गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 991

विभागीय आयुक्तांकडून यवतमाळ जिल्ह्यातील निवडणूक कामकाजाचा आढावा

अमरावती, दि. 22 : विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक डॉ. निधी पाण्डेय यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालयाला भेट देऊन मतदार नोंदणी व निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सहाय्यक आयुक्त वैशाली पाथरे, तहसीलदार विठ्ठल कुमरे, शिवाजी मगर, स्नेहल देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम-2024 जाहीर केला आहे. मतदार यादीच्या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांची मतदार यादी निरीक्षक नेमणूक केली आहे. त्यानुसार डॉ. पाण्डेय यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मतदार संघांतर्गत येणाऱ्या दारव्हा उपविभागीय कार्यालयात सभा घेऊन मतदार यादी पुनरिक्षक कार्यक्रमाचा आढावा घेतला. याप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांच्या हस्ते दारव्हा तहसील कार्यालयातील ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक व प्रसिध्दी केंद्राचे उदघाटनही करण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत महाविद्यालयीन विद्यार्थीनींना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनवर मतदानाच्या प्रात्यक्षिकाव्दारे मार्गदर्शनही करण्यात आले.

दिग्रस विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुररिक्षण कार्यक्रमांतर्गत एकूण 4,901 मतदारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 1,947 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे. तसेच अठरा ते एकोनाविस वर्षे वयोगटातील 1,610 पुरुष आणि 1,006 महिला असे एकूण 2,616 नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती दारव्हाचे उपविभागीय अधिकारी श्री. खडसे यांनी बैठकीत दिली.

नवीन मतदार अर्ज स्वीकृती तसेच मतदार यादीतून अपात्र मतदार वगळणे, मतदार यादीमध्ये महिला व तरुण मतदारांची संख्या वाढविणे, दिव्यांग मतदारांच्या नावापुढे नोंदणी करणे, स्वीप व ईव्हीएम जनजागृती कार्यक्रम आदी उपक्रमांची विभागीय आयुक्तांनी माहिती घेतली. जिल्ह्यात मतदार यादी जनजागृती आणि ईव्हीएम जनजागृतीचे काम चांगले प्रयत्न सुरु असल्याबाबत डॉ. पाण्डेय यांनी समाधान व्यक्त केले.

00000

 

‘दिलखुलास’ कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत

मुंबई, दि. 22: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘डीप क्लीनिंग ड्राईव्ह’ मोहिमेची अंमलबजावणी’ या विषयावर बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांची मुलाखत उद्या प्रसारित होणार आहे.

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी महापालिकेनं कंबर कसली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेनं ‘डीप क्लिनिंग ड्राईव्ह’ मोहीम सुरु केली आहे. या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून मुंबईमधील विविध भागांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने स्वच्छता करण्यात येत आहे. या मोहिमेचे नियोजन, अंमलबजावणी व नागरिकांचा सहभाग याबाबत अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. शिंदे यांची मुलाखत शनिवार दि. 23 आणि सोमवार दि. 25 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

००००

 

महाराष्ट्राचे चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार

नवी दिल्ली, दि. 22 : वर्ष 2023 साठीचे  राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाले असून यात महाराष्ट्र राज्यातून चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 जानेवारी 2024 रोजी एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि  क्रीडा  मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह एकूण 9 खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’ व ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन  खेळाडूंना जाहीर झालेले आहेत. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना घोषित करण्यात आला आहे.

मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2023 महाराष्ट्रचे बॅडमिंटन पटू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे. उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांचा समावेश आहे. तर, तिरंदाजी या क्रीडा प्रकारासाठी ओजस देवतळे आणि आदिती स्वामी यांना आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे, तर ‘अर्जुन पुरस्कार’ हा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 15 लाख रुपयांच्या रोख पारितोषिकासह प्रमाणपत्र देखील दिले जाते.

ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत 21 वर्षीय ओजसने सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकून आणखी एक विक्रम केला. नागपूरचा गोल्डन बॉय तिरंदाज ओजस देवतळे याच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी त्याचे नाव जाहीर झाले आहे.

सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. 2023 मध्ये जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये 720  पैकी 711 गुण मिळवून वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत.

सलग चारवर्ष कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात येते.  खेळात तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट प्रदर्शनासाठी ‘अर्जुन पुरस्कार’ दिला जातो.  खेळाडूंच्या मागील चार वर्षांतील उत्तम प्रदर्शन, नेतृत्व, खेळ आणि त्यातील शिस्तीसाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते.

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळातील प्रशिक्षण देण्यासाठी आणि खेळाडुंकडून स्पर्धांसांठी उत्कृष्ट कार्य करून घेणा-या क्रीडा प्रशिक्षकांची ‘द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी शिफारस केली जाते.

खेळ आणि स्पर्धेमधील आजीवन कामगिरीसाठी ‘ध्यानचंद पुरस्कार’ दिला जातो. यामध्ये खेळाडूंच्या चांगले प्रदर्शन आणि सेवानिवृत्तीनंतरही संबंधित क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन देत राहण्यासाठी या पुरस्काराची शिफारस केली जाते. खाजगी अथवा सार्वजनिक क्षेत्रातील कॉर्पोरेट संस्था ज्या खेळाडू आणि खेळांना प्रोत्साहन देतात अशा संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन’ पुरस्काराने गौरिवण्यात येते. आंतर विद्यापीठ स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शनासाठी विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद ट्रॉफी दिली जाते.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन) अर्जुन पुरस्कार:ओजस देवताळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दिक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवन कुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बोल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब).

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

0000

‘जे एन-१’ला घाबरू नका, सतर्क रहा; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन

मुंबई, दि. २२ :  राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन  व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता कोविड अनुरूप वर्तणुकीचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केले आहे.

‘जेएन-१’ साठी आरोग्य यंत्रणा सज्ज असून, संशयित रुग्णांच्या चाचण्या वाढविण्याचे, त्यांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्याचे आणि त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्याचे त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रिल करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करण्याचे असे निर्देश प्रा. डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा पुणे येथे आढावा घेतला. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानचे संचालक धीरज कुमार, सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिकांचे आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच आरोग्य विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी बैठकीला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

‘जेएन-१’ हा व्हेरियंट धोकादायक नसला तरी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना डॉ. सावंत यांनी दिल्या. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी जिल्हा स्तरापासून घेण्यात यावी. यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करावी. ‘जेएन-१’वर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे गांभीर्याने आणि वस्तुस्थितीला धरून मॉकड्रिल करावे. हलगर्जीपणा न करता आरोग्य यंत्रणा, विलागीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत असल्याबाबत प्रत्यक्ष जाऊन तपासणी करावी आणि त्याबाबतचे व्हिडिओ तयार करून राज्य स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावेत. प्रत्येक जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असून चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशा सूचना डॉ. सावंत यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमासह जिल्हा रुग्णालय, आपला दवाखाना येथे फलक लावण्यात यावेत. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये चुकीची माहिती पसरू नये यासाठी माध्यमांना माहिती देण्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. या अधिकाऱ्यामार्फतच याविषयीची अधिकृत माहिती देण्यात यावी. जेणेकरून अफवा आणि चुकीची माहिती प्रसारित होणार नाही. प्रसारमाध्यमांनीही याविषयीचे वृत्त देताना वस्तुस्थितीची पडताळणी करावी आणि नागरिकांमध्ये विनाकारण भीती पसरेल अशी चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

0000

निलेश तायडे/विसंअ

मतदार यादीमधील नाव अद्यावत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

मुंबई, दि. २२ :  मतदार यादीत नाव तपासणे आणि नवीन नाव नोंदविणे यासाठी राजकीय पक्ष आणि त्यांच्या प्रतिनिधींनी लोकांना साक्षर करण्यासाठी निवडणूक अधिकारी यांना सहकार्य करावे  असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मंत्रालय येथे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नाव नोंदणी संदर्भात आयोजित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समवेत झालेल्या बैठकीत अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी  श्रीकांत देशपांडे  बोलत होते.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवीण महाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरीष सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रवींद्र पवार, आम आदमी पार्टीचे धनंजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) दिनकर तावडे, दीपक पारडीवाला, काँग्रेस पक्षाचे डॉ. गजानन देसाई, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे म्हणाले, विशेष संक्षिप्त पुनरिक्षण- २०२४ कार्यक्रमांतर्गत मतदार ओळखपत्रातील त्रृटी दुर करणे,  भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मतदार यादीत सुधारणा करणे, अस्पष्ट तसेच  अंधुक  छायाचित्र बदलुन त्याऐवजी संबंधित मतदाराकडून  योग्य दर्जाची छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यासोबत एक Booth Level Agent (BLA) राजकीय पक्षाने नियुक्त करुन सहकार्य करावे, अशी विनंतीही यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना केली.

मतदार नोंदणी, नाव वगळणी, तपशिलातील दुरुस्त्या या सुविधा https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विशेष संक्षिप्त पुर्नरिक्षण कार्यक्रम-2024 अंतर्गत राज्यामध्ये दि.27 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. यानंतर दि.27 ऑक्टोंबर, 2023 ते 9 डिसेंबर, 2023 या कालावधीत प्राप्त झालेल्या अर्जांनुसार दि.21डिसेंबर, 2023 पर्यत मतदार यादीमध्ये 8 लाख 50हजार 816 एवढी निव्वळ नाव नोंदणी झालेली आहे. यामुळे दि. 21 डिसेंबर,2023 रोजी राज्याच्या मतदार यादीतील एकुण मतदारांची संख्या 9 कोटी 16 लाख 83 हजार 79 एवढी झालेली आहे. यामध्ये महिला मतदार ४ कोटी ३९ लाख ३८ हजार ३१६ ,पुरुष मतदार ४ कोटी ७७ लाख ३९ हजार ३८८ इतके असून तृतीय पंथी ५३७५ इतके मतदारांची नोंद झाली आहे. मतदार नोंदणी बाबत राजकीय पक्षांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल.मतदार संघ निहाय असलेले मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असेही असेही मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी सांगितले

पदवीधर विधानपरिषद मतदार नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी एकूण 61 हजार 390, कोकणसाठी 85 हजार 667 इतकी नोंदणी झाली आहे. तसेच दि.21 डिसेंबर पर्यत मुंबईसाठी 29 हजार 446 व कोकणसाठी 1 लाख 8हजार 76 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक विधानपरिषद मतदारांच्या नाव नोंदणीमध्ये प्रारुप मतदार यादीमध्ये मुंबईसाठी 11 हजार 155 व नाशिकसाठी 53 हजार 518 एवढी नोंदणी झाली आहे. दि.21 डिसेंबर पर्यत मुंबई साठी 2हजार 820 व नाशिकसाठी 11 हजार 268 एवढे आणखी अर्ज प्राप्त झालेले आहेत. मतदार नोंदणीची प्रक्रिया ही निवडणूकीमध्ये उमेदवाराच्या नामनिर्देशनाच्या दिनांकाच्या 10 दिवस अगोदर पर्यत सुरु असते, अशीही  माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी यावेळी दिली.

००००

संध्या गरवारे/विसंअ                             

 

 

ओबीसी विद्यार्थींच्या वसतिगृहासाठी भाडे तत्त्वावर इमारतीसाठी इमारत मालकांकडून अर्ज आमंत्रित 

मुंबई, दि. २२ : इतर मागासवर्ग  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये मुलांचे एक व मुलींचे एक शासकीय वसतिगृह सुरु करावयाचे आहे. विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या  30 जानेवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये मुंबई उपनगर जिल्ह्यात दोन शासकीय वसतिगृह सुरु करण्यात येणार आहेत. या परिसरातील बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, सिडको तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांचेकडून इमारत भाडेतत्वावर घेण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

इतर मागास प्रवर्गातील मुलांकरिता १०० मुलांच्या क्षमतेचे  एक शासकीय वसतिगृह आणि इतर मागास प्रवर्गातील मुलींकरिता १०० मुलींची क्षमता असलेले एक शासकीय वसतिगृह अशा दोन वसतिगृहाकरीता इमारत तपशिल असा आहे. इमारत मुंबई उपनगर परिसरात असणे आवश्यक आहे. किमान क्षेत्रफळ दहा हजार चौ. फुट असावे. या इमारतीमध्ये १० स्वच्छतागृह व १० स्नानगृहाची सुविधा असावी. इमारत अधिकृत असावी व पूर्णत्वाचा दाखला असावा. कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार इमारत मालक देण्यास तयार असलेबाबत संमतीपत्र देणे आवश्यक राहील. प्रत्येक वसतिगृहाकरिता स्वतंत्र दोन इमारती आवश्यक आहेत.

इच्छूक म्हाडा, सिडको, बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच खासगी इमारत मालक, बांधकाम विकासक यांनी नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर, आर सी चेंबुरकर मार्ग, प्रशासकीय इमारत, ४ था मजला, चेंबुर (पूर्व), मुंबई ७१, (दूरध्वनी क्रमांक ०२२ २५२२२०२३) या कार्यालयामध्ये लेखी स्वरूपात अर्ज करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

००००

शैलजा पाटील/विसंअ

 

‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – पर्यटन मंत्री गिरीश महाजन 

मुंबई, दि. २२ : मुंबईत  २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित करण्यात आला आहे. हा फेस्टिव्हल यशस्वी करण्यासाठी मुंबई फेस्टिव्हल समितीसह सर्व सहभागी संस्थांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी  दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत २० ते २८ जानेवारी दरम्यान आयोजित होणाऱ्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ पूर्वतयारीबाबत झालेल्या आढावा बैठकीत पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा, ड्रीम स्पोर्ट्सचे सिध्देश्वर मिश्रा यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री.महाजन म्हणाले की, देशातील आणि विविध परदेशातील नागरिकांना मुंबईचे आकर्षण आहे. फेस्टिव्हलच्या माध्यमातून महाराष्टाची संस्कृती पर्यटकांना सांगण्यासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या महोत्सवामध्ये व्यावसायिक, भागधारक, शॉपिंग मॉल, कला दालने, सिनेमा गृह, हॉटेल, फूड कोर्ट, साहसी क्रीडा केंद्रे, मनोरंजन केंद्रे, गाईडेड सीटी टूर, सीटी टूर यांचा समावेश असणार आहे. मुंबई फेस्टिवलची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध समाज माध्यमांचा प्रभावी वापर करुन या महोत्सवात लोकांचा सहभाग वाढविण्यात यावा.

मुंबई महोत्सवाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे. महोत्सवासाठी कमी कालावधी राहिला असल्याने महोत्सवाच्या कार्यक्रमांसाठी लागणा-या विविध परवानग्या, महोत्सवाचे नियोजन, वेळापत्रक व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबतचे सविस्तर सादरीकरण संबंधित संस्थेने तयार करावे. मुंबईचे डबेवाले, मुंबईची सांस्कृतिक कोळी बांधव, मुंबईचे शेअर मार्केट, मुंबईचे हॉलीवुड स्टार, मुंबई चौपाटी या सर्वांना मुंबई फेस्टिवल मध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. शासनाच्या सर्व यंत्रणा आणि अशासकीय संस्थांनी समन्वयाने काम करावे, असेही आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 22 (जि. मा. का.) : मिरज शहरातील वाहतुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता महत्वाचा आहे. या रस्त्याच्या कामाला संबंधित सर्व यंत्रणानी गती द्यावी. कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये. या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ते कामाच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर, महानगरपालिकेचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, विद्युत अभियंता अमर चव्हाण, नगर आणि शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग, महावितरण, परिवहन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, रस्त्याचे काम पूर्ण होण्यासाठी विजेचे खांबांचे स्थलांतर, एस. टी. महामंडळाकडील रस्त्यालगतची भिंत तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची भिंतीबाबतचे काम, मालकी हक्काच्या जागांसाठी मोबदला आदिंबाबत सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सहकार्याने गतीने कार्यवाही करावी. या रस्त्याचे काम त्वरेने पूर्ण होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महानगरपालिका, महावितरण, राज्य परिवहन विभाग यासह संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने व सहकार्याने कार्यवाही करावी. रस्त्याच्या मधोमध फुलझाडे लावावीत. दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर लावावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

00000

 

पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम वाटप करावी – पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दि. 22 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा):अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानग्रास्त शेतकऱ्यांना पिक विमा योजनेच्या माध्यमातून मिळणारा विम्याचा लाभ पिक विमा कंपनीने तत्काळ वाटप करावा. जेणे करून शेतकऱ्यांना योग्य वेळेत आर्थिक मदत प्राप्त होईल. तसेच दिव्यांगांना स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांची जिल्ह्यात  प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.


आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना व पीक विमा योजना, दिव्यांग निधी खर्चाबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, नाशिक महानगरपालिका अपर आयुक्त प्रदीप चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) एफ. बी. मुलाणी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महावेध हवामान केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक राहुल व्यास, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नितीन ठोके, ओरिएंटल पीक विमा कंपनीचे राज्य व्यवस्थापक विनायक दिक्षीत, जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे सदस्य शेतकरी भाऊसाहेब जाधव, अजित खर्जुल, शांताराम वंजारी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


पालकमंत्री  दादाजी भुसे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील ज्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता, त्यांना निकषानुसार लाभ देण्याचे शासनाने ठरविले आहे. त्या अनुषंगाने सर्व बँकांनी शाखानिहाय या योजनेचा लाभ आवश्यक त्यासर्व शेतकरी लाभार्थ्यांना होईल यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. तसेच लीड बँकेने सर्व बँकांना सूचित करावे की, विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना व इतर लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभाची रक्कम ही इतर कोणत्याही कारणास्तव वळती करू नये. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री पिक विमा योजनेत जिल्ह्यातील साधारण 5 लाख 88 हजार 648 शेतकरी सहभागी झाले असून यातील आतापर्यंत पिक विमा कंपनीने 57 कोटी 46 लाखंची विमा रक्कम वाटप केली आहे. यातील उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर विमा रकमेचे वाटप करण्यात यावे. तसेच सोयाबीन, मका व बाजरी या पिकांसोबतच कापूस पिकाचा समावेश करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पिक विमा योजनेचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.
महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका यांना एकूण निधीच्या 5 टक्के निधी दिव्यांगांच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. हा निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यावर खर्च करण्यात यावा. जेणे करून दिव्यांग व्यक्तिंना आर्थिक पाठबळ मिळून त्या स्वत:च्या पायावर आत्मनिर्भरपणे उभे राहू शकतील. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यात यावे. तसेच शहारात तयार होणारे दिव्यांग भवन लवकरात लवकर तयार करून दिव्यांग भवानाच्या माध्यमातून त्यांच्यासाठी असणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळण्यास मदत होईल. दिव्यांगांच्या पुर्नवसनाकरिता सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करून त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश ही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.
दिव्यांग निधी खर्चाबाबतच्या आढावा बैठकीत नाशिक व मालेगाव महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका यांनी दिव्यांग निधी खर्चाबाबत केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदेमार्फत nashikdivyang.in या ॲपची निर्मीती केली आहे. या ॲपद्वारे कार्यालय अथवा संबंधित दिव्यांग व्यक्ती देखील लॉगइन करून माहिती भरू शकते. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी माहिती दिली.
00000000

 

पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यात येईल – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे, दि. २२ : पुणे शहरात विविध ऐतिहासिक वास्तू असून त्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधींच्या माध्यमातून (सीएसआर) जतन व संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, याकरीता समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, पुणे महानगरपालिका सांस्कृतिक कला केंद्राच्या उपायुक्त डॉ. चेतना केरुरे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर, सुनील देवधर, धीरज घाटे, शैलेश टिळक, कुणाल टिळक, अभिनेता क्षितिज दाते आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्यासाठी ‘सीएसआर बँक’ विकसित करण्यात येणार आहे. स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांचे अकाली निधनानंतर त्यांच्या संकल्पनेतील पुणे शहर अस्तित्वात आणण्यासाठी आणि त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुणे शहराचा सर्वांगिण विकास हीच स्व. मुक्ताताईंना खरी श्रद्धांजली ठरेल,असे श्री. पाटील म्हणाले.

स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्यावर पुण्यातील गॅलक्सी रुग्णालय येथे कर्करोगांवर उपचार करण्यात आले. या रुग्णालयात सामान्य नागरिकांना कर्करोगांचे मोफत उपचार मिळावेत, याकरीता त्यांच्या नावाने ‘पेटस्कॅन केंद्र’सुरु करण्यात येणार आहे. रेडिएशन उपचार पद्धतीदेखील उपलब्ध करुन देण्यात येईल, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावरील महागडे उपचार मोफत  मिळण्यास मदत होणार आहे.

श्री. मुळीक म्हणाले, स्व. आमदार मुक्ताताई टिळक यांच्या महापौरपदाच्या काळात आधुनिक पुण्याचे नेतृत्व दिसून येते. त्यांच्या काळात पुणे मेट्रो कामांचा पाठपुरावा, ऐतिहासिक वास्तूंमध्ये क्रांतीकांरकाचे संग्रहालय आदी कल्पना त्यांनी मांडल्या. त्या आज पूर्ण होतांना दिसत आहेत.

श्री. ठाकूर म्हणाले, पुणे शहरात विविध क्रांतीकारक होऊन गेलेत. या क्रांतिकारकांची ओळख नव्या पिढीला व्हावी यासाठी संग्रहालयाचे लोकार्पण करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे बलिदान लक्षात घेता आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. नागरिकांच्या मनात देशप्रेम निर्माण करण्यासाठी अशा वास्तूचे जतन करण्याची गरज आहे, असेही श्री. ठाकूर म्हणाले.

श्री. मोहोळ, श्री. देवधर, श्री. घाटे यांनीही विचार व्यक्त केले.

शैलेश टिळक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. क्रांतीकारकारकाचे संग्रहालय ही मुक्ता टिळक यांची संकल्पना होती; आज त्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद होत आहे. पुणे शहरातील वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने प्रयत्न करावे, असे आवाहन  त्यांनी केले.

यावेळी श्री. पाटील यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेकडून नाना वाडा येथील क्रांतीकारक संग्रहालयाच्या देखभालीबाबत करण्यात आलेल्या करारनाम्याची प्रत श्री. ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

०००००

 

ताज्या बातम्या

हिंजवडीकरांच्या समस्या सोडविण्यासाठी नियोजनाचा बृहत आराखडा सादर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. 10 : पुण्यातील हिंजवडी ‘आयटी’ पार्क परिसरातील वाहतूक कोंडी, पूरस्थिती तसेच पिण्याच्या पाण्यासह सर्व समस्या सोडविण्यासाठी पुणे ‘मनपा’, पिंपरी चिंचवड ‘मनपा’, पुणे महानगर विकास प्राधिकरण आणि...

विधानसभा कामकाज

0
शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना आणणार - कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट; कृषी विकासासाठी सर्व योजनांमधून ६९...

पारधी समाजातील युवकांनी व्यवसाय अर्थसहाय्यासाठी ३० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

0
मुंबई, ‍‍दि. १० :- मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवकांनी व्यवसाय करण्यास अर्थ साहाय्य मिळण्यासाठी ३० ऑगस्ट २०२५ पर्यंत...

विधानसभा लक्षवेधी

0
पीक कापणी, काढणी पश्चात नुकसान भरपाईचे वाटप प्रगतीपथावर – कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत परभणी जिल्ह्यात सन २०२४-२०२५ या...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
उरण फाटा येथे पारसिक हिलवर झालेल्या वृक्षतोडीची चौकशी - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १० : नवी मुंबई मधील सीबीडी बेलापूर येथील उरण फाटा येथे...