गुरूवार, जुलै 10, 2025
Home Blog Page 992

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेचा निकाल जाहीर

मुंबई दि.२१ :  राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने १ ऑगस्ट ते ५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘अभिव्यक्ती मताची’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करून घेण्याच्या उद्देषाने या स्पर्धेत जाहिरातनिर्मिती, भित्तिपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य लेखन या  तीन गटात  स्पर्धकांनी सहभाग घेतला.

यामध्ये जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी ६९, भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी ६३८ आणि घोषवाक्य लेखन स्पर्धेसाठी ३५७ प्रवेशिका प्राप्त झाल्या. त्यातुन प्रत्येक स्पर्धेसाठीच्या परीक्षकांनी या प्रवेशिकांचे परीक्षण करून मुल्यांकन केले.

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आगामी राष्ट्रीय मतदार दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच येत्या २४ जानेवारी २०२४ रोजी नियोजित आहे. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांसोबतच, स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला सहभागाचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. सोहळ्याचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहिर करुन सर्व विजेते आणि सहभागी स्पर्धकांना कळवले जाईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळवण्यात आले आहे. स्पर्धेचा निकाल असा आहे.

जाहिरातनिर्मिती स्पर्धा

जाहिरातनिर्मिती स्पर्धेत प्रथम पारितोषिक कुणाल कोळी (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) यांना तर निशा उपाध्याय (गुरु नानक कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.  शुभम फाळके (जे.के कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन) तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे‌.

यासोबतच वेदांती आखाडे (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि तेजस साळगावकर (बी.एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट – अप्लाईड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी प्रकाश कुंटे आणि विकास पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. जाहिरातनिर्मिती स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. १ लक्ष, ७५ हजार, आणि रु. ५० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. १० हजारचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धा

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेत प्रथम पारितोषिक  दया गुजर (मंथन आर्ट स्कुल) यांनी मिळवले असून  आकांक्षा किरण मर्दे (सोफिया पॉलिटेक्निक) यांना द्वितीय पारितोषिक आणि अभिषेक ठाकरे (मंथन आर्ट स्कूल) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच संयुक्ता पवार (जे.के अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाइन) आणि धनश्री भागडकर (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी संदीप सावंत आणि डॉ. संतोष पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. ५० हजार, रु. २५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

घोषवाक्य लेखन स्पर्धा

घोषवाक्य लेखन स्पर्धेत  प्रथम पारितोषिक साहिल कासारे (संवाद आणि पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ, कलिना, सांताक्रूझ) यांना  जाहीर झाले असून वैष्णवी धुरी (बी.एस. बांदेकर ललित कला महाविद्यालय) यांना द्वितीय पारितोषिक आणि अवेदिका रहिंज (सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट) यांना तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. यासोबतच समृद्धी पाटील (सोफिया- श्री बी.के. सोमानी मेमोरियल पॉलिटेक्निक), साक्षी चक्रदेव (मंथन- द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह अॅडव्हर्टायझिंग अँड आर्ट) आणि आदिती पोसणे (बी.एस.बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट्स, सावंतवाडी) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे.

या स्पर्धेसाठी डॉ. निर्मोही फडके आणि प्रा. अभिजित देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. घोषवाक्य लेखन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रु. २५ हजार, रु. १५ हजार आणि रु. १० हजार तसेच सन्मानचिन्ह, तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून प्रत्येकी रु. ५ हजारचे पारितोषिक देऊन गौरवले जाईल.

या स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल सर्व विजेते आणि स्पर्धकांचे निवडणूक कार्यालयाने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

000000

वंदना थोरात/वि.सं.अ.

जगातील रोजगाराची मागणी लक्षात घेवून कुशल मनुष्यबळ विकसित करणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि.२१ :   महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्राला मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळेल.राज्यात सहा ठिकाणी ही सुविधा केंद्र आहेत.  परदेशात रोजगार प्राप्त व्हावा यासाठी जगातील रोजगाराची मागणी आणि त्याप्रमाणे कुशल मनुष्यबळ विकास देणे शासनाला शक्य होईल असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय व राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) यांच्यामध्ये सामंजस्य करारावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते.

कौशल्य विकास मंत्री श्री.लोढा म्हणाले की, राज्यात महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत जे उमदेवार परदेशात नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांना सर्व प्रकारचे रोजगाराभिमुख  प्रशिक्षण येथे दिले जाईल. जगातील प्रत्येक क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी ची माहिती मिळाली तर विद्यार्थ्यांना त्याच प्रकारचे शिक्षण देणे शक्य होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया व डिजिटल इंडियाच्या माध्यमातून  देशभरात अनेक उपक्रम राबविले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राबविण्यात येत आहेत असेही श्री.लोढा यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी म्हणाले की, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांसाठी बदलत्या काळाची पाउले ओळखून कौशल्य  विकासाला बळ देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडियाला प्रोत्साहन दिलेले आहे.अनेक व विकसित देशांची उदा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, जपान येथे  कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. असे देश कुशल मनुष्यबळाची  मागणी करत आहेत. भारतातील सद्यस्थितीत तरूण वयोगटाचे प्रमाण ६२ टक्क्यावरून सन २०३० पर्यंत ६८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या  देशाला मिळत आहे. महाराष्ट्र शासनाशी झालेल्या करारामुळे राज्यातील युवकांना याचा नक्की लाभ होईल असेही ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी यांच्या दोन नवीन कार्यालयांचा आरंभ आणि महाराष्ट्र इंटरनॅशनलच्या टेलिग्राम, व्हॉट्सअँप चॅनल, लिंक्डइनचा  आरंभ करण्यात आला.

व्हॉट्सअप चॅनल:https://whatsapp.com/channel/0029VaFSFjiKmCPXrP0ncr38,

_LinkedIn Page_: https://shorturl.at/hpwQW अशा या लिंक आहेत.

या कार्यक्रमाला कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त डॉ.रामास्वामी एन.,व्यवसाय  शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी,कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर,राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एन. एस. डी. सी.) चे संचालक वेदमनी तिवारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे यांनी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

नागरिकांनो घाबरू नका, काळजी घ्या; कोरोना जेएन-वन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेचा आढावा

राज्यात ६३ हजार विलगीकरण, ३३ हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध

ठाणे, दि.21 (जिमाका) :- देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश दिले. नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले. राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याचीही ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून ही बैठक घेतली. त्यामध्ये आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते.

ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी व योग्य पद्धतीने ते कार्यान्वित आहेत की नाही याची खात्री करतानाच लसीकरणाचा आढावा घ्यावा, ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

लस व औषध साठा पुरेसा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. आरोग्य यंत्रणेने टास्क फोर्सची स्थापना करुन त्यातील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी कोविड सेंटर, विलगीकरण बेड्स, आयसीयू बेड्स, व्हेंटिलेटर बेड्सच्या सद्य:स्थितीबाबतचीही माहिती यावेळी घेतली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील यंत्रणा संपूर्णपणे सज्ज आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नागरिकांना केले.

सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

शासन यंत्रणा एकजुटीने कोणत्याही परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूर्णत: सज्ज आहे. यंत्रसामुग्री, औषध साठा, इतर साधनसामुग्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनतेने घाबरु नये. काळजी घ्यावी काळजी, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ, आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी आरोग्ययंत्रणेच्या सज्जतेबाबत माहिती दिली. आरोग्य यंत्रणेच्या सर्व यंत्रसामुग्री, इतर सर्व यंत्रणा योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याची खात्री करण्यासाठी दि. 15 ते 17 डिसेंबर 2023 या कालावधीत ठिकठिकाणी मॉक ड्रिल घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात 63 हजार विलगीकरण बेड्स, 33 हजार ऑक्सिजन बेड्स, 9 हजार 500 आयसीयू बेड्स व सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 45 रुग्ण (मुंबई-27, पुणे-8, ठाणे-8,कोल्हापूर-1, रायगड-1) आढळून आले आहेत, असे श्री. म्हैसकर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी जेएन वन या नव्या व्हेरिएंटबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येईल, असे सांगितले.

000000

 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी

पुणे, २१ : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ५० व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शनस्थळाची पाहणी करुन पूर्वतयारीचा आढावा घेतला. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे उपक्रम प्रदर्शनस्थळी आयोजित करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे, सहसंचालक रमाकांत काठमोरे, उपसंचालक डॉ.कमलादेवी आवटे, डॉ. नेहा बेलसरे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, महाराष्ट्राची सांस्कृतिक विविधता ही सर्वांच्या उत्सुकतेचा आणि आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे राज्याच्या संस्कृतीचे दर्शन या प्रदर्शातून घडले पाहिजे. प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना क्रीडा संकुलाचा परिसरही दाखविण्यात यावा. राज्याच्या विविध भागातील खाद्यसंस्कृतीची ओळख करुन देणारी भोजन व्यवस्थाही करण्यात यावी, असे श्री. केसरकर म्हणाले.

५० वे राष्ट्रीय बालवैज्ञानिक प्रदर्शन २०२३

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत चक्राकार पद्धतीने मुलांसाठी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार ५० व्या प्रदर्शनाचे यजमानपद महाराष्ट्राला मिळाले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने २६ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत वैज्ञानिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

शालेय वयातच विज्ञान विषयाची गोडी लागावी व वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. वय वर्षे १४ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना आपली सृजनशीलता दाखवण्यासाठी बाल वैज्ञानिक प्रदर्शनीच्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या प्रदर्शनामध्ये राज्यशासन, केंद्रीय विद्यालय संघटन, नवोदय विद्यालय, ॲटोमिक एनर्जी केंद्रीय विद्यालय, तिबेटीयन विद्यालय, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संलग्न शाळा आदी विविध व्यवस्थापनाच्या शाळा सहभागी होणार आहे. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामधून राष्ट्रीय स्तरावर पात्र झालेले विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून शालेय विद्यार्थी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला भेट देणार आहे.

या प्रदर्शनात २२५ दालनाची उभारणी केली जाणार केली आहे. विज्ञानविषयक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राज्यातील शासकीय व अशासकीय संस्थांचे दालन, महाराष्ट्राची संस्कृती, पारंपरिक खेळणी आदी विषयांचे नाविन्यपूर्ण दालन या बालवैज्ञानिक प्रदर्शनाचे वैशिष्ट्य राहणार आहे. विविध सांस्कृतिक कलागुणाचे सादरीकरण, विविध मार्गदर्शनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती श्री. येडगे यांनी दिली आहे.

०००००

साहित्य अकादमीसाठी कांदबरीकार कृष्णात खोत यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. २१ : अस्सल ग्रामीण शैली हे मराठी भाषेचे वैभव आहे. या शैलीला भारतीय साहित्य विश्वात ओळख निर्माण करून देण्याची, भारतीय साहित्य विश्व समृद्ध करण्याची कामगिरी कादंबरीकार कृष्णात खोत यांनी केली आहे. त्यांच्या या शैलीवर आणि प्रतिभेवर साहित्य अकादमी पुरस्काराने शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी ‘रिंगाण’ मधून मराठी साहित्याचे रिंगण समृद्ध करणारी अभिमानास्पद कामगिरी केली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कादंबरीकार कृष्णात खोत यांचे साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

‘आधुनिक जगरहाटीत ग्रामीण संस्कृती आणि आपल्या गावा- गावातील बदलत्या जीवनाचं नेमकं चित्रण करण्यात श्री. खोत यांचा हातखंडा आहे. तो त्यांनी आपल्या लेखनातून अनेकदा सिद्ध केला आहे. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. त्यांच्या साहित्यकृतीचा सन्मान होण्याने मराठी साहित्य क्षेत्रातील नवोदितांना प्रेरणा मिळणार आहे.लेखक, कादंबरीकर कृष्णात खोत यांच्या हातून यापुढेही अशीच दर्जेदार साहित्यसेवा घडत राहील, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

0000

नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. २१ : देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेसाठी सन २०२३ -२४ या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात आले होते, मात्र  नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याने या योजनेसाठी अर्ज  करण्यास ४ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम(IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आयटी(NIT),आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) इन्स्टीट्यूट ऑफ नॅशनल इंपार्टन्स व इतर कॉलेज या शैक्षणिक संस्थांसह भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांसाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते. राज्यातील १०० अनुसूचित जातीच्या, नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. राज्यातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांना समान संधी देण्याच्या उद्देशाने विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळनिहाय १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांस संबंधित विद्यापीठ/ संस्थेने अभ्यासक्रमासाठी ठरवून दिलेले पुर्ण शिक्षण शुल्क, नोंदणी फी, जिमखाना, ग्रंथालय, संगणक इत्यादी शुल्क संबंधित  विद्यापीठ/ शैक्षणिक संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बॅक खात्यात जमा करण्यात येते. वसतीगृह व भोजन शुल्क याचा देखील संस्था आकारणीनुसार खर्च देण्यात येणार आहे. तसेच पुस्तकांसाठी ५ हजार रुपये व इतर शैक्षणिक खर्चासाठी ५ हजार असे रुपये १० हजार दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत.

या योजनेविषयी अधिक माहिती, जाहिरात, अर्ज व नियमावली शासनाच्या  www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  जलद दुवे रोजगार या मथळ्याखाली उपलब्ध आहे. या संकेतस्थळावरुन विहित अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन कागदपत्रासह ४ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य,३ चर्च पथ पुणे येथे करावा. पदवी, पदव्युतर पदवी,  पदव्युतर पदविका पूर्णवेळ अभ्यासक्रसाठी या योजनेचा लाभ देय असणार आहे.  राज्यातील रहिवासी असलेल्याच विद्यार्थ्याना याचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थानी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्यात आले आहे.

000

शैलजा पाटील/स.सं

‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई, दि.२१ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी केले आहे.

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी https://innovateindia.mygov.in/mr/ppc-2024 ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  या लिंकद्वारे १२ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक एनसीइआरटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सन २०२४ करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.

0000

शैलजा पाटील/स.सं.

मुंबईत २६ डिसेंबरपासून ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन

मुंबई, दि. 21 : उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्तगत महालक्ष्मी सरस प्रदर्शन  व विक्री 26 डिसेंबरपासून वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर सुरू होत आहे. 26 डिसेंबर ते 8 जानेवारी अशा दोन आठवड्यांच्या कालावधीत महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला बचतगटांना सक्षम करणाऱ्या सरस प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.

दरवर्षी लक्षणीय आर्थिक उलाढाल करणाऱ्या बचत गटांना सक्षम बनवण्यात महालक्ष्मी सरस प्रदर्शन महत्त्वाची भूमिका बजावते. गेल्या दीड दशकात सुमारे 8 हजार बचत गटांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून सहभाग घेतला आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्री तसेच या उत्पादनाला शहरी बाजारपेठ अनुभवण्याची संधी मिळते. याशिवाय या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा परिचय शहरातील नागरिकांना होतो.

या प्रदर्शनात भरतकाम केलेल्या साड्या, ज्यूटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बूट,ड्रेस मटेरियल, साड्या, चादरी, कार्पेट आणि पडदे यांचा समावेश असणार आहे. या वस्तू केवळ वैशिष्ट्यपूर्णच नाहीत तर उच्च दर्जाच्याही आहेत, शिवाय ग्रामीण कारागिरांचे कौशल्य आणि कारागिरीचे प्रदर्शन करतात. घरगुती मसाले, पापड, कुरडई आणि इतर खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल असतील. मुंबईकर आणि संपूर्ण देशाने ग्रामीण भारतातील खाद्यसंस्कृती आणि नावीन्यपूर्ण उपक्रम साजरा करणे हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

सरस प्रदर्शनात, ग्रामीण महिलांनी बनवलेल्या विविध प्रकारच्या हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असतील. ग्रामीण भागातील स्वादिष्ट खाद्यपदार्थ, जळगावच्या भरीत ते कोकणातील मच्छी आणि तांदळाच्या भाकरीपर्यंत पर्यटकांना ग्रामीण भागातील चव चाखण्याची आणि खरेदीची संधी मिळणार आहे. कोल्हापुरातील तांबडा-पंढरा रस्सा आणि सोलापूरची शेंगाची चटणी यांसारखे पारंपरिक पदार्थही उपलब्ध असतील. याशिवाय राज्याच्या विविध भागातील मसाले आणि हातसडीचे तांदूळ प्रदर्शनात असतील. अधिकाधिक नागरिकांनी सरस प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी, ग्रामीण भागातून दर्जेदार उत्पादन घेऊन आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन मंत्री श्री.महाजन यांनी केले आहे.

000

संध्या गरवारे/स.सं.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेट

पुणे, दि.२१: भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय पुस्तक न्यास तर्फे आणि महाराष्ट्र शासन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस आदी उपस्थित होते.

पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून मंत्री श्री. पाटील म्हणाले, राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात वाचन संस्कृती वृद्धींगत होण्यासाठी पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पुणे येथे आयोजित पुस्तक महोत्सवालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यामध्ये शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने भेट देऊन उत्सुकतेने पुस्तकांची खरेदी करीत आहेत. ही आजच्या पिढीसाठी चांगली बाब आहे. येथे पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री झालेली असून २४ डिसेंबरपर्यंत आणखीन पुस्तकांची विक्रमी विक्री होईल, अशा शब्दात या भव्य आयोजनाबद्दल श्री. पाटील यांनी कौतुक केले.

या पुस्तक महोत्सवामुळे चार विश्वविक्रम मोडण्यात आले आहे हे पुस्तक महोत्सवाचे वैशिष्ट आहे. दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून त्यामध्ये पुस्तक प्रकाशन, पुस्तकावर चर्चा, पुस्तक वाचनाविषयी मार्गदर्शन तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यमहोत्सव असे भरगच्च कार्यक्रम होत आहेत.

यावेळी श्री. पाटील यांनी विविध प्रकाशनाच्या दालनांना भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून त्यांनी महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमांची माहिती घेतली.

0000

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित

नागपूर, दि २० : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईत होणार असल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत, तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभेत प्रत्यक्षात १०१ तास १० मिनिटे कामकाज झाले. यामध्ये रोजचे सरासरी कामकाज १० तास ५ मिनिटे इतके झाले. या अधिवेशनात सदस्यांची सरासरी उपस्थिती ही ९३.३३ टक्के इतकी होती, तर कमीत कमी उपस्थिती ६४.७१ टक्के इतकी होती. एकूण सरासरी उपस्थिती ही ८१. ६९ टक्के इतकी होती.

अधिवेशनात एकूण ७५८१ तारांकित प्रश्न प्राप्त झाले. त्यातील २४७ स्वीकृत झाले, तर ३४ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. अधिवेशनात दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा झाली. अधिवेशनात एकूण २४१४ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी ३३७ स्वीकृत, तर ७० लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली.

या अधिवेशनात विधानसभेत १७ शासकीय विधेयके पूर:स्थापित  तर १७ संमत झाले. मागील अधिवेशन सत्रातील एक विधेयकही संमत झाले.  नियम २९३ अन्वये ३ सूचनांवर चर्चा झाली.  अशासकीय ठरावाच्या एकूण २६३ सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी १८७ सूचना मान्य  करण्यात आल्या.

या अधिवेशनात विधानपरिषदेत सभागृहाच्या एकूण बैठकींची संख्या 10, प्रत्यक्षात झालेले कामकाज 71 तास 09 मिनिटे, रोजचे सरासरी कामकाज 7 तास 06 मिनिटे तसेच संपूर्ण अधिवेशनासाठी सभागृहात सदस्यांची  जास्तीत जास्त उपस्थिती 95.55 टक्के, कमीत कमी उपस्थिती 60 टक्के तर एकूण सरासरी उपस्थिती 82.36 टक्के होती.

तारांकित प्रश्न त्यापैकी प्राप्त झालेल्या प्रश्नांची संख्या १८१९ आणि स्वीकृत झालेल्या प्रश्नांची संख्या 452, उत्तरीत झालेल्या प्रश्नांची संख्या 47 इतकी आहे.

नियम 289 अन्वये प्रस्ताव प्राप्त झालेल्या प्रस्तावांची संख्या 42 आहे. लक्षवेधी सूचना प्राप्त झालेल्या सूचनांची संख्या 623, मान्य झालेल्या सूचनांची संख्या 142 तर चर्चा झालेल्या सूचनांची संख्या 30 अशी आहे. विशेष उल्लेखांच्या सूचना पैकी प्राप्त सूचनांची संख्या 119 व मांडण्यात आलेल्या व पटलावर ठेवलेल्या सूचनाची संख्या 133 आहे. एकूण प्राप्त औचित्य  मुद्दे 115, नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा: प्राप्त सूचनाची संख्या 26 ,मान्य झालेल्या सूचनांची संख्या 25 ,चर्चा झालेल्या सूचना पाचहून अधिक आहेत.

शासकीय विधेयके : विधानसभा विधेयके पारित करण्यात आलेली संख्या 14, संयुक्त समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संमत करण्यात आलेले विधानसभा विधेयक 1, विधानसभेकडे शिफारशी शिवाय परत पाठवण्यात आलेली विधेयके(धन विधेयके) तीन.

०००

दीपक चव्हाण/‍प्रवीण भुरके/विसंअ/

 

ताज्या बातम्या

अतिवृष्टी व पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज – विजयलक्ष्मी बिदरी

0
बाधित कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्याला प्राधान्य नागपूर व वर्धा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट पुरपरिस्थिती हातळण्यासाठी आंतरराज्य समन्वय महसूल, पोलीस व जलसंपदा विभागांचा समन्वय  नागपूर, दि...

कफ परेड फेडरेशनच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांचा विशेष सत्कार

0
मुंबई, दि. ९ : देशातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष म्हणून ॲड. राहुल नार्वेकर यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या...

पद्म पुरस्कारांसाठी शिफारसीसंदर्भात बैठक

0
मुंबई, दि. 9 : पद्म पुरस्कार २०२६ करिता केंद्र शासनास शिफारशी पाठविण्यासंदर्भात विधानभवनात राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत केंद्र शासनाला पद्म पुरस्कार २०२६...

परिचारिकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक – वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ

0
मुंबई, दि. 9 : "नर्सेस या आरोग्यव्यवस्थेचा कणा असून, त्यांच्या अडचणींविषयी शासन गंभीर आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्यात...

येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारक ‘बार्टी’ने ताब्यात घेऊन विकसित करावे – अन्न, नागरी...

0
मुंबई, दि. 9 : येवला येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाचा ताबा ‘बार्टी’ने घेऊन याचा उपयोग सर्वसामान्य लोकांसाठी आणि...