शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 990

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. 26 : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथून भारतीय वायु  सेनेच्या  विमानाने दुपारी 3.45 मिनिटांनी दिल्लीकडे प्रयाण झाले.

यावेळी वायू सेनेचे व नौदलाचे  वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार, पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

 

‘इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या सागरी सुरक्षेत आयएनएस इम्फाळ महत्त्वाची भूमिका बजावेल’ – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

मुंबई, दि. 26: पश्चिम आशियायी क्षेत्रात अर्थात ‘इंडो- पॅसिफिक’मधील सागरी सुरक्षा भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षेमध्ये भारतीय युद्धनौकांची कामगिरी मोलाची ठरते. या क्षेत्रातील सागरी सुरक्षेत भारतीय बनावटीची आयएनएस (इंडियन नेव्ही शीप) इम्फाळ ही युद्धनौका महत्त्वाची भूमिका बजावेल, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज केले.

नेव्हल डॉकयार्ड, कुलाबा येथे आयएनएस इम्फाळ या युद्धनौकेचे जलावतरण संरक्षण मंत्री श्री. सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नौसेना प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार, व्हाइस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी, किरण देशमुख, माझगाव डॉक शिपयार्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल, आयएनएस इम्फाळचे कमांडिंग ऑफिसर कमलकुमार चौधरी आदी उपस्थित होते.

आयएनएस इम्फाळ ही आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असल्याचे सांगत संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले की, या युद्धनौकेच्या निर्मितीसाठी देशाच्या चारही भागातून सहकार्य मिळाले आहे. ही युद्धनौका म्हणजे भारताच्या एकता आणि अखंडतेचे उत्कृष्ट उदाहरण असून ब्राम्होस मिसाईलने सज्ज आहे. स्पीड गन, रडार, अत्याधुनिक संपर्क यंत्रणा, सी गार्डियन्स, हेलिकॉप्टर सुविधेच्या सुसज्जतेसह ही युद्धनौका आहे. वैज्ञानिक, अभियंत्यांसह मजुरांनी एकत्र येऊन हे महाकाय काम साकारले आहे. देशाचे हित सर्वोतोपरी ठेऊन या युद्धनौकेची निर्मिती झाली आहे. या युद्धनौकेच्या निर्मितीत एमएसएमई, स्टार्ट अप उद्योगांचेही सहकार्य लाभले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले, आयएनएस इम्फाळ केवळ समुद्रात उद्भवणाऱ्या भौतिक धोक्यांचा सामना करणार नाही, तर त्याहूनही महत्वाचे म्हणजे आपली राष्ट्रीय एकात्मता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशविघातक कृत्यांना आळा घालेल. युद्ध हे कधी दोन देशांच्या सैन्यामध्ये होत नसते, तर दोन राष्ट्रात होते. त्यामुळे युद्धात संबंधित देशातील सर्व नागरिक सहभागी झालेले असतात. युद्धाचा त्या देशातील नागरिकांवर विपरीत परिणाम होत असतो.

हिंदी महासागर क्षेत्रात भारत ‘संपूर्ण सुरक्षा’ पुरवठादाराच्या भूमिकेत आहे. या प्रदेशातील सागरी व्यापार समुद्रापासून आकाशाच्या उंचीपर्यंत पोहोचेल, याची खात्री देतानाच संरक्षण मंत्री श्री. सिंह म्हणाले की, यासाठी मित्र देशांसोबत मिळून सागरी व्यापारासाठी सागरी मार्ग सुरक्षित ठेऊ. देशाचा बराचसा व्यापार हा सागरी मार्गाने होतो. त्यामुळे सागरी मार्गांच्या सुरक्षिततेसाठी भारत काम करीत राहील. आयएनएस इम्फाळ भारताचे सागरी सुरक्षेमधील वाढते बळ दाखविते. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात ‘जलमेव यस्य, बलमेव तस्य’म्हणजे ‘जिसका जल, उसका बल’या आपल्या सिद्धांताला मजबुती प्रदान करते.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात माझगाव डॉक शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिंघल यांनी आयएनएस इम्फाळचे महत्व विशद केले. नौसेना प्रमुख ॲडमिरल आर. हरिकुमार यांनीही आपले विचार व्यक्त केले. सुरूवातीला संरक्षण मंत्री श्री. सिंह यांनी सन्मान गार्डचे निरीक्षण केले. तसेच त्यांच्या हस्ते जहाज पट्टीचे अनावरणही करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान कॅप्टन श्री. चौधरी यांनी ‘कमिशनिंग ऑर्डर’चे वाचन केले. त्यानंतर युद्धनौकेवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ‘निशाण गार्ड’ने मान्यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमानंतर मान्यवरांनी जहाजाच्या आतील भागाचे निरीक्षण केले. कार्यक्रमाला नौसेनेचे अधिकारी, माझगांव डॉकचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

0000

मनिषा सावळे/निलेश तायडे, विसंअ

‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, हा विश्वास सार्थ ठरवला..!’; एमपीएससी उमेदवारांची भावना, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुंबई, दि. 26 :  ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये एमपीएससी व अन्य भरती प्रक्रियेतील उमेदवारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनीही या भावनांचा स्वीकार करतानाच, या सर्व उमेदवारांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आर्थिक दुर्बल -ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या पुढाकारामुळे राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रभावी बाजू मांडली. त्यामुळे उच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांचे आरक्षण मान्य केल्याने मराठा समाजासह अन्य विविध भरती प्रक्रियांमध्ये रखडलेल्या शेकडो उमेदवारांचा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर या उमेदवारांनी आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन आभार मानले.

मराठा समाजाचे ५ मे २०२१ रोजी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्य सरकारने राज्य लोकसेवा आयोग – एमपीएससीच्या १२ जाहिरातीं तसेच राज्यातील इतरही सरळसेवा भरतीत ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणाचे लाभ मराठा समाजाला देण्याचे धोरण राबवले होते. हे धोरण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरण-( मॅट) २ फेब्रुवारी २०२३ रोजी रद्द केल्याने २३ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय तसेच ३१ मे २०२१ च्या शासन निर्णयातील पूर्वलक्षी प्रभावाने होणाऱ्या नियुक्त्याही रद्द झाल्या होत्या. त्यामुळे ईडब्लूएसमधून होणाऱ्या मराठा उमेदवारांच्या नियुक्त्या थांबल्या होत्या. या सगळ्या घडामोंडीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे बारकाईने लक्ष होते. या सगळ्या गोष्टींचा ते सातत्याने पाठपुरावा करत होते. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी  महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनाही या प्रकरणात विशेष लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते. प्रशासकीय पातळ्यांवरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या उमेदवारांची बाजू भक्कमपणे मांडली जावी यासाठी प्रयत्न केले. उमेदवारांना बाजू मांडण्याकरता ज्येष्ठ विधिज्ञांपासून ते अनुषंगिक मदत मिळेल याकडे मुख्यमंत्र्यांचा कटाक्ष होता. या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजेच उच्च न्यायालयाने या उमेदवारांच्या भरतीचा मार्ग मोकळा होईल असा निर्णय दिला.

हा सर्व घटनाक्रम उलगडत आज या उमेदवारांनी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांची भेट घेत, त्यांचे आभार मानले. ‘आमच्या बाजूने निर्णय लागावा याकरिता मुख्यमंत्र्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले. करता येतील, ते सर्व प्रयत्न ते करत होते आणि केल्याचे आम्ही जवळून पाहिले आहे. यात मराठा उमेदवार व राज्य सरकार यांच्यामध्ये दुवा साधण्याचे काम मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्यांनी केले, अशी प्रतिक्रियाही या उमेदवारांनी यावेळी दिली. यामुळे गत ३-४ वर्षांपासून रखडलेली भरती प्रक्रिया, तसेच नियुक्ती आता मार्गी लागणार आहेत. यात अडकलेले साधारण ३००-४०० वर्ग-१ व २ चे मराठा समाजाचे उमेदवार तसेच १००-२०० इतर प्रवर्गातील उमेदवार यांच्या नियुक्त्याही देखील होणार आहेत. तसेच यापूर्वी झालेल्या सुमारे तीन हजार नियुक्त्यांवरील टांगती तलवारही दूर झाल्याने या सर्व उमेदवारांमध्ये तसेच आमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण परतल्याची भावनाही उमेदवारांनी व्यक्त केली. या सर्वांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या सह्यांचे पत्र तसेच पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. याप्रसंगी राजेंद्र कोंढरे, संजीव भोर – पाटील‌, अंकुश कदम, रघुनाथ चित्रे – पाटील आदी उपस्थित होते.

या निकालामुळे एमपीएससीच्या वर्ग-१ व २ पुढील जाहिरातीतील उमेदवारांच्या प्रलंबित नियुक्त्या मार्गी लागणार आहेत. त्या जाहिराती पुढीलप्रमाणे (कंसात संख्या) महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०१९ (९४ उमेदवार), महाराष्ट्र वनसेवा-२०१९ (१०), कर सहायक-२०१९ (१२), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा-२०२०(१५३), पोलीस उपनिरीक्षक-२०२० (६५), वरिष्ठ संशोधन अधिकारी (गट-अ – ७).  इतर सरळसेवा भरती : कनिष्ठ अभियंता-२०१९ (जलसंपदा विभाग – ६६), दंतशल्यचिकित्सक(पुणे महानगरपालिका – १). अशा रितीने २७६ मराठा व १३२ इतर उमेदवार अशा एकूण ४०८ उमेदवारांचा नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.

0000

 

बाबा जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्या शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल – पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड, (जिमाका) दि. 26 :- संपुर्ण भारताला शौर्याचा समृद्ध वारसा देणाऱ्या साहिबजादे, बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग जी यांच्या स्मृतीचा आजचा दिवस आहे. धार्मिक स्वातंत्र्यावर घाला घालणारा निर्णय या कोवळ्या बालकांवर मुघल शासक वजीर खान याने लादला होता. या बालकांनी मरण यातना सहन केल्या. परंतु धर्म बदलणार नसल्याचे सांगितले. आपल्या शीख धर्माला त्यांनी प्राधान्य दिले. भारतातील सर्वांसाठी ही घटना एक मिसाल बनली आहे. सर्वांसाठी ही प्रेरणा असून हा शौर्याचा वारसा भारत प्राणपणे जपेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्यावतीने येथील गुरुग्रंथ साहिब भवन, यात्री निवास परिसर नांदेड येथे अयोजित करण्यात आलेल्या वीर बाल दिवस व सर्व धर्म संमेलनात ते बोलत होते. यावेळी पंचप्यारे साहेब, बाबा बलविंदरसिंग जी, पंजाब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हरभजन सिंघ, खासदार प्रतापराव चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

भारता सारख्या विविधतेने नटलेल्या देशात सर्व धर्माप्रती आदर व श्रद्धा असणे तेवढेच महत्त्वाचे आहे. परस्पर धर्मा विषयी संहिष्णुता गरजेची आहे. परस्पर आदराच्या शिकवणुकीला आपल्या संस्कृतीने प्राधान्य दिले आहे. भारताला जी त्यागाची परंपरा लाभलेली आहे त्यातील शौर्य व ज्यांनी बलिदान दिले त्यांच्याप्रती कायम कृतज्ञता युवकांनी बाळगली पाहिजे. एका समृद्ध पायावर उभा असलेला देश भविष्यात तुम्हा युवकांच्या हाती येणार असून त्यासाठी आजपासूनच अधिक सुसंस्कृत, जबाबदार, कर्तव्य तत्पर आणि निरव्यसनी व्हा, असे भावनिक आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी साहिबजादे, बाबा जोरावर सिंग, बाबा फतेह सिंग जी यांच्या बलिदानाला अधोरेखीत करून 9 जानेवारी 2022 रोजी आजचा दिवस वीर बाल दिवस दिन म्हणून भारतभर साजरा होईल असे सर्व प्रथम जाहीर केले. या पाठिमागे सर्व मुलांना त्यागाची प्रेरणा मिळावी या उद्देश त्या पाठिमागे आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. उद्याच्या सशक्त भारतासाठी आयुष्यभर आपण कोणतेही व्यवसने करणार नाही व करून देणार नाही अशी शपथ घेण्याचे भावनिक आवाहनही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुलांना केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हा वीर बाल दिवस साजरा करतांना संपूर्ण देशाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. हा संपूर्ण देशाचा सन्मान आहे, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगून वीर बालकांना नमन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघजी यांनी केले.

यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरीत करण्यात आली. निबंध स्पर्धेत पुष्पिंदर कौर परमीत सिंघ संधू, राजेश गोविंद राठोड, अनिता कौर प्रीतम सिंघ कामठेकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार मिळाले. प्रोत्साहनपर बक्षिसे श्वेता गायकवाड, शिवकांत मोकमपल्ले यांना देण्यात आले. मॅरेथॉन स्पर्धेच्या वरिष्ठ गटात संतोष उत्तरवार, वैभव काळे, गोविंद निमगाडे यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली. मुलींच्या गटात वर्षा खानसोळे, वैष्णवी दहिमल, सामका राठोड तर ज्युनिअर मुलांच्या गटात शिवम इंगळे, श्रीकांत ठाकूर, सोहम चक्रधर, मुलींच्या गटात विणया माचुपुरे, आकांक्षा कदम, वैष्णवी गंगासागर हे अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे असे विजयी ठरले.

000

महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची ११३ वी बैठक संपन्न

मुंबई, दि.26 : महाराष्ट्र कृषी शिक्षण, संशोधन परिषदेची 113 वी बैठक कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे झाली.

या बैठकीत कृषी परिषदेच्या 112व्या बैठकीचा कार्यपूर्ती अहवाल व इतिवृत्त मंजुरीसाठी सादर करण्यात आले. कृषी मंत्री श्री. मुंडे हे या परिषदेचे अध्यक्ष आहेत. या बैठकीच्या माध्यमातून मंत्री श्री. मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

या बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सदस्य डॉ. विवेक दामले, कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, कृषी परिषदेचे संचालक हेमंत पाटील. डॉ. हरिहर कौसडीकर आणि परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

 

विभागीय आयुक्तालयात ‘वीर बाल दिवस’ साजरा

अमरावती, दि. 26 : ‘वीर बाल दिवस’ निमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज साहिबजादा जोरावर सिंगजी व साहिबजादा फतेह सिंगजी यांच्या प्रतिमेस विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांचेसह अन्य अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

गुरु गोविंद सिंग यांच्या दोन लहान मुलांनी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक म्हणून 26 डिसेंबर हा दिवस “वीर बाल दिवस” म्हणून साजरा केला जातो.  साहिबजादा जोरावर सिंगजी आणि साहिबजादा फतेह सिंगजी हे दोघेही 9 वर्षे आणि 7 वर्षांचे असतांना दोघांना सन 1705 मध्ये मुघलांनी भिंतीत जिवंत गाढले होते.  या दोन लहान मुलांना मोगलांनी दोन मोठ्या भावांसह मारले. गुरू गोविंद सिंग जी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे शौर्य आणि आदर्श म्हणून दरवर्षी या दिवशी अन्यायाविरुद्ध त्यांच्या प्रतिकारशक्तीचे स्मरण केले जाते.

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली होती.  17 व्या शतकात शहीद झालेल्या 4 साहिबजादांच्या (गुरु गोविंद सिंग जींचे चार पुत्र) शौर्याला श्रद्धांजली म्हणून हा दिवस साजरा केला जाईल असे पंतप्रधान मोदी यांनी 09 जानेवारी 2022 रोजी श्री गुरु गोविंद सिंग जी यांच्या प्रकाश पर्व किंवा शिखांचे 10 वे गुरू आणि खालशाचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त ही घोषणा केली होती, अशी माहिती श्री. मस्के यांनी यावेळी दिली.

000

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडून पाणीपुरवठा, महामेट्रो, गॅस पाईपलाईन कामांबाबतचा आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.26, (विमाका) :- केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामासंदर्भात आढावा घेतला.

स्मार्ट सिटी कार्यालय येथे आयोजित बैठकीला महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, जीवन प्राधिकारचे प्रमुख अधिकारी तसेच मनपा पाणी पुरवठा यंत्रणेचे संबंधित अधिकारी यांच्यासह गॅस पाईपलाईन यंत्रणेतील अधिकारी उपस्थित होते.

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर शहरास पाणीपुरवठा, महामेट्रो प्रकल्प, गॅस पाईपलाईन योजना आदी महत्त्वाच्या विकास कामाला गती देत सदर प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश सबंधित यंत्रणेतील अधिकारी व संबंधित ठेकेदार यांना दिले.

डॉ. कराड म्हणाले, महानगरातील पाणी समस्या दूर करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे. महानगरातील पाणी समस्या सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत वेळेत व गतीने पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

महानगरातील गॅस पाईपलाईन योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. गोदावरी नदी पात्राखाली 20 मीटर खोल पाईपलाईन टाकण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, अहमदनगर, नेवासा फाटा, गंगापूर, वाळूज मार्गे महानगरात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, तसेच गॅस पाईपलाईनच्या कामातील अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

000

महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि.२६: ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळावी, प्रत्येक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी. म्हणून शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही  ‘महालक्ष्मी सरस’च्या माध्यमातून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पादनांची विक्री होईल, असा विश्वास व्यक्त करीत ८ जानेवारी २०२४ पर्यंत सुरू असलेल्या प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी, असे आवाहन  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

एमएमआरडीए मैदान, वांद्रे (पूर्व)  येथे ‘महालक्ष्मी सरस’ २०२३-२४ या  बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्धघाटनानंतर ग्रामविकास मंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, ‘नाबार्ड’चे व्यवस्थापकीय संचालक रेमंड डिसोजा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत, ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. पी. पाटील, उपायुक्त विकास कोकण विभाग गिरीश भालेराव, ग्रामविकास विभागातील अधिकारी,  महिला बचत गटाच्या सदस्य यावेळी उपस्थित होत्या.  

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, ‘महालक्ष्मी सरस’ मध्ये स्टॉल मिळावा यासाठी महिला आग्रही आहेत. या प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी आता महिला बचत गटांमध्ये देखील स्पर्धा निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी बचतगटांच्या माध्यमातून 17 कोटी रुपयांच्यावर उत्पादनांची विक्री झाली आहे. यंदा या विक्रीमध्ये वाढ होऊन 25 कोटी रुपयांच्यावर वस्तूंची विक्री होईल. त्याचबरोबर प्रत्येक विभागनिहाय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्याबाबत  विचार करणार असून याबाबत लवकरच अंमलबजावणी केली जाईल. राज्यातील सहा लाख बचतगटांना सन 2022 -23 मध्ये सहा हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. तर यामध्ये वाढ होऊन 23-24 मध्ये हा कर्ज वितरण पुरवठा 7 हजार कोटी पर्यंत बचतगटांना कर्ज मिळाले आहे. महिला बचत गटांनी घेतलेले कर्ज फेडण्याचे प्रमाण हे 98 टक्के आहे आणि ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. कोणत्याही क्षेत्रात घेतलेल्या कर्ज परतफेडीच्या प्रमाणापेक्षा महिला बचत गटांनी केलेली कर्ज परतफेड सर्वात अधिक आहे, असेही मंत्री श्री. महाजन म्हणाले.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांचा विकास करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी देशात प्रभावीपणे केली आहे. महिलांचे परिश्रम कमी व्हावेत यासाठी उज्ज्वला गॅस योजना, प्रत्येक वाडीपर्यंत रस्ते, प्रत्येकाला राहण्यासाठी घरकुल, प्रत्येक घरामध्ये शौचालय, गरीब व गरजूंना मोफत अन्नधान्य वितरण यासारख्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली आहे. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना चांगली बाजारपेठ मिळावी यासाठी देखील आम्ही प्रयत्न करत आहोत. आज अनेक बचतगटांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर कोटी रुपयांचे कर्ज मिळत आहे. बचत गटांच्या प्रामाणिकपणाचे हे यश आहे. बचतगटांनी तयार केलेले उत्पादन जागतिक बाजारपेठेत टिकले पाहिजे.

प्रधान साचिव श्री.डवले म्हणाले, बचत गटांकडून घेतलेले कर्ज फेडीचे ९८ टक्के प्रमाण आहे. त्यामुळे बचत गटांना बँका कर्जपुरवठा करण्यास नेहमी उत्सुक आहेत. पंतप्रधान आवास योजना, विकसित भारत त्याचबरोबर सेंद्रिय शेती आणि शासनाच्या विविध योजना एकत्रितपणे राबवत आहोत याचा लाभ बचतगटांना होत आहे. बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात आहे.

नाबार्डचे व्यवस्थापकीय संचालक श्री. डिसोजा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे अतिरिक्त संचालक श्री. राऊत यांनी आभार मानले.

 महालक्ष्मी सरस  प्रदर्शन व विक्री ८ जानेवारी २०२४ पर्यंत

राज्यातील ग्रामीण भागातील महिला आर्थिक व सामाजिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याकरीता सन २०११ पासून ग्राम विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहाय्यता समूहातील महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात येत असून त्यांना एक उद्योजक म्हणून नवीन ओळख निर्माण करण्याची संधी निर्माण करण्यात येत आहे. अभियानांतर्गत महिलांच्या उपजिविकेवर भर देण्यात येत असून आतापर्यंत ६ लाख ३० हजार ०४० स्वयं सहायता समूह, ३१ हजार ३७०  ग्रामसंघ, १ हजार ८५० प्रभागसंघ, ३०७ महिला शेतकरी उत्पादक कंपनी व १० हजार ४१४ उत्पादक गट स्थापित झालेले आहेत. सुमारे ६० लाखांपेक्षा जास्त महिला अभियानाशी प्रत्यक्षपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्य, विभाग व जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते. सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनीचा मुख्य उद्देश देशातील व राज्यातील स्वयंसहाय्यता समूहांतील महिलांनी व ग्रामीण कारागिरांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करुन देणे तसेच समूहांतील सदस्यांना विवीध राज्यातील उत्पादने, विक्री व बाजारपेठेची माहिती देणे व राज्या- राज्यातील लोकांचे राहणीमान, खाद्यसंस्कृती व कलाकुसर इ.चा परस्परांना परिचय करुन देणे. शहरी भागातील लोकांना अस्सल देशी-गावरान वस्तू आणि पदार्थ उपलव्ध करुन देणे हा आहे.

यावर्षी महालक्ष्मी सरस मध्ये एकूण ५१३ स्टॉल असून, महाराष्ट्रातील २५५, देशभरातून येणारे इतर राज्यांचे ११८ आणि नाबार्ड चे ५० उर्वरित स्टॉल हे नावीन्यपूर्ण प्रकारचे  आहेत. यावेळी महाराष्ट्रातून जी उत्पादने येत आहेत त्यामध्ये त्या -त्या जिल्ह्यांची ओळख सांगणारे उत्पादने आहेत. मुंबईकरांना या प्रदर्शनातून खात्रीचा माल किंवा वस्तू मिळतील देशभरातील अस्सल चवी  चाखण्यास मिळतील, कलाकुसर अनुभवायला मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त प्रतिसाद मिळाल्यास ग्रामीण महिलांच्या या प्रयत्नांना हातभार  लागणार आहे.  वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स ८ जानेवारी २०२४ पर्यंत असलेल्या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

संध्या गरवारे/विसंअ

 

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. 26 : केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ  येथे भारतीय वायु सेनेच्या  विमानाने दुपारी 12.40 मिनिटांनी आगमन झाले. यावेळी श्री. सिंह यांचे स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी वायू सेनेचे, नौदलाचे  वरिष्ठ अधिकारी, राजशिष्टाचार तसेच पोलिस दलाचे  वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

0000

बाल विज्ञान प्रदर्शनाद्वारे वैज्ञानिक दृष्टिकोन प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल-राज्यपाल रमेश बैस

पुणे, दि.२६: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ५० व्या राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संस्था आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या सहभागाद्वारे हे केवळ विज्ञान प्रदर्शन न राहता विज्ञानाचा उत्सव झाला आहे. या प्रदर्शनाला अनेक विद्यार्थी भेट देणार असल्याने वैज्ञानिक दृष्टिकोन दर्शविणारे हे वादळ प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल,असा विश्वास राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी व्यक्त केला.

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, एनसीईआरटीचे सहसंचालक डॉ. श्रीधर श्रीवास्तव, शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक अमोल येडगे आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, नियमित शिक्षण घेताना विज्ञान विषयात रुची निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना मिळावी यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  प्रदर्शनाद्वारे विद्यार्थी आणि बाल वैज्ञानिकांच्या सृजनशीलतेला चालना मिळते. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी शाळांमधून अशा प्रदर्शनाचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले. प्रत्येक व्यक्तीत असा गुण असतो आणि इच्छाशक्तीच्या माध्यमातून तो समोर येतो. बाल वैज्ञानिकांच्या या प्रदर्शनातूनही अशाचप्रकारे भविष्यातील वैज्ञानिक तयार होतील, त्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून नवे पेटंटची नोंद केली जाईल आणि हेच बाल वैज्ञानिक राष्ट्राच्या वैज्ञानिक प्रगतीत हातभार लावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे बाल विज्ञान प्रदर्शन ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावर आधारित आहे. भारतात स्थानिक खेळण्यांना प्रोत्साहन दिले जात आहे.  ही खेळणी विज्ञान विषयावर आधारित असल्यास मनोरंजनातून विज्ञानाविषयी आकर्षण निर्माण होईल. शाळांमधूनही अशा प्रदर्शनाचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता वाढीस लागेल. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीचे प्रयत्न न थांबविता संशोधनाचे प्रयत्न सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी  केले.

पुणे हे संस्कृती आणि शिक्षणाचे केंद्र असल्याचे नमूद करतांना डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. जयंत नारळीकर, डॉ. विजय भटकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी वैज्ञानिक क्षेत्रात राज्याचे नाव जगभरात पोहोचविले, असे गौरवोद्गार राज्यपाल श्री. बैस यांनी काढले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील म्हणाले की, मुंबई येथे १९७९ आणि २००६ मध्ये पुण्याला  हे प्रदर्शन भरविण्याची  संधी मिळाली होती. अलीकडच्या काळात आर्थिक प्रगतीसाठी नाविन्यता आणि नवकल्पनांना महत्व प्राप्त झाल्याने अशा प्रदर्शनाचे महत्व वाढले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणातही विद्यार्थ्यांची शोधकवृत्ती वाढीस लागेल यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रदर्शनातील वैज्ञानिक आविष्कार  अत्यंत उपयुक्त आहेत, असे त्यांनी सांगितले. एक ट्रस्ट तयार करून अशा प्रदर्शनातील चांगल्या निर्मितीला बाजारात आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर म्हणाले की,  नव्या शैक्षणिक धोरणानुसार हे प्रदर्शन महत्त्वाचे आहे. नव्या युगातील गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात आपल्याला लक्ष द्यावे लागेल. शिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी चांगले तंत्रज्ञान विद्यार्थ्यांसमोर ठेवावे लागेल. या प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक अविष्कारातून शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि त्यातून जगाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान राज्यात राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

एनसीईआरटीचे सहसंचालक  श्रीवास्तव म्हणाले, गेल्या पाच दशकापासून विविध राज्यात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एनसीईआरटी प्रयत्न करते. विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल. ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ या विषयावरील नवकल्पना प्रदर्शनात मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री.येडगे यांनी प्रास्ताविकात बाल विज्ञान प्रदर्शनाविषयी माहिती दिली. यावर्षी १७३ बाल वैज्ञानिकांनी आपल्या प्रतिकृतीसह या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. दररोज १० हजार विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रदर्शनाला भेट देतील. या कालावधीत राज्यभरातील शाळांमध्ये विज्ञान पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमापूर्वी राज्यपाल श्री. बैस यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निर्मिती आणि शोधकवृत्तीला दाद दिली.

बाल वैज्ञानिक प्रदर्शन २०२३

राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. संपूर्ण देशातील विद्यार्थी, शिक्षक, पालक, विविध भागधारक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती या प्रदर्शनास भेट देणार आहेत. प्रदर्शनाकरीता ३१ राज्यातील  विद्यार्थ्यांनी  सहभाग घेतला आहे. या व्यतिरिक्त नवीन शैक्षणिक विचार प्रवाह, यशोगाथा व यशस्वी उपक्रम यासाठी राज्यातून निवडक २५ दालनाद्वारे विविध शासकीय व स्वयंसेवी संस्था यांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. हे प्रदर्शन ३० डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहे.

प्रदर्शनाचा मुख्य विषय  ‘तंत्रज्ञान आणि खेळणी’ असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून  माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानातील प्रगती, पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, वाहतूक आणि नवोपक्रम,पर्यावरणीय चिंता,  वर्तमान नवोपक्रमासह ऐतिहासिक विकास आणि आमच्यासाठी गणित असे सात उपविषय निर्धारित करण्यात आले आहेत.

०००

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...