ताज्या पोस्ट

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव! ( विशेष लेख)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमाहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी 3 सहकाऱ्यांना कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटीव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं. आणि नंतर माझ्या सेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचं निदान झालं. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणं मला नव्हती. तरी मला  आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. कोरोना असल्याचं कळलं. त्यामध्ये मला मल्टीविटामीनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या. कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरं म्हणज सुरूवातीला थोडं टेन्शन आलं होतं. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे मला बरे वाटले.
मात्र मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनविला. त्यात मी वाचन, रुममध्येच वॉक, यु-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचं मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.

आयसोलेशनदरम्यान माझ्यापर्यत कोणी येत नव्हतं. साधारण 7 व्या दिवशी माझ्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. तो निगेटिव्ह आला. डिस्चार्जनंतरही मला घरी मास्क घालून व घरातील सदस्यापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच या दरम्यान खोकला किंवा सर्दी वाटल्यास तात्काळ  दवाखान्यात येण्याच्याही सूचना दिल्यात.

माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्ण हरविता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. तसेच सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित राहा.

बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण; सावध व्हा, गर्दी टाळा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यातील जनतेला विनम्र आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
·       स्थलांतरितांसाठी १ हजार केंद्रे, दोन ते सव्वादोन लाख मजुरांची व्यवस्था

·       चाचणी केंद्रे वाढल्याने पॉझेटिव्ह रुग्ण वाढले, पण बरे होऊन घरी जाणारे रुग्णही आहेत

·       शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात नाही

·       एसी न लावण्याचे, थंड पेय आणि पाणी न पिण्याचे आवाहन

·       जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा नाही.

·       विषाणूशी लढणारे डॉक्टर योद्धेच

·       संयम, जिद्द आणि आत्मविश्वासावर युद्ध जिंकण्याचाही विश्वास

मुंबई दि. ३१: राज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवलेली असूनही लोक विनाकारण झुंबड करून खरेदी करताना दिसत आहेत. हे अत्यंत चुकीचे असून बेशिस्ती म्हणजे संकटाला निमंत्रण आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. सावध व्हावे, गर्दी टाळावी  असे आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जिद्द, संयम आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे युद्ध आपण नक्की जिंकू असा विश्वास राज्यातील जनतेला दिला.

आज थेट प्रसारणाच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते

अन्नधान्य वितरणाची साखळी व्यवस्थित सुरु

लॉकडाऊननंतर जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी माणसे आणि यंत्रणा एकत्र करताना थोडा वेळ लागला त्यामुळे जनतेला थोडा त्रास झाला. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, आता ही वितरण साखळी सक्षमपणे कार्यान्वित झाली आहे. येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न पूर्णपणे सुटेल. राज्यात जीवनावश्यक वस्तूंची, औषधांची अजिबात कमी नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, त्यासाठी गर्दी करू नये.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही

महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात केली नसल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना संकटापाठोपाठ आर्थिक संकट येऊ नये, राज्याची आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून हे वेतन टप्प्याटप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचे पगार हे पहिल्यांदा दिले जातील, त्यामुळे वेतन कपात होईल ही भीती कुणीही मनात बाळगू नये, गैरसमज करून घेऊ नये.

धोका आहे, काळजी घ्या
रुग्ण बरे होत आहेत ही समाधानाची बाब

राज्यात चाचणी केंद्र वाढले आहेत, त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. असे असले तरी अजून आपण काळजी घेतली तर विषाणूचा हल्ला परतवून लावू शकतो या स्थितीत आहोत.  धोका आहे पण त्यामुळे घाबरून जाऊ नये, गर्दीही करू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले. रुग्ण बरे होऊन घरी जात असल्याचे समाधान व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारच्या यादीत सुरुवातीला जे देश नव्हते, त्या  देशातून जे नागरिक- पर्यटक आले, त्यांनी कोणतीही माहिती न लपवता पुढे यावे. लक्षणे आढळली तर पटकन उपचार करून घ्यावेत कारण योग्य वेळी उपचार झाले तर जीव वाचू शकतो हेही या दरम्यान स्पष्ट झाल्याचे सांगितले.

थंड पेय, थंड सरबत यापासून दूर राहा
मुख्यमंत्र्यांनी खाजगी डॉक्टरांना  दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन केले. सर्दी खोकला आणि तापाची लक्षणे असलेले रुग्ण सरकारी दवाखान्यात पाठवा. परंतु इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा द्या, घाबरून जाऊ नका असेही सांगितले.  मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला वातानुकूलन यंत्रणा (एसी) न लावण्याची सूचना केली. तसेच थंड पाणी, थंडपेय, थंड सरबत यापासून थोड्या काळासाठी दूर राहा, ॲलर्जी टाळा, साधं पाणी प्या, यामुळे नेहमीच्या पद्धतीने होणारे सर्दी पडशासारखे आजार तुम्ही दूर ठेऊ शकाल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

१ हजार केंद्रात दोन लाख स्थलांतरितांना सुविधा

संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला असल्याने  इतर राज्यातील कामगार, मजूर  यांनी स्थलांतर करणे ताबडतोब थांबवावे असे सांगितले असूनही लाखो लोक स्थलांतर करताना दिसत असल्याबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घेतली असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्यासाठी राज्यात जवळपास १ हजार केंद्रे सुरु करण्यात आली आहेत, तर आजघडीला दोन- सव्वादोन लाख स्थलांतरीत लोक, मजूर यांची तिथे व्यवस्था करण्यात आली आहे, इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील कामगार-मजुरांचीही ती राज्ये व्यवस्था करत आहेत, प्रत्येकजण माणुसकीचा धर्म पाळत आहेत, त्यांना अन्न, औषधे याचा पुरवठा केला जात आहे हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

गणवेशधारी डॉक्टर हे योद्धेच

 नायडू रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस शी आपण बोललो, त्यावेळी ते गणवेशधारी योद्ध्यासारखे दिसत होते. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सर्व कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर, एसटीचे ड्रायव्हर, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, या सगळ्यांचे  मला खुप कौतुक वाटते अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कामाचा गौरव केला.

'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय - वनमंत्री संजय राठोड यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. 31 : कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला वनविभागातील सुमारे पंचवीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपले एक दिवसाचे वेतन (सुमारे अडीच कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. प्रधान सचिव वने तसेच वनरक्षक, वनपाल यांच्यापासून ते प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्यापर्यंतचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ही रक्कम देण्यात येणार असल्याचे वनमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

वनमंत्री श्री.राठोड यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
00000
देवेंद्र पाटील, वि. सं.अ.

राज्यात कोरोना निदान करणाऱ्या एकूण २३ प्रयोगशाळा कार्यरत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतराज्यातील एकूण रुग्ण संख्या ३०२ - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई, दि ३१ : कोरोना निदानासाठी देशभरातील प्रयोगशाळांचे जाळे विस्तार करण्यात आला असून आयसीएमआरच्या अनुमतीने सध्या राज्यात १० शासकीय आणि १३ खाजगी अशा एकूण २३ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी सिद्ध झाल्या आहेत. यातील खाजगी प्रयोगशाळांकडील अहवालांचे मूल्यमापन करुन त्यानंतर त्यांचे अहवाल अंतिम करण्यात येत आहेत. आज राज्यात एकूण ८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबईतील मागील चार दिवसांमधील अहवालांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३०२ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ५९ रुग्ण मुंबईचे आहेत, १३ रुग्ण मुंबई परिसरातील शहरी भागातील आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ अहमदनगरचे आणि २ बुलढाणा येथील आहेत. आतापर्यंत ३९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील :-
मुंबई                                                      १५१
पुणे ( शहर व ग्रामीण भाग )                        ४८
सांगली                                               २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६
नागपूर                                        १६
यवतमाळ                                    
अहमदनगर                                   
बुलढाणा                       
सातारा, कोल्हापूर           प्रत्येकी 
औरंगाबाद, रत्नागिरी,  सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक प्रत्येकी 
इतर राज्य - गुजरात १

एकूण ३०२ त्यापैकी ३९ जणांना घरी सोडले तर १० जणांचा मृत्यू

राज्यात आज एकूण ४०६ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत.   आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६ हजार ३३१ नमुन्यांपैकी ५ हजार ७८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर ३०२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९ कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३ हजार ९१३  व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. 
00000
अजय जाधव..३१.३.२०२०

Blogger द्वारा समर्थित.

कोरोनालाही हरवता येतं… नागपुरातील कोरोना बाधिताचा स्वानुभव! ( विशेष लेख)

माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही 8 सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात ...