शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 989

राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती गठीत

नाशिक, दि. २७ (जिमाका) : राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती गठीत करण्यात आली आहे. या बाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमाग धारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधानपरिषद सदस्य प्रविण दटके हे सदस्य आहेत. तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच समिती राज्यातील ज्या विभागात पाहणी दौरा करेल त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहतील, असे ही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

अशी आहे समितीची कार्यकक्षा

  • राज्यातील यंत्रमागबहुल भागातील संघटना यांनी दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने त्यांच्या समस्यांचा अभ्यास करणे.
  • राज्यातील यंत्रमागबहुल भागातील समस्यांबाबत यंत्रमाग धारकांच्या विविध संघटना/फेडरेशन यांच्याशी चर्चा करणे.
  • राज्यातील यंत्रमागबहुल भागातील समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शासनास सादर करणे.
  • वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेंतर्गत यंत्रमाग धारकांना ऑनलाईन नोंदणी करणेसाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.
  • यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे.
  • राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.

०००

 

खेळाडूंनी देशाचे नाव उज्वल करावे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार 

नाशिक, दि. २७ (जिमाका): विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती आहे. खिलाडूवृत्ती जोपासलेली व्यक्ती आयुष्यात कधीच खचून जात नाही तर सातत्याने पुढे जाते. विद्यार्थ्यांनी विविध खेळांतून नवनवीन कौशल्ये व प्राविण्य आत्मसात करावे. यासोबतच सांघिक भावना वृद्धिंगत करून देशाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्‍य व कुटुंब कल्याण, आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. येथील गरूड झेप अकॅडमी, दुगाव येथील प्रांगणात आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ च्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त नाशिक संदिप गोलाईत, तुषार माळी, सहसंचालक  हितेश विसपुते, उपायुक्त संतोष ठुबे, विनिता सोनवणे यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, राज्यभरातून आलेले खेळाडू, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, केंद्र व राज्य शासनाने खेळांवर विशेष लक्ष दिले आहे. विद्यार्थ्यांचा खेळातील सहभाग वाढावा, उत्तम खेळाडू तयार व्हावेत, राज्यासोबतच देशाचे प्रतिनिधीत्व करून खेळाडूंनी ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांतून खेळाडूंनी आपल्या राष्ट्राचे नाव उज्वल करावे हाच यामागील हेतू आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही खेलो इंडियाचा मंत्र देवून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनातून खेळाडूंचे मनोबल वाढविले आहे. खेळात मेहनत व एकाग्रता हे गुण महत्त्वाचे असून यांचा उपयोग खेळासोबतच अभ्यासातही विद्यार्थ्यांना होतो. विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यात जाण्याची संधी मिळते त्यादृष्टीने हिंदी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व विद्यार्थ्यांनी वाढविण्यासोबतच इतर भाषा ही शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमधून सीबीएससी बोर्डच्या माध्यमातून निश्चितच याकडे लक्ष दिले जात आहेत. स्पर्धेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा झाल्यानंतर नाशिकच्या संस्कृतीचे दर्शन करावे असे सांगुन ‘ना हारना जरुरी है, ना जितना जरूरी है, ये जिंदगी एक खेल है, इसे खेलना जरूरी है’ अशा शब्दात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवत शुभेच्छा दिल्या.

अपर आयुक्त श्री. माळी यांनी प्रस्ताविकादरम्यान सांगितले की, 27 ते 29  डिसेंबर या दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी 37 एकलव्य स्कूलमधून 865 मुले व 865 मुली असे सुमारे 1730 विद्यार्थी 10 क्रीडा प्रकारात सहभागी होत असून 3 वेगवेगळ्या मैदानात या स्पर्धा होणार आहेत.

प्रारंभी दीपप्रज्वलन, क्रीडा ज्योत प्रज्वलन व खेलध्वजाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. मंत्री डॉ. पवार यांनी खेळाडूंसह रंगीत फुगे हवेत सोडून राज्यस्तरीय स्पर्धांचे उद्घाटन केले.

०००

विभागीय आयुक्तालयात डॉ. पंजाबराव देशमुख यांना अभिवादन

अमरावती, दि. २७: देशाचे माजी कृषीमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 

यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, वैशाली पाथरे, विशेष कार्य अधिकारी हर्षल चौधरी, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी यांनीही डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिली.

डॉ. पंजाबराव देशमुख यांना जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

मुंबई, दि. २७: देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयातील प्रवेशद्वाराजवळील प्रांगणात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी कॅप्टन आशिष दामले, प्रदीप चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेठकर, सहायक कक्ष अधिकारी श्री. बच्छाव, श्री. राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

 

वंचित व गरजू लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा महत्त्वाची – पालकमंत्री गिरीश महाजन

नांदेड (जिमाका) दि. 26 :- प्रत्येक घटकातील व्यक्तींना विकासाची संधी मिळावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी असंख्य योजना यशस्वी करून दाखविल्या आहेत. सर्वांचा विकास हे अंतिम ध्येय बाळगुन आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, उज्वला गॅस अशा कितीतरी लोककल्याणकारी योजनांनी सर्वसामान्यांना बळ दिले. आजही विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचितांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात यादृष्टिने विकसित भारत संकल्प यात्रा अधिक महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या चित्ररथाचे उद्घाटन पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज यात्री निवास परिसर नांदेड येथे करण्यात आले. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नोडल अधिकारी तथा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

जिल्हा प्रशासन व नांदेड शहर महानगरपालिकेच्यावतीने विकसीत भारत संकल्प यात्रा नांदेड महानगराच्या प्रत्येक भागात पोहचून वंचितांच्या अडीअडचणी समजून घेणार आहे. ज्या पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळाला नाही अशा लाभार्थ्यांची नावे या यात्रेत नोंदविली जाऊन त्यांना लाभ दिले जाणार आहेत. दिनांक 30 डिसेंबर पर्यंत ही यात्रा महानगरपालिकेच्या 13 प्रभागातून जाणार असल्याची माहिती यावेळी मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

या यात्रेत मनपा क्षेत्रात 419 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. 255 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीएम स्वनिधी या योजनेत 10 हजार रुपये कर्जासाठी 266 लाभार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. या मोहीमेत आरोग्य, कृषी, आवास, आयुष्यमान भारत, पीएम गरीब कल्याण अन्न योजना, पीएम विश्वकर्मा, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, बीमा योजना, पीएम पोषण अभियान, दिनदयाल अंत्योदय योजना आदीचा समावेश आहे. यावेळी विविध योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

000

‘कोविड’ उपाययोजनांसाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना – मंत्री प्रा. डॉ तानाजी सावंत

मुंबई, दि. 26: कोविड- १९ च्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी दि. १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा कोविड-19 ची रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जे.एन 1 या प्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी आज दिली.

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी आयसीएमआर, दिल्लीचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकच्या कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानीटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथील डॉ. सुरेश  कार्यकर्ते, नवले मेडिकल कॉलेज पुणे येथील डॉ. वर्षा पोतदार, नवले मेडिकल कॉलेज, पुणे येथील (फिजिशियन) डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत, तर आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

गंभीर व अतिगंभीर आजारी कोविड-१९ रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रोटोकॉल स्थापन करणे, कोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे, गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध प्रोटोकॉलची शिफारस करणे आदी कार्यवाही हा टास्क फोर्स करणार आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्री प्रा.डॉ सावंत यांनी दिली.

००००

निलेश तायडे/विसंअ.

डॉ.उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे नुकसान – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 26 : ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शिल्पकार डॉ. उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याची भावना वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

मंत्री श्री. मुनगंटीवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ” डॉ.उत्तम पाचर्णे यांच्या निधनाने ललित कला अकादमीसह महाराष्ट्रातील कला क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातून येऊन शिल्पकलेच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचे वेगळे असे स्थान निर्माण केले होते. तब्बल 3 वेळेस ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. गोवा येथील कला अकादमीचे ते सल्लागार समितीचे सदस्य होते. पु. ल. देशपांडे राज्य ललित कला अकादमीच्या सल्लागार समितीचे ते सदस्य होते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वील्झर्लंड बेल्जियम, नेपाळ, इस्राईल अशा अनेक देशांमध्ये त्यांच्या शिल्पाचे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. डॉ. पाचर्णे यांची लहान-मोठी शिल्पे भारतात आणि परदेशात विविध ठिकाणी बसविण्यात आली आहेत. ज्यात झाशीतील व्हाइट टायगर रेजिमेंट (1980), स्वामी विवेकानंद पुतळा, मुंबई (1981), स्थायी बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा धुळ्यातील पुतळा (2002), दक्षिण मुंबईतील राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, (2003), अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील स्वतंत्र ज्योत (2004), छत्रपती संभाजी नगर येथील स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ (2007) यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने आपण एका ज्येष्ठ शिल्पकराला मुकलो आहोत. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने देवो अशी प्रार्थना करतो.”, असेही मंत्री श्री.मुनगंटीवार यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

00000

दीपक चव्हाण‍/विसंअ

जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान

मुंबई, दि. 26 : राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कौन्सिल जनरल डॉ. फुकाहोरी यासुकाता, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी भावोत्कट मनोगत व्यक्त केले. भारत-जपानच्या मैत्री संबंधांचा आढावा घेताना त्यांनी महाराष्ट्र विकासाचा रोडमॅप मांडला. ते म्हणाले की, कोयासन विद्यापीठ हे कू काई यांनी सुरू केले. त्यांनी बुद्धिझम जपानमध्ये रुजवला. जगातील महत्वाचे केंद्र म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. त्यांनी हा सन्मान दिल्याबद्दल या विद्यापीठाचा मी ऋणी आहे. मी दीक्षाभूमीच्या शहरातून येतो. त्यामुळे बुद्धधम्माच्या प्रसारात असलेल्या या सर्वात जुन्या विद्यापीठाकडून सन्मान हा भावोत्कट क्षण आहे. या क्षणी भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

महाराष्ट्र–कोयासन मैत्रीची सुरुवात तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या काळात झाली. त्यानंतर मुख्यमंत्री असताना मी तिथे गेलो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तेथे आपण उभारला. आताही ही मैत्री निरंतर सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. जपानने सातत्याने भारताला आणि  महाराष्ट्राला मदत केली. जपान हा आपला अतिशय जवळचा आणि विश्वासू मित्र आहे. त्यामुळेच हा केवळ मैत्रीचा नव्हे, तर सांस्कृतिक दृष्ट्या जोडणारा अध्याय आहे. कोयासन विद्यापीठाने डॉक्टरेट देताना पायाभूत विकास, औद्योगिक विकास, जलसंधारण, सामाजिक समता या गोष्टीचा विचार केल्याचे ते म्हणाले.

आपल्या राज्याने पायाभूत क्षेत्र विकासासाठी 2014 मध्ये काम सुरु केले. मुंबईच्या पायाभूत क्षेत्र विकासात जपानचा मोठा वाटा आहे. आपली भुयारी रेल्वे, ट्रान्स हार्बर लिंक, समुद्र सेतू यासह अनेक प्रकल्पासाठी मोठी मदत जपान सरकारने केली आहे. याशिवाय,  शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रात मदत जपानने केली आहे. आगामी काळात वर्सोवा ते विरार ही सी लिंक तयार करण्याची चर्चा झाली आहे. पूरनियंत्रण क्षेत्रात जपानची मदत घेऊन काम केले जाणार आहे. आता आपण या क्षेत्रात अशा ठिकाणी आहोत की इतर राज्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागेल, असे त्यांनी नमूद केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पायाभूत सुविधा ही विकासाची गुरुकिल्ली आहे. आज महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत क्रमांक एकचे राज्य आहे. महाराष्ट्र हे स्टार्ट अप कॅपिटल झाले आहे. कोणतेही राज्य पुढे न्यायचे असेल, तर चांगल्या प्रशासनाची गरज असते आणि महाराष्ट्र हे त्यासाठी ओळखले जाते. आपण 2014 ते 2019 मध्ये जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे काम केले. त्यामुळे देशाच्या तुलनेत राज्यातील जमिनीची पाणी पातळी उंचावण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र हे असीमित शक्ती असणारे राज्य आहे. नवभारत निर्माणासाठीचा रस्ता महाराष्ट्रातून जातो. सामाजिक समतेचा मोठा इतिहास आहे. डॉ. बाबासाहेबांनी संविधानाद्वारे संधीची समानता दिली. त्यामुळे आपण सर्व समाज घटकांना पुढे कसे नेता येईल, त्यांना शिक्षणाची संधी, शिष्यवृत्ती याद्वारे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. या राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले कार्य यासाठी कोयासन विद्यापीठाने 120 वर्षांच्या – इतिहासात प्रथमच देशाबाहेरील मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे. जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना देण्यात आली. महाराष्ट्र आणि जपान यांचे नाते दृढ करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. आपले राज्य परकीय गुंतवणूक करण्यात आघाडीवर असून त्यात जपानने सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली असल्याचे ते म्हणाले.

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाचा सातत्याने ध्यास घेतलेले उपमुख्यमंत्री डॉ. फडणवीस यांचे व्यक्तिमत्व आहे. राज्यात त्यांच्या कार्यकाळात मोठी गुंतवणूक झाली. जपानच्या विद्यापीठाकडून एका उमद्या व्यक्तीमत्वाचा सन्मान झाला आहे.

डॉ. फुकाहोरी यासुकाता म्हणाले की, ही उपस्थिती सर्वांसाठी आनंददायी आहे. कोयासन विद्यापीठ हे ख्यातनाम विद्यापीठ आहे. या विद्यापीठाला 1200 वर्षांचा इतिहास आहे. श्री. फडणवीस यांनी जपानचा दौरा केला. अनेक उद्योजकांना भेटले. त्यानंतर अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एक व्यक्ती म्हणून ते खूप चांगले असल्याचे त्यांनी नमूद केले.

यामाशिता योशियो यांनी यावेळी मानद डॉक्टरेट पदवीच्या मानपत्राचे वाचन केले. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. कुलकर्णी यांनी स्वागत केले तर आभार उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. कांबळे यांनी मानले. कार्यक्रमास राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, प्रशासकीय अधिकारी, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नामवंत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

दीपक चव्हाण/विसंअ

बाबा जोरावरसिंग, बाबा फतेहसिंग यांच्या शौर्याला अभिवादन

नवी दिल्ली 26:  देशात 26 डिसेंबर हा दिवस  वीर बाल दिवस म्हणून पाळला जातो. हा दिवस गुरु गोबिंद सिंगांचे सुपूत्र साहिबजादा बाबा जोरावरसिंग आणि साहिबजादा बाबा फतेहसिंग यांच्या पराक्रम आणि बलिदानाची आठवण म्हणून पाळला जातो. यानिमित्त महाराष्ट्र सदनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव व निवासी आयुक्त  रुपिंदर सिंग यांनी बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यानीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या उपसंचालक(माहिती) अमरज्योतकौर अरोरा यांनी  बाबा जोरावरसिंग व बाबा फतेहसिंग यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी  उपस्थित  कर्मचा-यांनी  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

0 0 0 0

जे. जे. रुग्णालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम तातडीने पूर्ण करावे – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. २६ :- सर ज.जी. समूह रुग्णालयाच्या आवारातील अतिविशेषोपचार रुग्णालयासाठी नवीन बहुमजली इमारतीचे काम ऑगस्ट २०२४ पूर्वी पूर्ण करण्यात यावे. या दृष्टीने सुरु असलेल्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा दर १५ दिवसांनी घेण्यात यावा, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या विविध विषयांबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त राजीव निवतकर आदी प्रत्यक्षात, तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता हे दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या नवीन बांधकामांबाबत आढावा मंत्री श्री. मुश्रीफ यांनी घेतला. यामध्ये सातारा, जळगाव, सिंधुदुर्ग, नाशिक येथील महाविद्यालय, रुग्णालय, अधिष्ठाता व डॉक्टारांची निवासस्थाने, विद्यार्थी वसतिगृहांची कामे प्रगतिपथावर असून याबाबत सादरीकरण करण्यात आले. तसेच अंबरनाथ, पालघर, भंडारा, गडचिरोली, जालना येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जागांची उपलब्धता, त्यासाठी शासकीय जमिनींचे हस्तांतरण, निधी वितरण यासाठी आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले.

सर ज.जी. रुग्णालय आणि ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवासी डॉक्टरांनी सुरु केलेल्या संपाबाबत मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासमवेत मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. याप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर संप मागे घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. विभागातील ४,४९६ तांत्रिक व अतांत्रिक पदांची भरती प्रक्रिया केली जात असून पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती आदेश दिले जावेत, अशी सूचना यावेळी करण्यात आली.

००००००

 

किरण वाघ/विसंअ

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...