शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 988

‘उमेद’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबईदि. 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात महालक्ष्मी सरस‘ या प्रदर्शनाबाबत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे (उमेद)  मुख्य कार्यकारी अधिकारी ऋचेश जयवंशी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

राज्यातील दारिद्रयरेषेखालील कुटुंब तसेच महिला बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी ग्रामविकास विभागामार्फत विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना आणि महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत स्वयंसहायता गटांच्या आणि सर्व रोजगाराच्या उत्पादनांची प्रसिद्धी व विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी. यासाठी  8 जानेवारी 2024 पर्यंत ‘महालक्ष्मी सरस’ हे प्रदर्शन वांद्रे (पूर्व) येथे भरविण्यात आले आहे. या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे स्वरूपबचत गटांना यामध्ये सहभाग घेण्याची प्रक्रिया तसेच या प्रदर्शनाचे नियोजन  याबाबतची सविस्तर माहिती दिलखुलास‘ आणि जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयवंशी यांनी दिली आहे.

दिलखुलास’ कार्यक्रमातून श्री. जयवंशी यांची मुलाखत शुक्रवार दि. 29 आणि शनिवार 30 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर‘ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार दि. 30 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7.30 वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदिका सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या फळ पीक विम्याचे पैसे ३ जानेवारी पूर्वी अदा करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. २८ : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील ७५०० शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यापैकी ३५०० शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात आली आहे. मात्र, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने २९४० शेतकऱ्यांची ९ कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अदा केलेली नाही.

त्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले. तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एम. एस. सावंत, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मंत्री कु. तटकरे यांनी कोकणातील इतर जिल्ह्यांपेक्षा रायगड जिल्ह्यात फळ पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम मोठी असल्याकडे लक्ष वेधले. त्यावर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी पुढील हंगामात हप्त्याची रक्कम सर्वत्र समान करण्याची सूचना कृषी आयुक्तांना केली. यानंतर कृषी मंत्री श्री. मुंडे यांनी आंदोलकांना उपोषण मागे घेण्याचे विनंती केली. त्यानुसार उपोषण मागे घेण्यात आले.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा रोडमॅप सादर करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या तीनही संचालक मंडळाची बैठक आज झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या बैठकीला प्रधान सचिव तथा महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्राउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी अनबलगनमहापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीवकुमारस्वतंत्र संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.

राज्यात औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे हे सांगून श्री. फडणवीस म्हणालेमहाजेनकोने सर्व अंगाने ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे. कोराडीपारस व  इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी. आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. औद्योगिक क्षेत्रातील यंत्रे ही खूप महागडी व जास्त वीज घेणारी असतात. त्यामुळे त्यांना अखंडित वीज पुरवठा करणे आवश्यक ठरते. अन्यथा ही यंत्रे निकामी होतात.

त्याचबरोबर भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा. प्रथम २५ टक्के भूमिगत प्रणाली करुन त्याचा अभ्यास करावा. वितरण खर्च किती वाढतोवीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने नियोजन करावे. जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी. त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सीएसआर निधी वापरावा,जेणेकरून यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

०००

मनीषा सावळे/विसंअ/

राज्य सरकारतर्फे खेळाडूंच्या पुरस्काराच्या रकमेत १० पट वाढ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

चंद्रपूर, दि. 27 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त विकासाचा 11 सूत्री कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून यात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. याच धर्तीवर राज्य शासनानेही खेळाला प्रथम प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून भविष्यातील ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंना प्रेरणा मिळावी, यासाठी राज्य शासनाने खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत दहा पटीने वाढ केली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित 67 व्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

तर बल्लारपूर येथे आयोजित राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात मेडल प्राप्त खेळाडू मिळतील, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2036 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भारतात घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच अनुषंगाने चंद्रपूरमधून मिशन ऑलिम्पिक ची सुरवात झाली असून सन 2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू नक्कीच पदक मिळवतील, असा आशावाद सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

उद्घाटन समारंभाला आमदार रामदास आंबटकर, अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चावरे, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह पद्मश्री पुरस्कार विजेते बहाद्दूरसिंह चव्हाण, धावपटू हिमा दास, ललिता बाबर, बॅडमिंटनपटू मालविका बनसोड आदी उपस्थित होते.

खेलो इंडिया, फिट इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रेरणा देण्याचे कार्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 2036 मध्ये ऑलम्पिक क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठी प्रधानमंत्री मोदी यांचा पाठपुरावा सुरू आहे. राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे एक प्रकारे आव्हानात्मक कार्य असून चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

चंद्रपूरचे नाव देशभरात अभिमानाने घेतले जाईल, असे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन जाहीर झाल्याची घोषणा तसेच मिशन ऑलिम्पिक ची घोषणा यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली.

भविष्यात पदक प्राप्त खेळाडू मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बल्लारपुरात होणाऱ्या राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून भविष्यात पदक प्राप्त करणारे खेळाडू मिळतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला. पुढील ऑलिम्पिक व आशियाई स्पर्धेमध्ये देशाला पदक मिळवून देण्याचा संकल्प करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतून भविष्यात देशाचे नाव कमावणारे खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खेळातून आत्मविश्वास निर्माण होतो. खेळ भावनेतूनच व्यक्तिमत्व पूर्ण होते. देशाचे नाव उंचावण्यासाठी खेळाडूंनी खेळावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले

मिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूरचे खेळाडू पदक मिळवतील पालकमंत्री मुनगंटीवार

चंद्रपूर हा वाघांचा जिल्हा आहे. वाघांच्या भूमीत खेळाडू वाघांसारखा पराक्रम करतील, अशी अपेक्षा व्यक्त करून पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मिशन ऑलिम्पिक  2036 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीचे खेळाडू पदक मिळवतील. या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा प्रशासनाने परिश्रम घेतले आहेत. खेळाडूंना कोणतीही समस्या जाणवणार नाही. त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर आहोत, असे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.

संपूर्ण देशभरातून येथे खेळाडू आले आहेत. या स्पर्धेचे आयोजन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्कृष्ट केले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मिशन ऑलिम्पिक  2036 चे लाँचिंग येथे करण्यात आल्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

सुरवातीला मान्यवरांनी बल्लारपूर तालुका क्रीडा संकुल येथे असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. मनजित कुमार या खेळाडूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे क्रीडा ज्योत सुपूर्द केली. यावेळी संदीप गोंड या खेळाडूने शपथ दिली.

अभूतपूर्व उद्घाटन सोहळा : उद्घाटन समारंभात शाल्मली खोलगडे यांनी सादर केलेला ‘लाइव्ह’ परफॉर्मन्स सोबतच फायर शो, लेझर शो, ॲक्रोबॅटिक डान्ससह विविध सांस्कृतिक कार्यक्रम मुख्य आकर्षण ठरले.

खेळाडूंचे ध्वजसंचलन : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी बल्लारपूर येथे दाखल झालेल्या सर्व राज्यातील खेळाडूंनी ध्वजसंचलन करीत आपापल्या राज्याचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 1551 खेळाडू दाखल झाले आहेत.

चंद्रपूर गॅझेटिअर व ग्लोरी ऑफ चंद्रपूरपुस्तिकेचे विमोचन : चंद्रपूर जिल्ह्याचे गॅझेटिअर प्रथमच मराठी भाषेत प्रकाशित होत आहे. या गॅझेटिअरचे तसेच येथे आलेल्या खेळाडूंना चंद्रपूर जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारशाची माहिती व्हावी, या उद्देशाने हिंदी आणि इंग्रजी भाषेत तयार करण्यात आलेल्या ‘ग्लोरी ऑफ चंद्रपूर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे, दि.२७(जिमाका) :- भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिनेश दैठणकर उपस्थित होते.

00000

धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

धुळे, दिनांक 27 डिसेंबर, 2023 (जिमाका वृत्त); धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. वर्षानुवर्ष सामान्य धुळेकर पिण्याच्या पाण्यासाठी आठ, दहा दिवस वाट बघत होतो. ज्या धुळे शहराची पिण्याच्या पाण्याच्या दुरावस्थेमुळे वेगळी ओळख निर्माण झाली होती, तो ठपका मिटविण्याचा हा क्षण सुवर्णाक्षरात नोंदविण्यासारखा असा दिवस आहे. आणि या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचे भाग्य मला लाभले याचा मला विशेष आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी अक्कलपाडा येथे केले.

आज अक्कलपाडा येथील प्रकल्पातून १७० कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या धुळे शहर पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते झाले. धरण उद्भव योजनेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, त्यावेळी श्री.महाजन बोलत होते. या कार्यक्रमास खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, महापौर प्रतिभाताई चौधरी, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे-पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ, माजी महापौर जयश्री अहिरराव, चंद्रकात सोनार, प्रदीप कर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.महाजन म्हणाले की, आज धुळे शहराच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद व्हावी असा आजचा दिवस आहे. धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शाश्वत स्वरुपात मार्गी लागावा यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत होते. धुळेकरांना एकदिवसाआड पाणी देण्याचा दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि वर्षानुवर्षे पाणीटंचाईमुळे त्रस्त धुळेकरांना आम्ही दिलासा दिला आहे. तसेच धुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध असून येत्या दोन वर्षात सुलवाडे-जामफळ प्रकल्प पूर्ण करणार असून अक्कलपाडा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराचा विकास करायचा असेल तर मुबलक पाण्याशिवाय पर्याय नाही. धुळे शहरात यापूर्वी आठ दिवस, त्यानंतर चार दिवसांनी पाणी मिळत होते.अशा गंभीर स्थितीत धुळेकरांना झालेल्या त्रासाची कल्पनाही करवत नाही. धुळे जिल्ह्यात ज्यावेळी 2018 मध्ये महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने आलो त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे शहराची कायमस्वरुपी तहान भागविण्यासाठी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेची घोषणा केली. त्यानंतर योजनेचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला. सततच्या पाठपुराव्यामुळे योजनेचा दीडशे कोटीचा आराखडा मंजूर होऊन योजनेचे टेंडर निघाले आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महत्वाकांक्षी योजनेचे भूमिपूजन करण्यात आले. यासाठी खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी धुळेकरांना मुबलक पाणी मिळावे म्हणून केंद्र शासनाच्या अमृत योजनेत हा प्रकल्प समाविष्ट करून घेतला. त्यानुसार आम्ही सातत्याने पाठपुरावा करत केंद्र सरकार, राज्य सरकार व महापालिकेच्या निधीतून हे काम पूर्णत्वास नेले, अखेर ही योजना पूर्णत्वास आली असून, आता दोन दिवसाआड पाणी मिळते आहे, याचे आम्हाला अधिक समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

ही योजना पुर्णत्वास येण्यासाठी सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी, तसेच प्रकल्पासाठी सहयोग करणारे अक्कलपाडा व परिसरातील शेतकऱ्यांनीही पाईप लाईन टाकण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळेच ही 170 कोटींची योजना पूर्णत्वास आली. अक्कलपाडा प्रकल्पग्रस्तांच्या भूसंपादन, तसेच अक्कलपाडा येथील धरणात 100 टक्के पाणीसाठा कसा साठविता येईल तसेच कॅनॉलद्वारे शेतीला पाणी मिळण्यासाठी लवकरच मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात येईल. धुळे शहराच्या विविध विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. सुलवाडे-जामफळ योजनाही खान्देशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी योजना असून  यासाठी एक दोन महिन्यात ई -टेंडर काढणार असून येत्या दोन वर्षांत हा प्रकल्प पुर्ण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

खासदार डॉ. भामरे म्हणाले की, धुळेकरांना रोज आणि मुबलक पिण्याचे पाणी देण्याचा २०१९ मध्ये दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि याचा आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून अभिमान आहे. २०१९ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योजनेचे भूमिपूजन केल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी  हा प्रकल्प पुर्ण करण्यासाठी  प्रयत्न केले. सद्यःस्थितीत या अक्कलपाडा प्रकल्पात केवळ ६० टक्केच जलसाठा होत आहे. तो १०० टक्के व्हावा म्हणून प्रयत्नशील आहे. अक्कलपाडा येथील प्रकल्पाचा जलसाठा वाढविल्यास प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे भूसंपादन हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच प्रकल्पाच्या डावा, उजव्या पाटचाऱ्यांचा प्रश्नही सोडवावा लागणार आहे. जेणेकरून प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी मिळेल यासाठी जवळपास 100 कोटी रुपयांची गरज लागणार आहे. अनेर धरण व इतर प्रश्नाबाबत बैठक घेऊन पालकमंत्री म्हणून आपण यात जातीने लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

आमदार जयकुमार रावल म्हणाले की गेल्या ४० वर्षांपासून पिण्यासाठी ज्या अक्कलपाडा प्रकल्पाच्या पाण्याची वाट पाहत होतो ते पाणी आज धुळेकरांच्या घरात पोहोचले आहे. यामुळे हा सर्वांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे धुळ्याला आले होते त्यावेळी त्यांनी काही योजनांचे भूमिपूजन केले होते. त्यात मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचे भूमिपूजन केले होते. या रेल्वे मार्गासाठी वर्षानुवर्षे मागणी झाली होती. या कामास आता प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. अक्कलपाडा योजना पूर्णत्वास आली असून, सुलवाडे-जामफळ योजनेचा प्रश्न होता. दरम्यानच्या काळात खंड पडला नसता तर आज या योजनेचेही लोकार्पण करता आले असते. मंत्री गिरीष महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या माध्यमातून अनेक कामे झाली. धुळे जिल्ह्यासह लोकसभा मतदारसंघात १२०० कोटी खर्चाची कामे झाली आहेत. भविष्यात पाण्याचे मीटर लावून कोणाला किती पाणी मिळते तेही पाहिले जाईल आणि एक दिवसाआड पाणी पुरविण्याचे नियोजन होईल, असे श्री.रावल यांनी सांगितले. यावेळी महापौर प्रतिभाताई चौधरी, विजय चौधरी, अनुप अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते मोदी आवास योजना, प्रधान मंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना प्रातिनाधिक स्वरुपात घरकुलांची चावी देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी,आभार प्रदर्शन हिरामण गवळी, तर सुत्रसंचलन जगदिश देवपूरकर व वाहिदअली यांनी केले. कार्यक्रमास मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते. 

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता बाल अतिदक्षता विभाग युनिटचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते उद्घाटन 

शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता, बाल अतिदक्षता विभाग व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन  ग्रामविकासमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष  महाजन यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, हिरे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सयाजी भामरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दत्ता देगांवकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महेश भडांगे, माजी महापौर जयश्री अहिरराव, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील सांगळे, यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालय, धुळे हे शहाराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने असंख्य रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी येत असतात. तसेच श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे नवीन इमारतीत स्थलांतरीत झाल्याने व सदर रुग्णालय शहरापासून 7-8 किमी अंतरावर असल्याने गोरगरीब रुग्णांना  तेथे उपचारासाठी जाणे अडचणीचे होत असल्याने स्थानिक लोकप्रतीनिधीनी गोरगरीब रुग्णांना आरोग्य सेवा शहरातच मिळावी ह्या उद्देशाने शहरातच जिल्हा रुग्णालय कार्यान्वीत झालेले आहे. सदर रूग्णालयात सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी  रुग्णालयीन प्रशासनामार्फत जास्तीत जास्त सेवा देणे व त्यापुढील अद्ययावत सुविधा देखील रुग्णांना मिळण्याकरिता पालकमंत्री श्री.महाजन यांनी सन 2022-23 या आर्थिक वर्षात 3 मॉड्युलर  ऑपरेशन थिएटर व 1  ॲडव्हान्स लेबर रुम तयार करणे कामी जिल्हा नियोजन समितीमधून  जिल्हा रुग्णालय, धुळे येथे ऑर्थोपेडीक व सेप्टीक मॉडयुलर ऑपरेशन थिएटर तयार करण्यासाठी 3.25 कोटी, जिल्हा रुग्णालय, धुळे येथे जनरल व स्त्रीरोगशास्त्र विभाग मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 4.30 कोटी, जिल्हा रुग्णालय धुळे येथे नेत्रविभाग मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तयार करणे 2.30 कोटी, जिल्हा रुग्णालय धुळे येथे प्रसुती विभागाचे आधुनिकीकरण करणेसाठी 2 कोटी असा निधी देण्यात आला. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मुळे रुग्णांना दर्जेदार सेवा सुविधा पुरविली जाते, शस्त्रक्रियेदरम्यान जंतुसंसर्गाचा धोका अंत्यत  कमी होतो. प्रतिजैविक औषधांचा खर्च कमी होतो. रुग्णांचा मृत्यूदर कमी होतो.

जिल्हा रुग्णालय, धुळे येथे रुग्णालयीन सेवा बळकटीकरण करणे अंतर्गत ECRP मधुन 40 खाटांचे जनरल आयसीयू व 32 खाटांचे पीआयसीयू तयार करण्यात आलेले आहे. त्यासाठी जिल्हा रुग्णालय, धुळे येथे 40 खाटांच्या आयसीयु उपकरणासाठी 3.26 कोटी, जिल्हा रुग्णालय, धुळे येथे 32 खाटांच्या पीआयसीयूसाठी उपकरणासाठी 2.48 कोटी तर जिल्हा रुग्णालय, धुळे येथे 40 व 32 खाटांच्या आयसीयू व पीआयसीयू मॉड्युलर करणेसाठी 3.73 कोटी निधी मंजूर केला आहे.

शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना गुणवत्ता टिकून राहावी – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

अमरावती, दि. 27 : कृषिरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासह विदर्भातील खेड्यापाड्यापर्यंत शिक्षणाचे जाळे निर्माण केले. यामुळे आज विद्यार्थ्यांना विविध ज्ञानक्षेत्राचा लाभ मिळत आहेत. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होताना त्याची गुणवत्ता टिकून राहावी, असे प्रतिपादन केंद्रीय दळणवळण व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील क्रीडांगणावर शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या 125 व्या जयंतीनिमित विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. सत्कारमूर्ती खासदार शरद पवार, खासदार नवनीत राणा, आमदार सुलभा खोडके, आमदार किरण सरनाईक, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री अनिल देशमुख, संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कन्व्हर्जन्स ऑफ नॉलेजबाबत मार्गदर्शन करताना श्री. गडकरी म्हणाले, माणूस त्याच्या गुणवत्तेतून मोठा होत असतो. वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व हे केवळ शिक्षणाने तयार होत नाही तर त्यासाठी संस्काराचे कोंदण आवश्यक आहे. संताचे चांगले विचार आणि मार्गदर्शनामुळे समाज प्रगल्भ होतो. डोळे दान करता येतात, परंतु दृष्टी दान करता येत नाही. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून स्व-विकासासोबतच समाजाचाही विकास व्हावा, यासाठी युवकांनी प्रयत्नशील राहावे. आपला देश खेड्यात वसतो. येथील कृषिबांधव केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावे समृद्ध आणि स्वयंपूर्ण व्हावीत यासाठी शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. भाऊसाहेबांचे हेच स्वप्न होते. शेतकरी, गोरगरीब या सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात येता यावे, यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणगंगा घरोघरी पोहचविली. त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करीत राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

खासदार शरद पवार यांच्यासारख्या अभ्यासू आणि सम्यक व्यक्तीला पहिल्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येत आहे, हा खऱ्या अर्थाने या पुरस्काराचा सन्मान आहे. श्री. पवार यांनी देशातील कृषी विकासाचा दर वाढविण्यासाठी प्रयत्न केला. कृषी क्षेत्रात अत्याधुनिक तंत्राचा वापर करुन बी-बियाणे, जैव तंत्रज्ञान, खते व्यवस्थापन यांना प्रोत्साहन दिले. कृषी संशोधन, अन्नप्रक्रिया उद्योग व शेतीपूरक व्यवसायाला मार्गदर्शन केले. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची ओळख होऊन शेती उत्पादन वाढीसाठी उपयोग झाला, असेही श्री. गडकरी यावेळी म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले की, डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराचा प्रथम मान मला देण्यात आला, यासाठी मी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा आभारी आहे. महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. माझी आई हीदेखील महिला शेतकरी होती. तिने शेतात कष्ट करुन आम्हा भावडांना मोठे करुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्य शेतकरी महिलांच्या कार्यकर्तृत्त्वाचा सन्मान होणे गरजेचे आहे. यातून अन्य शेतकरी महिलांचा आत्मविश्वास दुणावेल, असेही ते यावेळी म्हणाले.

कृषिरत्न तसेच शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125 व्या जयंती उत्सवानिमित्त भारत सरकारने निर्माण केलेल्या 125 रुपयाच्या नाण्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ‘शिवसंस्था’ मासिक, दैनंदिनी, दिनदर्शिका-2024, भाऊसाहेबांच्या जीवनावरील छायाचित्रांचे पुस्तक व चित्रफितीचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या अभ्यासिकेचे व डॉ. पंजाबराव देशमुख अध्यासन केंद्राचे उद्घाटन रिमोटची कळ दाबून ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नूतनीकृत स्मृतीभवन श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या नवीन ग्रंथालयाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

खासदार शरद पवार यांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. 5 लक्ष रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी संस्थेच्या विविध विद्याशाखेत गुणवंत ठरलेल्या मुलींना श्रीमती विमलाबाई देशमुख, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासवृत्ती प्रदान करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर फुले तर आभार दिलीप इंगोले यांनी मानले.

 

सन २०२४ मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित

मुंबई, दि. २७ : सन २०२४ मध्ये राष्ट्रपुरूष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम साजरे करण्याचे शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे. यामध्ये दर्शविलेले कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत, असे परिपत्रकात नमूद आहे.

परिपत्रकामधील सर्व कार्यक्रम विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात आयोजित करण्याबाबत सूचना देऊन अंमलबजावणीबाबत कार्यवाही करावी, असेही परिपत्रकात नमूद आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ/

भारत निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर पात्र होणाऱ्या नागरिकांसाठी मतदार यादीत नाव नोंदणीसाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. आता या पुनरीक्षण कार्यक्रमाचा सुधारित आराखडा आयोगाने जाहीर केला आहे. यामध्ये पूर्व पुनरीक्षण उपक्रम व पुनरीक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सुधारित कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- (अनुक्रमे पुनरीक्षण उपक्रम, कालावधी, सुधारित कालावधी या क्रमाने) : दावे व हरकती निकालात काढणे – २६ डिसेंबर २०२३ पर्यंत, १२ जानेवारी २०२४. अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी मागणे, डाटाबेस अद्ययावत करणे आणि पुरवणी याद्यांची छपाई – १ जानेवारी २०२४, १७ जानेवारी २०२४. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी करणे – ५ जानेवारी २०२४, २२ जानेवारी २०२४ रोजी होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उपसचिव तथा सह मुख्य निवडणूक अधिकारी म. रा. पारकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

गोपाळ साळुंखे/ससं/

 

देशातील पहिला ‘मध महोत्सव’ महाराष्ट्रात

मुंबई, दि. 27 :- मध उद्योगाची व्याप्ती वाढावी, ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळावी आणि मध माशा पालनाबाबत लोकांना माहिती व्हावी या उद्देशाने देशातील पहिलाच ‘मध महोत्सव- २०२४’ महाराष्ट्रात आयोजित करण्यात येत आहे. त्याचे पहिले आयोजन मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे १८ व १९ जानेवारीला होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी दिली.

फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामीण मंडळाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, सहायक अधिकारी नित्यानंद पाटील उपस्थित होते.

श्री. साठे म्हणाले की, मधमाशी ही केवळ मध व मेण एवढ्या पुरतीच मर्यादित नसून मोठ्या प्रमाणात परागीभवनाद्वारे शेती उत्पादनात वाढ करते. मधमाशा हा निसर्गाचा महत्त्वपूर्ण घटक असून याचा थेट संबंध ग्रामीण अर्थकारणाशी जोडलेला आहे. देशातील पहिले मध संचालनालय १९४६ मध्ये महाबळेश्वर येथे स्थापन करण्यात आले. महाराष्ट्राची प्रेरणा घेऊन केंद्र शासनाने मध संचालनालय सुरु केले. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ मधाचे उत्पादन वाढण्यासाठी विविध योजना राबविते. यामध्ये प्रामुख्याने ‘मध केंद्र योजना’ तसेच ‘मधाचे गाव’ या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश आहे. मधमाशापालनातील उपउत्पादने जसे पराग, मेण, रॉयल जेली, प्रोपोलिस, मधमाशांचे विष इत्यादी उत्पादनांची माहिती व विक्रीसाठी मधमाशा पालन उद्योगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. त्यात मधाबरोबर मध, मेण यापासून तयार करण्यात आलेले उपउत्पादने व त्यांची निर्मिती करणाऱ्या राज्यातील विविध मधपाळांचे किमान 20 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असणार आहेत.

राज्यातील मधाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, मध महोत्सवाच्या माध्यमातून मधक्रांतीची पायाभरणी या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. दोन दिवसांच्या या मध महोत्सवात मधमाशांचे जतन, संवर्धन आणि संरक्षण याबाबत परिसंवाद, शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, शरीर स्वास्थ आणि मध, मधाच्या गावातील लोकांचे अनुभव कथन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र हे भारतातील मधाचा सर्वात जास्त हमीभाव देणारे राज्य असून राज्यात प्रति किलो पाचशे रुपये हमीभाव देण्यात येतो. त्याचबरोबर मधपाळांची माहिती संकलन करण्याची योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत महाराष्ट्रात १०७९ गावांमध्ये ४ हजार ५३९  मधपाळ शेतकरी मधमाशांच्या सुमारे ३२ हजार पेट्यांमधून मध उत्पन्न करीत आहेत. गेल्या वर्षी १ लाख ६० हजार मध उत्पादन झाले. त्याचे मूल्य २६९ लक्ष रुपये होते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

देशाच्या सीमांवर होणार मधमाशांचा वापर

मधमाशा ह्या त्यांना इजा पोहोचविल्यास समोरच्यावर हल्ला करुन त्याला जखमी करतात. मधमाशांच्या या वैशिष्ट्याचा वापर आता देशाच्या सीमेवर शत्रूला रोखण्यासाठी करण्यात येणार असल्याचे श्री. साठे यांनी सांगितले. त्याचबरोबर मधमाशांचे विष हे दुर्धर आजारावर सुद्धा उपयुक्त आहे, याची माहिती लोकांना नाही. त्यामुळे मधमाशांचे विष काढण्याचा भविष्यातील ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्याचा मानस असल्याचे  त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला म्हणाल्या की, मधुबन हा महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग विभागाचा मधाचा ब्रॅंड आहे. मध शरिरासाठी अतिशय उपयुक्त आहे. आरोग्यासाठी मधाचा उपयोग, मध निर्मिती, या विषयात काम करणारे अनेक तज्ज्ञ आणि पहिल्यांदाच न बघितलेले, न अनुभवलेले मधाचे वैविध्यपूर्ण जग या महोत्सवाच्या माध्यमातुन लोकांना अनुभवता येणार आहे. त्याचबरोबर मधपाळ, शेतकरी यांच्यासाठी मधपालन कसे करायचे याचे प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.

0000

मनीषा सावळे/विसंअ/

ताज्या बातम्या

छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय गौरव प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण – पंतप्रधान नरेंद्र मोदी

0
नवी दिल्ली १२: भारताच्या शौर्यशाली इतिहासाचा आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करणाऱ्या ‘मराठा सैन्य लँडस्केप्स’ ला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. या ऐतिहासिक...

हॉटेल मालकांनी संप न करण्याचे आवाहन

0
मुंबई, दि. १२: हॉटेल व्यावसायिकांशी संबंधित इंडियन हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन (आहार संघटना) यांनी 14 जुलै रोजी एक दिवसीय लाक्षणीय संप करण्याचे निवेदन दिले...

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर

0
मुंबई, दि. १२: केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाची पुनर्रचना केली असून त्याची अधिसूचना जाहीर केली आहे. राज्यातील...

जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
विमानतळाच्या प्रगतीपथावरील कामांचा आढावा  रायगड, दि. १२(जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर जगातील सर्वात जलद ‘बॅग क्लेम’ प्रणाली विकसित करण्यात यावी, हे या विमानतळावरील प्रमुख...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी

0
बारामती, दि.१२: तालुक्यात विविध विकासकामे सुरु असून ती गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, टिकाऊ आणि वेळेत पूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे,  तसेच मंजूर कामांचा आराखडा तयार करताना...