रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 953

हिंगोली जिल्ह्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देऊन आकांक्षीत जिल्हा ओळख पुसणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

हिंगोली, (जिमाका) दि. 10 : हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देवून आकांक्षीत जिल्हा ही ओळख पुसणार असल्याचे वित्त व नियोजन मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनातून दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा वार्षिक योजना 2024-25 या अर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत प्रत्यक्ष 167 कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला होता. या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. आज आयोजित राज्यस्तरीय प्रारुप आराखडा बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 171 कोटी 49 लाख 5 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यापैकी सर्वसाधारण वार्षिक योजनेतंर्गत 171 कोटी 49 लाख 05 हजार रुपयाचा अतिरिक्त निधी वाढवून दिला आहे. त्यामुळे आता जिल्ह्याचा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) आराखडा 338 कोटी 49 लाख 05 हजार रुपये करण्याची मागणी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केली.

या बैठकीस मंत्रालयातून आमदार राजू नवघरे, सतीश चव्हाण, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, दूरदृश्य प्रणालीद्वारे अल्पसंख्यांक विकास, औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार तर हिंगोलीतून आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्याची सकारात्मक जीडीपी वाढ ही आनंदाची बाब असून खात्यावर असलेला उपलब्ध निधी त्वरित खर्च करावा तसेच निवडणूक आचारसंहिता ग्रहित धरून खर्चाला प्राधान्य देवून सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून सरकारचा पैसा योग्य ठिकाणी, दर्जेदार कामे होण्यासाठी खर्च करावा. तसेच प्रधानमंत्री महत्वाकांक्षी योजना व केंद्र सरकारच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त निधी खर्च करण्याला प्राधान्य द्यावे. केंद्र शासनाचा जास्तीत जास्त निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. हिंगोलीचा आकांक्षीत जिल्हा म्हणून असलेली औळख पुसण्यासाठी जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेचा चालू वर्षाचा शंभर टक्के निधी खर्च करावा. श्री संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रासाठी निविदा प्रक्रिया व तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया पूर्ण करावी. यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ, लोकसंख्या, निती आयोगाने अकांक्षित जिल्हे व तालुके या सर्व बाबींचा विचार करुन जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यस्तरीय आयोजित ऑनलाईन बैठकीत वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी यावर्षीचा राहिलेला निधी वेळेत खर्च करावा. कोणताही निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन आराखडा अंतिम करण्यापूर्वी जास्तीचा वाढीव निधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही यावेळी सांगितले.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातील रस्ते, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रे, प्रशासकीय इमारती, श्री. संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास तसेच शहरांचा पायाभूत व मूलभूत विकास करण्यासाठी जास्तीत जास्त वाढीव निधी देण्याची मागणी केली.

जिल्हा विकास आराखड्यातील कामासाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या योजनांचा निधीचा वापर करावा व निधी कमी पडत असल्यास जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वापरावा. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा वापर करुन जिल्ह्याला जास्तीत जास्त निधी मिळवावा आणि सातारा जिल्ह्याच्या धर्तीवर प्रत्येक तालुक्यात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे, स्मार्ट शाळा, स्मार्ट गावे निर्माण करावीत. सन 2022-23 चा अखर्चित निधी व चालू वर्षाचा निधी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे खर्च करावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर झालेल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रारुप आराखड्याची सविस्तर माहिती सादर केली.

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीचे बांधकाम, वर्गखोल्यांची दुरुस्ती, नवीन वर्ग खोल्याचे बांधकाम, आदर्श शाळामध्ये विविध पायाभूत सुविधा निर्माण करणे, विज्ञान प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, डिजिटल शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, उपकेंद्र इमारत बांधकाम, आयुर्वेदिक, युनानी दवाखान्याचे बळकटीकरण, शासकीय कार्यालयासाठी इमारतीचे बांधकाम, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांचे निवासस्थान बांधकाम, रस्ते विकास, लघुपाटबंधारे बांधकाम व दुरुस्ती, कोल्हापुरी पध्दतीचे बंधाऱ्याचे बांधकाम व दुरुस्ती, अपारंपारिक ऊर्जा विकास, नगरविकास आदी जिल्ह्यातील विविध विकास कामासाठी आवश्यक अतिरिक्त निधीबाबतचे सादरीकरण केले. तसेच श्री संत नर्सी नामदेव व औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच नाविन्यपूर्ण योजनेत जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना क्षमता बांधणी करण्यासाठी अंतरिक्ष केंद्र श्रीहरी कोटा,आंधप्रदेश येथे उपग्रह प्रक्षेपणाचा लाभ दिला आहे. तसेच विविध शाळेस रोबोटिक्स व कोडिंग लॅब बसविण्यात आले आहे. या नाविण्यपूर्ण योजना राज्याच्या योजनेत समावेश करण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी यावेळी सांगितले.

यावेळी हिंगोली जिल्ह्यातील विविध विभागाच्या विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
0000

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागपूर येथे नवीन कार्यालय कार्यान्वित

मुंबई, दि. 8 :- उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांचे नवीन नागपूर विभागीय कार्यालय ‘विजयगड बंगला, नागपूर जिल्हा परिषदेसमोर, रविभवन, सिव्हिल लाईन्स, नागपूर 440001’ येथे कार्यान्वित करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकारी सचिन यादव हे उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी तथा नागपूर कार्यालयाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

नागपूर, अमरावती विभागातील नागरिकांची, सामाजिक संस्था, संघटनांची कामे स्थानिक स्तरावरंच मार्गी लागावीत, मुंबईपर्यंत येण्याचे त्यांचे कष्ट थांबावेत या उद्देशाने, श्री. अजित पवार यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांचे विभागीय कार्यालय सुरु केले आहे. नागपूरमधील नागरिकांच्या अडीअडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्याबरोबरंच, मंत्रालयाशी संबंधीत त्यांची कामे तसेच कामांचा पाठपुरावा उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागीय कार्यालयामार्फत केला जाणार आहे. विदर्भातील नागरिकांनी उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्याशी संबंधित कामांसाठी नागपूर विभागीय कार्यालयात किंवा उपमुख्यमंत्र्यांचे (वित्त व नियोजन) विशेष कार्य अधिकारी श्री. सचिन यादव यांच्याशी दु. क्र. 9421209136 वर संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

०००००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न

पुणे, दि.१०: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ च्या ९४८ कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १३५ कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ४५ कोटी ८४ लाख रुपये अशा एकूण एक हजार १२८ कोटी ८४ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली.

बैठकीस दूरदृश्य प्रणालीद्वारे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रालयातून सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास, जनसुविधा १२५ कोटी, नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी १४१ कोटी, आरोग्य सुविधा ५१ कोटी १६ लाख, रस्ते विकास १०५ कोटी, अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा विकास ९५ कोटी, पर्यटन विकास ५३ कोटी ४४ लाख, हरित महाराष्ट्र ६२ कोटी, महिला व बालकांचे सशक्तीकरण २८ कोटी ४४ लाख, गतिमान प्रशासन ७५ कोटी ८४ लाख, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती १६ कोटी ६५ लाख, शैक्षणिक दर्जा वाढीसाठी पायाभूत सुविधांवर भर ४७ कोटी ४० लाख, क्रीडा कलागुणांचा विकास ३० कोटी २० लाख आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी ४१ कोटी ८६ लाख रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला आहे.

सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०२३-२४ या वर्षात ५९० कोटी रुपये म्हणजेच ८३.७२ टक्के निधी खर्च झाला आहे. राज्यात पुणे जिल्हा प्रशासकीय मान्यता व वितरीत निधीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत १२.८० टक्के आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ५२.९५ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. मार्चअखेर १०० टक्के निधी खर्च करण्याचे नियेाजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी यावेळी दिली. विविध यंत्रणांची मागणी लक्षात घेता २०२४-२५ साठी ३६९ कोटी रुपये अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीस मुंबई येथील उपमुख्यमंत्री महोदयांच्या समिती कक्षातून आमदार दिलीप मोहिते पाटील, सुनिल शेळके, अतुल बेनके, दूरदृष्य प्रणालीद्वारे आमदार उमा खापरे, दत्तात्रय भरणे, अशोक पवार, ॲड.राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, अश्विनी जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य आणि विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखडा सादर करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्यातील तीर्थस्थळे आणि पर्यटन विकासाच्या कामांना गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिल्या. ते म्हणाले, उज्जैनच्या धर्तीवर पंढरपूर, देहू, आळंदी, भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकास करण्याचा प्रयत्न आहे. या कामांसाठी राज्यस्तरावरून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. भंडारा डोंगर तीर्थक्षेत्र विकासासाठी प्रस्ताव त्वरित सादर करावा.

मालोजीराजे गढी संवर्धनाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात यावी. जिल्हा विकास आराखडा त्वरीत सादर करावा. नियमाप्रमाणे महिला व बालविकास योजनांसाठी ३ टक्के, शालेय शिक्षण व क्रीडा ५ टक्के, गृह विभाग ३ टक्के, महसूल विभाग ५ टक्के, गड किल्ले संवर्धनासाठी ३ टक्के आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

राज्याची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत १ ट्रिलीयन डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे सांगून श्री.पवार म्हणाले, पुणे जिल्हा यादृष्टीने महत्वाचा जिल्हा आहे. पुणे आणि  पिंपरी चिंचवड परिसरात उद्योग यावेत यासाठी विशेष लक्ष द्यावे लागेल. प्रधानमंत्री आणि नीती आयोगाच्या प्रधान्याच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक सहकार्य करण्यात येईल.

ग्रामीण भागातील पथदिवे विद्युत देयकाच्या समस्येमुळे बंद राहू नये यादृष्टीने सौर वीजनिर्मितीकडे लक्ष द्यावे. सौर पॅनलद्वारे वीज निर्मितीसाठी जागेचा शोध घ्यावा. याद्वारे निर्मित वीज महावितरणला देऊन त्याऐवजी ग्रामीण भागातील पथदिव्यांसाठी वीज उपलब्ध होऊ शकेल.

सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून विज्ञान, तंत्रज्ञानाविषयी आवड निर्माण व्हावी. या  क्षेत्रातील उत्तमतेचे जवळून निरीक्षण करता यावे यासाठी कटाक्षाने केवळ गुणवत्ता या निकषावर जिल्हा परिषद शाळांमधील हुशार विद्यार्थ्यांची निवड करावी. त्यांना  नासा आणि इस्रोला पाठविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

चिंचवड येथील पी.डब्ल्यू.डी. मैदानाच्या संरक्षण भिंतीसाठी संबंधित यंत्रणा आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. विद्युत सुविधांसाठी इतर विभागातील बचतीतून अधिकचा निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही श्री.पवार यांनी दिली.

देशपातळीवरील स्वच्छ सर्वेक्षणात जिल्ह्याने चांगली कामगिरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी जिल्हाधिकारी डॉ.देशमुख, पुणे महानगरपालिका, लोणावळा आणि सासवड नगरपरिषदेचे अभिनंदन केले.

भीमाशंकर परिसर विकासाच्या कामांना गती देण्यात यावी आणि आदिवासी भागासाठी अधिकचा निधी देण्यात यावा असे मंत्री श्री. वळसे पाटील यावेळी म्हणाले.

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्र जास्त असल्याने या भागात आवश्यक सुविधांसाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात यावा. जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पोलीस प्रशासनाला अत्याधुनिक सुविधांसाठी अधिक निधी देण्यात यावा.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, ससून रुग्णालयात प्रसूती गृह आणि बालरुग्ण कक्षाला निधी देण्यात यावा. आगीच्या दुर्घटनेत गंभीर जखमी रुग्णांवर उपचारासाठी महापालिका रुग्णालयात सुविधा निर्माण कराव्या. गड-किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात निधीची तरतूद व्हावी, अशा सूचना त्यांनी केल्या.

यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले. पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास, पोलीस सुविधा, औद्योगिक क्षेत्रासाठी सुविधा, रस्ते विकास, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरूस्ती, नॉन प्लॅन रस्त्यांना राज्यस्तरावरून निधी, स्वस्त धान्य दुकानातील शिधावाटपात सर्व्हरमुळे येणाऱ्या अडचणी आदी विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

0000

 

ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा उमेदवार नोंदणी प्रणालीचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 9 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून तयार करण्यात आलेल्या  ऑनलाईन सामायिक प्रवेश परीक्षा उमेदवार नोंदणी प्रणालीचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आज मंत्रालयात उद्घाटन झाले.

              यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, प्रवेश नियामक प्राधिकरणाचे अध्यक्ष जे. पी. डांगे, राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आयुक्त महेंद्र वारभुवन, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या प्रणाली अंतर्गत करण्यात येणाऱ्या नोंदणीचा वापर उमेदवार पुढे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठीही  नोंदणी करताना  करू शकतील.

नव्या स्वरूपातील राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळामध्ये  उमेदवारांसाठी मदत केंद्राव्यतिरिक्त टोकन स्वरूपात  तक्रार नोंदविण्यासाठी प्रणाली तसेच प्रगती या  चॅटबॉटची मार्गदर्शनासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.

“शास्त्रीय गायक उस्ताद रशीद खान यांचे आज निधन झाले. उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे जन्मलेल्या उस्ताद रशीद खान यांनी आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स केला. रामपूर-सहस्वान घराण्याचे गायक असणाऱ्या खान यांनी चित्रपटांमध्येही त्यांचा आवाज दिला. उस्ताद अमीर खान आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या गायकीचाही त्यांच्यावर प्रभाव होता. उस्ताद रशीद खान यांनी ‘राझ 3’, ‘कादंबरी’, ‘शादी में जरूर आना’, ‘मंटो’ ते ‘मीत मास’ यांसारख्या चित्रपटांमध्येही आपल्या आवाजाची जादू रसिकांपर्यंत पोहोचवली. संगीत जगताला मंत्रमुग्ध करणारे उस्ताद रशीद खान यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते”, अशा शब्दात मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

नव तंत्रज्ञानाच्या मदतीने राज्यातील महावारशाचे जतन करणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. या वारशाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीत ३ टक्के निधी राखून ठेवला आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने या महावारशाचे जतन व संवर्धन करण्यास प्राधान्य दिले जाईल. त्याचबरोबर या वारशाची माहिती सर्वांपर्यंत जावी यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा, अशी अपेक्षा वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्या वतीने ‘महाराष्ट्रातील वारसा संवर्धन आणि व्यवस्थापन’ या विषयावरील दोन दिवसांचे राष्ट्रीय चर्चासत्र रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी मंत्री. श्री. मुनगंटीवार बोलत होते. पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होते.

यावेळी मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, राज्यातील ऐतिहासिक वारसा टिकला पाहिजे, यासाठी विभागाने प्रयत्न केले. राज्यातील ३८६ वास्तू पुरातत्व विभागाकडे घेतल्या. सुरुवातीला अतिशय कमी प्रमाणात असणाऱ्या निधीमध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी जिल्हा नियोजन निधीत ३ टक्के निधी हा पुरातत्व वास्तू संवर्धनासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या ३-४ वर्षात १५०० कोटी रुपयांचा निधी या वास्तूंच्या संवर्धनासाठी उपलब्ध होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन सीएसआरच्या माध्यमातून महावारसा योजनेत विविध पुरातन वास्तू संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहे. येत्या  ४-५ वर्षात वास्तू चांगल्या व्हाव्यात, हा प्रयत्न असल्याचे सांगून विशाळगड अतिक्रमण हटवण्यासाठी निधी दिल्याचे मंत्री श्री.मुनगंटीवार म्हणाले.

ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य राखले गेले पाहिजे यासाठी सर्व घटकांनी एकत्रित आणि समन्वय राखून प्रयत्न केले पाहिजे. पुरातन वास्तू संवर्धन क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ आणि शासकीय यंत्रणा यांनी वास्तू संवर्धन, संरक्षण करताना माहिती लोकांपर्यंत नेणे, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी वेब पोर्टल तयार केले जावे, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

000

दीपक चव्हाण/विसंअ/

महा मुंबईच्या विकासात खारकोपर ते उरण उपनगरीय रेल्वे सेवा होणार दाखल – डॉ. स्वप्नील नीला

मुंबई, दि. 9 : नवी मुंबई परिसरात महामुंबई विकसित होत आहे. या महामुंबईच्या विकासासाठी राज्य व केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण होणार असून त्यातील खारकोपर ते उरण ही उपनगरीय सेवा येथील नागरिकांना मुंबईशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. महामुंबईच्या विकासात या रेल्वे सेवेचे महत्व अनन्य साधारण असणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील नीला यांनी  दिलखुलास’, जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 जानेवारीला मुंबई व नवी मुंबईसह राज्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये रेल्वे प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आलेल्या प्रकल्पांचाही समावेश आहे. महामुंबईच्या विकासाच्या दृष्टीने खारकोपर ते उरण या उपनगरीय रेल्वे मार्गाचे त्याचबरोबर बेलापूर उरण प्रकल्प मार्गावरील दिघा गाव रेल्वे स्थानकाचेही लोकार्पण यावेळी होणार आहे. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील खार रोड ते गोरेगाव या सहाव्या मार्गिकेमुळे मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार आहे. याचबरोबर वर्धा, यवतमाळ, नांदेड या प्रकल्पांतर्गत असलेला वर्धा-कळंब नवीन ब्रॉडगेज प्रकल्प, अहमदनगर-बीड-परळी या नव्या मार्गावरील न्यू आष्टी ते अमळनेर प्रकल्पांमुळे राज्यातील नागरिकांना होणारा लाभ, दळण-वळणाची सुविधा कशाप्रकारे विस्तारीत होणार याबाबतची माहिती डॉ. नीला यांनी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून दिली आहे.

डॉ. नीला यांची मुलाखत दिलखुलास कार्यक्रमात शनिवार दि. 13 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत गुरूवार, दि. 11 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://x.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

मराठी भाषा प्रेमींना एकत्र आणण्यासाठी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ अशी या संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

येत्या 27 ते 29 जानेवारी या कालावधीत नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्र येथे विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने पूर्व तयारीचा मंत्री श्री.केसरकर यांनी आढावा घेतला. त्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या आढावा बैठकीत विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांच्यासह विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.केसरकर म्हणाले, विश्व मराठी संमेलनाचे आयोजन राज्य शासनामार्फत केल्याने त्यात सातत्य राहणार आहे. यापुढे दरवर्षी हे संमेलन आयोजित करण्यात येईल. केवळ परदेशातील नागरिकांसाठी हे संमेलन नसून महाराष्ट्रासह देशातील बृहन्महाराष्ट्र मंडळे तसेच परदेशातील विविध संस्थांच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी काम करणाऱ्यांना एकत्र येता यावे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उपक्रम राबविता यावेत, या उद्देशाने हे आयोजन होत आहे. यासाठी विविध संस्थांशी संपर्क साधण्यात येत असून देशाबाहेरील अमेरिका, युरोप, ब्राझील, जपान, ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आदी देशांमधून सुमारे 500 तर भारतातील सुमारे एक हजारांहून अधिक मराठी भाषा प्रेमी नागरिक येण्याची अपेक्षा आहे.

विश्व मराठी संमेलनात विविध दर्जेदार उपक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यात बोलीभाषा संवर्धनाच्या अनुषंगाने एक सत्र अंतर्भूत असेल, असेही मंत्री श्री.केसरकर यांनी यावेळी सांगितले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

 

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते चिराग शेट्टी, ओजस देवतळे, अदिती स्वामी, गणेश देवरूखकर यांना नवी दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, ९ : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील चिराग शेट्टी याना मेजर ध्यानचंद खेलरत्न, ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार व मल्‍लखांब प्रशिक्षक गणेश देवरूखकर यांना ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आज आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री  निसिथ प्रामाणिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात. यावर्षी दोन खेळाडूंना ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’ तर 26 खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ सन्मानित करण्यात आले. यासह  एकूण नऊ खेळाडूंना आणि क्रीडा प्रशिक्षकांना ‘द्रोणाचार्य’ श्रेणीतील ‘जीवनगौरव पुरस्कार’, ‘नियमित द्रोणाचार्य पुरस्कार’  प्रदान करण्यात आले.

यासोबतच ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील तीन खेळाडूंना प्रदान करण्यात आले. ‘मौलाना अबुल कलाम आझाद चषक’ गुरू नानक विद्यापीठ, अमृतसर, लवली प्रोफेशनल विद्यापीठ, पंजाब आणि कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र या तीन संस्थांना प्रदान करण्यात आले.

चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना ‍मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

मुंबईचे चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना बॅडमिंटनसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे उदय पवार बॅडमिंटन अकादमीमध्ये प्रशिक्षण सुरू केले. नंतर त्यांनी हैदराबाद येथील गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. चिराग शेट्टीना यापूर्वी ऑगस्ट 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्‍यांना बॅडमिंटनसाठी असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तथापि, ते सध्या मलेशियन ओपन स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे, या पुरस्कार वितरण कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही.

ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना अर्जुन पुरस्कार प्रदान

ओजस देवतळे- नागपूरचा गोल्डन बॉय, 21 वर्षीय तेजस प्रवीण देवतळे यांनी ऑगस्ट 2023 मध्ये जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या चॅम्पियनशिपच्या कंपाउंड तिरंदाज स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आणि संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. ओजसने चीनमधील हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत तीन सुवर्ण पदके जिंकून आणखी एक विक्रम केला. ओजस देवतळे यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

आदिती  स्वामी – सातारा तालुक्यातील शेरेवाडी येथील आदिती गोपीचंद स्वामी ही क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ मिळविणारी जिल्ह्यातील पहिली खेळाडू ठरली असून, त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आदिती ही कमी वयात जागतिक पातळीवर सर्वोच्च कामगिरी करणारी खेळाडू आहे. वर्ष 2023 मध्ये जर्मनी येथील बर्लिनच्या तिरंदाजी स्पर्धेत कम्पाऊंड तिरंदाजीमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीने भारताला 14 वर्षांनंतर विश्व करंडक स्पर्धेत 720  पैकी 711 गुण मिळवत जागतिक विक्रम केला आहे. भारताला एशियन गेम्स, एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड कप अशा अनेक स्पर्धांमधून तिने सुवर्णपदके मिळवून दिली आहेत. आदिती स्वामी यांच्या तिरंदाजीतील असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गणेश देवरूखकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान

गणेश देवरुखकर हे व्यायामशाळा संचालक, प्रशिक्षक, परीक्षक आणि कलाकार आहेत. ते मुंबईतील श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे मालक आणि व्यवस्थापक आहेत. एक अनुभवी मल्लखांबपटू,  म्हणून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे आणि विविध पदके जिंकली आहेत. श्री. देवरुखकर यांना त्यांच्या मलखांब प्रशिक्षणा असामान्य कामगिरीबद्दल प्रतिष्ठेच्या उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्काराने राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांची यादी

मेजर ध्यानचंद खेलरत्न : चिराग शेट्टी आणि सात्त्विक साईराज रंकीरेड्डी (बॅडमिंटन), अर्जुन पुरस्कार : ओजस देवतळे, आदिती स्वामी (दोघे तिरंदाजी), मुरली श्रीशंकर, पारुल चौधरी (दोघे अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सिंग), आर. वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल, दिव्यक्रिती सिंग (घोडेस्वारी), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्ण बहादूर पाठक, सुशीला चानू (दोघे हॉकी), पवनकुमार, रितू नेगी (दोघे कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, ईशा सिंह (दोघे नेमबाजी), हरिंदर पाल सिंग संधू (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार, अंतिम (दोघे कुस्ती), नौरेम रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा-तिरंदाजी), इलुरी रेड्डी (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा-कॅनोइंग). ’

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी) : ललित कुमार (कुस्ती), आरबी रमेश (बुद्धिबळ), महावीर प्रसाद सैनी (पॅरा-अ‍ॅथलेटिक्स), शिवेंद्र सिंह (हॉकी), गणेश देवरुखकर (मल्लखांब). ’

द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव): जसकीरत सिंग ग्रेवाल (गोल्फ), भास्करन ई (कबड्डी), जयंता कुमार पुशीलाल (टेबल टेनिस). ’

ध्यानचंद जीवनगौरव: मंजुषा कन्वर (बॅडमिंटन), विनीत कुमार शर्मा (हॉकी), कविता सेल्वराज (कबड्डी)

0000

पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय; पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन

मुंबई, दि. 9 : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी वसुंधरा अभियान, फिनिक्स फाऊंडेशन संस्था, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या शिखर परिषदेमध्ये चार सत्रांमध्ये पर्यावरण बदलाविषयीच्या समस्या, बांबू लागवड म्हणजे काय, बांबू लागवडीचे महत्व आणि वातावरण बदलामध्ये बांबू लागवडीचे महत्व या विषयावर चर्चासत्रे झाली. या चर्चासत्रामध्ये बांबू लागवडीचे महत्व सांगताना मार्गदर्शकांनी बांबू लागवडीमध्ये असलेल्या संधी, बांबू लागवडीमधून साधता येणारी आर्थिक प्रगती, त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. त्यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा उत्तम पर्याय असल्याचे मनोगत सर्वच मान्यवरांनी व्यक्त केले. तसेच बांबू लागवडीमध्ये भविष्यातील देशाच्या आर्थिक प्रगतीच्या  अनेक संधी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

या शिखर परिषदेमधील चर्चेमध्ये राष्ट्रीय बांबू मिशनचे संचालक प्रभातकुमार, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, आसाम बायो रिफायनरीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक भास्कर फुकन, अदानी एन्टरप्रायजेसचे अमोल जैन, मुठा इन्डस्ट्रीचे नीरज मुथा, सीएनबीसीच्या मनीषा गुप्ता, रेणुका शुगर्सचे अतुल चतुर्वेदी, पीस ॲन्ड सस्टेनिबिलिटीचे संदीप शहा, आंतरराष्ट्रीय बांबू संघटनेचे बोर्जा दे ला इस्कार्बो, टेरीचे अरुपेंद्र मुलिक, नॅशनल रिफाईन्ड एरिया ॲथॉरिटीचे अशोक दहिवाल, एमएसएमई क्लस्टरचे मुकेश गुलाटी, भारतीय विज्ञान संस्थेचे माजी प्रमुख के.पी.जे.रेड्डी, पर्यावरण कार्यकर्त्या निशा जांमवल यांनी सहभाग घेतला.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

 

 

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...