सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 952

महाराष्ट्रात दुसऱ्यांदा होणार राष्ट्रीय युवा महोत्सव मंत्रभूमीत रंगणार युवकांच्या कला – कौशल्याचा जागर

‘उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका, जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही’, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी युवकांना दिला आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्श झालेल्या नाशिकमध्ये युवा महोत्सवांच्या आयोजनाची संधी राज्याला मिळाली आहे. अशा या नगरीत देशभरातील युवकांचे उत्स्फूर्त स्वागत केले जाणार आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. स्वामी विवेकानंद हे समाजसुधारक आणि ज्यांच्या विचारातून लोकांमध्ये क्रांती घडली आहे. त्यांचे विचार आजही सर्व युवकांना प्रेरणा व प्रोत्साहन देत आहेत. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून कला, साहित्य, तंत्रज्ञान, विज्ञान, संस्कृती यांचा अनोखा अनुभव नाशिककरांना घेता येणार आहे.

देशातील युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्ताने दरवर्षी देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे २७वा राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे. ही एक मोठी संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाशिक येथे उद्घाटन होणार आहे.

१२ जानेवारी हा स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून सुरू होणारा आठवडा राष्ट्रीय युवा सप्ताह म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय युवा सप्ताह उत्सवाचा एक भाग म्हणून, भारत सरकार दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करते. भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा हा कार्यक्रम आहे. दरवर्षी एका राज्यामध्ये संयुक्त उपक्रम साजरे केले जातात. राष्ट्रीय एकात्मता, सांप्रदायिक सौहार्दाची भावना, बंधुता, धैर्य आणि साहस या संकल्पनेचा प्रसार करून त्यांच्या सांस्कृतिक पराक्रमाचे प्रदर्शन एका सामायिक व्यासपीठावर करणे हा युवा महोत्सवाचा उद्देश आहे. देशभरातील तरुणांचे मेळावे आयोजित करून आणि त्यांना विविध उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून  राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा केला जातो.

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव नाशिक येथील तपोवन मैदानावर १२ ते १६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशामधील ८ हजार युवक सहभागी होणार आहेत.          युवकांचा सर्वांगिण विकास, संस्कृती आणि परंपरांचे जतन, युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे, राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील युवांचा चमू, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक, परीक्षक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण आठ हजार जण महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

भारत सरकारने १९८४ मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून जाहीर केला. १९८५ पासून दरवर्षी १२ जानेवारी रोजी देशात राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यामध्ये स्वामी विवेकानंदांची भाषणे, त्यांची शिकवण, प्रबोधन, देशप्रेम याविषयी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. असे कार्यक्रम तरुणांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहेत.

नाशिकला होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल. नाशिक येथे होणाऱ्या महोत्सवासाठी महाराष्ट्राचा ‘शेकरू’ हा राज्य प्राणी शुभंकर म्हणून निवडण्यात आले आहे. महाराष्ट्राचा शेकरू हा दिमाखदार राज्याचे वैशिष्ट्ये सर्वांसमोर प्रथमच अशा स्वरुपात येत आहे. शेकरू हा शांतता, मैत्री, गतिशीलता आणि पर्यावरण प्रेमाचे प्रतिक आहे. त्यातूनही युवकांना प्रेरणा मिळेल. ‘युवा के लिए – युवा द्वारा’ हे बोधवाक्य आहे, तर महाराष्ट्रासाठी ‘सशक्त युवा- समर्थ भारत’ हे घोषवाक्य आहे.

– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत’  साकार करण्याची प्रेरणा मिळणार आहे. या महोत्सवाचे १२ जानेवारी २०२४ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्राला जी-२० नंतर पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी मिळणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हा राष्ट्रीय युवा महोत्सव यशस्वी करण्याची जबाबदारी महाराष्ट्राने घेतली आहे. महाराष्ट्राची संस्कृती व कला परंपरा या महोत्सवातून देशभर पोहोचवता येणार आहे. १६ वर्षांनंतर महाराष्ट्राला या युवा महोत्सवाच्या आय़ोजनाचं यजमानपद मिळाले आहे. यात जास्तीत युवक सहभागी होतील. हा महोत्सव उद्घाटनापासून ते समारोपर्यंत दिमाखदार होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

महोत्सवाच्या आयोजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर समिती, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर कार्यकारी समिती, नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती, तर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

महोत्सवादरम्यान आयोजित केलेल्या उपक्रमांमध्ये स्पर्धात्मक आणि गैर-स्पर्धात्मक सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन, बौद्धिक प्रवचन, युवा कलाकारांची शिबिरे, चर्चासत्रे आणि साहसी कार्यक्रम यांचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय युवा पुरस्कारही  दिले जाणार आहेत.

राष्ट्रीय युवा महोत्सवाप्रमाणे, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि ब्लॉक स्तरावरील युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सवाप्रमाणेच आयोजित करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन दिले जाते. उत्सवाचे केंद्र सांस्कृतिक पैलूंवर आणि इतर अनेक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित करते ज्यामध्ये विविध प्रकारच्या क्रियाकलापांचा समावेश होतो, जे केवळ मैत्रीची भावनाच नव्हे तर शांतता आणि विकास देखील दर्शवते. या सर्वांशिवाय, हा उत्सव तरुणांना त्यांच्या सांस्कृतिक प्रतिभा उंचावण्यासाठी आणि आकांक्षा व्यक्त करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे.

 

राजू धोत्रे

विभागीय संपर्क अधिकारी, मंत्रालय, मुंबई.

0000

नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. १० : राज्याच्या नवनियुक्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आज  (१० जाने) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची राज्यपालांसोबत ही पहिलीच भेट आहे.

0000

New DGP calls on Governor

Mumbai, 10th Jan : The newly appointed Director General of Police Rashmi Shukla called on Maharshtra Governor Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai. This was her first meeting with the Governor after taking charge of DGP.

0000

सूक्ष्म सिंचन योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन सकारात्मक – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. १० :- ‘प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजने’तील सूक्ष्म सिंचन उत्पादक, वितरक आणि शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवून या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.

‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’अर्थात प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन या योजनेतील अडचणींबाबत इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या शिष्टमंडळाने आज कृषिमंत्री श्री. मुंडे यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष झुंबरलाल भंडारी, उपाध्यक्ष के एम महामूलकर, सचिव संदीप जवळेकर, कमलेश दास, ‘पोकरा’चे व्यवस्थापकीय संचालक परिमल सिंह आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुंडे म्हणाले, सूक्ष्म सिंचन योजनेचा केंद्र सरकारकडून देण्यात येणारा निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेऊन त्याचे वितरण करण्यात येईल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील शेतकऱ्यांच्या पूरक अनुदानात योजनांतील नियमावलीत बदल करून उत्पन्नाची अट शिथिल करण्याबरोबरच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत पूरक अनुदानाची कमाल मर्यादा वाढविण्यासाठी शासन सकारात्मक आहे. महाडीबीटी पोर्टल वरील अडचणींची सोडवणूक करण्यात येईल.

तसेच इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाला राज्यस्तरीय समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्याबाबत वेगळा प्रस्ताव सादर करावा, असेही मंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी सांगितले.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

नाशिक जिल्ह्यात कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. १० :- निसर्गाचा लहरीपणा आणि दरातील चढ उतार यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्ट प्रकल्पांतर्गत कांद्याची भुकटी करण्याचा प्रकल्प शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

याबाबत नाशिक जिल्ह्यातील विधान परिषदेचे माजी सदस्य जयंतराव जाधव यांनी कृषी मंत्री श्री. मुंडे यांच्याकडे बैठकीचे मागणी केली होती. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

निसर्गाच्या लहरीपणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. तसेच कांदा निर्यातीबाबतच्या धोरणात फेरबदल केल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. काही वेळेस शेतकरी कांदा फेकून देतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपनीकडून डिहायड्रेशन प्रोजेक्ट केल्यास कांद्याची भुकटी करून शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे अशा प्रकारचा पथदर्शी प्रकल्प राबवून कांदा उत्पादकांना दिलासा देण्याची मागणी श्री. जाधव यांनी शासनाकडे  केली होती.

हा प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जनहिताचा असल्यामुळे या प्रकल्पाला स्मार्ट योजनेतून ६० टक्के ऐवजी ९० टक्के पर्यंत अनुदान देण्यासाठी जागतिक बँकेकडे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी दिले. तसेच नाशिक जिल्ह्यात पिकणाऱ्या द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात निर्यात होते. मात्र, फूड टेस्टिंग लॅबोरेटरी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांना निर्यातीच्या अटींची पूर्तता करता येत नाही. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात फूड टेस्टिंग लॅबोरेटरी उभारण्यासाठी सुद्धा स्मार्ट योजनेतून अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे सादर करण्याचे आदेश सुद्धा यावेळी कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी दिले.

यावेळी स्मार्ट प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर, कृषी संचालक सुभाष नागरे, सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, कृषी विभागाचे उपसचिव संतोष कराड, कृषी संचालक दशरथ तांबाडे आदी उपस्थित होते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

 

 

चंद्रपूर महापालिका मलनि:स्सारण प्रकल्पास ५४२ कोटींची प्रशासकीय मान्यता

चंद्रपूर, दि.  १०: केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियानांतर्गत चंद्रपूर महापालिकेच्या रु. 542.05 कोटीच्या मलनि:स्सारण प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नगर विकास विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकरीता पाठपुरावा केला होता.

केंद्र शासन पुरस्कृत 2.0 अभियानाची शासन निर्णयान्वये सन 2021-22 पासून राज्यामध्ये अंमलबजावणी करण्यात येत आहे. सदर अभियानांतर्गत पाणीपुरवठा सरोवरांचे पुनर्जीवन व हरित क्षेत्र विकास आदी पायाभूत सुविधांची निर्मिती राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये करण्यात येणार आहे. आणि यापूर्वीच्या अमृत अभियानांतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 44 शहरांमध्ये मलनि:स्सारण सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत राज्याच्या 18236.39 कोटी प्रकल्प किमतीच्या राज्य जलकृती आराखड्यास केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पांतर्गत कार्य सर्वेक्षण, मलनि:स्सारण प्रणाली, गृह सेवा कनेक्शन, रस्ता पुनर्रसंचयित करणे, रेल्वे क्रॉसिंग पुढे ढकलणे, राष्ट्रीय महामार्ग 9 आणि नाला क्रॉसिंग एकूण 7, पंपिंग मशिनरी, सीवरेज पंपिंग स्टेशन, सीवर स्वच्छता तपासणी आणि नूतनीकरण आदी कामे असणार आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी विहितकालावधीत पूर्ण करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणा, प्रकल्पव्यवस्थापन सल्लागार व प्रकल्प व्यवस्थापन विकास व व्यवस्थापन सल्लागार यांची संयुक्तरीत्या राहील. अमृत 2.0 अभियानांतर्गत मार्गदर्शक सूचनेनुसार सदर प्रकल्पासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागाराची नेमणूक करावी. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानाच्या केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचना चंद्रपूर महानगरपालिकेच्या मलनि:स्सारण प्रकल्पास लागू राहतील.

शहरात 233 किलोमीटरची पाईपलाईन

पहिल्या टप्प्यात चंद्रपूर शहरात 233 किलोमिटर पाईप लाईन मलनिःसारण करण्यासाठी होणार असून यातून शहरातील 54 हजार घरांना जोडणी होणार आहे.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विभाग विकास समितीची बैठक

सांगली, दि.१० (जिमाका) : कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली डोंगरी विभाग विकास समितीची बैठक पार पडली. पालकमंत्री हे डोंगरी विभाग विकास समितीचे अध्यक्ष असतात. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सहाय्यक नियोजन अधिकारी पूजा पाटील आणि उदय पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रतिनिधी यांच्यासह अशासकीय सदस्य उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी डोंगरी विभाग विकास कार्यक्रम सन 2022-23 अंतर्गत मंजूर कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तसेच, सन 2023-2024 प्रस्तावित आराखड्यास मान्यता देण्यात आली.

तसेच,  डोंगरी  विभाग विकास कार्यक्रम अंमलबजावणीकरिता डोंगरी समितीवर नियुक्त दोन अशासकीय सदस्य राजाराम आनंदराव पवार (पाडळी, ता. कडेगाव) व दुर्गादेवी रणजीतसिंह नाईक (रा. शिराळा) यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

०००

 

 

रेल्वे विभागाशी संबंधित सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. १० (जिमाका) : सांगली – मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग तसेच रेल्वे विभागांशी संबंधित अन्य सर्व समस्यांचे तातडीने निराकरण करा. त्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सविस्तर आराखडा सादर करावा, असे निर्देश कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे दिले.

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार रेल्वेच्या विभागीय अधिकाऱ्यांनी आज सांगलीला भेट देऊन पाहणी केली व समस्यांची माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, रेल्वे विभागाचे सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रीतमकुमार आणि मंडल रेल इंजिनिअर विकासकुमार आदी उपस्थित होते.

सांगली – मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील जुना पूल तसाच ठेवून नवीन सहा पदरी पूल करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री यांच्या सूचनेनुसार रेल्वे प्रशासनाने स्थानिकांच्या समस्यांकडे सकारात्मक विचारसरणीने पाहावे. सांगली – मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील जुन्या पूलासंदर्भात नागरिकांची सोय पाहावी. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका आदि संबंधित विभागांच्या स्थानिक अधिकाऱ्याशी समन्वय ठेवून यासंदर्भातील कार्यवाही करावी. कृपामयी रेल्वे ओव्हरब्रीज, मिरज यार्ड येथील रेल्वे फाटक क्र. १ आणि मिरज आरग सेक्शनमधील रेल्वे फाटक क्र. ७० आणि हुबळी विभागातील विजयनगर स्टेशन यार्ड या ठिकाणी प्रवाशी व नागरिकांच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सर्वोच्च प्राधान्याने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. समतानगर (मिरज) येथील रेल्वेच्या भिंतीमुळे नागरिकांना वहिवाटीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता रेल्वे व महानगरपालिका यांनी घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

०००

 

मनपा क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रेचा पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ

सांगली, दि. १० (जिमाका) : शासन विविध योजना राबवित असून विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज येथे केले.

      विकसित भारत संकल्प यात्रेचा महानगरपालिका क्षेत्रातील शुभारंभ आज मारूती चौक सांगली येथे पालकमंत्री डॉ. खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वैभव पाटील, प्रकाश ढंग, श्रीकांत शिंदे, प्रकाश बिरजे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की,  विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ महानगरपालिका क्षेत्रात झाला असून सांगली, मिरज व कुपवाड शहरातील विविध भागात केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देणारा रथ जाणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात या यात्रेची सांगता २१ जानेवारी रोजी होणार आहे. जे लाभार्थी शासनाच्या योजनांपासून वंचित आहेत त्यांना चांगले मार्गदर्शन करावे. सर्व कागदपत्रांची माहिती देवून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याच्या दृष्टीकोनातून सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले की, शासन विविध योजनांच्या माध्यमातून वंचितांना न्याय देण्याचे काम करीत आहे. नागरिकांनी विविध योजनांच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या स्टॉलला भेटी देवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त सुनील पवार यांनी विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाचे महानगरपालिका क्षेत्रात आगमन झाल्याचे सांगून हा रथ केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रातील संपूर्ण प्रभागामध्ये जाणार असल्याचे सांगितले. सर्वांनी शासनाच्या योजना सामान्य लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असे सांगून शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी कमल शिर्के व राष्ट्रीय उपजीविका अभियानांतर्गत स्वनिधीचा लाभ घेतलेल्या अनिता लोंढे यांनी मनोगतात शासनाच्या योजनेचा कसा लाभ मिळाला याबद्दल माहिती सांगून शासनाचे आभार मानले.

कार्यक्रम स्थळी प्रधानमंत्री आवास योजना, सर्वांसाठी घरे, दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आदि योजनांची माहिती देणारे स्टॉल, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी स्टॉल, तसेच आरोग्य  विभागाच्या वतीने आरोग्य तपासणीसाठीचा स्टॉल लावण्यात आले होते.

दीपक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. उपायुक्त राहुल रोकडे यांनी आभार मानले.

०००

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ साठी ४७१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

सांगली, दि. १० (जिमाका) : कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ साठी एकूण ४७१ कोटी १ लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास आज मान्यता देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी ३८५ कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमसाठी ८५कोटी आणि आदिवासी उपयोजना बाह्य घटक कार्यक्रम साठी १ कोटी १ लाख रूपये निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच, जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) करीता १५० कोटीची जादा मागणी उपमुख्यमंत्री (नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ११ जानेवारी रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीत करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, आमदार अरूण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अनिल बाबर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमन पाटील, आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, सन 2023-24 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेतून 405 कोटी रूपये नियतव्यय मंजूर आहे. त्यापैकी रक्कम रूपये 284 कोटी प्राप्त असून, 213 कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. 45 टक्के निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित कामांच्या प्रशासकीय मान्यतेची कार्यवाही 15 दिवसांत पूर्ण करावी व मार्च 24 अखेर निधी खर्च करावा. याचे कटाक्षाने पालन करावे. कोणताही निधी परत जाणार नाही, याची दक्षता सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 (सर्वसाधारण) करीता स्थानिक स्वराज्य संस्थांकडील आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामे तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉ. खाडे यांनी दिले. तसेच, टेंभू, ताकारी व म्हैसाळ उपसा सिंचन योजनेंतर्गत भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला अदा करण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठक घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एस. टी. महामंडळाच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे यावेळी निर्देशित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल व स्मार्ट पीएचसी या उपक्रमांचे राज्य मंत्रीमंडळ बैठकीत कौतुक करण्यात आले असून, दोन्ही उपक्रम अजून गतीने राबवावेत, असे त्यांनी यावेळी सूचित केले. या माध्यमातून शाळांमध्ये चांगल्या सुविधा निर्माण होऊन, ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना मिळेल. ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी चालू आर्थिक वर्षातील डिसेंबरपर्यंतच्या खर्चित निधीचा आढावा घेण्यात आला. 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समिती सभेचे इतिवृत्त व त्यावरील कार्यवाहीच्या अहवालास मान्यता देण्यात आली. तसेच, प्रस्ताव प्राप्त झालेल्या यात्रास्थळांना “क” वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात आली.

या बैठकीत मौजे फार्णेवाडी (ता. वाळवा)  व मौजे निगडी बु. (ता. जत) येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली या संस्थेस सी. टी. स्कॅन मशीन विथ ऑल अक्सेसरीज व टर्न की सिस्टीम खरेदीसाठी रु. 10.50 कोटी इतक्या रकमेस शासनाकडून दि. ९ जानेवारी रोजी सुधारीत प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजमध्ये एमआरआय मशिन करीता रु. 25 कोटी इतक्या रकमेस शासनाकडून  दि. 9 जानेवारी रोजी प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) मधून सन 2023-24 व सन 2024-25 मध्ये निधी उपलब्ध करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून तर सहायक आयुक्त जयंत चाचरकर यांनी अनुसूचित जाती उपयोजनामधून सन 2023-24 मधील कामांची व डिसेंबर 2023 अखेर खर्चित निधीची माहिती सादरीकरणातून दिली.

यावेळी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी विविध विषय मांडले. रस्ते विकास, पाणी, ग्रामीण भागातील रस्ते, अंगणवाडी व शाळा खोल्यांची दुरूस्ती, मुख्यमंत्री सौर कृषि योजना, ग्रामीण रूग्णालयांचा प्रस्ताव, अपूर्ण पुलांची कामे, ट्रान्सफॉर्मरसाठी निधी उपलब्धता, सभामंडप, ग्रामपंचायतीच्या मालकीचे मंगल कार्यालय, बसफेऱ्या, महावितरणची देयके, पर्यटन विकास, तीर्थक्षेत्र विकास आदि विविध विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

प्रारंभी दिवंगत माजी आमदार प्रा. शरद पाटील यांना श्रद्धाजंली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्रीडांगण विकास अनुदान योजनाअंतर्गत पलूस नगरपरिषदेने सादर केलेल्या प्रस्तावानुसार पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते राष्ट्रीय रायफल शूटर वैष्णवी विजय सूर्यवंशी हिच्या वडिलांना रक्कम रूपये पाच लाख किंमतीचे पिस्टल प्रदान करण्यात आले.

०००

मंत्रिमंडळ निर्णय

राज्यातील नागरी भागात आता बाल विकास केंद्र

मुंबई, दि. १० : कुपोषणावर मात करण्यासाठी राज्यातील नागरी भागात ग्रामीण बाल विकास केंद्र योजनेच्या धर्तीवर नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र योजना सुरू करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यात ग्रामीण भागामधील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांच्या कुपोषणावर उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी स्तरावर ग्राम बालविकास केंद्र योजना कार्यान्वित आहे. राज्यात नागरीकरणाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या नागरी भागात राहत असल्याने नागरीकरण क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत देखील वाढ होत असून ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरु करण्यात येणार आहे.  या निर्णयामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील राज्यातील 104 नागरी प्रकल्पांमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी वार्षिक अंदाजे 11.52 कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली असून प्रती वर्ष अतितीव्र कुपोषित बालकांच्या संख्येनुसार येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.

—–०—–

पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना, कोथेरी लघुपाटबंधारे प्रकल्प बाधितांना आर्थिक पॅकेज मंजूर

राज्यातील पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजे रोहणखेड व मौजे पर्वतापूर, जि. अमरावती आणि कोथेरी लघुपाटबंधारे ता. महाड, जि.रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगाव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब म्हणून आर्थिक पॅकेज देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यामध्ये १ जानेवारी २०१४ पूर्वीच्या व पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पातंर्गत बाधित गावठाणातील प्रकल्पबाधित कुटुंबांना घराच्या बांधकामाचा खर्च, सर्व नागरी सुविधा विकसित करण्यासाठी लागणारा खर्च व स्थलांतरीत करतांना देय असलेले भत्ते यापोटी खालील प्रमाणे आर्थिक पॅकेज अनुज्ञेय करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रधानमंत्री (ग्रामीण) आवास योजनेतील निकषाप्रमाणे बांधलेल्या घराऐवजी   रु.1,65,000/- निर्वाह भत्ता

अ) बाधित स्थलांतरीत कुटुंबाला दरमहा एक वर्षासाठी

ब) अनुसूचित जाती आणि  अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना अतिरिक्त

अ) रु. 3,000/-

ब) रु.50,000/-

वाहतूक भत्ता

प्रत्येक बाधित स्थलांतरीत कुटूंबाला वाहतूक खर्च   रु.50,000/

पशुधन असणाऱ्यांना किंवा छोट्या दुकानदारांना द्यावयाची आर्थिक मदत

गोठा किंवा छोटे दुकान असणाऱ्या कुटुंबाला एकवेळची आर्थिक मदत रु.25,000/-

कारागीर/छोटे व्यापारी यांना एकवेळचे अनुदान      रु. 50,000/-

पुनर्स्थापना भत्ता

घर बदलल्यानंतर एकवेळचे  पुनर्स्थापना भत्ता        रु.50,000/-

ही दर्शविण्यात आलेली रक्कम तसेच नागरी सुविधांवर अपेक्षित एकूण खर्च (प्रती भूखंड प्रमाणे) व त्या व्यतिरिक्त त्यावर २५ टक्के वाढीव रक्कम याप्रमाणे आर्थिक पॅकेज म्हणून देण्यास मान्यता दिली आहे.

ज्या बाधित गावठाणांसाठी नवीन गावठाण विकसित झालेले असेल परंतू प्रकल्पग्रस्त स्थलांतरीत झालेले नाही, अशा प्रकरणी जे प्रकल्पग्रस्त आर्थिक पॅकेज  घेतील त्यासाठी तयार करण्यात आलेला भूखंड लिलाव करून त्यामधील उत्पन्न प्रकल्पाच्या संस्थेला (ज्यांनी प्रकल्पासाठी खर्च केला असे) परत करण्यात येईल.

पेढी बॅरेज मध्यम प्रकल्प उपसा सिंचन योजना या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या मौजा रोहणखेड व मौजा पर्वतापूर ता. जि. अमरावती या गावातील तसेच कोथेरी लघुपाटबंधारे योजना, ता. महाड, जि. रायगड या प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या शिरगांव येथील प्रकल्पबाधित कुटुंबांना विशेष बाब आर्थिक पॅकेज म्हणून मंजूरी देण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पांना आर्थिक पॅकेजसाठी आवश्यक रक्कमेची परिगणना करणे, निधी उपलब्ध करणे आणि अंमलबजावणी करणे या बाबी प्रकल्प यंत्रणा जलसंपदा विभाग यांनी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

—–०——

विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू

विरार, जि. पालघर येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कार्यरत असलेल्या आणि  १२ जुलै २००७ च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने ताब्यात घेतलेल्या पुर्नवसन केंद्रातील २३ कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

दिव्यांग पुनर्वसन केंद्र या संस्थेमध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ नियुक्तीच्या दिनांकापासून महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, 1982  व  महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम, 1984 लागू करण्यात आला आहे.

जिल्हा पुनर्वसन केंद्रातील कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू झाल्यानंतर त्यांच्याकडून CPF ची जमा झालेली रक्कम सबंधित कर्मचाऱ्यांना जमा झालेल्या व्याजासह अदा करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडून भरणा करण्यात आलेली CPF ची रक्कम व्याजाच्या रक्कमेसह राज्य शासन खाती जमा करण्यात येईल. शासनाकडून देय असलेली सेवा निवृत्ती नि-उपदानाची रक्कम तसेच निवृत्तीवेतनाची रक्कम तीन हप्त्यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येईल.

—–०—–

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा करातून सूट

‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिक्षण आणि सामाजिक प्रेरणादायी विचारांना चालना देणारा हा चित्रपट मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पहावा यासाठी विशेष खेळाचे आयोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या.

सत्यशोधक हा मराठी चित्रपट शिक्षण आणि सामाजिक समतेच्या मूल्यांना चालना देणारा आहे. या चित्रपटात महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन, महिला आणि अस्पृश्य यांच्या शिक्षणासाठीचे त्यांचे अमूल्य योगदान व त्यांच्या परिश्रमाची कथा दाखविण्यात आलेली आहे. अशाप्रकारे जनमानसात योग्य तो सामाजिक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आलेला आहे.

चित्रपटाच्या शैक्षणिक आणि सामाजिक प्रेरणादायी पैलुंचा विचार करता तो सर्वांना पाहता यावा यासाठी प्रोत्साहन म्हणून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चित्रपटगृहांनी या चित्रपटाच्या तिकीट दरावर लागू असलेला राज्य वस्तू व सेवाकर (एसजीएसटी) 30 एप्रिल, 2024 पर्यंत कालावधीत प्रेक्षकांकडून वसुल न करता स्वत: राज्य शासनाच्या तिजोरीत भरणा करण्यासाठी मंजूरी देण्यात आली. तिकीट विक्रीवरील शासन तिजोरीत भरणा केलेल्या राज्य वस्तू व सेवाकराचा (एसजीएसटी) परतावा देण्यास यावेळी मंजुरी देण्यात आली.

—–०—–

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहिनांना एक लाख रुपयांचे अनुदान

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते.

तथापि, या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन, राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनांतर्गत घरकुलास पात्र परंतू, बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबांना जागा खरेदीसाठी ५० हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरणामुळे सद्य:स्थितीत जागांच्या किंमती पाहता, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान १ लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

——०——

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त २२  जानेवारी पासून साखर, खाद्यतेल, चनाडाळ, रवा, मैदा आणि पोहे या ६ वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्रिका धारकांना देण्यास आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कु़टुंब शिधापत्रिकाधारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल, चणाडाळ, रवा, मैदा व पोहा प्रत्येकी अर्धा किलो याप्रमाणे या सहा वस्तूंचा समावेश असलेला संच “आनंदाचा शिधा” म्हणून वितरित करण्यात येणार आहे. आनंदाचा शिधा प्रति संच १०० रुपये या सवलतीच्या दरात वितरीत करण्यात येणार आहे.

या वितरणाकरीता येणाऱ्या 549.86 कोटी रुपये इतक्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे.

—–०—–

आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा व्यवस्था व कार्यपद्धती

पाटबंधारे विकास महामंडळांसाठी  निर्माण करण्यात आलेल्या आभासी वैयक्तिक ठेव लेखा या कार्यपद्धतीच्या धर्तीवर राज्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांना सहायक अनुदानाच्या निधीचे  संवितरण करण्यासाठी आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती कार्यान्वित करण्यासाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांचेकडून आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रणाली विकसित करुन घेण्यास, तसेच शासनाच्या अर्थसंकल्प अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणाली (BEAMS), अर्थवाहिनी, बिल पोर्टल आणि ट्रेजरीनेट या प्रणालींमध्ये आवश्यक ते बदल विकसित करुन घेण्यास मान्यता देण्यात आली. ही कार्यपद्धती कार्यान्वित करण्यासाठी योग्य आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य कार्यान्वयन प्राधिकारी / संस्था यांची निवड वित्त विभागाच्या स्तरावर करण्यास मान्यता देण्यात आली.

ही कार्यपद्धती कार्यान्वित करणेसाठी तपशीलवार कार्यपद्धती व प्रक्रिया निश्चित करणेबाबत आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत कार्यवाही वित्त विभागाच्या स्तरावर करण्यासही मान्यता देण्यात आली.

—–०—–

ग्राम विकास विभाग योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी लेखाशिर्ष मंजूर

ग्राम विकास विभागात राबविण्यात येणाऱ्या योजना सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेशी संबंधित असल्याने त्यांची प्रसिद्धी होण्यासाठी आणि निधी उपलब्धतेसाठी अन्य मंत्रालयीन विभागांप्रमाणे स्वतंत्र लेखाशिर्ष उघडण्यासाठी मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

“जाहिरात व प्रसिद्धी” या कार्यक्रमासाठी ग्राम विकास विभागाकरिता नवीन लेखाशिर्षास मान्यता देण्यात आली असून  विभागास उपलब्ध होणाऱ्या योजनांतर्गत नियतव्ययातून निधी सदर लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पित करण्यास मान्यता देण्यात आली.

—–०—–

राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची पदे टप्प्याटप्प्याने भरण्यास मान्यता

राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याबाबत व 5 हजार 803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास आणि या मंजूर पदांवरील भरती टप्प्याटप्प्याने करण्यास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

नॅशनल कोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम कमिटी (NCMSC) ने शिफारस केलेल्या दुय्यम न्यायाधीशांच्या 3211 पदांची शिफारस करतांना महाराष्ट्रात 2012 पदे मंजूर होती. त्यानंतर 348 पदे मंजूर करण्यात आली असून सद्य:स्थितीत मंजूर पदसंख्या 2360 एवढी आहे. त्यास अनुसरुन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दुय्यम न्यायालयातील न्यायाधीशांच्या 3211 पदांपैकी महाराष्ट्रात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त 2863 पदे तसेच त्यांचेसाठी सहाय्यभूत 11 हजार 64 पदे निर्माण करण्याचा व 5803 मनुष्यबळ बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंजूर पदांवरील भरती ही टप्याटप्याने करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

——०——

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...