सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 951

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा; नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन

नवी दिल्ली, 10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांशी संवाद साधतील.

यावर्षी, राष्ट्रीय युवा दिन विविध शासकीय विभागांच्या सहकार्याने देशातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. या मोहिमेत 88,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) युनिट्स, नेहरू युवा केंद्र संघटन (एनवायकेएस) आणि विविध शैक्षणिक संस्थांच्या पाठिंब्याने देशभरातील ‘माय भारत’ स्वयंसेवक, भारतासाठी स्वयंसेवक म्हणून उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील.

12 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्र/राज्य मंत्री, स्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून, व्यापक मोहिमेद्वारे उद्याची सुरक्षितता निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शविली जाईल. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी तैनात केले जातील.

कार्यक्रमात सहभागी मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये 12 जानेवारी 2024 रोजी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरुकता मोहिमेसाठी स्टॉल उभारतील. तसेच वाहतूक जागरूकता, पोषण आणि आहार, केव्हीआयसी स्टार्टअप्सची उत्पादने, पीएमईजीपी  लाभार्थी इ. मुद्द्यांवर यावेळी भर दिला जाईल. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन डिजिटल माय भारत व्यासपीठावर जिल्हास्तरावर तयार केले जात आहेत, जेणेकरुन जास्तीतजास्त युवकांपर्यंत पोहोचता येईल. प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा व्यापकस्तरावरील उपक्रमांमधून प्रतिबिंबित व्हावेत, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जाण्याबाबतची माहिती केंद्र शासनाच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने दिली आहे.

या उपक्रमात नोंदणीसाठी माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म (https://mybharat.gov.in) द्वारे स्वयंसेवकांची नोंदणी केली जाईल.

000000000

अमरज्योत कौर अरोरा/ वि.वृ.क्र. 05 /दि. 10.01.2024

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता एक लाख रुपये अनुदान – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 10 : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आल्यामुळे भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे असे ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

मंत्री  श्री. महाजन म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटूंबांना घरे उपलब्ध करुन देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहत होते. ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य देण्यात येते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय्य योजना राबविताना जागेची कमतरता – राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात नागरिकरणामुळे जागा उपलब्ध होत नाही. पंडित दीनदयाळ जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य खरेदी योजनेंतर्गत प्रति लाभार्थी ५० हजार पर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते. मात्र, एवढ्या कमी अर्थसहाय्यामध्ये ग्रामीण भागात जागा उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत अनुज्ञेय अर्थसाहाय्यामध्ये मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क व शुल्क इत्यादी शासकीय शुल्कांचा समावेश आहे, त्यामुळे प्रत्यक्षात जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणारी अर्थसहाय्याची रक्कम कमी आहे. या पार्श्वभूमीवर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत ५०० चौरस फूटसाठी ही रक्कम मर्यादा ५० हजार रुपये वरून १ लाख रुपये केल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.

******

संध्या गरवारे/विसंअ/

मोरवा फ्लाइंग क्लब फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु करावा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाइंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत तेथील फ्लाइंग क्लब सुरु होईल, या पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. यापूर्वी 26 जानेवारी रोजी हा फ्लाइंग क्लब सुरु करण्यासंदर्भांत कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, तांत्रिक कारणांमुळे जरी उशीर होणार असला, तरी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करुन चंद्रपूरवासियांच्या स्वप्नांची पूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे चंद्रपूर येथील फ्लाइंग क्लब संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विमान प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, अधीक्षक अभियंता मंगेश कुलकर्णी, दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे नागपूरहून विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, चंद्र्पूरचे प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्यासह महसूल आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, फ्लाइंग क्लबच्या अनुषंगाने ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत. भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तत्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी चंद्रपूर येथे फ्लाइंग क्लब स्थापन करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी किमान तीन शिकाऊ विमाने खरेदी करणे आवश्यक आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उद्योगपतींकडून अशी शिकाऊ विमाने मिळण्यासंदर्भात कार्यवाही गतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

‘डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार’ सर्वंकष करण्यासाठी योजनेत सुधारणा – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

मुंबई, दि. १० : उत्कृष्ट कार्य करणारी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, स्त्री व जिल्हा रूग्णालये, खाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी यांच्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ २६ फेब्रुवारी शासनातर्फे देण्यात येतात. या पुरस्कार योजनेत सुधारणा करण्यात येत असून पुरस्कार सर्वंकष करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

डॉक्टरांचे मनोबल वाढविण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत आग्रही आहेत. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या धोरणांमधून पुरस्कार सर्वंकष करण्यात आले आहे. पुरस्काराने गौरविल्यानंतर अधिकाधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते. कोविडसारख्या साथरोग काळात डॉक्टर, आरोग्य क्षेत्रात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांनी लोकांचे जीव वाचविले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येत आहे.

राज्यस्तरावर सर्वोत्कृष्ट डॉक्टर व सर्वोत्कृष्ट महिला डॉक्टर, सर्वोत्कृष्ट उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा रूग्णालय, स्त्री रूग्णालय, स्वयंसेवी संस्था, मानसिक आरोग्य केंद्र, कर्करोग रूग्णालय,  ग्रामीण, कुटीर, उपजिल्हा यापैकी सर्वोत्कृष्ट असे एक रूग्णालय पुरस्कार देण्यात येतील. अशापद्धतीने जिल्हास्तरावरही पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्कारार्थी निवडण्यासाठी राज्यस्तरावर आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली समिती असून यामध्ये संचालक आरोग्य सेवा मुंबई व पुणे, अतिरिक्त संचालक आरोग्य सेवा (रूग्णालय) मुंबई, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रतिनिधी सदस्य असणार आहे. तर सदस्य सचिव हे आरोग्य सेवा राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे उपसंचालक असणार आहे.

विभागीय स्तरावर निवड समितीमध्ये संबंधीत आरोग्य मंडळाचे उपसंचालक अध्यक्ष, डॉक्टर संघटनेचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी, महिला डॉक्टर प्रतिनिधी, जिल्हा माहिती अधिकारी, मंडळ कार्यालयातील सहाय्यक संचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक सदस्य असणार आहे. तर आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य सदस्य सचिव असणार आहे.

स्वयंसेवी संस्थेच्या निवडीसाठी राज्यात कार्यरत असणारी, धर्मदाय आयुक्तांकडे किमान पाच वर्षापूर्वी नोंदणी केलेली, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात लगतचे किमान पाच वर्ष भरीव सहभाग असलेली, सनदी लेखापालमार्फत लगतच्या किमान तीन वर्षाचे लेखापरीक्षण केलेली, आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभाग असणारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व समुपदेशन या क्षेत्रात काम केलेले असणारी, दुर्बल घटकांसाठी दुर्गम भागात आरोग्य विषयक उपक्रम, आरोग्य शिक्षण विषय उपक्रम राबविलेली, एड्स, कर्करोग आदी क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर व राज्यात काम केलेले संस्था असावी.

वैयक्तिक पुरस्कारासाठी किमान दहा वर्ष अखंड सेवा, संस्था रूग्णालय त्यांच्या कामांमध्ये उल्लेखनिय सहभाग, आरोग्य शिक्षण उपक्रमात सहभाग असायला पाहिजे. पुरस्कारार्थींना राज्यस्तरीय कार्यक्रमात स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येईल.

*****

नीलेश तायडे/विसंअ/

क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. १० :  श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तालुका  व जिल्हा क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणासाठी निधी वितरित केला आहे. त्या संकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालयात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील जिल्हा व तालुका क्रीडा संकुलांच्या सद्य:स्थितीबाबत आढावा बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

माणगाव, तळा, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या कामांसाठी वाढीव निधी आवश्यक असेल, तर तातडीने प्रस्ताव सादर करावा आणि कालमर्यादेत कामे पूर्ण करावीत.  क्रीडा संकुलात विविध क्रीडा प्रकाराच्या सोयीसुविधेसह, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते, चेंजिंग रुम, जुनी इमारत दुरुस्ती, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था या सुविधाही चांगल्या दर्जाच्या देणे गरजेचे या क्रीडा संकुलनामुळे ग्रामीण भागातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याच्या संधी उपलब्ध होईल असेही मंत्री कु. तटकरे यांनी सांगितले.

या बैठकीला जिल्हा व तालुका क्रीडा अधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने करावी – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 10 : राज्यात उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नव्हते. विभागामध्ये प्रशिक्षणासाठी अशाप्रकारे कुठेही सुविधा नाहीत. त्यामुळे विभागात प्रशिक्षणावर मर्यादा येत आहेत. प्रशिक्षणाअभावी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता बांधणीवरसुद्धा परिणाम होतो. विभागांतर्गत प्रशिक्षण केंद्राची निकड लक्षात घेत वाटोळे, (ता. पाटण, जि. सातारा) येथे उत्पादन शुल्क विभागाचे पहिले प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तसेच प्रशिक्षण केंद्र हे अद्ययावत व सर्व सुविधांनीयुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

मंत्रालयात त्यांच्या दालनामध्ये प्रशिक्षण केंद्राबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उत्पादन शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजय सूर्यवंशी, कोल्हापूर विभागाचे उपायुक्त श्री. चिंचाळकर, उपसचिव रवींद्र औटी, अवर सचिव संदीप ढाकणे आदी  उपस्थित होते, तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र ड्रुडी सहभागी झाले होते.

वाटोळे येथील जागा ताब्यात घेऊन इमारतीचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देत उत्पादन शुल्क मंत्री श्री. देसाई म्हणाले की, जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून जमिनीचा ताबा उत्पादन शुल्क विभागाला द्यावा.  या प्रशिक्षण केंद्रामध्ये एकावेळी 200 अधिकारी प्रशिक्षण घेतील एवढी क्षमता आवश्यक आहे. प्रशिक्षण केंद्रात 30 लोकांसाठी निवासाची व्यवस्था असावी. प्रशिक्षणार्थी महिला अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी 75 क्षमतेचे व 150 पुरुष अधिकारी, कर्मचारी यांच्याकरीता वसतिगृह असावे. तसेच ग्रंथालय, तांत्रिक प्रयोगशाळा, संगणक कक्ष असावे.

प्रशिक्षण केंद्रात स्वतंत्र सेमिनार सभागृहाची व्यवस्था असणे आवश्‍यक असून वैद्यकीय तपासणी कक्ष, भोजनाच्या व्यवस्थेसह सुसज्ज असावे. यासोबतच  या ठिकाणी क्रीडाविषयक सर्व सुविधा करण्यात याव्यात, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या. याकामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन आराखडे अंतिम करावेत.

यावेळी पाटण येथील प्रशासकीय इमारतीच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या. बैठकीला संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

****

नीलेश तायडे/विसंअ/

मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसह ‘डीपीसी’चा निधी उपयोगात आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. 10 :- मराठवाड्यात आकांक्षीत तालुक्यांची संख्या जास्त असून काही जिल्हे मानव विकास निर्देशांकात मागे आहेत. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या विकासातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामुळे मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, नीती आयोगाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना यांच्या माध्यमातून मिळणारा निधी प्राथम्याने वापरावा. त्यानंतर जिल्ह्याच्या गरजेनुसार लोकप्रतिनिधींच्या शिफारशींप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी उपयोगात आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज मराठवाड्यातील ८ आणि उत्तर महाराष्ट्रातील ५ अशा, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, नांदेड, लातूर, जालना, बीड, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार या १३ जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस नांदेड, लातूर आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे, धाराशीवचे पालकमंत्री तानाजी सावंत, नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे, नंदुरबारचे पालकमंत्री अनिल पाटील, मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे, हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे, यांच्यासह पालक सचिव एकनाथ डवले, पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, तसेच संबंधित जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केंद्र, राज्य शासनासह जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करून राज्यातील काही जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. नावीन्यपूर्ण योजनांसाठी निधीचा वापर करून जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या विकासाचा आदर्श नमुना उभा केला आहे. इतर जिल्ह्यांनीही या मॉडेलचा अभ्यास करून आपापल्या जिल्ह्यात लोकहिताची उत्कृष्ट कामे करावीत. या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात, जिल्ह्याच्या विकासात सकारात्मक परिवर्तन करावे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा.

निवडणूक आचारसंहिता कालावधीत विकासकामांसाठी निधी मंजूर करताना मर्यादा येणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना देण्यात येणाऱ्या निधीच्या खर्चाचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी योग्य नियोजन करून जास्तीत जास्त कामे मार्गी लावावीत. जिल्ह्यांना मिळालेला निधी निर्धारित कामांवर खर्च होईल याची काळजी घ्यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, काही तालुके, जिल्ह्यांमध्ये जाहीर करण्यात आलेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि यापुढील काळात राज्यात निर्माण होणारी पाणी व चारा टंचाईसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी आणि राज्य आपत्ती निवारण निधीमधून मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या जिल्हा नियोजन समितीमधून दुष्काळासंदर्भातील उपाययोजनांसाठी तरतूद करण्याची आवश्यकता नाही. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा यासारख्या सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवरच डीपीसीचा निधी खर्च करावा, असेही त्यांनी सांगितले.

——-०००——

वंदना थोरात/विसंअ/

शेतकऱ्यांना दीड वर्षात ४४ हजार कोटी रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

यवतमाळ, दि. 10 : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना 44 हजार कोटी रुपयांची मदत केली. शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी प्रसंगी निकषाच्या बाहेर निर्णय घेतले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे साखर पूजन व शेतकरी मेळावा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, खासदार हेमंत पाटील, आमदार नामदेव ससाने, आमदार तान्हाजी मुटकुळे, भीमराव केराम, माजी खासदार शिवाजीराव माने, माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजय खडसे, प्रकाश पाटील देवसरकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना चांगली मदत करता यावी यासाठी निकषाच्या बाहेर जावून निर्णय घेतले. दोन हेक्टर मदतीची मर्यादा तीन हेक्टर केली. सततचा पाऊस नुकसानभरपाईच्या टप्प्यात आणला. केंद्र शासनाच्यावतीने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेतून वर्षाला 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. याच धर्तीवर राज्य शासनाने पुन्हा 6 हजार रुपये देण्याचा निर्णय केला. त्यासाठी 5 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील 1 हजार 800 कोटी रुपयांचे वाटप देखील केले आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये सहाय्य मिळत आहे.

वेगवेगळ्या कारणाने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे नुकसान होते. अशावेळी त्यांच्या पिकाला हक्काचे संरक्षण असणे गरजेचे आहे. त्यामुळेच या वर्षापासून पीकविमा योजना व्यापक प्रमाणात राबवित आहोत. शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येत आहे. विम्याची रक्कम शासनाच्यावतीने भरली जाते. यावर्षी प्रथमच 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम देण्याचा निर्णय घेतला. त्याचेही वाटप देखील सुरु आहे.

पोफाळी येथील आठ वर्षांपासून बंद साखर कारखाना सुरू झाल्याने 26 हजार सभासद शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांसह परिसरातील तालुक्यांना निश्चितच त्याचा लाभ होणार आहे. राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला. शेतकऱ्यांनी देखील खचून न जाता आधुनिक, सेंद्रीय, प्रयोगशील शेती केली पाहिजे, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

बांबू अतिशय चांगले पीक आहे. ‘मनरेगा’त बांबूचा समावेश केला. त्यासाठी हेक्टरी 7 लाख रुपये दिले जातात. बांबू चांगला जोडधंदा असल्याने परिसरात त्याचे क्लस्टर करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. पैनगंगा नदीवर मंजूर 6 बंधाऱ्यांचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी त्याची निविदा प्रक्रिया जलदगतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

खासदार श्री. पाटील म्हणाले की, 50 वर्षांपूर्वी वसंतराव नाईक यांनी परिसरातील शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना सुरु केला. आज हा कारखाना सुरु होतांना आनंद होत आहे. पैनगंगा नदीवर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी 6 बंधारे मंजूर केले. या बंधाऱ्यांचे काम लवकर होण्यासाठी निविदा प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे. बंधाऱ्यामुळे परिसरात 75 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार श्री. ससाने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते कृत्रिम अवयव वाटपाचे उद्घाटन तसेच ‘मुख्यमंत्री आपल्या दारी’ अंतर्गत मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या सौजन्याने तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

000

थेंबा-थेंबातून सिंचनासाठी ‘सूक्ष्म सिंचन योजना’

उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब पिकांच्या पोषक वाढीसाठी उपयुक्त ठरावा. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येतात. त्यापैकीच एक योजना म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रतिथेंब अधिक पीक अर्थात सूक्ष्म सिंचन योजना होय. 

राज्यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत प्रती थेंब व अधिक पीक ही सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये केंद्र सरकारचा 60 टक्के आणि राज्य शासनाचा 40 टक्के हिस्सा असतो. राज्यातील  ३४ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. ठिबक व तुषार संच उभारणीसाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ५५ टक्के तर इतर शेतकऱ्यांना ४५ टक्के अनुदान ५ हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत  देण्यात येते.

जिल्हानिहाय  वार्षिक कृती आराखड्यांवरून राज्याचा वार्षिक कृती आराखडा तयार करून राज्यस्तरीय मंजुरी समितीची (SLSC) मान्यता घेण्यात येते. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात केंद्र शासनाकडून योजनेसाठी सर्वांच्या सर्व चार हप्ते मिळवणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.

या योजनेतून शेतकरी लाभार्थीस अनेक फायदे झालेले आहेत. ठिंबक सिंचनामुळे पाणी थेट  पिकाच्या मुळाशी व आवश्यक त्या प्रमाणात दिले जाते, त्यामुळे पाण्याची बचत होते.   ठिंबक सिंचनामुळे जमिनीत वाफसा कायम राहतो. विद्राव्य खाते वेंचुरी/फर्टिलायझर टॅकद्वारे पाण्यात मिसळून पिकांच्या अवस्थेनुसार आणि गरजेनुसार देता येतात. त्यामुळे पाण्याची व खतांची बचत होऊन खतांचा अधिक कार्यक्षमतेने वापर होतो. तणांची वाढ नियंत्रित राहते, विजेच्या व मजुरांच्या खर्चात बचत होते. पिकांच्या उत्पादनात व गुणवत्तेत वाढ होऊन दर्जेदार व निर्यातक्षम उत्पन्न मिळते आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते.

सन २०२२-२३ मध्ये या योजनेसाठी एकूण रु.५५६.६६ कोटी निधी उपलब्ध झाला. या निधीमधून सन २०२१-२२ मधील प्रलंबित लाभार्थ्यांकरिता व सन २०२२-२३ मधील महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेले व अनुदानास पात्र २ लाख २२ हजार २२५ लाभार्थ्यांना  रु ५५६.६६ कोटी अनुदान वितरित  करण्यात आले आहे. सन २०२२-२३ मध्ये एकूण १.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यात आला आहे. सन २०२३-२४ साठी रु ५०९.९९ कोटी रकमेचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यापैकी रु. १०२ .०८ कोटी निधी प्राप्त झाला असून सन २०२२-२३ मधील प्रलंबित आणि सन २०२३- २४ महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेले व अनूदानास पात्र  ३२ हजार १८६ लाभार्थ्यांना रु. ८०.६१ कोटी अनुदान वितरीत करण्यात आले आहे. उर्वरित अनुदान वितरीत करण्याची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या सोयीकरीता सर्व योजनांचा  लाभ देण्यासाठी महाडीबीटी  प्रणाली विकसीत केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या घटकांच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत विविध घटकांकरिता अर्ज करण्याची सुविधा या प्रणालीद्वारे करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर स्वतःची नोंदणी करून आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbt.maharashtra.gov.in/  हे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा‌. शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उपरोक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करु शकतात.

योजनेच्या प्रसारासाठी तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा यासाठी राज्य शासन खालीलप्रमाणे प्रोत्साहनपर पूरक अनुदानाच्या योजना राबवित आहे.

अ) मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना :

राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत देय अनुदानास राज्य शासनाकडून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेमधून अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आणि इतर शेतकऱ्यांना ३० टक्के पूरक अनुदान देऊन सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे ८० टक्के व ७५ टक्के एकूण अनुदान देण्यात येत आहे. सन २०२१-२२,२०२२-२३ व २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना पूरक अनुदान देण्याकरिता राज्य शासनाकडून रु. ४६४ कोटी निधी प्राप्त झाला. यातून पात्र ३ लाख १४ हजार २५२ लाभार्थ्यांना रु.४१८.७३ कोटी पूरक अनुदान देण्यात  आले.

ब) अटल भूजल योजना

ही योजना १३ जिल्ह्यातील ४२ तालुक्यातील १३३९ ग्रामपंचायतीमधील १४४० गावांमध्ये केंद्र शासन व जागतिक बॅक यांच्या अर्थसहाय्याने पाच वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक आणि इतर  शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी अनुक्रमे २५ टक्के आणि ३० टक्के पूरक अनुदान देण्यात येत आहे.

दत्तात्रय कोकरे

विभागीय संपर्क अधिकारी

0000

‘अटल सेतू’ मुळे साधला जाणार मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास

default

 

मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारे अंतर कमी करणारा आणि प्रवासाच्या वेळेत बचत करणारा ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’ लोकार्पणासाठी सज्ज झाला आहे. मुंबईसह परिसराची सर्वांगीण उन्नती साधणारा, प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेणारा आणि मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी साहाय्यभूत ठरणारा हा सेतू ‘गेमचेंजर’ ठरणारा असेल हे निश्चित… लोकार्पणानिमित्त अटल सेतूबाबतची थोडक्यात माहिती देणारा हा लेख..

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. बेटांचे शहर असलेल्या मुंबईच्या रहिवाश्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शासनाने विविध प्रकल्प राबविले आहेत. याचाच पुढचा टप्पा म्हणून मुंबईला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) अर्थात ‘अटल सेतू’ अस्तित्वात आला असून यामाध्यमातून मुंबईकरांचे एक स्वप्न आता साकार होत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील वाहतूक जाळे विस्तारणारा हा देशातील सर्वात मोठा सागरी पूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) उभारण्यात आला असून तो आता वाहतुकीसाठी खुला होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला आणि त्यांच्याच हस्ते लोकार्पण होत असलेला हा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे अभियांत्रिकी आविष्कार मानला जात आहे.

default

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

सागर, जमीन आणि दलदल अशा तीनही भागांमध्ये उभारलेला सुमारे 21 हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तीन स्थापत्य कंत्राटदार, एक इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्ट सिस्टिम कंत्राटदार, विविध 10 देशांतील विषयतज्ज्ञांनी आपले योगदान दिले असून 1500 हून अधिक अभियंते, तर सुमारे 16500 कुशल मजुरांनी तीन पाळ्यांमध्ये अहोरात्र काम केले आहे. या प्रकल्पामध्ये सुमारे 1.2 लाख टन स्टील वापरण्यात आले आहे. इतक्याच स्टीलमध्ये चार हावडा ब्रिज उभारले जाऊ शकतात. प्रकल्पासाठी आठ लाख 30 हजार क्युबिक मीटर काँक्रीटचा वापर झाला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारण्यासाठी लागलेल्या काँक्रीट पेक्षा हे सहापट अधिक आहे. तर, या प्रकल्पात वापरण्यात आलेले स्टील आयफेल टॉवरमध्ये वापरले गेलेल्या स्टीलच्या 17 पट अधिक आहे. सुमारे एक हजार खांबांवर उभारल्या गेलेल्या या मार्गावर 100 किमी प्रती तास वेगाने प्रवास करता येणार असून दररोज सुमारे 70 हजार वाहने वाहून नेण्याची याची क्षमता आहे.

अटल सेतूसाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याची एकूण लांबी 22 किलोमीटर असून यापैकी 16.5 किलोमीटरचा भाग समुद्रात आणि सुमारे 5.5 किलामीटरचा भाग जमिनीवर उन्नत स्वरूपात आहे. यावर दोन्ही बाजूंना प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. पूर्व द्रुतगती मुक्तमार्ग हा जोडला गेला आहे आणि पूर्व-पश्चिम असणारा वरळी-शिवडी उन्नतमार्ग हा भविष्यात अटल सेतू प्रकल्पास जोडला जाणार आहे. यामुळे मुंबई सागरी किनारा रस्त्याद्वारे दक्षिण मुंबई आणि पश्चिम उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांना अटल सेतूद्वारे विनाथांबा मुख्य भूमीकडे जाणे शक्य होणार आहे. साहजिकच प्रवासाचे अंतर कमी झाल्याने आणि एक तासाहून अधिक प्रवास वेळेची बचत होणार असल्याने हरितगृह वायू उत्सर्जन सुद्धा कमी होणार आहे.

पुलाच्या दुसऱ्या बाजूला, नवी मुंबईतील उलवे येथील शिवाजीनगर, उरण-पनवेल राज्य महामार्ग आणि मल्टीमॉडेल कॉरिडॉरवर चिर्ले येथे आंतरबदल (इंटरचेंज) करण्यात आले आहेत. याद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण, पुणे किंवा गोवा येथून प्रवासी जड वाहने सहजतेने मुंबईत प्रवेश करू शकतील. हा सेतू मार्ग विविध जोडरस्त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्याला जोडला जाणार असल्याने यामधील अंतर कमी होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिल्या ओपन रोड टोलिंग प्रणालीचा देखील वापर करण्यात आला आहे.

अटल सेतू उभारताना पर्यावरणाचा समतोल विचार करण्यात आला आहे. या क्षेत्रात स्थलांतरीत पक्ष्यांचा विशेषत: फ्लेमिंगोंचा नैसर्गिक अधिवास असल्याने प्रकल्पाच्या समुद्रातील भागात खारफुटी व दलदल इत्यादी पर्यावरणीय वैशिष्ट्यांना कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता एमएमआरडीएने घेतली आहे. सुरक्षेची बाब लक्षात घेऊन बंद पडलेली वाहने नेण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन मार्गिका, ॲण्टी-क्रॅश बॅरियर्स असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टिम, तसेच पक्ष्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये ध्वनी अडथळे (साऊंड बॅरिअर्स) लावण्यात आली आहेत. भूकंप, चक्रीवादळ, वाऱ्याचा दाब आणि भरती-ओहोटीच्या प्रभावामध्ये टिकून राहण्यासाठी या प्रकल्पास सक्षम बनविण्यात आले असून सागरी सेतूचे घटक पुढील 100 वर्षांपर्यंत टिकून राहण्यासाठी गंजरोधक सामग्रीपासून बनवलेले आहेत.

प्रकल्पासमोरील आव्हाने

अटल सेतू बनविणे अतिशय आव्हानात्मक काम होते. यासाठी अत्याधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा वापर करून हा अद्वितीय पूल बांधण्यात आला. एका बाजूला मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसऱ्या बाजूला जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण असलेल्या मुंबई खाडीमध्ये हा पूल उभारण्यात आला आहे. कंटेनर वाहून नेणारी मोठी जहाजे तसेच मासेमारीच्या बोटी येथून सतत ये-जा करीत असतात. त्यांची वाहतूक सुरळीत व्हावी याबरोबरच कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या समुद्राखालील वाहिन्या, भाभा अणुसंशोधन केंद्र आणि बीपीसीएलच्या तेल टर्मिनल्सची सुरक्षितता आदी बाबी लक्षात घेऊन या व्ह्यू बॅरिअर्सचे नियोजन करण्यात आले आहे.

चौफेर विस्तारासाठी सहाय्यभूत

मुंबई बेटाच्या भौगोलिक मर्यादांमुळे शहरातील जमिनीच्या टंचाईची समस्या संपुष्टात येऊन अद्याप उपनगरी रेल्वेवर अवलंबून असल्यामुळे प्रामुख्याने उत्तर-दक्षिण विस्तारलेल्या मुंबई शहराच्या चौफेर विस्तारासाठी हा प्रकल्प सहाय्यभूत ठरणार आहे. या परिसरात दहा विकास केंद्र उभारण्यात येणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश करणारे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई परिसरातील नागरिकांना विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देत असून अटल सेतूच्या रूपाने प्राधिकरणाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याने या प्रकल्पामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात मोठे उद्योग, विकासात्मक प्रकल्प येऊन आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक असा सर्वांगीण आणि शाश्वत विकास होण्यास मदत होणार आहे. यामुळे या भागातील पर्यटनाला देखील अधिक चालना मिळेल. अर्थव्यवस्थेला मिळणाऱ्या अपेक्षित चालनेमुळे तसेच नव्याने होणाऱ्या रोजगार निर्मितीमुळे हा प्रकल्प ‘गेम चेंजर’ ठरणार आहे, यात शंका नाही.

– ब्रिजकिशोर झंवर

विभागीय संपर्क अधिकारी

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...