सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 949

राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद यांना मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १२ : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँ साहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयात जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम, अवर सचिव रवींद्र पेटकर यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजमाता जिजाऊ माँ साहेब, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. १२: स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

नाशिक मध्ये आजपासून राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

नाशिक, दि. 11 जोनवारी 2024 (जिमाका वृत्तसेवा) : स्वामी विवेकानंद यांच्या १६१ व्या जयंतीनिमित्त नाशिक येथे होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. युवा महोत्सवाचे उ‌द्घाटन गुरुवार १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. महोत्सवाच्या उद्घाटनाआधी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचा रोड शो होईल. राष्ट्रीय युवा महोत्सवाची सुरुवात १२ जानेवारीला तपोवन मैदानावर होईल. त्यानंतर शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारण, युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या सचिव मीता राजीव लोचन, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. ठाकूर म्हणाले की, १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता युवा कला महोत्सव सुरु होईल. भारताची क्रीडा क्षेत्रातील कामगिरी चमकदार आहे. खेळाडू आपली कामगिरी उंचावत विविध स्पर्धांमध्ये पदके पटकावत आहेत. त्यामुळे २०२६ ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत प्रबळ दावेदारी करणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवातून भारतातील युवा शक्तीला ‘विकसित भारत @२०४७’  संकल्पना साकार करण्याची प्रेरणा मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता खाद्य महोत्सव, महा युवा ग्राम हनुमान नगर येथे सुरु होईल.

  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र युवा प्रदर्शन महा युवा ग्राम येथे सुरू होईल.

  • १२ ते १६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, १३ ते १५ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता समूह आणि सोलो लोकनृत्य प्रदर्शन, महाकवी कालिदास कलामंदिर येथे होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० वाजता फोटोग्राफी स्पर्धा महाकवी कालिदास कलामंदिर हॉल नं. १ येथे होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता महाकवी कालिदास कलामंदिर हॉल क्रमांक दोनमध्ये उ‌द्घाटन आणि सादरीकरण होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहामध्ये गट आणि सोलो लोकगीत प्रदर्शने होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील उदोजी महाराज संग्रहालयात युवा कला शिबिर, पोस्टर मेकिंग आणि कथा लेखन होईल.

  • १३ ते १४ जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १.१५ वाजता प्रेरणादायक (सुविचार) कार्यक्रम होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजता साहसिक कार्यक्रम अंजनेरी, बोट क्लब, चामार लेणी आणि महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.

  • १३ ते १५ जानेवारी रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजता स्वदेशी खेळ महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.

  • १५ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १.१५ वाजता युवा संमेलन महायुवा ग्राम, हनुमान नगरमध्ये होईल.

राष्ट्रीय युवा महोत्सव १६ जानेवारीला विभागीय क्रीडा संग्रहालयात एका सोहळ्यात समारोप होईल.

000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर

गतिशीलतेत वाढ करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन प्रधानमंत्री करणार

सुमारे 17,840 कोटी रुपये खर्चाचा अटल सेतू हा देशातील सर्वात लांब पूलतसेच सर्वात लांब सागरी पूलदेखील आहे

पूर्व मुक्त मार्गाचे ऑरेंज गेट मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत बोगद्याची प्रधानमंत्री करणार पायाभरणी

रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, प्रधानमंत्री सिप्झ सेझ येथे भारतरत्नम‘ आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन

रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण

महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी प्रधानमंत्री महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ

प्रधानमंत्री करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

महोत्सवाची संकल्पना – विकसित भारत@2047: युवांसाठीयुवांद्वारे

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055 

PM to visit Maharashtra on 12th January

PM to inaugurate, dedicate to Nation and lay the foundation stone of multiple development projects worth more than Rs. 30,500 crore in Maharashtra

In a significant step to enhance ease of mobility, PM to inaugurate Atal Bihari Vajpayee Sewri – Nhava Sheva Atal Setu

Built at cost of about Rs 17,840 crore, Atal Setu is the longest bridge in India and also the longest sea bridge in the country

PM to lay the foundation stone of underground road tunnel connecting Eastern Freeway’s Orange Gate to Marine Drive

In a significant step to bolster the Gems and Jewellery sector, PM to inaugurate the ‘Bharat Ratnam’ and New Enterprises & Services Tower (NEST) 01 at SEEPZ SEZ

Multiple projects related to rail and drinking water to be dedicated to Nation

In yet another effort towards women empowerment, PM to also launch Namo Mahila Shashaktikaran Abhiyaan in Maharashtra

PM to inaugurate 27th National Youth Festival

Theme of the Festival – Viksit Bharat@ 2047: युवा के लिए, युवा के द्वारा

https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1995055

महिला सशक्तीकरण अभियान व विविध उपक्रमांच्या उद्या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

नवी मुंबई, दि. 11 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या विविध उपक्रमांचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घेतला. नवी मुंबई येथील विमानतळाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंडप व्यवस्थेची, कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या एक लाखाहून अधिक महिला आणि मान्यवरांसाठीच्या सेवा सुविधांबाबत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पाहणी केली.

यावेळी ‘एमएमआरडीए’चे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, एमएमआरडीए चे सह व्यवस्थापकीय संचालक अश्विन मुदगल, कोंकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, तसेच विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा उद्घाटन सोहळा तसेच विविध प्रकल्पांचे लोकार्पण प्रधानमंत्री श्री.मोदी यांच्या हस्ते दि. 12 जानेवारी रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची सुरक्षा, वाहतूक व्यवस्थेबाबत व्यक्तिशः तपशिलवार आढावा घेतला, कार्यक्रमस्थळाची पाहणी केली तसेच संबंधित शासकीय  यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

०००००

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रम स्थळांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

नाशिक, दि. 11 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होत असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तपोवन मैदानावरील सर्व कार्यक्रम स्थळांची पाहणी केली.

 यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार हेमंत गोडसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलगिरी बाग येथे उभारण्यात आलेल्या हेलिपॅडची पाहणी करून समाधान व्यक्त केले. ‘रोड शो’ चा परिसर व मुख्य कार्यक्रम मंचची पाहणी करून आयोजनात कोणत्याही उणिवा राहणार नाही याची खबरदारी सर्व अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले. यावेळी श्री. शिंदे यांनी श्री काळाराम मंदिराची पाहणी करून दर्शन घेतले. तसेच गोदावरी नदी व शहर सुशोभीकरण कामाची पाहणी केली.

0000

 

पुणे विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय बैठकीत आढावा

पुणे दि.११: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ च्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे विभागाच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये देण्यात येणारा निधी प्राधान्याने सामाजिक क्षेत्रातील विविध योजनांवर विशेषत: शिक्षण, आरोग्य, पर्यटन, महिला व बाल विकास, कृषी, मृद व जलसंधारण क्षेत्रासाठी उपयोगात आणावा, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सांगलीचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उपसचिव नितीन खेडकर, नियोजन उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, शासनाने निर्धारीत केलेल्या आर्थिक मर्यादेत वार्षिक आराखडा निश्चित करण्याची मर्यादा असल्याने राज्यस्तरीय योजनांमधून काही कामे घेण्यात यावीत. जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांना राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. जिल्ह्याचा एकात्मिक विकास आराखडा लवकर तयार करावा.

केंद्राच्या महत्वाकांक्षी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना सुरू आहेत. नीती आयोगामार्फतही काही योजनांचे संनियंत्रण होते. या योजनांमध्ये  प्रधानमंत्री स्कूल रायझिंग इंडिया, अमृत योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, जल जीवन मिशन, हर घर जल, ट्रॅव्हल फॉर लाईफ, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आदींचा समावेश आहे. या केंद्राच्या योजनांची अभिसरणाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

रोजगार निर्मितीवर भर द्या

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरवर नेण्याचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांनी आपल्या जिल्ह्यात औद्योगिक विकास, कौशल्य विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर द्यावा. महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजार मिळवून देण्याचे प्रयत्न व्हावेत. सर्व कामे दर्जेदार होतील याकडे विशेष लक्ष द्यावे. कामांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करु नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. अंगणवाडी बांधकामाचा दर्जा चांगला असावा यासाठी खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्ह्याने प्रतापगड किल्ला संवर्धनासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा, त्यासाठी राज्यस्तरावरून निधी देण्यात येईल. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून इतर कामे करता येतील.  इको टुरिझममुळे पर्यटकांची संख्या वाढत असल्याने त्यासाठीदेखील आवश्यक निधी देण्यात येईल, असे श्री.पवार म्हणाले.

सांगली जिल्ह्याने शिक्षण आणि आरोग्यात चांगली कामगिरी केली आहे. मात्र दरडोई उत्पन्न वाढविण्याच्यादृष्टीनेही प्रयत्न करावा. जिल्हा वार्षिक योजनेचा निधी वेळेत खर्च होईल याची दक्षता घ्यावी. शाळेच्या दुरुस्तीचे काम करताना इमारत आणि परिसर सुंदर दिसेल यावर भर द्यावा, असे श्री. पवार म्हणाले.

पंढरपूर विकास आराखड्यातील कामे दर्जेदार करावी. येणाऱ्या  वारकऱ्यांना उत्तम सुविधा मिळाव्यात आणि परिसराची जुनी ओळख कायम राहील अशा रचनेसह परिसर सुंदर दिसेल अशी कामे व्हावीत. सोलापूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करावा. वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून रोजगार वाढविण्यासाठी योजना केल्यास त्यास सहकार्य देण्यात येईल, अशा सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी दिल्या.

कोल्हापूर जिल्ह्याने अधिक पर्यटक जाणाऱ्या यात्रास्थळांच्या विकासाला प्राधान्य द्यावे. जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे श्री.पवार यांनी सांगितले. त्यांनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याची माहिती घेतली. या विकासकामांसाठी आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, पंढरपूर विकास आराखड्याचा भाग म्हणून चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण प्रकल्प करण्याची अनुमती मिळावी. जूनपर्यंत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये असा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्री डॉ. खाडे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेतून सिटी स्कॅन आणि एमआरआय मशीन घेण्यात येणार आहे. त्यासोबत नवे रोहित्र, वीज उपकेंद्रांची क्षमता वाढविणे, ग्रामीण रस्ते यासाठी निधी वाढवून मिळावा. शहर विकास, आदर्श शाळा, कृषी विकासावरही भर देण्यात आहे. सांगली जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या वीज देयकाबाबत सवलत देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

प्रधान सचिव सौरभ विजय यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या.

संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिलेल्या आराखड्याचे सादरीकरण केले. बैठकीला पुणे विभागातील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

0000

जर्मनीमध्येही महाराष्ट्र वनविभागाचा डंका वाजेल – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर दि. 11 : पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्याच्या उद्देशाने गत काळात वनमंत्री म्हणून 50 कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात आला. ही केवळ एक योजना नव्हती तर झाडे कापणा-या हातांपेक्षा झाडे लावणारे हात निर्माण व्हावे, हा उदात्त हेतु त्यामागे होता. वृक्षलागवडीच्या या उपक्रमातून राज्यात 2550 चौ.कि.मी.चे हरितआच्छादन वाढले. महाराष्ट्राचा वन विभाग नेहमीच अभिनव उपक्रम राबविण्यात आघाडीवर राहिला आहे. आताही भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य करार भारतातील चार राज्यात राबविण्यात येत असला तरी महाराष्ट्र यात अव्वल राहील व आपल्या वनविभागाचा डंका जर्मनीमध्येसुध्दा वाजेल, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

वन अकादमी येथे भारत – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य प्रकल्पांतर्गत वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षणार्थ कार्यक्रमाचा शुभारंभ करतांना वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महिप गुप्ता, कॅम्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शोभिता विश्वास, या प्रकल्पाचे जर्मनीतील संचालक डॉ. अलेजांद्रो वॉन बेर्ट्राब, वन अकादमीचे संचालक एम.एस.रेड्डी, डॉ. कुंदन आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र – जर्मनी यांच्यात द्विपक्षीय सहकार्य करार झाल्याचे घोषित करून वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले,  महाराष्ट्रात पर्यावरण विषयक संशोधन व प्रशिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संस्था यांच्या सहकार्याने करण्यात आलेल्या या कराराची अंमलबजावणी उत्तम व्हायला पाहिजे. चंद्रपूर येथील वन अकादमी ही देशातील उत्कृष्ट प्रशिक्षण संस्था आहे. याच संस्थेत आज महत्वाचा करार होत असून अतिशय शास्त्रशुध्द नियोजन आणि प्रशिक्षण या वनअकादमीत व्हावे. जगातील 193 देशांपैकी 14 देशामध्ये वाघ आहे त्यातील 65 टक्के वाघ भारतात आहे, आणि महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे येथून पराक्रमी मानसिकता घेऊन जावी. उत्तमातील उत्तम काम करून या कराराला पूर्णपणे यशस्वी करू तसेच महाराष्ट्राच्या वनविभागाचा झेंडा जर्मनीमध्ये रोवू, अशी ग्वाही वनमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

पुढे ते म्हणाले,  निव्वळ धनाने काम होत नाही तर त्यासाठी हिरवे मनसुध्दा लागते. या कराराच्या माध्यमातून उत्कृष्ट अंमलबजावणी करण्याचा संकल्प करा. पर्यावरणाचा –हास हे आज जगातील सर्वात मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. संपूर्ण ब्रम्हांडात केवळ पृथ्वीवर सजीवसृष्टी आहे. मात्र आज मनुष्याकडूनच पर्यावरणाची हानी होत आहे. पर्यावरणीय बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे महाकाय राक्षस आपल्यासमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे वनांच्या संरक्षणाची सर्वाधिक जबाबदारी वन अधिका-यांवर आहे. आई आणि वनराईच्या सेवेचे मुल्यांकन सर्वाधिक असून मातेचे तसेच मातीचेही कर्ज आपल्यावर आहे. त्यामुळे आहे त्या जमिनीचे संगोपन, संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्र – जर्मनी द्विपक्षीय सहकार्य कराराचे  डीजीटल पध्दतीने उद्घाटन, सौर उर्जा कुंपन  योजनेचे उद्घाटन तसेच माहिती पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.प्रास्ताविकात वनबलप्रमुख म्हणाले, जागतिक पातळीवर वनांचे महत्व वाढले आहे. वातावरणात 64 टक्के कार्बन डॉयऑक्साईड असून त्यामुळे तापमानात वाढ होत आहे. या कराराच्या माध्यमातून वन, वनेत्तर क्षेत्र पुर्नसंचयन, जतन आणि संरक्षण करून हवेतील कॉर्बन डॉयऑक्साईडचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच जमिनीचा पोत सुधारणे, शेती, वनजमीन आणि पाणी साठा असलेल्या जमिनीचा विकास करणे आणि स्थानिक लोकांना उपजिविकेचे साधन म्हणून प्रशिक्षित करणे, हा या कार्यक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यांना मिळाला सौर उर्जा कुंपनाचा लाभ : उध्दवराम पाटणकर, रविंद्र गावडे, मारोती तायडे, सुरेश कुईटे, सचिन जमदाळे, दिवांजी गिरडकर, आशा गिरडकर, दिलीप भोयर, गणपती उपरे, विनय डोंगरे यांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सौर उर्जा कुंपण वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

10 जिल्ह्यातील ग्रामस्थांना लाभ : वने, वनक्षेत्र पुनर्संचयित व जतन आणि संरक्षित करण्यासाठी रिकॅप फॉन एन.डी.सी. प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यातील चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि नंदुरबार या 10 जिल्ह्यांतील 94278 हेक्टर वन व वनेत्तर क्षेत्राचे पुनर्संचयित प्रस्तावित आहे. त्यामुळे 11 लक्ष 57 हजार 189 ग्रामस्थांना लाभ होणार आहे.

0000

गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन

प्रत्येक फिडर सौर ऊर्जेशी जोडून शेतीला विजपुरवठा

छत्रपती संभाजीनगर,दि.११(जिमाका)-   मराठवाड्याशी निगडीत ‘दुष्काळी’ अशी ओळख मिटविण्यासाठी शासनाने  एकात्मिक जलआराखडा तयार करुन नियोजन केले आहे. त्याद्वारे मराठवाडा जलसमृद्ध करुन नंतर पीक पद्धतीत बदल व नैसर्गिक शेतीला चालना देऊन शेती विषमुक्त करण्याचा संकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

गंगापूर उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आरापूर ता. गंगापूर येथे करण्यात आले. यानिमित्त आयोजित जाहीर सभेत श्री. फडणवीस बोलत होते.  केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आ. हरिभाऊ बागडे, आ. रमेश बोरनारे, आ. प्रशांत बंब, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया,गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, बजाज फाऊंडेशनचे  सी.पी. त्रिपाठी तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गंगापूर भागातील ४० गावांमधील ३० हजार एकर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचे भुमिपूजन श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भुमिपूजन स्थळी  विधीवत पूजा करुन व कुदळ मारुन प्रारंभ करण्यात आला. तसेच कोनशीला अनावरणही करण्यात आले. उपस्थित अभियंत्यांकडून श्री. फडणवीस यांनी प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.

आपल्या भाषणात श्री. फडणवीस म्हणाले की, ‘जय जवान जय किसान’, हा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी आहे. त्याच दिवशी ‘जय किसान’ हा नारा सार्थ करणारा कार्यक्रम होत आहे. गंगापूर भागात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी असे प्रश्न होते. मी स्वतः ३० जून २०२३ ला येथे आलो होतो. त्यावेळी जलजीवनचे भुमिपूजन करण्यासाठी आलो होतो. तेव्हाच या योजनेच्या मंजूरीची प्रत आणली होती.  आज या योजनेचे भुमिपूजन करतांना  मला आनंद होत आहे. सर्व क्षेत्राला ठिबकद्वारे थेट शेतात पाणी देणारी ही एक अभिनव योजना आहे. ते पुढे म्हणाले की, मराठवाड्याची दुष्काळी ही ओळख मिटविण्यासाठी  शासनाचे प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी एकात्मिक जलआराखडा तयार करण्यात आला. त्यावरुन योजना तयार केली. मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासनाने १८ हजार ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. ५००० कोटी सिंचनासठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  मराठवाड्याच्या हक्काचे पाणी जे कृष्णा खोऱ्यातून मराठवाड्यात आणण्यासाठी  ११ हजार कोटी रुपयांचे कामे केली जात आहेत.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प अशा प्रकल्पांना चालना देऊन  सिंचनासाठी भरीव तरतूद केली आहे. मराठवाड्यातील ३१ हजार ७५१ कोटी रुपयांच्या प्रकल्पांसाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता देऊन  ४ लाख ६९ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याची तरतूद झाली आहे,असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, सिंचनासाठी लागणारी संपूर्ण वीज दिवसा देण्यासाठी प्रत्येक फिडर सौर उर्जेद्वारे जोडण्याचे नियोजन आहे. शेतीला पाणी दिल्यानंतर पीक पद्धतीत बदल करुन विषमुक्त शेती करण्याचे शासनाचे धोरण आहे. कृषी प्रक्रिया उद्योगांद्वारे या भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल. महिलांसाठी शासनाने नवीन महिला धोरण आणले आहे. आमच्या भगिनी सरासरी एका वर्षाच्या कालावधीत अडीच महिने कालावधी केवळ पाणी भरण्यात घालवतात. त्यांची या त्रासातून सुटका करुन त्यांच्या वेळेचा सदुपयोग रोजगार, व्यवसायात करावयाचा आहे. मुलीचा जन्म झाल्यावर ‘लेक लाडकी’, या योजनेद्वारे त्या कुटुंबाला  मुलीच्या १८ व्या वर्षी १ लाख रुपये देण्यात येणार आहेत. महिलांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी शासन सहाय्य करणार आहे,असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कामगार कल्याण पेटी, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना,  उज्ज्वला गॅस योजना,  महिला आरोग्य पेटी, दिव्यांगांना साहित्य, क्रीडा साहित्य असे लाभ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी  आपल्या भाषणात सांगितले की, जलजीवन मिशन सारख्या योजनेतून प्रत्येक गावात पाणी पोहोचत आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  अनेक योजना गावोगावी पोहोचत आहेत. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

प्रास्ताविकातून  आ. प्रशांत बंब गंगापूर उपसा सिंचन योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.राज्यगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने सांगता.

०००००

‘जाणता राजा’च्या माध्यमातून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होऊया – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. 11 : शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंगांना साकारणारे आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्य ‘जाणता राजा ‘ नागपुरात 13 ते 15 जानेवारी दरम्यान होत आहे. या महानाट्याला उपस्थित राहून शिव विचारांच्या जागरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या आवाहनात म्हणाले की, आपल्या सर्वांचे आदर्श आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष आहे. शिवाजी महाराजांनी परकीय शक्तींचा पराभव करत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वत्र विस्तार केला. शिवराज्याभिषेकाच्या या साडेतीनशेव्या वर्षानिमित्त महाराष्ट्र सरकारतर्फे छत्रपती शिवरायांच्या विचारांचे जागरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात विविध उपक्रम राबवले जात आहे. अनेक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या चरित्रावर आधारित महानाट्याचे सलग तीन दिवस प्रयोग आयोजित करण्यात येणार आहेत.

येत्या 13 जानेवारी रोजी नागपूर येथून या उपक्रमाचा शुभारंभ जाणता राजा या महानाट्याच्या प्रयोगाने होणार आहे. सलग तीन दिवस यशवंत स्टेडियमवर सायंकाळी होणाऱ्या या महानाट्यास सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून शिव विचारांच्या या जागरणामध्ये सहभागी व्हावे. विशेषतः पुढच्या पिढ्यांवर संस्कार होण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह उपस्थित राहावे, हा कार्यक्रम पूर्णतः निःशुल्क राहणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या आवाहनात म्हटले आहे.

००००

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्राने अमूल, मदर डेअरी प्रमाणे दुधाचा ब्रँड निर्माण करावा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

0
मुंबई, दि. ७ : दुधाच्या उत्पादनात सहकाराच्या माध्यमातून ज्याप्रमाणे गुजरात राज्याने 'अमूल', दिल्लीने 'मदर डेअरी' व कर्नाटकने 'नंदिनी' ब्रँड तयार केला त्याप्रमाणे महाराष्ट्राने सहकार संस्थांच्या माध्यमातून दुधाचा सामायिक ब्रँड निर्माण...

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी घेतली राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. 7 : भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी न्या. गवई...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रसिद्धीबाबत चर्चा

0
मुंबई, दि. ७ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद-सिंगल यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांच्या प्रसिद्धीबाबत माहिती व जनसंपर्क...

विधानपरिषद लक्षवेधी

0
राज्यात सर्व नगरपरिषद, नगरपंचायतीमधील कर आकारणीबाबत सर्वेक्षण करणार - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. ७ :- नगरपरिषदसाठी नमूद कमाल व किमान दरांपेक्षा अन्य वाढीव दराने कर आकारणी...

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीची तातडीने आवश्यकता – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय...

0
मुंबई, दि. ७ :- पुणे-नाशिक आणि नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून या दोन्ही मार्गांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक...