मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 948

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३५ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा शुभारंभ

            रायगड, दि.12 : महाराष्ट्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजना प्रकल्प राबविण्यात येत आहेत. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन समर्पित भावनेने काम करीत असून महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ बनला पाहिजे, यासाठी केंद्र शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली. तसेच येत्या काळात देशातील 2 कोटी महिलांना लखपती बनविण्याचा केंद्र शासनाचा संकल्प असून विकसित भारत संकल्प अभियानामध्ये महिलांनी नेतृत्व करुन या अभियानाला यशस्वी करावे,  असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

 

            नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 35 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या अनेक  विकास प्रकल्पांचे उदघाटन , राष्ट्राला समर्पण आणि पायभरणी करण्यात आली.  यामध्ये अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतु, (२२.०० कि.मी.) (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एम.टी.एच.एल.) खारकोपर-उरण रेल्वे लाईन प्रकल्प (१४.६० कि.मी.) ठाणे आणि ऐरोली दरम्यान ‘दिघा गाव रेल्वे स्थानक’ भारतरत्नम नेस्ट-१ भवन महानगर प्रदेशाच्या पश्चिम उप-प्रदेशासाठी सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (क्षमता ४०३ द.ल.लि.) नवी मुंबई मेट्रो मार्ग-१ बेलापूर ते पेंढार (११.१० कि.मी., ११ स्थानके) खाररोड आणि गोरेगाव दरम्यान नवीन ६ वी रेल्वे लाईन (८.८० कि.मी.) उरण आणि खारकोपर दरम्यान उपनगरीय ईएमयू  ट्रेनची सुरुवात, नमो अभियान – मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नारी शक्ती दूत अॅप लेक लाडकी योजनेतील लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप यांचा समावेश आहे.

            यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजानिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री, कु.आदिती तटकरे, खा.श्रीरंग बारणे, खा.सुनिल तटकरे, आ.प्रशांत ठाकूर, आ.महेश बालदी आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र हा विकसित भारताचा भक्कम आधारस्तंभ  

            यावेळी प्रधानमंत्री श्री.मोदी म्हणाले, आजचा दिवस केवळ मुंबई आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर विकसित भारताच्या संकल्पाच्या ऐतिहासिक पुरावा आहे.  भारतातील सर्वात लांब असलेल्या अटल सागरी सेतूचे लोकार्पण हा भारताचा विकासाप्रती असलेल्या वचनबध्दतेचा पुरावा आहे. 2014 च्या निवडणुकीआधी रायगड किल्ल्यावर गेलो होतो, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन काही संकल्प केले होते. आज ते संकल्प पूर्ण होताना दिसत आहेत. अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. अटल सेतू ही विकसित भारताची एक झलक आहे. अटल सेतूमुळे गोवा देखील मुंबईच्या जवळ येणार आहे,” अटल सेतू प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प जपानचे माजी पंतप्रधान शिंझो ॲबे यांच्या समवेत केला होता. सागरी सेतूचं काम पूर्ण होणं, हे मोठे यश आहे.  देशासाठी गेल्या 10 वर्षात पायाभूत सुविधांसाठी 44 लाख कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात केंद्र सरकारने सुमारे 8 लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि आणखी  काम सुरू आहे.  ही रक्कम प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी वाढवित आहे, असेही ते  म्हणाले.

            स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय मदत आणि रोजगाराशी संबंधित योजनांचा  महिलांना सर्वाधिक फायदा झाला असल्याचे सांगून ते म्हणाले, देशात  पीएम जनऔषधी केंद्रे, स्वनिधी, पीएम आवास आणि बचतगटांना मदत मिळून ‘लखपती दीदी’ तयार होत आहेत. 2 कोटी ‘लखपती दीदी’ तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.  महाराष्ट्र शासनाच्या योजनाही याच दिशेने कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि अजित पवारांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास गतीने सुरू आहे, शासन याच निष्ठेने महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत राहील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

            महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या मेगा विकास प्रकल्पांची उदाहरणे देताना प्रधानमंत्री यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि नवी मुंबई विमानतळ आणि कोस्टल रोड प्रकल्पाची कामे सुरू आहेत, यामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटीचा चेहरामोहरा बदलेल. प्रवासाची सोय आणखी वाढविण्यासाठी  इस्टर्न फ्री-वे च्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्त्यात बोगदा तयार करण्यात येत आहे.  “लवकरच, मुंबईलाही पहिली बुलेट ट्रेन मिळेल, असेही ते म्हणाले.

             “दिल्ली-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर महाराष्ट्राला मध्य आणि उत्तर भारताशी जोडेल.  महाराष्ट्राला तेलंगणा, छत्तीसगड आणि इतर शेजारील राज्यांशी जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईनचे जाळेही टाकले जात आहे.  तेल आणि वायू पाईपलाईन, नवी मुंबई विमानतळ आणि शेंद्रा-बिडकीन इंडस्ट्रियल पार्कचे मोठे प्रकल्प महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचे मोठे योगदान -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            देशाच्या प्रगतीत आणि विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. उद्योगाबरोबरच, पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामातही महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या विकासाचा हा प्रवास निरंतर सुरूच राहील. यासाठी केंद्र शासनाचा  नियमित पाठिंबा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

            राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) या सहा मार्गिकांच्या समुद्रावरील भारतातील सर्वांत लांब सागरी सेतूला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे. हा पूल अटलजींच्या नावाप्रमाणेच मजबूत आणि अटल आहे. अटलजींचे नाव आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन ही या पुलाच्या मजबूतीची हमी आहे. या सागरी सेतूमध्ये कोणत्याही मोठ्या भूकंपाचा धक्का सहन करण्याची क्षमता आहे. आज देशातील पायाभूत सुविधांची सर्वाधिक कामे महाराष्ट्रात सुरू आहेत. राज्यात सुमारे 8 लाख 35 हजार कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत. गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करण्यासाठी स्पर्धा करीत आहेत.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश बुलेट वेगाने प्रगती करत आहे. मागील नऊ वर्षांत आपण अनेक सकारात्मक बदल पाहिले आहेत. महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अडथळेही दूर झाले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. जगातील अनेक देश आर्थिक आघाडीवर अनेक समस्यांशी लढत आहेत, तर आपला भारत मजबूत आणि संतुलित नेतृत्वामुळे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, असा विश्वास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. 

चार वर्षांत मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 1973 मध्ये या सागरी सेतूची संकल्पना मांडली होती. मात्र 40 वर्षात हे काम झाले नाही, ते आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळे शक्य झाले आहे. या अटल सेतूसाठी प्रधानमंत्री यांनी थेट एम.एम.आर.डी.ए. ला कर्ज उपलब्ध करुन देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.

            मागील 50 वर्षांत महाराष्ट्राला आणि देशाला मुंबईने ताकद दिली. येत्या 25 वर्षांते देशाला, महाराष्ट्राला आणि मुंबईला रायगडचा परिसर ताकद देईल. रायगडमध्ये नवा इकॉनॉमिक हब तयार होणार आहे. 65 टक्के डेटा सेंटर कॅपॅसिटी तयार झाली आहे. या सेतूने या विभागाला कनेक्टिव्हिटी दिली आहे.

            मुंबईत कुठूनही 59 मिनिटात पोहोचता आले पाहिजे. मेट्रो आणि रस्त्यांचं नेटवर्क त्या पद्धतीने तयार होत आहे. येत्या तीन ते चार वर्षांत असे नेटवर्क तयार होईल”, असेही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी जनतेला सांगितले. यापुढे रायगड, नवी मुंबई हे नवे इंडस्ट्रियल हब असेल. येथे नवीन विमानतळ लवकरच पूर्ण होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची शक्ती आमच्यामागे उभी असल्यामुळे राज्यातील पायाभूत प्रकल्प लवकर पूर्ण होतील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कटीबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

            स्वागतपर भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आजचा दिवस महत्वपूर्ण आहे. सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना, प्रकल्प राबविण्यात येत आहेत. भारतीय रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या सुधारणामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळत आहे.

            प्रधानमंत्री मोदी यांनी सुरुवातीपासून महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर विशेष लक्ष दिले आहे. उज्वला योजना ही महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे. यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या विकासासाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात कटीबद्ध असल्याचे सांगून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार  असल्याचा निर्धारही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

अटल सेतू‘ शनिवारी सकाळी खुला होणार..!

             अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. हा अटल सेतू‘ शनिवार दि. 13 जानेवारीच्या सकाळी आठ वाजल्यापासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहेअसे एमएमआरडीएच्यावतीने कळविण्यात आले आहे.

००००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन

मुंबई, दि. 12 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन केले. मोदींनी छायाचित्र दालन आणि अटल सेतूच्या प्रदर्शनीय प्रतिकृतीचा आढावा घेतला.

एमटीएचएल अटल सेतू 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधला गेला आहे आणि सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे.

“आमच्या नागरिकांसाठी ‘जीवन सुलभता’ वाढवण्याच्या दृष्टीने एक पुढचे महत्त्वपूर्ण पाऊल असलेल्या अटल सेतूचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. हा पूल प्रवासाचा वेळ कमी करेल आणि कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्याद्वारे दैनंदिन प्रवास सुरळीत होईल.”

प्रधानमंत्र्यांच्या समवेत राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू

शहरी वाहतूक पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी बळकट करून नागरिकांची ‘प्रवास सुलभता’ सुधारणे हे प्रधानमंत्र्यांचे ध्येय आहे. या संकल्पनेनुसार, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल), आता ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ नामकरण झालेला पूल बांधण्यात आला आहे. डिसेंबर 2016 मध्ये प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.

एकूण 17,840 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून अटल सेतू बांधण्यात आला आहे. हा सुमारे 21.8 किमी लांबीचा 6-पदरी पूल आहे ज्याची लांबी समुद्रावर सुमारे 16.5 किमी आहे आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी आहे. हा भारतातील सर्वात लांब पूल आहे आणि भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे. हा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जलद कनेक्टिव्हिटी प्रदान करेल आणि मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारत दरम्यानचा प्रवासाचा वेळ देखील कमी करेल. यामुळे मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारेल.

०००

 

कोल्हापूरची संस्कृती दर्शविणारे आधुनिक विमानतळ लवकरच नागरिकांच्या सेवेत – केंद्रीय मंत्री जोतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : कोल्हापूर मधील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार जिल्ह्यात आधुनिक आणि आवश्यक सुविधा असणाऱ्या विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ते नागरिकांच्या सेवेत येईल. विमानतळावर प्रवेशद्वार व आतील भिंती येथील संस्कृतीचे दर्शन घडवतील अशा प्रकारे तयार करण्यात येत असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांनी दिली.

जोतिरादित्य सिंधिया हे कोल्हापूर येथे विमानतळ पाहणी व विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आले आहेत. यावेळी त्यांनी नवीन विमानतळ इमारतीच्या कामांची आतून व बाहेरून पाहणी केली व आवश्यक सूचना विमानतळ प्रशासनाला दिल्या. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या रुबिना अली, सह सचिव भारतीय विमानतळ प्राधिकरण दिलीप साजणानी, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर इंजिनिअरिंग अनिल हरिभाऊ शिंदे कोल्हापूर विमानतळ संचालक, प्रशांत वैद्य इंजनीअरिंग इन चार्ज, प्रकाश दुबल, संयुक्त महाप्रबंधक विद्युत, सिद्धार्थ भस्मे उप महाप्रबंधक सिव्हिल यांचेसह विमानतळ प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

त्यांनी इमारतीच्या आतील पाहणी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य चित्रमय व व्हिडीओ स्वरूपात सर्व भिंतींवर लावण्याचे निर्देश दिले. तसेच आलेल्या नवीन प्रवाशांसाठी स्थानिक संस्कृती, गडकिल्ले यांची माहिती देणारे व्हिडीओ वॉल, वस्तूंचे प्रदर्शन लावण्याच्या सूचना केल्या. स्थानिक चित्रकारांनी तयार केलेले ताराराणी यांचे चित्र व इतर कलाकृतींची त्यांनी प्रशंसा केली. यावेळी त्यांनी आरक्षण कक्ष, प्रतिक्षा कक्ष, प्रवाशांसाठी असणारा आराम कक्ष, आरक्षित असणारा व्हिआयपी कक्ष तसेच इतर सुविधांची पाहणी केली.

यावेळी त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले, देशाची अर्थिकच नाही तर आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रगतीही झाली आहे. देशाच्या मेट्रो शहरांबरोबरच उर्वरीत महत्त्वाच्या शहरांमधे जागोजागी विमान सेवा सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. कोल्हापूरचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा विमानतळावर आल्यावर पाहायला मिळेल. मुंबई, बंगलोर व हैद्राबाद या प्रमुख तीन शहरांना अखंड स्वरूपात कोल्हापूर जोडले जाणार आहे. लवकरच पूर्ण होणा-या या विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी केंद्रीय स्तरावरील बैठकीत निर्णय घेवून घोषणा करू.

40 हजार चौरस फुट असणा-या या विमानतळावर 500 प्रवाश्यांची दैनंदिन येजा राहील. 5 लक्ष प्रवाशांना वार्षिक सेवा देण्याची क्षमता या विमानतळाची असणार आहे. पूर्वी लहान धावपट्टी होती आता 1780 मीटरची केली आहे. भविष्यात टप्पा 2 मधे ती 2300 मीटरची करू. त्यासाठी अजून 65 एकर जमीन राज्य शासनाकडून हवी आहे. कार्गो सेवाही सुरू करण्याचा विचार आहे. येत्या काळात तेही काम जोमाने करू.

विमानतळाचे काम पूर्ण झाले असून थोडेच काम बाकी आहे. येत्या काही दिवसात तारिख निश्चित झाल्यानंतर भव्य लोकार्पण करू असे ते यावेळी म्हणाले. दिड वर्षापूर्वी आम्ही नियोजन करताना फक्त काचेची इमारत करायची नाही असे नियोजन केले. यात मराठी इतिहास आणि संस्कृती, मराठा इतिहासातील वाडा पद्धतीच्या काळ्या दगडातील वास्तू निर्माण करून विमानतळ उभारण्याची कल्पना होती. अशाच प्रकारे दगडी बांधकामात, मशाली लावलेल्या स्वरूपात किल्ल्यांप्रमाणे आज विमानतळ आपणाला पाहायला मिळत आहे याचा निश्चितच स्थानिकांना आनंद मिळेल असे ते यावेळी म्हणाले.

0000

९.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. १२ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या  ९.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि. १२ फेब्रुवारी, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १२ फेब्रुवारी, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.६३ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केलें जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

0000

वंदना थोरात/विसंअ

 

‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान

साहित्य अकादमीचे २० भाषांतील ‘युवा’ साहित्य पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली, 12:अतिशय प्रतिष्ठित समजला जाणारा साहित्य अकादमीचा ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठी ‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या कविता संग्रहास प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या कवितासंग्रहाच्या कवयत्री विशाखा विश्वानाथ यांनी स्वीकारला.

साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार 2023 चा प्रदान सोहळा रवींद्र सदन सभागृह, हेरासिम लेबेदेव सरानी, कोलकाता येथे झाला. यावेळी प्रसिद्ध बंगाली कवी, संपादक, निबंधकार आणि अनुवादक सुबोध सरकार,अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्ष कुमुद शर्मा आणि अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते सन्माननीय साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 20 प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली. यामध्ये जिंटु गीतार्थ (आसामी), हमीरद्दीन मिद्या (बाड्:ला), माइनावस्त्रित दैमारि (बोडो), धीरज बिस्मिल (डोगरी), अनिरुध्द कानिसेट्टी (इंग्रजी), सागर शाह (गुजराती), अतुल कुमार राय (हिंदी), मंजुनायक चळ्ळूरु (कन्नड), निगहत नसरीन (कश्मीरी) तन्वी बांबोळकार (कोंकणी),  गणेश पुथुर (मल्याळम), विशाखा विश्वनाथ (मराठी), नैना अधिकारी (नेपाळी),संदीप  (पंजाबी), देवीलाल महिया (राजस्थानी), बापी टुडू (संथाली), मोनिका पजंवानी (सिंधी), राम थंगम (तमिळ), जॉनी तक्केदासिया (तेलुगु) आणि जहन जाद (उर्दू) यांचा समावेश आहे. पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.मराठी भाषेतील पुरस्कार निवड समितीत ख्यातनाम साहित्य‍िक डॉ. अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ.विलास पाटील यांचा समावेश होता.

‘स्वत:ला स्वत:विरुध्द उभं करताना’ या काव्यसंग्रहाविषयी

विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कविता संग्रह आहे. 86 कविता असणाऱ्या त्यांचा हा संग्रह गमभन प्रकाशन यांनी प्रकाशित केलेला आहे. यामध्ये कवयित्रीने स्वत:सोबत भांडण करत स्वत: वर प्रेमकरण्यापर्यंतचा प्रवास शब्दबद्ध केला आहे. या कवितांचा विषय प्रामुख्याने आत्मशोध आणि आत्मस्वीकार आहे. कवयित्री स्वत:च्यातील विरोधाभास, अपूर्णता आणि कमतरता यांचा वेध घेतात. त्या स्वत:ला समजून घेण्याचा आणि स्वत:वर प्रेम करण्याचा प्रयत्न करतात.

या कवितांची भाषाशैली सरळ आणि सोपी आहे. कवयित्रींची भावना प्रामाणिकपणे व्यक्त झाली आहेत. कवितासंग्रहातील कविता वाचून वाचकांना स्वत:तील भावना समजून घेण्यास आणि स्वत:वर प्रेम करण्यास प्रेरणा मिळते.

विशाखा विश्वनाथ यांच्याविषयी

विशाखा विश्वनाथ या मूळच्या खान्देशातील रहिवासी  आहे. त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे झाला. विशाखा विश्वनाथ यांचे शिक्षण मुंबई विद्यापीठातून झाले आहे. त्यांचे शिक्षण फिल्म मेकिंगमध्ये झालेले असून फिल्म मार्केटिंगमध्ये त्या काम करतात. गोष्ट एका पैठणीची, अथांग, गुडबाय, पावनखिंड, झोंबिवली, चंद्रमुखी, शेर शिवराज, मी वसंतराव या सारख्या 50  नामांकित हिंदी मराठी चित्रपट आणि वेबसिरीजसाठी डिजिटल मार्केटिंग आणि कॉपीरायटिंग त्यांनी केलेले आहे.

0000

तरूणाईच्या बहारदार सादरीकरणानं जिंकली उपस्थितांची मनं; तरूणाई, उत्साह अन् जल्लोष, तपोवनात अवतरला तरुणाईचा मेळा

नाशिक, दि.12 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात तरूणाईच्या कला – कौशल्याने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह उपस्थितांची मनं जिंकली. ‘विकसित भारत @२०४७ – युवा के लिए – युवा द्वारा’ या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमात तालबद्ध जिम्नॅस्टिक, मल्लखांब, योगासने, साहसी प्रात्यक्षिकांचे युवक – युवतींनी बहारदार सादरीकरण केले. राष्ट्रीय युवा महोत्सवातील देशभक्तीपर गीतांमुळे सांस्कृत‍िक कार्यक्रमात रंगत आली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचा पहिला दिवस तरूणाईच्या सळसळत्या उत्साहाने गाजला. एकाहून एक  सरस, कला – कौशल्य दाखविताना तरूणाईची चपळता पहायला मिळाली‌.

तपोवन मैदानावर आज स्वामी विवेकानंद जयंती युवा दिनानिमित्त २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन झाले. महाराष्ट्रासाठी ‘सक्षम युवा – समर्थ भारत’ या घोषवाक्यावर आधारित या महोत्सवात तरूणाईचा जल्लोष, उत्साह ओसंडून वाहत असून नाशिकमध्ये देशातील विविध राज्यातील तरूणाईचा मेळा अवतरला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाषणे झाली. त्यानंतर‌ भारताची विविधता, एकात्मता, संस्कृती, नृत्य व वेशभूषा यांचे दर्शन घडविणाऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या चमूंचे प्रधानमंत्र्यासमोर संचलन झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणात जिम्नॅस्टिकमध्ये हूप, बॉल, रिबन आणि रोप अशा साधनांचा वापर करत युवकांनी आपले कौशल्य दाखवत तालबद्ध जिम्नॅस्टिक सादर केले. जिम्नॅस्टिकचे कौशल्य पाहून उपस्थित आवाक झाले. महाराष्ट्राच्या तरूणांनी मल्लखांबावरील चित्तथरारक कसरती करून दाखवत उपस्थितांना आपल्या कौशल्याचे दर्शन घडविले. ढोल, झांज, लेझीम, कथकली, भरतनाट्यम्, भांगडा या विविध राज्यातील लोकनृत्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.

तरूणांनी सादर केलेल्या साहसी शारीर‍िक कसरती, प्रात्यक्ष‍िकांच्या जोडीला सायकलिंग आणि स्केटिंगचे मनोवेधक सादरीकरण केले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्, जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता‌.

नाशिकच्या ढोल‌ पथकानं वेधलं लक्ष

संचालनात नाशिकच्या सहस्त्रनाद ढोल पथकातील युवक- युवतींनी ढोल वाजवत साथ-संगत केली.  सुमारे १० मिनिटे चाललेल्या संचालनात ढोल पथकाच्या निनादात आसमंत ढवळून निघाला होता‌. ५० युवक- युवतींचा समावेश असलेल्या या ढोल पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं‌ होते.

000000

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

सातारा, दि. १२:- स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंती निमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विनम्र अभिवादन केले.

शासकीय विश्रामगृह सातारा येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ.दीपक चव्हाण, संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

शासकीय विश्रामगृह सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
000

‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत 

मुंबई, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘मध महोत्सव 2024’ या विषयावर महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी ‘मध केंद्र योजना’ राबविण्यात येत आहे. याचबरोबर उद्योगाचे स्थैर्य, स्वयंरोजगाराच्या क्षेत्राची व्यापक प्रमाणात वृद्धी करणे तसेच कारागिरांचे तांत्रिक कौशल्य वाढविण्यास निवडक ग्रामोद्योगांचे प्रशिक्षण देणे, तयार मालाच्या विक्रीस मदत करणे इत्यादी कामे प्रामुख्याने केली जात आहेत. यासाठी 18 व 19 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, सभागृह येथे देशातील पहिल्या मध महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिक, शेतकरी व तरुणांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून केले आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात सभापती श्री. साठे यांची मुलाखत सोमवार दि. 15 आणि मंगळवार दि. 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या राज्यातील सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार, दि. 16 जानेवारी, 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

०००

 

 

राजधानीत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी

             नवी दिल्ली, 12 : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय  केंद्रात आज साजरी करण्यात आली.

कॉपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार हेमंत पाटील यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी निवासी आयुक्त  तथा  प्रधान सचिव रुपिंदर सिंग, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, डॉ.प्रतिमा गेडाम उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थ‍ितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद  यांची जयंती साजरी करण्यात  आली. परिचय केंद्राच्या उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

००००

 

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संचालकांनी घेतली सामाजिक न्याय विभागाच्या सचिवांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. 12 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट बंगलुरु, कर्नाटक या संस्थेच्या संचालक डॉ. व्ही. भाग्यलक्ष्मी या राज्याच्या अभ्यास दौऱ्यावर नुकत्याच आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी सचिव श्री.भांगे यांनी राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रम व योजना याबाबतची सविस्तर माहिती सांगितली. तसेच चैत्यभुमी मुंबई, दिक्षाभुमी, नागपुर व बार्टी पुणे तसेच राज्यात विभागामार्फत विविध ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांची माहिती  दिली.

यावेळी डॉ.व्ही.भाग्यलक्ष्मी यांनी श्री.भांगे यांचा कर्नाटक मधील पारंपरिक पद्धतीची वोड़ीयार राजघराण्याची पगडी देऊन सत्कार केला व पुस्तक भेट दिले. यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, सहसचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...