मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 947

‘उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १३ (जिमाका) : ऐतिहासिक ओळख असलेल्या निसर्गरम्य उपवन तलावाचे सौंदर्य संगीतमय कारंजे आणि बनारसच्या धर्तीवरील घाटामुळे आणखी उजळले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचे लोकार्पण झाले.

राज्य सरकारच्या निधीतून ठाणे महापालिकेने उपवन तलाव येथे संगीतमय कारंजे आणि घाट यांची उभारणी केली आहे. संगीतमय कारंजे हे ‘वॉटर स्क्रीन’सह असून प्रेक्षकांसाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील तीन शो तयार करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, ठाणे शहराचा इतिहास आणि राम मंदिर असे विषय आहेत. हे कारंजे आणि घाट यांचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्कृती कला उत्सवाच्या तरंग या पाण्यावरील रंगमंचावर करण्यात आले.

 

याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, आशा डोंगरे, जयश्री डेव्हिड, माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

ठाणे शहर आता बदलू लागले आहे. स्वच्छ होत आहे, रस्ते चांगले होत आहेत. महापालिकेची सर्वंकष स्वच्छता मोहीम उत्तम सुरू आहे. आपल्याला ठाणे शहर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी करायचे आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. उपवन तलाव परिसरात ठाणेकर आतापर्यंत फक्त चालायला, फिरायला यायचे आता त्यांना या संगीतमय कारंजाचाही आनंद घेता येईल. नागपूरला फुटाळा तलावातील कारंजे पाहिल्यावर आमदार सरनाईक यांना असे कारंजे ठाण्यात करण्याबद्दल बोललो होतो. त्यांनी पुढाकार घेऊन वर्षभरात कारंजे सुरू करूनही दाखवले, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, येथील शो विनामूल्य ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले.

मुख्यमंत्र्यांमुळे ठाण्यात विविध प्रकल्प साकारणे शक्य झाले आहे. असे आणखी दोन संगीतमय कारंजे लवकरच सुरू होतील, अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. या कार्यक्रमात चित्रकार किरण कुंभार यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. किरण कुंभार यांचे एक चित्र अयोध्येतील राम मंदिरात लावण्यासाठी निवडण्यात आले आहे. त्याची प्रतिकृती कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना भेट दिली. ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल तसेच, संदीप वेंगुर्लेकर यांचाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान उद्घाटन समारंभापूर्वी गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.

०००

स्वच्छता अभियान लोकचळवळ व्हावी -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे,दि.१३ (जिमाका) : सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत संपूर्ण राज्यात स्वच्छता अभियान पूर्ण क्षमतेने राबविण्यात येणार आहे. मात्र हे स्वच्छता अभियान मर्यादित न राहता त्याचे प्रत्यक्ष लोकसहभागातून लोकचळळीत रूपांतर व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे येथे केले.

राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता करा, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी मंदिराच्या साफसफाईची सुरूवात ठाण्यातील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरापासून केली, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, परिवहन सभापती विलास जोशी, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अप्पर पोलीस आयुक्त महेश पाटील आदी या मोहिमेत सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वत: हाती झाडू घेवून कौपिनेश्वर मंदिर परिसर स्वच्छ केला त्यांनंतर  मंदिराचा मुख्य सभामंडप व परिसराची पाण्याने साफसफाई केली.

ठाणे शहराच्या मध्यवर्ती असलेल्या ऐतिहासिक अशा कौपिनेश्वर मंदिराच्या साफसफाईला स्वतः सुरुवात करून ते म्हणाले की, मुंबई- ठाणे परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्यामुळे या शहरांमधील प्रदूषणाचे प्रमाण निश्चित कमी झाले आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महाराष्ट्राला स्वच्छतेतील प्रथम क्रमांक देवून गौरविले आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.

मुंबई- ठाण्यातील सर्वंकष स्वच्छता अभियानामध्ये सफाई कर्मचाऱ्यांबरोबरच प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी तसेच सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक सहभागी होत असून हे अभियान मर्यादित स्वरूपाचे न राहता त्याचे रूपांतर लोकचळवळीत होणे आवश्यक आहे, यासाठी या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व मंदिरे साफ करुन त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांना दिल्या. तसेच टप्याटप्याने राज्यातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेणार असल्याचेही सांगितले.

ठाणे महानगरपालिकेच्या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत (Deep Cleaning Campaining) अंतर्गत आज नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतील सर्व विभागांमध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्वंकष स्वच्छता मोहीम सुरू आहे.

०००

रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि.१३ : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस शोकसंदेशात म्हणतात की,  केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन देखील केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरविले आहे.

गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात त्यांना अटल संस्कृती पुरस्कार प्रदान सोहळ्यातील त्यांची शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील.

मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हे दुःख सहन करण्याची शक्ती त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकीय आणि चाहत्यांना लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.

०००

स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने संगीत, कला क्षेत्राची मोठी हानी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १३ : स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनामुळे संगीत आणि कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. प्रभाताई यांच्या जाण्याने भारतीय संगीत क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भजन, भावगीत गायकीवरही अत्रे यांचे प्रभुत्व होते. संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. अत्रे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभावान आणि श्रेष्ठ कलावंताला मुकला आहे, अशा भावना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

त्यांचे गायन कला क्षेत्राला प्रेरणा देणारे व रसिकांना मंत्रमुग्ध करणारे होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. ‘किराणा ‘ घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभाताई यांनी बालपणापासून संगीताची आराधना केली. विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन करणाऱ्या अत्रे यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पोहोचविणाऱ्या या प्रतिभावान कलावंतांस भावपूर्ण श्रद्धांजली. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहे,असे मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

०००

 

सराफा व्यापारी शांतीकुमार शहा यांच्या पार्थिवाचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अंत्यदर्शन

बारामती, दि. १३ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सराफा व्यापारी दिवंगत शांतीकुमार जंबुकुमार शहा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी शहा कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

यावेळी पत्नी शोभाताई शहा, मुलगे रोहित शहा आणि शीतल शहा, मुलगी मिताली शहा उपस्थित होते.

मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भातील सूचना पाठविण्याचे राज्य मागासवर्ग आयोगाचे आवाहन

मुंबई, दि. १३ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्याचे काम सुरू आहे. मराठा समाजाच्या मागासलेपणासंदर्भात काही सूचना करावयाच्या असल्यास ५०० शब्दांच्या मर्यादेत महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे दि. १९ जानेवारी २०२४ पर्यंत mscbcpune2@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात,असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आले आहे.

डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन संगीताची अखंड तपस्या  – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १३ : विख्यात शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.

डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ  सांगीतिक कारकीर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला व भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते विद्यादान केले. डॉ. अत्रे यांच्या रचना अजरामर आहेत. त्यांचे जीवन ही अखंड तपस्या होती. त्यांच्या महान कार्याला वंदन करतो व त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय संगीत क्षेत्रातील तेजस्वी प्रभा निमाली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. १३ :  भारतीय संगीत क्षेत्राला मिळालेलं सृजनशील, अलौकीक प्रतिभा यांचं अनोखं वरदान म्हणता येईल, अशी एक तेजस्वी गान प्रभा आज निमाली आहे, अशा शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय संगीत क्षेत्राचे क्षितीज उजळवून टाकणाऱ्या व्यक्तिमत्वात ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचा समावेश करावा लागेल. शास्त्रीय संगीतातील त्यांचे योगदान उच्चकोटीचे राहीले आहे. संगीतातील विविध प्रवाहांना सामावून घेऊन, हे क्षेत्र त्यांनी समृद्ध केलं. आपल्या अलौकिक प्रतिभेने त्यांनी गायनातील मानदंड प्रस्थापित केले. त्यांचं गाणं स्वर्गीय आणि मंत्रमुग्ध करणारं होतं तसचं ते आपल्या संगीत क्षेत्राचं देखणेपण आणि नजाकत प्रकट करणारं होतं. त्यांनी भारतीय संगीताचं हे रुप आपल्या प्रसन्न, हसतमुख व्यक्तिमत्त्वातून देश-विदेशातही पोहचवलं. आपल्या प्रसन्न, वैशिष्ट्यपूर्ण अशा स्वरांनी त्या अजरामरच आहेत. आवाजाच्या रुपात त्या आपल्या अवतीभवतीच राहतील. संगीत क्षेत्राला मात्र त्यांची निश्चितच पोकळी जाणवेल. ही भारतीय संगीत क्षेत्राची आणि रसिकांसाठी मोठी हानी आहे. भारतीय संगीतामध्ये होणारे विविध बदल सहजपणे आत्मसात करीत संगीत क्षितिजावर अढळ स्थान निर्माण करणाऱ्या स्वरयोगिनीच्या रुपातील एक तेजस्वी तारा निखळला आहे, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

दरम्यान डॉ. अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

०००

‘जाणता राजा’ महानाट्याचा आज प्रयोग; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

नागपूर, दि.१२*: स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक महानाट्याच्या राज्यभर आयोजित होणाऱ्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उद्या दि.१३ जाऐवरी रोजी सायंकाळी ५.३० वाजता येथील यशंवत स्टेडियमवर होणार आहे.
नागपुरातील ७० कलाकार यात सहभागी होणार आहेत. शहरात आतापर्यंतचा या महानाट्याचा ६वा प्रयोग असणार आहे.
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमीत्याने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगातील हा पहिला प्रयोग आहे. जिल्हा व महानगरपालिका प्रशासनामार्फत यशवंत स्टेडियम परिसरात महानाट्यासाठी स्टेज, सीसीटीव्ही कॅमेरे, कचरागाड्यांची व्यवस्था, साईड पॅनल आदिंसह आयोजनाची यशस्वीरीत्या संपूर्ण तयारी करण्यात आली आहे.
        शहरात  “जाणता राजा” या ऐतिहासिक महानाट्याचा जवळपास ६वा प्रयोग होणार आहे. वर्ष १९९२ मध्ये शिव कथाकार विजयराव देशमुख यांच्या पुढाकाराने या महानाट्याचा प्रयोग घेण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५०व्या वर्षानिमित्त आयोजित या महानाट्यामध्ये २०० पेक्षा अधिक कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत.नागपूरातील १४४  वा प्रयोग असणार. राणी सईबाई, कान्होजी जेथे, तानाजी मालुसरे, अष्टप्रधान बाल शिवाजी आदींमध्ये नागपूरकर कलाकार दिसणार आहेत.
      १९८५ साली पुण्यात या महानाट्याचा पहिला प्रयोग झाला होता. आतापर्यंत महाराष्ट्राशिवाय अमेरिका, इंग्लंड या देशांसह भारतातील एकूण ११ राज्यांमध्ये ११४३ प्रयोग झाले आहेत.
          छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेचा घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह   प्रसंगानुरूप फिरत्या रंगमंचा समोर घोडे आणि उंटाहून जाणारा लवाजमा. तसेच, शिवराज्याभिषेक सोहळ्याच्यावेळी फटाक्यांची आकर्षक आतषबाजी बघायला मिळणार आहे.
    जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांसह नागपुरकरांनी सहकुटुंब हा प्रयोग बघण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. प्रवेश मोफत असून प्रवेशिकेद्वारे प्रवेश मिळणार आहे.  दि.१४ व १५  जानेवारीला दररोज सायंकाळी ६.३० ला प्रयोगाची सुरुवात होणार आहे.
            ०००००

तू घे भरारी…

नवी मुंबई दि.१२ :- नवी मुंबईतील आंतराष्ट्रीय विमानतळावर अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू या प्रकल्पाचे उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेल्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला ग्रामीण महिलांची प्रचंड गर्दी होती. महिलांचा उत्साह दिसून येत होता.  महिलांच्या आसन व्यवस्थेकडे आयोजकांनी विशेष लक्ष दिले होते.

उपस्थित महिला हौशेने एकाच रंगाच्या साड्या‌ परिधान करुन आल्या होत्या. त्यांची दूर्दम्य इच्छाशक्ती व आशावाद हे विकसित महाराष्ट्राचे प्रतिबिंब होते. शासनाच्या योजना या केवळ कागदावरच न राहता शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे, याचे उत्तम उदाहरण या निमित्ताने दिसले.

भडगाव, ता.वैजापूर जि.संभाजीनगर येथून आलेल्या वैशाली दिपक जगताप म्हणाल्या की, आम्ही जरी ग्रामीण भागात राहत असलो म्हणून काय झालं , “आम्हालाबी आमच्या संसारात हातभार लावायचा हाय” ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते.  या अडचणी ओळखून सरकार आमच्या पाठीशी खंबीर उभं हाय, म्हणूनच आम्हाला सरकारकडून आर्थिक मदत मिळाली. त्यातून आम्ही बचतगट स्थापन केलाय. या बचत गटाच्या माध्यमातून गावातच वॉटर फिल्टर, दूध संकलन केंद्र चालू केले आहे. त्याचबरोबर कॉमन सर्विस सेंटर चालू करुन सगळया सुविधा या सेंटरमधून पुरवतो.  त्यामुळे गावकऱ्यांना यांत्रिक साधने दुरुस्त करण्यासाठी बाहेर जावे लागत नाही. मायबाप सरकार खऱ्या अर्थाने आमचा आधार बनला आहे.

रायगड जिल्हयातील खालापूर तालुक्यातून आलेल्या श्रीमती अर्चना चंद्रकांत वालम यांना दोन जुळ‌्या‌ मुली असून शासनाच्या सुकन्या योजनेचा लाभ मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. तर उमेद अभियानांतर्गत बँक कर्ज मिळाल्याचे नागमठाण ता.वैजपूर येथील विजया चांगदेव घोडके यांनी सांगितले. स्टार्टअप योजनेंतर्गत खेळतं भांडवल मिळालं, त्यातून त्यांनी कापड व्यवसाय सुरु करुन आपल्या कुटुंबाला हातभार लावीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी १५ गावे मिळून एक ग्रामसंघ स्थापन केला आहे. तर प्रभात संघ अंतर्गत शेतकरी कंपनी स्थापन केली आहे. मशीनद्वारे स्वच्छ करुन विविध डाळी, धान्य, कडधान्य ग्राहकांना माफक दरात उपलब्ध करुन देतात. स्वत:सोबत इतर महिलांना आर्थिक लाभ मिळवून देत आहेत.

गणेशकृपा या बचतगटाच्या माध्यमातून रायगड जिल्ह‌्यातील उरण तालुक्यातून  आलेल्या श्रीमती शोभा धनाजी म्हात्रे यांनी पापड लघुउद्योग सुरु करुन २५ ते ३० महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिलाय. याकरिता त्यांच्या बचतगटाला १५ हजाराचे कर्ज शासनाकडून उपलब्ध झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. १ टक्का व्याजदराने एक लाखाचे कर्ज देखील उपलब्ध झाले आहे. यातून एक बचतगट स्थापन करुन त्यांनी लोणचे, मसाला, चहा पावडर विविध प्रकारचे लाडू तयार करुन त्या आत्मविश्वासाने स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथून आलेल्या वर्षा केतकावळे आणि सायली अक्षर पांघारे यांना देखील शासनाच्या माध्यमातून एचडीएफसी बँकेकडून कर्ज उपलब्ध होऊन कुक्कुटपालन व्यवसायात त्या आत्मविश्वासाने उतरल्या आहेत. मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचा लाभ घेतल्याची प्रातिनिधीक उदाहरणेही सांगता येतील.

0000000000

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...