मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 946

युवकांनी शास्त्रीय व लोकनृत्य परंपरांचे जतन करावे – मंत्री डॉ. भारती पवार

नाशिक दि. १३ (जिमाका): आपल्या देशाला विविध नाट्य, नृत्य परंपरा लाभल्या असून त्यामुळे देशाची जगात एक वेगळी ओळख आहे. या शास्त्रीय व लोकनृत्य परंपरेचे युवकांनी जतन करून त्या पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आज महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या लोकनृत्य समुह व वैयक्तिक नृत्य कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांच्यासह राज्यातील विविध मान्यवर व युवक उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, भारतीय नृत्यकला ही संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. तसेच मानवी मनातील भावना कथा स्वरूपात नृत्यातून दाखवण्याची कला शास्त्रीय व लोकनृत्यात आहे. शास्त्रीय नृत्यात भरतनाट्यम, कथ्थक, मोहिनीअट्टम, कुचीपुडी, कथकली, ओडिसी, मणिपुरी, सत्रिय अशा या आठ महत्त्वाच्या शास्त्रीय नृत्याचे प्रकार देशात विविध राज्यात प्रसिद्ध आहेत. शास्त्रीय व लोकनृत्य ही दोन्ही नृत्य भारतीय संस्कृती, परंपरेचं दर्शन घडवित असतात. युवा महोत्सवासाठी आलेल्या विविध राज्यातील युवकांनी नाशिकमधील पर्यटन व खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहनही मंत्री डॉ. पवार यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विविध राज्यातील शास्त्रीय व लोकनृत्यांचे सामूहिक व वैयक्तिक नृत्य प्रकार सादर करण्यात आले.

०००

खाद्य महोत्सवात विविध प्रांतातील खाद्यपदार्थ एकाच छताखाली

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी घेतला कर्नाटकी गुळपोळीचा आस्वाद

नाशिक दि. १३ (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवात आज दुसऱ्या दिवशी विविध  कार्यक्रमांनी सुरुवात झाली. पंचवटीतील हनुमान नगरातील युवाग्राममध्ये आयोजित खाद्य महोत्सवाकडे नाशिककरांची पावले वळत आहेत. वेगवेगळ्या प्रांतातील खाद्यपदार्थांची चव घेण्याची संधी एकाच छताखाली मिळत असल्याने खाद्य महोत्सव हा या महोत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. अशा चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याचा मोह केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनाही झाला व त्यांनी यावेळी कर्नाटकी गुळपोळीचा आस्वाद घेतला.

खाद्य महोत्सवात घ्या या पदार्थांचा आस्वाद

राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त हनुमान नगर परिसरात खाद्य महोत्सव भरवला आहे. महोत्सवात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश, आसाम, गुजरात यांसह वेगवेगळ्या भागातील खाद्यपदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील केळी वेफर्स, वडापाव, वेगवेगळ्या प्रकारच्या मिसळ यासह चमचमीत, तर्रीदार कोल्हापुरी उसळसह दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदुवडा, कर्नाटकी गुळपोळी असे वेगवेगळे खाद्यपदार्थ नाशिककरांना आकर्षित करत आहेत. पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे केले जात असल्याने देशपातळीवर तृणधान्यविषयक पाककला स्पर्धेतील विजेत्यांच्या पाककृती, पदार्थ या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

०००

लोकगीतांनी घडविले लोकसंस्कृतीचे दर्शन; पारंपरिक लोकगीतांच्या श्रवणीय सादरीकरणाने रंगत

नाशिक दि. १३ (जिमाका): राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विविध राज्यांच्या कलाकारांनी सादर केलेल्या श्रवणीय लोकगीतांनी महोत्सवात रंगत आणली. या लोकगीतांतून विविध राज्यातील लोकसंस्कृती, परंपरांचे प्रेक्षकांना दर्शन घडविले.

२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज रावसाहेब थोरात सभागृहात विविध राज्यातील कलाकारांच्या लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोकगीत कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले.

कर्नाटक, महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, गुजरात आणि गोवा‌ राज्यातील कलाकारांनी लोकगीते सादर केली‌. प्रत्येक राज्यातील कलाकारांनी आपल्या पारंपरिक गीते, संगीत, सुरांद्वारे श्रवणीय, नादरम्य लोकगीते सादर केली‌. महादेवाच्या अलौकिक शक्तीचे महत्त्व विशद करणारे कर्नाटकचे लोकगीत, महाराष्ट्राच्या कृषी संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकगीत, झारखंडच्या दारूच्या व्यसनावर मार्मिक भाष्य करणारं, लडाखच्या कलाकारांच्या भावस्पर्शी सुरांनी गाव आणि आईच्या प्रेमाची तळमळ‌ व्यक्त करणारे, हरियाणाच्या कलाकारांनी‌ सकस अभिनयासह सादर केले. लोकगीते आणि छत्तीसगडच्या प्राचीन परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या लोकगीतांनी उपस्थितांना अवर्णनीय आनंद दिला.

स्पर्धा स्वरूपात सादर झालेल्या आजच्या सांघिक व वैयक्तिक लोकगीत कार्यक्रमांचे परीक्षक म्हणून डॉ. रंजना सरकार, डॉ. टी.व्ही. मणिकंदन आणि ओंकार वैरेगकर यांनी काम पाहिले. नेहरू युवा केंद्राचे पंजाब राज्याचे संचालक परमजीत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक संचालक सूर्यकांत कुमार, धुळे जिल्हा युवा अधिकारी अविनाश आणि रेश्मा चंद्रन यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन‌ केले.”लोकगीतांचा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला, तसा तो केवळ संगीताचा उत्सवच राहिला नाही तर भारताच्या लोकसंस्कृती, परंपरा व‌ एकात्मतेचे दर्शन घडविणारा ठरला.” अशी भावना परमजित सिंग यांनी ‌व्यक्त केली.

०००

शिवछत्रपतींचा जीवनपट चंद्र सूर्य असेपर्यंत आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘जाणता राजा’चा प्रयोग उद्यापासून सर्वांसाठी खुला

प्रथम येणाऱ्यांना प्रथम प्राधान्य; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

नागपूर दि. १३ : जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आमच्या मनात जोश, वर्तनात आदर्श आणि मनामनात ऊर्जा निर्माण करत राहणार आहे. शिवचरित्र युगानुयुगे आमच्यासाठी ऊर्जास्त्रोत्र राहणार आहे, असे प्रतिपादन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शिवचरित्रावर आधारित महानाट्य कार्यक्रम राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे. नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून आज शिवछत्रपतींच्या जीवनपटांवर आधारित महानाट्य ‘जाणता राजा’ या प्रयोगाचा राज्यस्तरीय शुभारंभ हजारोंच्या उपस्थितीत करण्यात आला. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यातील जिल्ह्यामध्ये हा प्रयोग होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज हा शुभारंभ झाला.

यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रवीण दटके, आमदार आशिष जायस्वाल, माजी खासदार विकास महात्मे,  महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला 350  वर्ष पूर्ण झाल्यानिमित्याने अतिशय समर्पक भूमिका घेत राज्यभर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणता राजाचा राज्यस्तरीय पहिला प्रयोग नागपूर येथे होत असल्याचा आपल्याला आनंद आहे. शिवशाहीर महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांनी जाणता राजाची सुरुवात केली होती, याचे देशभर शेकडो प्रयोग झाले, नागपुरातही अनेक प्रयोग झाले, मात्र दरवर्षी हे नाटक आपल्याला बघावसे वाटते इतके प्रेरणादायी आहे.

जेव्हा आमचे अस्तित्वच नाकारले गेले होते त्यावेळेस शिवरायांनी अतुलनीय पराक्रम गाजवत दडपशाहीला मिटवून टाकले. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत शिवरायांचे चरित्र आम्हाला प्रेरणादायी असेल. ते कायम आम्हाला ऊर्जास्त्रोत असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे. त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. त्यांचा इतिहास आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच उभा करणारा आहे. त्यांचे नुसते नाव विचारले तरी स्फुल्लिंग जागृत होते. यावेळी त्यांनी लंडनवरून शिवाजी महाराजांची वाघनखे आणण्याचा करार करण्यात आल्याचे सांगितले. लवकरच ही वाघ नखे महाराष्ट्रात येणार असून लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. सीएसआर निधीमधून हे काम हाती घेण्यात येणार आहे. जनसामान्यापर्यंत शिवाजी महाराजांचे विचार पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

रविवार, सोमवारचा प्रयोग सर्वांसाठी खुला

जाणता राजा या प्रयोगाच्या आजच्या उद्घाटन सोहळ्यानंतर उद्यापासून हा प्रयोग सर्वांसाठी खुला ठेवण्यात आला आहे.  जिल्हा प्रशासनाने उद्यापासून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. त्यामुळे उद्या रविवारी मोठ्या संख्येने नागरिकांनी शिवचरित्रावरील आयोजित या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

०००

शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. १३: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, त्यांच्या निधनाने ‘भारतीय शास्त्रीय संगीतातील  वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले. कोट्यवधी रसिकांची मने जिंकली.ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. पुण्यात जन्मलेल्या डॉ. अत्रे  महाराष्ट्र, देश, जागतिक संगीतक्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो’.

०००

 

शास्त्रीय संगीतातील स्वरप्रभा निमाली– महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १३ :  आपल्या प्रतिभासंपन्न गायनाने भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केले, अशी शास्त्रीय संगीतातील स्वर प्रभा निमाली, अशा भावना व्यक्त करून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली अर्पण केली.

पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित अशा डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन ही राज्याच्याच नाहीतर देशाच्या कला व संगीत सृष्टीची फार मोठी हानी असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

भारतीय शास्त्रीय संगीतसृष्टीतील प्रभा युगाचा अंत झाला असून ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभाताई अत्रे यांच्या जाण्याने कला, साहित्य, संगीत आदी विविधांगी क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारे एक प्रतिभावंत व्यक्तिमत्व हरपले आहे. तब्बल ११ पुस्तके तसेच ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीतून त्यांनी गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अशा सृजनशील, अलौकीक प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वास मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मंत्री विखे पाटील म्हटले आहे.

०००

‘विकसित भारत’ लक्ष्य प्राप्तीसाठी विकसित शिक्षण प्रणाली व आरोग्य व्यवस्था आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

 मुंबई, दि. १३: विकसित भारताचा महामार्ग विकसित शिक्षण प्रणाली, विकसित आरोग्य सेवा, उद्यमशीलता व नवसृजनाच्या वाटेने जातो, असे सांगून विकसित भारताचे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी नव्या भारतातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १३) प्रशासन, पोलीस, आरोग्यसेवा, समाजकार्य, शिक्षण यांसह विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील ६५  व्यक्तींना ‘नव भारत के शिल्पकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

प्रकाशनाचे ९० वर्षे साजरे करीत असलेल्या नवभारत समूहातर्फे हे पुरस्कार देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून नवभारत समूहातर्फे  ‘शिव राज्याभिषेक ३५० वर्ष’ या कॉफी टेबल पुस्तकाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर ७६ वर्षांनी भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयाला आला आहे. आपल्याला भेटणारे विविध देशांचे राजदूत, विविध देशांचे संसद सदस्य या सर्वांचे या बाबतीत मतैक्य असल्याचे त्यांनी सांगितले. भारत येत्या काही वर्षात जगातील तिसरी मोठी आर्थिक सत्ता होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला असल्याचे सांगून विकसित भारत ध्येय गाठण्यासाठी विद्यापीठ व उच्च शिक्षण संस्थांची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. या दृष्टीने आपण राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना  ‘विकसित विद्यापीठ’ बनविण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी सांगितले.

नवभारत नवराष्ट्र तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर सचित्र ग्रंथ काढल्याबद्दल आनंद व्यक्त करुन प्रत्येकाने शिवाजी महाराजांच्या आदर्शाप्रमाणे महिलांचा सन्मान, विविध धर्म व पंथांचा आदर व जनसामान्यांचे कल्याण यासाठी कार्य केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाला खासदार पूनम महाजन, माजी मंत्री व पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील व नवभारत समूहाचे व्यवस्थापकीय संचालक निमिष माहेश्वरी उपस्थित होते. .

यावेळी राज्यपालांच्या हस्ते हर्षवर्धन पाटील, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी पल्लवी दराडे, स्नेहलता कोल्हे (संजीवनी समूह),  राजेश गोयल (कोहिनुर समूह), महानगर पालिका आयुक्त छत्रपती संभाजी नगर जी श्रीकांत, पोलीस आयुक्त अमरावती नवीनचंद्र रेड्डी, शशांक परांजपे (परांजपे स्कीम), चिंतन देसाई (सोसायटी टी) आदींना ‘नव भारत के शिल्पकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

०००

वाढीव पदांवर समायोजन झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावेत – मंत्री दीपक केसरकर

मुंबई, दि. १३ :  वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ समायोजनास पात्र शिक्षकांपैकी मुंबई विभागातील २० शिक्षकांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते यासंदर्भातील आदेश प्रदान करण्यात आले. वाढीव पदावर समायोजन केलेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वागीण विकासासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केली. मुंबईत नुकताच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

मान्यताप्राप्त खासगी अनुदानित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीसंख्या वाढल्यामुळे वाढलेल्या अतिरिक्त कार्यभारानुसार पायाभूत पदांपेक्षा अतिरिक्त शिक्षक पदे मंजूर करण्याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले होते. सन २००३-०४ पासून २०१८-१९ पर्यंत वाढीव कार्यभारानुसार अतिरिक्त वाढीव पदे मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता. या कालावधीतील वाढीव पदांवर कार्यरत असलेल्या एकूण २८३ पात्र शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी समायोजन झालेल्या शिक्षकांना यावेळी शुभेच्छा दिल्या. समायोजनाचे आदेश प्राप्त शिक्षकांनीही शासनाच्या या कार्यवाहीबाबत समाधान व्यक्त करून आभार मानले. यावेळी संबंधित सर्व शिक्षक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

०००

 

विकासकामांच्या माध्यमातून बारामती परिसराचा सर्वांगिण विकास करण्याचा प्रयत्न-उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, दि. १३ :  विविध विकासकामांच्या माध्यमातून बारामती तालुक्याच्या सर्वागिण विकास करुन  नागरिकांना उत्तम सोईसुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत; आगामी काळातही विविध विकासकामे कामे करावयाची असून त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती येथे अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघातर्फे गरजू विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साडी वाटप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव, बिरजू मांढरे, माजी नगरसेवक समीर चव्हाण, अभिजित चव्हाण, अर्जून प्रतिष्ठान व स्व. वस्ताद बाजीराव काळे तालिम दहिहंडी संघाचे अध्यक्ष डॉ.ऋतुराज काळे आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, बारामती परिसरातील नागरिकांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेले महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि गरजू नागरिकांना घरे मिळण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परिसर विकासाच्यादृष्टीने विविध दूरगामी धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरण, चिल्ड्रन पार्क, श्रीमंत बाबुजी नाईक वाडा शुभोभिकरण, कऱ्हा नदी शुभोभिकरण, नवीन प्रशासकीय भवनाच्या शेजारी सेंट्रल पार्क, रस्ते बांधणी अशी विविध विकास कामे सुरु आहेत.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जुन्या भाजी मंडईचे गाळे पाडण्यात आले असून तेथील गाळे धारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी ६५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गाळेधारक, ग्राहकांची सुरक्षितता, वाहनतळ आदी बाबीचा विचार करुन व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोईच्यादृष्टीने अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. आगामी काळात परिसरातील नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी उद्यान, बगीचे, क्रीडांगण उभारण्यात येणार आहे. यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था मदत करीत आहेत. सार्वजनिक विकासकामे दर्जेदार, गतीने वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न

महिलांना समाजात प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त करुन दिल्याशिवाय  प्रगती होत नाही. महिलांचे राष्ट्र निर्मितीच्या कामात मोठे योगदान आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्यादृष्टीने मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.  केंद्र व राज्य शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी केले.

काळे परिवाराचे बारामती परिसरातील सामाजिक कार्यात योगदान

स्व. वस्ताद बाजीराव काळे यांनी कुस्ती क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली होती तसेच सामाजिक कार्यात योगदान दिले होते. डॉ.ऋतुराज काळे नेहमीच सामाजिक कार्याच्या माध्यमातून बारामती परिसराच्या विकासासाठी नेहमी कार्यरत असतात. त्यांनी परिसरातील शाळेसाठी भूखंड दिला असून त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मुलांच्या सोईच्यादृष्टीने उत्तम आराखडा अंतिम करुन याठिकाणी दर्जेदार शाळा उभारण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनीना सायकल, महिलांना शिलाई व साड्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्री. गुजर यांनी आपले विचार व्यक्त केले.

अपर पोलीस पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,  न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते.

०००

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी

बारामती, दि. १३ :  बारामती शहरात विविध विकासकामे सुरु असून ती वेळेत पूर्ण करुन कामासाठी देण्यात आलेला निधी ३१ मार्चअखेर खर्च हाईल, यादृष्टीने कामे करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी बारामती परिसरातील मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, नवीन बसस्थानक, परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणाअंतर्गत करण्यात येणारी कामे, श्रीमंत बाबुजीनाईक वाडा व परिसरातील विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

मेडद येथील आयुर्वेदिक महाविद्यालय परिसरात व्यवस्थितपणे पाण्याचा निचरा होईल असे पेव्हर ब्लॉक बसवा. परिसराची  आकर्षक रंगरंगोटी करावी.  मेडद येथील नागरिकांसाठी बगीचा करण्याबाबत नियोजन करा. परिसरातील कऱ्हा नदी सुशोभीकरण व पुलांची  कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. नदी सुशोभिकरणाची कामे करतांना पाण्याच्या प्रवाह सुरळीत राहील, याबाबत काळजी घ्या.  याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात अधिकाधिक  सुविधा मिळतील यादृष्टीने  कामे करावीत. या परिसरातील स्मशानभूमीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीनेही नियेाजन करा, असे निर्देश श्री.पवार यांनी दिले.

परकाळे बंगला येथील कालवा सुशोभिकरणाअंतर्गत कामे करतांना अधिकाधिक वृक्षारोपण करा. परिसर स्वच्छ राहील, याची काळजी घ्या. काम पूर्ण झाल्यानंतर समाधान वाटले पाहिजे, यादृष्टीने बारकाईने लक्ष ठेवून कामे करावीत.

शासकीय कार्यालयात स्वच्छता ठेवा

प्रशासकीय भवन व परिसरातीची पाहणी करुन श्री. पवार म्हणाले,  शासकीय कार्यालय व परिसरात स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे. कार्यालयाच्या अंतर्बाह्य भागात लावण्यात येणारे फलक एकसारखे लावावे. विजेच्या तारा लटकता कामा नये. कार्यालयाचे नुतनीकरण करतांना सर्वसुविधानी युक्त कार्यालय असेल, अशी कामे करावीत.  परिसरातील बगीच्यासाठी नगरपरिषदेच्या शुद्धीकरणप्रकल्पाअंतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या वापर करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या

नवीन बसस्थानकाचे लवकरात लवकर उद्धघाटन करुन नागरिकांना सोई-सुविधा मिळण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण करा. मध्यवर्ती भागात नागरिकांना सावली देणाऱ्या वृक्षाची लागवड करा. वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजे तसेच परिसर स्वच्छ राहील, याकडे लक्ष द्यावे.

बाबुजीनाईक वाडा व परिसरातील नागरिकांची सुरक्षिततेचा विचार करुन पोलीस चौकी उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करा. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक, आणि दिव्यांग नागरिकाच्या सुरक्षिततेदृष्टीने पायऱ्या व शौचालयाची व्यवस्था करावी,  अशा सूचना श्री.पवार यांनी दिल्या.

सार्वजनिक विकासकामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे. निधी अभावी कामे प्रलंबित राहू नये.  कामेवेळेत पूर्ण करण्यासाठी अधिक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री वाढवावी. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही,  उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले

यावेळी अपर पोलीस पोलीस अधीक्षकआनंद भोईटे, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील पावडे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, न.प.चे मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती बसस्थानकाच्या आगार व्यवस्थापक वृषाली तांबे,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जय पाटील, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

०००

अटल सेतूवर वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि.१३:  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल ‘अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतू’ चे राष्ट्रार्पण केले. हा अटल सेतू आजपासून सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला झाला आहे. वाहनचालकांनी या सेतूवरून प्रवासाचा आनंद घेताना वेग मर्यादा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, भारतातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू अशी या अटल सेतूची ओळख आहे. यामुळे, दाक्षिण भारतासह, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोवा यांचे अंतर कमी होणार आहे. हा सेतू एक देशातील एक प्रमुख अभियांत्रिकी आविष्कार ठरला आहे. या सेतूवरून प्रवास करणे हा आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाचा क्षण असणार आहे, हा क्षण अनुभवताना वाहन वेग मर्यादा लक्षात घेऊन सुरक्षितपणे प्रवास करावा.

आपण सर्वांनी सुरक्षित आणि आनंददायी प्रवास करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

०००

जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पालघर दि. १३ : राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देऊन राज्य विकासाकडे वाटचाल करत आहे.   जगाला हेवा वाटावा  असा विकसित महाराष्ट्र  घडवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वि.वा. ठाकूर महाविद्यालय, विरार येथे १९ व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री श्री.  शिंदे बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, आमदार सर्वश्री हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, वसई – विरार महापालिकेचे आयुक्त अनिल पवार, संमेलनाचे अध्यक्ष, जपान मधील मराठी आमदार योगेंद्र पुराणिक, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, कामानिमित्त किंवा व्यवसायानिमित्त जगामध्ये कुठेही मराठी माणूस स्थायिक झाला तरी त्यांची नाळ ही मराठी भाषा व महाराष्ट्राशी जोडलेली असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जपानमधील मराठी भाषिक आमदार योगेंद्र पुराणिक हे आहेत. काळाबरोबर अनेक शब्दांचा संचय मराठी भाषेमध्ये झाला आहे. शेकडो वर्षांपासून मराठी भाषेची मुळं सामान्य जनतेच्या मनामध्ये घट्ट रुजलेली आहेत हे सर्वांना अभिमानास्पद आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण  झालेला शिवडी – नाव्हा शेवा ट्रान्स हार्बर लिंक हा पर्यावरणपूरक प्रकल्प असून तो वरळी, कोस्टल हायवे, मुंबई – पुणे एक्सप्रेस वे, मुंबई -गोवा हायवे, तसेच वसई – विरार- अलिबाग मल्टी मॉडल कॉरिडॉर या मार्गाला जोडण्यात येणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन मुंबई -पुणे मीसिंग लिंक हा जगातील सर्वात जास्त रुंदीचा बोगदा तयार होत आहे. या बोगद्यामुळे पुण्याचे अंतर हे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. वर्सोवा सी ब्रिजची जोडणी पालघर जिल्ह्यातील विरारपर्यंत वाढविण्यात  आली असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्र संत, साहित्यिक, कवी, कलाकारांची भूमी असून या सर्व महान विभूतींनी मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले आहे. यामुळेच आपली मराठी भाषा भक्कम पायावर उभी असून  जगभर मराठी भाषेचा प्रसार होतांना आपल्याला दिसत आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने पहिले विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते या संमेलनाला  जगभरातील मराठी बंधू-भगिनीचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावर्षी देखील विश्व मराठी साहित्य संमेलन, वाशी येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनामुळे मराठी भाषेचा प्रसार जगभर होण्यास मदत होणार आहे . गिरगाव चौपाटी येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

०००

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...

पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी घेतली केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार...

0
नवी दिल्ली 7 : महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे उत्त्पन्न घेतात. केंद्र शासनाने या शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करावा अशी मागणी पणन मंत्री...

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ७ : राज्यातील अकृषी सार्वजनिक विद्यापीठ आणि अशासकीय महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर रिक्त पदे भरल्यास नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनुसार उच्च शिक्षणाची गुणवत्ता...

पनवेल व उरणमधील आदिवासी बांधवांचे नियोजनबद्धरित्या पुनर्वसन करावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

0
मुंबई, दि. 7 : पनवेल व उरण तालुक्यातील सिडको परिक्षेत्रात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांचे पुनर्वसन नियोजनबद्धरीत्या करण्यात यावे, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिले. आदिवासी...

मिरा-भाईंदर येथील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधांची कामे वेळत पूर्ण करावी – सार्वजनिक आरोग्य...

0
मुंबई, दि. 7 : मिरा-भाईंदर शहरातील ‘पंडित भीमसेन जोशी’ शासकीय रुग्णालयातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्यात यावीत, तसेच तांत्रिकदृष्ट्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही...