मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 945

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते चार हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभिकरणाचे लोकार्पण

सोलापूरदिनांक 14 – सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे  कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टीहुतात्मा श्रीकिसन सारडा,हुतात्मा जगन्नाथ शिंदेहुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांचे वंशज श्रीमती अन्नपूर्णा धनशेट्टी व हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा कुर्बान हुसेन यांचे वंशज (मुलीचा मुलगा)हसीमोद्दीन शेख यांचा सन्मान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नरेंद्र काळेनगर अभियंता सारिका आकूलवारउपअभियंता किशोर सातपुतेकनिष्ठ अभियंता परशुराम भुमकंटीबिरू बंडगरविजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका इमारतीला भेट –

स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळापैकी सोलापूर महानगरपालिकेची इंद्रभुवन या इमारतीचे नुतनीकरण कामास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.  यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण संदर्भातील  संपूर्ण माहिती त्यांना दिली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजेअतिरिक्त आयुक्त निखिल मोरेउपायुक्त मच्छिंद्र घोलपउपायुक्त आशिष लोकरेसहाय्यक आयुक्त शशिकांत भोसलेनगर अभियंता सारिका आकूलवारउप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

‘पीएम जनमन’ आणणार कातकऱ्यात समृद्धीची पहाट; ८४५ कुटुंबाना मूलभूत सुविधांचा लाभ

सातारा / प्रतिनिधी  :- सातारा जिल्ह्यातील आदिम कातकरी समाजातील वंचित कुटुंबांच्या प्रधानमंत्री जनमन योजनेच्या माध्यमातून समृद्धी फुलवण्याचे स्वप्न सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करून जिल्ह्यातील ८४५ कातकरी समाजातील कुटुंबांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वेक्षण झाले असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन मार्फत विविध मूलभूत सुविधा पुरविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत सोमवार दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब या लाभार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता जनजाती आदिवासी न्याय महाअभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने प्राधान्य क्रमाने घेतला आहे. यासाठी १५ नोव्हेंबर २०२३ रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री जनमन या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या अभियानादरम्यान सातारा जिल्ह्यात नऊ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील ८४५ कातकरी कुटुंब वास्तव्यास असलेल्या गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षण झालेल्या कुटुंबांना आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, आयुष्यमान भारत, आरोग्य कार्ड, जातीचा दाखला, घरकुल, रस्ते, पिण्याची पाणी इत्यादी मूलभूत सेवा सुविधा पुरवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा प्रशासन अविरतपणे प्रयत्नांची पराकाष्टा करीत आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या जिल्ह्यातील ८४५ लाभधारक कुटुंबांशी दिनांक १५ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० या वेळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधणार आहेत.
यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभुराज देसाई, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार. रामराजे निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्री छ. शिवेंद्रराजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदे, अण्णासाहेब महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार महादेव जानकर, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर तसेच आदिवासी विभागाचे अप्पर सचिव दीपक मीना आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रशासनाच्या वतीने मेढा, ता. जावली येथील‘कलश मंगल कार्यालयात’ ऑनलाईन कार्यक्रमासाठी विशेष नियोजन करण्यात आले असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिली. कार्यक्रमासाठी पात्र लाभधारक कुटुंबांनी या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केले आहे.
000

आत्मनिर्भर आदिवासी केंद्रबिंदू ठरवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नागपूर दि. 10 :   आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी विविध योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. आदिवासी समाज हा बहुसंख्येने अतिदुर्गम भागात राहत असून त्यांच्यापर्यंत योजनांची माहिती व्हायला पाहिजे. सोबतच रोजगारामुळे मूळ रहिवास सोडून आदिवासी समाज शहरी भागात पलायन करीत आहे. त्यासाठी त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणीच शेतीसह पूरक पशुपालन हा उद्योग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केल्यास त्यांचे पलायन होणार नाही व आदिवासी समाज आत्मनिर्भर बनेल, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी दिले.

रवी भवन येथे आदिवासी विकास विभागाच्या योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे तसेच आदिवासी विभागाचे अधिकारी व बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आदिवासी विकास विभागांतर्गत शाळा व आश्रमशाळांचे बांधकाम गुणात्मक असायला पाहिजे. येत्या दोन वर्षात सर्व बांधकाम पूर्ण होतील याची आतापासून  सुरुवात करा. महसूली जागेसंदर्भात समन्वयाने निर्णय घ्या, असे डॉ. गावित म्हणाले.

आदिवासी समाज आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना शेळी-मेंढी पालन व गाय-म्हैशी पालन योजनांचा लाभ द्या. पशुची निवड लाभार्थ्यांसाठी स्वयंपसंती असेल. त्यांना चारा व दुध काढण्याचे प्रशिक्षण द्यावे, पशुधन अधिकाऱ्यांकडून त्यांचे आरोग्य तपासणी करा, जेणेकरुन योग्य जनावरांची निवड करुन त्यांना आपला आर्थिकस्तर वाढविता येईल, सोबतच त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील, असे त्यांनी सांगितले.

अनेकदा शेतकरी पशु घेतात व नंतर त्याची विक्री करतात त्यामुळे योजना सफल होत नाही यासाठी 5 लाभार्थ्यांचा एक गट करुन त्यांचे बँक खाते उघडण्यात येते. त्यामुळे अशा बाबींवर आळा बसेल. तसेच योजना यशस्वी होईल. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कार्यवाही करुन 70 हजार रुपये गाईसाठी व म्हसीसाठी 80 हजार अनुदान देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आदिवासी विकासासाठी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना योग्य माहिती द्यावी. बांधकामासोबतच योजनांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000

गडचांदूर येथे उद्या रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियानाचे आयोजन

चंद्रपूर, दि. 14 : देशातील आदिम जमातींच्या विकासाकरिता ‘प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान’ अर्थात पी. एम. जनमन या योजनेची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर 2023 रोजी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे जयंतीचे औचित्य साधून करण्यात आली आहे. यात देशातील 75 आदिम जमातींमधील 7 लाख कुटुंबांतील 28 लाख आदिम लोकांना 11 विविध मूलभूत सेवा प्रदान करण्यात येणार आहे. पंतप्रधानांचे प्राधान्यक्रमात असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीकरिता केंद्र शासनाने अकरा प्राथम्य क्षेत्र निश्चित केले असून त्यामध्ये नऊ विविध मंत्रालयांचा समावेश केला आहे.

राज्यातील कोलाम, कातकरी व माडीया गोंड या आदिम जमाती असून त्यापैकी  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिम जमात प्रामुख्याने जिवती, कोरपणा, राजूरा व वरोरा ह्या तालुक्यांत वास्तव्यास आहे.

कोलाम जमातीच्या विकासाकरिता व “पंतप्रधान-जनमन” या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर या कार्यालयाने संबंधित अन्य विभागांच्या समन्वयाने जिल्हयातील कोलाम या आदिम जमातींच्या नागरिकांकरिता त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जाऊन दिनांक 03 जानेवारी 2024 पासुन विविध शिबीरांचे आयोजन केले आहे.

प्रधानमंत्री जनमन अभियानाच्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे टू-वे कनेक्टीव्हीटीद्वारे आदिम जमातीच्या जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन बालाजी सेलीब्रेशन हॉल ॲन्ड लॉन, गडचांदुर येथे करण्यात आले असून त्या ठिकाणी कोलाम जमातीच्या लोकांना विविध दाखल्यांचे आणि योजनांच्या लाभाचे वितरण करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे यू-ट्यूब चॅनलद्वारे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे.

योजनेची उद्दिष्टे : आदिम कोलाम जमातीच्या नागरीकांना नवीन आधार कार्ड, घरकुल, जातीचे दाखले, बँक खाते, किसान क्रेडीट कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान योजना, उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, आरोग्य तपासणी अशा विविध सुविधा व दाखले या अभियानांतर्गत देण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण 8504 एवढे विविध दाखले काढण्यात आले असून इतर अनुषंगीक 4281 सेवा प्रदान करण्यात आल्या आहेत.

आदिम जमातीतील कुटुंबांना पक्के घर देणे, नल से जल योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविणे, पाडे / वस्त्यांना पक्क्या रस्त्याने जोडणे, प्रत्येक घराला मोफत विद्युत मीटर देऊन वीजपुरवठा करणे, पोषण आहार आणि आरोग्य सुविधा पुरविणे, वस्त्या / पाडे मोबाईल आणि इंटरनेट सेवेने जोडणे, बेरोजगारांसाठी कौशल्य विकासाच्या योजना राबविणे, विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह सुविधा देणे, उपजीविकेच्या साधनांची निर्मिती करणे, वैयक्तिक वन हक्क दावे मंजूर करणे, वन हक्क दावेधारकांना पीएम किसान योजनेचा लाभ देणे, वस्त्यांवर बहुउद्देशीय केंद्र स्थापन करून त्यात अंगणवाडी  आणि आरोग्य केंद्र सुरू करणे, तेथे स्वतंत्र कर्मचारी नेमणे ही पीएम जनमन योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत.

 पालकमंत्र्यांची असणार उपस्थिती

जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या थेट संवादाच्या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते आदिम कोलाम समाजबांधवांना विविध योजनांचे लाभ आणि दाखले वितरण होणार आहेत. तसेच सदर कार्यक्रमास जिल्हातील आमदार देखील उपस्थिती दर्शविणार आहेत.

 15 जानेवारी रोजी होणाऱ्या पंतप्रधानांच्या थेट संवादाच्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, प्रकल्प अधिकारी मुरूगानंथम एम., राजुरा उपविभागीय अधिकारी रविंद्र माने यांच्यासह इतर अधिकारी परिश्रम घेत आहेत.

000

शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीशिल शेतकरी बनावे – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. 14 : शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले

यवतमाळ शहरातील समता मैदानात आयोजित जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संत़ष डाबरे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, या जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनी पाहायला मिळणार आहेत.  त्यासोबत शेतीमध्ये उपयुक्त ठरणारे अनेक नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन होणार आहे. राज्य शासनाने हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. या माध्यमातून शेतीमध्ये अजून चांगले काय करू शकतो याची कल्पना शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

हरितक्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे आज राज्य अन्नधान्यात स्वयंपूर्ण आहे. यवतमाळ पांढरे सोने उगवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज कापूस, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शासन प्रशासन म्हणून आम्ही सुद्धा याबाबत चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडून चांगली बातमी शेतकऱ्यांना कळेल आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्ह्यातील धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना आणि मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जिल्ह्यात सहाशे कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढले पाहिजे ही भूमिका घेऊन जिल्हास्तरावर वेगवेगळ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मॉडेल शाळा सुरू करणार आहोत. वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन अनुदान तत्त्वावर देण्यात येणार आहे.

या कृषी महोत्सव व प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील नवीन गोष्टींची माहिती होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती केली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी हितासाठी प्रामाणिकपणे काम करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या महोत्सवात विविध विभागाचे स्टॉस सुरू करण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रगतीशिल शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डांबरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवट यांनी केले तर रंजन वानखेडे यांनी आभार मानले.

या कृषी महोत्सवात कृषी निविष्ठा दालन, शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, गृहोपयोगी वस्तूं, बचत गट, कृषी यंत्र व साहित्य, रोजगार दालन तसेच ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले आहेत. यावेळी शेतकरी, नागरिक या दालनांना भेट देऊन माहिती जाणून घेत होते. सदर महोत्सव व प्रदर्शन दि.१८ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

येवला मतदारसंघातील गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत निधीचे वितरण करावे – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा)  :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला मतदारसंघात नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या गारपीट अवकाळी नुकसान मदतीचा आढावा घेतला. शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेली रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना वितरित करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, येवल्याचे नायब तहसीलदार पंकज मगर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नोव्हेंबर २०२३ मध्ये येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील गारपीटग्रस्त २५२७ बाधित शेतकऱ्यांना ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये तर येवला तालुक्यातील गारपीटग्रस्त ३७७ बाधित शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपये मदत निधी मंजूर करण्यात आला आहे.

येवला मतदारसंघातील निफाड तालुका परिसरातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडळात तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी परिसरात नोव्हेंबर २०२३ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. तसेच अधिक मदत मिळवून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्वासित केले होते.

त्यानुसार जिरायत, बागायत व फळपिकांच्या प्रती हेक्टरी निफाड तालुका परिसरातील विंचूर, देवगाव, नांदूरमध्यमेश्वर व लासलगाव मंडळातील ५० गावांतील एकूण २५२७ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना  ४ कोटी १५ लाख ७० हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आली आहे.

तसेच येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी येथील ३७७ नुकसानग्रस्त ७८ लक्ष ७७ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

000

पावसाळ्यापर्यंत पुणेगांव दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरणाचे काम पूर्ण करा – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. 14 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा)  :- येवला तालुक्यातील सिंचनाच्या वाढीसाठी मांजरपाडा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाद्वारे येणारे पाणी पूर्ण क्षमतेने डोंगरगावपर्यंत पोहचण्यासाठी पुणेगाव व डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्याच्या आत पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून पुणेगाव डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामास २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या कामाला सुरुवात झाली आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी अंगुलगांव, न्याहारखेडे खु., नगरसुल येथे दरसवाडी डोंगरगांव पोहोच कालव्याची दुरुस्ती व अस्तरीकरण कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी नांदूरमध्यमेश्वर प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता संगीता जगताप, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, वसंत पवार, ज्ञानेश्वर शेवाळे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर, भाऊसाहेब धनवटे यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पुणेगाव ते दरसवाडी कालवा विस्तारीकरण, अस्तरीकरण कामात एकूण ६३ किमीसाठी ९६ कोटी इतक्या निधीची तरतूद आहे. तर दरसवाडी ते डोंगरगाव एकूण ८७ किमी अंतर विस्तारीकरण, अस्तरीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लक्ष रुपये मंजूर आहेत. पुणेगाव ते दरसवाडी या ९६ कोटी च्या कामात अस्तरीकरण, काँक्रीटीकण, पुल , कालव्याखालून जाणारे पाणी यासाठी एचपीडी सुविधा, नदीवरील पूल, कालव्यास गरजेनुसार संरक्षक भिंत, गेट आदी कामांचा समावेश आहे. या कामास सुरुवात करण्यात आली असून ३७ किमी ते ६३ किमी येथे मशीनने कालवा लेव्हल काम सुरू आहे. या कामासाठी कर्मचारी कॅम्प आणि प्लॅन्टचे काम सुरू आहे.

तसेच दरसवाडी ते डोंगरगाव या ८८ किमी च्या कामात विस्तारीकरण, काँक्रीटीकरण सह कातरणी शिवारात ३ पुल, बाळापुर, सावखेडे, कुसमडी, नगरसुल, न्याहारखेडे, अंगुलगाव, तळवाडे या गावांच्या शिवारात मागणीप्रमाणे प्रत्येकी १ पुल, कुसुर, हडपसावरगाव, वाईबोथी या गावांच्या शिवारात प्रत्येकी २ पुल, वाईबोथी व न्याहारखेडे येथील नदीवरील ये जा करण्यासाठीचे मोठे २ पुल, बंधारे भरण्यासाठीचे गेट व अनेक लहान कामे यात घेतलेले आहेत. या कामास सुरुवात करण्यात आली आहे. या कालव्याचे सात ठिकाणी एकाच वेळी काम सुरू आहे. या सातही ठिकाणी काँक्रिट प्लांट उभारण्यात आले आहे. तसेच यासाठी २२  एक्सव्हेटर व दहा पेव्हर मशीनसह सुमारे ७०० मजूर काम करत आहे. हे काम येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

000

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे साधणार कातकरी लाभार्थ्यांशी संवाद

ठाणे, दि.14(जिमाका):- प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत (PM JANMAN)सोमवार, दि.15 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.00 वाजता पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी देशातील आदिम जमातीच्या बांधवांशी थेट संवाद साधणार आहेत. ‍
ठाणे विभागातील जि. प. शाळा, खरीड, ता. शहापूर जि. ठाणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय वित्त व कार्पोरेट मंत्री ना.श्री.पियुष गोयल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना. श्री. कपिल पाटील, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री ना. श्रीम. अनुप्रिया पटेल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
तसेच आजी-माजी आमदार, विविध विभागाचे शासकीय वरिष्ठ अधिकारी, पोलीस यंत्रणा आरोग्य पथके व आदिम जमाती (कातकरी) समाज बांधवही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमामध्ये आदिम (कातकरी) समाजाच्या लाभार्थ्यांना विविध दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, उज्वला गॅस योजनेचे ‍साहित्य, तसेच घरकुल वाटपाचे आदेश, वैयक्तिक वनहक्क दावे मंजूरी आदेश, वैयक्तिकक बचतगटांना वनधन केंद्र मंजूरी आदेश,  बहुउद्देशीय केंद्र (PMC)  मंजूर आदेशांचे कातकरी लाभार्थ्याना वाटप करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आदिवासी विभागाचे अपर आयुक्त दीपककुमार मीना, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर जि. ठाणे चे   प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी केले आहे.
000

मुंबईमध्ये ‘आरोग्य आपल्या दारी’ अभियान राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १४ :- शासन आपल्या दारी या उपक्रमाप्रमाणे मुंबई मध्ये आरोग्य आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात  मुंबई महानगरपालिका आरोग्य विभाग प्रत्येक घरा घरात भेट देऊन आरोग्य आपल्या दारी मोहीम राबविणार आहे. या मोहिमेतून नागरिकांची मोफत आरोग्य  तपासणी करण्यात येऊन त्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले.

डीप क्लिन ड्राइव्हअंतर्गत आज  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिव वल्लभ छेद रस्ता, नाना – नानी उद्यान, नॅन्सी  कॉलनी, सावरकर नगर, दहिसर पूर्व, सिंह इस्टेट, मार्ग क्र. ०२ ठाकूर गाव, कांदिवली पूर्व, दफ्तरी मार्ग, मालाड पूर्व, तपोवन मालाड पूर्व येथे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ्ता मोहिमेत सहभाग घेतला.

या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  सिद्धेश कदम यांनी वडारपाडा, कांदिवली पूर्व येथे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराला भेट दिली. तदनंतर बुवा साळवी मैदान, दिंडोशी येथील  बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण केले.

स्वच्छ्ता मोहीम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत खासदार  गोपाळ शेट्टी, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार अतुल भातखळकर, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

स्वच्छता मोहीम व्यापक लोकचळवळ

स्वच्छता हा निरोगी जीवनाचा मूलमंत्र आहे.  स्वच्छतेचा हा मूलमंत्र राज्यातील प्रत्येक गावात, घरा-घरात पोहोचला पाहिजे यासाठी या स्वच्छ्ता मोहिमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राज्यात स्वच्छतेची गुढी उभारूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

मुंबईत राबविण्यात येत असलेल्या या स्वच्छता मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, सामाजिक संस्था, मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे. स्वच्छता मोहीम आता व्यापक लोक चळवळ बनली आहे असे गौरवोद्गार  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना काढले. लोकांनी हातात घेतलेली स्वच्छतेचे अभियान लोक चळवळ बनून यशस्वी होत आहे. या अभियानात यापुढे  सातत्य ठेवून प्रत्येकाने यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये देशात स्वच्छता मोहीम सुरू केली. त्याचे महत्त्व आता सर्वांना कळत आहे. ही चळवळ फक्त सरकारची नाही तर सर्व नागरिकांची झाली आहे. स्वच्छता अभियानात देशात महाराष्ट्राने उज्वल कामगिरी केली असून स्वच्छता अभियानाचा पुरस्कार देशाच्या राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते महाराष्ट्राला नुकताच मिळाला असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वच्छता अभियानामुळे प्रदूषणात घट

मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे  प्रदूषण कमी होत आहे. प्रदूषणाची पातळी 300 वरून 100 पर्यंत खाली आली आहे हे या अभियानाचे यश म्हणावे लागेल.  याचे सारे श्रेय मुंबईच्या सफाई कामगार व अभियानात सहभागी होत असलेल्या मुंबईकरांचे आहे. स्वच्छ्ता अभियान सतत चालणारे अभियान आहे. यापुढे या अभियानात सातत्य ठेवून  मुंबईत अर्बन फॉरेस्ट संकल्पना  राबविली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.           

ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना

आजच्या स्वच्छ्ता मोहीम दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजी आजोबा पार्क मध्ये ज्येष्ठ नागरिकांसमवेत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांकडून ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपला आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन अनेक योजना राबविल्या जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना सुरू करण्यात येत असून लवकरच या योजनेचा शासन निर्णय काढण्यात येईल.ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा प्राधान्याने मिळाव्यात यासाठी महापालिकेने त्यांच्या रुग्णालयात स्वतंत्र व्यवस्था सुरू करावी. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रे सुरू करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

कांदिवली पूर्व येथे मुख्यमंत्र्यांचा शिक्षक व जनतेशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉलेज समोरील सिंग इस्टेट रोड नं. २ ची पाहणी करून उपस्थित शिक्षक व जनतेची संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईत राबविण्यात येत असलेल्या डीप क्लीन ड्राईव्ह बाबत माहिती दिली. स्वच्छता हा आरोग्याचा मुलमंत्र घराघरात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या परिसरातील लोकांच्या घरा संदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्न संदर्भात आनंद महिंद्रा यांच्यासोबत बैठक घेऊन या प्रश्नातून मार्ग काढला जाईल. वन विभागाकडील प्रश्नाबाबत वनविभागाच्या सचिवांना योग्य त्या सूचना दिल्या जातील, असे  सांगून  शिक्षकांच्या प्रश्न संदर्भात ही बैठक घेतली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.

महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन

सिद्धेश कदम यांनी वडारपाडा कांदिवली येथील हनुमान मंदिर येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन या शिबिराचे उद्घाटन केले. या ठिकाणी लोकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून संयोजकांना त्यांनी धन्यवाद दिले.

मुंबईत २५०  आपला दवाखाने सुरू करणार

दिंडोशी येथील बुवा साळवी मैदान परिसरात  सुरू करण्यात आलेल्या  हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर त्यांनी या दवाखान्यातील नोंदणी कक्ष, चिकित्सा कक्ष, औषध निर्माता कक्ष, नर्सिंग रूम या  ठिकाणी भेट देऊन पाहणी केली व माहिती घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, सामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये यासाठी मुंबईत 250 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार असून आतापर्यंत 202 दवाखाने सुरू झाले आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लघु अग्निशमन केंद्राचे उद्घाटन आणि शारदाबाई गोविंद पवार गार्डनचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच  दहिसर पूर्व येथे हुनमान मदिरात मुख्यमंत्री महोदयांनी स्वच्छता केंली.

000

लोककला, परंपरा जोपासण्यासाठी ‘महासंस्कृती महोत्सव’ – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.१३ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृती, लोककला, परंपरेचे आदानप्रदान, संवर्धन, स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यवतमाळ येथे फेब्रुवारी महिन्यात पाच दिवसीय ‘यवतमाळ जिल्हा महासंस्कृती महोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे परिपूर्ण नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 राज्यात १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान महासंस्कृती महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यानुषंगाने यवतमाळ जिल्ह्यात या महोत्सवाच्या आयोजनाबाबत पालकमंत्री संजय राठोड आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, पोलीस अधीक्षक डॉ पवन बन्सोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री राठोड म्हणाले की, या महोत्सवात शासनाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करावे. या महोत्सवाची सुरवात बहुचर्चित ‘जाणता राजा’ कार्यक्रमापासून होणार आहे. महोत्सवातील कार्यक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. यवतमाळ हा आदिवासी, बंजाराबहुल जिल्हा असून आदिवासी समाजातील कोलाम,गोंड, प्रधान आदी जातींच्या लुप्त होत चाललेल्या परंपरा, लोककलांसाठी महासंस्कृती महोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करावे. या महोत्सवात शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, शासकीय यंत्रणेतील कलागुण असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहभागी करून घ्यावे. या महोत्सवाला ‘यवतमाळ महोत्सवा’चे स्वरूप मिळेल असे नियोजन करावे.

विविध समाजाच्या संस्कृती, रुढीपरंपरेची माहिती युवा पिढीला व्हावी यादृष्टीने कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी दिले. या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धां, व्याख्यानाचे संयुक्तिक आयोजन करावे. जिल्ह्यात अनेक लोककला सादर करणारे कलाकार आहेत. त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. कृषी, पर्यटन, मराठी भाषा आदी विभागाचे तसेच महिला बचत गटांचे स्टॉल्स उभारावे. विविध विभागाच्या उपक्रमांचा एक संयुक्तिक महोत्सव आयोजित करून यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करावे. हा महोत्सव शासकीय नसून सर्वांचा आहे यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी महासंस्कृती महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली. महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी डॉ आशिया यांनी यावेळी सांगितले.

000

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे

0
विधानसभा/विधानपरिषद निवेदन मुंबई दि. ८ : राज्य शासनाने १०० दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर दिनांक ०६ मे २०२५ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १५०...

विधानसभा लक्षवेधी

0
खारघर परिसरातील दारूबंदीचे निवेदन प्राप्त झाल्यास योग्य ती कार्यवाही करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ :  खारघर परिसरात प्रभागाकरिता दारूबंदी करण्याबाबत विहित प्रक्रियेनुसार...

 ‘दिलखुलास’ मध्ये मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या प्रमुख शुभांगी भुते यांची १०, ११, १२ व १४...

0
मुंबई, दि. ८: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात, 'हवामान अंदाज तंत्रज्ञान आणि प्रादेशिक हवामान केंद्राची कार्यपद्धती' या विषयावर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या...

संसदीय राजभाषा समिती सदस्यांकडून राज्यपालांची भेट

0
मुंबई, दि. ८: संसदीय राजभाषा समितीच्या ९ सदस्यांनी समितीचे निमंत्रक खासदार डॉ. दिनेश शर्मा (उ.प्र.) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन मुंबई...

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई दि. 7 : मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. महामार्गाच्या संदर्भात विधानभवनात...