मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 944

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आदिवासी जनजातींना मिळाला विकासाचा मार्ग – केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा

नांदेड (जिमाका) दि. 15 :- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही विकासाची संधी भेटली पाहिजे. त्यांच्या मुलभूत गरजा पूर्ण होतील अशा योजना साकारून त्यांना नवे मार्ग मिळावेत यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी ठेवली. त्यांनी आदिवासी क्षेत्राच्या विकासाचा एक व्यापक आराखडा तयार केला. यानुसार योजनांची अंमलबजावणी अचूक व्हावी यासाठी त्यांनी प्रशासनाला मार्गदर्शन केले. या प्रयत्नांमुळेच आज आदिवासी कुटुंबांना 1 लाख पक्की घरे, सुमारे 1 हजार 200 किमी एवढ्या एकुण लांबीचे जोडणारे रस्ते, 405 वनधन विकास केंद्राची निर्मिती, 450 मल्टीपर्पज केंद्र, 206 मोबाईल टॉवर्स, 906 अंगणवाडी केंद्र, आयुष्यमान भारत कार्ड, किसान सन्मान निधी आदी, आरोग्याच्या सुविधा व विविध प्रकारच्या योजना आदिवासी बांधवांपर्यंत यशस्वी पोहोचल्या असे प्रतिपादन केंद्रीय रसायन व उर्वरक आणि नवीन व नवीकरणीय उर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले.

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत किनवट येथील एनके गार्डनमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार भिमराव केराम, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, संबंधित विभाग प्रमुख यांची यावेळी उपस्थिती होती.

आदिवासी समाजामुळे या देशातील जंगल व वनसंपत्ती टिकून राहण्याला मोठी मदत झाली आहे. पिढ्यांपिढ्या आदिवासी बांधवांनी विविध नैसर्गिक आव्हानांना सहन करत जंगल राखली, झाडे वाढवली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. मातृभूमीसाठी भगवान बिरसा मुंडा लढले. त्यांच्या योगदानाला अधोरेखीत करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या जयंती दिनी आदिवासी गौरव दिन सुरू केला. संपूर्ण आदिवासी समाजाचा आत्मविश्वास या दूरदृष्टीपणामुळे वाढला. या देशातील वंचित असलेल्या 75 आदिवासी जमातींच्या हितरक्षणासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. भारतातील साडेतेरा करोड लोकांना दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याची किमाया शासनाने केली आहे. भारतातील 81 करोड गरीब लोकांना योजनांचा लाभ मिळाला आहे. सर्वांना पक्की घरे, पिण्याचे पाणी नळाद्वारे, प्रत्येक घराला वीज, शिक्षण, आरोग्य याची हामी देण्याचे धाडस व धैर्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले, असे गौरवोद्गार केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी काढले.

गोरगरीब, वंचित, आदिवासी घटकातील प्रत्येकाला पक्के घर भेटले पाहिजे हे स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिले. त्याला आकार दिला. अल्पवधितच करोडो लोकांचे स्वत:च्या घराचे स्वप्न त्यांनी घरकूल योजनेतून पूर्ण करून दाखविले, असे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. विविध विभागाचे नेतृत्व करतांना एक साधेपणाचा आदर्श केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी निर्माण करून दाखविला आहे. केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा हे सुद्धा साध्या जीवनशैलीचे प्रतीक असून देशातील प्रत्येक भागाच्या विकासासाठी त्यांनी दाखविलेली कटिबद्धता मोलाची आहे, असे त्यांनी सांगितले. वंचित घटकासाठी असलेल्या योजनांचे शतप्रतिशद लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष शिबिरे घ्यावीत, अशी सूचना खासदार हेमंत पाटील यांनी केली.

भारतातील 18 राज्य आणि केंद्रशासीत प्रदेश असलेल्या अंदामन-निकोबार द्वीपसमूह येथे सुमारे 22 हजारापेक्षा अधिक गावात राहणाऱ्या 75 प्रकारच्या जनजाती या कमजोर आहेत. त्यापैकी आपल्या किनवट आणि माहूर तालुक्यात कोलाम ही जमात आहे. या जमातीतील आदिवासींच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान हे महत्त्वपूर्ण असल्याचे आमदार भिमराव केराम यांनी सांगितले.

कोलाम जमातीतील 35 मुलींच्या खात्यावर 70 हजार रुपये प्रत्येकी वर्ग

कोलाम जमातीतील मुलींना शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या कुटूंबियांनी त्यांचे शिक्षण पूर्ण व्हावे यादृष्टिने मुलींसाठी 70 हजार रुपये मुदतठेव योजना कोलाम जमातीसाठी सुरू केली आहे. याचा उद्देश या मुदतठेव योजनेच्या लाभासह त्यांचे शिक्षणही विनाखंड सुरू राहावे, असा आहे. किनवट व माहूर तालुक्यातील कोलाम जमातीच्या 8 वी ते दहावी या वर्गात शिकणाऱ्या पात्र सर्व 35 मुलींना प्रत्येकी 70 हजार रुपये मुदत ठेवीचे धनादेश प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आले. याचबरोबर 11 वी व बारावीमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोलाम जमातीतील 5 मुलींना प्रत्येकी 48 हजार रूपयांचा शैक्षणिक साहित्य, संगणक व पुस्तके या स्वरूपात लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कोलाम जमाती करीता बहुउद्देशीय सभागृहाची भेट मिळाली. यात जवरला, काजीपोड व कोलामपोड येथे हे बहुउद्देशीय सभागृह मंजूर झाले. याचबरोबर इतर विभागाच्या योजनांचा प्रातिनिधिक स्वरूपात या कार्यक्रमात लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.

आदीकोलाम ॲपचे लोकार्पण

किनवट आणि माहूर तालुक्यात असलेल्या कोलाम जमातीतील सर्व माहिती एकत्रीत स्वरूपात गोळा व्हावी या उद्देशाने आदीकोलाम ॲपचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. मराठीत असलेल्या या ॲपमुळे कोलाम जमातीतील कौटुंबिक माहितीसह ते सध्या करत असलेली कामे, उपजिविकेची साधने, शिक्षण, आजूबाजूचा परिसर, घरांची रचना याची नेमकी वस्तुस्थिती आता तात्काळ गोळा होऊ शकेल. याबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांना दिली.

000

प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल

ठाणे,दि.15(जिमाका):- गेली अनेक वर्ष आदिवासी समाज हा समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिला आहे. मात्र त्यांनाही स्वयं विकासाचा हक्क आहे आणि म्हणूनच त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान” सुरू केले आहे. लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि लोक यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे अभियान यशस्वी करू, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, उपभोक्ता प्रकरणे, खाद्य, सार्वजनिक वितरण तथा वस्त्र मंत्री पियुष गोयल यांनी आज येथे व्यक्त केला.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत (PM JANMAN) आज सोमवार, दि.15 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशातील आदिम जमातीच्या बांधवांशी दूरदृष्यप्राणालीद्वारे संवाद साधला. याबाबतचा कार्यक्रम ठाणे विभागातील जि. प.शाळा, खरीड, ता. शहापूर जि. ठाणे येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री ना. श्री. कपिल पाटील, स्थानिक आमदार दौलत दरोडा, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त दीपककुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, आरोग्य उपसंचालक डॉ. अशोक नांदापूरकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर चे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप, सहायक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी संजय बागूल, इतर विभागांचे अधिकारी-कर्मचारी, आदिवासी लाभार्थी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री श्री.गोयल पुढे म्हणाले की, आदिवासी समाजाचे योगदान भारताच्या इतिहासात आणि विकासातही मोठे आहे. मात्र गेली अनेक वर्ष त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प केला आणि आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2023 रोजी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान सुरू केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गरीब, वंचित, शोषितांबाबत नेहमीच संवेदनशील असतात.समाजातील प्रत्येक गरजू, गरीब घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध होऊन ते अहोरात्र काम करीत आहेत. शासन शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासनाच्या लाभाच्या योजना पोहोचविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आपल्याला ठळकपणे दिसून येतात. देशातील प्रत्येक गरजू घटकाचा विकास घडवून आणणे, त्यांच्या जीवनात बदल घडवून आणणे, हाच ध्यास ठेवून केंद्रशासन युद्धपातळीवर काम करीत असल्याचे सांगून श्री.गोयल पुढे म्हणाले की, आपल्या देशाला विकसित देश म्हणून ओळख मिळवून द्यायची आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत संकल्पना देशभरात राबविली जात आहे. या उपक्रमात सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी आणि जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद व सहकार्य मिळत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील प्रत्येक गरजूला शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यात येत आहेत.
आज देशातील एक लाख आदिवासी बांधवांना पक्के घर मिळवून देण्यासाठी पहिला हप्ता त्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येत आहे, आपल्या सर्वांसाठी ही बाब अतिशय आनंदाची आहे. आदिवासी बांधवांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, असे सांगून श्री.गोयल यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे उदाहरण दिले. ते म्हणाले, भारताच्या सर्वोच्च पदावर आज एक आदिवासी महिला विराजमान आहे, याचा आपल्या संपूर्ण राष्ट्राला अभिमान आहे. नारी सन्मान, वंचितांचा, गरिबांचा, शोषितांचा सन्मान हाच विकसित भारताचा पाया आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, केंद्र शासनाने कातकरी उत्थान अभियानांतर्गत आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण 24 हजार कोटी निधीची तरतूद केली आहे. यातील एकूण 15 हजार कोटी केंद्रशासन देणार असून 8 हजार कोटी राज्याचा हिस्सा असणार आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्याला लाभ देण्यासाठी केंद्र शासन व राज्य शासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. हे शासन “प्यासा कुए के पास जाता है” … याच्या अगदी उलट काम करीत असून “कुआ प्यासे व्यक्ती के पास जा रहा है” … असे चित्र दिसत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येत असून त्याबाबत समाधान व्यक्त करून त्यांनी शासकीय यंत्रणांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यात कातकरी बांधवांसाठी जिल्हा प्रशासन कशा प्रकारे काम करीत आहे, त्यांना कोणते लाभ देण्यात येत आहेत, याविषयीची माहिती दिली व जिल्ह्यातील एकही गरजू लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 6 हजार 831 लाभार्थ्यांना विविध 13 शासकीय विभागांकडून लाभ देण्यात आले असून आजच्या कार्यक्रमात 270 जणांच्या बँक खात्यात पक्के घर बांधण्यासाठीच्या पहिल्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगड, मध्यप्रदेश, नाशिक आंध्रप्रदेश आणि झारखंड राज्यातील आदिवासी लाभार्थ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी, त्यांना मिळालेला लाभ, त्यांच्या अपेक्षा याविषयी जाणून घेतले. तसेच हे शासन गरिबांसाठी, वंचितांसाठी असून मी प्रधानमंत्री या नात्याने “मै गरीबो को पूछता भी हू और पूजता भी हू” असे सांगितले तसेच पक्क्या घरांसह गॅस शेगडी, वीज, पाणी, शौचालय यासारख्या मूलभूत सोयी-सुविधाही पुरविणार असल्याबाबत आदिवासी बांधवांना आश्वस्त केले.
या कार्यक्रमामध्ये आदिम (कातकरी) समाजाच्या लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले, जातीचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, उज्वला गॅस योजनेचे ‍साहित्य, तसेच घरकुल वाटपाचे आदेश, वैयक्तिक वनहक्क दावे मंजूरी आदेश, वैयक्तिक बचतगटांना वनधन केंद्र मंजूरी आदेश,  बहुउद्देशीय केंद्र (PMC) मंजूर आदेशांचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमाच्या वेळी एकलव्य रेसिडेन्सी स्कूल, शिरडन आणि शासकीय आश्रमशाळा, मढ च्या विद्यार्थ्यांनी बहारदार आदिवासी नृत्य सादर केले. सूत्रसंचालन डॉ.तरुलता सुनिल धानके यांनी केले.
000

२७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव ; ऑलम्पिक वीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्यातील पहिल्या क्रीडा दिनाला सुरुवात

नाशिक, 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) :- ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत देशाला पहिले पदक मिळवून देणारे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिन (15 जानेवारी) हा दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आज राष्ट्रीय युवा महोत्सवात राज्यातील पहिला क्रीडा दिन साजरा करण्यात येत असून यादिनानिमित्त राज्यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त युवाग्राम,  हनुमान नगर येथील सुविचार कक्षातील कार्यक्रमात आजचे प्रमुख अतिथी अभिनेता राहुल बोस यांच्या मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास दिवसे, नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील आदि  उपस्थित होते.

या खेळांडूचा करण्यात आला सत्कार
यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत, टेबल टेनिसपटू नरेंद्र छाजेड, हँडबॉलपटू साहेबराव पाटील, तलवारबाजी पटू अशोक दुधारे, अजिंक्य दुधारे, अस्मिता दुधारे, राजू शिंदे, व्हॉलीबॉल पटू आनंद खरे, अविनाश खैरनार, रोइंगपटू अंबादास तांबे, वैशाली तांबे, दत्तू भोकनाळ, कुस्तीपटू गोरख बलकवडे, पॅरा एशियन सुवर्णपदक प्राप्त खेळाडू दिलीप गावित, योग अभ्यासात गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या प्रज्ञा पाटील आदी पुरस्कारप्राप्त खेळाडूंचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

000

‘मुंबई फेस्ट‍िवल २०२४’ चे जपानच्या संसदेतील सदस्यांना निमंत्रण – पर्यटनमंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. १५ : ‘मुंबई फेस्टीवल २०२४’ चे २० ते २८ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन केले आहे या फेस्ट‍िवलचे जपानच्या संसदेतील सदस्यांना पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी निमंत्रण दिले.

चर्चगेट येथील ॲब्मेसिडर हॉटेल येथे वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी यांच्यासह सदस्यांनी भेट दिली. त्यावेळी पर्यटनमंत्री श्री. महाजन बोलत होते. यावेळी पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, वाकायामा प्रीफेक्चर संसदेचे स्पीकर हमागुची तैशी, भारत जपान मैत्रीसंघाचे अध्यक्ष निजीमा ताकेशी, भारत जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे संसदेतील उपाध्यक्ष फुजीयामा मासाकी, भारत जपान मैत्री प्रोत्साहन गटाचे प्रचार समितीचे उपाध्यक्ष हिरोइको युवात, सरचिटणीस तेसुया कवाबटा, कार्यकारी संचालक ताकेती सातो, संसद सदस्य होरी तास्तुओ, सदस्य अकीझुकी फुमीनारी, तोकीशा सुझुकी, मिसू टाकूया, आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशोओ, सचिव तिटाझुमे ताकाहिरो यावेळी उपस्थित होते.

पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, राज्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटन स्थळे देखील आहेत. राज्यातील गड किल्ले इतिहासाचे साक्ष देतात, जागतिक पर्यटकांना महाराष्ट्र माहिती व्हावा यासाठी नक्की राज्याला भेट द्यावी, असे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले. मुंबईची ही ओळख पर्यटकांना करून देण्यासाठी, दुबई शॉपिंग फेस्ट‍िवलच्या धर्तीवर ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन केले जात आहे. या फेस्ट‍िवलच्या माध्यमातून मुंबईच्या संस्कृतीची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ मिळणार आहे. या महोत्सवात महाएक्सपो, पर्यटन परिषद, शॉपिंग फेस्ट, काळा घोडा फेस्टीवल, बीच फेस्ट, योगा, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बीच क्लीन अप, मेरेथॉन, संगीत महोत्सव, क्रिकेट, साहसी क्रीडांचा देखील समावेश असल्याची माहिती जपान मधील सदस्यांना यावेळी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून राज्यात परदेशी पर्यटक यावेत त्याचप्रमाणे परदेशातही आपल्या पर्यटकांना जाताना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

 

‘रस्ता सुरक्षा’ मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप आणावे – मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. 15 : राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ता अपघातांमध्ये होत आहेत.  रस्ता अपघात टाळण्यासाठी रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे. राज्य शासन 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या एक महिन्यासाठी रस्ता सुरक्षा अभियान राबवित आहे. या अभियानाचा रस्ता सुरक्षा, वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती करून अपघात कमी करण्याचा उद्देश आहे. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप आणावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

रस्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी मार्गदर्शन करताना मंत्री श्री. भुसे बोलत होते. कार्यक्रमाला व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, परीवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया, अतिरिक्त महासंचालक (वाहतूक) सुखविंदर सिंग, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रविण पडवळ, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनचे नितीन डोसा उपस्थित होते.

रस्ता सुरक्षा हा विषय शालेय अभ्यासक्रमात असणे गरजेचे असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे म्हणाले की, रस्ता सुरक्षेचे संस्कार लहान वयातच बिंबविण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याचा विचार आता करावा लागेल. राज्यात होत असलेल्या अपघातांमध्ये 60 टक्के अपघात हे दुचाकीचे असतात. दुचाकी अपघात कमी करण्यासाठी हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्यात यावी. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे. अपघातग्रस्ताला उपचार देण्यासाठी नागरिक पुढे येत नव्हते. मात्र आता चित्र बदलत आहे. अनेक नागरिक पुढे येवून ‘गोल्डन अवर’ मध्ये उपचार देवून अपघातग्रस्तांचे प्राण वाचवित आहेत. रस्ता सुरक्षेबाबत उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार निधीची उपलब्धता होत आहे.

जिल्हा स्तरावर जिल्हा रस्ता सुरक्षा समिती कार्यरत आहे. त्यांच्या स्तरावर जिल्हा नियोजनमधून अपघात प्रवण स्थळे दुरूस्त करणे, जनजागृती आदींसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येत आहे. परिवहन महामंडळाप्रमाणे चालकांमध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी मोहिम राबवावी.  रस्ता सुरक्षा मोहिमेच्या पुढील वर्षीच्या कार्यक्रमात अपघातांचे प्रमाण यावर्षीच्या तुलनेत निश्चितच कमी होण्याची अपेक्षाही मंत्री श्री. भुसे यांनी व्यक्त केली.

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करावे – दीपक केसरकर

रस्ते वाहतूक नियमांचे पालन करीत शिस्तबद्ध वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल. अपघाताचे ठिकाण निश्चित करून त्या ठिकाणी जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबवावी. रस्ता सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.

परिवहन विभागामार्फत राज्य रस्ता सुरक्षा अभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती करावी. स्पीड गनचा वापर करून अतिवेगावर नियंत्रण आणावे, त्यामुळे निश्चितच अपघात कमी होतील. चालकांनी कटाक्षाने वाहतूक नियम पाळावेत.  नागरिकांना  शिस्त लागणे व अपघाताचे प्रमाण कमी होणे उद्दिष्ट असून दंडाची वसुली करणे  हे शासनाचे उद्दिष्ट नाही, असेही मंत्री श्री. केसरकर यांनी सांगितले.

परिवहन आयुक्त विवेक भीमनवार म्हणाले,  परिवहन विभाग 37 सेवा फेसलेस पद्धतीने देत असून या सेवांचा आतापर्यंत 68 लाख 61 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे. मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्यात आल्या आहेत. अपघात कमी करण्यासाठी विभाग अधिक प्रभावीपणे उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहे.

यावेळी मागील वर्षाच्या तुलनेत अपघातामध्ये लक्षणीय घट होण्यासाठी विशेष प्रयत्न केलेल्या मुंबई शहर आणि उपनगर, चंद्रपूर व नवी मुंबई येथील परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचा रस्ता सुरक्षेबाबत अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला.   तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या जीवनदूतांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. यामध्ये खोपोली जि. रायगड येथील गुरूनाथ रामचंद्र साठीलकर व विजय सुरेश भोसले, खालापूर जि. रायगड येथील मो. हनिफ कर्जीकर, वर्धा येथील वायरलेस विभागातील हवालदार शशिकांत गजबे, मोटार वाहन निरीक्षक कराड येथील  श्रीमती प्रसन्ना पवार यांचा समावेश आहे. मुंबई ते पुणे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण मागील वर्षाच्या तुनलेत 32 टक्के अपघात कमी केल्याबद्दल उप परिवहन आयुक्त भरत कळसकर, पनवेलचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल पाटील, पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांचा गौरव करण्यात आला आहे. यासोबतच सहा. परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, परिवहन उप आयुक्त (प्रशासन) संजय मैत्रेवार, परिवहन उप आयुक्त (संगणक) संदेश चव्हाण यांचा विशेष कामगिरीसाठी गौरव करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान रस्ता सुरक्षा पुस्तिका आणि वेस्टन इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशनच्या रस्ता सुरक्षा वार्षिक दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. उपस्थितांना रस्ता सुरक्षेबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मृण्मयी भजक यांनी, तर आभार प्रदर्शन अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमाला परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

इंटरसेप्टर वाहनांचा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ

रस्ता सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे वाहन असलेल्या इंटरसेप्टर वाहनांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी प्रधान सचिव पराग जैन – नैनुटीया उपस्थित होते. विभागाला 187 इंटरसेप्टर वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात 5 वाहनांना ताफ्यात दाखल करून घेण्यात आले.

००००

निलेश तायडे/विसंअ/

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ च्या आखणीसंदर्भात घेतला राज्यस्तरीय आढावा

मुंबई, दि. १५ :- राज्यातील प्रशासकीय विभागांनी वार्षिक कार्यक्रमांची आखणी करताना २५ वर्षानंतरच्या विकसित महाराष्ट्राचे चित्र डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम, योजना, उपक्रम प्रस्तावित करावेत. योजनांसाठी निधीची मागणी करताना कालबाह्य योजना रद्द कराव्यात. पुढील चार वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्यादृष्टीने महाराष्ट्र आर्थिक सल्लागार समितीने सूचविलेल्या प्राधान्यक्रमानुसार नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण, मृद व जलसंधारण, वस्त्रोद्योग, उच्च व तंत्रशिक्षण, ग्रामविकास, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, अन्न व औषध प्रशासन विभाग अशा नऊ विभागांच्या वार्षिक कार्यक्रम २०२४-२५ आखणीसंदर्भात राज्यस्तरीय आढावा घेतला. बैठकीस वस्त्रोद्योग, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील; ग्रामविकास व  पर्यटन मंत्री गिरीश महाजन; अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड; सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे; गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे उपस्थित होते.

विभागनिहाय योजनांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रशासकीय विभागांच्या माध्यमातून राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास करतानाच उद्योग, रोजगार-स्वयंरोजगार, कौशल्य विकास, पर्यटन यासारख्या क्षेत्रांच्या विकासावर भर द्यावा. शासकीय इमारती ३० ते ४० वर्षे जुन्या झाल्यानंतर लगेच त्या पाडून नव्या बांधण्याबाबत लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मागणी होते. रस्ते, इमारतींचे बांधकाम वर्षानुवर्षे टिकावे यासाठी बांधकामाचा दर्जा चांगला ठेवा, वेळच्या वेळी त्यांची देखभाल-दुरुस्ती करा, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा. यासाठी सीईओपी, व्हीजेटीआय, निकमार यासारख्या नावाजलेल्या संस्थांचे सहकार्य घ्यावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, शिष्यवृत्ती, गृहनिर्माण, पर्यटन यासारख्या एकाच विषयाच्या योजना विविध शासकीय विभागांमार्फत राबविण्यात येतात. या योजनांच्या अंमलबजावणीत समानता, समन्वय, एकसूत्रीपणा राखण्यासाठी त्या विषयाशी संबंधित विभागाने नोडल एजन्सी म्हणून काम करावे आणि संबंधित विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. त्यामुळे योजनांमधील द्विरुक्ती टाळता येऊन लाभार्थ्यांना गतिमान पद्धतीने लाभाचे प्रदान करता येईल. यादृष्टीने नियोजन करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव (व्यय) ओ.पी.गुप्ता, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, नियोजन विभागाचे सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण, बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) स.शं. साळुंखे, बांधकाम विभागाचे सचिव (इमारती) संजय दशपुते, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सचिव अंशु सिन्हा, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड आदींनी यावेळी विभागांच्या माहितीचे सादरीकरण केले.

०००

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कावनईच्या भारती व भाऊसाहेब रण यांच्याशी साधला संवाद

नाशिक, दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कावनई येथील रहिवासी व पिंप्री सदो येथील एकलव्य विद्यालयातील नववीतील विद्यार्थिनी कु. भारती रण व तिचे शिक्षक भाऊसाहेब रण यांच्याशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. निमित्त होते प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान अर्थात पी. एम. जनमन अंतर्गत योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी एकलव्य विद्यालयांचा लाभ घेऊन एकलव्य विद्यालयांच्या माध्यमातून त्यांची स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, आदिवासी सहकारी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, जिल्हाधिकारी जलज शर्मा,  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, नाशिक प्रकल्प अधिकारी जतिन रहमान, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, गट विकास अधिकारी सोनी नाखाडे यांच्यासह कावनईचे ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी कु. भारती रण व भाऊसाहेब रण यांना मिळालेल्या शैक्षणिक योजनांच्या लाभाबाबत विचारणा केली. तसेच पी. एम. जनमन अंतर्गत लाभ मिळालेल्या अन्य योजनांबद्दलही माहिती घेतली. त्यांनी सांगितले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एकलव्य विद्यालयांची संख्या वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी सुरू असलेल्या सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.


कातकरी समाजातील लाभार्थी गोकुळ देवराम हिलम मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेसह अंत्योदय रेशन कार्ड, वनधन योजनेंतर्गत वनधन केंद्राला मान्यता मिळाली आहे. त्यासाठी त्यांनी शासनाचे आभार मानले.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, अतिमागास भागातील आदिवासी बांधवाना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांच्या मुलांना उत्तम गुणवत्तेच्या शिक्षणासाठी एकलव्य विद्यालयाच्या माध्यमांतून प्रयत्न होत आहेत. विकसित भारत संकल्प यात्रेतून वंचितांपर्यंत योजना पोहोचविल्या जात आहेत. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. सिकलसेल आजारावर वेळीच औषधोपचार करून त्याबाबत जनजागृती करण्यात यावी. रामजन्म भूमी पूजनाच्या माध्यमातून मंदिर स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहचवून त्यासाठी सर्वांनी काम करावे, असेही त्यांनी आवाहन केले.

आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य: डॉ. विजयकुमार गावित

आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित म्हणाले की, पी. एम. जनमन महा अभियानाच्या माध्यमातून कमी वेळेत आदिवासी बांधवांना योजनांचा लाभ मिळत आहेत. आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. तसेच आवास योजनेचा निधी वाढवून देण्यासाठी देखील केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. घरकुल योजना 100 टक्के राबविण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कातकरी बांधवांचे स्थलांतर थांबवीत त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्याचा त्यांनी लाभ घ्यावा.

विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. झिरवाळ म्हणाले की, आदिवासी बांधवांसाठी राबविण्यात येणाऱ्या घरकूल योजनेचे उद्दिष्ट वाढवून मिळावे. प्रत्येक गरजूला घरकुलाचा लाभ मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त  केली. यावेळी आमदार हिरामण खोसकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. गावितांसह मान्यवरांच्या हस्ते मोबाईल युनिट व्हॅनला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तसेच मान्यवरांनी कपिलधारा मंदिर परिसराची स्वच्छता ही केली.

या लाभार्थ्यांना केले योजनांचे लाभ वाटप…..

MSEB नवीन विज कनेक्शन
भाऊसाहेब पांडुरंग रन, कल्पना आनंदा वाघ, नामदेव लक्ष्मण गावित, सुरेश खंडू वाघ, सखाराम देवराम मुकणे, पीएम किसान क्रेडिट कार्ड, ज्ञानेश्वर नामदेव वाघ, मंदाबाई बुधा हिलम, नारायण सोमा वाघ, अलका गंगाराम वाघ, एकनाथ पालू मुकणे

रेशनकार्ड वाटप
विठ्ठल देवराम हिलम, संतोष पांडुरंग रन, विलास नारयण रन, पिंटु पंढरी हिलीम, नारायण दामू रन, द्रौपदा भाऊ कवर, अंकुश किसन रन, प्रकाश पांडुरंग रन

जात प्रमाणपत्र वाटप
देवराम एकनाथ चौरे, रोहिदास भगवंत हिलम, दत्तु पांडु वाघ, विठ्ठल नामदेव हिलम, पद्मा शांताराम हिलम, बाळु भिवा हिलम, मंदाबाई बुधा हिलम, राजाराम बाळु वाघ, अलका शंकर दिवे, वसुंधरा पिंटु मुकणे

आयुष्यमान कार्ड वाटप
मनोहर आनंदा वाघ, सोनाली अंकुश रन, कमल पांडुरंग हिलम, फुलाबाई एकनाथ मुकणे, किसन सोमनाथ, दिवे, सविता विठ्ठल वाघ

पी. एम. सन्मान निधी योजना लाभ
पप्पु नाना पवार, सान्याबाई लक्ष्मण वाघ, किसन सोमा हिलम, हरी सिताराम वाघ, वामन झिपा मुकणे

000

प्रधानमंत्री जनमन महाअभियानाचे उद्घाटन; केळापूरमधील धारणा येथून जिल्ह्यात महाअभियानाला सुरुवात

यवतमाळ, दि. १५ : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय (पीएम जनमन) महाअभियान देशभरात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील या महाअभियानाचे उद्घाटन केळापूर तालुक्यातील धारणा येथे प्रधानमंत्र्यांच्या दुरदृष्य उपस्थितीत करण्यात आले.

या महाअभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आमदार प्रा.डॅा.अशोक उईके, आमदार डॉ.संदीप धुर्वे,  जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक याशनी नागराजन, प्रकल्प संचालक आत्माराम धाबे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या मंजूर लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संवाद साधतांना या अभियानाची माहिती दिली. तसेच आदिवासी समाजातील संस्कृती, लोककलेचे कौतूक केले. केंद्र सरकारने या अभियानासाठी सुमारे २३ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गेल्या दोन महिन्यात देशभरातील अनेक अतिमागास आदिवासी बांधवाना किसान कार्ड, आयुष्मान कार्ड, वनपट्टे आदी लाभ देण्यात आले. आदिवासींना हक्काचे पक्के घर बनविण्यासाठी देशभरात एक लाख लोकांना आज अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यांना घरासाठी २.५० लाख रूपये दिले जात आहे. या घरासोबत वीज, पाणी, शौचालय, गॅस या सुविधा मिळणार आहे.

प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत सरकार पोहोचेल. एकही आदिवासी बांधव योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी संवाद साधताना दिली. यावेळी योजनांच्या माध्यमातून परिवर्तन घडविणाऱ्या लाभार्थ्यांसोबतही त्यांनी संवाद साधला.

आमदार डॉ.संदीप धुर्वे मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, प्रधानमंत्री जनमन महाअभियानाला मूर्त स्वरुप देण्यासाठी प्रशासनाने काम करावे. प्रत्येक गावात शिबीर आयोजित करुन आदिवासींना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. हे महाअभियान यशस्वी करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी आ.डॅा.अशोक उईके यांनीही हे महाअभियान यशस्वीपणे राबवावे, असे सांगितले.

गेल्या एका महिन्यात जिल्ह्यातील कोलाम आदिवासी भागात सुमारे १६० शिबीरे आयोजित करुन २० हजार नवीन आयुष्मान कार्ड, ५०० नवीन आधार कार्ड वितरित करण्यात आले. १५०० आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले. जिल्ह्यात जवळजवळ एक लाख कोलाम आदिवासी लोकसंख्या आहे. मागील दोन महिन्यात याचा सर्वे करण्यात आला असून त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्प संचालक याशनी नागराजन यांनी दिली.

प्रधानमंत्र्यांनी साधला लाभार्थीसोबत संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दि.१५ नोव्हेंबर २०२३ रोजी झारखंडच्या खुंटी गावातून जन जातीय गौरव दिनी प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (जनमन) सुरु केले आहे. या अभियांनांतर्गत पंतप्रधानांनी देशभरातील आदिवासी बांधव, महिला व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपूरी येथील विद्यार्थ्यांसोबत त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यात केळापूर तालूक्यातील धारणा या गावातून आमदार संदीप धुर्वे, आमदार डॅा. अशोक उईके यांच्यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, आदिवासी बांधव आणि विविध योजनांची लाभार्थी मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.

०००

युवक-युवतींनी लोकनृत्यातून घडविले सांस्कृतिक एकतेचे दर्शन

नाशिक, दि. 15 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक येथे सुरु असलेल्या 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात आज चौथ्या दिवशी महाकवी कालिदास कलामंदिरात विविध राज्यातील युवक-युवतींनी लोकनृत्यातून आपापल्या भागातील लोकनृत्य, संस्कृती आणि सभ्यतेचे दर्शन घडविले. आसामच्या युवक युवतींनी सादर केलेल्या बिहू नृत्याला उपस्थित दर्शकांनी भरभरुन दाद दिली.

नाशिक येथे 12 जानेवारीपासून 27 वा राष्ट्रीय युवा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात आज सकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात विविध राज्यातून आलेल्या युवकांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात सामूहिक व वैयक्तिक लोकनृत्य सादर केली. यावेळी केंद्रीय युवक कल्याण विभागाच्या संचालक विनिता सूद, स्पर्धेचे समन्वयक परमजित सिंह, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील उपस्थित होते.

आज सकाळच्या सत्रात आसाम, केंद्र शासित प्रदेश लडाख, जम्मू आणि काश्मीर, सिक्कीम, नागालँड, केरळ, हरियाणा या राज्यातील युवक – युवतींनी लोकनृत्य सादर केली. आसामच्या अप्सरा शिलंग हिने उत्कृष्ट अदाकारी सादर करीत वैयक्तिक बिहु नृत्य सादर केले. बिहू नृत्य हे आसाम राज्यातील प्रमुख लोकनृत्य आहे. आसामचे वैशिष्ट्य आणि संस्कृती असलेल्या बिहू उत्सवांच्या काळात हे नृत्य केले जाते. रोंगाली बिहू, काटी बिहू, माघ बिहू या उत्सवांच्या काळात बिहू नृत्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

लडाख बॅगस्ट नर्चेस नृत्य सादर केले. या नृत्याच्या माध्यमातून युवतींनी लडाखची प्राचीन संस्कृती, सभ्यता आणि आपल्या परंपरेचे दर्शन घडविले. त्यापाठोपाठ निसर्ग सौंदर्याने नटलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या युवतींनी लोकनृत्य सादर करीत आपल्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.  कुलदेवता, देवी-देवता यांची आराधना या नृत्याच्या माध्यमातून केली जाते. जम्मू आणि काश्मीरच्याच किश्तवाड जिल्ह्यातील नितेश शर्मा याने पाडरी हे आगळे-वेगळे लोकनृत्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली.

सिक्कीम, नागालँड, केरळ, हरियाणाच्या युवक – युवतींनी सामूहिक आणि वैयक्तिक नृत्य सादर करीत आपापल्या राज्याच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. मयंक झा यांनी सूत्रसंचालन केले.

राष्ट्रनिर्माण आणि देशाच्या प्रगतीत युवकांचे योगदान मोलाचे – केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक

राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४ 

 

नाशिक, 15 जानेवारी, 2024 (जिमाका) : संपूर्ण जगामध्ये भारत देशाची ओळख ही ‘युवकांचा देश’ म्हणून आहे. आज आपल्या देशाने सर्वच क्षेत्रात विकासाचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासाच्या दृष्टीने देशात आमूलाग्र बदल घडून येत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचा प्रभाव निर्माण झाला आहे. तसेच राष्ट्रनिर्माण आणि देशाला पुढे घेऊन जाण्यात युवकांचे मोलाचे योगदान आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी पुरस्कार सोहळ्या प्रसंगी काढले.

27 व्या ‘राष्ट्रीय युवा महोत्सवात’ केंद्र सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा विभागामार्फत देशसेवा तसेच समाजसेवा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवकांना तसेच स्वयंसेवी संस्थांना महायुवाग्राम हनुमाननगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात
केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या हस्ते ‘राष्ट्रीय युवा पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. यावेळी युवा मंत्रालय संचालिका विनिता सूद, अवर सचिव धर्मेंद्र यादव, क्रीडा आयुक्त डॉ. सुहास धिवसे, नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, अर्जुन पुरस्कार विजेती धावपटू कविता राऊत यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त देशात दरवर्षी राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने देशात राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदाचा राष्ट्रीय युवा महोत्सव साजरा करण्याचा मान महाराष्ट्र राज्याला मिळाला. प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच ज्योर्तिलिंग त्र्यंबकेश्वर महाराजांच्या नाशिकच्या या भूमीत महोत्सवानिमित्ताने मला यायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना युवकांप्रती अतिशय प्रेम आहे. युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांना सन्मानित करण्याची कल्पना देखील त्यांनीच मांडली होती. अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच युवकांना प्रेरणा देऊन मार्गदर्शन केले आहे. देशाच्याप्रती सेवाभाव असणाऱ्या आणि समाजसेवेसाठी उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 युवक आणि दोन संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान आज करण्यात येत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे. देश सेवा आणि सामाजिक क्षेत्रात अमुलाग्र काम करणाऱ्या युवकांचे मी या निमित्ताने आभार मानतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, असेही राज्यमंत्री श्री.प्रामाणिक म्हटले.


महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या या २७ वा राष्ट्रीय युवा महोत्सव देशातील युवकांसाठी प्रेरणेचा स्त्रोत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात ‘विकसित भारत २०४७’ ही संकल्पना विकसित करण्यासाठी तसेच  ‘सक्षम युवा, समर्थ भारत’  या संकल्पनेतून देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातूमन शपथ घेवूया, असेही यावेळी केंद्रीय राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी उपस्थित युवकांना आवाहन केले.

राष्ट्रीय युवा पुरस्काराने या युवकांचा झाला सन्मान (वर्ष-2020-2021)

◼️अधि दैव (१७), गुरुग्राम, हरियाणा
◼️अंकित सिंह (२९), छत्तरपूर, मध्य प्रदेश
◼️बिसाठी भरत (२८), अनंतपुरम, आंध्र प्रदेश
◼️ केवल किशोरभाई पावरा (२७) बोटाद, गुजरात
◼️पल्लवी ठाकुर (२६), पठाणकोट, पंजाब
◼️प्रभात फोगाट (२५), झज्जर, हरियाणा
◼️राम बाबू शर्मा (२८), जयपूर, राजस्थान
◼️रोहित कुमार (२९), चंडीगड
◼️ साक्षी आनंद (२६), पाटणा, बिहार
◼️ सम्राट बसाक (२८), धलाई, त्रिपुरा
◼️सत्यदेव आर्य (३०), बरेली, उत्तर प्रदेश
◼️वैष्णवी श्याम गोतमारे (२६), अकोला, महाराष्ट्र
◼️विधी सुभाष पलसापुरे (२६), लातूर, महाराष्ट्र
◼️विनीशा उमाशंकर (१७), तिरुवन्नामलाई, तमिळनाडु
◼️विवेक परिहार, उधमपूर, जम्मू-कश्मीर

या स्वयंसेवी संस्थांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने झाला सन्मान (वर्ष-2020-2021)

◼️शक्ती विकास बहुद्देशीय संस्था, नाशिक, महाराष्ट्र
◼️ युनिफाईड रूरल डेव्हलपमेंट ऑर्गेनायझेशन, थौबल, मणिपूर

पुरस्काराचे स्वरुप :-
यावेळी राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त युवकांना वैयक्तिक पुरस्कारात एक लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच युवक संस्था मध्ये तीन लाख रुपये, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

000

ताज्या बातम्या

सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ : विद्यार्थी हितासाठी निर्णय

0
मुंबई, दि. 8 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी तीन दिवस मुदतवाढ आणि...

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई, दि. ८ : भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश असून भारतीय राज्यघटना अद्वितीय आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या...

फनेल झोनमधील रखडलेल्या इमारतींचा लवकरच पुनर्विकास – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

0
मुंबई, दि. ८ : फनेल झोनमध्ये उड्डाण मर्यादा आणि विविध तांत्रिक कारणांमुळे या भागातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडलेला आहे. मुंबईतील विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येणाऱ्या आणि...

बीड जिल्ह्यात परळी येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

0
मुंबई, दि. 8 : बीड जिल्ह्यातील परळी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या औष्णिक वीज केंद्रात आणखी वीज निर्मिती संच वाढविण्याची बाब तपासली असता ती व्यवहार्य नसल्याचे निदर्शनास आले...

विधानसभा लक्षवेधी

0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही - उद्योगमंत्री उदय सामंत मुंबई दि. ८ :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये  कोणत्याही नागरिकावर अन्याय...