सोमवार, ऑगस्ट 18, 2025
Home Blog Page 89

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

मुंबई, दि. ११ : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे. हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा व ऐतिहासिक क्षण ठरला आहे.

या मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) यांचा समावेश होता.

‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या “अद्वितीय वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value)” या निकषांवर हे किल्ले खरे उतरले. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

शासनाचा पुढाकार आणि व्यापक सहकार्य

या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकारमार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाने युनेस्कोकडे पाठविण्यासाठी निवडला होता.

या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली यांनी या १२ किल्ल्यांची स्थळ भेट घेतली आणि जिल्हाधिकारी व वनविभागांनीही सहकार्य केले.

राजकीय नेतृत्वाचे प्रभावी योगदान

या मानांकनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या महानिदेशकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि , पुरातत्व संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी यांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.

शौर्य, वारसा आणि पर्यटनाला चालना

हे मानांकन केवळ ऐतिहासिक किल्ल्यांचे गौरवगान नाही, तर पर्यटन, संशोधन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णायक टप्पा आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य, स्थापत्य परंपरा आणि स्वराज्यरचना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झाली आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. ‘युनेस्को’चा दर्जा हा त्या ऐतिहासिक समृद्धतेला जागतिक मान्यता देणारा आहे.” असे मत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले आहे.

000

संजय ओरके/विसंअ/

मानखुर्द महामार्गालगतच्या रहिवाशांचे ‘एसआरए’मार्फत सर्वेक्षण करून पुनर्वसन करावे – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. 11 : सायन- पनवेल महामार्ग हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग आहे. यामध्ये मानखुर्द परिसरात या महामार्गाच्या हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम करून नागरिक राहत आहेत. त्या जमिनीचे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) च्या मार्फत सर्वेक्षण करून त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोंसले यांनी दिले.

सह्याद्री मित्र मंडळ चाळ कमिटी, महात्मा फुले नगर (शिंदेवाडी), यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय महामार्ग, मानखुर्द, मुंबई येथील रहिवाशांच्या समस्यांबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विधानभवनातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्री श्री. भोसले यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील विशेष राज्य महामार्ग मानखुर्द परिसरातून जातो. या महामार्गाच्या हद्दीत अनेक अनधिकृत झोपड्या, गाळे व बांधकामे आढळली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही अतिक्रमणे निष्काषित करण्यात आली आहेत. गरीब आणि विस्थापित झालेल्या नागरिकांना न्याय मिळावा या दृष्टीने या जागेचे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत करून पुनर्वसनाची प्रक्रिया शासनाच्या धोरणानुसार सुरु करण्यात यावी.

बैठकीस आमदार सना मलिक शेख, सचिव संजय दशपुते, उपसचिव प्रज्ञा वाळके, अवर सचिव सुधीर शिंगाडे आदिसह अधिकारी उपस्थित होते.

OOO

 

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी अर्जाची पडताळणी करून घ्यावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

मुंबई, दि. ११ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. उमेदवारांनी वेळेत अर्ज पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज पडताळणी प्रक्रिया निश्चित कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे. यानंतर संबंधित अभ्यासक्रमांची तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांनी यादीतील स्वतःची माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी. तसेच, यादीत काही त्रुटी आढळल्यास तक्रार निवारणासाठी तीन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पडताळणी (E-Scrutiny Centre) चा पर्याय निवडलेला आहे, त्यांनी आपली हरकती संबंधित दस्तऐवजासह स्वतःच्या लॉगिनद्वारे नोंदवाव्यात. त्यानंतर उमेदवाराचा अर्ज सुधारणा करण्यासाठी “अनलॉक” करण्यात येईल. उमेदवाराने आवश्यक दस्तऐवज अपलोड करून अर्ज संपादित (Edit) करून पुन्हा सादर (Submit) करावा.

ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष पडताळणी केंद्राचा (Scrutiny Centre) पर्याय निवडला आहे, त्यांनी आवश्यक हरकती असल्यास मूळ प्रमाणपत्रांसह केंद्रावर जाऊन आपली त्रुटी दूर करावी.

वैध हरकती, दावे व त्रुटी यांचा विचार अंतिम गुणवत्ता यादीत (Final Merit List) घेण्यात येईल, अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही हरकतीचा स्वीकार केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया अचूक पूर्ण करावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

विद्यार्थी हितासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश नोंदणीस १४ जुलै पर्यत मुदतवाढ – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. ११ : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता बी.ई./बी.टेक तसेच एमबीए/एमएमएस या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक ११ जुलै २०२५ होती. आता मुदतवाढ देऊन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, काही उमेदवार, पालक तसेच शैक्षणिक संस्थांनी वैयक्तिक भेटीद्वारे, ई-मेल तसेच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून, नोंदणीसाठी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या भवितव्यास प्राधान्य देऊन बी.ई./बी.टेक आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मुदतवाढ अंतिम असून यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, याची सर्व उमेदवार, पालक  आणि शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही मंत्री श्री.पाटील यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

गणेश मंडळांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. ११ : मुंबईत साजरा होणारा गणेशोत्सव जगप्रसिद्ध असून, हा उत्सव अविस्मरणीय साजरा करणार आहोत तसेच गणेश मंडळ आणि भक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेऊ, असे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले. मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका डी विभाग कार्यालयात गणेश मंडळांसोबत समन्वय बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे उपायुक्त मनीष वळंजू, वरिष्ठ पोलीस अधिकारी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सचिव गिरीश वालावलकर तसेच गणेश उत्सव मंडळांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा यांनी उपस्थित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्या समस्यांचे निवारण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. गणेश मूर्तींचे आगमन आणि विसर्जन यादरम्यान होणारी वाहतूक कोंडी तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने, पार्किंग केलेल्या वाहनांना त्वरित हटवून रस्ते मोकळे करण्याच्या सूचनाही त्यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या. दरवर्षीप्रमाणे वन विंडो प्रणालीच्या माध्यमातून मंडळांना विविध प्रकारच्या ऑनलाईन परवानग्या देण्यास विलंब होऊ नये याची काळजी महापालिका अधिकाऱ्यांनी घ्यावी. भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, बसण्याची जागा या सर्वच आवश्यक सोयींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन तत्पर आहे, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा मिळाला असून, यावर्षीपासून अनोख्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार आहे. मुंबई महापालिका, बेस्ट प्रशासन आणि पोलीस विभागाच्या सहकार्याने दक्षिण मुंबईत ताडदेव, गिरगाव, वाळकेश्वर, खेतवाडी आणि लेमिंग्टन रोड परिसरात वैविध्यपूर्ण सजावट करण्याचे सुद्धा नियोजन आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर समितीही स्थापन करण्यात येत आहे. या न्यायालयाने दिलेले निर्देश आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करून हा उत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा, असे आवाहनही श्री.लोढा यांनी यावेळी केले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

८.२६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

मुंबई, दि.११ : महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.२६ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ अदत्त शिल्लक रकमेची  ११ ऑगस्ट, २०२५ पर्यंत देय असलेल्या व्याजासह १२ ऑगस्ट, २०२५ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल, असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर  १२ ऑगस्ट, २०२५ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४ (३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत्त समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाद्वारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ८.२६% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.

रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाद्वारे त्याचे प्रदान करील,असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रात नमूद केले आहे.

०००

प्राथमिक तपासणी करून मतदान यंत्र सज्ज ठेवावीत – राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई, दि. 11 : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी आवश्यक ती सर्व प्रकारची पूर्वतयारी करून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी करण्यात यावी व ती मतदानासाठी सज्ज करावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले.

महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांच्या प्राथमिक तयारीसंदर्भात विभागीय आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांच्यासह आयोगाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

श्री. वाघमारे म्हणाले की, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीबाबत आतापासूनच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टळू शकेल. मतदार संख्या, मतदार केंद्र, उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळ इत्यादींची आपल्या स्तरावरील उपलब्धता लक्षात घ्यावी. मतदान यंत्रांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतर आवश्यक संख्येचा अंदाज घेता येईल. मनुष्यबळाबाबत विभागीय आयुक्तांनी समन्वयकाची भूमिका घेऊन सर्व महानगरपालिका आयुक्तांसोबत वेळोवेळी आढावा घ्यावा. सर्व संबंधितांशी समन्वय आणि नियोजनपूर्वक तयारी केल्यास आपल्याला या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडणे सहज शक्य होईल.

श्री. काकाणी म्हणाले की, मतदाराची संख्या लक्षात घेऊन मतदान केंद्रांची अचूक संख्या निश्चित करता येईल. त्या आधारे पुढील नियोजन करणे सुलभ होईल. मतदान केंद्राचा अचूक अंदाज आल्यावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांच्या आवश्यकतेबाबतही नियोजन करता येईल. मनुष्यबळाचाही अंदाज येईल. विभागीय आयुक्तांच्या समन्वयातून आजुबाजूच्या जिल्ह्यातील मनुष्यबळ उपलब्ध करून घेता येईल. एकूणच तयारीबाबतची सर्व तपशीलवार व अद्ययावत माहिती तयार ठेवावी. त्याबाबत वेळोवेळी आढावा घेण्यात येईल. त्यावेळी ही माहिती सादर करावी.

0-0-0

जगदीश मोरे/ज.सं.अ./रा.नि.आ./

दिल्लीचे अन्न व नागरी मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी घेतली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि. ११ : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्लीचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी विधानभवनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या विविध योजना, त्यांची अंमलबजावणी, तसेच योजना प्रभावीपणे राबविण्या संदर्भात श्री.सिरसा यांनी ‘आनंदाचा शिधा’, ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘शिवभोजन थाळी योजना’ यांसारख्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांची माहिती घेतली.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे स्वरूप, उद्दिष्टे, लाभार्थ्यांची संख्या, तसेच या योजनांमुळे गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मिळणाऱ्या मदतीबाबत सविस्तर माहिती दिली. विशेषतः महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेच्या माध्यमातून राज्यात महिलांना आर्थिक व सामाजिकदृष्टया सक्षम करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवभोजन थाळी उपक्रमामार्फत अल्पदरात सकस भोजन देऊन गरजू नागरिकांना मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

दोन्ही राज्यांमध्ये अन्न व नागरी पुरवठा क्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण करून परस्पर सहकार्य वाढवण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच भविष्यात एकमेकांच्या योजनांमधील चांगले घटक समजून घेऊन त्याची अंमलबजावणी अन्य राज्यांमध्ये देखील कशी करता येईल, यावर चर्चा झाली.

यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल उपस्थित होत्या.

०००००००

राजू धोत्रे/विसंअ

जलसंधारणात लोकसहभाग महत्त्वाचा – मंत्री संजय राठोड

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी धोरणात्मक सहकार्याच्या दिशेने ठाम पाऊल

मुंबई, दि. ११ : राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच धोरणात्मक सहकार्याच्या उद्देशाने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शन केले.

यावेळी सचिव गणेश पाटील, मृद व जलसंधारण विभागाचे उपसचिव मृदुला देशपांडे,  मुख्य कार्यकारी अधिकारी रणदिवे उपस्थित होते. बैठकीला अपर्णा पाठक, कोमल धस, शिरीष कुलकर्णी, रमेश भिसे, संतोष राऊत, लतिका राजपूत, अरुण शिवकर, मंगल कुलकर्णी, कल्पेश कुलकर्णी, अश्लेषा खंडागळे, तसेच सुनिता मोरे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड म्हणाले, दुष्काळमुक्त महाराष्ट्र हे आपले सामूहिक ध्येय असले पाहिजे. जलसंधारणात लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जलसंधारणाच्या योजनांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी काही ठोस उपाय सुचवले. काम करू इच्छिणाऱ्या संस्थांसाठी आपण छोटे युनिट तयार करणे. विश्वासार्ह स्वयंसेवी संस्थांना कामात सहभागी करुन घेण्याबरोबरच जल व मृदसंधारण क्षेत्रात आदर्श काम करणाऱ्या गावांची सादरीकरणे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले. राज्यभरातील कार्यरत स्वयंसेवी संस्थांसाठी एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्याचा प्रस्तावही डॉ. गोऱ्हे यांनी मांडला.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या. सामाजिक संस्थासाठी नियमावली बनवून सर्वसमावेशक धोरण ठेवावे. त्यामध्ये लाडकी बहिणी, एकल महिला यांना जल व मृदसंधारणाच्या कामात सहभागी करून घेण्यात यावे. यामुळे त्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त होईल, असे त्या म्हणाल्या.

भटक्या व विमुक्त समाजासाठी विशेष उपक्रम तयार करून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर देण्यात यावा. याशिवाय, चौथ्या महिला धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करताना, त्यानुसार विभागाची योजना व धोरणे तयार करावीत, असेही त्या म्हणाल्या.

क्रियान्वयन, मूल्यांकन आणि लोकसहभाग या तीन मुख्य मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे. पावसाचे प्रमाण, भूजल पातळी, शाश्वत सिंचन योजना आणि गावस्तरावर महिला पाणी समित्यांचा सहभाग यावर भर देण्याचेही बैठकीत निश्चित करण्यात यावे.

0000000

चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी

मुंबई, दि. 11 : चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर आयात होत असून यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात तत्काळ थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी पत्र लिहून केंद्र सरकारकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहिले असून महाराष्ट्रातील आणि देशातील द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले आहे. चीनमधून निकृष्ट दर्जाच्या बेदाण्यांची बेकायदा आयात वाढली आहे. आयात कर आणि शुल्क चुकवून बेदाणे मोठ्या प्रमाणावर भारतात आणले जात आहेत. या करचोरीमुळे शासनाचा महसूल बुडत असून देशाच्या महसुलाचे नुकसान होत आहे. ऐन हंगामात होत असलेल्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या बेदाण्यांचे दर प्रतिकिलो शंभर ते सव्वाशे रुपयाने घसरले आहेत. याचा फटका द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांना बसला असून त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. हे टाळण्यासाठी केंद्र सरकारमार्फत तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात. बेकायदा आयात व विक्री थांबवण्यासाठी कठोर कारवाई करावी. आयात होणाऱ्या बेदाण्यांचा दर्जा तपासण्यासाठी तसेच करवसुली योग्य, अचूक होण्यासाठी बंदरे, विमानतळ, बाजारपेठांच्या ठिकाणी तपास व करवसुली यंत्रणा कार्यक्षम करावी. ऐन हंगामात बाजारातील बेदाण्यांचे दर स्थिर राखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ कराव्यात, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराजसिंह चौहान तसेच केंद्रीय व्यापारमंत्री पियुष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष उत्पादक संघ-पुणे यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे त्यांचे लक्ष वेधले होते तसेच हा प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले आहे.

—–०००००००—-

ताज्या बातम्या

जनसंवादद्वारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या

0
नागपूर दि. १७: महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमात वृद्ध, महिला, विद्यार्थी, दिव्यांग, तृतीय पंथी अशा समाजाच्या सर्व थरातील जनतेच्या...

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई

0
शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता सोहळा कोल्हापूर, दि. १७: राज्याच्या सीमेवरील दुर्गम भागातील सर्वसामान्य...

जळगावच्या मेडिकल हबची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

0
जळगाव दि. १७ (जिमाका):  जळगाव- छत्रपती संभाजीनगर रोडवरील चिंचोली शिवारात 66.27 एकर क्षेत्रावर उभारण्यात येत असलेल्या भव्य मेडिकल हबची पाहणी आज उपमुख्यमंत्री अजित पवार...

येत्या बजेटमध्ये जिल्ह्याला निधी देणार वाढवून – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
जळगाव जिल्ह्यातील उद्योगांनाही मराठवाडा, विदर्भासारख्या सवलती देणार तीन दिवसातील अतिवृष्टीच्या पंचनाम्याचे आदेश जळगाव दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): आपण प्रत्येक जिल्ह्यात गेल्यानंतर त्या जिल्ह्यात जिल्हा...

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन

0
कोल्हापूर, दि. १७ (जिमाका): सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इमारतीचे उद्घाटन व कोनशिला अनावरण करण्यात आले. या ऐतिहासिक...