रविवार, जुलै 13, 2025
Home Blog Page 880

श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कलावंत हरपला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमीन सयानी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २१ : ज्येष्ठ रेडीओ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने आपल्या आवाजाने श्रोत्यांच्या मनावर अधिराज्यकरणारा कलावंत हरपला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, आमची पिढी ही रेडीओवरील अमीन सयानी यांचा आवाज ऐकतच मोठी झाली. त्यांच्या बिनाका गीतमाला या कार्यक्रमाने अनेक विक्रम रचले. या गीतमालेतील गाण्यांबरोबरच अमीन सयानी यांचा आवाज ऐकण्यासाठी रसिक आतुरतेने या कार्यक्रमाची वाट पहात असत.  त्यांनी अनेकांना आपल्या आवाजाचा वापर कसा करावा याचेही मार्गदर्शन केले. त्यांच्या आवाजामुळे, त्यांच्या निवेदनाच्या शैलीमुळे अनेकांनी आपल्या निवेदनात बदल केले. त्यांच्या निवेदनाची शैली असलेली निवेदकांची एक पिढी तयार झाली. भाषेवर प्रेम करायला त्यांनी शिकविले. त्यांच्या निधनाने एक थोर निवेदक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद कुटुंबियांना मिळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने रेडिओच्या इतिहासातील सुवर्णअध्याय संपला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 21 :- “रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट, ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओच्या सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे. रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात अमिन सयानी यांनी १९५२ ते १९९४ अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली. त्यांच्या शैलीदार, रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैकपटीने वाढवली. संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनानं तृप्त केले. त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक, गीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगीतिक वाटचालीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्याचा आवाज ऐकायला मिळणं, हा अवर्णनीय आनंद होता. त्यांचं निधन ही भारतीय कला, सांस्कृतिक क्षेत्राची कधीही भरुन न निघणारी हानी आहे. मी अमिन सयानी साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ निवेदक अमिन सयानी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

सर्वसामान्य मुंबईकरांच्या घराची होणार स्वप्नपूर्ती; पुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 20 : राज्य शासनाने पुनर्विकास/स्वयंपुनर्विकासाबाबत घेतलेल्या निर्णयामुळे स्वयंपुनर्विकासासाठी गृहनिर्माण संस्थांना आता बिल्डरांकडे चकरा मारण्याची गरज राहिली नसून बिल्डर त्यांच्याकडे धावत येतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे घराचे स्वप्न पाहणाऱ्या मुंबईतील मराठी माणसाची स्वप्नपूर्ती होणार, असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली.

गृहनिर्माण सहकार परिषदेतील स्वयंपुनर्विकास/पुनर्विकासाच्या निर्णयाबाबत अभ्युदयनगर येथे आयोजित कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री दिपक केसरकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, राज्य शासनाने घेतलेल्या स्वयंपुनर्विकासाच्या निर्णयामुळे किमान 25 हजार वसाहती म्हणजेच साधारणपणे 5 लाख घरांची निर्मिती होणार आहे. तीन पिढ्यांपासून घराचे स्वप्न पाहणाऱ्या मराठी माणसांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. बीडीडी चाळींचा बिल्डरांकडून नव्हे तर म्हाडाकडून विकास करण्याचा निर्णय घेतला. 100 स्क्वेअर फुटाच्या घरामध्ये राहणाऱ्यांना 560 स्क्वेअर फुटांचे घर दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अभ्युदयनगरच्या सीएनडीच्या विकासाचा प्रस्तावही लवकरच मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांच्या विविध मागण्या, प्रश्नांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान 17 पोलीस वसाहती म्हाडाकडून विकसित केल्या जाणार असून बांद्रा रिक्लमेशन, आदर्शनगर वरळी, पीएमजीपी कॉलनी पुनमनगर, अंधेरीतील वसाहतींच्या विकासाचे प्रश्न लवकरच मार्गी लावले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

00000

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३.३७ कोटी रुपये वितरित

मुंबई दि. 20 : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत  23.37 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना अपघातात अपंगत्त्व अथवा मृत्यू आल्यास त्यांना भरपाई देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षातील तरतुदीतून 23.37 कोटी रुपये इतके अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

0000

महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोराम राज्य स्थापना दिवस साजरा

मुंबई, दि. २० : अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री तसेच संसदीय समित्यांचा सदस्य या नात्याने आपण उत्तर पूर्वेतील प्रत्येक राज्यांना भेट दिली आहे. तेथील नैसर्गिक सौंदर्य जगातील सुंदर देशांना तोडीस तोड देणारे आहे.  पर्यटनासाठी विदेशात जाण्यापूर्वी आपण उत्तर पूर्व राज्यांना भेट दिली तर तेथील पर्यटन वाढेल व लोकांमधील राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राज्यपाल  बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. २० फेब्रुवारी) महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी डॉ होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश व मिझोरम राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोक गीत व नृत्यांचा सांस्कृतिक बहारदार कार्यक्रम सादर केला.

सूर्योदय पाहावयाचा असल्यास प्रथम अरुणाचल प्रदेश राज्याकडे पहावे लागते. त्या राज्यात लोक परस्परांना शुभेच्छा देताना ‘जय हिंद’ म्हणतात ही गोष्ट उल्लेखनीय असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपण त्रिपुरा राज्यातील एका लहानश्या गावाला भेट दिली होती. तेथील स्वच्छता व प्रत्येक घरासमोरील फुलांची वैशिष्ट्यपूर्ण सजावट पाहून आपण थक्क झालो होतो, असे सांगून उत्तर पूर्व राज्यांच्या विकासाकरिता गेल्या दहा वर्षांमध्ये कसोशीने प्रयत्न झाले असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत  देशातील विविध राजभवनांमध्ये वेगवेगळ्या राज्यांचे राज्य स्थापना दिवस साजरे करण्यात येत असून महाराष्ट्रात आतापर्यंत १८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेशांचे स्थापना दिवस साजरे करण्यात आले. या उपक्रमामुळे देशातील वेगवेगळ्या राज्यांची कला, संस्कृती, परंपरा व नृत्य यांमधील समृद्धी पाहण्यास मिळाली, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

सिडनहॅम व एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही राज्यांच्या लोकगीत व नृत्यावर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली.  राज्यपाल बैस यांच्या हस्ते यावेळी विद्यार्थी कलाकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ले. जन. के टी. परनाईक (नि) यांचा अरुणाचल प्रदेश स्थापना दिनानिमित्त व्हिडीओ संदेश दाखविण्यात आला.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजनीश कामत तसेच विद्यापीठांतर्गत एल्फिन्स्टन महाविद्यालय, सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालय, विज्ञान संस्था व सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज मुंबई या महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

 

Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram celebrated in Maharashtra Raj Bhavan

 

The State Foundation Day of Arunachal Pradesh and Mizoram was celebrated for the first time in Maharashtra Raj Bhavan in the presence of Maharashtra Governor Ramesh Bais on Tue (20 Feb).

The Arunachal Pradesh and Mizoram State Foundation Day was celebrated as part of the ‘Ek Bharat Shreshtha Bharat’ initiative of Government of India.

A cultural programme depicting the rich culture, folk dance and traditions of Arunachal Pradesh and Mizoram was presented on the occasion. The Cultural programme was presented by the students of Dr Homi Bhabha State University. Two audio visual films showing the beauty and well known tourist destinations of the two States were also shown on the occasion.

The Governor complimented the students of the University for their excellent cultural presentation.

A video message of Arunachal Pradesh Governor Lt Gen K T Parnaik, PVSM, UYSM, YSM (Retd) was shown on the occasion.

Vice Chancellor of Dr Homi Bhabha State University Prof Rajneesh Kamat, Deans of affiliated colleges, members of faculty and students were present on the occasion.

०००

कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. २० : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीसिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींकरिता ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा दि. २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी आयोजित केला जाणार असे घोषित करण्यात आले होते मात्र काही कारणास्तव या तारखांमध्ये बदल झाला असून ठाणे येथे होणारा मेळावा २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल.

या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनवेस्टर्स व इनकुबेटर्स या सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वर जावून उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येईल, मुलाखती देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत.

‘नमो महारोजगार’ मेळाव्याकरिता जास्तीत जास्त संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

कोकण विभागातंर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

संध्या गरवारे/विसंअ

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रा. कृष्णात खोत यांची मुलाखत

            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात जागतिक मातृभाषा दिनानिमित्त‘ ‘रिंगाण या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील लेखक प्राध्यापक कृष्णात खोत यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            श्री. खोत यांची ओळख नव्या काळातील मराठी साहित्याला वेगळी दिशा देणारे लेखक म्हणून होत आहे. गावाकडची संस्कृती आणि खेड्यात होत असलेल्या बदलांमुळे निर्माण होत असलेला संघर्ष हे त्यांच्या लिखाणाचे विषय आहेत. श्री. खोत यांच्या गावठाण, झडझिंबड, रौंदाळा आणि धूळमाती या कादंबऱ्यांमधून बदलत्या ग्रामीण जीवनाचं वास्तविक चित्रण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी या छोट्याशा खेड्यातील लेखकाचा साहित्य अकादमी पुरस्कारापर्यंतचा प्रवास याविषयी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून लेखक प्रा. खोत यांनी माहिती दिली आहे.

            दिलखुलास कार्यक्रमात लेखक प्रा. खोत यांची मुलाखत शुक्रवार दि. 23, शनिवार दि. 24, सोमवार दि. 26 आणि मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआरया मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. प्राध्यापक नंदकुमार मोरे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत

            मुंबई, दि. 20 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात नमो महा रोजगार मेळावा या विषयावर महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या आयुक्त निधी चौधरी यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

            नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी राज्य शासनामार्फत सातत्याने राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत बेरोजगार युवक तसेच नव उद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी आणि नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळावा यासाठी ठाणे जिल्ह्यातही ठाणे विभागस्तरीय नमो महा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये नोकरी इच्छुक युवक, युवतींनी मुलाखतीसाठी आणि महा एक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स व इंक्युबेटर्स या सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त श्रीमती चौधरी यांनी दिलखुलास आणि जय महाराष्ट्र कार्यक्रमातून केले आहे.

           दिलखुलास कार्यक्रमात आयुक्त, श्रीमती चौधरी यांची मुलाखत बुधवार दि. 21 आणि गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर जय महाराष्ट्र कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई दि. २० : सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनच्यावतीने महासंस्कृती महोत्सव २०२४ चे आयोजन जिल्ह्यात गोरेगाव चेंबूर विलेपार्ले या ठिकाणी २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी महोत्सवाची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, राज्यातील विविध संस्कृती आणि परंपरांचा जागर करण्यासाठी तसेच पुढील पिढीला इतिहासाची, संस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.

            महोत्सवाचे उद्घाटन शिव सोहळ्याने होणार आहे. या अंतर्गत मी मराठी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे सायंकाळी  ६.३० वाजता मालाड पश्चिम येथील मालवणी, अंबोजवाडी मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

            २३ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत संत संमेलन कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, सन्मान सोहळा, शोभा यात्रा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन सकाळी १० वाजेपासून विलेपार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम येथे करण्यात आले आहे.

            २४ व २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सवात पुस्तक प्रदर्शन, व्याख्यान, शोभा यात्रा, महिला मेळावा, शाहिरी जलसा, भीमगीत स्पर्धा, धम्म परिसंवाद, संविधान रॅली टिळक नगर येथे लोकमान्य टिळक टर्मिनल जवळ सर्वोदय बुद्धविहारात सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे.

            २७ ते २८ फेब्रुवारी रोजी शबरी महोत्सव अंतर्गत लोकनृत्य, वस्तू प्रदर्शन, आदिवासी भागातील जनजाती पूजा पद्धती, वैदू संमेलन ७५ जनजाती क्रांतिकारकांची प्रदर्शनी, आदिवासी महिलांच्या संमेलनाचे सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. तर, आदीशक्ती आदीमाया या महोत्सव अंतर्गत संध्याकाळी ६.३० वाजता महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती यांना समर्पित नृत्य, गीत यांचा कलाविष्कार गोरेगाव येथे मध्यवर्ती आरे डेअरीचे पटांगण येथे आयोजित करण्यात आले आहे.

            २८ फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाच्या सांगता समारंभात संगीत शिवस्वराज्य गाथाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ नवं गीतांमधून साकारलेलं संगीतमय शिवचरित्र संध्याकाळी ६.३० वाजता आरे कॉलनीच्या मध्यवर्ती पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी नागरिकांना केले आहे.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी सूक्ष्‍म नियोजन करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

पुणे, दि.२०: शासनाच्या कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळावा २ मार्च २०२४ रोजी बारामती येथे आयोजित करण्यात आला असून औद्योगिक आस्थापनांकडून रिक्त पदांची नोंदणी केली जाईल आणि त्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना रोजगार मिळवून देता येईल यासाठी सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचना कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिल्या.

विधानभवन पुणे येथे आयोजित महारोजगार मेळाव्याच्या आढावा बैठकीत दूरदृष्यप्रणालीद्वारे मंत्री श्री. लोढा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त वर्षा लड्डा- उंटवाल, कौशल्य विकास विभागाच्या उपआयुक्त अनुपमा पवार आदी उपस्थित होते.

श्री.लोढा म्हणाले, कौशल्य, विकास, उद्योजकता व नाविन्यता धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतांना सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी नियोक्ते, कारखानदार, व्यापारी व सुशिक्षित बेरोजगार यांचे एकत्रित मेळावे घेण्यात येत आहेत. मेळावा यशस्वी होण्यासाठी नियोक्त्यांची मागणी आणि त्यानुसार कुशल मनुष्यबळ याचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी औद्योगिक संस्था, महाविद्यालये, रोजगार क्षेत्रात काम करणाऱ्यास संस्था यांच्याशी संवाद साधावा. मेळाव्याचा जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना उपयोग व्हावा यासाठी व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील संधी याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शनही ठेवण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

मंत्री श्री.लोढा यांनी पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्हाधिकारी यांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेतला.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, महारोजगार मेळाव्याची माहिती जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगारांना व्हावी यासाठी विविध माध्यमातून प्रसिद्धी करावी. स्थानिक औद्योगिक संघटनांशी संपर्क साधून रोजगार उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील मोठ्या उद्योगसंस्थांना मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात यावे. मेळाव्यात आलेल्या उमेदवारांना कोणतीही समस्या येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी डॉ. दिवसे म्हणाले, मेळाव्यात सुमारे १५० आस्थापना सहभागी होणार असून जागेचे नियोजन, नोंदणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा करण्यात येत आहेत. युवकांना अधिक रोजगार देणारे क्षेत्र निवडण्यात आले असून नियोक्त्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. परिसरातील जिल्ह्यातील उमेदवारांनाही या संधीचा लाभ व्हावा यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीला विभागातील सातारा, सोलापूर,कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या-त्या जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

0000

ताज्या बातम्या

परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन न्यू एज अभ्यासक्रम सुरू करावेत- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...

0
पुणे, दि.१३: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन युगातील ६ अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस) यावर्षीपासून सुरू करण्यात येत असून प्रत्येक आयटीआयमध्ये परिसरातील उद्योगांच्या गरजा लक्षात...

नवीन वीज उपकेंद्रामुळे श्रीरामपूरमधील उद्योगवाढीस चालना — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
शिर्डी, दि. १३ — श्रीरामपूर तालुक्याला भेडसावणाऱ्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येचे निराकरण २२०/३३ केव्ही क्षमतेच्या उच्चदाब वीज उपकेंद्रामुळे होणार असून, शेती व एमआयडीसीमधील उद्योगांना पूर्ण...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन

0
मुंबई, दि. १३ :- माहिती व जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय ५५ वर्षे) यांचे...

हिंजवडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे -उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. १३ : हिंजवडी, राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्राला अधिक चालना देण्याकरिता परिसरातील नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सोडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने...

न्यायसहायक प्रयोगशाळा बळकट करण्यासाठी लोकाभिमुख व ब्लॉकचेन पद्धतीचा अवलंब करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या इमारतीचे भूमिपूजन नागपूर, दि. १३: महाराष्ट्रात देशातील सर्वात अत्याधुनिक सायबर न्यायसहायक वैज्ञानिक व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. आधुनिक सायबर प्रयोगशाळांसह मोबाईल न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा उभारल्या जात आहेत....