शनिवार, जुलै 12, 2025
Home Blog Page 874

देशातून सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी वेगाने काम करा – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार

मुंबई, दि. २२ : देशातील आरोग्यविषयक पायाभूत सोयी – सुविधा उभारणे, रुग्णसेवा प्रभावी होणे यासाठी केंद्र शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून राज्यांना निधी देण्यात येतो. या निधीच्या विनियोगातून राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे काम होत आहे. यासोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशात सिकलसेल आजाराच्या निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्यासाठी यंत्रणांनी वेगाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.

 

आरोग्य क्षेत्रासाठी केंद्राकडून प्राप्त निधी, विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घेतला. बैठकीस केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संचालक डॉ. सरोज कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. पवन कुमार, केंद्रीय आरोग्य विभागाच्या लेखा शाखेचे शशांक शर्मा, अप्पर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, अतिरिक्त संचालक नितीन अंबाडेकर आदी उपस्थित होते.

सिकलसेल रूग्ण, वाहक यांचे निदान होणे गरजेचे असून रूग्णांची तपासणी करून ओळख व्हावी, यासाठी रूग्ण ओळखपत्र वितरण गतीने पूर्ण करण्याच्या सूचना करीत मंत्री डॉ. पवार म्हणाल्या की,  ओळखपत्रामध्ये रूग्ण व वाहक असे प्रकार असावे. सिकलसेल निर्मूलनासाठी आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर तपासणी वाढविण्यात यावी. गर्भवती महिलांच्या आरोग्य तपासणीमध्ये सिकलसेल आजाराची तपासणी सक्तीची करण्यात यावी. यासोबतच क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात यावी. ‘निक्षय मित्र’ बनण्यासाठी जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना यामध्ये जोडण्यात यावे.

राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या की, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन अंतर्गत राज्यात प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात येत आहे. राज्यात चार जिल्ह्यात ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच १८ क्रिटीकल केअर ब्लॉक्सचे कामही करण्यात येत आहे. राज्यामध्ये ११ हजार ५२ आरोग्यवर्धीनी केंद्र असून त्यांना आता आयुष्मान भारत आरोग्य मंदिर करण्यात आले आहे. या ठिकाणी मधुमेह तपासणी, तीन प्रकारच्या कर्करोगाच्या तपासण्या आदी नवीन सुविधा असणार आहेत.

दूरध्वनीवरील आरोग्य सल्ला (टेलिकन्सल्टींग) सुविधेचा राज्यात ६९ लाख रूग्णांनी लाभ घेऊन तज्ज्ञांचा सल्ला घेतला असून त्याचा लाभ रूग्णांना झाला आहे. १५ वा वित्त आयोग, कोविड प्रतिसाद निधी आदींचा आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपयोग करण्यात यावा. राज्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे तीन कोटी २६ लाख लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत या योजनेतून २४ लाख रूग्णांनी लाभ घेतला आहे. या योजनेतंर्गत कार्ड वितरण पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी मंत्री डॉ. पवार यांनी दिल्या.

गुजरात व महाराष्ट्रात किलकारी प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत गरोदर माता व एक वर्षापर्यंतच्या बाळाची काळजी घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष संपर्क करून त्यांना आरोग्य सुविधा देण्यात येतील. आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासह देशात वैद्यकीय शिक्षणाच्या जागाही वाढविण्यात आल्या आहेत. नंदूरबार व गोंदीया येथे वैद्यकीय महाविद्यालयांचे काम सुरू आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात सार्वजनिक खासगी भागीदारी ( पीपीपी) पद्धतीचा उपयोग करण्यात यावा. यामधून चांगले काम होत आहे. कर्करोग निदान व उपचारामध्ये केमोथेरपी केंद्र उघडण्यात यावे. कर्करोगासाठी प्रभावी नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात यावा, असेही केंद्रिय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

०००

निलेश तायडे/विसंअ/

 

भारताच्या सांस्कृतिक योगदानात गायत्री परिवाराचे मोठे योगदान – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रायगड दि. २२ (जिमाका): भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. भारताच्या सांस्कृतिक योगदानामध्ये गायत्री परिवाराचे सर्वाधिक योगदान असेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

अखिल विश्व गायत्री परिवाराच्या वतीने खारघरमध्ये पाच दिवशीय अश्वमेध महायज्ञाचे आयोजन करण्यात आले असून आज दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित राहून देवावाहन, देवदर्शन घेतले. तसेच महायज्ञात सहभागी होऊन यज्ञ अग्नीमध्ये आहुती दिली.

यावेळी खासदार जे. पी. नड्डा, डॉ. मल्लिका नड्डा, गायत्री परिवाराचे संस्थापक शैलबाळा पंड्या,  डॉ.चिन्मय पंड्या, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रविण दरेकर,  मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, गीतकार समीर, गायक शंकर महादेवन, संगीत आणि गायक हिमेश रेशमिया आणि अभिनेता सुनील लहिरी यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र ही वीरांची, संतांची तसेच ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ असलेली भूमी आहे. या भूमीत वैश्विक शांती साठी महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे, यासाठी गायत्री परिवाराचे आभार मानून  उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की,  गायत्री परिवाराने यज्ञ परंपरेला वैश्विक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. ही सनातन, यज्ञ संस्कृती विज्ञानाधिष्ठीत असून विश्व शांती तसेच सदाचारी वर्तनासाठी जागतिक पातळीवर पोहोचविण्याचे काम गायत्री परिवार करीत आहे.

हम बदलेंगे तो देश बदलेगा हा आपला मंत्र आहे. गायत्री परिवाराने नशामुक्ततेसाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. विश्व कल्याणसाठी गायत्री परिवाराचे मोठे योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या अश्वमेध यज्ञात सहभागी सर्वानी यावेळी पर्यावरण संरक्षण, महिला सबलीकरण, अंमली पदार्थ मुक्त जग, मानव कल्याण, सहकार्य-संघटन आणि मजबूत राष्ट्र उभारणीसाठी संकल्प केला.

०००

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात दोन दिवसीय मुंबई शहर ग्रंथोत्सवास प्रारंभ

मुंबई दि. २२ : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई शहर ग्रंथोत्सव २०२३ चे आयोजन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात करण्यात आले आहे. २२ व २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवात २२ फेब्रुवारी रोजी ग्रंथ दिंडी, अभिवाचन दृकश्राव्य कार्यक्रम, लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तर २३ फेब्रुवारी रोजी मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन, ग्रंथ भेट वितरण व व्याख्यान, वसा वाचन संस्कृतीचा या विषयावर परिसंवाद, कुटुंब रंगले काव्यात हे एकपात्री काव्य नाट्य अनुभव, हास्य संजीवनी अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद विद्यार्थी व साहित्यप्रेमींना घेता येणार आहे.

०००

ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. २२ : ग्रीसचे प्रधानमंत्री किरियाकोस मित्सोटाकिस यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.

यावेळी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनीषा पाटणकर – म्हैसकर, पोलीस आयुक्त (मुंबई शहर) विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलिस महासंचालक दीपक पांडे, बृहन्मुंबई महानगरपालिाक अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे व राजशिष्टाचार व पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

गौतम बुद्धांचे विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी उपयोगी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई दि. २२ : भारत आणि जपानचे ऐतिहासिक काळापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सिद्धार्थ गौतम बुद्धांच्या विचारातून भारतामध्ये जो विचार निर्माण झाला, त्याचा जगामध्ये प्रसार झाला व लोकप्रिय ठरला. बुद्धांचे तत्वज्ञान व विचार संपूर्ण जगाला आव्हाने पेलण्यासाठी आजही उपयोगी पडत आहेत. जपान अभ्यास दौऱ्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भेट दिल्यानंतर जपानमध्येही डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सुरू असल्याचे पाहून मनाला समाधान वाटले, अशी भावना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. मुंबईतील जपानचे वाणिज्य दूतावास जनरल यांनी आयोजित केलेल्या मुंबईतील कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जपानचे राजदूत डॉ. फूकाहोरी यासुकाता आदी मान्यवर उपस्थित होते.

 

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, जपानमध्ये गुन्ह्यांमधील दोषारोप सिद्धीचा दर हा ९८ टक्के आहे.  आपल्याकडील दोषारोप सिद्धीचा दर वाढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जपानच्या सहकार्याने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यात येत असलेल्या तंत्रज्ञाचा वापर भारतातही होणे आवश्यक आहे. तसेच जपान सरकारने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टरेट देऊन सन्मान केल्याबद्दल डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.

जपान दौऱ्यावरून आल्यावर जपान येथील बाजारपेठ राज्यातील उद्योजकांकरिता तसेच राज्यातील बाजारपेठ जपानच्या उद्योजकांना कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, त्यादृष्टीने विधान भवनात उद्योग विभागाचे अधिकारी तसेच औद्यागिक संस्थांसह बैठक घेतली असून त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

०००

तुलसीदास किलाचंद उद्यानातील शिल्पातून प्रेरणा मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि, २२ : गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानात उभारण्यात आलेल्या महान देशभक्तांच्या शिल्पातून सर्वांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचे सुशोभीकरण आणि १८ शिल्पांचे अनावरण उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकस उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार जे. पी. नड्डा, आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, ॲड. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मुंबई महानगर महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, शायना एन.सी., लोढा फाउंडेशन संस्थेच्या मंजू लोढा, रणजित सावरकर, भीमराव आंबेडकर उपस्थित होते.

कौशल्य विकास मंत्री श्री. लोढा म्हणाले की, मुंबई महापालिकेसोबत करार करून ही जागा विकसित करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात हे स्थळ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होईलच, त्याचबरोबर लाखो लोकांचे प्रेरणास्थान बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उद्यानातील १८ शिल्पांमध्ये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकर, डॉ. नाना शंकर शेठ, डॉ. होमी भाभा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले, बाबू गेनू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न जमशेदजी टाटा, दादासाहेब फाळके, सेठ मोतीलाल शाह, बाळासाहेब ठाकरे, अशोक कुमार जैन, रामनाथ गोयंका,  कुसुमाग्रज, धीरूभाई अंबानी, कोळी पुरुष यांची रेखीव शिल्पे साकारली आहेत.

खासदार श्री. नड्डा म्हणाले की, युवा पिढीच्या उज्वल भविष्यासाठी या महान व्यक्तींचे विचार आणि त्यांचा आदर्श  प्रेरणा देतील.

०००

प्रवीण भुरके/विसंअ/

‘मार्ड’ संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

मागण्यांबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार

मुंबई, दि. २२: मार्ड संघटनेच्या डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र, या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या (२५ फेब्रुवारी) मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने मार्ड डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

राज्य सरकार मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सेंट्रल मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली तसेच वस्तुस्थितीची माहीत दिली. राज्यातील रुग्णसेवा सुरळीत रहावी, रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून, मार्डने आज संध्याकाळपासून सुरू होत असलेला त्यांचा संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी मार्ड डॉक्टरांना केले आहे.

दि. ७ फेब्रुवारीला मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याचा निर्णय झाला होता. विद्यावेतन वाढीसंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत. विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश देऊन उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले होते की, शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे. त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही.

राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करावी. वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात. अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे. शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.

०००

जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगासाठीचे पुनर्वसन केंद्र उभारण्याच्या कामास गती द्या – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २२: राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगासाठी पुनर्वसन केंद्र उभे राहावे, यासाठी गतीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र  दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झाली.

बैठकीस दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय करगुटकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नमो दिव्यांग ११ कलमी कार्यक्रमात नमो दिव्यांग शक्ती अभियानांतर्गत राज्यात ७३ दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्याचा संकल्प केला आहे. यात दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी विविध साधनांची उपलब्धता असेल. तसेच चिकित्सा व उपचार आदी आवश्यक गोष्टींचा समावेश राहील, या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी ७९८ हरित उर्जेवर चालणारी पर्यावरणस्नेही वाहनांवरील दुकाने- ई शॉप्स वाटप करण्यास व त्यासाठीच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच पुण्यातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क यांच्याशी करार करण्यास मान्यता देण्यात आली. या करारामुळे दिव्यांगांच्या रोजगार, स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकास प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. यातून दिव्यांगामधील स्टार्ट अप्स, उद्योजकता विकास यांना प्रोत्साहन मिळणार आहे.

दिव्यांगाचे जिल्हानिहाय १०० टक्के सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे काम अत्याधुनिक पद्धतीने आणि त्याची सर्व माहिती एकाच ठिकाणी एकत्रित होईल, अशाप्रकारे कार्यवाही करण्याची सूचनाही करण्यात आली.

दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल ५० वरून ५०० कोटी करण्यात आले आहे. यामुळे महामंडळाची केंद्रीय कार्पोरेट अफेअर्स मंत्रिमंडळाच्या संकेतस्थळावर नोंद प्रसिद्ध करण्यासाठीची कार्यवाही व शुल्क भरण्यास मान्यता देण्यात आली.

०००

पर्यटन विकासातून दुर्गम भागातील नागरिकांना रोजगाराची संधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

श्री क्षेत्र महाबळेश्वर, ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे पर्यटनाच्या दृष्टीने जतन करणार

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करणार

मुंबई, दि. २२: सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील धार्मिक, ऐतिहासिक व निसर्ग पर्यटनस्थळांच्या एकात्मिक विकासाकरिता पर्यटन विकास आराखड्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यासाठी सुमारे ३८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून श्री क्षेत्र महाबळेश्वर, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र राखीव व वनक्षेत्रातील पर्यटन विकास व कोयना हेळवाक वन विभागांतर्गत कोयना नदी जलपर्यटनाचा समावेश आहे.

मुनावळे येथे महिन्याभरात वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येणार असून नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस् असणारा हा पहिला प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृह येथे सातारा जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी विकास आराखड्याचे सादरीकरण केले.

हा संपूर्ण परिसर निसर्ग संपन्न असून पर्यटनवृद्धीसाठी मोठी संधी आहे. याठिकाणी निर्सर्ग पर्यटन, दुर्गभ्रमंती, धार्मिक पर्यटनाबरोबरच वॉटर स्पोर्टस् देखील करता येणार असल्याने ह्या आराखड्याची अंमलबजावणी जलदगतीने करावी, असे निर्देश देतानाच पर्यटन विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या कामांमुळे स्थानिकांना रोजगार मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुनावळे येथे नदीत जलपर्यटन आणि वॉटर स्पोर्टस् सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कृष्णा खोरे महामंडळ आणि एमटीडीसी यांच्यामध्ये लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. याठिकाणी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर वॉटर स्पोर्टस्‌चे विविध प्रकार, बोटींग करता येणार आहे. त्यामुळे परिसरात पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी पर्यटन महोत्सव आयोजित करावा, संकेतस्थळ विकसित करण्यात यावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

सह्याद्री व्याघ्र राखीव वनक्षेत्रातील पर्यटन विकास आराखड्यामध्ये प्रेक्षागृह, तंबू निवास, सफारी मार्गाचे बळकटीकरण, पर्यटन सफारीकरीता वाहने, आदी विविध कामे करण्यात येणार आहे. प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन अंतर्गत किल्ला जतन, दुरूस्तीचे कामे, संग्रहालय निर्मिती, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, विद्युतीकरण, सीसीटिव्ही यंत्रणा आदी कामांचा समावेश आहे. श्री क्षेत्र महाबळेश्वर पर्यटन विकास आराखड्यामध्ये मंदिर व परिसर विकास , वाहन तळ, बाजारपेठ विकास कामे, अन्नछत्र, मंदिर परिसरातील प्राथमिक शाळा, आदी विविध विकास कामांचा समावेश आहे.

०००

पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी भरीव निधी देणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. २१ : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस विभाग अहोरात्र आपले कर्तव्य बजावत असतो. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पार पाडताना पोलीस विभागाचे सर्व सुविधायुक्त अत्याधुनिकीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने पोलीस विभागाच्या बळकटीकरणासाठी नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात शहर व ग्रामीण पोलीस विभागाला मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

पोलीस कवायत मैदान येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्तालयाला नवीन १८ चारचाकी व १० दुचाकी वाहनांचे हस्तांतरण आणि पोलीस आयुक्तालयातील प्रशिक्षण सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, माजी महापौर चेतन गावंडे, निवेदिता दिघडे, तुषार भारतीय यांच्यासह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस अधिक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, पोलीस उपायुक्त सागर पाटील, गणेश शिंदे, कल्पना बारावकर व सर्व पोलीस निरीक्षक आदी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवा झेंडा दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आलीत. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातील नुतणीकरण करण्यात आलेल्या प्रशिक्षण सभागृहाचे पालकमंत्र्यांचे हस्ते फीत कापून लोकार्पण झाले.

श्री. पाटील म्हणाले की, अमरावती पोलीस खात्याला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १८ चारचाकी व १० दुचाकी वाहने खरेदीसाठी 2 कोटी 26 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच दुचाकी वाहनांसाठी 8 लाख 30 हजार रुपये व सभागृहाच्या नुतणीकरणासाठी 12 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार मंजूर निधीतून उपरोक्तप्रमाणे विभागाच्या बळकटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पोलीसांच्या सन्मानाला कुणाद्वारेही ठेच पोहोचविली जावू नये, यासाठी पोलीसांच्या बदल्यांमध्ये हस्तक्षेप करण्यात येणार नाही. मादक पदार्थांची विक्री व व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. ही किड समाजातून पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पोलिसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. पोलिसांच्या कुटुबिंयांना सर्व सोयीयुक्त निवासस्थाने उपलब्ध होण्यासाठी त्यांच्या निवासस्थांनाची दुरुस्ती करण्यात यावी. समाजातील विघातक, गुन्हेगारी वृत्तींना आळा घालण्यासाठी तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांना पायबंद करण्यासाठी पोलीसांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. दामिनी पथके अधिक सजगपणे कार्यान्वित करावित. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला जे जे काही लागेल ते ते तुम्हाला पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

शहर पोलीस विभागाच्या अत्याधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत मंजूर सुमारे दोन कोटी 50 लक्ष रुपये निधीतून नवीन अठरा चारचाकी, दहा दुचाकी वाहनांची खरेदी तसेच अधिकारी-कर्मचारी प्रशिक्षण सभागृहाचे नुतणीकरण करण्यात आले आहे. याव्दारे पोलीस विभागाला गस्ती व गुन्हे शोध प्रक्रिया  गतीने पूर्ण करण्यासाठी सहाय्यता होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती, साईनगर, बडनेरा एमआयडीसी, नांदगाव पेठ एमआयडीसी याठिकाणी नवीन पोलीस ठाणे तसेच सीसीटीव्ही कॅमेरा प्रकल्प आदींसाठी निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी पालकमंत्र्यांना केली.

०००

 

 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३ : लिपिक-टंकलेखक संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

0
मुंबई, दि. ११ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दि. १७ डिसेंबर, २०२३ रोजी मुंबईसह छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हाकेंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा-२०२३ मधील...

इटलीतील मॉन्टोन येथे नायक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण

0
नवी दिल्ली, दि. 11 : दुसऱ्या महायुद्धातील भारतीय वीर नायक यशवंत घाडगे यांच्या अतुलनीय शौर्यास श्रद्धांजली म्हणून इटलीतील मॉन्टोन शहरात त्यांच्या कांस्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. भारताच्या...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य, शौर्य, पराक्रमाचा वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

0
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान - उपमुख्यमंत्री अजित पवार तामिळनाडूतील जिंजीसह महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा...

छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास जागतिक पातळीवर पोहोचणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आनंद...

0
मुंबई दि. ११ : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा समावेश झाल्याची घोषणा आज झाली असून, ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि...

देशातील सर्वोत्तम ‘ऑफ शोअर एअरपोर्ट’ मुंबईत उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ११ : भारताला ‘मेरीटाईम पॉवर’ बनविणारे वाढवण बंदर जसे देशातील सर्वोत्तम 'ऑफ शोअर पोर्ट'  होणार आहे त्याचप्रमाणे सर्वोत्तम 'ऑफ शोअर एअरपोर्ट' मुंबईत उभारणार असून जे मुंबईतील तिसरे एअरपोर्ट...