मंगळवार, जुलै 8, 2025
Home Blog Page 863

दिमाखदार सोहळ्यात राज्य चित्रपट पुरस्कारांचे वितरण

‘वाय’ चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

दीपक डोब्रियाल आणि मृण्मयी देशपांडे ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री

संजय पाटील यांचे ‘आभाळसंग मातीचं नांदन’ ठरले उत्कृष्ट गीत

मुंबई, दि. २३:   सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी, कलाकारांचे बहारदार नृत्य, कार्यक्रमांच्या प्रारंभीच सादर झालेली गणेश वंदना आणि शिवराज्याभिषेक ३५० व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या कार्यक्रमांनी ५७ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चांगलीच रंगत भरली. यावेळी दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान ‘वाय’ या चित्रपटाने मिळविला. या चित्रपटाचे दिग्दर्शक अजित वाडीकर यांना भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले.  ‘बाबा’ चित्रपटातील भूमिकेसाठी दीपक डोब्रियाल यास उत्कृष्ट अभिनेता तर ‘मिस यू मिस्टर’ मधील भूमिकेसाठी मृण्मयी देशपांडे हिला उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले.

वरळी येथील डोम, एन.एस.सी.आय येथे गुरुवारी रात्री राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा रंगला. मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्यासह सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ॲड. मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे, किरण शांताराम, जब्बार पटेल, सचिन पिळगावकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आदींसह चित्र नाट्य सृष्टीतील अनेक नामवंत उपस्थित होते.

 

याच पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा ‘राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार’, ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार’ही यावेळी प्रदान करण्यात आले.

 

राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यातील विविध वर्गातील पुरस्कार विजेते :

दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट चित्रपट क्र.१ –

वाय (अजित वाडीकर), भालजी पेंढारकर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक क्र.१ – वाय ( अजित वाडीकर). बाबूराव पेंटर उत्कृष्ट चित्रपट क्र.2 – मिस यु मिस्टर (श्रीम. दिपा त्रेसी). राजा परांजपे उत्कृष्ट दिग्दर्शक क्र. 2 -मिस यु मिस्टर (समीर जोशी). मा. विनायक उत्कृष्ट चित्रपट क्र.3 –  स्माईल प्लिज (श्रीम. निशा सुजन /श्रीम, सानिका गांधी). राजा ठाकूर उत्कृष्ट दिग्दर्शक क्र.3- स्माईल प्लिज ( विक्रम फडणीस).

अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट-  (ताजमाल) नियाज मुजावर.

दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा चित्रपट – ताजमाल ( कुलभूषण मंगळे).

दत्ता धर्माधिकारी सामाजिक प्रश्न हाताळणारा दिग्दर्शक -समीर विद्वांस (आनंदी गोपाळ).

व्ही. शांताराम सामाजिक प्रश्न हाताळणारा चित्रपट- आनंदी गोपाळ (मंगेश कुलकर्णी).

प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती –  विशबेरी ऑनलाईन सर्विसेस प्रा.लि (झॉलिवूड).

प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शक – अच्युत नारायण (वेगळी वाट).

उत्कृष्ट अभिनेता कै. शाहू मोडक पारितोषिक  व श्री शिवाजी गणेशन पुरस्कार -दीपक डोब्रियाल (बाबा).

उत्कृष्ट अभिनेत्री (कै.स्मिता पाटील पारितोषिक) – मृण्मयी देशपांडे (मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – कै.काशिनाथ घाणेकर पारितोषिक -अजित खोब्रागडे (झॉलिवूड).

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री कै. रंजना देशमुख पारितोषिक – अंकिता लांडे (गर्ल्स).

उत्कृष्ट विनोदी अभिनेता कै. दामूअण्णा मालवणकर पारितोषिक -पार्थ भालेराव (बस्ता).

सहाय्यक अभिनेता – कै. चिंतामणराव कोल्हटकर पारितोषिक –  रोहित फाळके (पांघरुण).

सहाय्यक अभिनेत्री – कै. शांता हुबळीकर व कै. हंसा वाडकर पारितोषिक – नंदिता पाटकर (बाबा).

उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक – राज्याभिषेक गीत सुभाष नकाशे (हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वगायिका- मधुरा कुंभार (गीत- आभाळसंग मातीचं नांदन ,मिस यू मिस्टर).

उत्कृष्ट पार्श्वगायक – सोनू निगम ( गीत- येशील तू, हिरकणी).

उत्कृष्ट पार्श्वसंगीत- प्रफुल्ल – स्वप्निल (स्माइल प्लिज).

उत्कृष्ट संगीत -कै. अरुण पौडवाल पारितोषिक  – अमितराज (हिरकणी).

उत्कृष्ट गीते – कै.ग. दि. माडगूळकर पारितोषिक –  संजय कृष्णाजी पाटील (गीत- आभाळसंग मातीचं नांदन, हिरकणी).

उत्कृष्ट संवाद- कै.आचार्य अत्रे पारितोषिक

इरावती कणिक (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट पटकथा-  विक्रम फडणीस,इरावती कर्णिक (स्माईल प्लिज),

सर्वोत्कृष्ट कथा – कै. मधुसूदन कालेलकर पारितोषिक -पांघरुण.

याशिवाय, तांत्रिक गट आणि उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारही यावेळी देण्यात आले. यामध्ये, उत्कृष्ट कला दिग्दर्शन-(कै. साहेबमामा ऊर्फ फत्तेलाल पारितोषिक ) – सुनील निगवेकर, निलेश वाघ (आनंदी गोपाळ).

उत्कृष्ट छायालेखन ( कै. पांडुरंग नाईक पारितोषिक) – करण बी. रावत (पांघरुण)

उत्कृष्ट संकलन- आशिष म्हात्रे, श्रीमती अपूर्वा मोतीवाले (बस्ता).

उत्कृष्ट ध्वनीमुद्रण – अनुप देव (माईघाट),

उत्कृष्ट ध्वनिसंयोजन – मंदार कमलापूरकर (त्रिज्या),

उत्कृष्ट वेशभूषा- विक्रम फडणीस (स्माईल प्लिज),

उत्कृष्ट रंगभूषा – श्रीमती. सानिका गाडगीळ (फत्तेशिकस्त)

उत्कृष्ट बालकलाकार (कै. गजानन जहागिरदार पुरस्कार)  – आर्यन मेघजी (बाबा).

या दिमाखदार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले.

०००

दीपक चव्हाण/वि.सं.अ

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २३ वा दीक्षान्त सोहळा संपन्न

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 23 वा वार्षिक दीक्षान्त समारोह राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते डिजिटल माध्यमातून विद्यापीठाच्या ‘ई – प्रबोधिनी : लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम’चे उद्घाटन करण्यात आले, तसेच ‘ब्लूप्रिंट ऑफ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी’ या क्रमिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ ख्रिस्तोफर डिसुझा यांना डी. लिट. ही मानद पदवी प्रदान करण्यात आली.

नाशिक येथील विद्यापीठ परिसरात झालेल्या दीक्षान्त सोहळ्याला विद्यापीठाचे प्रकुलपती तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, केएलई अकादमी ऑफ हायर एजुकेशन अँड रिसर्च  बेळगाव डॉ. नितीन गंगणे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, विद्यापीठाच्या कुलगुरु ले. जन. (नि.) डॉ. माधुरी कानिटकर, प्रकुलगुरु डॉ. मिलिंद निकुम्ब, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाल, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, प्राधिकरणाचे सदस्य, अध्यापक व स्नातक उपस्थित होते.

दीक्षान्त सोहळ्यात १०३०२ स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. एकूण २६ उमेदवारांना पीएचडी तर १११ गुणवंत स्नातकांना सुवर्ण पदके व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

0000

Governor presides over 23rd Convocation of

MUHS / Dr Christopher D Souza awarded D.Litt.

 

Maharashtra Governor and Chancellor of universities Ramesh Bais presided over the 23rd Annual Convocation ceremony of Maharashtra University of Health Sciences (MUHS) through online mode.

The Governor launched ‘E- Prabodhini:  Learning Management System’ through online mode. Dr Christopher D’Souza was awarded D Litt. for his outstanding contribution in the field of health care.

The Governor released the textbook ‘Blueprint of Bachelor of Dental Surgery (BDS)’ on this occasion. Pro Chancellor of MUHS and Minister of Medical Education Hasan Mushrif, Principal Secretary Medical Education Dinesh Waghmare, Vice Chancellor of KLE Academy of Higher Education and Research Belgaum Dr. Nitin Gangane, Vice Chancellor of MUHS Lt. Gen. (Rtd.) Dr. Madhuri Kanitkar, Pro Vice Chancellor Dr. Milind Nikumb, were present at the Convocation Ceremony held in the University premises at Nashik.

Degrees were awarded to 10302 graduates during the convocation ceremony. A total of 26 candidates were awarded PhD while 111 meritorious graduates were awarded gold medals and certificates.

राज्यपाल रमेश बैस यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. 23 :-  महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. प्रिन्सिपल मनोहर जोशी हे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक धुरंधर व्यक्तिमत्व होते.

कुशल संघटक, उत्कृष्ट संसदपटू, अभ्यासू विरोधी पक्षनेते, उत्कृष्ट लोकसभा अध्यक्ष असा सार्थ लौकिक असलेल्या मनोहर जोशी यांनी प्रत्येक पदावर काम करताना आपला वेगळा असा ठसा उमटवला. कौशल्य शिक्षणाचे महत्त्व फार पूर्वीच ओळखून त्यांनी कोहिनूर संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण तरुणींना तंत्र व कौशल्य शिक्षण देण्याची व्यवस्था केली. उत्कृष्ट वक्ते, मितभाषी, शिस्तप्रिय व राजकारणातील अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका तत्त्वनिष्ठ नेत्याला आपण गमावले आहे. जोशी हे लोकसभा अध्यक्ष असताना आपला त्यांच्याशी घनिष्ठ परिचय झाला व तो कायम राहिला. त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राल्यपाल श्री.बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

0000

Maha Governor Bais condoles the demise of Manohar Joshi

Mumbai, Feb 23- Maharashtra Governor Ramesh Bais has expressed grief over the demise of former Chief Minister of Maharashtra and former Lok Sabha Speaker Manohar Joshi. In a condolence message, Governor Bais wrote;

“Shri Manohar Joshi was one of the most respected political leaders in Maharashtra.  A skilled organizer, outstanding parliamentarian, excellent orator, fiery opposition leader and respected Lok Sabha Speaker, Shri Joshi left his indelible mark while discharging every role. Realizing the importance of skill education long ago, he created centres for imparting technical and skill education which helped thousands of young women and men to secure jobs. Joshi Ji was a soft-spoken and erudite parliamentarian who was respected by politicians cutting across the political spectrum. In his demise, Maharashtra has lost a man of high principles and values.  I had the good fortune of knowing Shri Joshi intimately when he was the Speaker of the Lok Sabha. My heartfelt condolences to his family.”

मंत्रालयात संत गाडगेबाबा यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई, दि. 23 :- थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त, मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी कदम पाटील यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रवींद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

0000

धोंडीराम अर्जुन/स.सं

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 23 : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आपल्या संदेशात म्हणतात, मनोहर जोशी सर आणि माझा वैयक्तिक ऋणानुबंध होता. नगरसेवक ते महापौर, आमदार ते मुख्यमंत्री आणि खासदार ते लोकसभा अध्यक्ष असे सर्व टप्पे त्यांनी आपल्या राजकीय जीवनात पूर्ण केले. विधानसभा आणि विधानपरिषद, लोकसभा आणि राज्यसभा अशा चारही सभागृहात प्रतिनिधीत्व करण्याचा मान त्यांनी मिळविला. अतिशय शिस्तबद्ध, संयमी आणि अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख होती. वैयक्तिक जीवन असो की राजकीय जीवन वेळेची शिस्त त्यांनी कधी सोडली नाही. महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे योगदान  कायमच स्मरणात राहिल. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार राजेंद्र पाटणी यांना श्रद्धांजली

मुंबई, दि. २३:- विकासाचा ध्यास घेतलेले शांत, संयमी नेतृत्व म्हणून आमदार राजेंद्र पाटणी सदैव स्मरणात राहतील. त्यांचे अकाली निधन दुःखद असल्याची भावना व्यक्त करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार पाटणी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘आमदार पाटणी लढवय्ये होते. पण आजाराने त्यांच्यावर मात केली. समाजकारण आणि राजकारणातील त्यांची धडाडी सर्वपरिचित आहे. विधानपरिषद, विधानसभा सदस्य म्हणून काम करताना त्यांनी वाशिम जिल्हा आणि कारंजा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांच्या अकाली निधनाने पाटणी कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांवर आघात झालेला आहे. त्यांना यातून सावरण्याचे बळ मिळावे’, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात आमदार राजेंद्र पाटणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

राजकारण, समाजकारणातील सर्वांचे ‘सर’, सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला

मुंबई, दि. २३ :-  शिक्षणातील ‘सर’ ते लोकसभा अध्यक्ष म्हणून ‘स्पीकर सर’ अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी शोकमग्न भावना व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्यासाठी वैयक्तिक पातळीवर ही मोठी हानी आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विकासाची चौफेर दृष्टी असलेल्या एका सुसंस्कृत, व्यासंगी नेत्याला मुकला असल्याचेही म्हटले आहे.

मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, ‘नगरसेवक, महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा प्रवास राजकारण- समाजकारणात येऊ पाहणाऱ्या पिढ्यांकरिता दीपस्तंभासारखा मार्गदर्शक राहणार आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे ते सच्चे पाईक होते. ते शिक्षक, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, कला-साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यासंगी होते. राजकीय तसेच संसदीय लोकशाही प्रणालीवर गाढा विश्वास असणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते. जिथे जिथे त्यांनी काम केले. तिथे तिथे त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. ‘स्वच्छ मुंबई -हरित मुंबई’ हा त्यांचा ध्यास होता. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिले. त्यांनी अखिल भारतीय महापौर परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. राष्ट्रीय विरोधीपक्ष नेता संघाची स्थापना त्यांनी केली होती. जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या स्थापनेत ते पुढे होते. महाराष्ट्रात गुंतवणूक यावी याकरिता त्यांनी ‘ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’, शेतीतील गुंतवणूकीसाठी ‘ॲग्रो ॲडव्हान्टेज महाराष्ट्र’ अशा संकल्पनांना मुर्त रुप दिले. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाचा एक्स्प्रेस – वे म्हणता येईल असा मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग त्यांच्याच काळात साकारला गेला. सिंचनातील कृष्णा खोरे विकास महामंडळाची सुरुवातही त्यांच्याच काळात झाली. ‘टँकरमुक्त महाराष्ट्र’ ही देखील त्यांचीच घोषणा. ‘महाराष्ट्र भूषण’ या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरुवातही त्यांच्याच पुढाकाराने झाली. लोकसभा अध्यक्षपदाची त्यांची कारकीर्द वैशिष्ट्यपूर्ण राहिली. तिथेही ते कडक शिस्तीचे ‘स्पीकर सर’ आणि सर्वपक्षीयांसाठी आदरणीय होते. परखड विचारांचे आणि वाणीचे म्हणून त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षासाठी देखील ही मोठी हानी आहे. आमचे सर्वांचे लाडके आणि मार्गदर्शक सर आपल्यात नाहीत ही कल्पना देखील करवत नाही. सरांच्या निधनामुळे जोशी परिवारावर, त्यांचे स्नेही, कार्यकर्ते यांच्यावर आघात झाला आहे. तो सहन करण्याची ईश्वराने या सर्वांना ताकद द्यावी, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 23 :- शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शिक्षण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान, विश्वासू सहकारी अशी जोशी सरांची ओळख होती. शिवसेना पक्षस्थापनेपासून पक्षसंघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या.  विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईचे महापौर म्हणून त्यांची कारकीर्द उल्लेखनीय, संस्मरणीय ठरली. शिवसेना भाजपच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशी सरांना दिली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा महाराष्ट्रात उमटवला. दिल्लीच्या राजकारणात केंद्रीय अवजड उद्योगमंत्री म्हणून त्यांनी काम केले. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून नि:ष्पक्ष भूमिका त्यांनी बजावली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जोशी सरांनी स्वकर्तृत्वावर लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या प्रत्येक संधीचे त्यांनी सोने केले. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासू, सुसंस्कृत नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. कोहिनूर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले. अनेक मराठी तरुणांना उद्योगक्षेत्रातील संधींसाठी प्रशिक्षित केले. मराठी माणूस आणि महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील. ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांच्या, नातेवाईकांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

००००

‘अष्टपैलू’ अशोक सराफ हे मराठी मातीतील अस्सल हिरा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगाला हेवा वाटेल अशी मुंबईची फिल्मसिटी बनवण्याचा प्रयत्न

मुंबई, दि.२२ : आपल्या अविस्मरणीय भूमिकांनी अष्टपैलू असणाऱ्या अशोक सराफ यांनी प्रेक्षकांची अभिरुची संपन्न केली. अवघ्या महाराष्ट्राला त्यांनी पोट धरुन हसवले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही त्यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही. खऱ्या अर्थाने ते मराठी मातीतील अस्सल हिरा आहेत, अशा भाषेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या कार्याचा गौरव केला. मराठी चित्रपटसृष्टी साठी जे जे आवश्यक आहे, त्या सर्व सुविधा राज्यात उपलब्ध करून देण्याचा आणि जगाला हेवा वाटेल अशी फिल्मसिटी आपण तयार करू, असे प्रतिपादन त्यांनी केले.

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना तर मानाचा “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार” ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान आज करण्यात आला.त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते. याशिवाय, मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीसाठी आपल्या कलेच्या माध्यमातून अनेक वर्ष योगदान देत रसिकांची व कलासृष्टीची सेवा करणाऱ्या ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा राजकपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. या समारंभास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार मनीषा कायंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे आणि सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे, म्हणाले की, अष्टपैलू, हा शब्द ज्याला खऱ्या अर्थाने ज्यांना लागू होतो ते नाव म्हणजे अशोक सराफ आहे. सलग ५० वर्षे असंख्य भूमिका करुनही ज्यांच्यात अभिनयाची आणि नवं काही तरी करून दाखविण्याची त्यांची भूक अजूनही कायम आहे. अशोक सराफ हे वयाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना राज्य सरकारचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना देण्यात येतोय, हा अवघ्या महाराष्ट्रासाठी केवळ अभिमानाचाच नाही तर अमृताहूनही गोड क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या वर्षी ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले आणि ज्येष्ठ निरुपणकार तिर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्याची संधी मला मिळाली. यावर्षी अशोक सराफ यांचा आपण गौरव करत आहोत. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठी रसिकांवर राज्य केले. प्रसिद्धीचे इतके वलय मिळूनही सराफ यांनी कधीही जमीनीशी नातं तोडलं नाही, असे त्यांनी सांगितले. मराठी रसिकांनीही त्यांच्या अभिनयावर भरभरुन प्रेम केले. त्यांच्याप्रमाणेच सुरेश वाडकर यांनी अत्यंत कष्टपूर्वक आपली सांगितीक कारकीर्द उभी केली. मराठी आणि हिंदीच नव्हे तर विविध भाषांतील त्यांची गाणी विशेष गाजली. सुरेशजींचा सुरेल आवाज आजही आपल्याला मंत्रमुग्ध करतो, अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा गौरव केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईतल्या फिल्मसिटीत शुटीगसाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, मुंबई फिल्मसिटीबाहेर इतर जिल्ह्यात चित्रपटाची शुटींग करायची असेल तर ‘वन विंडो सिस्टीम’चा निर्णय सांस्कृतिक विभागाने घेतलाय. या शुटींगसाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. राज्यात ७५ नावे चित्र नाट्यगृह उभरण्यासाठी ९ कोटी ३३ लाखाचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले.

अशोक सराफ हे मराठी चित्रपटाचा चेहरा: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आजचा दिवस सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस आहे. चित्रपट पुरस्कारांचा बॅकलॉग भरून काढला. आज आपले कलाविश्र्व समृध्द करणारे अनेक मोठे कलावंत येथे आहेत. चित्रपट सृष्टीला आणि आपल्या जीवनाला समृध्द करणारी ही मंडळी आहेत. अशोक सराफ यावर्षी ७५ वर्षाचे झालेत. त्यांच्या अमृत महोत्सवात आपण त्यांना महाराष्ट्र भूषण देत आहोत. मराठी चित्रपटाचा चेहरा हे अशोक सराफ आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

ते म्हणाले की, मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी, नाटक यामध्ये सर्व पद्धतीच्या भूमिका अशोक सराफ यांनी साकारल्या. त्यांनी साकारलेला नायक हा स्वप्नातील नव्हे तर खऱ्याखुऱ्या जीवनातील नायक वाटायचे. त्यांचे चित्रपट पाहून आम्ही मोठे झालो. याशिवाय, सुरेश वाडकर यांनी गेल्या कित्येक वर्षे त्यांच्या सुरेल आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले. ज्या लोकांनी आपले जीवन आनंदमय केले, त्यांना पुरस्कार देण्याची संधी आपल्याला मिळाली, अशी भावनाही यांनी यावेळी व्यक्त केली.

महाराष्ट्राची भूमी ही कलाकारांची खाण: मंत्री सुधीर मुनगंटीवार

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्र हे जसे आर्थिक शक्तिकेंद्र आहे तसे ते सांस्कृतिक शक्तिकेंद्र आहे. महाराष्ट्राची भूमी ही आता कलाकारांची खाण झाली आहे. या कलावंतांचा सन्मान करताना सांस्कृतिक कार्य विभाग सोनेरी झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

फिल्मसिटीच्या बाहेर जिथे चित्रीकरण असेल तिथे शुल्क आकारले जाणार नाही. मनोरंजन करातून सुट या अगोदरच दिली असल्याचे सांगून जगातील सर्वात उत्तम फिल्मसिटी करू शकतो, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

रसिक प्रेक्षकांचे प्रेम कायम हृदयात राहील: अशोक सराफ

महाराष्ट्रातील एक क्रमांकाचा पुरस्कार तुम्ही मला दिलात, याचा खरोकर आनंद आहे. माझ्या जन्मभूमी आणि कर्मभूमी ने माझा गौरव केला. महाराष्ट्र भूषण मिळणाऱ्यांची यादी भाली मोठी. त्यात मला स्थान दिले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. पन्नास वर्षात प्रवासात ज्यांनी मला कळत नकळत का होईना त्यांनी मदत केली आहे, ही सगळी त्यांची किमया आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे रसिक प्रेक्षक. जे आवडले तर डोक्यावर घेतात. रसिकांना आवडलं पाहिजे हाच दृष्टीकोन ठेवला. रसिकांनी प्रेम दिले. ते उपकार मी कधीच फेडू शकणार नाही. माझ्या ह्रदयात हे प्रेम कायम राहील, अशी भावना यावेळी अशोक सराफ यांनी व्यक्त केली.

लतादीदींच्या नावे पुरस्कार हा आशीर्वाद: सुरेश वाडकर

यावेळी मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ पार्श्र्वगायक सुरेश वाडकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. लताजींच्या नावाचा पुरस्कार हा आशीर्वाद आहे. आजही लतादीदी आपल्यात आहेत, हीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. खारगे यांनी केले. सांस्कृतिक दृष्ट्या समृध्द असे आपले राज्य आहे. महान सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यात कलावंतांचा मोठा वाटा आहे. विविध सांस्कृतिक पुरस्कार, महोत्सव आयोजित करून व्यासपीठ निर्माण करण्याचे काम राज्य शासन करीत आहे.तीन वर्षाचे पुरस्कार यावर्षी देत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि मान्यवरांच्या हस्ते राजकपूर जीवनगौरव पुरस्कार २०२० ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती अरुणा इराणी, सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती हेलन यांना प्रदान करण्यात आला. तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी ज्येष्ठ दिग्दर्शक जे. पी. दत्ता, सन २०२१ साठी ख्यातनाम गायक सोनू निगम आणि सन २०२२ साठी विधू विनोद चोप्रा यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने त्यांचे स्नेही श्री. विजय यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ज्येष्ठ कलावंतांना दिला जाणारा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला. सन २०२० साठी ख्यातनाम चित्रपट अभिनेते स्व. रविंद्र महाजनी (मरणोत्तर), सन २०२१ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा चव्हाण आणि सन २०२२ साठी ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती उषा नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्व. रवींद्र महाजनी यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र गश्मिर महाजनी यांनी तर श्रीमती उषा चव्हाण यांच्यावतीने विजय कोंडके यांनी पुरस्कार स्वीकारला.

चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार सन २०२० साठी चित्रपट दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, सन २०२१ साठी ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे आणि सन २०२२ साठी प्रसिद्ध चित्रपट अभिनेते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी चित्रपट समीक्षक अशोक राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे सुत्रसंचलन अभिनेता अमेय वाघ आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी यांनी केले. 0000

जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना गृहोपयोगी संचांचे वाटप करणार – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.२२ (जिमाका) : महाराष्ट्र ईमारत व ईतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्यावतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत राज्यभर गृहोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात ८६ हजार कामगारांना या साहित्याचा संप वाटप करणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

नेर येथे साहित्य वाटपाचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्र्यांहस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे, नेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज नाल्हे, पराग पिंगळे, सुभाष भोयर, नामदेवराव खोब्रागडे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात १ लाख ४१ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहे. त्यापैकी ८६ हजार कामगारांची नोंदणी जिवीत असल्याने त्यांना संचाचे वाटप केले जात आहे. उर्वरीत कामगारांनी आपल्या नोंदणीचे नुतनीकरण केल्यास अशा कामगारांसह नवीन नोंदणी केलेल्या कामगारांना देखील गृहोपयोगी साहित्य संचाचा लाभ देऊ, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.

वर्षात ९० दिवस कामगार म्हणून काम केल्यास त्यांची कामगार म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा कामगारांनी त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करुन घ्यावे व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री श्री.राठोड यांनी केले. जिल्ह्यात जास्तीत जास्त कामगारांना योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्न करत आहे. त्यामुळेच आजच्या साहित्य संच वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे तालुकास्तरावरच कामगारांना संच उपलब्ध झाले असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

जिल्हास्तरीय शुभारंभाला नेर तालुक्यातील २ हजार १४६ नोंदणीकृत बांधकाम कामगारांना पालकमंत्र्यांच्याहस्ते संचाचे वाटप करण्यात आले. या संचात १७ प्रकारच्या एकून ३० गृहोपयोगी साहित्याचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच तालुका ठिकाणी साहित्य संच वाटपाचे कार्यक्रम घेतले जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पराग पिंगळे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरकारी कामगार अधिकारी राहुल काळे यांनी केले. कार्यक्रमास नेर तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

विधानपरिषद लक्षवेधी

0
वन जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत धार्मिक स्थळ निर्माण करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई - वन मंत्री गणेश नाईक मुंबई, दि. 8 : वन जमिनीवर अतिक्रमण करून अनधिकृत...

विकास कामांचे वाटप महिला सहकारी संस्थांना करण्याचे विचाराधीन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
मुंबई, दि. ८ : राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्णयानुसार १० लाख किमतीपर्यंतच्या विकासाच्या कामांचे वाटप मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते आणि पात्र नोंदणीकृत...

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
आंधळी बोगद्याचे अस्तिरकरणाचे काम १६ दिवसात पूर्ण स्टोन क्रशरमुळे गंभीर समस्या नाही - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबई, दि. 8 : सातारा जिल्ह्यातील कै.लक्ष्मणराव इनामदार...

विधानसभा प्रश्नोत्तरे

0
कोळसा वाहतुकीमुळे पिकांची होणारी नुकसानभरपाई ठरवण्यासाठी समिती गठीत -मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. ८ : कोळसा वाहतुकीमुळे होणाऱ्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना द्यावयाच्या सानुग्रह अनुदानाच्या धोरणासाठी अपर मुख्य...

विधानपरिषद इतर कामकाज

0
न्यायमूर्ती भूषण गवई यांची सरन्यायाधीशपदी निवड महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई, दि. ८ : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्या...