सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 852

जळगाव जिल्ह्यासाठी अठरा ‘आपत्कालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीट’

जळगाव दि. 4 (जिमाका ) – महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागामार्फत जळगाव जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन व बचाव कार्यासाठी आवश्यक असलेल्या ‘आपातकालीन शेल्टर टेन्ट व फायर ब्लँकेट रेस्क्यु शीटचे’  उदघाटन ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाले.

जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयाच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास आ.मंगेश चव्हाण, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन.पी. राऊळ, नायब तहसिलदार रुपाली काळे यांच्यासह विविध विभगाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, राज्यात ज्या ज्या ठिकाणी आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवत असते अशा‍ ठिकाणी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसते.  अशा आपत्तीकाळात राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या टिम मदतीसाठी येत असतात आणि ही आपत्ती जास्त काळ असल्यास  राहण्यासाठी तसेच बचाव कार्यातील नागरिकांना तात्काळ उपचाराचासाठी या टेन्टचा उपयोग होणार आहे. जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास अशी सर्व सुविधा असलेले 18 टेन्ट मिळाले असून जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थिती उद्भवल्यास या टेन्टचा उपयोग होणार आहे. हे टेन्ट पोलीस दल, वन विभाग, महापालिका, नगरपालिकेस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी टेन्ट बद्दल सर्वांना सविस्तर माहिती दिली.

00000

पासपोर्ट केंद्रामुळे जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार; लवकरच स्वतंत्र विमानतळाच्या मंजूरीसाठी प्रयत्न करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 04 मार्च (जिमाका वृत्त) : नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यात पासपोर्ट केंद्र सुरू झाल्याने या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार आहे. तसेच जिल्ह्यात स्वंतंत्र विमानतळ मंजूर व्हावे, यासाठी प्रयत्न करणार, असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या डाकघर पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे, धुळ्याचे विभागीय पोस्ट अधिक्षक पी.आर.सोनवणे, नंदुरबारचे पोस्ट मास्तर बी.एस. जोशी, सहाय्यक पोस्ट मास्तर व्हि.आर. चव्हाण, मनोज कुमार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, या जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिना गावित निवडून आल्यापासून जिल्ह्यात वीज, आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालय, शिक्षण, राष्ट्रीय महामार्गांचे विस्तारीकरण, रेल्वे मार्ग आणि रेल्वे गाड्यांचे विस्तारीकरण, आकाशवाणी केंद्र, पासपोर्ट ऑफिस यासारख्या सुविधा प्रधानमंत्री मोदी यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत. जे प्रश्न मांडले त्या प्रश्नावर तात्काळ तोडगा प्रधानमंत्री मोदी यांनी या जिल्ह्यासाठी दिला आहे. लवकरच उपसा जलसिंचन योजना, उकाई बॅकवॉटर च्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनाचे जाळे निर्माण होते आहे. वस्रोद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचे क्लस्टर जिल्ह्यात निर्माण होताहेत. रोजगारासाठी होणारे स्थलांतर या माध्यमातून थांबणार आहे. आता पासपोर्ट ऑफिसच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याची ग्लोबल ओळख निर्माण होणार असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र – डॉ. हिना गावित

विविध संसदीय शिष्टमंडळांसोबत मला विदेश जाण्याची संधी मिळाली. मी ज्या देशांना भेटी दिल्या त्या प्रत्येक देशात नंदूरबारचे शिक्षण आणि नोकरीसाठी गेलेले नागरिक मला भेटतात. वेळेवर पासपोर्ट मिळावा यासाठी शिफारस मागण्यासाठीही नागरिक येत असतात. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक पातळीवर पासपोर्ट केंद्र असायला पाहिजे हे लक्षात आल्यानंतर त्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला. उत्तर महाराष्ट्रात खानदेशात सर्वप्रथम पासपोर्ट केंद्र हे नंदुरबारचे मंजूर झाले आहे. या केंद्रात एकाच ठिकाणी अर्ज, डाक्युमेंट व्हेरीफिकेशन, बायोमॅट्रीक्स सारखी कामे होणार आहेत. त्यामुळे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील शिक्षण आणि नोकरीसाठी विदेश जाणाऱ्यांना दिलासा देणारे केंद्र म्हणून या पासपोर्ट केंद्राकडे पाहायला हवे, असे प्रतिपादन यावेळी खासदार डॉ. हिना गावित यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

यावेळी पोस्ट अधिकारी मनोज कुमार व पासपोर्ट अधिकारी राजेंद्र गावंडे यांनी प्रास्ताविक केले.

 

0000000000

तांत्रिक शिक्षणातून सक्षम देश उभारणीचा पाया घाला : मृदसंधारण मंत्री संजय राठोड

नांदेड, दि 4 : ग्रामीण भागाच्या विकासासाठी तांत्रिक शिक्षण कायापालट करणारे माध्यम ठरू शकते. जगातील सर्वात मोठे स्टार्टअप केंद्र सध्या महाराष्ट्र आणि पर्यायाने भारत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात तांत्रिक शिक्षणाच्या उपलब्धतेतून सक्षम देश उभारणीचा पाया घालणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन मृदसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज येथे केले.

नांदेड येथील ग्रामीण टेक्नीकल अॅन्ड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णूपुरी व कंधार येथील तांत्रिक व कृषी महाविद्यालयात भेट दिल्यानंतर नांदेड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष संजय पवार, प्राचार्य डॉ. विजय पवार,जिल्हा मृद संधारण अधिकारी हनुमंत खटके, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी एल. शरमन, श्रीमती मीनाताई पवार,डॉ. राजेंद्र पवार, प्रोफेसर डॉ. पी. बी. उल्लागडी, उपप्राचार्य संजय देऊळगावकर, विभाग प्रमुख प्रा. गुरुदीपसिंघ वाही, डॉ. निलेश आळंदकर, डॉ. सुनिल कदम, प्रा. देवयानी कापसे तसेच मंत्री महोदयाच्या सुविद्य पत्नी शीतल राठोड उपस्थित होत्या.

बांधकाम क्षेत्र,संगणक क्षेत्र, दोन्ही विभाग देशाच्या जडणघडणीत महत्त्व ठेऊन आहे. या दोन्ही क्षेत्रात करियर घडविण्यास अग्रेसर असणारे विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहे. मराठवाडा परिसरातील ही एक चांगली संस्था आहे. सिव्हील व संगणक क्षेत्रात भरारी घेऊन आपल्या प्रदेशासाठी देशासाठी काम करणे आवश्यक आहे, मोठमोठ्या स्टार्टअप या क्षेत्रात सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मृद व जलसंधारण खात्याची माहिती यावेळी दिली. या विभागाच्या गेल्या काही दिवसातील उल्लेखनीय कामामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढत आहे. कोणत्याही गावात पाणीटंचाई राहणार नाही अशा पद्धतीची मृदसंधारणाची कामे आपल्या विभागाने हाती घेतली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थित विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक सचिव कै. शिवरामजी पवार साहेबाना अभिवादन केले. त्यांच्या दूरदृष्टीतून नांदेड सारख्या शहरात तांत्रिक शिक्षणाचा वटवृक्ष उभा राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. ओमप्रकाश दरक यांनी केले.

00000

मुंबई उपनगर ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ची ग्रंथ दिंडीने झाली उत्साहात सुरुवात

मुंबई, दि. ४ : वाचनाने माणूस अधिक सुसंस्कृत आणि समृद्ध होतो. प्रत्येकाने नॅशनल लायब्ररी येथे दोन दिवसीय सुरू असलेल्या या ग्रंथ महोत्सवाला जरूर भेट द्यावी, असे आवाहन आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केले.

दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड यांनी कळवले आहे. नॅशनल लायब्ररी वांद्रे पश्चिम येथे जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे उद्घाटन मुंबई उपनगरचे आमदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रमोद महाडिक, कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक मंजुषा साळवे, राज्य ग्रंथालयाचे प्रशांत पाटील, ॲड. दीपक पडवळकर, मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड उपस्थित होते.

आमदार ॲड. आशिष शेलार म्हणाले, काळाच्या ओघात वाचनाच्या पद्धती बदललेल्या आहेत. मात्र नव्या पिढीला दोन दिवस येथे सुरू असलेल्या ग्रंथ महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या साहित्य संस्कृतीची माहिती मिळेल. ग्रंथ महोत्सवात विविध प्रकाशकांची पुस्तके देखील आहेत. शासनाच्या या  उपक्रमाचा येथील सर्व ग्रंथ प्रेमी आणि नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमापूर्वी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरुवात झाली. शालेय विद्यार्थ्यांनी या ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. मुंबई उपनगरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. बनसोड यांनी प्रास्ताविक केले. तर कोकण विभागाच्या प्रभारी सहाय्यक ग्रंथालय संचालक श्रीमती साळवे यांनी आभार मानले.

ग्रंथ महोत्सव २०२३ मध्ये उद्या विविध परिसंवाद

दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ५ मार्च रोजी पहिल्या सत्रात ‘प्रकाशन व्यवसायातील आव्हाने’ या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असेल.

वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयी चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे. अवयव दान काळाची गरज हे पुरुषोत्तम पवार सादर करणार आहेत.

याशिवाय राकेश तळगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकर, अस्मिता पांडे राजश्री पोतदार, आशुतोष घोरपडे, समीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

समारोपात वाचनाची आनंदयात्रा या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. सोबत ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामुल्य असणार आहेत.

००००

संध्या गरवारे/विसंअ/

६५ हजार ७२४ रोपट्यांपासून चंद्रपूरमध्ये साकारला ‘भारतमाता’ शब्द

मुंबई, दि. ४ :  वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५,७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे  वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे.

चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५,७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपूर येथे ६५,७२४ रोपट्यांनी लिहिलेल्या ‘हरित भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर, वनअधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना

‘भारतमाता’ शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये ‘भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीत, अशी सूचना मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

 

कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचे ५ मार्च रोजी प्रदर्शन

मुंबई. दि. ४ : राजर्षी शाहू महाराज हे  लोकशाहीवादी व समाज सुधारक राजे होते. राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु झाले आहे. यानिमित्ताने शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित चित्ररथ निर्मिती करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य तरुण पिढीला माहित व्हावे हा या मागील मुख्य उद्देश असून यानिमित्ताने दसरा चौक, कोल्हापूर या ठिकाणी चित्ररथाचे प्रदर्शन ०५ मार्च, २०२४ रोजी सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येणार आहे.

हा चित्ररथ कोल्हापूरमधील महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या चित्ररथाच्या प्रदर्शनाचे उद्धाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे करणार असून या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन चित्ररथ निर्मिती कामी लाभले आहे. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.

000

 दीपक चव्हाण/विसंअ/

 

 

‘ताडोबा भवन’ ठरणार पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 4 : ‘ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला हवे, असा विचार मनात आला. त्यामुळेच 4482 चौ. मीटरमध्ये एक उत्कृष्ट ताडोबा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. ही केवळ एक साधी इमारत नसेल तर ताडोबा भवन हे पर्यावरणाच्या विद्यापीठाचे चालते-बोलते ज्ञानकेंद्र ठरणार आहे’, असा विश्वास राज्याचे वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

चंद्रपूर येथे ताडोबा भवनाच्या नवीन इमारत बांधकामाचे भुमिपूजन कार्यक्रमात वनमंत्री श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वास, महिम गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपवनरंक्षक कुशाग्र पाठक, जितेश मल्होत्रा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, विभागीय वनअधिकारी प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.

वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, देशाचे रक्षण करणा-या जवानांना आपण सॅल्यूट करतो, तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कार्यरत असणा-या वन अधिकारी व कर्मचा-यांना आज सॅल्यूट करण्याची गरज आहे. देशाची सेवा सर्वतोपरी आहे, तशीच वसुंधरेचे रक्षण होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचा वनविभाग हा देशात सर्वोत्कृष्टच असला पाहिजे. जगायचा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, तो पर्यावरणातूनच मिळू शकतो. त्यामुळे ताडोबा भवन हे पर्यावरणाचा आनंद देणारे केंद्र राहील, असे त्यांनी नमूद केले.

मंत्री म्हणाले, ताडोबा भवन हे इको – फ्रेंडली असावे, या इमारतीमध्ये विजेचे बील येता कामा नये, त्यासाठी संपूर्ण इमारत सोलर पॅनलवर करावी. या इमारतीच्या बांधकामासाठी 18 कोटी 8 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे, मात्र इतर अत्याधुनिक सोयीसुविधा करण्यासाठी अतिरिक्त 14 कोटी रुपये त्वरीत देण्यात येतील. वनविभागाच्या प्रस्तावांना गती देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या.

वन विभागात पायाभूत सुविधा उत्तम

वन विभागाच्या इमारती, विश्रामगृह अतिशय उत्तम करण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण राज्यातील वन कर्मचा-यांच्या निवासी वसाहतीसुद्धा कॅम्पमधून उत्तम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

असे राहील ताडोबा भवन

चंद्रपूर येथील मुल रस्त्यावर असलेल्या क्षेत्र संचालक, ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या खुल्या जागेत 18 कोटी 8 लक्ष खर्च करून नवीन ताडोबा भवन बांधण्यात येणार आहे. यात तळमजल्यावर 100 आसन क्षमतेचे ऑडीटोरीयम, पहिल्या माळ्यावर उपवनरंक्षक (बफर) आणि उपवनसंरक्षक (कोअर) यांचे कार्यालय तर दुस-या माळ्यावर क्षेत्रीय संचालक यांचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय संकीर्ण बांधकामामध्ये पेव्हींग ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग या कामांचा समावेश आहे.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

            वाशिम, दि. 4 : वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

            अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता.

            सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले.  सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच आहे.

०००

शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम, दि. 4 :  शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रूपयांत पीक विमा, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा,  तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन  शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडीग, पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणाऱ्या रथाला यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणे, अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना कृषी व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणे, नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे. केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० मे.टन, कोल्ड स्टोरेज ४० मे.टन, रायपेनिंग चेंबर १५ मे.टन, ग्रेडिंग अँड पॅकिंग, २ व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपनी, २ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे.

०००

 

महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी टप्प्याचे लोकार्पण

वेळेची बचत करणारा समृद्धी महामार्ग : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला हातभार : पालकमंत्री दादाजी भुसे

नाशिक, दिनांक 4 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो (तालुका इगतपुरी) येथे आज करण्यात आले.


समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार : मंत्री छगन भुजबळ
रस्त्यांमुळे जिल्हा, राज्य व देशाचा विकास साधला जात असतो. या अनुषंगाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरणार आहे, असा विश्वास यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, या महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 520 कि.मी.चे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. मुंबई ते नागपूर दरम्यान असणारा हा समृद्धी महामार्ग शेतमालाची वाहतूक करण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर वाहने चालवताना नियमांचे पालन करणे आवश्यक असून त्यासाठी एक दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.


वेळेची बचत करणारा समृद्धी महामार्ग : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार
समृद्धी महामार्ग हा अतिशय सरळ व सोपा असून मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांसोबतच 15 जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे सांगून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, देशाचा होणारा विकास हा HIRA (Highways, Infrastructure development, Railways & Airways) डेव्हलपमेंट म्हणून होत आहे. या चारही माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील समृद्धी महामार्गाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.


समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला हातभार : पालकमंत्री दादाजी भुसे
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करून पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मुंबई ते नागपूर दरम्यान असणाऱ्या 701 कि.मी. लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामांपैकी 625 कि.मी. रस्त्याचे काम पूर्ण झाले असून आज तिसऱ्या टप्प्यातील भरवीर ते इगतपुरी या 25 कि.मी. रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. या महामार्गाच्या माध्यमातून पर्यटन व तीर्थस्थळे जोडली जाणार आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. या महामार्गाचा वापर करताना वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे व वाहनाच्या वेगाचे पालन करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, समृद्धी महामार्गाच्या उर्वरित 25 कि. मी. मार्गाचे म्हणजेच इगतपुरी ते आमने येथील काम प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे या महामार्गावर उभारण्यात आलेल्या टोलनाका व इतर 18 ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये स्थानिक नागरिकांचा रोजगाराच्या दृष्टीने समावेश करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिक शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार हिरामण खोसकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे सह व्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी तथा उप व्यवस्थापक विठ्ठल सोनावणे, तहसीलदार तथा व्यवस्थापिका रचना पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फीत कापून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
प्रास्ताविकात अनिलकुमार गायकवाड यांनी संपूर्ण समृद्धी महामार्गाबद्दल व त्यावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आवश्यक सोयी सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. आभार कैलास जाधव यांनी मानले.
असा आहे समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा….
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे तिसरा टप्पा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील 24.872 कि.मी लांबी एकूण 16 गावातून जात असून पॅकेज 13 अंतर्गत 23.251 कि.मी व पॅकेज 14 अंतर्गत 1.621 कि.मी लांबीचा समावेश आहे. या टप्प्यात पॅकेज 13 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (200 मी लांबी), दारणा नदीवरील 1 मोठा पूल (450 मी), 8 छोटे पूल, वाहनांसाठी 5 भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी 8 भुयारी मार्ग, 9 ओव्हरपास, पथकर प्लाझा वरील 4 इंटरचेज, 14 टोलबूथ, 2 वे-ब्रिज, 1 टनेल-275 मी, 27 बॉक्स कल्वर्ट, 27 युटीलीटी डक्ट व पॅकेज 14 अंतर्गत 1 व्हायाडक्ट (910 मी लांबी), आदी सुविधांचा समावेश आहे. या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये 1078 कोटी असून या टप्प्याच्या लोकार्पणामुळे 701 कि.मी पैकी आता एकूण 625 कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस उपलब्ध झालेला आहे.
00000000

ताज्या बातम्या

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

0
मुंबई, दि. १४ : हिंगोली जिल्ह्यातील 'संजीवनी अभियान' हे आरोग्यविषयक नवचैतन्य निर्माण करणारे ठरत असून कर्करोगावरील लढ्यात एक सकारात्मक पाऊल मानले जात आहे. हिंगोलीचे...

बालगृहातील अनुचित प्रकार रोखण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

0
मुंबई, दि. १४ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालगृहात घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व बालगृहांमध्ये अतिदक्षता बाळगून भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी विशेष यंत्रणा...

दिवंगत संजय देशमुख यांना मंत्रालयात श्रद्धांजली

0
मुंबई, दि. १४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख (वय 55 वर्षे) यांचे...

विधानसभा लक्षवेधी

0
कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी कामगारमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि. १४:  कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये पारदर्शकता यावी...

मुंबईकरांच्या स्वप्नातील सुंदर व मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
गृहनिर्माण, सहकार, नगरविकास विभागाकडून आलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांची होणार अंमलबजावणी मुंबई, दि. १४: सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास - समुह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल मुदतीच्या आधीच सादर...