मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 851

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

            मुंबई, दि. ४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी राज्यातील  ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला आपल्या ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याबाबत आवाहन केले होते.

            राज्यात एकूण ८९,२९९ बुथ व ट्रान्झिंट टिम २७,५५३ फिरती पथक १५,४३० व रात्रीचे पथक ६४२ याद्वारे ० ते ५ वर्ष वयोगटातील ९५,६४,६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस (आय.पी.पी.आय.) राबविण्यात येणार असून घरोघरी जाऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

            राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करुन त्यांच्या मार्फत सर्व जिल्हा व मनपा या मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली व त्यांच्यामार्फत मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. सर्व शासकीय विभाग, अशासकीय संस्था, जागतिक आरोग्य संस्था, युनिसेफ, जे. एस.आय., आय.एम. आय. आय. ए.पी. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी मदत झाली.

            देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यांत येत आहे. दिनांक ३ मार्च २०२४ रोजी राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

            या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. दि. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो. यासाठी पोलिओ निर्मुलनाकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणणे आवश्यक आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव दि. 4 (जिमाका) :  महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या  पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील  पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.

मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायत, कोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंय, कोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी  रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.

   मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी ज्या मुक्ताईनगरमध्ये आहे त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली.

000

‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन

           मुंबई, दि. 4 : देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्त्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल,  असे प्रतिपादन  वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.

            त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्‍सन, मनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्‍ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, आलोक मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा  उपस्‍थ‍ित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोळसा, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्ट, रेल्‍वे, रस्‍ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

            मंत्री श्री. लोढा यांनी श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिक, औद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले. ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 संदर्भात एक चित्रफीत दाखवण्यात आली.

            ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 साठी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

५० वर्षांचे व्हिजन तयार करा  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

            चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या  विकासासाठी, जिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन तयार करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्स, वॉटर स्‍पोर्टस, पर्यटन, पर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्या, रिसॉर्टस, बांबू लागवड, मत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार – अलोककुमार मेहता

            लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपचे संचालक (मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट) अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट स्‍थापन करण्‍यात येणार असून त्‍या माध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, असे ते म्‍हणाले. मधुसुदन रुंघटा यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

19 सामंजस्‍य करार, 75 हजार 721 कोटींची गुंतवणूक

            ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’च्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह एकुण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. यामध्ये सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांचे करार करण्‍यात आले ज्‍या द्वारे या भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केली. या विविध करारांवर आर्सेलर मित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहता, न्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ता, चंद्रपूर सोलारचे राजेश ओसवाल, अंबुजा सिमेंट के. सुब्‍बलक्ष्‍मणन, अरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय मिश्रा, राजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍ता, सनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यर, अल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयल, वेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातार, अल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसन, डेस्टीनो मिनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडे, एसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

            मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनामध्‍ये कोळसा खाणी, खनिज, लोह – पोलाद, बांबू, मत्स्यव्यवसाय, पर्यटन सोबतच पुरवठा, डेअर, ग्रीन एनर्जी, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत. मान्‍यवरांनी यावेळी या प्रदर्शनाची पाहणी करून कौतुक केले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजेमेंटचा दीक्षान्त समारंभ

पुणे दि. ४ : जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरूवातीस एक नवकल्पना होते, प्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळविले. आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारे, त्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटच्या 14 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला वीकफील्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी. एस. सचदेवा, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, पीआयबीएम गुपचे अध्यक्ष रमण प्रीत आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, नव्या पिढीने नवोन्मेषक, उद्योजक, नवप्रवर्तक आणि आव्हाने स्वीकारणारे व्यावसायिक व्हावे. त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकेरबर्ग दडलेला असेल. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल.

देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या परिवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकांने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखा परिक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात. जागतिक दर्जाच्या कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात. संपत्ती निर्माण करणारे आणि स्टार्ट अप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडावेत, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

देशातील 50 टक्क्यापेक्षा अधिक रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, फलोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा क्षेत्रांना प्रभावित करणारे आहे. व्यवस्थापन स्नातक आणि व्यवसाय व्यवस्थापकांनी देशाच्या विकासासाठी एआय शक्तीचा उपयोग करण्यात भारताला अग्रेसर ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पदवीदान समारंभात एमबीएच्या 323 व पीजीडीएमच्या 359 अशा एकूण 682 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात  सुवर्णपदक  आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रमन प्रीत यांनी प्रास्ताविकात संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील प्राध्यापक, पालक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

****

वंचितांनी उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रींवर भर द्या – राज्यपाल रमेश बैस

पुणे दि. ४ : देशाची आर्थिक आणि सामाजिक विकासाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्व असून त्यासाठी विद्यापीठांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचविणे, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

हॉटेल ग्रॅण्ड शेरेटन येथे ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@2047’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय संमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाला एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडियाचे डॉ. एम.आर.जयरामण, डॉ.जी.विश्वनाथन, प्रा.मंगेश कराड, डॉ. प्रशांत भल्ला, डॉ. एच.चतुर्वेदी आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, शाश्वत आर्थिक विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्यास विकसित भारताचे उद्दीष्ट गाठता येईल. शिक्षणाच्या क्षेत्रात आपण कुठे आहोत याचे चिंतन करण्याची हीच योग्य वेळ आहे. भारतातील विद्यार्थी विकसित राष्ट्रातील विद्यापीठांमध्ये का प्रवेश घेतात याचाही विचार करणे गरजेचे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगच्या काळात शिक्षण क्षेत्रात वेगाने बदल पहायला मिळतील. अशा परिस्थितीत विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभ्यासक्रमाचे आदान-प्रदान करण्यासाठी जगातील उत्तम विद्यापीठांसोबत आपल्याला जोडून घ्यावे लागेल. देशातील विद्यापीठात संशोधनाकडे दुर्लक्ष होत असून संशोधनावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणात 2035 पर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 50 टक्क्यापर्यंत नेण्याचे महत्वाकांक्षी उद्द‍िष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट गाठण्यासाठी विद्यापीठांना समजातील वंचित, सामाजिक आणि आर्थिकदृष्टया मागास, दिव्यांग, एलजीबीटीक्यू आदी घटकांपर्यंत पोहोचावे लागेल. आर्थिक अडचणींमुळे कोणीही उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करावे लागतील. नोकरी करणारे, गृहिणी, बंदिजन, शिक्षणापासून दूर झालेल्या व्यक्तींपर्यंत मुक्त शिक्षण पोहोचवावे लागेल, असे राज्यपाल म्हणाले.

आज बरेच विद्यार्थी रोजगार मिळावा यासाठी शिक्षण घेतांना दिसतात. आपला पारंपरिक अभ्यासक्रम रोजगारासाठी कौशल्य उपलब्ध करून देण्यास पुरेसा नसल्याने त्यात बदल करून कौशल्य शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. 12 वी नंतर कौशल्य शिक्षण हेच खरे उच्च शिक्षण असून विद्यापीठांनी अशा अभ्यासक्रमांची रचना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे सहकार्य घ्यावे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी समावेशक, न्यायसंगत आणि परिवर्तनकारी अभ्यासक्रमाची रचना विद्यापीठांनी करावी, असे आवाहन श्री.बैस यांनी केले. विद्यार्थी  नवोन्मेषक, उद्योजक आणि नोकरी निर्माण करणारे व्हावेत यादृष्टीने नवी शिक्षण पद्धती विकसित करण्यावर शिक्षणतज्ज्ञ, नीति निर्धारण करणारे आणि शिक्षण प्रवर्तकांनी भर द्यावा, अशी अपेक्षाही राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

यावेळी डॉ. जयरामन, श्री. विश्वनाथन, श्री.चतुर्वेदी आणि प्रा.कराड यांनीही विचार व्यक्त केले.

****

 

कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.४:  अवसरी खुर्द येथील कवियत्री शांता शेळके सभागृहाच्या उर्वरित कामांसाठी लागणारे ३ कोटी रुपये मंजूर करण्यात येईल. तसेच शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावेत, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथील ‘कवियत्री शांता शेळके’ सभागृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, तहसीलदार संजय नागटिळक,  तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, मराठी साहित्य क्षेत्रात मनाचा तुरा रोवणाऱ्या कवियत्री शांता शेळके यांचा जन्म इंदापूर तालुक्यात झाला. त्यांचे बालपण जिल्ह्यासह मंचर परिसरात गेले. तालुक्याच्या याठिकाणी  ज्ञान, गुण, कौशल्यवृद्धीसाठी चर्चा, ज्ञान, संवाद, परिसंवाद, व्याख्यान, परिषद अशा प्रकारच्या सांस्कृतिक केंद्राची गरज लक्षात घेऊन शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन परिसरात  ‘कवियत्री शांता शेळके’ यांच्या नावाला साजेसे अत्याधुनिक आणि अतिशय सुंदर असे १ हजार आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. सभागृहाचे उद्घाटन आपल्या जीवनात आनंदाचा, अभिमानाचा आणि कर्तव्यापूर्तीचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

सभागृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळेल. त्यांना चांगल्या व्यक्तींचे विचार ऐकता येईल आणि त्यांच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. कवियत्री शांता शेळके यांच्या नावाला साजेसे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करावेत. तसेच सभागृह व परिसर स्वच्छ महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांने काळजी घ्यावी,असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

आंबेगाव परिसराचा विकास करण्यासोबत सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखण्यासाठी सहकार मंत्री श्री. वळसे पाटील गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. परिसरात विविध विकासकामे चालू असून याचा येथील नागरिकांना लाभ होईल, असेही उमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले.

मंत्री श्री. वळसे पाटील म्हणाले, अवसरी खुर्द परिसरात अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या रूपात वैभव उभे आहे. आज हे एकमेव महाविद्यालय गावाच्या ठिकाणी उभे आहे. आज या ठिकाणी वेगवेगळे संशोधन होत आहे.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सभागृहाची आवश्यकता लक्षात घेता हे सभागृह उभारण्यात आले आहे.

काळाच्या ओघात दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय टिकले असून ते चांगले दर्जेदार  विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. या महाविद्यातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देश विदेशात नोकरी करत आहे. आजच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबर कुटुंबाचा उदरनिर्वाह केला पाहिजे, असे श्री. वळसे पाटील म्हणाले.

पुणे म्हाडाचे अध्यक्ष श्री. आढळराव पाटील, सह संचालक श्री.जाधव आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. पानगव्हाणे यांनी विचार व्यक्त केले.

0000

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

पुणे, दि.४: राज्यातील पोलीस दल सक्षम करण्यासाठी त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबरच  त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पोलीस दलाला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे,  असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

आंबेगाव तालुक्यात मंचर येथील पोलीस ठाणे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, घोडेगाव येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे निवासस्थान, जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे लोकार्पण श्री.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ यमपल्ले, तहसीलदार संजय नागटिळक, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक कैलास पाटील, तंत्र शिक्षण विभागाचे सह संचालक दत्तात्रय जाधव आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, राज्याची कायदा व सुव्यवस्था राखत असतांना पोलीस दल विविध सण, उत्सव आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्याच्यावेळी ऊन, थंडी, पाऊस, सुट्टीची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या सोबत त्यांचा परिवारांदेखील विविध अडीअडचणीना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा देणे गरजेचे असून त्याादृष्टीने शासन प्रयत्नशील आहे.

पोलीस दलासाठी अत्याधुनिक पोलीस ठाणे, सुसज्ज निवासी वसाहती उभे करण्यात येत आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पुणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तसेच जिल्हा ग्रामीण पोलीस दलाला वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.  पर्यावरणाचा समतोल साधतांना शासकीय इमारती आणि वसाहतीच्या ठिकाणी चांगल्याप्रकारे जागेचे सपाटीकरण करुन अधिकाधिक वृक्षारोपण करावे, परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

मंचर येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीकरीता ११ कोटी ५१ लाख रुपये, पोलीस अधिकारी व अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी ८१ लाख रुपये, घोडेगाव येथे पोलीस अधिकारी आणि अंमलदार निवासस्थान इमारत १४ कोटी रुपये  आणि जुन्नर-आंबेगाव उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीकरीता २ कोटी ३४ लाख रुपये खर्च करुन  आंबेगाव परिसराच्या वैभवात भर घालणाऱ्या इमारती उभारण्यात आल्या आहेत.

घोडेगाव येथील ४० खाटाचे ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान इमारतीचे बांधकाम करण्यासाठी २७ कोटी २३ लाख रुपये, बस स्थानक इमारत  पूर्णबांधणी करिता २ कोटी रुपये, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा प्रत्येकी ७ कोटी रुपये अशा सुमारे १२३ कोटी रुपये खर्च होणार आहे. यामुळे नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील.

शासनाच्यावतीनेबेरोजगार तरूणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत आहे. शेतकरीवर्गासोबत सर्व घटकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येतील, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी श्री.पवार यांच्या हस्ते घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे निवासस्थान आणि बस स्थानक इमारत, शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृह इमारतीचे तसेच गोहे, आहुपे आणि तेरूगंण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे आदर्श शाळेत रूपांतरित करण्याचा कामांचे ई-भूमीपूजन करण्यात आले.

000

महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे जानेवारीत काढलेल्या लॉटरीच्या मासिक सोडतीचे निकाल जाहिर

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून जानेवारी-२०२४ महिन्यातील  मासिक सोडतीचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. १३ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. १७ जानेवारी  रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २० जानेवारी  रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर, दि. २४ जानेवारी  रोजी महाराष्ट्र तेजस्व‍िनी व दि. २८  जानेवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ८६९ तिकीटांना एकूण ७ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गौरव मालिका तिकीट क्रमांक G-38/3627 या मे. प्रिन्स एजन्सी, काळबादेवी, मुंबई कडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम ३५ लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ६ हजार २४१ तिकीटांना एकूण रू.४३ लाख ८ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी न्यू इयर विक्री झालेले एकूण १ हजार ७०५ तिकीटांना एकूण ८ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी मालिका तिकीट क्रमांक TJ-02/3241 या महाराजा लॉटरी सेंटर, इचलकरंजीकडून विक्री झालेल्या तिकीटास रक्कम  २५ लाख रुपये किंमतीचे प्रथम क्रमांकाचे एक बक्षिस जाहीर झाले आहे. या सोडतीच्या एकूण ९१२ तिकीटांना एकूण ३१ लाख ७१ हजार ८०० रुपये किंमतीचे बक्षीस जाहीर झाले आहेत. महाराष्ट्र गजराज विक्री झालेल्या तिकीटांमधून एकूण २ हजार ६६० तिकीटांना एकूण २ लाख ९८ हजार ३५० रुपये किमतीचे बक्षीस जाहीर झाले आहे.

सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून १० हजार  रुपये वरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी या कार्यालयाकडे सादर करावी.  रूपये १०, हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

 

 

महाराष्ट्र राज्य लॉटरी; फेब्रुवारीमधील सोडतींचा निकाल जाहीर

मुंबई, दि. ४ :- महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक सोडती काढल्या जात असून फेब्रुवारी-२०२४ मधील मासिक सोडती काढण्यात आलेल्या सोडतींचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  यामध्ये ९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र सहयाद्री,  १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती, २० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र तेजस्विनी, २१ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गौरव आणि २४ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतींचा समावेश आहे.

त्यापैकी महाराष्ट्र सह्याद्री या विक्री झालेल्या तिकीटांमधून  ३ हजार ३० तिकीटांना एकूण  ७ लाख ५८ हजार ५० रुपये किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गणेशलक्ष्मी माघी गणपती या सोडतीच्या विक्री झालेल्या  १ हजार ६८६ तिकीटांना  ८ लाख ७० हजार ५०० रुपये किंमतीची बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र तेजस्विनी या सोडतीच्या विक्री झालेल्या  ९३२ तिकीटांना  ६ लाख १५ हजार ७०० रुपये  किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गौरव या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून  ६ हजार ९८१ तिकीटांना  ९ लाख २७ हजार किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत. महाराष्ट्र गजराज या सोडतीच्या विक्री झालेल्या तिकीटांमधून  २ हजार ५३३ तिकीटांना  २ लाख ८९ हजार ४०० रुपये किंमतीची  बक्षिसे जाहीर झाली आहेत.

लॉटरी तिकीट खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली प्रक्रिया पूर्ण करून रुपये  १० हजारवरील बक्षिसाची मागणी उपसंचालक (वित्त व लेख) महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी कार्यालयाकडे सादर करावी. तर १० हजाराच्या आतील बक्षीस रकमेची मागणी  विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे  उपसंचालक (वित्त व लेखा) महाराष्ट्र राज्य लॉटरी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

 

आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षागृह

मुंबई, दि. ४ : मुंबई उपनगर जिल्ह्यात आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनातर्फे सुरक्षा गृह पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी.एच.नागरगोजे यांनी दिली.

सुरुवातीला एक महिन्यासाठी नाममात्र शुल्कावर सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता जास्तीत – जास्त एका वर्षापर्यंत सुरक्षागृह उपलब्ध करून देण्यात येईल. या सुरक्षागृहाची व्यवस्था समाज कल्याण विभागामार्फत पुरवण्यात येणार आहे. उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

तरी ऑनर किलींग प्रकरणात त्रस्त असणाऱ्या जोडप्यांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.

0000

हेमंतकुमार चव्हाण/वि.सं.अ./

 

 

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...