सोमवार, जुलै 14, 2025
Home Blog Page 853

मानवी जीवन, सृष्टीच्या संरक्षणासाठी व्याघ्र संवर्धन गरजेचे – वनमंत्री सुधीर मुनंगटीवार

चंद्रपुरातून जागतिक स्तरावर व्याघ्र संरक्षणाचा संदेश

चंद्रपूर, दि. २: वाघ तिथे वन आहे….वन तिथे जल आहे….जल तिथे मानवसृष्टी आहे.’ पर्यावरणाच्या जीवनचक्राचा महत्वाचा घटक असलेला वाघ वाचला तरच जंगल आणि जीवनसृष्टी वाचेल. त्यामुळे मानवी जीवन आणि सृष्टीच्या संरक्षणासाठी आपण सर्व जण एकत्र येऊन वाघ वाचविण्याचा संकल्प करूया, असा संदेश वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

महाराष्ट्र शासन आणि वन विभागाच्यावतीने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

देश-विदेशातील पर्यटकांमध्ये सर्वांत लोकप्रिय असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे, असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘ताडोबा महोत्सव’ शाश्वत विकासाला चालना देत आपला नैसर्गिक वारसा जतन करण्यासोबतच वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा आहे. सर्वांना संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेत आम्ही केवळ आमच्या मौल्यवान जैवविविधतेचे रक्षणच करीत नाही तर स्थानिकांसाठी आर्थिक प्रगतीच्या संधीही निर्माण करतो. दोन दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मध्ये ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे कौतुक केले. चंद्रपूर जिल्ह्याला आंतरराष्ट्रीय शोकेसमध्ये नेण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, सिंगापूरच्या धर्तीवर आता चंद्रपुरात सफारी सुरू करण्यात येईल. यात न्युझीलंड, ऑस्ट्रेलियाचे प्राणी बघायला मिळतील. विशेष म्हणजे सफारी करताना आपण पिंजऱ्यात तर आपल्या आजुबाजूला मोकळ्या वातावरणात वन्यजीव राहतील, असे नियोजन करण्यात आले आहे. ताडोबा हे जगातील सर्वांत उत्तम व्हावे, असा प्रयत्न आहे. गत काळात वृक्षलागवडीतून राज्यात 2 हजार 550 चौरस किलोमीटर हरीत आच्छादन वाढले आहे. याचा सर्वांना अभिमान आहे. ताडोबा महोत्सवात तीन दिवस विविध महत्वाच्या विषयांवर चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आहे, नागरिकांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही वनमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

तत्पूर्वी दीप प्रज्वलन आणि आदिवासी नृत्याने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी बल्लारपूर येथील जयशिवराय ग्रुपने वाघनृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी ताडोबा प्रकल्पाविषयी तसेच या आयोजनामागची भूमिका विशद केली.

०००

वाघांच्या जतनाबाबत देशाची शान ठरलाय ताडोबा – रविना टंडन

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे नेतृत्व आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने साकारले स्वप्न
  • जगात जाईन तिथे ताडोबाचा झेंडा फडकावेन

चंद्रपूर, दि.२– वाघांचं जतन करून त्यांची संख्या वाढविण्याबाबत संपूर्ण देशाला जो अभिमान वाटतो, त्याचे सर्वाधिक श्रेय ताडोबाचे आहे. राष्ट्रीय संपदा, माणसं आणि निसर्गाचा समतोल राखत ही जी निसर्ग रक्षणाची घोडदौड चालली आहे, त्याचे श्रेय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कुशल नेतृत्व, वनविभागातील कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि जंगलातील गावकऱ्यांचे सहकार्य यामुळे साकार होऊ शकले आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री व वन्यजीव सद्भावना दूत रविना टंडन यांनी शुक्रवारी चंद्रपूर येथे केले.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आयोजित चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी  विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबलप्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक)  शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदि मान्यवरांची उपस्थिती होती .

या प्रसंगी बोलताना रविना टंडन भावूक झाल्या. ‘माझं ताडोबाशी फार जवळचं आणि भावनिक असं नातं आहे. मी अनेकदा इथे येते. ताडोबाच्या जंगलातील वाघ आणि त्यांचे परिवार ओळखता यावेत इतकी भटकंती मी ताडोबात केली आहे. ताडोबा हे प्रेमाचं जंगल आहे. इथे आलं की माणूस या जंगलाच्या मोहात पडतो,’ अशा भावना व्यक्त करतानाच, पर्यावरण, जंगल आणि वाघांच्या  संवर्धनासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

आपल्या भाषणात रविना टंडन यांनी वनसंवर्धनाचं काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांपासून तर जिप्सी चालक, गाईड आणि गावकरी सर्वांना श्रेय बहाल करत, असंच काम करत राहण्याचं आवाहन केलं. एखाद्या वाघिणीने पिलाला जन्म दिल्याची बातमी जशी आनंद देऊन जाते, तसेच एखाद्या वाघाच्या मृत्यूची घटना तेवढीच वेदनादायी असते. पण एक मात्र खरं आहे की ताडोबाच्या जंगलाची जादू जगात कुठेही बघायला मिळत नाही. म्हणूनच या टायगर कॅपिटलची महती मी जगाला सांगणार आहे. जगाच्या पाठीवर जिथे जाईल तिथे ताडोबाचा झेंडा फडकावणार असल्याची ग्वाही देखील रविना टंडन यांनी यावेळी दिली.

०००

चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवातविश्वसुंदरींनी दिला व्याघ्र संवर्धनाचा संदेश

  • वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहायचा योग – ज्युलिया मॉर्ले
  • तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयोजन

चंद्रपूर, दि. : ‘मिस वर्ल्ड’स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशातून आलेल्या विश्वसुंदरी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सौंदर्यवती चंद्रपुरातील ताडोबाच्या चांगल्याच मोहात पडल्या. चंद्रपुरातील व्याघ्र संवर्धनाचा मूलमंत्र आपापल्या देशात घेऊन जाण्याचा निर्धार करीत पुन्हा एकदा ताडोबाला भेट देण्याची इच्छाही व्यक्त केली. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढकारातून तीन दिवसीय ‘ताडोबा महोत्सव 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वन्यजीव सद्भावना दूत प्रसिद्ध सिनेअभिनेत्री रविना टंडन, विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक विरेंद्र तिवारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिम गुप्ता, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण, वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

ज्युलिया मॉर्ले म्हणाल्या, ‘ताडोबा व्याघ्र प्रकल्पात अतिशय सुदंर वाघ आहेत. वाघांना वाचविले तरच आपण आपले पर्यावरण आणि सृष्टीचे भविष्य सुरक्षित करू शकतो.’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमंत्रित केल्याबद्दल मॉर्ले यांनी आभार मानले. जमील अजमल सैद्दी म्हणाले, ‘वनमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ताडोबा पाहण्याचे सौभाग्य लाभले. ताडोबा एक वरदान आहे. त्यामुळे प्रत्येक वृक्षाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. वन हेच जीवन आहे, असे मानून आपले भविष्य सुरक्षित करा.’

2015 मधील ‘मिस इंडीया’ नवीनी देशमुख म्हणाल्या, ‘वाघ हे दुर्गामातेचे वाहन आहे. वाघ धैर्याचे प्रतिक आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाकडे आपले दुर्लक्ष झाले म्हणून प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.’ विश्वसुंदरी स्पर्धेतील कॅरोलिना व्हेरिस्का म्हणाल्या, ‘वाघांचे संरक्षण या प्रकल्पाबद्दल ऐकून खूप आनंद झाला. येथे कुटुंबासह वाघ बघण्याचा योग आला. वाघ हा सृष्टीच्या जीवनचक्राचा महत्वाचा भाग आहे. सन 2021 आणि 2022 मधील मिस इंडिया सिनी शेट्टी म्हणाल्या, चंद्रपुरात येऊन आज अतिशय आनंद झाला. वाघांचे संरक्षण या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी मिळाली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे.’

ऑस्ट्रेलियाच्या क्रिस्टिन लाइज यांनी ‘सेव्ह द टायगर प्रोजेक्ट’ ही अतिशय महत्वाची आणि तेवढीच सुंदर संकल्पना असल्याचे म्हटले. इंग्लडच्या जेसिका म्हणाल्या, ‘येथे येऊन स्वत:ला भाग्यशाली समजत आहे. या कार्यक्रमाचा आम्ही एक भाग बनू शकलो, याचा आनंद आहे. स्पेनच्या पोला म्हणाल्या, वाघ हे धैर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतिक आहे. जैवविविधतेसाठी वाघ महत्वाचा घटक असून अशा उपक्रमातून पर्यावरणाचे संरक्षण होईल.’

पटनायक यांचा सॅण्ड आर्ट शो :

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक आणि त्यांच्या चमूने सॅण्ड आर्ट शो मधून ‘वाघ वाचवा’ असा संदेश दिला. यावेळी त्यांनी वाळूचे अतिशय उत्कृष्ट शिल्प साकारले. उपस्थितांनीही त्यांच्या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पुस्तकांचे प्रकाशन :  

वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जैवविविधता मॅप ऑफ ताडोबा कॉफी टेबल बुक, ताडोबा डायरीज, प्रमुख गवत प्रजाती, सी.एस.आर. बुकलेट, ट्रिज ऑफ मेळघाट, महाराष्ट्रातील वने आणि वनवार्ता या न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले.

०००

 

 

चंद्रपुरच्या ‘भारतमाता’ शब्दाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्रदान

 चंद्रपूर, दि. २ :  वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा वन विभाग एकामागून एक यशाचे टप्पे गाठत आहे. आतापर्यंत वनविभागाने चार लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केले. आता 65724 रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दांची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.

चंद्रपूर येथे वनविभागाच्या वतीने 1 ते 3 मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव 2024’ आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प आज (शनिवारी) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. 26 प्रजातींच्या तब्बल 65724 रोपट्यांनी ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती केली आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त केले.

 

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘आतापर्यंत वन विभागाने चार लिमका रेकॉर्ड केले. आता मात्र प्रथमच राज्याच्या वनविभागाने गिनेस बुक ऑफ वर्ड रेकॉर्ड केला आहे. यासाठी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सर्व वन अधिकारी, वन कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. चंद्रपुरात 65724 रोपट्यांनी लिहिलेल्या ‘ग्रीन भारतमातेचा’ संकल्प संपूर्ण जगभरात पोहचला असून ही आमच्यासाठी केवळ एक फोटो फ्रेम नसून प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महामार्ग आहे.’

कार्यक्रमाला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसरंक्षक (वन्यजीव) तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (कार्मिक) शोमिता विश्वास, महिप गुप्ता, ताडोबाचे क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमचे स्वप्नील डांगरीकर, वनअधिकारी प्रशांत खाडे, मिलिंद वेर्लेकर आदी उपस्थित होते.

त्वरित उद्यान करण्याच्या सूचना

ग्रीन भारतमातेच्या शब्दातील सर्व रोपट्यांचे चंद्रपूर येथे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या नावाचे वनविभागाने एक चांगले उद्यान त्वरीत साकारावे. तसेच आज मिळालेले प्रमाणपत्र हे तेथे दर्शनी भागात लावावे. विशेष म्हणजे ही रोपटे सुध्दा नवनिर्मित उद्यानामध्ये ‘भारतमाता’ याच शब्दाप्रमाणे लावावीत, अशा सुचनाही त्यांनी केल्या. यापुढेही राज्याचा वनविभाग असाच अग्रेसर राहणार असून या विभागाच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येऊ देणार नाही. वनविभागासोबत नागरिकांनी असेच आशिर्वाद आणि शुभेच्छा कायम ठेवाव्यात, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

०००

कामगार कल्याणासाठी स्वतंत्र निधीची तरतूद – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. २ (जिमाका) :कामगारांच्या कल्याणासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक नोंदीत कामगार कुटुंबाला ३० गृहोपयोगी भांड्यांचा संच दिला जाणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले आहे.

ते शहादा तालुक्यातील नांदरखेडा,तोरखेडा,सारंगखेडा येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमास जि.प.सभापती हेमलता शितोळे पंचक्रोशीतील गावांचे सरपंच, अधिकारी, पदाधिकारी तसेच कामगार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री डॉ.गावित पुढे म्हणाले की, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत कामगारांना त्यांच्या गरजेप्रमाणे मदत केली जाते. शिक्षण, आरोग्य,आणि भविष्य संरक्षणासाठीच्या विविध योजना या मंडळामार्फत सुरू आहे. ज्या जिल्ह्यात मध्यान्ह भोजन योजनेची आवश्यकता नाही, त्या काही मोजक्या जिल्ह्यात गृहोपयोगी साहित्य वितरणाची योजना सुरू करण्यात आली, त्यात आपल्या नंदुरबार जिल्ह्याचा समावेश आहे. कामगारांसाठी कल्याणकारी योजनांसोबत जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना राबवल्या जात असल्याचे सांगताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, गावात समाजाच्या लोकसंख्येला अनुसरून समाजमंदिरे उभारली जाणार आहेत, त्यासाठी या आर्थिक वर्षात किंवा पुढील आर्थिक वर्षात जून महिन्यात मंजूरी दिली जाईल. जिल्ह्यातील २ हजार बचत गटांना मदत करताना ते जो व्यवसाय निवडतील त्या व्यवसायाचे प्रशिक्षण, अर्थसहाय्य देण्याचा  आदिवासी विकास विभागाचा आहे.

ते पुढे म्हणाले की, १ हजार क्रिकेट टीम्स, ८०० भजनी मंडळे, ३७ बॅंड पथकांना उपयुक्त सर्व साहित्य देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील २ हजार लोकांना प्रत्येकी दोन गायी स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी दिल्या जाणार आहेत. मागेल त्याला शेळी गट दिला जाणार आहे. शेळी गट योजना आदिवासी बांधवांसाठी १०० टक्के मोफत असून बिगर आदिवासी समुदायाच्या लोकांसाठी ती ५० टक्के दराने दिली जाणार राबवली जाणार आहे. तसेच शबरी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून बचत गटांना शेतीपूरक व्यवसायांसाठी केवळ ४ टक्के दराने कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी बचत गटात ६० टक्के आदिवासी व उर्वरीत ४० टक्के सभासद बिगर आदिवासी असले तरी चालणार आहेत. शबरी घरकुल योजनेसह विविध योजनांमधून प्रत्येक समुदायासाठी घरकुले केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहेत. २ वर्षात २४ हजार घरे मंजूर केली जाणार आहेत.

जिल्ह्यातील ९० टक्के शेती सिंचनाखाली आणली जाईल, असे सांगताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, तापी नदीवर १६ उपसा सिंचन योजनांच्या कामाला गती देण्यात आली आहे. बंद पडलेल्या सिंचनाच्या  लिफ्ट पुन्हा कार्यान्वित केल्या जातील, प्रसंगी नव्या लिफ्टस् ची निर्मितीही केली जाईल.शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून इथला शेतकरी एकरी ३ ते ५ लाख उत्पन्न काढू शकेल एवढे सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे.

थोडक्यात पण महत्वाचे…

◼ कामगारांना दिला जाणार ३० गृहोपयोगी वस्तुंचा संच

◼ २ हजार बचत गटांना प्रशिक्षणासह अर्थसहाय्य करणार

◼ एक हजार क्रिकेट टीम्स्ला खेळण्यांचे साहित्य दिले जाणार

◼ ८०० भजनी मंडळांना भजन साहित्य

◼ ३७ बॅंड पथकांना वादन साहित्य

◼ दोन हजार नागरिकांना गायींचे तर मागेल त्याला शेळी गटांचे वितरण करणार

◼ जिल्ह्यातील ९० टक्के शेती सिंचनाखाली आणनार

◼ २४ हजार घरकुले देण्याची क्षमता

◼ बचत गटांना व्यवसाय सुरू करण्यासाठी शबरी वित्त व विकास महामंडळाच्या माध्यमातून ४ टक्के दराने कर्ज देणार

०००

महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन

सांगली  दि. २ (जिमाका) :महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई व सांगली जिल्हा प्रशासन यांच्यावतीने दि 2 ते 6 मार्च या कालावधीत कल्पद्रुम मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या महासंस्कृती महोत्सवाचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी आमदार सुधीर गाडगीळ मंत्री श्री .खाडे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुमन खाडे, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उप जिल्हाधिकारी ज्योती पाटील, मनपा उपायुक्त स्मृती पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी मंत्री श्री. खाडे म्हणाले की, सांगली जिल्ह्याला कला, साहित्य, संगीत, क्रीडा आदी बाबींची समृद्ध आणि उज्ज्वल सांस्कृतिक परंपरा आहे. जिल्ह्यातील स्थानिक कलावंताना वाव देण्यासाठी शासनाच्यावतीने हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. मराठी रंगभूमीची सुरुवात सांगलीमधूनच झाल्याचे सांगून राज्य शासनाच्या या उपक्रमाला सांगली जिल्ह्यातील रसिक प्रेक्षकांनी उंदड प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ यांनी ही आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी श्री. खाडे आणि आ. गाडगीळ यांनी या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनाला भेट देवून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी राज्यगीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांनी केले.

०००

सर्वसामान्यांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे ही मुख्यमंत्र्यांची अपेक्षा – उपसभापती डॉ. गोऱ्हे

बारामती दि. ०२: सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, आज मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या दृष्टिकोनातून उद्योजक आणि प्रशिक्षणार्थी तसेच प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवकांसोबत कौशल्य, कला, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाद्वारे संवादाची संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध केली जात असल्याचे सांगत विभागाचे अभिनंदन केले. तसेच यापूर्वी देखील विभागाने ठिकठिकाणी असे मेळावे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात नोंदणीकृत उद्योजक ३४७, अधिसूचित केलेली रिक्त पदे ५५ हजार ७२ म्हणजे एवढी रिक्त पदे विविध कंपन्यांमध्ये असून त्यांना योग्य उमेदवारांची अपेक्षा आहे. उमेदवार नोंदणी ३३ हजार १९ आणि स्टार्टअप स्टॉल २६ अस आजच्या कार्यक्रमामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर रोजगार, कायदा सुव्यवस्था त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी सारखा उपक्रम असेल महिला सक्षमीकरण योजना आहे या सगळ्या योजनांच्याबद्दल देखील उहापोह झाला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन बारामती येथे करण्यात आले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री मंगल प्रभात लोढा, उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच सुनेत्रा पवार, संजय घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

०००

मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या प्रदान

मुंबई दि. २ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या मंडळ कृषी अधिकारी संवर्गातील १२१ उमेदवारांना केवळ ७ महिन्यांच्या विक्रमी वेळेत नियुक्त्या देण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

महाराष्ट्र कृषी सेवा गट ब म्हणजेच मंडळ कृषी अधिकारी संवर्गासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2022 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या.या परीक्षांमध्ये आयोगाने पात्र ठरवलेल्या उमेदवारांची यादी जुलै 2023 मध्ये कृषी विभागास प्राप्त झाली. उत्तीर्ण उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशी सर्वसाधारण प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ही प्रक्रिया बरीच वेळखाऊ असते.

मात्र याबाबतीत केवळ ७ महिने इतक्या विक्रमी वेळेत नियुक्त्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणी, जात प्रमाणपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या बाबींच्या अधीन राहून नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत.  यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची कामे गतीने होण्यास मदत होणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सर्व नवनियुक्त मंडळ कृषी अधिकारी यांचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

हे अधिकारी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देतील तसेच कृषी विभागाचा लौकिक वाढवण्यात योगदान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

शासन निर्णय

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/03/202403012327459301.pdf”]

०००

दत्तात्रय कोकरे/वि.सं.अ./

राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीस प्रारंभ

नागपूर दि. २ : महाराष्ट्र  राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीच्या दोन दिवसीय बैठकीस येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे आणि नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या उपस्थितीत आज प्रारंभ झाला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी होते. यावेळी  माहिती संचालक तथा समितीचे सदस्य सचिव डॉ.राहुल तिडके, नागपूर विभागाचे माहिती संचालक हेमराज बागुल, मराठवाडा विभागाचे माहिती संचालक किशोर गांगुर्डे तसेच राज्य अधिस्वीकृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

डॉ. इटनकर यांनी प्रशासनातील कारकिर्दीत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीं सोबतच्या सौहार्दपूर्ण संवादाचे अनुभव कथन केले. तसेच, येत्या लोकसभा सार्वत्रित निवडणुकीत प्रसारमाध्यमांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

अश्वती दोरजे म्हणाल्या की, पोलीस आणि पत्रकार हे जनतेला न्याय देण्याचे काम करतात. पोलीस गुन्ह्यातील सत्य शोधून काढतात तर पत्रकार हे सत्य जनतेसमोर मांडतात.

राहुल पांडे यांनी सांगितले, पत्रकारांजवळ लेखणीचे शस्त्र असून त्याचा सुयोग्य उपयोग व्हावा. राज्य अधिस्वीकृती समितीने पात्र व योग्य पत्रकारांस अधिस्वीकृती पत्रिका देण्याची व याचा सुयोग्य वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय संबोधनात यदू जोशी म्हणाले, माहितीच्या अधिकाराबाबत यशदा पुणे यांच्या मार्फत राज्यातील पत्रकारांना विभाग निहाय प्रशिक्षण देण्याबाबत पुढाकार घेण्यात येईल. तसेच, अधिस्वीकृती पत्रिका योग्य पत्रकारांना‍ मिळण्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

संचालक (माहिती/प्रशासन) हेमराज बागुल यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. राहुल तिडके यांनी आभार मानले. नागपूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी आणि सदस्यही यावेळी उपस्थित होते.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक कार्यालयाच्यावतीने अधिस्वीकृती समितीच्या चौथ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या समितीचे राज्याच्या विविध विभागातील सदस्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व विभागांचे संचालक, उपसंचालक या बैठकीसाठी उपस्थित असून ३ मार्च २०२४ पर्यंत ही बैठक चालणार आहे.

०००

मुंबई उपनगर जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

मुंबई, दि.२: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर तर्फे दरवर्षी ग्रंथ महोत्सव साजरा केला जातो. यंदा हा महोत्सव नॅशनल लायब्ररीच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ व ५ मार्च रोजी होणार आहे. ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री  मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते होणार असून सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांची यावेळी उपस्थिती लाभणार आहे.

दि.४ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आमदार अॅड. आशिष शेलार आणि शिक्षणाधिकारी राजू तडवी यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडीने महोत्सवाची सुरवात होईल.

दुपारी १२ ते १.०० या वेळेत ज्येष्ठ गिर्यारोहक राजू देसाई यांचे ‘अपरिचित स्वराज्याचा इतिहास’ या विषयावर भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात हास्य कविता आणि आरोग्य या विषयावर सुनील हिंगणे बोलणार आहेत. त्यानंतर  दुपारी ३.४५ नंतर  नव्या ग्रंथातील वाचनीय अर्पण पत्रिकांचे वाचन होणार आहे. यात अनिल हर्डिकर, नंदू परदेशी आणि चित्रा वाघ यांचा सहभाग असणार आहे.

दुसऱ्या दिवशी दि.५ मार्च रोजी पहिल्या सत्रात ‘प्रकाशन व्यवसायातील आव्हाने’ या परिसंवादात डिम्पल प्रकाशनाचे अशोक मुळे, मॅजेस्टिक पब्लिशिंगचे अशोक कोठावळे, जयहिंद प्रकाशनचे हेमंत रायकर, ज्योत्स्ना प्रकाशनाचे विकास परांजपे आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांचा सहभाग असणार आहे.

वाचन संस्कृती, सामाजिक बांधिलकी या विषयावर चेतना महाविद्यालया तर्फे पथनाट्य सादर करण्यात येणार आहे.अवयव दान काळाची गरज या विषयावर पुरुषोत्तम पवार हे सादरीकरण करणार आहेत.

याशिवाय राकेश तळेगावकर यांची संकल्पना असलेले  मराठी साहित्यातील उत्तम व अभिजात पत्र साहित्यावर आधारित कार्यक्रमात श्रीनिवास नार्वेकर, अस्मिता पांडे, राजश्री पोतदार, आशुतोष घोरपडे, समीर दळवी आणि विनीत मराठे यांचा सहभाग असणार आहे.

समारोप ‘वाचनाची आनंदयात्रा’ या कार्यक्रमाने होईल. यात ज्योती कपिले, विनम्र भाबल, तसेच महिला वाहतूक पोलीस कर्मचारी मेधा तामोरे आणि सुप्रिया रणधीर हे आपले मनोगत व्यक्त करतील. या महोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्री यांचे स्टॉल असणार आहेत. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम ग्रंथप्रेमी आणि वाचक प्रेमींसाठी विनामूल्य असणार आहेत.दोन दिवस सुरू असणाऱ्या या ग्रंथ महोत्सवात वाचन प्रेमी, ग्रंथ प्रेमी आणि सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई उपनगरचे मुलुंड येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी  संजय बनसोड यांनी केले आहे.

०००

संध्या गरवारे/वि.सं.अ./

आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जादायी ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे दि.२: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे आणि उरळी देवाची येथील नगर रचना परियोजनेअंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्त्वाचे योगदान देणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक तरुण पिढीला ऊर्जा देणारे ठरेल, असे प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

संगमवाडी परिसरात आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा पुढे नेणाऱ्या आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक उभारले जात असल्याबद्दल आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांच्या आदर्शानुसार चालणारे सरकार असल्याने सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आज करण्यात आले आहे. मातंग समाज प्रामाणिक आणि कष्टाळू आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बार्टीप्रमाणे आर्टीची स्थापना करून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य केले आहे. त्यामुळे मातंग समाजातील मुलांना आता उच्च शिक्षण घेता येईल. स्पर्धेच्या युगात या समाजाला इतर समाजाच्या बरोबर विकासात सहभागी करून घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात गड किल्ले, महापुरुषांच्या स्मारकासाठी तरतूद ठेवली आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या कार्य, बलिदानापासून प्रेरणा मिळावी यासाठी स्मारके उभारण्यात येत आहेत. भिडेवाडा येथे देखील सावित्रीबाई फुले यांचे स्मारक होत आहे. लहुजी वस्ताद यांच्या हातातील दांडपट्ट्याला शासनाने राज्य शस्त्राचा दर्जा दिला आहे. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाच्या माध्यमातून मातंग समाजातील नव्या पिढीला प्रेरणा मिळण्यासोबत उच्च पदावर जाता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांनी क्रांतीची ज्योत हजारो मनात पेटवली असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य वाढविणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाच्या भूमीपूजनानंतर छत्रपतींच्या मावळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होत आहे याचा आनंद आहे. क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी शस्त्राने पारंगत वीर तयार करण्यासाठी देशातील शस्त्राचे प्रशिक्षण देणारी पहिली शाळा काढली म्हणून त्यांना आद्य म्हटले जाते. आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद यांनी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य  टिळक, महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रशिक्षण दिले.

समाजातील विषमता दूर करण्याचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले यांच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. १८५७ च्या स्वातंत्र्य समरात लहुजी वस्ताद साळवे यांनी प्रशिक्षित केलेले क्रांतिकारक लढत होते. देह ठेवण्यापर्यंत त्यांनी देशाची सेवा केली. अशा थोर क्रांतिकाराचे स्मारक रूपाने स्मरण करणे आवश्यक आहे. ही  प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्मारक उभारण्यात येत आहे. आता आर्टीची स्थापना करण्यासोबत आरक्षणात होणारा अन्याय दूर करण्यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. येत्या काळात चिरागनगर मध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बहुजन समाजातून आलेल्या आणि आपल्या कर्तृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्यांमधून लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य मोठे आहे. लहुजी वस्ताद साळवे यांचे घराणे पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध होते. लहुजी वस्ताद साळवे यांनी ही परंपरा राखत इंग्रजी सत्तेला आव्हान देण्याचे कार्य केले आणि तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण दिले. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी तरुणांच्या मनात विद्रोहाची ज्योत पेटवली. अशा थोर पुरुषाचे त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभे राहणार आहे. पुढच्या पिढीला अभिमान वाटेल, असे स्मारक उभारण्यात येईल.

लहुजी वस्तादांच्या कार्याची आठवण ठेवत तरुणांनी त्यांचा विचारा स्विकारावा, स्मारक विचाराचे केंद्र असतात. तरुणांनी महापुरुषांपासून चांगला विचार घ्यायला हवा. व्यायाम, शिस्त, सचोटी आणि शिक्षणाने मेंदू बळकट करीत अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी ठेवावी. क्रांतीवीर लहुजी वस्तादांसारख्यांच्या कार्यातून महाराष्ट्र उभा राहीला आहे. स्मारकाच्या रूपाने त्यांच्या कार्याचा ठेवा जपला जाईल, येणाऱ्या पिढ्यांना त्यातून प्रेरणा मिळत राहील.  मातंग समाजाच्या कल्याणासाठी आर्टीसाठी तातडीने पाऊले उचलले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. उरळी देवाची नगर रचना परियोजनेद्वारे ५-६ एकरात गरिबांसाठी घरे मिळतील,असेही ते म्हणाले.

मंत्री श्री.पाटील म्हणाले की, आद्य  क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे भव्य स्मारक असावे, याची २० वर्षाची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. येत्या दोन वर्षात निधीची कोणतीही कमतरता पडू न देता स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येईल. स्मारक पूर्ण झाल्यावर लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य लक्षात घेऊन उपक्रम राबवावे. नुकतेच अंदाजपत्रकात आर्टीची घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीला गती मिळेल. समाजातील सुशिक्षित व्यक्तींनी शासनाच्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार सुनील कांबळे आणि स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रास्ताविक केले. साडेपाच एकर जागा आरक्षित करण्यात आली असून स्मारकाच्या कामावर ११५ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यात म्युझिअम, आर्ट गॅलरी, वसतिगृह, वाचनालय, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण हॉल आदी सुविधा असतील. परिसरात आद्य  क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचा ३५ फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. नगर नियोजन योजने अंतर्गत उरळी देवाची येथे विकासकामे करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ,  सुनील कांबळे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे,  विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार,क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख,  जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, मनपा अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

०००

छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे, दि. २: स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधीस्थळ व तुळापूर येथील बलिदानस्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे असून ती अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत, यासाठी ही दोन्ही स्मारकस्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदानस्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे, अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला. मराठा साम्राज्यापेक्षा १५ पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या. संपूर्ण जीवनात ते एकही लढाई हरले नाहीत.

छत्रपती संभाजी महाराज प्रखर धर्माभिमानी होते. धर्मकारण, अर्थकारण यात निर्विवाद वर्चस्व गाजवणारे तसेच राजकारणात निपुण होते. त्याचबरोबर ते अत्यंत कुशल संघटकही होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा आणि त्यांचा इतिहास जपणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.

राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

चंद्र, सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची प्रेरणा राहील- देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या बलिदानाने मराठी माणसात जागृती निर्माण झाली, ज्यांनी मोघलांना सळो की पळो करून सोडले, अशा छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळ व बलिदान स्थळाला भव्य स्वरूप देण्यासाठी आज विविध विकासकामांचे भूमिपूजन होत आहे याचा मनस्वी आनंद आहे. जोपर्यंत चंद्र व सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देत राहील.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर हिंदवी स्वराज्य घशात घालण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात बांधावी लागली हे छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे शूरवीर मावळे यांच्या कर्तृत्वाचे यश आहे, असे सांगून श्री.फडणवीस म्हणाले, ज्या काळात देशातील अनेक राजे रजवाडे औरंगजेबाला आणि मोगल सत्तेला शरण जात होते, त्यांचे मांडलिक होत होते त्या काळात प्राणाचे बलिदान देऊन छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी लढत राहिले. धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण, समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमके काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते, त्यांचाच आदर्श घेऊन केंद्र व राज्य शासन काम करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की,  छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला साजेसे स्मारक शासनाच्या वतीने साकारण्याचा अनेक दिवसांचा संकल्प होता. स्मारक विकासाठी २६९ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. तुळापूर येथे स्मारकासाठी आठ एकर जागा उपलब्ध झाली आहे. तर वढु बु. येथे दोन एकर जागा उपलब्ध झाली असून केईएम हॉस्पिटला देण्यात आलेली आणखी दोन एकर जागा ताब्यात घेऊन एकूण चार एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळ आणि परिसराची विकास कामे करण्यात येतील. या कामांतर्गत संग्रहालय, प्रशासकीय कार्यालय, वैद्यकिय कक्ष, सभागृह, स्मरणिका दुकाने,  छत्रपती संभाजी महाराज यांचे ६० ते ६५ फुट उंच धातूचे प्रतिकात्मक शिल्प, अडीचशे मीटर लांबीचा वॉकींग प्लाझा, जीएफआरसी  तंत्रज्ञानावर आधारित संभाजी महाराजांच्या जीवनपटाची, विचारधारांची व साहित्याची माहिती दर्शविणारे भित्तीचित्रे, भिमा नदीच्या घाटाचा विकास, बोटीचे फलाट विकसीत करणे आदी कामे करण्यात येणार आहेत.

श्री.पवार म्हणाले की, येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण होईल. समाजासमोर आदर्श ठेवणारे जे महापुरुष होऊन गेले त्यांचे शौर्य, इतिहास नवीन पिढीला समजावा यासाठी ही स्मारक स्थळे सदैव प्रेरणादायी ठरतील. हे स्मारक दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावे, यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसे स्मारक उभे करत असताना शासन कुठेही कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमपूर्वी मान्यवरांच्या हस्ते वढु बु.येथील छत्रपती संभाजी महाराज समधीस्थळ विकास आणि तुळापूर येथील बलिदानस्थळ विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

०००

ताज्या बातम्या

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

0
देयके अदा केल्याने १०२ क्रमांक रुग्णवाहिकांची सेवा सुरळीत - आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. १४ : राज्यात आरोग्य सेवेसाठी १०२ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा उपलब्ध...

बनावट खतांविरोधात राज्यांनी कठोर पावले उचलावीत

0
नवी दिल्ली, दि.१४ : देशभरात बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या खतांच्या विक्रीबाबत वाढती चिंता व्यक्त करत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री...

विधानसभा प्रश्नोत्तरे 

0
अनधिकृत बांधकामांना शासन पाठीशी घालणार नाही - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. १४ : मुंबईतल्या अनधिकृत बांधकामांची यादी आणि त्यांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेच्या...

विधानसभा इतर कामकाज/निवेदन

0
छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्गसंपदा महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांकडून विधानसभेत महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. १४ : महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा,...