मंगळवार, जुलै 15, 2025
Home Blog Page 850

पैठणचे संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसीत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ५ : पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित करण्याबाबत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची बैठक झाली. यावेळी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे सहभागी झाले होते तर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरव विजय, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज  उपस्थित होते.

या उद्यानाच्या विकास कामांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये समितीच्या शिफारशीनुसार विकासकामांच्या प्रस्तावात सुधारणा करून १४९ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव करण्यात आला.

पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी वेळोवेळी बैठका घेण्यात आल्या आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संत ज्ञानेश्वर उद्यान पुनर्विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली होती.

संत ज्ञानेश्वर उद्यान विकसित व सुशोभित करण्याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जागतिक स्तरावरील सल्लागार निवडीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सल्लागाराला  कार्यारंभ आदेश देखील देण्यात आला आहे. यावेळी उद्यानाच्या सुशोभीकरण आणि पुनर्विकास कामांचे सादरीकरण करण्यात आले.

००००

१५ हजार झोपड्यांच्या पुनर्विकासासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एसआरए’मध्ये संयुक्त भागीदारी करार

मुंबई, दि. ५: महानगरातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त करार करण्यात आला. मंत्रालयात झालेल्या ‘एमएमआरडीए’च्या बैठकीत हा करार झाला. यावेळी अन्य महत्वांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांबरोबरच वांद्रे कुर्ला संकुलात स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक परिवहन (पॉड टॅक्सी) प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर करण्यास मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी मान्यता दिली.

दरम्यान, मुंबई महापालिकेप्रमाणेच एमएमआरडीक्षेत्रातही डीप क्लिन ड्राईव्ह घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात झाली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, एम एम आर डी एचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, इंडिपेंडंट स्टडी ग्रुपचे अध्यक्ष जॉनी जोसेफ, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आदी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.

 पॉड टॅक्सी

वांद्रे ते कुर्ला स्थानकादरम्यान वांद्रे – कुर्ला संकुलामधून ‘पॉड टॅक्सी’ धावणार असून त्याची लांबी ८.८० कीमी एवढी आहे. त्यामध्ये ३८ स्थानके असणार आहेत. प्रति पॉड सहा प्रवासी एवढी त्याची क्षमता आहे. कमाल ४० किमी प्रति तास एवढा त्याचा वेग असणार आहे, हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागिदारी तत्वावर सुरू करण्यास मुख्यमंत्री यांनी मान्यता दिली. या प्रकल्पामुळे वांद्रे स्थानक ते बीकेसी हा प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

झोपडपट्ट्यांचा पुर्नविकास

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांच्या कामांना चालना मिळावी यासाठी बृहन्मुंबई, ठाणे महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सिडको व म्हाडा यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्वावर पुनर्विकास करण्यात येणार आहे. एसआरए आणि एमएमआरडीए यांच्यात याअन्वये माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर येथील सुमारे १५ हजार घरांचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून करण्यात आहे. या प्रकल्पात पूर्व मुक्त मार्ग आणि पश्चिम द्रुतगतीमार्ग या दरम्यान असलेल्या सुमारे २००० झोपड्यांचा देखील पुनर्विकास होणार असून त्यामुळे हा रस्ता मोकळा होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत हा संयुक्त करार करण्यात आला.

झोपडपट्टी मुक्त ठाणे

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे परिवहन सेवा यांच्या मालकीच्या बस डेपोसाठीच्या जागांवर अत्याधुनिक बस डेपोचा विकास व सभोवतालच्या शासकीय जमिनीवरील झोपडपट्टयांचे पुनर्वसन करुन उपलब्ध होणाऱ्या मोकळ्या शासकीय जमिनीचा विकास प्राधिकरणामार्फत करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार असून ठाणे शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

यावेळी बाळकूम ते गायमुख ठाणे खाडी किनारा मार्गाचे काम (ठाणे कोस्टल रोड), पूर्व मुक्त मार्गाचे छेडानगर, घाटकोपर ते ठाणे पर्यंत विस्तारीकरण प्रकल्प, पूर्व द्रुतगती महामार्गावर ठाणे शहरातील आनंद नगर ते साकेत पर्यंतच्या ८.२५ कि.मी. लांबीच्या उन्नत मार्गाचे काम, कासारवडवली ठाणे ते खारबाव भिवंडी प्रकल्प, विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत (Extened MUIP) ऐरोली बोगदा ते कटाई नाका, गायमुख ते पायेगाव दरम्यान खाडीपुलाचे काम, कल्याण बाह्यवळण रस्ता भाग ८ च्या (रुंदे रस्ता ते गोवेली रस्ता) बांधकाम या सर्व प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता यावेळी देण्यात आली.

‘एमएमआरडीए’मार्फत विशेष प्रयोजन वाहन (SPV) कंपनीची स्थापना करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याव्दारे सल्लागाराची कामे हाती घेण्यास व व्यवसाय विकास कक्षाची स्थापना करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

०००००

 

 

नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळ व परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटींचा निधी देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            रायगड, दि. ०५ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा वारसा असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनामार्फत केले जात आहे.  तसेच स्वराज्य निर्मितीसाठी प्राणपणाने लढलेल्या मावळ्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी, म्हणून ऐतिहासिक स्थळांचा, गावांचा विकास केला जात आहे. या अंतर्गत उमरठ येथील ‘नरवीर तानाजी मालुसरे’ यांच्या समाधीस्थळाचे सुशोभिकरण आणि परिसराचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

            तसेच या परिसराचा विकास करण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.              पोलादपूर तालुक्यातील उमरठ येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या 354 व्या पुण्यतिथीनिमित्त नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ व परिसर सुशोभिकरण कामाचा आरंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.  या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, (ऑनलाईन), उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब, स्थानिक समिती अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

             सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या समाधीस्थळाचे सुशोभिकरण होणार असून यामध्ये शिवकालीन जननी कुंभळाजाई मंदिराचे सुशोभिकरण, समाधी प्रवेशद्वाराजवळच्या कमानीचे बांधकाम, बुरुजाचे बांधकाम, प्रसाधनगृहे, अंतर्गत रस्ते काँक्रीट गटार, कंपाउंड वॉलचे बांधकाम ही कामे करण्यात येणार आहेत.

            उमरठच्या ऐतिहासिक भूमीत नरवीर तानाजी मालुसरे आणि त्यांच्या समवेत कोंढाणा किल्ल्यावरील लढाईत लढलेल्या शेलार मामा यांची समाधी आहे. या दोन्ही शूरवीरांना अभिवादन करुन मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी मालुसरे यांनी दिलेली साथ आणि ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं’..ही घोषणा इतिहासात अजरामर आहे. स्वामीनिष्ठेचा जगापुढे ठेवलेला आदर्श हा इतिहास कधीही विसरू शकणार नाही. राज्य शासनामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील 32 शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.  तसेच रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे उभारण्यात येणाऱ्या  शिवसृष्टीसाठी 50 कोटी देखील मंजूर केले आहेत.  या सर्व कामांसाठी पुरेसा  निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनामार्फत आग्र्याला देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. याबरोबरच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे तुळापूर येथील बलिदान स्थळ आणि शिरूरच्या वढू येथील समाधीस्थळी भव्य स्मारक उभारण्यात येत आहे.

            रायगड जिल्ह्यातील पोलादपुर तालुका दुर्गम आणि डोंगराळ आहे. या भागातील युवकांचे रोजगारासाठीच्या स्थलांतराचे  प्रमाण अधिक आहे. हे लक्षात घेवून या भागातील पर्यटन विकासाला चालना देवून स्थानिक ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी  राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

            पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, शिवकालीन इतिहास पुढील पिढीपर्यंत  पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने हे ऐतिहासिक पाऊल उचलेले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधीस्थळ आणि परिसराचे सुशोभिकरण करताना त्यांच्या वाड्याचे देखील या निधीमधनू सुशोभिकरण करण्यात येईल असे जाहीर केले.  तसेच या परिसरातील जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाचे देखील जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून प्राधान्याने नूतनीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी  यावेळी दिल्या.

            यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी या भागाच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत प्रभावी  उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले.

            प्रास्ताविक आमदार भरत गोगावले यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्री उदय सामंत आणि उपस्थित मान्यवरांनी नरवीर तानाजी मालुसरे आणि शेलारमामा यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  तसेच यावेळी ज्येष्ठ इतिहासकार आप्पासाहेब परब यांना शौर्य पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

००००००

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित

मुंबई, दि. 05: ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांनी गैरवर्तन करणे, भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा भाडे घेणे या संदर्भातील तक्रार आता व्हॉट्सअप क्रमांकावर तक्रार करता येते.  त्यासाठी  9152240303 क्रमांक व mh03autotaxicomplaint@gmail.com ईमेल आयडी प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) यांनी उपलब्ध करून दिला आहे.  ऑटोरीक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध आतापर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या असून दोषी आढळलेल्या 739 परवानाधारकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप व ईमेल आयडीवर 11 जुलै 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत 1865 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित कार्यालयाशी निगडीत 790 तक्रारी आहेत. त्यापैकी 672 तक्रारी या ऑटोरिक्षा व 118 तक्रारी या टॅक्सी सेवे संबंधीत आहेत. तक्रारींमध्ये 588 तक्रारी ठोस कारणाशिवाय भाडे नाकारणे, 59 तक्रारी या मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे व 143 तक्रारी प्रवाशांशी गैरवर्तन करणे याबाबत प्राप्त झाल्या आहेत. त्याचप्रमाणे 790 परवानाधारकांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. दोषी आढळलेल्या एकूण 739 परवानाधारकांचे परवाना निलंबित करण्यात आले आहे.  यापैकी 557 परवानाधारकांचे ठोस कारणांशिवाय भाडे नाकारणे या कारणासाठी परवाने 15 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईत 66 वाहनधारकांकडून 1 लाख 63 हजार 500 रूपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.  तसेच 128 परवानाधारकांचे प्रवाशांशी गैरवर्तन करणे, 54 परवानाधारकांचे मीटरप्रमाणे देय असलेल्या भाडयापेक्षा जादा भाडे आकारणे या कारणासाठी परवाने 10 दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. या सर्व प्रकारांमध्ये एकूण 96 प्रकरणात 2 लाख 37 हजार रूपये तडजोड शुल्क वसूल केले आहे.

तसेच 37 तक्रारींबाबत तक्रारदारांनी चुकीची तक्रार नोंद केल्याबाबत तक्रारदारांना अवगत केले आहे. तसेच सद्यस्थितीत परवाना निलंबित करण्यात आलेल्या 643 वाहनांची वाहन 4.0 प्रणालीवर ‘नॉट टू बी ट्रान्सक्टेड’ नोंद (पाहिजे नोंद) घेण्यात आली आहे. कारवाईच्या माहितीबाबत तक्रारदारांना व्हॉट्सॲप व ई-मेल आयडीवर या माध्यमांतून अवगत करण्यात आले आहे.

प्रवासी नागरिकांनी संबंधित कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींची कार्यालयाकडून गांभीर्याने दखल घेण्यात येत आहे, याबाबत प्रवाशांनी आश्वस्त रहावे.  परवानाधारकांनी नागरिकांना चांगली सेवा द्यावी आणि नागरिकांशी गैरवर्तन करू नये, असे आवाहन कार्यालयाकडून करण्यात येत आहे. खोटी तक्रार दाखल करणे हा भारतीय दंड विधान कलम 192, 193, 199 व 200 अंतर्गत दंडनीय अपराध आहे.  या कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवासी तक्रार मदत कक्षाला नागरिक उत्तमप्रकारे प्रतिसाद देत आहेत. नागरिकांना ऑटोरिक्षा/टॅक्सी चालकांकडून गैरवर्तन भाडे नाकारणे, विहित दरापेक्षा जादा दराने भाडे आकारणे आदी तक्रारी असतील, तर 9152240303 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आणि mh०३autotaxicomplaint@gmail.com या ईमेल आयडीवर योग्य त्या पुराव्यासह तक्रार दाखल करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ

वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार

मुंबई, दि. 05 :  महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. अर्ज सादर करण्याची मुदत 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. या मुदतीअंती 22 हजार 981 बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 283 रिक्त पदे भरावयाची आहेत. ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 05 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला 9 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेसाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पंधरवड्यात 1 लाख  शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष विभागाने ठेवले आहे.

या मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत   ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना नि:शुल्क शस्त्रक्रिया करून आपली दृष्टी कायम ठेवता येणार आहे. राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान अंतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 27 लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.

सन 2022-23 मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असून मोहिमेकरिता 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 5 : परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.  परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी  पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेच, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्ता, गणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरित करण्यांत आले याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्‍या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

जळगाव जिल्हा ‘वारकरी भवन’ ला निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            जळगाव दि. 4 (जिमाका ) : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी भवन‘ चे भूमिपूजन खेडी (जळगाव) येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखा. उन्मेष पाटीलखा  रक्षा खडसेआ. राजुमामा भोळेआ किशोरआप्पा पाटीलआ.चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकितह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि  मनाला खूप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या  वारकरी भवन‘ चे भूमिपूजन होत  आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून  शुभेच्छा देतो.  

             पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू  यात सर्वात महत्वाचे असे वारकरी भवन‘ बांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून  प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातूनत्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करुन मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.   पंढरपुरचा विकास होत असतांना  राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेतत्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील ‘ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची  तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वारकरी भवन

            प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन पहिल्या टप्प्यात  सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत) प्रस्तावित आहे.

००००

ख्यातनाम चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘रिव्हर रिटर्न्स’ या चित्रप्रदर्शनास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि 4 : नित्या आर्टिस्ट सेंटर पुनर्निर्मीत आर्टस गॅलरीज येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट दिली. सध्या येथे ख्यातनाम चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांचे रिव्हर रिटर्न्स हे अमूर्त चित्रकारितेचे प्रदर्शन सुरू आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व चित्रांचे तपशीलवार रसग्रहण केले व भारतीय अमूर्त चित्रकारितेची गौरवशाली परंपरा प्रकाश बाळ जोशी हे समर्थपणे सांभाळत आहेत, असे सांगून भेटी प्रसंगी श्री. जोशी यांचे अभिनंदन करुन सत्कार केला.

 

0000

ताज्या बातम्या

विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून युवकांच्या जीवनाला सकारात्मक दिशा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

0
सांगली, दि. १४, (जिमाका): जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता राबवण्यात येत असलेल्या विद्यार्थी सहाय्य जनजागृती अभियानातून शासकीय संस्थांच्या योजना, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास, अधिछात्रवृत्ती अशा अनेक...

देशाचा समृद्धीसाठी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढवावी – राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे

0
नांदेड, दि. १४ : जगात शिक्षणाला अत्यंत महत्त्व आहे, त्यामुळे आपल्या देशाचा सर्वांगिण विकास व  समृद्धीसाठी विद्यापीठे, शाळांनी विद्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढविण्यावर विशेषत्वाने भर...

प्रकरणांचा तत्काळ निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
अमरावती, दि. १४ : विभागीय लोकशाही दिनासाठी प्राप्त अर्जांवर विहित कालमर्यादेत कार्यवाही करुन निपटारा होण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विभागाला प्राप्त होणाऱ्या प्रकरणांच्याबाबत मुद्देनिहाय...

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांची गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट

0
यवतमाळ, दि.१४ (जिमाका) : राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ बागडे यांनी महागांव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर युनिटला भेट दिली. यावेळी उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक तयारीचा विभागीय आयुक्तांकडून आढावा

0
छत्रपती संभाजीनगर दि.१४ (विमाका): विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर  यांनी छत्रपती संभाजीनगर विभागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा जिल्हानिहाय आढावा घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत...