बुधवार, जुलै 16, 2025
Home Blog Page 847

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना फार्मर टूल किट, विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप 

मुंबई, दि. ७: मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने अल्पभूधारक शेतकऱ्यांना फार्मर टूल किट व शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय बॅग व त्यालाच जोडलेला डेस्क अशा नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्याचे (इन्फॉर्मेशन, एज्युकेशन आणि कम्युनिकेशन किट – IEC KIT) वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वाटप करण्यात आले.

वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास आमदार भरत गोगावले यांच्यासह आयटीसी कंपनी, एएफएआरएम (AFARM) फिनिश सोसायटीचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे समन्वयक मनोज घोडे पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने, आयटीसी या कंपनीचे आर्थिक सहाय्य व फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने लाभार्थ्यांना या लाभाचे वाटप होत आहे.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते अल्पभूधारक शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये शेती साहित्याबरोबर वैयक्तिक उपयोगाच्याही गोष्टींचा समावेश असल्याने त्याचा या शेतकऱ्यांना  लाभ होणार आहे. तर नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य (आयईसी किट) मुलांना उपलब्ध होणार असल्याने या मुलांची जाण वाढविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे.

०००

एकनाथ पोवार/विसंअ

 

महिलांच्या सर्वांगीण विकासाचे चौथे महिला धोरण उद्या जाहीर करणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ७: महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण उद्या महिला दिनी म्हणजेच ८ मार्च २०२४ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, यूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसन, टाटा समाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगम, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.

महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत ३ महिला धोरणे जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, या तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे. या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसुत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलाबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबवणे, लिंग समानता, पूरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या बाबींचा महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री-पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसूत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकारी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला अधिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्री-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.

मंत्री कु. तटकरे पुढे म्हणाल्या की, समाजामध्ये स्त्री – पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल. त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

महिला व बाल विकास विभागाचे सविच श्री. यादव म्हणाले की, महिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणची, पापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.

यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवले, हायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधव, दूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकर, आदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगाम, सरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कैशल्या वडवी आणि छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

कोस्टल रोड परिसरात जागतिक दर्जाचे पार्क उभे करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ७: धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडच्या परिसरात ३२० एकर जागतिक दर्जाचे पार्क उभे केले जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. सागरी किनारा रस्त्यासह मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी वरळी, दादर परिसरातील सिमेंट रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देशही त्यांनी मुंबई महापालिका आणि संबंधित यंत्रणाना दिले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मुंबई सागरी रस्ता म्हणजेच मुंबई कोस्टल रोडची पाहणी केली. त्यासाठी त्यांनी वरळी ते मरीन ड्राईव्ह असा प्रवास केला. या भेटीत त्यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी करून अधिकारऱ्यांना सूचनाही केल्या. याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्यासमवेत मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई मनपाचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे उपस्थित होते.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तयार होत असलेल्या या कोस्टल रोडचे काम वेगाने पूर्ण होत आहे. या कोस्टल रोडवर ३२० एकर जागेत भव्य असे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार असून, २०० एकर जागेत वेगवेगळी झाडे लावण्यात येणार आहेत. जागतिक दर्जाचे हे पार्क उभारण्यात येणार असल्याचे. तसेच लवकरच हा कोस्टल रोड नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.

त्यानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी वरळी परिसरातील गणपतराव कदम मार्ग, नेहरू सायन्स पार्क येथील सेठ मोतीलाल सांघी मार्ग आणि दादर येथील दादासाहेब रेगे मार्ग याठिकाणी सुरू असलेल्या रस्ता काँक्रीटीकरण कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशीही संवाद साधला. ही सर्व कामे वेळेवर आणि दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. नागरिकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते कॉंक्रिटीकरणामुळे मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील. पावसाळ्यातील पाणी शोष खड्ड्यांद्वारे जमिनीत पुरवण्यासाठी या काँक्रिटीकरण कामांमध्ये शोषकड्यांचा देखील समावेश केला असल्याने ही कामे पर्यावरण पूरक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले.

०००

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहीम; एप्रिलपासून मुंबईत झीरो प्रिस्किप्शन पॉलिसी

मुख्यमंत्र्यांची आपला दवाखान्याला अचानक भेट

मुंबई, दि.७: मुंबईतील वरळी भागातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी दवाखान्याची पाहणी करतानाच तपासणीसाठी आलेल्या रुग्णांशीदेखील संवाद साधला.

मुंबईकरांचा आरोग्य उपचारावरील खर्च कमी करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. आरोग्य आपल्या दारी मोहीम सुरु करण्यात आली असून या मोहिमेतून घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. एप्रिलपासून झीरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीदेखील सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

वरळीतील अभियांत्रिकी संकुलातील आपला दवाखान्यात मुख्यमंत्र्यांचे अचानक आगमन झाले. त्यांनी दवाखान्यातील, स्टोर रुम, औषध कक्ष, तपासणी खोली, स्वच्छतागृह यांची पाहणी केली. यावेळी तेथे तपासणीसाठी आलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत आपला दवाखान्याविषयी अनुभव विचारला. रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मुंबईकरांना उपचारासाठी घराजवळच सोय व्हावी या संकल्पनेतून आपला दवाखाना मुंबईत २२६ ठिकाणी सुरू करण्यात आले आहेत. आतापर्यंत ४२ लाख नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. याठिकाणी उपचार मोफत, कॅशलेस,पेपरलेस मिळत आहेत.

मुंबईत आरोग्य आपल्या दारी मोहिमेतून घरोघरी आरोग्य तपासणी केली जाणार आहे. झीरो प्रिस्किपशन पॉलिसी एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी १५०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुंबई शहर पालक मंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त वेलारासू, डॉ. सुधाकर शिंदे आदी उपस्थित होते.

स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे दि. ६:-आंतरराष्ट्रीय महिला दिन हा फक्त महिलांचा उत्सव म्हणून साजरा न होता तो महिलांना हक्क, न्याय मिळवून देणारा आणि महिला सशक्तीकरणावर भर देणारा असावा. स्त्री-पुरुष या दोघांमध्येही समानतेची भूमिका येणे आवश्यक असून स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी, असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र कारागृह विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कारागृह महिला परिषदेचे उद्घाटन व महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी पुस्तिका सन २०२२ चे प्रकाशन डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा स्वाती साठे, कारागृह उपअधीक्षक पल्लवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान काम, समान अधिकार असावेत. घरकामात पुरुष वर्गाचा सहभाग वाढला पाहिजे. यामुळे स्त्रियांना त्यांच्या कामात प्रगती करता येईल. समाजात वावरताना प्रत्येक घटकाबद्दल सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. यासोबतच मन संतुलीत करण्यासाठी सकारात्मकता आवश्यक आहे. यातून एक विशिष्ठ शक्ती निर्माण होत असते.

स्त्री संवेदनशील आहे, पण ती तेवढीच हुशार आणि तल्लखही आहे. प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी असेलच याची वाट न पाहता स्त्रियांनी एकट्याने संकटाला सामोरे जावे. त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी ठेवली पाहिजे.

समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसांना शिस्त लावण्याचे काम कारागृह करत आहे. भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे सर्व कायदे केंद्रात मंजूर झाले असून देशभर ते लागू करण्यात येणार आहेत. दिशा कायद्याअंतर्गत सुचविलेल्या तरतुदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. गुप्ता म्हणाले, जीवनात नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. सर्वांना समानतेची वागणूक देणे जी प्रत्येकाची जबाबदारी आहे.

कारागृह प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढल्याबद्दल श्रीमती साठे यांनी समाधान व्यक्त केले.

शासकीय योजनांतून महिलांचे सशक्तीकरण…

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्य शासन यांच्या पुढाकाराने राज्यभरातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी अनेक शासकीय योजना राबविल्या जात आहेत. महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ अनेक योजना राबवित आहे. माविमचे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील महिलांना माविमच्या अनेक योजनांचा लाभ दिला जात असून यामुळे महिला उद्योग उभारणीत पुढे येत असल्याचे दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांनी महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे अनेक योजनांचा लाभ घेऊन स्वतः सक्षम बनण्याबरोबरच अन्य महिलांनाही रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यातील महिलांनी साधलेल्या  सर्वांगीण प्रगतीच्या यशोगाथा त्यांच्याच तोंडून…

फुलशेतीतून साधली सर्वांगीण प्रगती

महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र बालिंगा येथून महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती मिळाली. यानंतर मी फुलशेती व्यवसाय करण्याच्या विचाराने पुण्यातील तळेगाव दाभाडे येथील फुलशेतीमध्ये प्रशिक्षण घेतले. नंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून 6 लाख रुपयांचे अर्थसाह्य घेऊन करवीर तालुक्यातील कुडित्रे येथे

फुलशेती (पॉलिहाऊस) सुरु केली. या शेतीमध्ये आम्ही लावलेल्या जरबेरा व निशिगंधाच्या फुलांना मुंबई, हैद्राबाद, नाशिक, दिल्ली अशा मोठ्या शहरांमधून चांगली मागणी आहे. महिन्याला साधारण 40 हजार रुपयांचा नफा मला या फुलशेतीतून होतो. या फुल शेतीमध्ये मी सहा महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे.  शेती हा व्यवसाय देखील कमीपणाचा नसून शेती व शेतीपूरक व फुल शेतीतूनही आपली प्रगती साधता येते. जिल्ह्यातील महिलांनी शेती, शेतीपूरक व्यवसाय अथवा फुलशेतीतून आपले सर्वांगीण प्रगती साधावी. महिलांसाठी अनेक योजना राबवून शासन महिलांना सशक्त करत असल्याबद्दल राज्य शासनाचे धन्यवाद – विद्या बोरुडकर, कुडीत्रे, ता. करवीर

बेकरी उद्योगातून कुटुंबाला हातभार

हातकणंगले तालुक्यातील टोप येथे पिठाची गिरण सुरु केली होती. यानंतर या उद्योगाला बेकरी उत्पादन विक्रीचाही जोड दिला. महिला आर्थिक विकास महामंडळा अंतर्गत उन्नती लोकसंचलित साधन केंद्र, पेठ वडगाव या केंद्रांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून 2 लाख 12 हजार रुपयांचे कर्ज घेतले. यातून मला 35 टक्के सबसिडी मिळाली. बेकरी उद्योगाला चांगला प्रतिसाद मिळू लागल्यामुळे वर्षाला साधारण 3 ते 4 लाख रुपयांचा नफा मला मिळतो. या उद्योगामुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागला आहे. माझ्या मदतीसाठी अन्य दोन महिलांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांनाही दरमहा 6000 रुपये मानधन मी देते. राज्य शासन महिलांच्या विकासासाठी अनेक योजना राबवीत असून महिलांनीही या योजनांचा लाभ घ्यायला हवा. या योजनेचा लाभ माझ्यासह राज्यातील अनेक महिलांना मिळत असून त्यामुळे त्या प्रगती साधत आहेत यासाठी मी शासनाला धन्यवाद देते – सरिता सिसाळ, टोप, ता. हातकणंगले

लघु उद्योगातून कुटुंबाला आधार

कुटुंबाला हातभार लावण्याच्या उद्देशाने मला एखादा लघुउद्योग सुरु करायची इच्छा होती, पण मार्ग दिसत नव्हता. याचवेळी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना कर्ज पुरवठा होत असल्याची माहिती मला मिळाली. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर अंतर्गत स्थापित अस्मिता लोकसंकलित साधन केंद्र बालिंगा या संस्थेच्या अंतर्गत जोडलेल्या दुर्गामाता महिला स्वयंसहायता गटाच्या माध्यमातून मी 5 लाख रुपयांचे कर्ज घेतले. यातून औरंगाबाद येथून पीठ शिजवण्याचे व मळण्याचे मशीन, कुरडई व पापड मशीन खरेदी केले. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कळंबे तर्फ कळे येथील आमच्या घरी हे मशीन आल्यानंतर लगेचच मी उन्हाळी पदार्थांचे उत्पादन तयार करण्यास सुरुवात केली. गहू, रवा, नाचणीच्या कुरडई, पापड, सालपापडी, नाचणी, तांदूळ, टोमॅटो, पालकाचे पापड, तिखट सांडगे, उडदाचे पापड, शाबूचे पळी पापड, उकड सांडगे, बटाटा शाबूचे मिक्स पापड, आंबा, लिंबू, मिरचीचे लोणचे असे पदार्थ तयार करुन मी त्याची विक्री करते. या उद्योगात मदतीसाठी आणखी 2 महिला कार्यरत असून त्यांना दरमहा 4 हजार रुपयापर्यंत मानधन देते. गौरी लघु उद्योगाच्या माध्यमातून हे सर्व उन्हाळी उत्पादन कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पुणे, मुंबई सारख्या शहरांमध्येही विक्रीसाठी पाठवले जातात. या उद्योगातून मला वर्षभरात 2 लाख रुपयांचा नफा मिळतो. लघुउद्योगातूनही कुटुंबाला आधार देण्याबरोबरच महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या राहू शकतात यासाठी महिलांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा व आपली स्वप्नपूर्ती करावी – सविता शामराव सुतार, कळंबे तर्फ कळे, ता. करवीर.

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) मुळे महिलांच्या कुटुंबाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागण्याबरोबरच स्वतः ची स्वप्नपूर्ती होत आहे. यासाठी राज्य शासनाचे आभारी असल्याचे मत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांनी व्यक्त केले.

वृषाली पाटील, माहिती अधिकारी, कोल्हापूर

०००

महिलांनी उद्योजक व्हावे- पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर, दि.६(जिमाका):-  हिमरु शाल निर्मिती प्रशिक्षणाद्वारे हिमरु शाल निर्मितीच्या कलेस पुनरुज्जीवीत करुन महिलांनी उद्योजक व्हावे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालास बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करु, असे आश्वासन रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण येथे दिले.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) तर्फे आयोजित हिमरु शाल निर्मितीचे महिलांसाठी प्रशिक्षण ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन पैठण येथे करण्यात आले. याप्रसंगी विभागीय अधिकारी डी.यु. थावरे, प्रकल्प अधिकारी भारती सोसे, पुष्पाताई गव्हाणे, सोमनाथ परदेशी, वैशाली परदेशी, तुषार पाटील, विनोद तुपे, प्रतिभा निमकर तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.

पालकमंत्री श्री. भुमरे म्हणाले की, महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. हिमरु शालचे पुनरुज्जीवन करावे. यशस्वी महिला उद्योजक व्हावे. हिमरु शाल उत्पादनाच्या विक्रीसाठी संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण येथे मंजूर आराखड्यात पैठणी व हिमरु शाल विक्रीसाठी  प्रशिक्षित महिलांना गाळे उपलब्ध करुन देऊ,असे आश्वासन त्यांनी दिले. डी. यु. थावरे यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिले.

०००

वारकऱ्यांना सुरक्षा,स्वच्छता आणि सेवा द्या- पालकमंत्री संदिपान भुमरे

छत्रपती संभाजीनगर, दि.६ (जिमाका): नाथषष्ठी यात्रा महोत्सवाचे यंदा ४२५ वे वर्ष आहे. यानिमित्ताने पैठण येथे मंदिरावर सजावट, रोषणाई करतांनाच येणारे भाविक व वारकऱ्यांना सुरक्षा, स्वच्छता आणि सेवा द्यावी,असे निर्देश रोहयो, फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी आज दिले.

नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या पुर्वतयारीसाठीची आढावा बैठक आज पैठण येथील नाथ मंदिरात घेण्यात आली. पालकमंत्री संदीपान भुमरे हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, पोलिस अधीक्षक (ग्रामीण) मनिष कलवानिया,अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी (महसूल) नीलम बाफना, मुख्याधिकारी संतोष आगळे, डिवायएसपी विश्वंभर भोर,पोलीस निरीक्षक संजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे  सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर, गटविकास अधिकारी संजय कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ. पंडित किल्लारीकर, एसटी आगारप्रमुख गजानन मडके, नाथवंशज हरिपंडीत गोसावी तसेच विविध प्रशासकीय विभाग प्रमुख व विविध सामाजिक संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती दिली. दि. ३१ मार्च, १ व २ एप्रिल या दरम्यान षष्ठी, सप्तमी व अष्टमी असे ३ दिवसीय धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यंदाचे ४२५ वे वर्ष आहे. यात्रा मैदानावरील सफाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच जंतुनाशक फवारणी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सक्षम करण्याची कामे हाती घेतली आहेत,अशी माहिती आगळे यांनी दिली.

या बैठकीत पालकमंत्री श्री. भुमरे यांनी सांगितले की, यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा देण्यात याव्या. यंदा प्रथमच शहर व नाथषष्ठी यात्रा मैदानावर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे वारकऱ्यांना सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध होणार आहेत. येणाऱ्या वारकऱ्यांना शांतता व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्था, पार्किंग व रोगराई नियंत्रणासाठी स्वच्छता यासारख्या सेवा देण्यात याव्या, अशा सुचना त्यांनी प्रशासनाला केल्या. संचालन अरुण काळे यांनी केले.

०००

 

अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित व कलापिनी कोमकली राष्ट्रीय साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली, दि. ६: संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारांना राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने आज सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत संगीत नाटक अकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या या प्रतिष्ठित पुरस्कारांमध्ये देशातील ९२ कलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले असून, यापैकी महाराष्ट्रातून ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विजय चव्हाण, देवकी पंडित आणि कलापिनी कोमकली या कलाकारांचा समावेश आहे.

राजधानीस्थित विज्ञान भवन येथे हा भव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार मंत्री, जी. किशनरेड्डी, केंद्रीय सांस्कृतिक व्यवहार राज्य मंत्री अर्जुनराम मेघवाल, विभागीय सचिव गोविंद मोहन तथा संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्ष डॉ संध्या पुरेचा उपस्थित होते.

सुप्रसिद्ध कलाकार अशोक सराफ यांच्याविषयी

आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे, प्रसिद्ध कलाकार अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्यामुळे, त्यांना आज राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्‍यांना वर्ष 2022 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकतेच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. आयत्या घरात घरोबा, माझा पती करोडपती, नवरी मिळे नवऱ्याला, यासह अनेक चित्रपटांत अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाने प्रक्षकांची दाद मिळवली आहे. मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अनेक विनोदी भूमिका सादर केल्या.  करण अर्जून, सिंघम यासह अनेक चित्रपटांतून त्यांनी उल्लेखनीय अभिनयाने त्यांनी विशेष स्थान निर्माण केले आहे. अभिनयातील उत्कृष्‍ट योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार, सह्याद्री रत्न पुरस्कार आणि पुरंदरे पुस्कारांचा समावेश आहे.

विजय शामराव चव्हाण यांच्याविषयी

सुप्रसिद्ध ढोल‍की वादक विजय शामराव चव्हाण यांना वर्ष २०२२ साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. संगीत श्रेणीतील लोकसंगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल, त्यांना प्रतिष्ठित संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध लावणी गायिका श्रीमती सुलोचना चव्हाण यांचे पुत्र असलेले विजय चव्हाण यांची त्यांच्या बहुमुखी प्रतिभेमुळे, लोकप्रिय क्षेत्रातील अग्रगण्य कलाकार म्हणून ख्याती आहे. ते डफ, चांडा, हलगी, आणि फली यांसारखी लोकवाद्य वाजवण्यातही निपुण आहेत.

शास्त्रीय संगीत गायिका देवकी पंडित यांच्याविषयी

कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये, हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती देवकी पंडित यांना संगीत नाटक अकादमीकडून वर्ष 2022 या वर्षाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबई येथे जन्मलेल्या श्रीमती देवकी पंडित यांनी गायनाचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांच्या आई श्रीमती उषा पंडित यांच्याकडून घेतले. जयपूर आणि आग्रा घराण्यच्या गायकीची उत्तम गायिका म्हणून श्रीमती देवकी पंडित यांची ख्याती आहे. त्यांनी देश-विदेशात अनेक प्रतिष्ठित संगीत महोत्सवांमध्ये सादरीकरणे केली आहेत. शास्त्रीय भक्तिगीते, मराठी आणि हिंदी चित्रपट गीते अशा विविध प्रकारच्या गायनात आपला ठसा उमटवला आहे. हिंदुस्तानी संगीतातील अमुल्य योगदानाबदद्वदल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले आहे.

शास्त्रीय संगीत गायिका कलापिनी कोमकली यांच्याविषयी

कला क्षेत्रातीतील संगीत श्रेणीमध्ये, हिंदुस्तानी गायनासाठी श्रीमती कलापिनी कोमकली यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुप्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका कलापिनी कोमकली या स्वरतपस्वी पंडित कुमार गंधर्व यांच्या कन्या आहेत. मध्यप्रदेश राज्याच्या देवास येथे जन्मलेल्या श्रीमती कोमकली यांना वर्ष 2023 साठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुरांचा ठेवा जपतानाच शास्त्रीय संगीतात त्यांचा ताना ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीवर आधारित असले तरी त्यांनी त्यांची स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व आणि गायिका वसुधरा कोमकली यांच्या कन्या आणि शिष्या आहेत. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील अग्रगण्य गायिकांपैकी एक मानल्या जातात.

संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान केले गेले. अकादमी पुरस्कार 1952 पासून प्रदान केले जात आहे. संगीत, नृत्य, नाट्य, पारंपारिक संगीत आणि लोककलेच्या श्रेणींमध्ये एकूण 92 कलाकारांचा सन्मान करण्यात आला.

०००

 

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ – ‘उत्सव स्त्री शक्तीचा’

            मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, 8 मार्च ते रविवार, 10 मार्च, 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्र, मुलाखती, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम, नाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य ‘दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन, नागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार ‘तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचल, वित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईल, या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित ‘सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावे, अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा ‘देवी – दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळ, दादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

………

ताज्या बातम्या

विधानसभा इतर कामकाज

0
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून देणार -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५: राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार शिक्षक उपलब्ध करून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून संजय देशमुख यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

0
मुंबई, दि. १२ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे जनसंपर्क अधिकारी दिवंगत संजय देशमुख यांच्या कुटुंबियांची वरळी येथील ‘दर्शना’ या शासकीय निवासस्थानी सांत्वनपर भेट...

कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

0
मुंबई, दि. १५ : कोकणातील वीज पुरवठा अधिक सक्षम, नियमित व तक्रारमुक्त होण्यासाठी कोकणातील वीज विभागाच्या कामांचा दर्जेदार व कालबद्ध आराखडा तयार करा, अशा...

नागपूर, अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा मंत्री गिरीश महाजन व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आढावा

0
मुंबई दि. १५ : नागपूर व अमरावती जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पांचा कामांचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेऊन सिंचन...

राज्य क्रीडा विकास निधीसाठी  १४ लाख रुपयांचा वाढीव निधी मंजूर –मंत्री दत्तात्रय भरणे

0
मुंबई, दि. १५ : राज्यातील गुणवंत, गरजू आणि प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण व प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासनाने ‘राज्य क्रीडा विकास निधी’ अंतर्गत...