शेतकऱ्यांना त्रास होईल असा प्रकल्प जिल्ह्यात येणार नाही – पालकमंत्री उदय सामंत
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विविध उपक्रम
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (MTDC) राज्यात पर्यटनाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबवीत असते. सध्या महामंडळ रिसॉर्ट्स, उपहारगृह, जल पर्यटन, अजिंठा व वेरूळ अभ्यागत केंद्र, कलाग्राम,जबाबदार पर्यटन (Responsible Tourism) समुदाय आधारित पर्यटन (Community Based Tourism) हे यशस्वीरित्या राबवीत आहे.
पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण अंतर्गत महिलांसाठी विविध उपक्रम पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महामंडळ राबवीत आहे. एमटीडीसी हे भारतातील एकमेव पर्यटन महामंडळ आहे की जे ‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक पर्यटन धोरण प्रथम अंमलात आणुन महिलांचे पर्यटनात योगदान वाढविण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे.
‘आई’ महिला केंद्रित / लिंग समावेशक (Gender Inclusive) पर्यटन धोरणांतर्गत महिलांसाठी महामंडळामार्फत पोषक वातावरण पर्यटन सचिव, जयश्री भोज व व्यवस्थापकीय संचालक, मपविम, श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आखले जात आहे. महाराष्ट्रात पर्यटनासाठी येणाऱ्या जगभरातील महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एमटीडीसीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
‘आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस 50% सूट देण्यात आली होती, या कालावधीत महिला पर्यटकानी प्रचंड प्रतिसाद देत 1500 हून अधिक महिला पर्यटकांनी भेट दिली आहे, तसेच 8 मार्च रोजी सुट्टी तसेच लॉंग वीकेंड असल्या कारणाने अधिक 200-300 पर्यटकांनी भेट देण्याची शक्यता आहे, असे मत एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी शर्मा यांनी व्यक्त केले आहे.
या धोरणांतर्गत महामंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले आहे व महामंडळास भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. महामंडळाद्वारे 3 पर्यटक निवास संपूर्णपणे महिला संचलीत आहेत. महामंडळाद्वारे नागपूर, छत्रपती संभाजी नगर व खारघर, नवी मुंबई येथील पर्यटक निवास, उपहारगृहे आणि कार्यालयीन कर्मचारी हे सर्व महिलांद्वारे संचलीत करण्यात आले आहे. या ठिकाणी रिसॉर्ट मॅनेजर पासून ते हाऊस किपींग, फ्रंट ऑफीस, फुड ॲन्ड बेवरीजेस, लेखा सहाय्यक, शिपाई, मदतनीस, चौकीदार, टॅक्सी चालक इ. सर्व अर्हता प्राप्त महिला असुन संपूर्णपणे महिला संचलीत करण्यात आले आहे. यानुषंगाने 40 महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
पर्यटक निवसांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट
‘आई’ धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8 मार्च 2024 हे 8 दिवस, आणि 1 ते 6 जून 2024, 1 ते 5 ऑगस्ट 2024 व 1 ते 5 ऑक्टोबर 2024 असे वर्षातील इतर 22 दिवस असे एकूण 30 दिवस महिलांकरिता महामंडळाच्या सर्व पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी 50% इतकी सूट देण्यात आली आहे.
एक दिवसीय सहल, शहरी सहल आयोजन, साहसी सहल आणि ट्रेकिंग टूर इ. चे आयोजन
याअंतर्गत हेरीटेज वॅाक, अनुभवात्मक पर्यटन (Experiential Tourism), शैक्षणिक सहल, 1 व 2 दिवसीय टुर्ससाठी महिलांना पर्यटक मार्गदर्शक (Tour guide) म्हणून मपविमद्वारे संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याचप्रमाणे जल पर्यटनासाठी महिला प्रशिक्षक देखील उपलब्ध आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात सर्व टुर्स हे प्रशिक्षित महिलांमार्फत राबवित आहे. या टुर्समध्ये क्युरेर्टस, गाईड महिला असणार आहे.एमटीडीसी मालमत्तेच्या ठिकाणी महिला बचत गटांना विविध स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य आहे.विशेष खेळ व मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन पाच वर्षांपर्यंतची मुले असलेल्या महिला पर्यटकांसाठी पाळणाघर, या आंतराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सर्व उपक्रम महिलांना पर्वणी ठरतील. या उपक्रमामुळे एकट्या महिला प्रवासी (solo women traveller) व महिला ग्रुप टूर यांना पर्यटनासाठी वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रातील विविध पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग नोंदवला जाईल आणि महिला पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल.महिलांना त्यानुषंगाने महिला चालवत असलेले उपक्रम, महिला पर्यटक व महिला उद्योजक असा सर्वांकडून भरघोस प्रतिसाद मिळेल.
०००
संध्या गरवारे/विसंअ
नवीन वाहनांमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे
सांगली, दि. 7, (जि. मा. का.) : जिल्हा नियोजन समितीतून सांगली पोलीस दलाला एकूण नवीन २२ वाहने प्राप्त झाली आहेत. यामुळे पोलीस विभाग अधिक सक्षम होईल. या वाहनांमुळे कायद्या व सुव्यवस्था राखण्यास निश्चित मदत होईल. असा आशावाद पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त वाहनाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आमदार अरुण लाड, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुमनताई पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधिक्षक संदीप घुगे,
जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून पोलीस दलासाठी एकूण 22 वाहने तर पोलीस महासंचालक कार्यालय यांच्याकडून 10 दुचाकी वाहने प्राप्त झाली आहेत. पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सत्यजित देशमुख यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000
वाघांच्या भूमीत संभाजी महाराजांचे पोस्ट तिकीट काढण्याचे सौभाग्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण
चंद्रपूर, दि.7 : जगातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अशा या वाघांच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘छावा’ असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करणे, हे माझे सौभाग्य आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रियदर्शनी सभागृह येथे सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टपाल तिकिट, छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रे, मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड – 1, ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ आणि महाराष्ट्र : गोंड समुदाय या पुस्तकांचे विमोचन करण्यात आले. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. मंचावर नागपूर क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे, जिल्हाधिकारी विनय गौडा, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर, पुराभिलेख विभागाचे संचालक सुजित उगले, प्रा. अशोक जिवतोडे, राहुल पावडे, डॉ. मंगेश गुलवाडे आदी उपस्थित होते.
शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने 12 महान व्यक्तिरेखा आणि 12 ऐतिहासिक प्रसंगावर आधारीत पोस्ट तिकिट काढण्याचा निर्णय घेण्यात आला, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, आज मात्र चंद्रपूर या वाघाच्या भुमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत टपाल तिकिटाचे अनावरण करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले आहे. आपल्याला जेव्हा आयुष्य समजायला सुरुवात होते, त्या केवळ 32 वर्षाच्या वयात छत्रपती संभाजी महाराज 120 लढाया लढले आणि जिंकलेही. छत्रपती संभाजी महाराजांची विरता, पराक्रम आणि शौय शब्दबध्द करता येत नाही. जगात अनेक राजे होऊन गेले, त्या सर्वांनी आपले साम्राज्य वाढविण्यावर भर दिला. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची ख-या अर्थाने रयतेचे राज्य चालविले. सुर्याच्या पोटी सुर्यच जन्मतो, त्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांनी तत्वासाठी आपले जीवन समर्पित केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. संभाजी महाराजांवरचे टपाल तिकीट हा केवळ एक कागदाचा तुकडा नाही, तर आपला शक्तीशाली वारसा आहे.
पुढे श्री. मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज म्हणजे सुर्याची उर्जा देणारा स्त्रोत होय. आग्र्याच्या ज्या दरबारात शिवाजी महाराजांचा अपमान झाला तेथेच गत दोन वर्षांपासून राज्य शासनाच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे नियोजन आहे. 4 मे ला वाघ नखं भारतात येत आहे. ही वाघनखं पाच ठिकाणी जाणार आहे. दिल्लीच्या जे.एन.यु. विद्यापीठात सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यावेळी श्री. मुनगंटीवार यांनी विभागाचे संचालक विभीषण चवरे, गॅझेटिअर विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर यांचे विशेष कौतुक केले.
चंद्रपूर सतत प्रगतीच्या मार्गावर जात राहावा. राज्यातच नव्हे तर देशातील इतर जिल्ह्यांनी चंद्रपूरचा अभ्यास करावा, या जिल्ह्याचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्र महान करायचे असेल ‘जय महाराष्ट्र’ आणि महाराष्ट्र श्रेष्ठ करायचा असेल चंद्रपूर मोठे करणे आवश्यक आहे, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
प्रास्ताविकात संचालक विभीषण चवरे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विभागाला एक वेगळी उंची मिळवून दिली आहे. अनेक वर्षाचे काम केवळ दोन वर्षात करून सांस्कृतिक कार्य विभागाने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात एक वेगळा ठसा उमटविला आहे. पूर्वी वर्षात एखादा कार्यक्रम होत होता. आता विभागाच्या वतीने 400 च्या वर कार्यक्रम करण्यात आले आहे. मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविले असून महासंस्कृती महोत्सव, महानाट्य ‘जाणता राजा’ चे प्रयोग प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. यावेळी पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
अंध बांधवांसाठी ब्रेललिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यकथा
आपल्या राज्यात नोंदणीकृत अंध असलेल्या नागरिकांची संख्या 5 लक्ष आहे. या लोकांपर्यंतसुध्दा शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास पोहचविण्यासाठी ब्रेल लिपीमध्ये मुद्रीत छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीग्रंथ पोहचिवण्याचा निर्णय घेतला. अंध बांधवांपर्यंत शिवाजी महाराज पोहचवू शकलो, याचा आनंद आहे. सर्व दिव्यांग शाळांमध्ये हा ग्रंथ पोहचविण्याचा सुचना विभागाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र : गोंड समुदाय पुस्तकाचे विमोचन
गोंड समाजाच्या वीरतेचा इतिहास सर्वदूर पोहचविण्याच्या दृष्टीने प्रा. श्याम पोरेटे यांनी लिहिलेले ‘महाराष्ट्र : गोंड समुदाय’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये गोंडवाना विद्यापीठ स्थापन व्हावे, यासाठी आपल्या अर्थमंत्री पदाच्या काळात 200 एकर जागा उपलब्ध करून दिली. तसेच विद्यापीठासाठी 800 कोटी रुपये मंजूर केल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले.
शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचे कॉफीटेबल बुक
पुराभिलेख विभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे उपलब्ध असून ही पत्रे सामान्य जनेतपर्यंत पोहचावित, या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळपत्रांचे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले आहे. तसेच पुराभिलेख संचालनालयामध्ये उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारीत मराठेकालीन टाकसाळी संबंधाची मोडी कागदपत्रे, खंड – 1 हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
विभागाच्या वतीने आतापर्यंत विविध टपाल तिकिटे प्रकाशित
सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने शहाजी महाराज, 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊ यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण, 6 जून रोजी राजभवन येथे शिवराज्याभिषेक तिकीटाचे अनावरण करण्यात आले असून केवळ 6 दिवसांत टपाल तिकीट काढण्याचा विक्रम देशात सर्वप्रथम झाला आहे. संत जगनाडे महाराज, बाबा आमटे, शहीद बाबुराव शेडमाके, अण्णाभाऊ साठे या महान व्यक्तिंवरसुध्दा टपाल तिकीट काढण्यात आले आहे.
000000
राज्य शासन उद्योजकांच्या सदैव पाठीशी – पालकमंत्री उदय सामंत
रायगड, दि.07(जिमाका) :- महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाने मोठ्या उद्योजकांबरोबर च छोट्या उद्योजकांना देखील सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. उद्योजकांवर कुठलेही संकट येणार नाही याची राज्य शासन काळजी घेईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. यावेळी श्री.सामंत यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्यासाठी 2600 कोटी रुपयांचे 17 सांमजस्य करार करण्यात आले.
पनवेल येथे आयोजित जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर आ प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजु सिरसाठ, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक जी. हरळय्या उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी, गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरिता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन उद्योग विभागामार्फत करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणुकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्हयांना विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे हा या परिषदेचा उद्देश आहे. तसेच राज्याची अर्थव्यवस्था सन 2027 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर पर्यत पोहचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. त्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद 2023 यांनी सुचविलेल्या सुधारणाचे अंमलबजावणीसाठी विविध उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर निर्यात व विकासाचे केंद्र म्हणून जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करुन जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी रायगड जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
समुद्र किनारी असलेल्या जिल्ह्यामध्ये उद्योजक गुंतवणूक करत आहेत. स्थानिक स्तरावर 1 लाख कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे. 50 लाखाच्या प्रोजेक्टला देखील रेड कार्पेट मिळाले आहे. छोटे व स्थानिक उद्योजक शासनाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. अटल सेतूमुळे रायगड जिल्ह्यात पायाभूत सोयी-सुविधांचा विकास होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ,समृध्दी महामार्गामुळे उद्योग वाढीला चालना मिळणार आहे. देशात परकीय गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र राज्य एक नंबरला आहे असेही श्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
गडचिरोली मध्ये एक हजार एकर जागा लॉइडस कंपनीला दिली असून 60 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या जिल्ह्यात झाली आहे. गडचिरोली मध्ये जिंदाल, टाटा ने गुंतवणूक केली असल्याने आगामी एका वर्षात उद्योग नगरी म्हणून गडचिरोली ओळखली जाणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमामुळे 18 ते 19 हजार उद्योजक बनविण्याचे स्वप्न साकार होणार आहे. उद्योगाची भरभराट होण्यासाठी उद्योजकांनी उद्योजक तयार करावेत असे केले तर बेरोजगारी दूर होईल. उद्योजकांवर कुठलेली संकट येणार नाही, याची काळजी शासन घेईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाठ यांनी प्रास्ताविक केले.
000000
जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे १२ मार्चपासून वार्षिक प्रदर्शन
मुंबई, दि. ७ : सर ज.जी. कला महाविद्यालय ही दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य कला संस्था असून २ मार्च रोजी या संस्थेने १६८ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या संस्थेचा वार्षिक कला प्रदर्शनाचे उद्घाटन ११ मार्च रोजी सायं. ५ वा. होणार आहे. दि. १२ ते १७ मार्च या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्व कलाप्रेमींना विनामूल्य पाहता येईल.
वार्षिक कला प्रदर्शन हा विद्यार्थी व संस्थेसाठी महत्त्वाचा उपक्रम असून यामध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या वर्ग कामामधून उत्कृष्ट कलाकृती निवडून त्या प्रदर्शित केल्या जातात.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या मुख्य इमारतीतील तळमजला तसेच पहिला मजला व रे आर्ट वर्कशॉप या इमारतीमध्ये हे संपूर्ण प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखिका डॉ. फिरोजा गोदरेज व संस्थेचे माजी विद्यार्थी व चित्रकार विलास शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे. दि. १२ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि फॅशन शोचे आयोजन, दि.१३ मार्च रोजी सायंकाळी ६.०० वा प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका श्रुती सडोलीकर यांच्या हिंदुस्थानी शास्रीय संगीत गायनाच्या कार्यक्रमास सर्वाना विनामूल्य प्रवेश देण्यात येईल. दि. १६ मार्च रोजी कलावेध चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित केली आहे.
या प्रदर्शनामध्ये चित्रकला विभागातील विद्यार्थ्यांनी वास्तववादी पद्धतीने रंगवलेली व्यक्तिचित्र निसर्ग चित्र, स्थिर चित्र प्रदर्शित केली आहेत त्याच बरोबर प्रिंट मेकिंग व रचनाचित्र या विषयांमध्ये वेगवेगळे सामाजिक विषय तसेच व्यक्तिगत अनुभवावर आधारित विविध पद्धतीने चित्र रंगविलेली आहेत.
शिल्पकला विभागामध्ये व्यक्ती शिल्प व रचना शिल्प ही फायबर, लाकूड, वेगवेगळ्या प्रकारचे दगड व मिश्र माध्यमांचा वापर करून शिल्पाकृती बनविलेल्या आहेत धातू काम विभागातील विद्यार्थ्यांनी तांब्याचा पत्रा, विविध पद्धतीने ठोकून व वेगवेगळे उठाव निर्माण करून विविध कलाकृती तयार केल्या आहेत.
इंटेरियरच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची फर्निचर व इंटेरियरची डिझाईन तयार करून त्यांची मॉडेल या प्रदर्शनामध्ये सादर केली आहेत. टेक्स्टाईल या विभागातील विद्यार्थ्यांनी विव्हिंग व प्रिंटिंग पद्धतीने कार्पेट, बेडशीट, पडदे, साडी, ड्रेस इत्यादी वर नावीन्यपूर्ण डिझाईन केलेली पहावयास मिळतील याचबरोबर कलाशिक्षक प्रशिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचीही कामे यात प्रदर्शित करण्यात आली आहेत.
कला रसिक व कलेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या व पद्धतीच्या कलाकृती बघण्याची संधी या प्रदर्शनातून मिळणार आहे तसेच चित्रकला व डिझाईनच्या क्षेत्रामध्ये पुढील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी योग्य क्षेत्र निवडण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत मार्गदर्शक ठरेल.
०००
श्रद्धा मेश्राम/स.सं
खादी ग्रामोद्योगच्या राज्यस्तरीय प्रदर्शनास उद्यापासून बोरीवलीत प्रारंभ – सभापती रवींद्र साठे
मुंबई, दि. ७ : ग्रामीण लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने ८ मार्च ते १७ मार्च या कालावधीत सी.बी.कोरा केंद्र, शिंपोली गाव, बोरीवली येथे राज्यस्तरीय वस्तू प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ग्रामीण लघु उद्योजकांच्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे सभापती श्री. साठे यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या प्रदर्शनामध्ये खादी ग्रामोद्योग आयोग व राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ग्रामीण उद्योजकांच्या दर्जेदार उत्पादनांचा समावेश केला आहे. तसेच मध केंद्र योजना व मधाचे गाव यासह मधाच्या विक्रीसाठी इच्छुक लघुउद्योजकांना प्रदर्शनामध्ये माहिती देण्यात येणार आहे.
खादी ग्रामोद्योग मंडळ व खादी ग्रामोद्योग आयोगाच्यावतीने ग्रामीण भागात शासनाच्या रोजगार निर्मितीच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. ग्रामीण उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तू/उत्पादनांना मोठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी मंडळ कार्यरत आहे. खादी सामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जनजागृती मेळाचे सर्व जिल्ह्यात आयोजित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनामध्ये ५० स्टॉल लावण्यात येणार असून, सकाळी १० ते रात्री १० या वेळेत खुले राहील. प्रदर्शनामध्ये खादीवस्त्र, हळद, मध, हातकागद उत्पादने, कोल्हापूरी चप्पल, केळीपासून विविध पदार्थ, मसाले, विविध प्रकाची लोणची, पापड, लाकडी खेळणी, शोभेच्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार असल्याची माहिती श्री. साठे यांनी दिली.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागिरांना कौशल्य प्रशिक्षणासमवेत आर्थिक लाभ देणार – मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला
विविध १८ लघु व्यवसायातील कारागीर आणि शिल्पकारांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत १५ हजारापर्यंत प्रोत्साहनपर आर्थिक लाभ देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्यांना पाच दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण आणि भांडवल खरेदीसाठी तीन लाखापर्यंत टप्प्याटप्याने कर्ज प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी दिली.
लहान कामगार आणि कुशल कारागिरांना प्रशिक्षण, कौशल्याबाबत सल्ला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान देण्यात येणार आहे. देशातील गरजू कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारातून ही योजना राबवित असल्याचेही त्यांनी सांगितले. नोंदणीकृत कारागिरांना मान्यता देण्यात येणार आहे. आजतागायत ३ लाख कारागिरांची नोंदणी झाली असून, १४ हजार कारागिरांना १०० प्रशिक्षण केंद्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या प्रदर्शनाची सुरुवात जागतिक महिला दिनानिमित्त होत असल्याने ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ५० कारागीर महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या विविध योजनांची माहिती या मेळाव्यात देण्यात येणार आहे.
या प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन ग्रामोद्योगी उत्पादने खरेदी करावी, आणि ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन मंडळाचे सभापती रवींद्र साठे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांनी केले आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी ०२२/२२६१७६४१ या क्रमांकावर संपर्क साधावा.
०००
श्रद्धा मेश्राम/स.सं