गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 844

पोलिसांचे मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरविणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. ९ (जिमाका): समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागाला  आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर अनुदानातून अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय (ग्रामीण)यांच्यासाठी 35 चारचाकी तसेच 15 मोटर सायकल वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनांचा हस्तांतरण सोहळा  पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पालकमंत्री श्री. पाटील  बोलत होते.

खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार रवि राणा, निवेदिता दिघडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अमरावती  पोलीस अधीक्षक ( ग्रामीण )विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आली.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीमार्फत पोलीस अधीक्षक अमरावती (ग्रामीण) घटकांकरिता 3 कोटी 4 लाख 70 हजार रुपयांचा निधी मंजूर  झाला होता. त्यानुसार मंजूर निधीतून विभागाच्या सक्षमीकरणासाठी 35 चारचाकी वाहन खरेदी करण्यात आले आहेत. ही वाहने कायदा व सुव्यवस्था, व्हीआयपी, व्हीव्हीआयपी, स्कॉटिंग, एस्कॉर्ट तसेच पोलीस स्टेशन येथील डायल 112 या कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. तर 15 मोटरसायकल या पोलीस स्टेशन येथील दैनंदिन कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत. पोलीस बंदोबस्त तसेच दामिनी पथकाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या वाहनांचा निश्चितच फायदा होईल. यापुढेही पोलीस खात्याचे आधुनिकीकरण तसेच निवासस्थानांच्या दुरुस्ती, नवीन पोलीस स्टेशन निर्मिती, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, वेलफेअर फंड, सभागृहांची निर्मिती, अत्याधुनिक साहित्य खरेदी आदींसाठी सीएसआर फंड व जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल ,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली .

पोलीस विभाग अधिक सक्षम करण्यासाठी शासन विविध उपायोजना राबवित आहेत. पोलिसांच्या सहकार्यामुळेच आपण बिनधास्तपणे समाजात सुरक्षितपणे वावरू शकतो. विविध सण-उत्सव आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकतो. आपल्याला रात्रीची शांत झोप मिळावी, यासाठी पोलीस विभाग आपले कर्तव्य बजावीत असतात. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सायबर सुरक्षितता महत्त्वाची आहे. अंमली पदार्थांचा युवकांमधील वापर, वाढती गुन्हेगारी वृत्ती यांना आळा घालण्यासाठी पोलिस विभाग सर्व सुविधांनी सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधितपणे राखण्यासाठी पोलीस विभागाला आवश्यक साधन सामुग्री, अत्याधुनिक यंत्रणा पुरविण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक( ग्रामीण) विशाल आनंद यांनी केले. संचालन आणि आभार डॉ. सागर धनोडकर  यांनी मानले.

०००

‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. ९ (जिमाका): माणसामध्ये प्रगल्भता विकसित होण्यासाठी तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. यासाठी येत्या काळात ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून काही हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावातही ग्रंथालय सुरू करण्यात येईल. आदिवासी दुर्गम पाड्यांवरही विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमरावती ग्रंथोत्सव -2023 चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन जवळील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, ग्रंथालयाच्या अनुदानामध्ये 60 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, पुस्तकांची खरेदी यासाठी सहाय्य होत आहे. पूर्वी ग्रंथालयांना अनुदान मिळायला विलंब व्हायचा. आता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून केवळ एका क्लिकवर राज्यातील 12 हजार ग्रंथालयांना तात्काळ अनुदान मिळत आहे. सुरु ग्रंथालय तसेच नवीन ग्रंथालयांच्या विकासासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या स्मार्ट युगात ई-लायब्ररी हा प्रयोग राबवावा लागणार आहे. येत्या जूनमध्ये 4 हजार नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यात येणार आहे. ग्रंथालयांची अ, ब, क आणि ड ही वर्गवारी आणि तपासणी सोपी होण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये ग्रंथालयांच्या वर्गवारीतही वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रयत्न केल्यास वाचन संस्कृतीत निश्चितच वाढ होते, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की,  यापुढे जिल्ह्याच्या नियोजनातही ग्रंथालयाला अनुदान दिले जाईल. हा निधी ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाईल. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायोजनांना विद्यार्थीवर्ग तसेच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ ही देश पातळीवरील रास्त व वाजवी दरात पुस्तके प्रकाशित करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत ‘बुक फेस्ट’ नावाने राष्ट्रीय प्रदर्शन नुकतेच पुण्यात घेण्यात आले होते. या बुक फेस्टच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये 90 टक्के खरेदीदार हे शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते, हे विशेष. वाचकसंख्या वाढविण्यासाठी अशा विविध उपक्रमांचा फायदा होतो. वाचकांपर्यंत त्यांना आवश्यक असणारी पुस्तके पोहोचावी, यासाठी कोल्हापूर येथे ‘फिरते वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. फिरते वाचनालयाला कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या प्रतिसादानंतर आता येथील शाळेतही फिरते वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येत आहे. एका विशिष्ट वेळेला शाळेच्या प्रांगणात फिरते वाचनालय येते. फिरते वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या रुचीची पुस्तके घेवून आवडीने वाचतात.  वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथालयांनी पुढाकार घेवून विविध उपक्रम राबवावेत. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशक, लेखक यांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे. आवश्यकतेनुसार ग्रंथालया विकासासाठी शासन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला सकाळी ग्रंथदिंडीने सुरवात झाली. ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, परिसंवाद, व्याखान, नाटक आदी भरगच्च कार्यक्रमांमुळे रसिक व ग्रंथप्रेमींना खास  बौद्धिक मेजवानी मिळत आहे. ग्रंथोत्सवामध्येमध्ये पालकमंत्री श्री. पाटील यांनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्या. त्यांनी प्रकाशक, आणि वाचक यांच्याशी संवाद साधला. ग्रंथोत्सवात व्यक्तिपरत्वे आवड-निवड लक्षात घेऊन पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, कला कौशल्य, प्रशासकीय रचना, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, मानसशास्त्र, प्रभावी व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉ. सुरज मडावी यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट केली. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक वाचकाला त्यांच्या आवडीनुरुप ग्रंथ मिळावा,  प्रकाशक व विक्रेत्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, नवलेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रंथोत्सवाचे महत्त्व विशेष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथेत्सवात नियमित वाचकांचाही सत्कार करण्यात येतो. शासकीय ग्रंथालयाची नवीन इमारत पूर्णत्वास येत असून येथे वाचकांना वाचनविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम यांच्यासह ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी, प्रकाशक, लेखक, वाचक आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रिती बनारस यांनी मानले.

ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रम

ग्रंथोत्सवात रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत ‘सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवरील परिणाम’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपायुक्त संजय पवार तर अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. हेमंत खडके, प्रा. प्रणव कोलते व प्रा. ऋषभ डाहाके सहभागी होतील. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन नितीन भट तर कविसंमेलनमध्ये अनंत नांदूरकर, प्रणाली देशमुख, सारिका उबाळे, विष्णु सोळंके, संघमित्रा खंडारे, ऋषिकेश पाडर, शिल्पा पवार, विशाल मोहोड, नंदा भोयर सहभागी होतील. दुपारी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमात ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्र वितरण सोहळा होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

०००

 

विद्यापिठाच्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना तीन लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. ९ : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे विद्यापीठातील शिक्षक-शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही तीन लाभांच्या (दहा-वीस-तीस) सुधारित सेवांतर्गत  आश्वासित प्रगती योजनेंतर्गत वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्यासाठी मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिली. विद्यापीठातील शिक्षक- शिक्षकेत्तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हिताचे सर्व प्रश्न राज्य शासनाकडून सोडविण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरातील दृक-श्राव्य सभागृहात आयोजित कार्यक्रमात सात उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्तीचे आदेश पालकमंत्र्यांच्या हस्ते आज वितरीत करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे-पाटील, आमदार प्रताप अडसळ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, प्र. कुलगुरु प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. उमेश काकडे, विद्यापीठ कर्मचारी संघाचे अध्यक्ष अजय देशमुख यांच्यासह विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येत आहे, ही चांगली गोष्ट विद्यापीठ प्रशासनाकडून होत आहे. यामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना खूप मोठा आधार मिळणार आहे. यापुढेही विद्यापीठाच्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे हिताचे प्रश्न राज्य शासनाकडून तत्परतेने सोडविण्यात येईल. तसेच अनुकंपा तत्वाचे प्रलंबित आठ प्रकरणे व वयोमर्यादा ओलांडलेली चार प्रकरणे विशेष बाब म्हणून विचार करुन त्यांचा मंत्रालय स्तरावर निर्णय घेण्यात येईल. लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी या मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यापीठाने सुध्दा आपल्या कार्यात गतीमानता आणावी. परीक्षांचे निकाल घोषित केल्यानंतर पदवी प्रदानासाठी अधिक कालावधी न घालवता डिजिटल स्वाक्षरीची पदवी डिजी लॉकरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या हिताची कामे स्वनिधीतून पूर्ण करावीत. आगामी काळात विद्यापीठ व महाविद्यालयातील 2 हजार 100 पद भरती करण्यात येईल. तसेच 2001 पूर्वीच्या सर्व महाविद्यालयांना अनुदानही उपलब्ध करुन देण्यात येईल. खूप अंतर असलेल्या धारणी व बुलडाणा येथील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाचे स्वतंत्र उपकेंद्र निर्मितीसाठी शासनाकडून मदत करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

कुलगुरू डॉ. बारहाते म्हणाले की, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने स्थापनेपासूनच अनेक यशाची मोठी शिखरे गाठली आहेत. नुकताच विद्यापीठाला पी.एम. उषा योजनेंतर्गत 20 कोटी रुपये, इन्क्युबेशन सेंटरला पाच कोटी रुपयाचे अनुदान शासनाकडून प्रदान करण्यात आले आहे. विद्यापीठामध्ये आदिवासी विद्यार्थीनींकरीता वसतीगृहाचे बांधकाम सुरू असून अनेक इमारतींचे बांधकाम प्रस्तावित आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.  विद्यापीठांतर्गत पाच जिल्ह्यांचे विद्यार्थी शैक्षणिक सुविधा घेतात, परंतु, बुलढाणा व धारणी सारख्या अधिक अंतर असलेल्या विद्यार्थ्यांना लवकर शैक्षणिक सुविधा मिळण्यासाठी उपकेंद्र निर्मितीसाठी शासनाने मंजूरी द्यावी, अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना यावेळी केली.

अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश प्राप्त करणारे उमेदवार :

अनुकंपा तत्वावर नोकरीचे आदेश नेहा देवानंद रॉय, अनजर खान अयुब खान, अब्दुल तौसिफ अब्दुल तसलीम, ऋषिकेश विनोद कांडलकर, अभिषेक गणेश देशमुख, अदिती दत्ता वाबळे व अदिती दिपक मोहोड यांना कनिष्ठ लिपिक पदाचे शासनादेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

०००

 

 

 

 

 

 

बचत गटाच्या मध्यमातून आपल्या गावात आपला रोजगार निर्माण करणार – मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दि. ९ (जिमाका):  प्रत्येक महिला बचत गटांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दहा हजार रूपये दिले जात आहेत, आता गावातील महिलांनी त्यांचा रोजगार निवडायचा असून त्या रोजगारासाठी बचत गटांना प्रशिक्षण आणि निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, त्यामुळे आपल्या गावात आपला रोजगार निवडण्याचे स्वातंत्र्य आदिवासी महिलांना मिळणार असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते आज तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आयोजित विविध वैयक्तिक व सामुहिक याोजनांच्या लाभा वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित, आदिवासी सेवक डॉ. शशिकांत वाणी, रूपसिंग पाडवी, जितू महाराज, यशवंत ठाकरे,दिलीप ठाकरे यांच्यासह पंचक्रोशीतील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून घरकुले, वैयक्तिक व सामुहिक शेळी गट वाटप, महिलांना गायींचे वितरण तसेच गावातील तरूणाईमध्ये खेळ भावना निर्माण व्हावी यासाठी क्रकेट साहित्य व भजनी मंडळांना वाद्यावृंद व तद्अनुषंगिक साहित्य वितरित केले जात असल्याचे सांगितले. आदिवासी भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी जे उपक्रम व योजना राबवता येतील ते उपक्रम व योजना राबवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

ते पुढे म्हणाले, प्रत्येक वाडा-पाड्याला जोडणारे जाडरस्ते बिरसा मुंडा योजनेच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत. आश्रमशाळा, आरोग्य केंद्र, शाळा, ग्रामपंचायतींना या रस्त्यांच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात नळाच्या माध्यमातून पेयजल दिले जाणार असून आता शासकीय योजना जनतेच्या गरजेप्रमाणे राबवली जाणार आहे, त्यासाठी तुम्ही एखादा स्थानिक पातळीवर शेतीपुरक उद्योग विवडायचा आहे त्या उद्योगाला प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देण्याचाही प्रयत्न येणाऱ्या काळात शासनानार्फत केला जाणार आहे.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हिना गावित यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी वैयक्तिक शेळी प्रमाणपत्र वाटप- ६०, महिला बचत गट शेळी वाटप- ३१, महिलांना गायींचे निवड प्रमाणपत्र-७१,क्रिकेट संच साहित्य- १०५, ६७ बचत गटांना प्रत्येकी रुपये १० हजार अर्थ सहाय्य,९० भजनी मंडळांना  साहित्य वितरित करण्यात आले.

०००

 

 

लोकसभा निवडणूक २०२४; मुंबई शहर जिल्ह्यातील तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा 

मुंबई, दि. ९ :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४’ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील मध्यवर्ती मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या समवेत, कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे,अपर जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, स्वीप नोडल ऑफिसर फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, संबंधित अधिकारी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. यादव यांनी भेटी दरम्यान ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम सुरक्षा आणि सुरक्षितता याबाबत स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत चर्चा करून स्वतः सर्व जागेची पाहणी करून आढावा घेतला. निरंतर मतदार नोंदणी ऑनलाइन/ऑफलाइन अर्ज बाबत केलेली कार्यवाही, नवमतदार नोंदणी, जिल्हा निवडणूक व्यवस्थापन आराखडा, मतदान केंद्र, आरक्षित मतदार केंद्र, जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर किमान सुविधाचा आढावा, राष्ट्रीय सेवा तक्रार पोर्टल (NGSP)वरील तक्रारीबाबत तातडीने निपटारा करणे, मतदान केंद्रातील व्यवस्थापन,वेब कास्टिंग, रूट मॅप, सेक्टर मॅप, क्षेत्र नकाशा, संप्रेषण योजना (Communication Plan), मतदान कक्षात मतदार सहाय्यकांच्या नियुक्ती,वाहन व्यवस्था याबाबत सविस्तर आढावा घेऊन स्थानिक काही अडचणी आहेत का जाणून घेतल्या.

मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून मतदान प्रक्रिया शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी आवश्यक त्या  उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी भेटी दरम्यान स्थानिक  वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या सोबत चर्चा संबंधित अधिकारी यांनी दिले.

 

काल कुलाबा,मलबार हिल,मुंबादेवी,भायखळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. तर आज धारावी,सायन कोळीवाडा,माहिम,वडाळा विधानसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या मतदान केंद्रांवरील निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक त्या  सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करून  निवडणूक काळात सर्व यंत्रणांनी आपली कर्तव्य चोखपणे बजावीत आणि  मतदान केंद्रावरील नियमितपणे स्थितींचा आढावा घ्यावा अशा सूचना निवडणूक अधिकारी श्री.संजय यादव यांनी यावेळी दिल्या.

नवीन मतदार नोंदणी वाढविण्यासाठी  विशेष प्रयत्न करावेत आणि  मतदार केंद्रातील बदल व ईव्हीएम मशीन, स्ट्रॉंग रूम संदर्भात  स्थानिक लोकप्रतिनिधी व  राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना विश्वासात घ्यावे, अशा सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

०००

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा गौरव पुरस्कार प्रदान समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम उद्या सह्याद्री वाहिनीवर

मुंबई, दि. ९ – महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियान नुकतेच राज्यात राबविण्यात आले. या अभियानातील विजेत्या शाळांचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ मुंबईत ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. या समारंभावर आधारित विशेष कार्यक्रम मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता पाहायला मिळणार आहे.

शिक्षण क्षेत्राला नवचेतना देणाऱ्या या अभियानात एक लाख तीन हजार शाळांमधून सुमारे दोन कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते. देशाच्या महासत्ता होण्याच्या वाटचालीत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राचा मोलाचा वाटा असेल असे अभिमानाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात नमूद केले. तर अभियानातील तीन उपक्रमांची गिनीज बुक मध्ये नोंद झाल्याचे जाहीर करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे प्रमाणपत्रे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या कार्यक्रमात सुपूर्त करण्यात आली.

राज्य तसेच विभागीय पातळीवर पारितोषिक पटकावलेल्या शाळांचा मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. या संपूर्ण सोहळ्यावर आधारित असलेला वैष्णो व्हिजन निर्मित आणि जयू भाटकर दिग्दर्शित हा विशेष कार्यक्रम रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.

०००

वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. महानगरपालिकेने शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल.  सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे.  शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्त्वाचा असल्याने बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल. आज शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार श्री.लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात आली आहेत. भविष्यातले शहर म्हणून विविध सुविधा येथे निर्माण करण्यात येत आहेत. खेळाडुंसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरात अनेक चांगले बदल होत असून स्वच्छता, दर्जेदार पायाभुत सुविधा याबाबत महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मोशी येथे 700 खाटांचे रुगणालय उभारण्यात येणार असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला चांगले उपचार देता येतील असे त्यांनी सांगितले. लोकार्पण करण्यात आलेले विविध कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

 

श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

चिखली येथील टाऊन हॉल, भोसरी आणि बोऱ्हाडेवाडी येथील युवक व युवतींना रोजगार व प्रशिक्षण देणारा  ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्पाअंतर्गत भोसरी येथील स्टीचिंग युनिट, मोशी येथील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प आणि प्रभाग क्र.७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र  तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गट सक्षमीकरण अंतर्गत ‘सक्षमा’ प्रकल्पाचा व मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा २ कामाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

१७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, भोसरी स.नं.२१७- पंपिंग स्टेशनच्या अतिरिक्त वीज वापरण्याच्या ठिकाणी एनर्जी सेव्हिंगसाठी आवश्यक क्षमतेच्या एसटीपीचे, कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एनसीएपी अंतर्गत हवा शुद्धीकरण प्रणाली ॲड्री मिस्ट आधारित कारंजे प्रणाली, स्थिर धुके तोफ युनिटचे, चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निवासी सदनिकांचे आणि निगडी येथील जय ट्रेडर्स येथील पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

मोशी येथील गट क्र. ६४६ मधील गायरान जागेमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील एकूण १२.४ किमी लांबीच्या नवीन डीपी रस्त्याचे, भोसरी मधील प्रभाग क्र.७ येथील मनपा शाळेसाठी बांधण्यात येणारी इमारत, निगडी, दापोडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसन करणे, मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करणे, त्रिवेणी नगर चौकातील स्पाईन रस्त्याची मिसिंग लिंक रस्ता विकसित करणे व भक्ती शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरीडॉर विकसित करणे या कामांचे भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती – खासदार राहुल शेवाळे

मुंबई दि. ९ : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि अमरहिंद मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘महिला कला महोत्सव २०२४ – उत्सव स्त्रीशक्तीचा’ या महोत्सवाचे उद्घाटन ८ मार्च रोजी झाले. विविध शासकीय योजनांमुळे महिलांची प्रगती होत असल्याचे प्रतिपादन खासदार राहुल शेवाळे यांनी केले.

उद्घाटन सोहळ्यास आमदार सदा सरवणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मीनाक्षी खारगे, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, अकादमीच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, सदस्य श्वेता परळकर, अमर हिंद मंडळाच्या कार्याध्यक्ष सीमा कोल्हटकर उपस्थित होत्या.

शासनाकडून महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आणि त्याचा लाभ घेऊन महिलावर्ग करत असलेली प्रगती, याचा खासदार श्री. शेवाळे यांनी आढावा घेतला.

आपल्या संस्कृतीतील स्त्रियांचे महत्त्व आणि समाजातील त्यांचे योगदान याबद्दल प्रधान सचिव विकास खारगे यांनी आपल्या भाषणातून गौरवोद्गार काढले आणि  कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी व अमरहिंद मंडळाचे अभिनंदन केले.

उद्घाटन सोहळ्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी यांनी घेतली. त्यानंतर  सम्याक कलांश प्रतिष्ठान यांनी शेतकऱ्यांच्या विषयावर भाष्य करणारे “दादला नको गं बाई” हे  विनोदी लोकनाट्य सादर केले.

०००

 

कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि. : देशातील आणि जगातील कर्क रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. कुटुंब तसेच देशाकरिता कॅन्सरचे आर्थिक ओझे  फार मोठे असते. अनेकदा कुटुंबांना घर, दागिने विकावे लागतात. त्यामुळे कॅन्सरशी लढताना समग्र दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असून रुग्णांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या मानसिक, भावनिक व आर्थिक समस्यांचा विचार झाला पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पहिले माझे कर्तव्य’ (पीएमके) फाउंडेशनतर्फे कर्करुग्णांना तसेच त्यांच्या कुटुंबांना मदत करणाऱ्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी व्यक्तींना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘आय इन्स्पायर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. अण्णा भाऊ साठे सभागृह भायखळा येथे झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल श्री. बैस बोलत होते.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बडवे व अधिष्ठाता डॉ. श्रीपाद बाणावली यांना जीवन गौरव सन्मान देण्यात आला. कॅन्सरवर मात करणाऱ्या महिला तसेच विविध क्षेत्रातील २० कर्करोगयोद्धे यांना यावेळी ‘आय इन्स्पायर पुरस्कार’ देण्यात आले.

गावांमधील लोकांना कर्करोग झाल्याचे समजते तोवर आजार बराच बळावलेला असतो. या दृष्टीने  केंद्र सरकारतर्फे ग्रामीण भागात १.५ लाख आयुष्मान आरोग्य मंदिर बनविण्यात आले आहेत. कर्करोगाचे निदान वेळेवर झाल्यास उत्तम उपचार करता येतो, असे राज्यपालांनी सांगितले. लहान मुलांना कर्करोग उपचार घेताना पाहतो तेंव्हा दुःख होते. अशा मुलांना तसेच त्यांच्या मातापित्यांना समाजाने धैर्य देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

कर्करोगाशी लढताना समाजाची मदत महत्त्वाची – डॉ. सुरेश अडवाणी

कर्करोगाशी लढताना रुग्णांचे तसेच समाजाचे सहकार्य आवश्यक असते.  सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून कर्करोगावर मात करता येऊ शकते, असे कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांनी यावेळी सांगितले.  

शहरी भागात कर्करोग वाढतोय: डॉ. राजेंद्र बडवे

कर्करोगाचे प्रमाण  देशात सातत्याने वाढत असून ग्रामीण भागांपेक्षा शहरात कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे, तसेच भारतापेक्षा पाश्चात्य देशात ते प्रमाण अतिशय जास्त आहे, असे प्रतिपादन टाटा हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बडवे यांनी केले. महिलांमध्ये कर्करोगातून बरे होण्याचा दर पुरुषांच्या तुलनेत जास्त आहे, असे डॉ. बडवे यांनी सांगितले.

येत्या काही वर्षात देशातील कर्करोग रुग्णांची संख्या २० लाख झाली असेल. कॅन्सरवर उपचार महाग असल्यामुळे देशात कॅन्सर होण्यापूर्वीच आळा घालण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सांगितले. कर्करोगावरील उपचाराचा खर्च कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून राज्य व केंद्र सरकार देखील या कार्यात सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला पीएमके फाउंडेशनच्या अध्यक्षा नयना कनल, आयोजन सचिव डॉ. संदीप बिपटे तसेच समाज सेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

 

वृद्ध, दिव्यांगांच्या पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण करावे -राज्यपाल रमेश बैस

मुंबई दि.९: रस्त्यावरील अपघातांमुळे मज्जासंस्थेला इजा होऊन देशात अनेक लोकांना कायमचे अपंगत्व येते. आगामी काळात देशातील वरिष्ठ नागरिकांची संख्या देखील लक्षणीय वाढणार आहे. गंभीर अपघात तसेच वृद्धत्वामुळे येणारी गतिशीलतेवरील बंधने विचारात घेऊन आरोग्य सुविधा आणि दिव्यांग पुनर्वसन संस्थांचे बळकटीकरण झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अखिल भारतीय भौतिक उपचार व पुनर्वसन संस्थेच्या संयुक्त विद्यमानाने हाजीअली येथे संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये राज्यपाल बैस यांच्या हस्ते विकलांग लहान मुलामुलींना आज व्हिलचेअरचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी  शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध मज्जाविकार तज्ज्ञ डॉ. प्रेमानंद रमाणी, अखिल भारतीय भौतिक चिकित्सा व पुनर्वसन संस्थेचे संचालक डॉ.अनिल कुमार गौर, शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त डॉ.तुषार रेगे, मानद सचिव भूषण जॅक, डॉ अंजना नेगलूर तसेच संस्थेचे पदाधिकारी व निमंत्रित उपस्थित होते.

देशात 2016 साली तयार करण्यात आलेल्या दिव्यांग विधेयकासाठी स्थापन केलेल्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो, त्यावेळी आपण देशभरातील दिव्यांग व्यक्तींच्या अनेक संस्थांना भेट दिली होती. देशात इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे दिव्यांग लोक आहेत याची आपल्याला तोवर कल्पना देखील नव्हती, असे सांगून लहान मुलांमधील अपंगत्व चिंतेचा विषय असला पाहिजे तसेच त्यांना मुलांना सामान्य जीवन जगण्यासाठी सर्वतोपरी मदत केली गेली पाहिजे, असे राज्यपाल यांनी सांगितले.

वाहतूक नियम न पाळल्यामुळे तसेच रेल्वे मार्ग ओलांडताना अनेक लोकांना गंभीर अपघात होऊन कायमचे अपंगत्व येते. नियमांचे पालन केल्यास अपंगत्व येणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

दिव्यांग पुनर्वसनासाठी शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट सारख्या अनेक संस्थांची तसेच डॉ. रमाणी  सारख्या लोकांची गरज असल्याचे राज्यपालांनी सांगितले. व्हिलचेअर उपलब्ध करून दिल्यामुळे लहान मुले व मोठ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होईल असे सांगून राज्यपालांनी शांता सिद्धी ट्रस्टचे तसेच अध्यक्ष डॉ. रमाणी यांचे अभिनंदन केले.

०००

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...

नागपूरमधील विधानभवनाची विस्तारीत इमारत भव्यदिव्य असेल– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

0
मुंबई, दि. १६: नागपूरमधील विधानभवनच्या इमारतीचे विस्तारीकरण व प्रस्तावित नव्या प्रशासकीय इमारतीच्या आराखड्याचे आज सादरीकरण करण्यात आले. विस्तारीकरण व प्रस्तावित इमारतीचे काम भव्यदिव्य असे...

विधानसभा इतर कामकाज

0
अर्धा तास चर्चा ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार -पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मुंबई, दि. १६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक...

एस.टी. बस चालकाचा मुलगा विरोधी पक्षनेता होणे, ही लोकशाहीची मोठी देणगी – मुख्यमंत्री देवेंद्र...

0
मुंबई, दि. १६: "एस.टी. बस चालकाचा मुलगा आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्य विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, ही बाब अभिमानास्पदच आहे. कोणी कुठेही जन्माला आला तरी...

अंबादास दानवे हे विधानपरिषदेत चर्चेची उंची वाढवणारे विरोधी पक्षनेते – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
मुंबई, दि. १६ : अंबादास दानवे हे विधानपरिषदेतील चर्चेची उंची वाढवणारे आणि संयमी, परखड भूमिका मांडणारे विरोधी पक्षनेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...