गुरूवार, जुलै 17, 2025
Home Blog Page 843

मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडेल – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 10 (जि. मा. का.) : मिरज ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतका निधी देण्यात आला आहे. यामधून सुसज्ज, देखणे व मिरज शहराच्या वैभवात भर पडेल असे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानक तयार होईल, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या मिरज (ग्रामीण) बसस्थानक बांधकामाचे भुमिपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, माजी महापौर संगीता खोत, परिवहन मंडळाचे विभाग नियंत्रक सुनिल भोकरे, विभागीय वाहतूक अधिकारी वृषाली भोसले, विभागीय अभियंता सुशांत पाटील, मिरज आगार व्यवस्थापक श्रीमती किरगत, धनंजय कुलकर्णी, विठ्ठल खोत, उमेश हारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, मिरज ग्रामीण बसस्थानकाची 1983 साली स्थापना झाली होती. यामध्ये 15 फलाट व इतर सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामीण भागातून पूरक रेल्वे सेवा मिरज शहरामध्ये जोडली गेली असल्याने तसेच मिरज शहर हे वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले असल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून तसेच कर्नाटकमधूनही प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे सद्याचे मिरज ग्रामीण बसस्थानक अपुरे पडत आहे. कर्मचारी, प्रवाशी यांनाही अडचण होत आहे. त्यासाठी या बसस्थानकाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक होते. मिरज शहर व ग्रामीण बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 37 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये मिरज ग्रामीण बसस्थानकासाठी 19 कोटी 50 लाख रूपये इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आली असून त्याच्या कामाची सुरवात करण्यात येत आहे.  मिरज येथील शहरी बस स्थानकही लवकरच सुसज्ज करण्यात येईल.

बसस्थानकाचे तात्काळ काम सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी संबधितांना दिले. तसेचन काम सुरू असताना प्रवाशांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देवून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. मिरज ग्रामीण नव्याने बांधण्यात येणाऱ्या मिरज ग्रामीण बसस्थानकामध्ये तळमजला व पहिला मजला असे एकूण 1 हजार 965 चौ.मी. चे बांधीव क्षेत्रफळ आहे. यामध्ये तळमजल्यात 18 फलाट, सुलभ शौचालय, प्रतिक्षालय, वाहतूक निरीक्षक, पार्सल ऑफीस, जेनेरिक मेडिकल, आरक्षण, हिरकणी कक्ष, आगार व्यवस्थापक कक्ष, महिला विश्रांतीगृह, उपहारगृह, दुकान गाळे इत्यादीचा अंतर्भाव करण्यात आला आहे. पहिल्या मजल्यामध्ये चालक-वाहक विश्रांतीगृह, लेखा शाखा, तिकीट व रोकड शाखा, प्रसाधनगृह तसेच पाणीपुरवठा व्यवस्था, विद्युत काम, फायर फायटींग, ट्रीमिक्स पेव्हमेंट, पेव्हर ब्लॉक पार्किंगकरिता, आर.सी.सी. स्ट्रॉम वॉटर ड्रेन, संरक्षक भिंत, लँडस्केप, रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी कामे करण्यात येणार आहेत. या कामाची अंदाजित रक्कम 13 कोटी 96 लाख 95 हजार 797 रूपये इतकी असल्याचे यावेळी सांगितले.

प्रास्ताविकात परिवहन महामंडळाचे विभागीय अभियंता सुशांत पाटील यांनी बसस्थानकाबाबतची सविस्तर माहिती दिली. प्रतिदिन प्रवासी संख्या सुमारे 25 हजार इतकी आहे. त्यामुळे सध्याच्या सोयी सुविधा अपुऱ्या पडत असल्यामुळे आधुनिकीकरण गरजेचे होते. त्यासाठी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या पाठपुरावा व विशेष प्रयत्नांमुळे सर्व सोयी सुविधायुक्त मिरज ग्रामीण बसस्थानकाचे नव्याने बांधकाम होत असल्याचे ते म्हणाले. आभार विभाग नियंत्रक सुनिल भोकरे यांनी मानले. कार्यक्रमास परिवहन महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालयांचे भूमिपूजन

जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन रूग्णालयांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळेल पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन या सांगली येथे नविन बांधण्यात येणाऱ्या रूग्णालयांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील. आरोग्य पंढरीला साजेशा अशा सोयी सुविधा या रूग्णालयांच्या माध्यमातून मिळतील. गोरगरीब जनता शासकीय हॉस्पीटलमध्ये येते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या रूग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांचे भुमीपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, निता केळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सारंगकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे बांधण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयासाठी 46 कोटी रूपये व माता बाल संगोपन रूग्णालयासाठी 36 कोटी रूपये अशा एकूण 82 कोटी रूपयांचया रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मिरज येथेही नर्सिंग कॉलेज व 100 बेडचे माता बाल संगोपन रूग्णालय होत आहे. मिरज येथे मल्टीपर्पज हॉस्पीटल सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्था, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रूग्णालयातून गोरगरीब जनतेला सर्व औषधे मिळावीत यासाठी डीपीडीसीमधून निधी देवू, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार संजय पाटील म्हणाले, मिरज व सांगली ही वैद्यकीय नगरी म्हणून प्रसिध्द आहे. सांगली येथे होणाऱ्या 100 बेडच्या नविन दोन रूग्णालयांचा गोरगरीब जनतेला लाभ होईल. या रूग्णालयांच्या माध्यमातून रूग्णांची सेवा व्हावी, त्यांना दिलासा मिळावा. या रूग्णालयांचे काम लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन रूग्णालय सांगली येथे होण्यासाठी 2017 पासून पाठपुरावा व प्रयत्न सुरू केले होते. या रूग्णालयांमुळे एक चांगली सुविधा निर्माण होईल. काहीवेळा रूग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात, हा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते यावेळी म्हणाले.

प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांमुळे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होतील. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व सोयीयुक्त हॉस्पीटल सुरू झाल्यामुळे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण होईल व  गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करू, असे ते यावेळी म्हणाले.

आभार डॉ. प्रमोद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मिरज येथे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन

मिरज येथे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक संदीप आवटी, शिवाजी दुर्वे यांच्यासह अन्य मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

            मिरज येथील वॉर्ड क्र. 3(ब) मधील मिरज पंढरपूर रोड येथील स्मशानभूमी विकसित करणे, इस्त्राईलनगर अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करणे,  ईदगाहनगर ते पंढरपूर रोड रस्ता हॉटमिक्स करणे या कामांचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मिरज पंढरपूर रोड येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन योजनेतून 9 लाख 99 हजाार 649 रूपये, नगरविकास विशेष अनुदान योजनेतून इस्त्राईलनगर अंतर्गत रस्ते हॉटमिक्स करण्यासाठी 36 लाख 18 रूपये व  नगरविकास विशेष अनुदान योजनेतून ईदगाहनगर ते पंढरपूर रोड रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी 32 लाख रूपये अशी या कामांची अंदाजपत्रीय रक्कम आहे.

00000

आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक रहावे; आदिवासी संस्कृती, कला, नृत्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार

नाशिक, दिनांक : 10 मार्च, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा): केंद्र सरकारच्या जनजातीय विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग, शबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्‍य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्या योजनांचा लाभ करून घ्यावा. तसेच आदिवासी संस्कृती, कला व पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी त्याची तालुका व जिल्हा पातळीवर नोंदणी होणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशा सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज दिल्या.

आदिवासी विकास विभाग, नाशिक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या., नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ मर्या. (TRIFED) यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित आदिवासी कारागीर मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अतिरीक्त आयुक्त तुषार माळी यांच्यासह भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव चलवादी, ट्रायफेडचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, आदिवासी स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती हा जनजातीय गौरव दिवस म्हणून ओळखला जातो. या दिनाचे औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी बांधवांच्या सामाजिक-आर्थिक सक्षमीकरणासाठी पीएम जन मन (पीएम जन जातीय) ही योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत वनधन विकास केंद्राच्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत साधारण ९१ लाख रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. तसेच ट्रायफेड संबंधित महाराष्ट्रातील २४ आदिवासी कारागिरांना कार्यक्रमात GI प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. वनधन विकास, एमएसपी, एफपीओ अशा आदिवासी बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या लाभातून आदिवासी महिला बचत गट, वनधन विकास केंद्र यांच्या माध्यमातून आत्मविश्वासाने उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत. निसर्गाकडून मिळणाऱ्या शेतमाल तसेच अन्य साधनसामुग्रीला उत्पन्नाचे स्त्रोत बनवून स्वत: सोबतच इतर महिलांची आर्थिक उन्नती साधतांना दिसत आहेत. याचप्रमाणे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या शिष्यवृत्ती योजना, एकलव्य स्कूल, आदिवासी आश्रम शाळा, शैक्षणिक प्रगतीच्या योजनांच्या बाबतीत देखील जागरूक राहणे आवश्यक आहे, असे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले.

तसेच, आदिवासी बांधवांची कला, संस्कृती, पारंपरिक नृत्यांची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी यांनी तालुका व जिल्हा पातळीवर या नृत्य समुहांची नोंदणी करावी. जेणे करून राज्य तसेच देश पातळीवर आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्याचे संधी त्यांना उपलब्ध होईल, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

लीना बनसोड म्हणाल्या, आदिवासी बांधव त्यांच्या नृत्यशैलीतून नवचैतन्य निर्माण करत असतात. त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनांची थोडक्यात माहिती देवून या योजनांचा आदिवासी बांधवांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही लीना बनसोड यांनी यावेळी केले.

प्रारंभी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉ. भारती पवार यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांनी वरूण राजाला पावसासाठी आवाहन करणारे आदिवासी नृत्य, नागपंचमीच्या काळात करण्यात येणारे तारपा नृत्य, होळी सणात सादर करण्यात येणारे आदिवासी डांगी नृत्य अशा विविध आदिवासी पारंपरिक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर आदिवासी विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहिती देणाऱ्या ध्वनीचित्रफिती दाखविण्यात आल्या.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त व विकास महामंडळाच्या सहकार्याने शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांच्या अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांना धनादेश वाटप खालीलप्रमाणे

  1. विमल राजेंद्र बोके – रु. 2,00,000/-
  2. तीलोत्तमा चंद्रकांत नाठे- रु. 3,00,000/-
  3. प्रतिभा मुकुंदा भोये- रु. 2,00,000/-
  4. जनार्दन बाळू हलकंदर- रु. 10,00,000/-

या वनधन केंद्राना धनादेशाचे झाले वाटप….

1) जय कातकरी वन धन विकास केंद्र, हरसूल, ता. त्र्यंबकेश्वर- रु. 3,30,000/-

2) वन धन विकास केंद्र, रामवाडी, नांदगाव- रु.1,65,000 /-

3) वन धन विकास केंद्र, करंजखेड – रु. 1,25,000/-

4) वन धन विकास केंद्र, कोसवन, कळवण – रु.14,92,500/-

5) दिशा वन धन विकास केंद्र, कळवण’ – रु.14,92,500/-

6) कल्पतरू वन धन विकास केंद्र, मोहदान, पेठ – रु.7,50,000/-

7) प्रतीक्षा वन धन विकास केंद्र, अभोणा, कळवण रु. 14,92,500/-

00000000

जनता दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा दि.१०- (जि. मा .का) : पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा  होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पाटण पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यशराज देसाई उपस्थित होते.
पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, जनता दरबारात येणाऱ्या प्रत्येक अर्जांवर दोन महिन्याच्या आत कार्यवाही होणार आहे. ह्या अर्जांबाबत जिल्हाधिकारी व माझ्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडून देत नाहीत.
पाटण येथे आगळावेगळा असा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात नागरिकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. आपल्या अर्जांवर दोन महिन्याच्या आत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रशासन आपल्या दारात येणे हेच शासनाला अपेक्षित असल्याचेही  पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पाटण येथे होत असलेल्या जनता दरबारात जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित आहेत. जनता दरबारात आलेल्या अर्जांवर दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. आलेले अर्ज प्रत्येक विभागाला पाठविण्यात येतील. विविध योजनांच्या लाभासाठी अपूर्ण असलेले कागदपत्रे आपल्या घरी येऊन कर्मचारी पूर्तता करतील ,  नागरिकांनाही आता जिल्हास्तरावर हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचे आयोजन करून जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वाटप
जनता दरबार कार्यक्रम प्रसंगी लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिकांचे वाटप, पाणंद रस्ते कार्यारंभ आदेश, दिव्यांगांना सायकलीचे, अंगणवाडी सेविकांना मोबाईल व वजन काट्याचे वाटप, यासह विविध योजनांच्या लाभाचे वाटप  पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
या जनता दरबारास जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपजिल्हाधिकारी विजया यादव, पाटणचे प्रांत अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार आनंद गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
००००

मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारा सागरी किनारा मार्ग

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबई शहरातील धकाधकीच्या जीवनात वेळ आणि इंधन बचतीला आत्यंतिक महत्त्व आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या सागरी किनारा मार्ग (दक्षिण) ची एक बाजू वाहतुकीसाठी खुली होत असून वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यामध्ये हा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असलेले मुंबई हे भारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक प्रमुख शहर आहे. दक्षिण मुंबईतील परिसर व्यापार उदिमाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. सात बेटांनी तयार झालेल्या मुंबईचा भौगोलिक विस्तार उत्तर दक्षिण असा पसरलेला असल्याने येथील देशाच्या मुख्य भागाशी जोडलेले दोन मुख्य रस्ते देखील उत्तर दक्षिण असेच बांधलेले होते. साहजिकच या रस्त्यांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब असे. तथापि मागील काही वर्षांत या रस्त्यांना पूरक असे नवीन रस्ते तयार होत असल्याने रहदारीची ही जटील समस्या कमी होऊ लागली आहे. नुकत्याच सुरू झालेल्या ‘अटल सेतू’ नंतर आता सोमवारी वाहतुकीसाठी खुला होत असलेला मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

प्रकल्पामुळे होणारे फायदे

सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे 70 टक्के वेळेची बचत होणार असून इंधनामध्ये 34 टक्के बचत होईल. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची देखील मोठ्या प्रमाणात बचत होईल. ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होईल. सुमारे 70 हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होऊन मुंबईकरांचे जीवनमान सुधारेल. या हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह आदी प्रस्तावित आहेत. या रस्त्यामुळे इतर मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि सुरक्षित व जलद प्रवास करता येईल. मुंबईकरांना सागर किनारी अतिरिक्त प्रोमीनेड उपलब्ध होईल.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

मुंबई किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा दक्षिण मुंबईतील प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत असणार आहे. या रस्त्याची लांबी 10.58 कि.मी. असून मार्गिकांची रस्त्यावरील संख्या दोन्ही बाजूला प्रत्येकी चार असेल. तर बोगद्यांमध्ये ती दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन असेल. भराव टाकून बनविलेल्या रस्त्यांची लांबी 4.35 कि.मी. असून पुलांची एकूण लांबी 2.19 कि.मी.आहे. या मार्गातील मलबार हिल टेकडीच्या खालील दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी 2.072 कि.मी. असून त्याचा अंतर्गत व्यास 11 मीटर आहे. याचे एकूण भरावक्षेत्र 111 हेक्टर इतके असून तीन ठिकाणी आंतरबदल असतील ज्यांची लांबी 15.66 कि.मी. इतकी आहे. 7.5 कि.मी. लांबीचे नवीन पदपथ असून बस वाहतूकीसाठी समर्पित मार्गिका ठेवण्यात आली आहे. समुद्री लाटांपासून बचावासाठी 7.47 कि.मी. लांबीची सागरी तटरक्षक भिंत असणार आहे. या प्रकल्पात अमरसन्स, हाजी अली, वरळी डेअरी, थडाणी जंक्शन, वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

हा प्रकल्‍प मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून 25 फेब्रुवारी पर्यंत याची भौतिक प्रगती 85.91 टक्के तर आर्थिक प्रगती 81.19 टक्के इतकी झाली आहे. बोगदा खणन काम 100 टक्के पूर्ण झाले असून पुनःप्रापणाचे (रिक्लेमेशन) चे काम 98 टक्के पूर्ण झाले आहे. समुद्रभिंत उभारण्याचे काम देखील पूर्णत्वास आले असून आंतरबदल 87 टक्के तर पुलांचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे.

बोगद्याची वैशिष्ट्ये

किनारा मार्गावरील पहिला बोगदा खणण्‍याची सुरुवात जानेवारी 2021 मध्‍ये करण्‍यात आली होती. हा बोगदा जानेवारी 2022 मध्‍ये पूर्ण झाला. दुसरा बोगदा खणण्‍याची सुरुवात एप्रिल 2022 मध्‍ये करण्‍यात आली आणि हा बोगदा मे 2023 मध्‍ये पूर्ण झाला. बोगद्याला 375 मि.मी. जाडीचे काँक्रीटचे अस्‍तर लावण्‍यात आलेले असून त्‍यावर अग्‍नीप्रतिबंधक उपाययोजनेअंतर्गत अग्‍नीरोधक फायरबोर्ड लावण्‍यात येत आहेत. भारतात प्रथमच सकार्डो वायुविजन प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात आली असून आपत्‍कालिन निर्वासनासाठी प्रत्‍येक 300 मीटरवर छेद बोगदे आहेत. उपयोगिता सेवेसाठी बोगद्यांमध्‍ये युटीलिटी बॉक्‍सची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्‍यवस्‍थापन नियंत्रण प्रणालीची व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे.

प्रकल्पाचा खर्च

मुंबई किनारी रस्त्यासाठी एकूण बांधकाम खर्च 13983.83 कोटी रुपये अपेक्षित आहे. यामध्ये 9383.74 कोटी रुपयांच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाबरोबरच इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे.

इतर वैशिष्ट्ये

सागरी रस्ता प्रकल्पातील बोगदा खणणाऱ्या यंत्राने (टीबीएम) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा बोगदा (व्यास 12.19 मी.) आहे. भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यामध्ये सकार्डो वायुविजन प्रणालीची योजना करण्यात आली आहे. तसेच भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ पाईलचा पाया बांधून पुलांची उभारणी करण्यात आली आहे. एकाच प्रकल्पामध्ये पुनःप्रापण करुन रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पातील प्रवाळांचे (कोरल) स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याचे काम यशस्वीरित्या साध्य करण्यात आले आहे.

एकूणच वेळ आणि इंधन बचतीबरोबरच वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करून मुंबईकरांचे दैनंदिन जीवनमान सुखकर करण्यामध्ये हा किनारा मार्ग महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, हे निश्चित.

 

000

ब्रिजकिशोर झंवर

विभागीय संपर्क अधिकारी

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१०-पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार विकास ढाकणे, रविंद्र बिनवडे आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, पुण्यात वाहनांची संख्या अधिक असल्याने रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे. पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याच्या प्रयत्नासोबत रिंगरोडचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. रिंगरोडमुळे राज्याच्या कुठल्याही भागातून येणारी वाहने पुण्यात प्रवेश न करता इतर जिल्ह्यात जावू शकतील आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यावर रस्ते वाहतूकीवरील ताण कमी होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांमुळे वडगाव शेरी परिसराचा वेगाने विकास होत आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या मनात आपल्या आकांक्षा पुर्ण होत असल्याची भावना निर्माण व्हायला हवी असा शासनाचा प्रयत्न आहे.  विश्रांतीवाडी चौकात उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटरसह १७२ कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. उड्डाणपूलामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक कोटी नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सांडपाणी व्यवस्थापन आणि नदी सुधार कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी मंत्रालय स्तरावर नियमित आढावा घेण्यात येत आहे. या बैठकांच्या माध्यमातून विकासकामात येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतात, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.

सांस्कृतिक शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. अनेक महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी असल्याने शहराचा लौकीक कायम रहावा यासाठी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी सांगितले.

आमदार श्री.टिंगरे म्हणाले, वडगावशेरी विधानसभा मतदार संघात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. गोरगरिबांना हक्काची घरे देण्यासोबत अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. विश्रांतवाडी परिसराला भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे सुटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते एकूण १७२ कोटी ३० लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

0000

पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन

महाराष्ट्रात विमानसेवेचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – अजित पवार

पुणे, दि.१०: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री श्री.मोदी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  उपस्थित होते.

पुणे शहराला साजेसे भव्य आणि आधुनिक, पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देऊन यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले,  पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी  खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण  इमारतीत आहे.  विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले.

 

पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन

 

पुणे वायुसेनेचे केंद्र असल्याने इथली धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता  पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ  उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत. दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे, असेही श्री.फडणवीस म्हणाले.

 

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, एकाचवेळी १० हजार कोटी रुपये खर्चाच्या १४ विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. बरेच दिवसापासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावे ही पुणेकरांची मागणी होती. स्व.गिरीश बापट यांनीदेखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला.  एक हजार मोटारी उभे राहू शकतील, ३४ चेक इन काऊंटर, ९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा परिसरात उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री असल्याने देशात असे आमुलाग्र बदल होत आहेत. वंदे भारत रेल्वे, नवे विमानतळ आदी बाबी पुर्णत्वास येत आहेत, असेही श्री.पवार म्हणाले.

 

डॉ. एच. श्रीनिवास यांनी प्रास्ताविकात पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीतील सुविधांची माहिती दिली. भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात येत आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ५२ हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत ३ हजार प्रवासी क्षमता आहे, अशी त्यांनी दिली.

 

कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे,  केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

00000

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीमार्फत लोकार्पण

सांस्कृतिक वारसा दर्शविणाऱ्या टर्मिनलची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर, दि. 10 (जिमाका) :  देशात सात राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधे 9 हजार 800 कोटींहून अधिक खर्चाचे 15 विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर विमानतळाच्या नूतन टर्मिनलचा समावेश होता. या नवीन टर्मिनलचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरुपात झाले. या कार्यक्रमांतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर विमानतळाच्या या नवीन इमारतीची पाहणी करून हे विमानतळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडेल, असे मत व्यक्त केले.

कोल्हापूर येथून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके,  जिल्हाधिकारी अमोल येडगे, विमानतळ प्राधिकरणाचे पियुष श्रीवास्तव, दिलीप सजनानी, संजय शिंदे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूरसह अलीगड, आझमगड, चित्रकूट, मुरादाबाद, श्रावस्ती, ग्वाल्हेर, पुणे, आदमपूर, जबलपूर, दिल्ली आणि लखनौ येथे नवीन तसेच सुधारित विमानतळ टर्मिनल इमारतींचे उद्घाटन आणि कडप्पा, हुब्बल्ली, बेळगावी येथे नवीन टर्मिनल इमारतींची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाली. कोल्हापूर येथे या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या विकासात आणि पर्यटनाला गती देणाऱ्या विमानतळासाठी शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर विमानतळाची स्थापना राजाराम महाराजांनी 1939 मध्ये केली होती. आज लोकार्पण केलेल्या नूतन इमारतीतून कोल्हापूर जिल्ह्याची संस्कृती आणि वारसा दृश्य स्वरूपात प्रवाशांना पाहता येणार आहे. अतिशय सुंदर आणि दिमाखात बांधकाम केलेल्या इमारतीचा कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन आणि विकासासाठी हातभार लागणार असल्याचे सर्वच मान्यवरांनी या कार्यक्रमावेळी सांगितले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नूतन टर्मिनलची सर्वत्र फिरून बारकाईने पाहणी केली.

कोल्हापूर विमानतळाची संक्षिप्त माहिती

दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे शतकानुशतके समृद्ध ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र राहिले आहे, ज्यामुळे ते विविधता आणि एकतेचे खरे प्रतिनिधित्व करते. याला “दक्षिण काशी किंवा “महातीर्थ असे संबोधले जाते. कोल्हापूर हे पूर्वीच्या राजघराण्यांचे किल्ले, मंदिरे आणि राजवाडे यासाठी देखील ओळखले जाते आणि महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात प्रगत जिल्ह्यांपैकी एक आहे. तसेच कृषी आधारित उद्योगात अग्रगण्य जिल्हा म्हणूनही कोल्हापूर ओळखला जातो.

कोल्हापूर विमानतळावर रात्रीची हवाई सेवा सुरु केल्याने कोल्हापूर विमानतळावरील प्रवासी वाहतूक वाढली आहे. विद्यमान टर्मिनल इमारतीची प्रवासी हाताळणी क्षमता 150 प्रवाशांपर्यंत होती, जी मागणीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यानुसार, भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन एटीसी टॉवर कम टेक्निकल ब्लॉक आणि एअरसाइड वाढीसह नवीन टर्मिनल बिल्डिंगचे नियोजन करण्यात आले. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 255 कोटी खर्चुन A-320 प्रकारच्या विमानांच्या संचालनासाठी विमानतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन टप्यात धावपट्टी आणि संबंधित कामांच्या विस्तारासाठी राज्य सरकारकडून 65 एकर जागेची मागणी करण्यात आली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत पहिला टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली आहेत.

डिझाइन, संकल्पना आणि कला कार्य

कोल्हापूर विमानतळाचे टर्मिनल भवन स्थानिक संस्कृती आणि वारसा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे, जेणेकरून त्याचे सार आतील आणि बाहेरील दोन्हींमध्ये प्रतिबिंबित होईल, नवीन टर्मिनल इमारतीच्या दर्शनी भागावरील मोठे तोरण हे सामान्यतः कोल्हापूर शहरातील महाराजांच्या राजवाड्यात वापरल्या जाणाऱ्या वास्तू किंवा नवीन राजवाडा, भवानी मंडप इत्यादी वारसा वास्तूंद्वारे प्रभावित आणि प्रेरित आहेत.

त्याप्रमाणेच टर्मिनल भवनाच्या आत बसवलेल्या कलाकृती कोल्हापूर शहरातील समृद्ध कला, स्थापत्य आणि संस्कृतीचे वैभव दर्शवतात. पर्यटकांना या ठिकाणाची जाणीव करून देण्यासाठी, त्यांना स्थानिक संस्कृती, वारसा, उपजत परंपरा, धार्मिक श्रद्धा, सामाजिक जीवन आणि विविध पर्यटनस्थळांची चित्रे, चर्मकला (लेदर वर्क) आणि कोल्हापुरी साजच्या कलाकृ‌ती प्रदर्शित केल्या आहेत. येथील धावपट्टीचा विस्तार 1370 मीटर ते 1780 मीटरचा आहे, 03 पार्किंग वे (1 A-320+2 ATR-72 प्रकारच्या विमानांसाठी आहे.

नवीन टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ 3900 चौ.मी असून तासी प्रवाशी क्षमता 500 आहे. वार्षिक क्षमता 5 लाख प्रवाशी आहे. वाढीव हवाई कनेक्टिव्हिटी पर्यटन, व्यवसाय, शिक्षण आणि रोजगार निर्मितीला चालना देऊन कोल्हापूरच्या आर्थिक समृ‌द्धीसाठी आवश्यक आहे. कोल्हापूर विमानतळाच्या विकासामुळे या भागातील हस्तकला उद्योगाच्या वाढीस मदत होईल ज्यात कापड, चांदी, मणी आणि पेस्ट दागिन्यांची हस्तकला, मातीची भांडी, लाकूड कोरीव काम आणि लाखेची भांडी, पितळी पत्रे आणि ऑक्सिडाइज्ड सिल्व्हर आर्टवर्क आणि लेस आणि भरतकाम यांचा समावेश आहे.

000000

‘पीएमआरडीए’ क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे दि.१०: पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या  मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

वारजे येथील कै.अरविंद बारटक्के दवाखाना येथे आयोजित या कार्यमक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील, असे त्यांनी सांगितले.

वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन उभारण्यात येईल, त्यासाठी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत. सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेले रुग्णालय नागरिकांसाठी उभे रहाणार आहे. बाणेर येथेदेखील ५५० खाटांचे रुग्णालयही उभारण्यात येत आहेत.

महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी इच्छा शासनाची आहे. शास्तीकराच्या वसुलीला स्थगिती दिली असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर त्यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त करून रुग्णालयात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार तापकीर म्हणाले, येथे ३७५ खाटांच्या या रुग्णालयात नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे. खडकवासला परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाचे सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत माहिती दिली. घोरपडी येथील उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जर्मनीच्या स्टीफन यांचा संदेश दाखविण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल आणि वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वारजे येथील २४ मीटर डिपी रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

00000

विकासपूरक धोरणामुळे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रीलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचेही मांडले व्हिजन

पुणे, दि. ९ : विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०४७ मधील विकसित भारताचा रोडमॅप मांडला आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी प्रवासाचे व्हीजनही त्यांनी मांडले. पायाभूत सुविधा आधारित विकास, शाश्वत विकास, औद्योगिक विकास, सामाजिक विकास आणि विकासाला पूरक सुरक्षेचे वातावरण  या पाच पैलूंच्या आधारे २०४७ पर्यंत महाराष्ट्राची २ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला.

भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित ‘विकसित भारत ॲम्बेसेडर-विकसित पुणे’ कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरी मिसाळ,  सिद्धार्थ शिरोळे, हितेश जैन, डॉ.सुधीर मेहता, मनोज पोचट, क्रितीका भंडारी आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, हरित ऊर्जेवर भर, सायबर सुरक्षेसाठी देशातील सर्वोत्तम प्लॅटफॉर्म निर्मिती, एआयच्या क्षेत्रात रोजगार निर्मितीद्वारे  महाराष्ट्रदेखील वेगाने विकासाकडे वाटचाल करत आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीला ७५ वर्षे होतील, तेव्हा महाराष्ट्र २ ट्रिलियन आकाराची अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न आहे. जगातील सर्वांत मोठा सौर ऊर्जा वितरणाचा करार महाराष्ट्राने केला आहे. येत्या काळात राज्यात सोलर पार्क उभारण्यात येणार आहेत. शीतगृहांची संख्याही वाढविण्यात येत आहे.

राज्यात नवी रुग्णालये उभारण्यावर भर देण्यात येत आहे.  पुणे ते छत्रपती संभाजीनगर नवा महामार्ग तयार करण्यात येत असल्याने  नागपूरहून पुण्यात ६ तासांत येणे शक्य होईल. जेएनपीटीहून तीन पटीने मोठा असलेले वाढवण बंदरही विकसीत करण्यात येत आहे. महाराष्ट्र परकीय गुंतवणूकीतही देशात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच देशातील सर्वोत्तम सायबर सुरक्षेची यंत्रणा उभी केली जात आहे. शिक्षण क्षेत्रावरही विशेष लक्ष केंद्रित करून नोकऱ्यांमध्येही वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एकूणच भारत जगाच्या आर्थिक विकासाचे महत्वाचे केंद्र होत असतांना देशाच्या विकासाचे महाराष्ट्र हे ‘ग्रोथ इंजिन’ आहे, असे त्यांनी सांगितले.

सशक्त आणि दूरदृष्टीच्या नेतृत्वामुळे देशाचा वेगवान विकास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  गेल्या १० वर्षात झालेल्या विविध धोरणांमधील क्रांतीकारी सुधारणा, विकसीत होणाऱ्या क्षमता, सर्व क्षेत्रात वेगाने होणारे अनुकूल परिवर्तन आणि वेगवान माहिती प्रसाराच्या आधारावर देशाची वाटचाल विकसीत अर्थव्यवस्था असलेल्या महाशक्तीच्या दिशेने होत आहे. १० वर्षापूर्वी जगातल्या सर्वात नाजूक अर्थव्यवस्था असलेल्या पहिल्या ५ देशापैकी  एक भारत होता आणि आता जगातल्या सशक्त अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. ‘क्रीडा क्षेत्र ते अंतरिक्ष’ आणि ‘विज्ञान ते स्टार्टअप्स’ या सर्व क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लवकरच भारत जगातील तीसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल.

देशाच्या दरडोई उत्पन्नवाढीचा दर ४.५ टक्यावरून ८.४ टक्क्यावर गेला आहे. महागाईचा दर दोन आकडी संख्येवरून ५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. परकीय गुंतवणूक आणि निर्यातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मोठे प्रकल्प पूर्ण होण्याचा सरासरी कालावधीही कमी होत आहे. धोरणांमधील आमुलाग्र बदल आणि पारदर्शक प्रशासनाच्या बळावर देशाने ही प्रगती साधली आहे. डिजिटल इंडिया, गतीशक्ती, मेक इन इंडिया, खेलो इंडिया, महिला केंद्रीत विकास योजना अशा अनेक धोरणांमुळे आणि योजनांमुळे ही प्रगती होत आहे, असे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

विकासात सामान्य माणसाच्या सहभागाने देश बलशाली

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाचा आणि गरीब कल्याणाचा विचार मांडला. देशात ६० कोटी नागरिकांचे बँक खाते उघडून त्यांना अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणले.  पीएम मुद्रा योजनेच्या माध्यमातून ३० कोटीहून अधिक महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झाली. लोकसंख्येला कौशल्य विकासाद्वारे मनुष्यबळात परिवर्तीत करणे प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेतून अनेक गरजूंना विम्याचं कवच देणे,  ‘ई-नाम’ योजनेतून अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकमेकांशी जोडणे, अशा अनेक जनकल्याणारी योजना राबवून सामान्य माणसाला देशाच्या विकासात सहभागी करून घेण्यात आले. यामुळे ९ वर्षात २५ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्यावर आले.

बँकींग क्षेत्रातील सुधारणांद्वारे अर्थव्यवस्थेला चालना

बँकींग क्षेत्रात रेकग्निशन, रिकॅपिटलायजेशन, रिझोल्युशन आणि रिफॉर्म  या ४ आर धोरणामुळे  पारदर्शकता आली. यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा १ लाख कोटी इतका झाला आहे. आज जगात मंदी असतांनाही देशाच्या विकासाचा दर चांगला आहे. डिजीटल व्यवहारात देश जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांवर होणारा खर्च २ लाख कोटींवरून १० लाख कोटींपर्यंत पोहोचला आहे. ग्रामीण भागात दररोज ९१ किलोमीटर लांबीचे रस्ते होत आहेत. विमानतळांची संख्या दुप्पट झाली असून देशान विमान निर्मिती होत आहे. पुण्यासाठी येत्या काळात आणखी एक विमानतळ उभारण्यात येणार असून या कामाची सुरुवात लवकरच होईल, अशी ग्वाही श्री.फडणवीस यांनी दिली.

एमएसएमईचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान

देशात एमएसएमईसाठी  ३ लाख ६७ हजार कोटी रुपयांच्या तरतुदीमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले. त्यांचे योगदान आपल्या जीडीपीमध्ये ३० टक्के झाले आहे. भारताची निर्यातदेखील वाढली आहे. देश परकीय गुंतवणुकीत पुढे जात असताना महाराष्ट्र त्यात अग्रेसर आहे. वाहन उद्योगाचा तिसरा मोठा बाजार भारत आहे आणि मोबाईल निर्मितीही भारतात होत आहे.

स्वदेशी, संस्कृती आणि सुरक्षिततेवर भर

देशाचा विकास साधतांना सांस्कृतिक पुनरुत्थानाला महत्व देण्यात आले आहे. राम मंदिराची उभारणी, कर्तव्य पथाचे नामकरण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित स्थळांच्या विकासाद्वारे देशाच्या गौरवाचे जतन व संवर्धन करण्यात येत आहे.  महिला केंद्रित धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहेत. जनधन, आधार आणि मोबाईलच्या आधारे भ्रष्टाचारमुक्त नवी व्यवस्था करण्यात आल्याने योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. १० कोटी अपात्र लाभार्थी वगळल्याने देशाचे २ कोटी ७५ हजार कोटी रुपये वाचले असून त्याचा लाभ सामान्य लाभार्थ्यांना देता आला. कोविड संकटात स्वतःची लस तयार करणे, चांद्रयान-३ चे प्रक्षेपण, युक्रेन-रशिया युद्धातील डिप्लोमसी, जगात पोहोचलेले योगा आणि तृणधान्य  यामुळे देशाची शक्ती आणि वैभव जगाला कळले. आयएनएस विक्रांत सारखी विमानवाहू नौका देशात तयार होत आहे.

विविध क्षेत्रातील प्रगती पाहता पुढील ५ वर्ष देशाला यशोशिखरावर पोहोचविणारी असतील. यात सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे. यादृष्टीने विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमाला महत्व आहे. आपण केलेले एक चांगले काम  देशाला पुढे जाणार असल्याने नागरिकांनी देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, असे आवाहन श्री.फडणवीस यांनी केले.

श्री.जैन यांनी विकसित भारत ॲम्बेसेडर कार्यक्रमाची माहिती दिली. हा कार्यक्रम लोकसहभागावर आधारित असून स्वच्छता, विकास, पर्यटन आदी विविध पैलूंचा यात समावेश होतो. हा कार्यक्रम आपल्या उज्वल भवितव्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ.मेहता यांनी स्वागतपर भाषणात कार्यक्रमामागची संकल्पना मांडली. मतदान करणे आणि विकसित भारतासाठी क्रियाशील भूमिका या दोन बाबी महत्वाच्या असल्याचे त्यांनी सांगितले.

०००

‘शिवजागरा’ने दुमदुमली राजधानी!

महाराष्ट्राची लोकधारा आणि शिवराज्याभिषेक सोहळ्यास प्रेक्षकांची भरभरून दाद

नवी दिल्ली, दि. ९  : राजधानी नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ‘शिवजागर : साद सह्याद्रीची’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी सुमारे २०० कलाकारांनी सादर केलेल्या भव्य सादरीकरणास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

नवी दिल्लीतील सिरी फोर्ट सभागृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने तर विवेक व्यासपीठातर्फे या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील तसेच नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियलचे कर्नल (नि.) मोहन काकतीकर यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे, विवेक व्यासपीठाचे निमेश वहाळकर आणि कृष्णात कदम उपस्थित होते.

कार्यक्रमाचा प्रारंभ महाराष्ट्र राज्यगीताने झाला. यावेळी कर्नल (नि.) मोहन काकतीकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्ष कार्यक्रमाचे नवी दिल्लीत आयोजन होणे हे गौरवाचे आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळेच आजचा भारत समर्थपणे उभा आहे. मुघल औरंगजेबाचा पराभव करून मराठ्यांनी शिवरायांच्या प्रेरणेने अटकपर्यंत आपले साम्राज्य निर्माण केले होते. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे अपर सचिव आनंद पाटील म्हणाले की, संघर्ष करणे हा मराठी माणसाचा स्थायीभाव आहे. मराठी माणसाला ही प्रेरणा मिळते ते छत्रपती शिवाजी महाराजांकडून. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्या काळात क्रांती घडवली होती. त्यांनी मुघलांशी अविरत संघर्ष केला, अगदी औरंगजेबाच्या कैदेतही त्यांना राहावे लागले. त्यांनी नव्या युगाचा प्रारंभ केला. शिवरायांना घडवले ते जिजाऊनी. हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्याच मनात आली आणि त्यांनी ती शिवाजी महाराजांच्या मनात ती संकल्पना उतरवून ती प्रत्यक्षातही उतरवून दाखवली. त्यामुळेच शिवचरित्र आजही मार्गदर्शक असल्याचे आनंद पाटील यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात गीतगायन, नृत्य, सामूहिक नृत्य, पोवाडा व लोककला सादरीकरण, चित्रकला, रांगोळी, शिवकालीन साहसी क्रीडाप्रकारांचे सादरीकरण अशा विविध प्रकारच्या कलात्मक सादरीकरणाचा सहभाग होता. तब्बल २०० कलाकार या सादरीकरणात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती, लोप पावत चाललेल्या अनेक लोककलांचे दर्शन ‘महाराष्ट्राची लोकसंस्कृती’ या भागातून घडवण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग ‘शिवपर्व’ या भागातून मांडला गेला. अमित घरत यांनी या संपूर्ण कला सादरीकरणाचे नृत्य दिग्दर्शन केले. या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

कार्यक्रमास दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिसरातील मराठी जनांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. दिल्लीतील विविध मराठी संस्था-संघटनांचे सदस्य – पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नूतन मराठी विद्यालयासह अन्य शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थीही उपस्थित होते. यावेळी देशाच्या राजधानीत शिवछत्रपतींचे कार्य नेमकेपणाने मांडल्याबद्दल विद्यार्थी व त्यांच्या पालकांनीदेखील समाधान व्यक्त केले.

०००

 

ताज्या बातम्या

विधानसभा लक्षवेधी

0
मोझरी विकास आराखड्याबाबत लवकरच बैठक - उपमुख्यमंत्री अजित पवार  मुंबई, दि.१७ :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मोझरी क्षेत्रात मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी १५० कोटी...

विधानपरिषद लक्षवेधी

0
ट्रान्झिट कॅम्पमधील रहिवाशांना दिलासा देण्यासाठी कायदा करणार - मंत्री उदय सामंत मुंबई, दि. १७ : मुंबईमध्ये अनेक चाळी आणि वसाहतींचा पुनर्विकास होत आहे. या पुनर्विकास...

बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई

0
मुंबई , दि. १७ : मुंबई महानगरात ॲपच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे बाईक टॅक्सीद्वारे अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. ही...

ठाणे जिल्ह्यातील हातभट्टीवर धाडसत्र; ९.१६ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
मुंबई, दि. १७ : ठाणे जिल्ह्यातील अंजूरगाव व आलीमघर खाडीमध्ये अवैध हातभट्टी केंद्र नष्ट करण्यासाठी हातभट्टी केंद्रावर धाडसत्र राबवून धडक कारवाई करण्यात आली. पावसाचा...

बिहारमधील मतदार नोंदणीसाठी केवळ ६.८५ टक्के मतदारांचे फॉर्म बाकी

0
मुंबई, दि. १६:  भारत निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, बिहारमध्ये आगामी मतदार यादीच्या प्रारूप प्रकाशनासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. अद्याप...