शनिवार, जुलै 19, 2025
Home Blog Page 842

कल्याणसह परिसरातील महापालिका, नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा

मुंबई दि.13- मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरीक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

मुंबई महानगर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्राच्या नजिकच्या भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन सेवा उपक्रम पूर्ण क्षमतेने अस्तित्वात नाहीत. या क्षेत्रांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमांमार्फत बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी  नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. एकत्रित परिवहन सेवा क्षेत्र 225 चौरस किलोमीटर इतके मोठे असणाऱ्या या परिसराची लोकसंख्या सन 2011 जनगणनेनुसार एकूण 33,43,000 इतकी आहे. गेल्या 13 वर्षात या भागातील लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, त्या तुलनेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याचा शासन भर देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

भविष्यात एकत्रित परिवहन सेवेमुळे प्रवाशांना सुलभ व सहज वाहतूक सेवा रास्तदरात उपलब्ध होणार आहे. तसेच परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होणार असून यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संरक्षणावर शासनाचा भर आहे. या परिवहन सेवेत नवीन ईव्ही बसेस अंतर्भुत करण्यात येणार असल्याने शहरामधील हवा प्रदूषणाची पातळी नियंत्रित आणि कमी करणे शक्य होणार आहे. या परिवहन सेवेकरिता कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहाड येथे एकत्रित परिवहन उपक्रमाच्या प्रशासकीय कार्यालयासाठी परिवहन भवन बांधण्यात येणार आहे.

एवढ्या विस्तृत परिसरासाठी एकत्रित परिवहन सेवेमुळे या भागातील विकासाला मोठी चालना मिळण्यास मदत होणार आहे. परिवहन सेवेतून नागरिकांना चांगल्या दर्जाच्या सेवा मिळू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

0000

टंचाई निवारणासाठी सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 (विमाका) : मराठवाड‌्यातील टंचाईस्थिती दूर करण्यासाठी प्रशासनाने स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग घ्यावा, असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. शासनाने  जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ‘मराठवाडा विभागातील टंचाई स्थिती व प्रशासनाच्या तयारीबाबत आढावा घेतला. यावेळी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड यांच्यासह मराठवाडयातील आठही जिल्हयांचे जिल्हाधिकारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित होते. तसेच मराठवाड‌्यातील विविध ठिकाणच्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मराठवाड्यातील टंचाई स्थिती, काही जिल्ह्यातील अतिवृष्टी, तर काही भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. टंचाई निवारणासाठी शासनाकडून विविध सवलती व उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासकीय यंत्रणेसोबतच काही सामाजिक संस्था टंचाई स्थितीत चांगले काम करत आहेत. मराठवाड‌्यातील आठही जिल्ह्यात अशा स्वंयसेवी संस्थाचा टंचाई निवारणात सक्रिय सहभाग घ्यावा. प्रशासकीय यंत्रणा व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे काम केल्यास टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

गावागावात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे, बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूराचे मोठ्या प्रमाणात होणारे स्थलांतर या बाबी नियोजन करताना प्राधान्याने विचारात घ्याव्यात. महिलांचे होणारे स्थलांतर थांबविण्यासोबत महिलांना रोजगार हमी योजनेअंतर्गत काम मिळायला हवे. तसेच यावर  कार्यरत असलेल्या महिलांसाठी असलेल्या सोई सुविधा तसेच त्यांच्या मुलांसाठी देखभाल सुविधा त्यांना मिळाली पाहीजे, असेही त्यांनी सांगितले.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, शेती पंपाच्या वीजबिलात ३३.५% सूट, शेती पंपाचे वीस कनेक्शन न तोडणे तसेच पिण्याचे पाण्यासाठी टँकरची गरज आदींचा आढावा घेतला. टंचाई निवारणासाठी स्वयंसेवी संस्था व शासकीय यंत्रणा यांच्यामध्ये समन्वय असला पाहीजे. यासाठी प्रत्येक जिल्ह‌्यात उपजिल्हाधिकारी दर्जाच्या एका अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नेमणूक करावी. विद्यापिठांनी परीक्षा शुल्कात माफी दिली नसेल तर त्यांनी याबाबतचा खुलासा तातडीने करावा, असे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे व उपायुक्त नयना बोंदर्डे यांनी टंचाई स्थितीबाबत माहिती दिली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी आपापल्या भागातील दुष्काळी स्थितीबाबत सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली.

 

*****

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम-सुरज पोर्टल’चे लोकार्पण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सफाई कामगारांना पीपीई किटचे वाटप

मुंबई, दि. 13: वंचित व मागास घटकांचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होणार नाही. त्यामुळे देशातील वंचित आणि मागास घटकांच्या विकासावर केंद्र सरकार भर देत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. देशातील वंचित व मागासवर्गातील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या पीएम-सुरज पोर्टलचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याअनुषंगाने मुंबईत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नमस्ते योजनेंतर्गत सफाई कामगारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पीपीई-किटचे वाटप करण्यात आले.

              सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमोल शिंदे आदी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री विरेंद्र सिंह यांच्यासह विविध राज्यातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीएम-सुरजच्या माध्यमातून वंचित आणि मागासवर्ग घटकांसाठी आर्थिक सहायता तसेच उद्योगांसाठीचे कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, सरकारने 2047 पर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. देशातील सफाई कामगारांच्या आरोग्यासाठीही केंद्र सरकार काम करत असून त्यांना आज पीपीई किट वाटप करण्यात येत आहेत. तसेच त्यांना आयुष्मान भारत (आभा) कार्ड देण्यात येत आहे. आभा कार्डच्या माध्यमातून त्यांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले की, एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांना सक्षम करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. एससी, एसटी आणि ओबीसी तरुणांसाठी शिष्यवृत्तीत वाढ, वैद्यकीय जागांच्या अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसींसाठी 27 टक्के जागांचे आरक्षण तसेच नीट परीक्षेत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रवेश आणि वंचित समुदायातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे विद्यार्थ्यांना विज्ञानाशी संबंधित विषयात पीएचडी करता यावी यासाठी नॅशनल फेलोशिपची रक्कमही वाढवण्यात आली आहे.

यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील गणेश गुंड, उदय सावंत, लक्ष्मण भंडारी, सग्या पवार, सचिन केटकर, सुधाकर पडवळ, साईनाथ गिरोड या सफाई कामगारांना प्रातिनिधीक स्वरुपात पीपीई किट आणि आभा कार्डचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील नरेश साहेबराव अवचर या उद्योजकाशी संवाद साधला. नरेश हे कृषीतील निरूपयोगी पाण्यावर प्रक्रिया करण्याबाबत काम करत आहेत. त्यांनी असिम म्हणजेच डॉ. आंबेडकर सोशल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अर्थसहाय्य मिळवून हा उद्योग सुरू केल्याचे सांगितले. त्यांच्या या उद्योगाने प्रभावित झाल्याचे सांगून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी, कृषी सोबतच पर्यावरणासाठीही चांगले काम करत असल्याबद्दल नरेश यांचे कौतुक केले.

यावेळी देशातील १ लाख लाभार्थ्यांना पीएम सूरजच्या माध्यमातून ७२० कोटी रूपयाचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ (NBCFDC), राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (NSFDC) आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त आणि विकास महामंडळ (NSKFDC) या तीन राष्ट्रीय महामंडळामार्फत देशातील सर्व राज्यातील अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग व सफाई कर्मचारी यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सूरज पोर्टल सुरू करण्यात आले आहे. समाजातील सर्वात उपेक्षित घटकांचे उत्थान करणे हे या पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

00000

चित्रकार मनाली बोंडे यांच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ चित्र प्रदर्शनास प्रतिसाद

नवी दिल्ली, १३ : ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या विदर्भातील मनाली अनिल बोंडे यांच्या चित्र प्रदर्शनाचे मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य ज्ञानेश्वर मुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

राजधानीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र येथे हा उद्घाटन सोहळा झाला. ह्या कार्यक्रमाला भारतीय नौदलाचे निवृत्त व्हाईस ॲडमिरल सतीशकुमार घोरमाडे, खासदार डॉ. अनिल बोंडे, डॉ. वसुधा बोंडे, मराठी प्रतिष्ठानचे विष्णू पाटील आदी उपस्थित होते. हे प्रदर्शन 12 व 13 मार्च या कालावधी दरम्यान भरण्यात आले आहे. 

साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, औद्योगिक, प्रशासन यांसह चित्रांची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हे प्रदर्शन एक नवी पर्वणी ठरणार असल्याचा सूर उद्घाटनाप्रसंगी मान्यवरांकडून उमटला.

या प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रदर्शनाला आज भेट दिली. सर्जक कलाकृतींचा कौतुक करत त्यांनी मनाली बोंडे यांना शुभेच्छा दिल्या.

विविध देशांच्या संस्कृती आणि कथांवर आधारित छायाचित्र प्रदर्शन प्रथमच राजधानीत भरवण्यात येणार आहे. जागतिक महिला दिन सप्ताहानिमित्त इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली आणि त्रिवेणी चॅरिटेबल फाऊंडेशन अमरावती, यांच्या वतीने भरविण्यात आले होते.

चित्रकार मनाली अनित बोंडे विषयी

चित्रकार मनाली बोंडे यांनी त्यांच्या वयाच्या 12व्या वर्षापासून चित्रकलेची सुरूवात केली आहे. मागील 15 वर्षांपासून त्या चित्रकला क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत आहेत. मनालीने एमबीए पदवी मिळवली आहे. राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांच्या त्या कन्या आहेत.

कंबोडिया, लाओस, इटली, जर्मनी, इस्रायल, इंडोनेशिया अशा परदेशातील अनेक देशांना भेटी दिल्यानंतर मनालीने त्या- त्या देशाचे विचार आणि जीवनावर आधारित चित्रे या प्रदर्शनात ठेवली आहेत. भारताचे वैचारिक योगदान – ‘वसुधैव कुटुंबकम’ यांनी या विचारसरणीचे आपल्या चित्र आणि प्रदर्शनातून कौतूक केले आहे. हे छायाचित्र प्रदर्शन 12 आणि 13 मार्च 2024 रोजी इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स, दिल्लीच्या दर्शना- 2 हॉलमध्ये सादर केले.

*******

 

संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनांच्या थेट लाभ हस्तांतरण संकेतस्थळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

            मुंबई, दि. १३ : सामाजिक न्याय व  विशेष सहाय्य विभागाने विकसित केलेल्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ  यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

            संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधील लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (DBT – Direct Benefit Transfer) करण्याकरिता https://sas.mahait.org/ हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे.

            संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १५,९७,११६ तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे २९,६२,०१५ असे एकूण ४५,५९,१३१ इतके लाभार्थी आहेत. या योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये इतके अर्थसहाय्य देण्यात येते. या संकेतस्थळाद्वारे संबंधित लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आधार संलग्न बँक खात्यात लवकरच करण्यात येणार आहे.

००००

 

ऐतिहासिक ‘राजगड’ किल्ल्याचे नाव वेल्हे तालुक्याला मंत्रिमंडळाच्या माध्यमातून देता आले याचा मनस्वी आनंद – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :- पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्त्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या 22 नोव्हेंबर 2021 च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन  घेणे,  पुणे विभागीय आयुक्तांकडून 5 मे 2022 ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला त्यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. याचा वेल्हे तालुका, पुणे जिल्हा आणि समस्त महाराष्ट्रवासियांना अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

००००००

अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा निर्णय अहिल्यादेवींचे विचार, कार्य पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना प्रेरणा देणारा – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :- अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला  निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. यानिर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्त्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार सर्वश्री संग्राम जगताप, दत्तामामा भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर शहराचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसेच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

०००००

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांचा वाढीव तीनपट ते दहापट मिळकतकर कमी करण्याची कार्यवाही तत्काळ करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 13 :- पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावातील निवासी-बिगरनिवासी मिळकतींना तीनपट ते दहापट वाढीव कर आकारण्यात आल्याने संबंधित गावांवर अन्याय होत आहे. तो दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन अन्याय तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले.  उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील समिती सभागृहात झालेल्या या बैठकीला नगरविकास विभागाचे सचिव के. गोविंदराज, आमदार सर्वश्री चेतन तुपे, सुनील टिंगरे, भीमराव तापकीर यांच्यासह 34 गावांचे प्रतिनिधी,  नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट 34 गावातील अवैध बांधकामावरील शास्ती व वार्षिक थकीत मालमत्ताकरावर लावण्यात आलेल्या 2 टक्के शास्तीच्या (विंलब आकार) वसुलीस पुढील निर्देशांपर्यंत स्थगिती देण्याचे निर्देश राज्य शासनाने विशेष पत्राद्वारे दिले आहे. सदर शास्ती माफ करण्यासह 34 गावांतील मिळकतींवर आकारलेला तीनपट ते दहापट कर कमी करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती आवश्यक असल्याने ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करुन, 34 गावांतील मिळकतधारकांना दिलासा देण्यात यावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याने संबंधित गावांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.

०००००

 भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

मुंबई, दि. 13 : भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमिपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, क्रीश्ना मंगेशकर  व अधिकारी उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असे संगीत महाविद्यालय  देशात असावे या उद्देशाने राज्य शासनाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियम स्थापन करण्यास मान्यता दिली होती. आज या संगीत महाविद्यालयाचा भूमीपूजन सोहळा झाला. या कार्यक्रमादरम्यान, स्वामी विवेकानंद युवा सुरक्षा योजनेच्या पोर्टलचा शुभारंभही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

संगीत क्षेत्रात नवे काही शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाच्या माध्यमातून संधी उपलब्ध होईल आणि त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळेल.

सांताक्रूझ (पूर्व) येथे 7 हजार चौ.मीटर जागेवर हे महाविद्यालय साकारले जाणार असून याठिकाणी चारशे आसन व्यवस्थेचे सभागृह, 18 क्लास रुम, संग्रहालय आणि प्रदर्शन दालन, 200 विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, 300 आसनी खुले सभागृह आणि शिक्षकांसाठी निवास व्यवस्था आदी सुविधा असणार आहेत.

००००

दीपक चव्हाण/विसंअ/

बालभारतीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश, ऐतिहासिक बोधपर कथामालेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई, दि. १३ : बालभारतीतर्फे पाठ्यत्तर प्रकाशित करण्यात आलेल्या इयत्ता तिसरी ते बारावीच्या नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन पाठ्यपुस्तकातील संकल्पना सोप्या भाषेत सचित्र उदाहरणासह स्पष्ट करण्यासाठी कोश आणि ऐतिहासिक बोधपर कथामालेच्या तीन भागांचे प्रकाशन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या प्रकाशन कार्यक्रमास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

ऐतिहासिक घटनांच्या साखळीमागील ‍कार्यकारण संबंध समजणे, घटनांचे विश्लेषण वस्तुनिष्ठपणे करणे, विषयाची समज व आवड निर्माण करणे या गोष्टींची जाणीव ठेवून हे ऐतिहासिक कथामालेचे तीनही भाग वाचक, विद्यार्थी मित्र, शिक्षक व पालक यांच्यासाठी तयार केले आहेत.

कथामालेच्या भाग एकमध्ये प्राचीन कालखंड, दोन मध्ये मध्ययुगीन आणि तीन मध्ये आधुनिक कालखंड अशा सचित्र कथा आहेत. वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कथामालांचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. इतिहास विषय समितीच्या अध्यक्षपदी डॉ. शुभांगना अत्रे, सदस्य सचिव वर्षा सरोदे आहेत.

नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन या विषयांच्या पाठ्यपुस्तकातील संज्ञा, संकल्पना अधिक स्पष्ट व्हाव्यात यासाठी संदर्भसाहित्य उपलब्ध व्हावे त्यातून अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया प्रभावी व्हावी यासाठी नागरिकशास्त्र आणि प्रशासन कोश तयार करण्यात आला आहे. नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र आणि प्रशासन कोश विषय समितीच्या अध्यक्ष डॉ. गौरी कोपर्डेकर आहेत.

००००

ताज्या बातम्या

भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजिना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर दि. 19 : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर...

गरजू रूग्णांसाठी संजीवनी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

0
राज्यातील गरजू व गोरगरीब जनतेला दुर्धर आजारामध्ये उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा जणू संजीवनी ठरला आहे. विदर्भातील गरजू व पात्र रूग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

0
बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा...

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

0
राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व...

गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन व्यवसाय वाढीसाठी सहकार्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश...

0
मुंबई, दि. १८ :- मत्स्यव्यावसायिकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, इतर राज्यांतील यशस्वी प्रयोगांचा अभ्यास, तलावांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी नवीन पद्धती याकडे लक्ष द्यावे. गोड्या पाण्यातील मत्स्य...