सोमवार, जुलै 21, 2025
Home Blog Page 834

जिल्ह्यातील मतदान टक्केवारीत वाढ करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात १६ हजार १६६ निवडणूक अधिकारी कर्मचारी होणार नियुक्त

        कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): जिल्हयात एकूण 31 लाख 58 हजार 513 मतदार आहेत. त्यापैकी पुरूष 16 लाख 8 हजार 858, स्त्री 15 लाख 49 हजार 483 व तृथीयपंथी 172 आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 39 हजार 633 असून सैनिकी मतदारांची संख्या 8 हजार 923 आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या 25 हजार 911 आहे. 85 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदार संख्या 40 हजार 053 आहे. यावेळी जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आवश्यक तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. निवडणूक आचार संहिता लागू झाल्यानंतर त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, नवीन मतदार नोंदणी करण्याची शेवटची तारीख नामनिर्देशनपत्रे सादर करण्याच्या अंतिम दिनाकांच्या 10 दिवस अगोदर  म्हणजेच दिनांक  09 एप्रिल, 2024  पर्यंत आहे. प्रचारा दरम्यान निवडणूक उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकरीता  परवानगी देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.  या ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी 6.00 ते रात्री 10.00 वा.पर्यंतच करावयाचा आहे. मतदानाची  वेळ सकाळी  7.00 ते सायं. 6.00 याप्रमाणे असणार आहे.

मतदान प्रक्रियेत जिल्हयात पुरेसे मनुष्यबळ उपलब्धअसून 18 नोडल अधिकारी, 444 क्षेत्रीय अधिकारी,  3 हजार 359 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान पथकातील आवश्यक मनुष्यबळ 20 टक्के राखीवसह       16 हजार 166 आहे. आज रोजी जिल्हयात निवडणूकीसाठी एकुण 18 हजार 567 अधिकारी व कर्मचारी मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसेच बॅलेट युनिट 7 हजार 114, कंट्रोल युनिट 5 हजार 48 व व्हीव्हीपॅट 4 हजार 906 उपलब्ध आहेत. मतदारांसाठी वोटर हेल्पलाईन मोबाईल ॲप, उमेदवारांची माहिती घेण्यासाठी केवायसी ॲप, मतदान टक्केवारी व मतदानाचा निकाल पाहण्यासाठी वोटर टर्न आऊट ॲप, दिव्यांगांसाठी व्हाइस फीचर्स असलेले सक्षम ॲप, आचारसंहितेचा भंग किंवा तक्रार नोंदविण्यासाठी सी व्हीजील ॲप, उमेदवारांसाठी अर्ज दाखल करणे, विविध परवानगी घेणेसाठी सुविधा ॲप आहे याबद्दल जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली.

या वेळीपासून सुरू करण्यात आलेली होम वोटींगच्या सुविधेमधे मतदान केंद्रांवर  85 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या  व दिव्यांग मतदाराकरीता वेगळी अशी स्वतंत्र व्यवस्था करणेत येणार आहे. तसेच गर्भवती स्त्रिया याचा सुध्दा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना सामान्य मतदारांच्या रांगेमध्ये उभे राहण्याची आवश्यकता भासणार नाही.  त्यांना मतदानाकरीता प्राधान्य देणेत येईल. तसेच आवश्यकतेनुसार त्यांना मदतनीस  पुरविण्याची कार्यवाही करण्यात येईल.

राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडे संपर्क करावा. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. पेड न्युज असल्यास तशी माहिती सादर करावी अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

मतदारांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला जाणार नाही.  त्यांना कोणत्याही प्रकारची प्रलोभने दाखविली जाणार नाहीत. तसे केल्यास तक्रारी दाखल कराव्यात. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचे संबंधात कोणत्याही तक्रारी असल्यास निवडणूक आयोगाने तयार केलेल्या cVIGIL ॲप मध्ये तक्रार नोंदवावी. त्या तक्रारींवर  पुढील 100 मिनिटांमध्ये निवडणूक विभागाकडून, निवडणूक आदर्श आचरसंहिते अंतर्गत नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांचेकडून चौकशी व अहवाल नोंदवून निकाली काढणेची कार्यवाही करणेत येणार असल्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.  याव्यतिरिक्त  Complaint Redressal Mechanism चा भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात अहोरात्र  24 X 7 कंट्रोल रूम कार्यान्वित करणेत आलेली असून, टोल फ्री क्रमाक 1950 आहे. याठिकाणी तक्रार प्राप्त झालेनंतर त्याची रितसर नोंद घेवून, पडताळणीअंती निराकरणासाठी तक्रार संबंधित विधानसभा मतदारसंघाकडे वर्ग करणेत येवून त्यांचेकडून निर्गतीचा अहवाल सत्वर प्राप्त करुन घेतला जाणार आहे. तसेच तक्रारदारांना त्याबाबत अवगत करणेत येईल.  याव्यतिरिक्त मा. भारत निवडणूक आयोगाने तयार cVIGIL केलेल्या ॲप मध्ये तक्रारी नोंदविण्यात येणार आहेत.

उमेदवारांनी त्यांच्या प्रचारासाठी तसेच विविध रॅली बैठकांसाठी अर्ज करुन परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शिवाजी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक खिडकी योजना कार्यान्वित करणेत आलेली आहे. कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रात फ्लाइंग स्क्वॉड टीम्स FST –  85 पथक, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स SST – 112 पथके  ( 39 ठिकाणी ), व्हिडिओ पाळत ठेवणारी टीम VST – 44   पथके, व्हिडिओ दर्शक टीम VVT – 21  पथके नेमण्यात आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या लगतच्या इतर जिल्ह्यातून तसेच गोवा व कर्नाटक राज्यातून दारुची अवैध वाहतूक होण्याची शक्यता विचारात घेवून पोलीस विभाग  व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्तरावर नाकेबंदी करण्यात येवून आवश्यक ती  खबरदारी घेण्यात येणार आहे. यासंबंधात दोन्ही विभागांकडून  तात्काळ कार्यवाही  सुरु केली जाणार आहे.  यासंबंधाने कोणाला गोपनीय माहिती द्यावयाची असल्यास अशी माहिती पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील 1950 वर माहिती देणेत यावी, त्याचे नाव व क्रमांक गोपनीय ठेवण्यात येवून कारवाई करण्यात येईल.

जिल्हा माहिती कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक ई-पूर्वपीठिकाचे प्रकाशनही यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

000000

 

निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न

सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 7 मे रोजी मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निर्भय , निष्पक्ष वातावरणात निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा व आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, पोलीस उपायुक्त दिपाली काळे, अजित बोराडे, अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, अधिक्षक अभियंता सा.बां. विभागाचे संजय माळी, सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, जिल्हा परिषद च्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा कोषागार अधिकारी मोमीन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले, जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेख दादासाहेब घोडके यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने कोणत्याही विभाग प्रमुखांनी नवीन काम सुरू करू नये, नवीन कामाचे कार्यारंभ आदेश वितरित करू नये, जे काम सुरू आहे ते काम पूर्ण करून घ्यावे. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांच्याकडील सर्व कामांची व कामांची सद्यस्थितीची माहिती तात्काळ प्रशासनाला सादर करावी. अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही राजकीय पक्ष्यांच्या नेते तसेच मंत्री महोदय यांच्या बैठकीस उपस्थित राहू नये. तसेच त्यांची खाजगीत भेट घेऊ नये, असे आढळून आल्यास संबंधिताविरोध कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सुचित केले.

आदर्श आचारसंहिता काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत भारत निवडणूक आयोगाने सुस्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशांप्रमाणे सर्व शासकीय विभागांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यापासून 24 तास, 48 तास आणि 72 तासांमध्ये आवश्यक कार्यवाहीची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाकडे पाठवावा. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होता कामा नये. निवडणूक विषयक कामकाज हे प्राधान्याने आणि अचूकपणे होईल, याची दक्षता घ्यावी. तसेच या काळात सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी समन्वयाने आणि काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. आचारसंहिता कालावधी टंचाईच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविण्याबाबत कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता कक्षाकडे दैनंदिन पाठवण्यात येणाऱ्या विविध अहवालाची माहिती त्यांनी दिली. तसेच शासकीय वाहनाचा निवडणूक कामात वापर होणार नाही याबाबत सर्व संबंधित विभागाने काळजी घ्यावी. सोलापूर शहर नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध शासकीय मैदाने राजकीय पक्षांना प्रचारासाठी वापरण्यास देण्याबाबत संबंधित विभागाने तात्काळ यादी एक खिडकी योजना राबवणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने शासकीय विश्रामगृहे राजकीय वापरासाठी उपलब्ध करून देऊ नये, अशी माहिती त्यांनी दिली.

****

राजकीय पक्षांनी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे : जिल्हाधिकारी

        बीडदि. 17 मार्च (जिमाका) :-(जिमाका) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या काळात ३९-बीड लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू झाली असून राजकीय पक्षांनी आणि प्रतिनिधीनी त्याच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची वेठक झाली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कविता जाधव निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी अंजू निमसरकर आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात ५ प्रतिनिधीनां प्रवेश देण्यात येईल यासाठी सोबत अणावयाची वाहने, आदीप्रसंगी आचार संहितेनुसार बंधने पाळली जावीत. राजकीय पक्षाशी निगडित विविध मंजुरी एक खिडकी मधून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

यासह राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका त्यांची धोरणे कार्यक्रम पूर्वीची कामगिरी आणि कार्य यांच्याशी संबंधित असावी. शांततापूर्ण आणि उपद्रव रहित जीवन जगण्याचा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे त्या अधिकाराचे निवडणुकीच्या काळात पण जतन व्हावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली. सभेसाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची पूर्वपरवानगी घेण्यात यावी. सभांमध्ये सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्तची मदत घ्यावी.

मतदानाच्या दिवशी उमेदवार व त्यांची निवडणूक मतदान प्रतिनिधी याव्यतिरिक्त फक्त निवडणूक आयोगाकडून वैद्य प्राधिकार पत्र मिळालेल्या व्यक्तींनाच कोणत्याही मतदान कक्षा प्रवेश करता येईल इतर व्यक्ती कोणीही उच्चपदस्थ असली तरी तिला अटीतून सूट मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील काही शासकीय इमारतीचे बांधकाम होत असल्यामुळे लगतच्या चंपावती शाळेत निवडणुकीशी निगडित कार्यक्रम होतील याची माहिती पण जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली.

बीड जिल्ह्यात चौथ्या टप्प्यात 13 मे ला निवडणूक होणार असून हा काळ विद्यार्थ्यांसाठी सुट्ट्यांचा असतो त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक लोकांनी आणि विशेषतः तरुणांनी भाग घ्यावा असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

यावेळी भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या सोयी सुविधेबाबतचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली या अंतर्गत दिव्यांगांसाठी तसेच 80 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींसाठी घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध असेल. मतदान केंद्रावर व्हीलचेअरसह मूलभूत सुविधा असतील याबाबतही सांगितले. यावेळी दिव्यांग बूथ तसेच महिलांचे बूथ तयार केले जातील. मात्र अधिकाधिक मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे आणि इतरांनाही प्रोत्साहन करावे यासाठी राजकीय पक्षांनी त्याप्रमाणे प्रचार प्रसार करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केल्या.

काही मतदाराचे दोन ठिकाणी नावे असतात, अशा मतदारांनी कुठल्याही एका ठिकाणी नाव नोंदवावे यासाठी राजकीय पक्षांनीही याबाबत मतदारांना जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री ठाकूर यांनी मतदारसंघात स्टार प्रचारकांच्या प्रचार सभा, प्रचार आदीवेळी कायदा व सुव्यवस्था भंग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सोळंके यांनी निवडणूक काळात भरारी पथके, निगराणी पथके कार्यरत असून आचार संहिता भंगाच्या तक्रारीचा तातडीने दखल घेण्यात येईल असे सांगितले.

याप्रसंगी निवडणुकीची तयारी, निवडणूक कार्यक्रमाचा दिनांक देऊन प्रचार व प्रसिध्दीसाठी सार्वजनिक मालमत्तेच्या विदुपीकरणापासून संरक्षण आदीसाठी नियम यांची माहिती दिली. तसेच आदर्श आचार संहिता मार्गदर्शक तत्वांच्या माहिती देण्यात आल्या. बैठकीसाठी आम आदमी पक्ष, शिवसेना शिंदे गट तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट, एम आय एम, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कांग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष, कम्युनिष्ट पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट, आदी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी राजकीय पक्षांना निवडणुकीशी संबंधित माहिती पुस्तिका देण्यात आली.

 

00000

निर्भय व निष्पक्ष निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.१७(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून  त्यानुसार चवथ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार निवडणुका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत विश्वास व्यक्त केला.

निवडणूका जाहीर होताच जिल्हा प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या निवडणूक सज्जतेची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोलकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे  तसेच अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी स्वामी यांनी निवडणूकीविषयक सर्व माहिती दिली.

निवडणूक कार्यक्रमः

निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यात चवथ्या टप्प्यात निवडणूक होत आहे.

निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे- 

१.      अधिसूचना जारी करणे- गुरुवार दि.१८ एप्रिल,

२.      नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक  गुरुवार दि.२५ एप्रिल,

३.      नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार दि.२६ एप्रिल,

४.    उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिनांक सोमवार दि.२९ एप्रिल,

५.     मतदानाचा दिनांक सोमवार दि.१३ मे,

६.      मतमोजणीचा दिनांक मंगळवार दि.४ जून,

७.     निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक गुरुवार दि.६ जून.

मतदार संघ व मतदान केंद्रांची रचनाः-

जिल्ह्यात १८ जालना आणि १९ औरंगाबाद अशा दोन लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे.  त्यात जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री व पैठण हे विधानसभा मतदारसंघ क्षेत्र जालना लोकसभा मतदार संघास जोडलेले असून औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड हे विधानसभा मतदार संघ क्षेत्र औरंगाबाद लोकसभा मतदार संघास जोडलेले आहेत.  त्यात जालना लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी १०४५ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघाशी जोडलेल्या क्षेत्रासाठी २०४० असे एकूण ३०८५ मतदान केंद्रांवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

२०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ३७ लक्ष १ हजार २८२ इतकी असून  सन २०२४ ची अनुमानित लोकसंख्या ४५ लक्ष ८९ हजार ३२२ इतकी आहे.

या लोकसभा मतदार संघासाठी  जालना लोकसभा मतदार संघासाठी ९ लाख ९७ हजार ५२३ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघासाठी  २० लाख ३५ हजार ०२३ असे एकूण ३० लाख ३२ हजार ५४६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,असे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

वयोगटानुसार मतदारः-

वयवर्षे १८ ते १९ या वयोगटातील म्हणजेच नवमतदारांची संख्या ही ४१४६५, २० ते २९ वर्षे वयोगटातील-६२३४९१, ३०-३९ वयोगटातील -७५५६११, ४०-४९ वयोगटातील-६३३०५८, ५०-५९ वयोगटातील-४६८००७, ६०-६९ वयोगटातील२७५००१, ७०-७९ वयोगटातील-१५१४७४ तर ८० व त्यापेक्षा अधिक वयोगटातील -८४४३९ असे एकूण ३० लाख ३२ हजार ५४६ मतदार आहेत.

मतदारांसाठी मतदान केंद्रावर सुविधाः-

जिल्ह्यात ४५ मतदान केंद्र हे मॉडेल मतदान केंद्र म्हणून बनविण्यात येणार आहे.  मतदान केंद्रांवर आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व सुविधा देण्यात येणार आहेत. त्यांचीही सज्जता झाली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार सहायता कक्ष, लहान बालकांसाठी पाळणा घर, सावलीची सुविधा, पिण्याचे पाणी, औषधोपचार कक्ष, दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी आवश्यकतेनुसार व्हिल चेअर सुविधा, दिशादर्शक फलक इ. सुविधा देण्यात येणार आहात. तसेच मतदान केंद्रस्तरीय मतदार जागरुकता गट बनविण्यात येणार असून जिल्ह्यात असे २८९८ गट बनविण्यात आले असून त्याद्वारे मतदारांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती केली जाणार आहे.

‘स्वीप’द्वारे मतदार जनजागृतीः-

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यासाठी विविध माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देणे, त्यांचे मतदार यादीतील नाव सापडणे, त्यांचे मतदान केंद्र नेमके कुठे आहे याबाबतही त्यांच्यासाठी सर्व माहिती देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावरही मतदार सुविधा केंद्र निर्माण केले जाणार आहेत,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

आचारसंहिता अंमलबजावणीः-

निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांकडे असलेली शासकीय वाहने जमा करण्यात आले असून शासकीय, सार्वजनिक इमारतींवरील राजकीय पक्षांचे बॅनर्स, होर्डिंग्ज,झेंडे आदी सामुग्री जमा करण्यात येत आहे. त्यासाठी स्थिर सर्व्हेक्षण पथके, फिरते सर्व्हेक्षण पथके, व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके, व्हिडिओ पाहणी पथके आदी नियुक्त करण्यात आले असून त्यांचे कार्यान्वयन सुरु झाले आहे,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले आहे. जिल्हास्तरावर तसेच प्रत्येक सहा. निवडणूक निर्णय अधिकारीस्तरावर १९५० हा टोल फ्री क्रमांकही कार्यान्वयीत करण्यात आला आहे.  तसेच निवडणूक आयोगाच्या विविध ॲप द्वारेही मतदारांना विविध प्रकारची माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आचार संहिता लागू होताच जिल्ह्यातील प्रत्येक प्रिंटींग प्रेसला त्यांच्याकडे छापला जाणाऱ्या प्रत्येक कामाची माहिती जिल्हा प्रशासनाला देणे बंधनकारक  असल्याचेही सांगण्यात आले. तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिने  परवानाधारकांना त्यांचे शस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियमाचीही अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले.

‘फेक न्यूज’वर विशेष लक्ष

जाणीवपूर्वक खोटी, बनावट माहिती, व्हिडीओ, फोटो, मजकुर सोशल मिडियाद्वारे पसरवणे, जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणे, धार्मिक जातीय तेढ निर्माण करणे याबाबतचे प्रयत्न रोखण्यासाठी व त्यावर कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करुन नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सोशल मिडीयावरील पोस्ट इ. ची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या ॲडमिनने अशा माहितीच्या प्रसाराबाबत खातरजमा केली पाहिजे. त्यातून काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिनलाही जबाबदार धरले जाईल असे त्यांनी सांगितले.

माहिती तंत्रज्ञानाचा वापरः-

यंदाच्या लोकसभा निवडणूकीचे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यात येणार असून जवळपास १५ ॲप च्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदार, उमेदवार, अधिकारी, निरीक्षक अशा सर्व घटकांना या ॲपचा आपले कामकाज जलद व अचूक करणे, मतदारांना सुविधा उपलब्ध होणे, आचारसंहिता भंगाकडे लक्ष ठेवून त्याची दखल घेणे, तक्रारी नोंदविणे, कारवाई करणे अशा विविध बाबी या ॲपमुळे मोबाईलद्वारे सहज करता येणार आहेत,अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

कायदा सुव्यवस्थेसाठी सज्जता- पोलीस आयुक्त लोहिया

निवडणूक काळात जिल्ह्यात पोलीस आयुक्त हद्दीत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व निर्भयतेचे वातावरण राखण्यासाठी पोलीस दलाची सज्जता असून त्यासाठी मतदान केंद्रनिहाय सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला आहे.  जिल्ह्यात अतिरिक्त बंदोबस्तासाठी राज्यराखीव दलाच्या तीन तुकड्या तर केंद्रीय राखीव दलाच्या  दोन तुकड्या प्राप्त होणार आहेत. तसेच संवेदनशील व जोखमीच्या मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.

आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेणार-विकास मीना

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाची तात्काळ दखल घेण्याची यंत्रणा सज्ज करण्यात आली असून १९५० टोल फ्रि क्रमांक, ९४ स्थिर सर्व्हेक्षण पथके, तसेच फिरते सर्व्हेक्षण पथके  इ. माध्यमांतून ग्रामिण भागापासून शहरी भागापर्यंत प्रशासनाचे लक्ष आहे.  त्यासाठी नागरीकही सी व्हिजील या ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवू शकतात, असे आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

०००००

 

जळगाव जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू ; काटेकोरपणे पालन करण्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

जळगाव दि.17 ( जिमाका ) भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली यांनी दिनांक 16/03 / 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची आचार संहिता संपूर्ण जळगाव जिल्हयात सुरु झालेली आहे. त्यामुळे या आदर्श आचार संहितेचे काटेकोर पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 व भारत निवडणूक आयोग, दिल्ली यांनी वेळोवेळी निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्तेवर पोस्टर्स लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणाने सदर मालमत्ता विद्रुपित करणेवर बंदी घातलेली आहे.

अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष उमेदवाराने खाजगी अथवा सार्वजनिक मालमत्ता विद्रुपित केली असेल त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती पत्रके, घोषणा, झेंडे, कापडी फलक, व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.

दि महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेन्ट ऑफ प्रॉपर्टी अॅक्ट 1995 अन्वये अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षेस संबंधित इसम पात्र राहील.

0000000000

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४

सातारा दि.17: भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ घोषणा केली असून याची आचार संहिता दि.16 एप्रिल रोजी सायं 4 वाजल्यापासून जाहिर केली आहे.  निवडणुकांची घोषणा केल्यापासून तीन दिवसाच्या आत जिल्ह्यातील सर्व मुद्रणालयांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 याच्या कलम 127-क च्या आवश्यकता निदर्शनास आणणारी आणि कोणतेही उल्लंघन केल्यास राज्याचा संबंधित कायद्यान्वये मुद्रणालयाचे लायसन्स रदद करण्यासह कठोर कारवाई करण्यात येणार आहे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

कोणत्याही व्यक्तीला, त्याच्या दर्शनीभागावर त्याच्या मुद्रकाचे आणि प्रकाशकाचे नाव व पत्ता नसेल असे कोणतेही निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रक मुद्रित वा प्रकाशित करता येणार नाहीं अथवा मुद्रित किंवा प्रकाशित करवता येणार नाही.   कोणत्याही व्यक्तीला निवडणूकपत्रक किंवा भित्तिपत्रके  ती स्वतःच त्याचा प्रकाशक आहे याबद्दलचे स्वतः स्वाक्षरित केलेले आणि ज्या व्यक्ती तिला व्यक्तोशः ओळखतात अशा दोन व्यक्तीनी साक्षांकित केलेले अधिकथन त्याने मुद्रकाला दोन प्रतीमध्ये दिल्याशिवाय; आणि  तो दस्तऐवज मुद्रित झाल्यानंतर वाजवी मुदतीच्या आत, मुद्रकाने त्या कागदाच्या एका प्रतीसह अधिकथनाची एक प्रत जिल्हा दंडाधिकाऱ्याला, पाठविल्याशिवाय मुद्रित करता येणार नाही किंवा मुद्रित करवता येणार नाही.

या कलमाच्या प्रयोजनार्थ,  कागदपत्र हाताने नकलून काढण्याच्या प्रक्रियेतून अन्य कोणतीही अनेक प्रती काढण्याची प्रक्रिया म्हणजे मुद्रण असल्याचे समजण्यात येईल आणि ” मुद्रक” या संज्ञेचा अर्थ तदनुसार लावला जाईल आणि “निवडणूकपत्रक किंवा भित्तीपत्रक “याचा अर्थ, उमेदवाराच्या किंवा उमेदवारांच्या एखाद्या गटाच्या निवडणुकीचे प्रचालन करण्यासाठी किंवा निवडणुकीला बाधा आणण्यासाठी वाटण्यात आलेले कोणतेही मुद्रीत पत्रक, हस्तपत्रक किंवा अन्य दस्तऐवज किवा निवडणुकीशी संबंधित असा घोषणाफलक किंवा भित्तिफलक असा होतो, पण निवडणूक सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण आणि इतर तपशील किंवा निवडणूक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांच्यासाठी नेहमीच्या सूचना जाहीर करणारी हस्तपत्रके, घोषणाफलक किंवा भित्तिपत्रक यांचा समावेश होत नाही.

जी व्यक्ती, पोट-कलम (1) किंवा पोट-कलम (2) मधील कोणत्याही उपबंधाचे व्यतिक्रमण करील ती व्यक्ती सहा महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासास किंवा दोन हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षांस पात्र असेल.

कोणत्याही निवडणुकीची पत्रके, भित्तीपत्रके व त्यांनी मुद्रीत केलेले असे अन्य साहित्य यांच्या मुद्रकांची व प्रकाशकाची नावे, पत्ते ठळकपणे दर्शनी भागात स्पष्टपणे दर्शविण्यासाठी त्यांना विशेषकरून सुचविले पाहिजे लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 यांच्या कलम 127 अ (2) अन्वये, आवश्यक असल्याप्रमाणे मुद्रीतसाहित्याची व प्रकाशकाच्या घोषणापत्राची प्रत मुद्रकाने 3 दिवसांच्या आत जिल्हा निवडणूक अधिका-यास पाठवावयाची आहे. या विषयावरील तपशीलवार सूचना, आयोगाच्या पत्र क्रमांक 3/9 (3 एस008)/94, जे एस-दोन, दिनांक 2 सप्टेंबर 1994 (जोडपत्र डी-2) मध्ये अंतर्भूत केल्या आहेत,   जिल्हा निवडणूक अधिका-यास मुद्रणालयाकडून कोणतेही पत्रक किंवा भित्तिपत्रक, इत्यादी मिळाल्या बरोबर प्रकाशकाने व मुद्रकाने कायद्याचे व आयोगाच्या निदेशाचे पालन केले आहे किवा कसे याची तपासणो करण्यात येवून त्याची एक प्रत, कार्यालयाच्या सूचना फलकावर सुद्धा लावण्यात येईल म्हणजे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व अन्य इतरसंबंधित व्यक्ती, कायद्याच्या शर्तीचे पालन करण्यात आले आहे किंवा कसे हे तपासू शकतील, असेही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी कळविले आहे.

0000

 

आदर्श आचारसंहिता काळात बँकांनी रक्कम हाताळणी संदर्भात नियमांचे काटेकोर पालन करावे

सातारा दि.17:  उमेदवारांना निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते उघडण्याबाबत विशेष कक्ष तयार करावा. त्यांना धनादेश व अन्य सेवा, पैसे काढणे, पैसे भरणे या सर्व सेवा प्राधान्याने देण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या.

जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींसोबत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठक घेतली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम, अग्रणी बँक व्यवस्थापक योगश पाटील यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या संशयास्पद होणाऱ्या व्यवहारांची माहिती,   निवडणूक अधिकारी व खर्च सनियंत्रण पथकाला तात्काळ कळवावी. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत अथवा एटीएमध्ये  भरणा करण्यासाठी पैशांची वाहतूक करतांना भारत निवडणूक आयोगाने इलेक्शन सिजर मॅनेजमेंट सिस्टीम दिलेली आहे यामध्ये पूर्ण मार्गासह व्यवस्थीत माहिती भरावी. वाहतूक करणाऱ्या व हाताळणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची ओळखपत्रे सोबत आसणे आवश्यक आहे. पतसंस्थांना जिल्हाधिकारी निवडणूक अधिकाऱ्यांनी जो नमुना तयार त्यामध्ये माहिती भरुनच त्यांनी पैशांची वाहतूक अथवा देवान घेवाण करावी. याबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत दिल्या.

00000

आदर्श आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा दि.17:  निवडणूक प्रक्रियेची व आदर्श आचारसंहितेचे कोटेकोर पालन करण्यासाठी आणि शांतता व सुव्यवस्था राखत पारदर्शी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.

या बैठकीला पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, जिल्हा परिषदेचे वित्त व लेखाधिकारी राहूल कदम यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी निवडणूक खर्चाबाबतच्या कायदेशिर तरतुदींची माहिती राजकीय पक्षांना देवून त्याचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच विविध बाबींच्या दरपत्रकांवर  यावेळी चर्चा करण्यात आली.

लोकसभा निवडणूक उमेदवाराला 95 लाखापर्यंत खर्च करण्यास मुभा आहे. प्रत्येक तहसील कार्यालयांमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांना आवश्यक असणारे सर्व प्रकारचे परवाने  घेण्यासाठी एक खिडकी योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी सुविधा ॲप प्रामुख्याने करावा  किंवा समक्ष अर्ज द्यावेत. जिल्ह्यातील संवेदनशिल मतदान केंद्रांवर जास्तीचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. या मतदान केंद्रावर सर्व सुविधा देण्यात येणार आहे. त्याचबरोबर 50 टक्याकतहून अधिक मतदान केंद्रांवर वेब कास्टींची  करण्यात येणार आहे. याशिवायही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवश्यकता वाटल्यास त्यांनी मतदान सूचवावीत त्यांचेही वेब कास्टींग करण्यात येईल.

0000

 

लाच देणे, घेणे अथवा मतदारांना धमकी याबाबतच्या तक्रारींसाठी १९५० टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा दि.17:   नागरिकांनी कोणतीही लाच स्वीकारण्यापासून दूर रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.  जर कोणी लाच देत असेल अथवा लाच देण्याघेण्याबाबत कोणतीही माहिती असेल अथवा मतदारांना धमकी/धाकदपटशा करीत असेल तर   जिल्हयाच्या तक्रार संनियंत्रण कक्षातील 1950 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी हा कक्ष 24 तास सर्व दिवशी चालू राहील.

भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ख नुसार, निवडणूक प्रक्रियेच्या काळात त्याच्या मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणतेही परितोषिक, रोख रक्कम किंवा या प्रकारचे देणारी किंवा स्वीकारणारी कोणतीही व्यकती एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस, शिक्षापात्र असेल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी स्पष्ट केले आहे.   तसेच ज्याबाबी   भारतीय दंड संहितेचे उल्लंघन करतील अशांवर    एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्हीस शिक्षा पात्र असेल.  लाच घेणारा व देणारा या दोहांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणा-या व धाकदपटशा करणा-या विरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशीही माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

0000

 

लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

सातारा दि. 17 (जि.मा.का.) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा कार्यक्रम   जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार सातारा जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात दि. 7 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संपूर्ण देशात 16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहील. आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास जिल्हा प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी  सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, निवडणूक कार्यक्रमानुसार 45- सातारा लोकसभा मतदारसंघासाठीचा निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. (१) अधिसूचना प्रसिध्दी – शुक्रवार दि. 12 एप्रिल 2024, (२) उमेदवारी अर्ज दाखल करणे दि. 12 ते 19 एप्रिल(३) अर्जाची छाननी – शनिवार दि. 20 एप्रिल 2024, (४) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख – सोमवार दि. 22 एप्रिल 2024, (५) मतदानाची तारीख – मंगळवार दि. 7 मे 2024, (६) मतमोजणीची तारीख – मंगळवार दि. 4 जून 2024.

आदर्श आचारसंहिता –‍

आदर्श आचारसंहितेचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना व सर्व उमेदवारांना बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने आचारसंहितेचे उल्लंघन केलेस कडक कारवाई केली जाईल. 43 ‍ठिकाणी SST-113  तसेच FST-99पथके सर्व मतदार संघात कार्यान्वित करणेत येत आहेत.निवडणूकीचे अनुषंगाने जिल्हयामध्ये कोणत्याही प्रकारे पैशाचा व बळाचा गैरवापर होऊ नये याची दक्षता घेणेत येणार आहे.तसेच आर्थिक व वस्तू स्वरुपातील प्रलोभनांवर कडक कारवाई करणेत येणार आहे.तसेच सदर गोष्टीं रोखण्यासाठी सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. राजकीय आरोप वभाषेचा घसरता स्तर याची गंभीर दखल घेऊन, प्रचारा दरम्यान मर्यादेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी.प्रचारादरम्यान आक्षेपार्ह व्देष पसरवणारी भाषा वापरणेत येऊ नये.

Seizure From Enforment agencies –

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पोलिस,राज्य उत्पादन शुल्क,आयकर विभाग तसेच केंद्रीय व राज्य सेवा कर विभाग  या विभागामार्फत अवैद्य पैसे वाहतूक,पैशाचा गैरवापर,मद्य, व इतर अमली पदार्थ किंवा इतर प्रलोभने रोखण्यासाठी पथकांची नियुक्ती करणेत आलेली आहे. त्यानुसार असे गैरप्रकार आढळलेस सक्त कारवाई करणेत येईल. संशयित बँक व्यवहाराबाबतची यादी बँकेने रोजच्या रोज  कळवावी असे निर्देश देणेत आलेले आहे.

निवडणुकीची तयारी –

सातारा लोकसभा मतदार संघामध्ये SST 43 ‍ठिकाणी 113 पथके असून तसेच FST 99 पथके सर्व मतदार संघात कार्यान्वित करणेत आलेले आहेत.तसेच जास्तीत जास्त  मतदार जागृती करण्यात आलेली आहे.यामध्ये क्रिटीकल पोलींग स्टेशन 65,‍ परदानशिन 14, महिला प्रधान मतदान केंद्र-17,दिव्यांग मतदान केंद्र 17,नवतरुण मतदान केंद्र 17 व इतर 2883 असे एकूण 3025 मतदान केंद्र तयार केली असून सदर मतदान केंद्रासाठी एकूण 27,085  इतके कर्मचारी उपलब्ध केलेले आहेत.मतदान केंद्रावर पाणी,लाईट,स्वच्छता गृह इ.सोय करण्यात आलेली आहे.तसेच 85 वर्षावरील मतदारांसाठी व 40 % पेक्षा जास्त दिव्यांगासाठी 12 D  फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. त्यांना होम वोटींगची सुविधा दिली जाणार आहे.

Paid News/ Fake News

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये पेड न्युज  व फेक न्युज संदर्भात मिडीया सेल तयार करणेत आलेला आहे.त्यानुसार पेड न्युज व फेक न्युज संदर्भात तक्रार प्राप्त झालेस आवश्यक कारवाई करणेत येणार आहे.दिशाभूल करणाऱ्याबातम्या व जाहिराती रोखणेबाबत निर्देश देणेत आलेले आहेत.जिल्हा माहिती अधिकारी या कक्षाच्या प्रमुख आहेत. चुकीच्या व खोट्या बातम्यांचे खंडन तात्काळ करण्यात येईल.

Pre certificate of Adv of political party and candidate –

सर्व उमेदवारांनी त्यांना करावयाचे प्रचार साहित्य हे जिल्हास्तरीय मिडीया सर्टिफिकेट ॲन्ड मॉनिटरींग कमिटी (MCMC) या समितीकडून प्रमाणित करुन घ्यावे. सदरची समिती जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत करण्यात आली आहे.

Procedure of monitoring and reporting / explaining facts of fake news from DEO –

सातारा लोकसभा २०२४ अंतर्गत वर्तमानपत्र तसेच सोशल मिडीयावरील बातम्यांचे अनुषंगाने फेक न्युजची सत्यता पडताळणीसाठी पथकाची नियुक्ती करणेत आलेली आहे. सदरचा कक्ष टी.व्ही.,वर्तमानपत्रे यामधील बातम्यांची तपासणी करुन आवश्यक कार्यवाही केली जाईल.

SVEEP awareness –

स्विप कार्यक्रमांतर्गत मतदानांची टक्केवारी वाढविणेसाठी 134 विविध महाविद्यालयातून विद्यार्थ्यांचे मतदान नोंदणी करणेत आलेली आहे.तसेच पथनाट्ये ,भारूड,कीर्तन व विविध लोककलेच्या माध्यमातून मतदान जास्तीत जास्त करणेबाबत प्रचार व प्रसार करणेत येत आहे.तसेच विविध मतदान जनजागृतीच्या जाहिराती शासकीय महामंडळाच्या बसेस वर लावणेत येणार आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत.

Procedure set up at CEO and DGIPR for giving authorise letter to media person for polling and counting –

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्व पत्रकारांना निवडणुक व मतमोजणीसाठी प्राधिकार पत्र देणेसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय मुंबई व माहिती महासंचालनालय यांचेकडे व्यवस्था केलेली आहे.

सातारा जिल्हयातील मतदारांना लोकसभा निवडणूकीविषयी काहीही अडीअडचणी शंका असल्यास टोल फ्री क्रं.1950 या वर संपर्क करु शकता . तरी सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घेऊन जिल्हयात जास्तीत जास्त मतदान करुन लोकशाही मजबुत करावी असे आवाहन   जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले.

0000

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष — गरजूंसाठी दिलासा देणारी शासनाची संवेदनशील योजना

0
गडचिरोली, दि. २१ जुलै : मुख्यमंत्री सहाय्यता निधी ही राज्य शासनाची एक प्रभावी सामाजिक कल्याण योजना असून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गंभीर आजारांनी ग्रस्त व...

गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित – सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

0
रायगड जिमाका दि.२०: आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव म्हणून घोषित केला असून त्याची रुपरेषा देखील जाहीर केली आहे. यावर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष : गोर-गरीब, गरजू रुग्णांसाठी संजीवनी

0
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे अमरावती विभागातील गरजूंना ६ कोटी ८२ लाखांची मदत राज्यभरासह अमरावती विभागातील गरजू रुग्णांना अडचणींच्या प्रसंगी मदतीचा हात देत मुख्यमंत्री वैद्यकीय...

‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६’ स्पर्धा समन्वयाने यशस्वी करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पुणे, दि. २०: आगामी जानेवारीमध्ये 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर-२०२६'च्या रूपाने देशात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन होत असून स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने...

कामगार विमा योजनेतील रुग्णालयांबाबत केंद्रीय श्रम व रोजगार मंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा

0
मुंबई, दि.20 :  आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री डॉ.मनसुख मांडविया यांची शिष्टमंडळासह भेट घेतली. या भेटीत...