मंगळवार, जुलै 22, 2025
Home Blog Page 829

चंद्रपूरमध्ये २०६४ मतदार करणार गृहमतदान

चंद्रपूर, दि. 2 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 मध्ये पहिल्यांदाच, 85 वर्षांवरील नागरिक तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना गृह मतदानाची पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.  त्यानुसार 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील एकूण 1239 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली असून यात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 163 आहे. ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदान करणार आहेत. या मतदारांनी गृहमतदाना करीता आवश्यक असलेला फॉर्म 12 – डी प्रशासनाकडे सुपुर्द केला आहे.

आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, पात्र असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा प्रशासन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करीत आहे. भारत निवडणूक आयोगाने सुद्धा पहिल्यांदाच 85 वर्षांवरील नागरीक आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग बांधवांना गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे इच्छुक मतदारांना नमुना 12 – डी देण्यात आला.  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 1076 तर 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या मतदारांची संख्या 163 आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय गृह मतदान करणारे मतदार : राजूरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 325 आणि दिव्यांग 21 मतदार, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 175 आणि दिव्यांग 16, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 197 आणि दिव्यांग 56,  वरोरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 213 आणि दिव्यांग 39 मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघातील 85 वर्षांवरील 224 आणि 63 दिव्यांग मतदार तर चिमूर मतदारसंघातील 85 वर्षांवरील 437 आणि 101 दिव्यांग मतदार गृहमतदानाद्वारे मतदान करणार आहेत.

मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सुचना : गृहमतदानासंदर्भात अधिकारी व कर्मचा-यांचे प्रशिक्षण नुकतेच नियोजन भवन येथे घेण्यात आले. यात फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांना माहिती देण्यात आली. अतिशय अचूक पध्दतीने गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडायची असून त्याची गोपनीयता सुद्धा पाळणे आवश्यक असल्याचे प्रशिक्षणामध्ये सांगण्यात आले. प्रशिक्षणाला अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, रविंद्र माने आदी उपस्थित होते.

अशी राहील प्रक्रिया : गृहमतदानासाठी घरी जाणा-या अधिकारी व कर्मचा-यांनी डिक्लेरेशन म्हणजे फॉर्म 13 – ए अचूक भरून घ्यावयाचे आहे. मतदान केलेल्या पत्रिकेची उभी घडी करून सदर पत्रिका छोटा लिफाफा म्हणजे फॉर्म 13 – बी मध्ये टाकावा. डिक्लरेशन आणि छोटा लिफाफा दोन्ही कव्हर बी लिफाफा म्हणजेच फॉर्म 13 – सी मध्ये टाकावा. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान गृह मतदानाची व्हीडीयोग्राफी करण्यात येणार असून दोन अधिकारी / कर्मचारी, मायक्रो निरीक्षक आणि व्हीडीओग्राफर सोबत राहणार आहे.

०००००

 

मतदार जनजागृतीसाठी गीतमाला निर्मिती!

रायगड(जिमाका)दि.2:-रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.  यंदाच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हानिवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मतदार जनजागृतीसाठी गीतमाला तयार करण्यात आली आहे. या गीतांच्या सिडीचे प्रकाशन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या प्रकाशन सोहळ्यास अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, तहसिलदार म्हसळा, समीर घारे आदि उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात मतदार जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  मतदान प्रक्रिया हा लोकशाहीचा उत्सव आहे. या उत्सवात प्रत्येक मतदाराने मतदान करुन आपला सहभाग नोंदवावा यासाठी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघांचे सहा. निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार समीर घारे यांनी या गीतांची निर्मिती केली आहे. एकूण 6 गीते असून पारंपरिक चालीवर असलेल्या या गीतांचे लेखन, गायन श्री.भिमराव सूर्यतळ यांनी केले असून संगीत सचिन धोंडगे यांनी दिले आहे. सहकलाकार म्हणून प्रतिक निकम, आदेश डेरवणकर आणि किरण शिंदे यांनी काम केले आहे. या गीतमाला सिडीची निर्मिती नायब तहसिलदार धर्मराज पाटील, तहसिलदार समीर घारे यांनी केली आहे. ही संपूर्ण निर्मिती शासकीय अधिकारी कर्मचारी यांची आहे. या उत्कृष्ट निर्मितीसाठी संपूर्ण यंत्रणेचे जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी कौतुक करून अभिनंदन केले. रायगड जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी या गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

०००००

 

 

निवडणूक कर्मचाऱ्यांच्या आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी बेड्स आरक्षित ठेवावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२(जिमाका):- उन्हाळ्याचे दिवस पाहता निवडणूक कामकाजादरम्यान कर्मचाऱ्यांना अकस्मात वैद्यकीय समस्या उद्भवली तर अशा आपात्कालीन वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयांनी काही बेड्स आरक्षीत ठेवावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभुमिवर आज जिल्ह्यातील मल्टिस्पेशालिटी इस्पितळ चालकांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा तसेच शहरातील २० रुग्णालयांचे संचालक उपस्थित होते. जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, निवडणूकीच्या कामकाजादरम्यान एखाद्या अधिकारी – कर्मचाऱ्याची अचानक तब्येत बिघडून काही वैद्यकीय समस्या निर्माण झाल्यास त्यावर तातडीने उपचर होणे आवश्यक आहे. अशा परिस्थिती त्या त्या ठिकाणाहून जवळच्या रुग्णालयात ही सुविधा उपलब्ध व्हावी यादृष्टीने रुग्णालयांनी प्रशासनाला सहकार्य करावे. मतदान, मतमोजणी व प्रशिक्षणांदरम्यान अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्यावेळी मतदान व मतमोजणी कालावधीच्या दरम्यान दोन दिवस आधी व नंतर रुग्णालयांत काही बेड्स आरक्षित ठेवावे.  तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी, आपात्कालिन कक्षातील संपर्क क्रमांक आदींची माहिती प्रशासनाला द्यावी,असे आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

मतदार जागृतीतही रुग्णालयांनी सहभाग घ्यावा

जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या व्यवस्थापनांनी मतदार जनजागृती उपक्रमांमध्ये आपला सहयोग द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या बैठकीदरम्यान केले. रुग्णालयांनी आपले बाह्यरुग्ण कक्ष, मोकळ्या जागा अशा ठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्ये , प्रतिक्षालयांमध्ये व्हिडीओद्वारे मतदार जनजागृती करावी. किंवा यासाठी अभिनव कलपना रुग्णालये वापरु शकतात. जसे फाईलवर, रुग्णांना द्यावयाच्या सुचनापत्रकावर, अशा  ठिकाणी मतदानाचे महत्त्व सांगणारे घोषवाक्ये, मतदानाचे आवाहन छापून ते रुग्णांपर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.

०००००

 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्षातील दूरध्वनी कार्यान्वित

नाशिक, दि. २ (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने  निवडणूक संदर्भातील तक्रारींची नोंद करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्थापित केलेल्या आचारसंहिता कक्षातील  ०२५३-२९९५६७ आणि ०२५३-२९९५६७३ हे दोन दूरध्वनी क्रमांक कार्यान्वित झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविली आहे.

यासोबतच जिल्हा प्रशासनाने १९५० हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून दिला आहे. या टोल फ्री क्रमांकावर कॅाल करून नागरिकांना मतदानाची तारीख जाणून घेणे, मतदानाची वेळ माहित करून घेणे,  मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचा सविस्तर तपशील जाणून घेणे, मतदार नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया, मतदानासाठी आवश्यक असलेले निवडणूक ओळखपत्र या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाकडून विहीत केलेल्या इतर १२ ओळखपत्रांची माहिती घेणे यासारख्या विषयांवर चौकशी करता येईल.नागरिक या टोल फ्री क्रमांकावर डायल करून तक्रार नोंदवू शकतात. हा टोल फ्री क्रमांक २४ तास कार्यरत राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

०००

आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध – अध्यक्ष रजनिश सेठ

मुंबई, दि. १ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची ऐतिहासिक व उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष रजनिश सेठ व सदस्यांनी मत व्यक्त केले.

आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात संपन्न झालेल्या आयोगाचा ८७ वा स्थापना दिवस कार्यक्रमास सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अभय वाघ, डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात तसेच आयोगाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात १ एप्रिल, १९३७ रोजी झाली. स्वातंत्र्यापूर्वी बॉम्बे व सिंध लोकसेवा आयोग या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे नामकरण करण्यात आले. आज दिनांक १ एप्रिल, २०२४ रोजी ८७ वर्षे पूर्ण झाली आहेत.

ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवतांना आपल्याला समाजात दिसतात.

स्वसुख निरभिलाष: खिद्यते लोकहेतो: अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे या ब्रिद वाक्याप्रमाणेच गेली ८७ वर्षापासून प्रामाणिकपणे आयोग कार्यरत आहे.

****

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : पुणे विभाग – एक दृष्टीक्षेप

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला असून महाराष्ट्रात एकूण ५ टप्प्यात मतदान होणार आहे. पुणे विभागातील दहा लोकसभा मतदार संघात दोन टप्पात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे व विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही लोकसभा निवडणूक नि:पक्ष, पारदर्शी आणि आदर्श आचारसंहितेचे संपूर्ण पालन करुन पार पाडण्यासाठी पुणे विभाग सज्ज आहे. त्याची ही थोडक्यात माहिती…

       पुणे विभागातील 10 लोकसभा मतदार संघात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत आहे. याकरिता भारत निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम जाहीर केला आहे त्यानुसार विभागातील बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदार संघात मतदान तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे 2024 रोजी होणार आहे. ज्यासाठीची अधिसूचना 12 एप्रिल रोजी तर मावळ, पुणे व शिरुर लोकसभा मतदार संघात मतदान चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी होणार असून याची  अधिसूचना 18 एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे. तर 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे.

विभागात सुमारे 2 कोटी 4 लाख 66 हजार मतदार नोंदणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 5 लाख 61 हजार पुरुष व 99 लाख 4 हजार 366 स्त्री मतदार आहेत. विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये 21 हजाराहून अधिक मतदान केंद्र असून त्यापैकी पुणे 8 हजार 382, सातारा 3 हजार 25, सोलापूर 3 हजार 617, कोल्हापूर 4 हजार 16 व सांगली 2 हजार 448 मतदान केंद्र आहेत. विभागात सुमारे 1 लाख 25 हजार मनुष्यबळ निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

पात्र मतदार

पुणे जिल्ह्यात 81 लाख 27 हजार 19  मतदार असून त्यामध्ये 42 लाख 44 हजार 314 पुरुष व 38 लाख 82 हजार 10 स्त्री मतदार आहेत. तर 81 हजार 337 दिव्यांग मतदार, 80 वर्षावरील 2 लाख 48 हजार 790 व 695 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. सातारा जिल्ह्यात एकूण 25 लाख 64 हजार 427 मतदार असून त्यापैकी 13 लाख 5 हजार 277 पुरुष व 12 लाख 59 हजार 56 स्त्री मतदारांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 36 लाख 27 हजार 75 मतदार असून त्यापैकी 18 लाख 76 हजार 498 पुरुष व 17 लाख 50 हजार 297 महिला मतदार आहेत. तर 27 हजार 194 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघात एकूण 37 लाख 23 हजार 134 मतदार आहेत. त्यापैकी 18 लाख 97 हजार 356  पुरूष तर 18 लाख 25 हजार 598 स्त्री व 180 इतर मतदार आहेत. 18 ते 19 वयोगटातील एकूण मतदारांची संख्या 39633 असून सैनिकी मतदारांची संख्या 8923 आहे. तसेच दिव्यांग मतदारांची संख्या  25911 आहे. 85 व त्यापेक्षा जास्त वयोगटातील मतदार संख्या 40053 आहे. सांगली मतदार संघात 24 लाख 25 हजार 317 मतदार असून त्यापैकी 12 लाख 37 हजार 796 पुरुष व 11 लाख 87 हजार 405 स्त्री मतदार, 116 तृतीयपंथी, 85 वर्षावरील 39 हजार 232, दिव्यांग 20 हजार 616 मतदार आहेत.

मतदान जनजागृती

       भारत निवडणूक आयोगाने लोकशाहीच्या अधिकाधिक बळकटीसाठी मतदारांमध्ये जागृती करुन त्यांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्याच्या हेतूने ‘स्वीप’ (SVEEP- Systematic Voters` Education & Electoral Participation) हा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यांतर्गत विविध माध्यमातून मतदारांशी संपर्क साधून लोकशाहीचे महत्त्व विशद करणे आणि कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मतदान जागृतीसाठी स्वीपमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून वाड्या-वस्त्यांवर, आठवडी बाजार, गर्दीची ठिकाणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सहभागातून रॅली, विविध स्पर्धांमधून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

मतदारांना सुविधा

दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना सुलभरीत्या मतदान करता यावे यासाठी ‘पीडब्ल्यूडी ॲप’ च्या माध्यमातून दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मतदान केंद्रांवर दिव्यांगांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदान केंद्रात प्रवेश करताना दिशादर्शक फलक, त्याठिकाणी सुस्थितीतील रॅम्प, व्हील चेअर,  विश्रांती कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, प्रथमोचार पेटी, मतदान केंद्र तळमजल्यावर तसेच मतदान केंद्रांवर त्यांच्यासाठी स्वतंत्र वाहनतळ, मतदान केंद्रामध्ये जाताना रांगेत न थांबवता स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदान करतांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. असे ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी आधारकार्ड, मनरेगा जॉबकार्ड, बँकांचे/टपाल कार्यालयाचे छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसेन्स), पॅनकार्ड, भारतीय पारपत्र (पासपोर्ट), छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले छायाचित्रासह सेवा ओळखपत्र, खासदार, आमदार यांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक राहील.

मतदारांना आवाहन

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्व पात्र मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क जरुर बजवावा. नि:पक्ष आणि निर्भयतेने मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणा आपल्या सदैव मदतीला असते.  सर्व पात्र मतदारांनी मतदान करुन मतदानाची टक्केवारी वाढवावी, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करुन आपली लोकशाही अधिक बळकट करण्यास पुढे यावे. आपणही आपले कर्तव्य निभावू….चला मतदान करुया….

0000

डॉ. राजू पाटोदकर

उपसंचालक (माहिती), पुणे विभाग, पुणे

पारदर्शक, प्रचलित नियम व धोरणानुसारच रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया

मुंबई, दि. 1 : आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठीच्या रूग्ण्वाहिका खरेदी संदर्भातील संपूर्ण निविदा प्रक्रिया प्रचलित नियम व धोरणानुसार अत्यंत पारदर्शकप्रमाणे राबविण्यात आली आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता झालेली नाही. तसेच सद्यस्थितीत प्राप्त सेवापुरवठादारासोबत सामंजस्य करार करण्यात आलेला नसून अद्यापपर्यंत शासनामार्फत पुरवठादारास कोणताही निधी देण्यात आलेला नाही, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

सद्य:स्थितीत वापरात असलेल्या रुग्णवाहिका या 10 वर्ष जुन्या असल्यामुळे व निविदेचा कालावधी समाप्त होत असल्यामुळे सद्यस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पाअंतर्गत मंजूर जुन्या तांत्रिक विनिर्देशानुसार (Technical Specification) नवीन सेवा पुरवठादाराची नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णय 04 ऑगस्ट, 2023 नुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

प्रशासकीय मान्यतेमधील दर अंदाजित होते. तसेच त्यात मध्यवर्ती संपर्क कक्ष (108) (ERC- Emergency Response Centre) करिताचा खर्च अंतर्भूत करण्यात आलेला नव्हता. तसेच या प्रशासकीय मान्यतेमध्ये वार्षिक दरवाढ 8 टक्के तसेच सेवा पुरवठादारामार्फत करावयाच्या 51 टक्के भांडवली गुंतवणुकीच्या अनुषंगाने अपेक्षित भांडवली गुंतवणूक परतावा याचा अंतर्भाव करण्यात आलेला नव्हता. प्रशासकीय मान्यतेवेळी विचारात घेण्यात आलेले तांत्रिक विनिर्देश हे 10 वर्षे जुने असल्यामुळे ते गरजेनुसार अद्ययावत करण्यात आले.

सदर निविदेत वाढीव इंधन दर आणि अद्ययावत रुग्णवाहिकेचा वाढीव देखभाल दुरुस्ती दर सुद्धा निविदा अंतिम करताना विचारात घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय जगातील गरजेनुसार नवीन उपकरणांचे तांत्रिक विनिर्देश सुद्धा तज्ज्ञ समितीमार्फत अद्ययावत करण्यात आले. रुग्णवाहिकेत आधुनिक सुविधा असल्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना अत्यंत अद्ययावत अशा पद्धतीच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ मिळणार आहे. उपरोक्त बाबीचा विचार करुन निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती.

प्रथम निविदेस एकही निविदाकार प्राप्त न झाल्यामुळे पुनःश्च निविदा करण्यात आली व सदर निविदेस देखील दोन मुदतवाढीनंतर एकच निविदाधारक प्राप्त झाला. मात्र उद्योग व उर्जा विभागाच्या शासन निर्णय दिनांक 1 डिसेंबर 2016 मधील मुद्दा क्र 4.4.3.1 व दि. 29 ऑक्टोबर 2021 रोजीच्या केंद्र शासनाच्या वित्त विभागाच्या खरेदी धोरण विभागाच्या परिपत्रकामधील मुद्दा क्र 11.8 मध्ये नमूद नुसार सर्व अटींची पूर्तता होत असून, सद्यस्थितीत कार्यरत पुरवठादाराचे कंत्राट संपुष्टात येत असल्यामुळे व सदर सेवा आपत्कालीन असल्यामुळे एक निविदाकार असून देखील त्यासह पुढे जाण्याचा निर्णय अपर मुख्य सचिव (वित्त) यांच्या अध्यक्षतेखालील निविदा समितीमध्ये घेण्यात आला.

सदरील निविदेमध्ये मे. सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, मे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड व मे. एसएसजी ट्रान्‍सपोर्ट  सॅनिटेरीयो, एस.एल यांनी संयुक्तपणे सहभाग घेतलेला आहे. आयुक्त, आरोग्य सेवा यांच्या स्तरावरील समितीमार्फत प्रथम वाटाघाटी करण्यात आली व त्यानंतर अपर मुख्य सचिव, वित्त यांच्या अध्यक्षतेखाली निविदा समितीमार्फत निविदेत प्राप्त वाढीव दराबाबत संपूर्ण विश्लेषण (Cost Analysis) करण्यात येऊन त्यापश्चात पुनश्च वाटाघाटी करण्यात आली. निविदा समितीची मान्यता व  तद्नंतर मंत्रीमंडळाने प्रदान केलेल्या अधिकारानुसार नवीन सुधारित प्रशासकीय मान्यता दि. 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आली आहे.

शासन निर्णय दि.15 मार्च 2024 च्या प्राप्त सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार निविदेमधील पात्र संयुक्त निविदाकार मे.सुमित फॅसिलिटीज लिमिटेड, मे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड व मे.एसएसजी ट्रान्‍सपोर्ट सॅनिटेरीयो, एस.एल यांना ‘लेटर ऑफ अवार्ड’ देण्यात आले आहे.

पूर्वीच्‍या करारानुसार 233 ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (एएलएस) आणि 704 बेसिक लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (बीएलएस) अशा एकूण 937 रुग्‍णवाहिकांचा आपत्‍कालीन सेवेत समावेश होता. प्रस्तावित योजनेंतर्गत वाढलेल्या लोकसंख्येच्या निकषानुसार, नवीन निविदेमध्‍ये ॲडव्हान्स लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (एएलएस) 255 आणि बेसिक लाइफ सपोर्टिंग अॅम्ब्युलेन्स (बीएलएस) 1274, तसेच निओ नटल (Neo Natal) अॅम्ब्युलेन्स 36, बाइक अॅम्ब्युलेन्स 166 व वॉटर अॅम्ब्युलेन्स 25 अशा एकूण 1756 नवीन रुग्णवाहिका कार्यान्वित करावयाचे प्रस्तावित आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

निलेश तायडे/विसंअ/

स्वीप उपक्रमांतर्गत फेसबुकच्या माध्यमातून ‘मतदानावर बोलू काही’ लाईव्ह शो

अमरावती, दि. 1 (जिमाका): जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी  यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून स्वीप उपक्रमांतर्गत ‘मतदानावर बोलू काही’ हा फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देविदास पवार, स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके हे सहभागी होऊन त्यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून सर्व मतदारांपर्यंत पोहोचता येते. फेसबुक आणि झूम लिंक या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याला गावागावातून अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. गावातील महिला, युवक-युवती, नागरिक यांनी शाळा, मंदिर, सावलीचे ठिकाणी ज्या ठिकाणी नेटवर्क असेल अशी जागा येथे बसून जिल्हाधिकारी यांच्या लाईव्ह शो मोठ्या उत्सुकतेने बघितला. या शोमध्ये पद्मश्री शंकरबाबा पापळकर,कोन बनेगा करोडपती विजेती बबिता ताडे त्याचबरोबर काही ज्येष्ठ नागरिकांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि जिल्ह्यातील नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केले.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी नागरिकांनी आपल्या मनात कोणतीही भीती न बाळगता किंवा कोणाच्याही दबावात न येता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन यावेळी केले. फेसबुक लाईव्ह शोच्या माध्यमातून डॉ. घोडके यांनी नागरिकांना मतदानांशी संबंधित प्रश्न विचारून मतदान प्रक्रियाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करून असाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवावा, असे आवाहन सर्व नागरिकांना केले. शोच्या यशस्वी आयोजनासाठी संजय राठी, नितीन माहुरे, गजानन कोरडे, हेमंत कुमार यावले, श्रीकांत सदाफळे, विजय काळे यांनी परिश्रम घेतले.

00000

लोकसभा निवडणूक : राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदारसंघनिहाय उमेदवार चिन्हांची माहिती

[pdf-embedder url=”http://13.200.45.248/wp-content/uploads/2024/04/लोकसभा-निवडणुकीच्या-पहिल्या-टप्प्यातील-मतदार-संघ-निहाय-उमेदवारांची-यादी-1.pdf” title=”लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदार संघ निहाय उमेदवारांची यादी (1)”]

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करा – जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

   सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्यात येत्या 7 मे रोजी मतदान होत आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीप कार्यक्रम आढावा व नियोजनाबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी श्रीमती निता शिंदे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जि.प. उपपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, गत निवडणुकीत राष्ट्रीय सरासरी पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. मतदान केंद्र, गाव व तालुका स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाव्दारे जनजागृती करावी. महाविद्यालय, पेट्रोल पंप, एसटी महामंडळ बसस्थानक, बसेस, पोस्ट ऑफीस, चावडी, मंगल कार्यालये, मोठे समारंभ आदी ठिकाणी पोस्टर, स्टीकर, ऑडिओ  जिंगल्स, नाविण्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जनजागृती करावी. तसेच जिल्ह्यातून किमान एक लाख संकल्प पत्रे भरून घ्यावीत. यामध्ये 50 टक्क्यापेक्षा अधिक महिलांचा समावेश असावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे म्हणाले, तालुकास्तरावर मोठी रांगोळी, ज्या ठिकाणी नागरिकांची गर्दी असते त्या ठिकाणी पोहोचून मतदार जनजागृती करावी. त्याचबरोबर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. तसेच वाढता उन्हाळा लक्षात घेता नागरिकांना त्रास होणार नाही या दृष्टीने सकाळी कार्यक्रमाचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात याव्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी रांगोळी स्पर्धा, सायकल रॅलीचे नेटके आयोजन करून मतदार जनजागृती  मोठ्या प्रमाणावर करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. यावेळीस तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.

00000

 

 

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयात रक्तदान शिबिर; ८० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग

0
मुंबई, दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित रक्तदान शिबिरात ८० रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. महाराष्ट्र राज्य रक्त...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या धर्तीवर ‘कृषी समृद्धी योजना’ राबविणार – कृषी मंत्री ॲड....

0
मुंबई, दि. २२ : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याचा सुयोग्य व किफायतशीर वापर करण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या” धर्तीवर, “कृषि समृद्धी योजना”...

राज्यात विक्रमी १०२ रोजगार मेळावे, ५७ हजार नोंदणी, २७ हजार युवकांना एकाच दिवशी रोजगार

0
मुंबई दि. २२ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या राज्यव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार...

वर्ल्डवन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्रात उत्तम परिसंस्था निर्माण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २२ : वर्ल्डवन एनर्जी कंपनीने प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात चांगली सुरुवात केली असून येत्या...

गडचिरोली देशातील सर्वाधिक हरित जिल्हा बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प

0
गडचिरोली, दि. २२ (जिमाका) : राज्यात सर्वांधिक वनाच्छादित अशा गडचिरोली जिल्ह्याची ओळख ‘महाराष्ट्राचे फुफ्फुस’ म्हणून आहेच, परंतु आता हा जिल्हा देशातील सर्वाधिक हरित व...