बुधवार, जुलै 23, 2025
Home Blog Page 827

महाराष्ट्र लोकसेवा आयोग लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करणार

           मुंबई दि.५ :   सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच सुधारित परिक्षांच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

            राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत,जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ करिता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ पदांकरीता जाहिरात क्रमांक ४१४/२०२३ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक २८ एप्रिल, २०२४ रोजी घेण्यात येणार होती. परंतु, महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ अंमलात आल्याने या अधिनियमातील तरतुदी विचारात घेता आयोगाच्या दिनांक २१ मार्च, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ तसेच दिनांक १९ मे, २०२४ रोजी नियोजित समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

            महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण अधिनियम, २०२४, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ मधील तरतुदीनुसार दिनांक २६ फेब्रुवारी, २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. तथापि, निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून घेणे गरजेचे आहे व त्याप्रमाणे मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना कळविण्यात आले आहे.

            महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २०२४ करिता शासनाच्या महसूल व वन विभाग, वित्त विभाग, सामान्य प्रशासन विभाग, ग्राम विकास विभाग, आदिवासी विकास विभाग, उद्योग उर्जा व कामगार विभाग, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग इत्यादी विभागांकडून विविध गट-अ व गट-ब राजपत्रित संवर्गाकरिता प्राप्त मागणीपत्रामध्ये अराखीव पदांचा समावेश असल्याने, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरीता आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्र पाठविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागास कळविण्यात आले आहे.

            सुधारित मागणीपत्र आयोगास प्राप्त होण्यास किती कालावधी लागेल याबाबत निश्चितता नसल्याने सध्या परिक्षेची सुधारित तारीख जाहीर करता येत नाही. प्रस्तुत परीक्षेतील सर्व संवर्गाकरिता प्रशासकीय विभागाकडून सुधारित मागणीपत्र प्राप्त झाल्यानंतर परिक्षेच्या पूर्व तयारीकरिता पुरेसा कालावधी देऊन तसेच संघ लोकसेवा आयोग व कर्मचारी चयन आयोग इत्यादींमार्फत आयोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक विचारात घेऊन परिक्षेचा सुधारित दिनांक आयोगामार्फत जाहीर करण्यात येईल.

0000000

राजू धोत्रे/विसंअ

आई-बाबा मतदान करायचं हं…

मुंबई उपनगर, दि. 5 : लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे असते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जगातील या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपल्या पालकांनीही सहभाग नोंदवावा अशी चिमुकल्यांची अपेक्षा! हीच अपेक्षा वर्सोवा येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आई-बाबांना पत्र लिहून व्यक्त केली. ‘आई – बाबा मतदान नक्की करायचं हं..’ अशी आवाहन करणारी पत्रेच या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना लिहिली.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदारांनी मताधिकार बजावावा यासाठी मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने विविध ठिकाणी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांच्या समन्वयाने मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तुमचे एक मत देशासाठी ठरणार बहुमत यासाठी स्वीपच्या माध्यमातून जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचा एक भाग म्हणून आज वर्सोवा येथील यूपीस या इंग्रजी माध्यम शाळेत हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.

देशाच्या सर्वांगीण विकासात भावी पिढीचे योगदान अमूल्य असणार आहे. जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मतदानाचे महत्व पटवून दिले तर देशात एक सक्षम लोकशाही उभी राहण्यास नक्कीच मदत होणार आहे. ही बाब विचारात घेवून कामा रोड येथील इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना पत्रलेखनातून मतदान करण्यासाठी आग्रह केला आहे. या नावीन्यपूर्ण उपक्रमामुळे मतदानाची टक्केवारी उंचावण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.

लोकशाहीची हाक ऐकू या मतदार यादीत नाव नोंदवू या

लोकशाहीच्या या उत्सवात जिल्ह्यातील युवक व युवतींचा सहभाग वाढावा यासाठी चर्चगेट, मरीन लाईन्स येथे स्वाक्षरी मोहीम आणि मतदान प्रतिज्ञा बँडचे वितरण असा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 250 हून अधिक महिलांनी आणि युवतींनी सहभाग घेतला. यावेळी स्वीपच्या माध्यमातून लोकल ट्रेन मधील प्रवासी महिलांना मतदानाचे महत्व पटवून देत संवाद साधण्यात आला.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नियोजन पी-दक्षिण विभाग आणि 175- कलिना विधानसभा मतदारसंघातील एच/पुर्व विभागातील बचत गट, मारुती टेकडी कलिना, सांताक्रुझ (पुर्व), रईस वस्ती संघ, पी उत्तर आणि एल वॉर्ड कुर्ला येथे महिला बचत गटांच्या सदस्य यांनी यावेळी ‘….मी मतदान करणार’ अशी शपथ घेत मतदान करण्याचा संकल्प केला. आसपी नूतन शाळा, मारवे रोड, मालाड पश्चिम येथे 158 जोगेश्वरी पूर्व, एसआरपी रेसिडेन्सी, सिध्दी सहकारी संस्था, गौरी नगर गोराई, बोरीवली 177 वांद्रे (प.), सखी सहेली मेळावा, अंगणवाडी सेविका तसेच बचत गट, शताब्दी रुग्णालय गोवंडी येथे नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी जनजागृती आणि चर्चासत्र कार्यक्रम घेण्यात आला. तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील लहान मोठी दुकाने, स्वच्छता कर्मचारी आणि घरोघरी जाऊन मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभागी व्हावे यासाठी आवाहन केले.

आपले नावं मतदार यादीत आहे का

मतदान जनजागृती अभियानातून मतदारांना मतदानाचा हक्क बाजवता यावा यासाठी आपले नावं मतदार यादीत तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणी करण्यासाठी voters.eci.gov.in/ voter Helpline Mobile App वर आणि मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा, असे आवाहन देखील जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या वतीने यावेळी करण्यात आले.
०००

मंत्रालयीन अधिकारी – कर्मचारी यांना ‘कायझेन’चे प्रशिक्षण

मुंबई, दि. ५ ; कायझेन म्हणजे वैयक्तिक जीवनात आणि कार्यस्थळी चांगल्या प्रक्रियेसाठी सातत्याने सुधारणा करून लहान खर्चात मोठा बदल घडू शकतो. असे सांगून ही प्रक्रिया  निरंतर अंमलात आणल्यास  वेळ, कष्टाची बचत होऊन उत्साह निर्माण होत असल्याचे प्रतिपादन अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले.

मंत्रालयात अधिकारी – कर्मचारी यांना कायझेन इन्स्टिट्यूट मार्फत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

मध्यवर्ती टपाल केंद्र (C.R.U.) येथील टपालाचे व्यवस्थापन, ई ऑफिसच्या वापरास प्रोत्साहन देणे व जुन्या नस्त्यांचा अनुशेष निकाली काढणे यासाठी क्यूसीआय (QCI) मार्फत कायझेन इन्स्टिट्यूट (Kaizen Institute) या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी प्रशिक्षक हेमंत भांगे यांनी दिलखुलास संवाद साधत प्रशिक्षण दिले. यावेळी ते म्हणाले की, सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला असून सर्वांनी आपल्या वैयक्तिक जीवनात याचा उपयोग करावा. यामुळे  मोठा बदल नक्की घडून येईल असे त्यांनी सांगितले.

००००

मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांचे निर्देश

मुंबई, दि. ५ : “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मुंबई शहरातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. त्यासाठी विविध उपक्रम राबवावेत”, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांनी दिले.

भारत निवडणूक आयोग यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हा स्वीप समिती गठित करण्यात आली आहे. या समितीची बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी समितीच्या सदस्यांनी सदर निर्देश दिले.

या बैठकीत श्री. यादव म्हणाले की, “सर्व शासकीय विभागांनी एकत्र येऊन निवडणुकीत अधिकाधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करावे, विविध माध्यमांतून मतदान जनजागृतीपर विशेष मोहिम राबवावी. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्दिष्ट्यपूर्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. लोकसभा निवडणूकीसाठी जास्तीत – जास्त नवमतदार नोंदणी करुन लोकशाहीच्या या सर्वांत मोठ्या उत्सवामध्ये सहभागी करून घ्यावे. नागरिकांना मतदारयादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे, मतदारांनी मतदारयादीत आपले नाव तपासून घ्यावे आणि आपले नाव नसेल तर मतदारनोंदणीसाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर किंवा Voter Helpline Mobile App वर तसेच मतदार मदत क्रमांक १९५० यावर संपर्क करावा.

तसेच याबाबत काही अडचणी येत असतील, तर मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे मतदारांसाठी मतदार हेल्पलाइन क्रमांक ०२२-२०८२-२६९३ सुरू करण्यात आला आहे. मतदारांनी या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव केले.

श्री. यादव म्हणाले की, समितीच्या सदस्यांनी स्वतःसह कुटुंबियांनाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे. परिसरातील इतर नागरिकांनाही मतदान करण्याचे आवाहन करावे. तसेच मतदानाच्या दिवशी शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेत मतदारांनी आवर्जून मतदान करावे. यावेळी जिल्हाधिकारी श्री. संजय यादव यांनी स्वीप समितीच्या सदस्यांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत शपथ दिली.

या बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा प्रमुख समन्वय अधिकारी (स्वीप) फरोग मुकादम, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या बैठकीला पोलिस, सार्वजनिक बांधकाम विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठ, स्वयंसेवी संस्था, नशामुक्ती विभाग, समाजकल्याण व कामगार विभाग, राष्ट्रीय छात्र सेना, नेहरु युवा केंद्र व प्रसारमाध्यम कक्ष अशा विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

00000

मतदानाच्या जनजागृतीसाठी मुंबईत घाटकोपर येथे ‘रन फॉर वोट’

मुंबई दि. ५ – लोकसभा सार्वत्रिक निवडणुका अंतर्गत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघ अंतर्गत अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ‘रन फॉर वोट’ या मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

मुंबई उपनगर जिल्ह्याअंतर्गत चार लोकसभा मतदारसंघात २० मे रोजी मतदान होणार आहे. यामध्ये जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मुख्य निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांतर्गत स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी क्षेत्रीय अधिकारी यांना जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजनाबाबत प्रशिक्षण दिले आहे.  मुंबई- उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघांतर्गत मुंबई उपगनर जिल्ह्यातील १७०-घाटकोपर पूर्व या विधानसभा मतदारसंघातील युवकांची मतदानाबाबत जनजागृती करुन मतदानाचा टक्का वाढावा यासाठी आज मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

युवकांनी मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पुर्ण करावे. असे आवाहन अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी स्पर्धकांना केले.

प्रत्येक मत हे महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे निवडणूक आहे. यामध्ये प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. ही स्पर्धा म्हणजे मतदान जनजागृतीचा कार्यक्रम आहे. मोठ्या संख्येने या स्पर्धेत तरूण तसेच ज्येष्ट मतदारांनी सहभाग नोंदविल्याने या सर्वांचे अभिनंदन यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक श्री. पाटील यांनी केले.

या स्पर्धेदरम्यान पोस्टर आणि बॅनरवरील संदेशाद्वारे मतदानाबाबत जागृती करण्यात आली. ही स्पर्धा घाटकोपर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथून सुरु करण्यात आली होती आणि विक्रोळी येथे ईस्टन एक्सप्रेस हायवेवरील गोदरेज घोडा गेट येथे समाप्त करण्यात आली. मतदारांनी उत्फुस्र्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतला आणि मतदानाचे आपले कर्तव्य बजावण्याचा संकल्प केला. यामध्ये

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा  मतदार संघाचे ,निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दादाराव दातकर , उपायुक्त पुरूषोत्तम कराड यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

०००

मुद्रित माध्यमातील जाहिराती माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून पूर्व-प्रमाणित करण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश

मुंबई, दि ११: कोणताही राजकीय पक्ष, निवडणूक उमेदवार, इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांनी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या दिवशी राजकीय जाहिरात राज्य व जिल्हास्तरावरील माध्यम पूर्व प्रमाणिकरण समितीकडून (एम.सी.एम.सी.) प्रमाणित करुन घेणे बंधनकारक आहे. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करु नये, असे भारत निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत.

राज्यात लोकसभा निवडणूक 2024 पाच टप्प्यात होणार आहे. त्यानुषंगाने मतदानाच्या एक दिवस अगोदर आणि मतदान दिनी जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी त्या 48 तास  आधी एम.सी.एम.सी. कडून पूर्व-प्रमाणित करून घ्यावी, असे निर्देश आयोगाने दिले आहे.

०००

लोकसभा निवडणुकीसाठी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार

मुंबई, दि. 5 : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी 440 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.

ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे  असणार आहे. जळगावमध्ये 33, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये 30, मुंबई उपनगरमध्ये 26 महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील.

या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र असणार आहेत. सर्व महिला नियंत्रित मतदान केंद्रात कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही तसेच मतदान केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे स्पष्ट निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. महिला नियंत्रित मतदान केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून तहसील कार्यालय, पोलीस स्टेशननजीकच्या केंद्रांची तसेच ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्राची या विशेष प्रयोगाकरिता निवड करण्यात येणार आहे.

जिल्हानिहाय महिला नियंत्रित मतदान केंद्र : अहमदनगर 12, अकोला 6, अमरावती 8, औरंगाबाद 20, बीड 6, भंडारा 7, बुलढाणा 14, चंद्रपूर 6, धुळे 5, गोदिंया 4, हिंगोली 6, जालना 5, कोल्हापूर 10, लातूर 6, मुंबई शहर 10, नागपूर 12, नांदेड 20, नंदुरबार 4,  उस्मानाबाद 16, पालघर 6, परभणी 4, पुणे 21, रायगड 7, सांगली 8, सातारा 16, सोलापूर 22, वर्धा 8 आणि यवतमाळ 7 असे असणार आहेत.

००००

वर्षा आंधळे/विसंअ

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रभावी जनजागृती करावी – जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड(जिमाका)दि.5:- रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची तयारी सुरु आहे. संपूर्ण जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सर्व विभागांनी कृती आराखडा तयार करून त्याची समन्वयाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश  जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले.

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृश्यप्रणालीद्वारे घेण्यात आली. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी स्वीप भरत वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, तहसिलदार  उमाकांत कडनोर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया होय. या उत्सवात प्रत्येक मतदाराने आपला सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करावे. जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत मतदान केंद्रांची माहिती पोहोचवावी. तसेच मतदान केंद्रांवर वीज, पाणी, मंडप यासह सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व घटकांच्या  प्रबोधनासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले. मतदारांमध्ये जनजागृतीसाठी आवश्यक साहित्य पुरविण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी  श्री.जावळे यांनी सांगितले.

आदिवासी क्षेत्रासाठी विशेष मोहीम

रायगड जिल्ह्यातील आदिवासी, कातकरी समाजाचे मतदान वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी दिले. आदिवासी पाडे, वाड्या,वस्ती येथे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. जे रोजंदारी जाणारे मतदार आहेत त्यांच्या आस्थापनाशी संपर्क साधून भर पगारी सुट्टी देणे शक्य आहे का हे तपासावे. तसेच जेथे सुट्टी देणे शक्य नसेल त्या ठिकाणी दोन तासाची सवलत देण्याबाबत सूचना द्याव्यात. तसेच या मतदारांचे पहिल्या सत्रात मतदान घेण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी तसेच निवडणूक यंत्रणा यांनी दक्षता घ्यावी असे निर्देशही जिल्हाधिकारी यांनी दिले.

जिल्ह्यातील अनेक मतदार नोकरीं धंद्या बाहेरच्या जिल्ह्यात गेले आहेत. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत आहे. त्या सर्व मतदारांना मतदार चिट्ठीचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी दिले.

निवडणूक काळात सर्व अधिकारी कर्मचारी यांनी दक्ष राहून काळजीपूर्वक सर्व जबाबदाऱ्या पार पाडव्यात. निवडणूक कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी सर्व यंत्रणेला दिल्या आहेत.

0000000

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. ५ : मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत.

या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

०००

अंगणवाडी सेविकांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत – स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी

मुंबई, दि. ५ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढाविण्यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे. अंगणवाडी सेविकांनी समाजातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन स्वीपचे विशेष समन्वयक अधिकारी डॉ. सुभाष दळवी यांनी केले.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात चार लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 26 मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात अधिकाधिक मतदारांची नोंदणी वाढावी आणि मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रमांचे आणि प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून 159- दिंडोशी मतदारसंघातील नियुक्त क्षेत्रीय अधिकारी,  केंद्रस्तरीय अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका,  बचत गटातील महिला असे 700 पेक्षा अधिक कर्मचारी आणि अधिकारी  मतदार जागरूकता आणि सहभाग (स्वीप) कार्यक्रमात उपस्थित होते. विलेपार्ले येथील मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहात या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विशेष समन्वय अधिकारी डॉ. दळवी यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने अंगणवाडी सेविकांना निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

डॉ. दळवी म्हणाले की, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पेाहोचून आपण शिक्षण आणि आरोग्याचे काम करत आहात.  या क्षेत्रातील मतदारांच्या निवडणूक संदर्भात समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सकारात्मकरित्या काम करावे.

नव मतदारांनी २४ एप्रिलपर्यंत नाव नोंदवावे

एक अंगणवाडी सेविका किमान २०० कुटुंबापर्यंत पाहोचते. तरुणांचा सहभाग वाढावा यासाठी नवमतदारांना संकेतस्थळावर अथवा वोटर हेल्प लाईन मोबाईल ॲपच्या साहाय्याने २४ एप्रिल पर्यंत नाव नोंदविण्यास मदत करावी. अपंग अथवा ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या सुविधांची माहिती देणे. आपल्याला ज्या नागरी सुविधा हव्या आहेत त्यासाठी आपण आपला राष्ट्रीय हक्क बजावणे गरजेचे असून, कुणाच्याही मतप्रवाहात किंवा भावनांना बळी पडून विचार करु नये.  मतदार तसेच आशा वर्कर, स्वच्छता कर्मचारी, अभिनेते, पोलीस शिपाई यांच्या सहाय्याने मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करावेत, असेही डॉ. दळवी यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी विजयकुमार चौबे, निवडणूक नायब तहसीलदार स्मृती पुसदकर, ‘स्वीप’च्या अधिकारी संगीता शेळके, भास्कर तायडे आदी  उपस्थित होते.

०००

ताज्या बातम्या

विभागांनी अनुकंपा नियुक्तीची कारवाई कालमर्यादेत करावी – पालकमंत्री संजय राठोड

0
भरतीच्या अनुषंगाने नियुक्ती प्राधिकाऱ्यांची बैठक यवतमाळ, दि.23 (जिमाका) : राज्य शासनाने 150 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांतर्गत अनुकंपा नियुक्तीची कालमर्यादा निश्चित करून दिली आहे. विभागांनी या मर्यादेत...

धुळे जिल्ह्याच्या शाश्वत विकासासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा : पालकमंत्री जयकुमार रावल

0
धुळे, दि. 23 जुलै (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करून दळणवळणाच्या सुविधांमार्फत जिल्ह्याचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास करण्यासाठी रस्ते, पुल, नवीन शासकीय...

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष : जनतेच्या आरोग्यासाठी समर्पित योजना गरजूंना दिलासा देणारे कार्य

0
मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना आणि मार्गदर्शनातून तसेच मंत्रालयातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक...

मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सर्वसामान्यांचा आधार (भाग-३)

0
मा. मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबधीत रुग्णालय मार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत...

उमेदवारांनी रोजगार स्वयंरोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा – मंत्री प्रा. डॅा. अशोक उईके

0
Ø जाजू महाविद्यालयात रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्ती प्रतिसाद Ø मंत्र्यांच्याहस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्राचे वितरण यवतमाळ, दि.23 (जिमाका) : युवकांच्या हाताला काम देणे शासनाचे प्राधान्याचे धोरण आहे. त्यामुळेच रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून...