गुरूवार, जुलै 24, 2025
Home Blog Page 826

‘चुनाव का पर्व देश का गर्व’ लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकर यांचे आवाहन

मुंबई दि. ‌8 : लोकशाहीच्या उत्सवात म्हणजेच निवडणुकीत  मतदारांचा सहभाग वाढावा यासाठी प्रत्येक मतदान केंद्र मतदारांच्या स्वागताच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक नागरिकाने लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली राष्ट्रीय जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत राज्यात 5 टप्प्यात मतदान होत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी मतदान होणार असून, या  चार मतदारसंघात 73 लाख 28 हजार 865 मतदार आहेत.

मतदारांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावे यासाठी सचिन तेंडुलकर यानी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आवाहन केले आहे.

‘चुनाव का पर्व देश का गर्व’ म्हणत सचिन तेंडुलकर याने सांगितले आहे की, प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा, प्रतीक्षा कक्ष, शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग  आणि 80 वर्षांवरील मतदारांसाठी व्हील चेअर, मदतनीस आणि रॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना सुलभरित्या मतदान करता यावे यासाठी सर्वतोपरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंद असल्याची खात्री करावी. नवमतदार 24 एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करू शकतात. यासाठी voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या अथवा वोटर हेल्प लाईन, मोबाईल हेल्प लाईनचा वापर करावा.

मुंबई उपनगर क्षेत्रात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चारही मतदार संघात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे विशेष समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी विविध उपक्रम राबवित आहेत.

0000

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई

मुंबई, दि. 8 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.

मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.

0000

नांदेड लोकसभा संदर्भिकेचे जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते प्रकाशन

नांदेड दि. 8 एप्रिल :- १६-नांदेड लोकसभा निवडणूक २०२४ ची परिपूर्ण माहिती असलेली लोकसभा संदर्भिका नांदेडचे आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हा निवडणूक विभागासाठी जिल्हा माहिती कार्यालयामार्फत ही निर्मिती करण्यात आली. लोकसभा संदर्भिका नांदेडच्‍या माध्‍यमातून 1951 ते 2019 पर्यतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल तसेच लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अनुषंगिक संपर्काची माहिती माध्‍यमांना मिळणार आहे. या संदर्भिकेचे प्रकाशन आज जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या नियोजन भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्‍यात आली होती.
यावेळी संदर्भिका नांदेडचे प्रकाशन त्‍यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी महेश वडदकर, जिल्‍हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्‍हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, विविध माध्‍यमाचे प्रतिनिधी आदीची उपस्थिती होती.
नांदेड सं‍दर्भिकेत मतदार संघ नकाशा, निवडणूक आचारसंहितेत काय करावे याबाबतची पूर्ण माहिती, प्रमुख माध्‍यम प्रमाणिकरण व सनियंत्रण, माध्‍यम कक्ष, नांदेड, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र, (व्‍हीव्‍हीपॅट) भारत निवडणूक आयोग संपर्क, प्रमुख संपर्क अधिकारी, विविध कक्ष प्रमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी , नांदेड जिल्‍ह्यातील मतदार संख्‍या, विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्र व अंतर्गत तहसिल व महसुली क्षेत्र, 1951 ते 2019 पर्यंतचे नांदेड लोकसभा निवडणूक निकाल, महाराष्‍ट्र राज्‍य निवडणूक कार्यक्रम, नांदेड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024, नांदेड मिडीया सेंटर, तक्रार निवारण केंद्र याबाबतची माहिती या संदर्भिकेच्‍या माध्‍यमातून मिळणार आहे. नांदेड लोकसभा क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक तसेच निवडणुकीतील जबाबदाऱ्यासोबत होणाऱ्या अधिकाऱ्यांचे कक्ष व त्यांचे क्रमांक याची यादी देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
०००

मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे – आशिमा मित्तल

नाशिक, दि. ८ (जिमाका):  मतदान करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असून हे राष्ट्रीय कर्तव्य सर्वांनी पार पाडावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीप (SVEEP) च्या मुख्य नोडल अधिकारी आशिमा मित्तल यांनी आज केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमिवर निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वीप अंतर्गत शहरी व ग्रामीण भागात विविध कार्यक्रमांचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने शहरातील होरायझन अकॅडमीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अशोक करंजकर, पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वर्षा फडोल यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी तथा होरायझन अकादमीचे शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून लोकशाहीच्या महाउत्सवात सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती करण्यात आली. प्रत्येकाने आपल्याला दिलेल्या या अधिकाराचा वापर करावा व दि. 20 मे रोजी मतदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमादरम्यानअकादमीच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीचे कार्यक्रम सादर करून मानवी साखळीद्वारे मतदानाचा संदेश दिला. तसेच, विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी या रॅलीचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

०००

गुढीपाडव्यानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून शुभेच्छा

मुंबई, दि. ८ : राज्यपाल रमेश बैस यांनी गुढीपाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत.

देशाच्या विविध भागात हा सण चैत्र शुक्लादी, युगादि, संसर पाडवो आणि चेटी चंड  म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो, या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल श्री. बैस यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

समाजमाध्यमांवरील उथळ मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज –  प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

नागपूर, दि. ८: भारतीय संस्कृतीचा विचार एका भक्कम पायावर उभा आहे. आजच्या माहिती युगात विविध ॲप्स व संकेतस्थळाशी निगडीत समाजमाध्यमांवरील वेगवेगळ्या मतांतरांच्या गर्दीत माहितीच्या विश्वासार्हतेला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केले.

येथील विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या वतीने आयोजित कारवा या तीन दिवसीय उत्सवाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक प्रा. पी.एम. पडोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘बाईटसची लढाई : माहिती युद्धात भारताची भूमिका’  या विषयावर त्यांनी ओघवत्या भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

प्रधान सचिव श्री. सिंह म्हणाले की, माहितीच्या जालात प्रत्येक माहिती ही खरी असेलच हे सांगता येत नाही. अनेक चांगल्या गोष्टींबद्दल समाजमाध्यमांवर गैरसमज पसरविले जातात. क्युआर कोडच्या माध्यमातून आर्थिक व्यवहाराची किमया भारताने करुन दाखवली जी अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत देशाला शक्य झाली नाही. भारताने मोठ्या लोकसंख्येचा देशात ‘आधार’सारखी विश्वासार्ह व पूर्ण सुरक्षित प्रणाली निर्माण केली आहे.

लोकशाहीत प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे. परंतु, अभिव्यक्तीच्या नावाखाली जर मतमतांतरे चुकीच्या माहितीवर आधारित असतील किंवा ती जाणीवपूर्वक कुणाची फसवणूक करणारी असतील तर त्याला कायद्याच्या चौकटीत अटकाव असण्याची गरज आहे. आपल्या शेजारील देशांमध्ये व इतरही देशांमध्ये समाजमाध्यमांवर उथळ व्यक्त होण्यावर शिस्तीचा बडगा उगारतात. तेथील कायदे याबाबतीत खूप कडक आहेत. जपान, जर्मन, फ्रान्ससारख्या देशात तेथील नागरिक अभिमानाने आपली मातृभाषा जवळ करतात. त्या भाषेला प्राधान्य देतात. गोपनीयतेचा सन्मान करतात. भारतातही आपण समाजमाध्यमांवर अभिव्यक्त होताना कायद्याला अभिप्रेत असलेली इतरांप्रतीची सभ्यता बाळगली जाणे आवश्यक आहे, असे श्री. सिंह यांनी नमूद केले.

आज भारतातील एक मोठा घटक समाजमाध्यमांशी जुळलेला आहे. यात चुकीची माहिती पसरविणारा सिंथेटिक मीडिया त्याच्या पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. युद्धाच्या काळात जाणीवपूर्वक चुकीच्या संदेशाचा रणनीतीसारखा केला जाणारा वापर आपल्याला नवा नाही. यापेक्षा परस्परांची विश्वासार्हता सत्याच्या आधारे वाढविणे याबद्दल सर्वांनी जागरूक असले पाहिजे.  पारंपरिक मुल्यातून समृद्ध झालेली ‘वसुधैव कुटुंबकम’ ही शिकवण आपण सर्वांनी जपली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी बोलताना नमूद केले.

०००

निवडणूक आणि प्रचार : राजकीय पक्षांनी घ्यावयाची खबरदारी

या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.

जीवन जगत असताना ज्याप्रमाणे आपल्या आयुष्याला आपण काही नियम घालून दिलेले असतात. त्यामुळे आपले स्वतःचे आयुष्य हे सुखकर होत असते. त्याप्रमाणेच निवडणूक लढवितांनाही भारतीय निवडणूक आयोगाने काही बंधने नियम घालून दिलेले आहेत त्याचे पालन आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि निवडणूक लढवितांना दोन्ही वेळेस केल्यास फायदाच होतो .

सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वातावरण असल्याने राजकीय पक्षांनी घ्यावयाची काळजी हे महत्त्वाचे आहे. कारण, यावेळी ऐकणारा वर्ग /प्रेक्षक/ नागरिक हा मोठा असतो. त्यामुळे त्याचे पडसाद समाजात सकारात्मक तसेच नकारात्मक ही होऊ शकतात. म्हणून निवडणूक प्रचार प्रसाराच्या वेळेस राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे. कारण, हेच निवडून आलेले लोकप्रतिनिधी भारतीय संसदेत बसून कायद्याचे राज्य चालवितात त्यावेळी त्यांना सर्वसमावेशक विचार करावा लागतो. तीच भावना त्यांनी निवडणुकीच्या काळात पक्षाचे ध्येय धोरणे मांडताना तसेच मतदारसंघातील मुद्दे मांडताना विचारपूर्वक ठेवावी.

निवडणुकीचा प्रचार-प्रसार करताना जातीपाती वरून कुठलेही आक्षेपार्य भाषण देता येत नाही. तसेच जातीचा उल्लेख करणे राजकीय पक्षांनी टाळायला हवे. कुठली एक जात श्रेष्ठ आणि कुठली एक जात निम्न असे न बोलता पक्षाचे ध्येय धोरणे अथवा भविष्यात जनतेला आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधा बद्दल बोलणे जास्त सुसंगत असते.

ज्याप्रमाणे जातीपातीवर बोलणे टाळले पाहिजे त्याप्रमाणेच धर्म द्वेष न करता एखाद्या धर्माला विशेष महत्त्व न देता आपल्या संविधानामध्ये जो सर्वधर्म समभावाचा संदेश आहे तो जोपासणे आणि त्या परीने आपल्या राजकीय पक्षांचा अथवा उमेदवारांनी स्वतःचा प्रचार प्रसार करणे अपेक्षित आहे.

भारतीय घटनेच्या उद्देशिकेत सामाजिक सलोखा पाळणे असे उल्लेखित असून सामाजिक सलोखा असल्यास समाजाची प्रगतीच होते अधोगती होत नाही याचे भान निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांनी  ठेवल्यास निवडणूक चा हा काळ सर्वांसाठी सूसह्यय आणि प्रबोधनाचा ठरेल.

 निवडणुकीत उभे राहणारे उमेदवार हे प्रभावी व्यक्तिमत्व असतात. त्यामुळे त्यांचे असंख्य फॉलोवर्स अनुयायी असतात. जे  त्यांच्या व्यक्तिमत्त्वामधून बऱ्याच गोष्टी शिकून स्वतःच्या आयुष्यात त्याप्रमाणे वागतात. निवडणुकीत उभे असणाऱ्या उमेदवाराने कायदा व सुव्यवस्था पालन करून त्याप्रमाणे प्रचार प्रसार केला तर आपसूकच त्यांचे फॉलोवर्स अनुयायी देखील त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था पालन करतील. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे हे प्रत्येक उमेदवाराचे कर्तव्य आहे.

आताचा काळ  हा सामाजिक माध्यमाचा काळ आहे. माध्यमांवर लाखो फॉलोवर्स असतात जे आपल्या नेत्याला उमेदवाराला फॉलो करतात या समाज माध्यमांवर एक संदेश खूप मोठी हानी करू शकतो त्याप्रमाणे प्रबोधनही करू शकतो. त्यामुळे सामाजिक माध्यमाचा वापर करताना तो काळजीपूर्वक विशेषतः निवडणुकीच्या काळात अधिक जागरूकपणे करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्याचे कुठलेही  वाईट पडसाद उमटणार नाहीत.

निवडणुकीचा काळाचे  वातावरण भारावलेले असते त्यामुळे शब्दच्छलाने शब्द भेद तयार होऊन एखादा वाद विकोपाला जाण्याचे नाकारता येत नाही अशावेळी कार्यकर्ता प्रवक्त्यांमध्ये स्पष्टता हवी.

अंततः सर्वात महत्त्वाचे म्हणजे निवडणूक ही कोणासाठी आहे निवडणुकीच्या मागचा उद्देश काय आहे मतदान कशासाठी करायला हवे मतदार कोण आहे कारण संपूर्ण निवडणूक ही भारताचे नागरिक म्हणजेच मतदार ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत असे नागरिक या सर्व प्रक्रियेचा महत्त्वाचा हिस्सा आहेत.  त्यामुळे मतदान का करावे यासंदर्भात जागृतीची प्रयत्न राजकीय पक्षांकडून उमेदवारांकडून होणे गरजेचे आहे. मतदार जागृती उपक्रम अधिकाधिक केल्यास मतदानाचा टक्का वाढेल आणि एका चांगल्या लोकशाहीला ते पोषक असे ठरेल त्यामुळे या सर्व निवडणूक प्रक्रियेत राजकीय पक्षाची भूमिका ही महत्त्वाची असून मतदार जागृती त्यांच्यावतीने अधिकाधिक व्हावी असे अपेक्षित आहे.

 00000

अंजु कांबळे निमसरकर,

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय बीड

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

मुंबई दि. ७ : येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ मतदान केंद्राचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात दिव्यांगांसाठी मतदान केंद्रे असावीत यावर भर दिला असून ‘दिव्यांग नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३० मतदान केंद्रांचे नियंत्रण दिव्यांग कर्मचारी करणार आहेत. जळगावमध्ये २२, पुण्यामध्ये २१, ठाण्यामध्ये १८ आणि नाशिकमध्ये १५ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. अकोला, कोल्हापूर, लातूर, पालघर, परभणी, रायगड या ६ जिल्ह्यांत प्रत्येकी १ दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र असणार आहे. गडचिरोली, सिंधुदुर्ग आणि वाशिम या जिल्ह्यात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्र नसेल.

या वर्षी मतदार यादीमध्ये एकूण ६,०४,१४५ इतके दिव्यांग मतदार चिन्हांकित आहेत. त्यापैकी ज्या मतदारांच्या दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्केपेक्षा जास्त असेल अशा मतदारांपैकी इच्छुक मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे गृह मतदानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

दिव्यांग मतदारांसाठी (PwDs)सक्षम’ॲप

भारत निवडणूक आयोगाने या वर्षी दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढावा या हेतूने ‘सक्षम’ हे ॲप उपलब्ध करुन दिलेले आहे. त्या माध्यमातुन तसेच विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कालावधीत दिव्यांगांसाठी विशेष शिबिरे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांची नोंदणी करुन घेण्यात आली आहे. आजमितीस ६,०४,१४५ इतक्या मतदारांची नावे त्यांच्या मागणीनुसार दिव्यांग मतदार म्हणून चिन्हांकित करण्यात आली आहेत.

0000

वर्षा फडके-आंधळे,

वरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तिकेचे प्रकाशन

सोलापूर, दिनांक 7(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तयारीला लागलेले असून त्याच अनुषंगाने माध्यम कक्षामार्फत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाची सन 1980 ते 2019 पर्यंतची संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. या पुस्तिकेचे प्रकाशन विभागीय  आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते नियोजन भवन येथील सभागृहात झाले.

यावेळी जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, जिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे निवडला  जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांच्यासह अन्य सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार व जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघ संदर्भ पुस्तके चे कौतुक करून ही पुस्तिका सर्व प्रसार माध्यमे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे या पुस्तिकेमध्ये लोकसभा निवडणूक सन 1980 ते 2019 पर्यंतच्या सोलापूर जिल्ह्यातील दोन्हीही लोकसभा मतदार संघात उमेदवारांना मिळालेल्या मतांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणेच सर्व निवडणूक संबंधी काम करणाऱ्या शासकीय यंत्रणेला तसेच उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना यातील निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक तसेच निवडणुक संबंधी स्थापन करण्यात आलेल्या संबंधित कक्षाचे सर्व नोडल अधिकारी यांचे संपर्क क्रमांक ही यामध्ये देण्यात आलेले असल्याने ही पुस्तिका सर्वांसाठी उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले.

संदर्भ पुस्तिका :

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुका कार्यक्रमानुसार सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणारा असून दिनांक 4 जून 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माध्यम कक्षाच्या वतीने सन 1980 ते 2019 पर्यंत ची उमेदवारांच्या मतांच्या आकडेवारी सह अन्य निवडणूक संबंधी माहिती देण्यात आलेली आहे ती पुढील प्रमाणे.

यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम 2024 सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक, सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक 0217-2731040 लोकसभा निवडणूक 2024 साठी नियुक्त नोडल अधिकारी यांची यादी, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची यादी, निवडणूक आदर्श आचारसंहिता मार्गदर्शक तत्वे, राजकीय पक्ष उमेदवार यांच्या मार्गदर्शनासाठी आदर्श आचारसंहिता, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्वे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पेड न्यूज, सोशल मीडिया सह राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रामाणिकरण, सोशल मीडियासह इंटरनेटवरील मजकुराशी संबंधित आदर्श आचारसंहिता, मतदानासाठी ग्राह्य असलेली ओळखपत्रे, निवडणूक विषयक वेबसाईट व मोबाईल ॲप्लिकेशन्स आदीची माहिती देण्यात आलेली आहे.

********

औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक प्रशिक्षणाचा दुसरा दिवस

छत्रपती संभाजीनगर, दि.७(जिमाका):- निवडणूक कामकाज हे काही फार वेगळे काम नाही. या कामात सजगता अत्यंत महत्त्वाची आहे. हे काम करतांना नेहमी सकारात्मकता आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज १०८ औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात केले. वंदेमातरम सभागृहात हे प्रशिक्षण पार पडले.

लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने १०८ औरंगाबाद पश्चित, १०४ सिल्लोड व १०५ कन्नड, १११- गंगापूर व ११२ वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय प्रशिक्षण सत्राचा आजचा दुसरा दिवस होता.

जिल्हाधिकारी  दिलीप स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना खेतमाळीस, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी कन्नड संतोष गोरड, उपजिल्हाधिकारी भुसंपादन डॉ. सुचिता शिंदे, उपविभागीय अधिकारी वैजापूर डॉ. अरुण जऱ्हाड, कन्नड तहसिलदार विद्याचरण कडवकर, तहसिलदार सतिष सोनी,  स्वरुप कंकाळ, नायब तहसिलदार  प्रशांत काळे तसेच साधन व्यक्तिंनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, ज्या लोकशाहीमुळे आज आपणा सर्वांना पद, मान, सन्मान, चरितार्थाचे साधन, अशा सर्व गोष्टी मिळतायेत त्या लोकशाहीची सेवा करण्याची संधी या निवडणूक कामकाजाच्या निमित्ताने आपल्याला मिळते आहे. हे काम सकारात्मक दृष्टीकोन ठेवून करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतदान यंत्र, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणी बाबत प्रशिक्षण देण्यात आले.

०००००

ताज्या बातम्या

बिहारमधील मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

0
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात 24 जून 2025 पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण (Special Intensive Revision -...

राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

0
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता व पारदर्शकता मिळावी, तसेच आवश्यक मार्गदर्शन मिळावे यासाठी  ‘विद्यार्थी सहाय्यता...

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात लोकांमध्ये प्रभवीपणे पोहचवावा –...

0
सातारा दि.२३  : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा एकात्म मानव दर्शन कार्यक्रम जिल्ह्यात प्रभवीपणे पोहचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सर्व जिल्हास्तरीय समित्यांनी समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासाचा...

उद्योगांच्या गरजा लक्षात घेऊन आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरु करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात...

0
सातारा दि.२३ : राज्यातील उद्योगांना आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) उद्योग आधारीत पुरक असे नवनवीन कोर्सेस उपलब्ध करुन...

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना गतवैभव प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

0
सातारा दि. २३ : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्राचार्य यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असून तुमचे प्रश्न तातडीने मार्गी लावले जातील, अशी ग्वाही...