शुक्रवार, जुलै 25, 2025
Home Blog Page 825

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. १२ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात गृह तथा सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी बृहन्मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, मंत्रालय सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त प्रशांत परदेशी, कर्मचारी संघटनेचे भारत वानखेडे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ

स्थलांतरित, असंघटित कामगारांना शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम

मुंबई, दि. १२ : सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेमधील दि. १९ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्यातील जास्तीत जास्त स्थलांतरित किंवा असंघटित कामगारांना शिधापत्रिकांचे वितरण करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ही विशेष मोहीम एप्रिल ते मे २०२४ या दोन महिन्यांच्या कालावधीत राबविली जात आहे.

या प्रक्रियेमध्ये प्रचलित नियमानुसार पडताळणी किंवा तपासणी करून स्थलांतरित व असंघटित कामगारांना उचित शिधापत्रिका वितरित करुन शिधापत्रिकेवरील अनुज्ञेय लाभ तत्काळ देण्यात यावेत, अशा सूचना क्षेत्रीय यंत्रणेस देण्यात आलेल्या आहेत.

ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात येत असल्याने जास्तीत जास्त स्थलांतरित व असंघटित कामगारांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण  विभागाने केले आहे.

०००

पवन राठोड/स.सं

 ‘दिलखुलास’ कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची मुलाखत

मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘लोकसभा निवडणूक २०२४’ या विषयी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची शनिवार दि.१३ एप्रिल आणि सोमवार दि. १५ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने यांनी ही मुलाखत घेतली आहे.

आदर्श आचारसंहिता, निवडणुकीचे कामकाज सुरळित करण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली सर्व कार्यवाही, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था   कार्यवाही, मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर माहिती श्री.स्वामी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून  दिली आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ

महाराष्ट्रासाठी २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्यांची तरतूद

मुंबई, दि. १२ : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या लागणार आहेत. या शाईचे वाटप जिल्हानिहाय करण्यात आले आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांमध्ये ९८ हजार ११४ मतदान केंद्र आहेत. प्रत्येक मतदार केंद्रासाठी प्रत्येकी २ शाईच्या बाटल्या याप्रमाणे १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांची संख्या होते. याशिवाय १ लाख ९६ हजार २२८ शाईच्या बाटल्यांबरोबरच १० टक्के अधिक अशा एकूण २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्या त्याचबरोबर मतदानासाठी आवश्यक ते साहित्य येत्या काही दिवसात पोहोच करण्यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न सुरु आहेत.

या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांकरिता राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये ९ कोटी २४ लाख ९१ हजार ८०६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत सुमारे २ लाख १५ हजार ८५० शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंटस् कंपनीमार्फत बनवली जाते.

मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य घटक बनली आहे.

मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर न पुसली जाणारी शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो. मतदानापूर्वी मतदान केंद्राध्यक्ष (पोलींग ऑफीसर) मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे की नाही याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र असल्याचे मतदान अधिकारी सांगू शकतात. जर एखाद्या मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर त्या व्यक्तीच्या डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.

०००

वर्षा फडके- आंधळे

चंद्रपूरात निवडणुकीची टक्केवारी वाढविण्यासाठी औद्योगिक आस्थापनांची बैठक

चंद्रपूर, दि. १२: चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्योगांचे जाळे पसरले असल्यामुळे येथे कामगारांची संख्या खूप मोठी आहे. मतदानाच्या दिवशी म्हणजे 19 एप्रिल रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून औद्योगिक आस्थापनांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

नियोजन भवन येथे आयोजित बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) श्याम वाखर्डे, शिक्षणाधिकारी (माध्य.) निकिता ठाकरे तसेच औद्योगिक क्षेत्रातील विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

औद्योगिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर एक स्वीप नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तसेच 13 – चंद्रपूर लोकसभा क्षेत्रांतर्गत गत निवडणूकीमध्ये ज्या मतदान केंद्रावर 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते, अशा मतदान केंद्र परिसरातील मतदारांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी वेगवेगळ्या थीम ठेवून त्यावर आधारीत मतदान केंद्र करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी औद्योगिक संस्थेस मतदान केंद्र निश्चित करून देण्यात आले.

मतदानाच्या दिवशी मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागते. हे लक्षात घेता, या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत दिली जाणार आहे.

०००

 

गृह मतदानाबाबत दिव्यांग व वृद्ध मतदारांना आनंद

चंद्रपूर, दि. १२: ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता जिल्हा निवडणूक यंत्रणा, 85 वर्षांवरील आणि दिव्यांग मतदारांचे मतदान नोंदविण्यासाठी घरोघरी जात आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे गृहमतदान करणाऱ्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी या प्रक्रियेबाबत आनंद व्यक्त केला आहे.

‘मी पूर्णपणे दिव्यांग आहे, स्वत:च्या पायावर किंवा कशाचाही आधाराने उभी राहू शकत नाही, त्यामुळे मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हते, आज प्रशासनाने घरी येऊन मत नोंदविले, याचा अतिशय आनंद आहे’ अशा भावना व्यक्त केल्या महाराष्ट्र – तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराजगुडा येथील सुरेखा तुकाराम राठोड (वय 40) या दिव्यांग महिलेने.

‘मतदानासाठी लोक घरी आले, आम्ही म्हटलं, बापू मतदानासाठी आम्हाले मतदान केंद्रावर जाता येत नाही, त्यांनी घरी येऊन आमच्या दोघांचे मत घेतलं, आम्हाला आनंद झाला’, असे मत व्यक्त केले नारपठार (विजयगुडा) येथील संग्राम कोरपल्लीवार (वय 89) आणि मुद्रीकाबाई संग्राम कोरपल्लीवार (85) या वयोवृद्ध जोडप्याने. तर खांडरे ले-आऊट, शिवछत्रपती नगर, चंद्रपूर येथील रहिवासी अनंत देविदास कावळे आजोबा म्हणाले, ‘माझे वय 90 च्या वर असून आज घरून मतदान केलं, याचा अतिशय आनंद झाला’.

होय, सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल पासून गृह मतदानाला सुरूवात झाली. आतापर्यंत चार दिवसात एकूण 1185 मतदारांनी गृह मतदानाद्वारे आपले मत नोंदविले असून यात 1025 मतदार 85 वर्षांवरील तर 160 मतदार दिव्यांग आहेत.

तालुकानिहाय गृहमतदानाची संख्या : राजुरा विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले 310 मतदार आणि दिव्यांग 21 असे एकूण 331 मतदारांनी गृहमतदानातून मत नोंदविले आहे. चंद्रपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 167, दिव्यांग 15 असे एकूण 182 मतदार, बल्लारपूर मतदारसंघात 85 वर्षांवरील 186, दिव्यांग 56 असे एकूण 242 मतदार, वरोरा मतदारसंघात 85 वर्षांवरील 200, दिव्यांग 39 असे एकूण 239 मतदार, वणी मतदारसंघात 85 वर्षांवरील 89, दिव्यांग 17 असे एकूण 106 मतदार तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 85 वर्षांवरील 73, दिव्यांग 12 असे एकूण 85 मतदारांनी गृह मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

मतदानाची गोपनीयता : गृह मतदान करतांना मतदान प्रक्रियेची गोपनीयता पाळण्याच्या सुचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. त्यानुसार फॉर्म 13 – ए (डिक्लरेशन), फॉर्म 13 – बी (कव्हर ए लिफाफा), फॉर्म 13 – सी (कव्हर बी लिफाफा) आणि फॉर्म 13 – डी (मतदान कसे करायचे याबाबत सुचना) आदी प्रक्रियेबाबत अधिकारी व कर्मचा-यांनी सुरवातीला मतदारांना माहिती दिली. यावेळी घरामध्ये स्थापन केलेल्या मतदान कक्षामध्ये सदर मतदारांनी आपले मत नोंदविले. यावेळी मतदान करतांना कोणताही दुसरा व्यक्ती त्यांच्याजवळपास नव्हता. मतपत्रिका घडी केल्यानंतर सदर मतपत्रिका छोट्या लिफाफ्यामध्ये आणि नंतर मोठ्या लिफाफ्यामध्ये टाकून मतपेटीत जमा करण्यात आली.

०००

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान यंत्र तयार करण्याची प्रक्रिया

चंद्रपूर, दि. १२ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी केवळ एक आठवडा शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन अहोरात्र राबत आहे. याच अनुषंगाने मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया सर्व विधानसभा मतदारसंघात सुरू आहे. चंद्रपूर मतदारसंघातील 383 मतदान केंद्रासाठी मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालय येथे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या उपस्थितीत पार पडली. दोन दिवसांत संपूर्ण मशीन सज्ज करून चंद्रपूर येथे 19 हजार मतांचे मॉक पोलसुध्दा करण्यात आले.

13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मशीन तयार करण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयात 11 आणि 12 एप्रिल रोजी घेण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 383 मतदान केंद्र आहेत. यासाठी 478 बॅलेट युनीट, 478 कंट्रोल युनीट आणि 517 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. मशीन तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे एकूण 30 टेबल लावण्यात आले होते. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी याप्रमाणे एकूण 90 कर्मचा-यांमार्फत ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसह मशीन सज्ज करण्यात आली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 383 मतदान केंद्रासाठी असलेल्या ईव्हीएमपैकी 5 टक्के म्हणजे 19 मशीन मॉक पोलकरीता रॅन्डम पद्धतीने निवडण्यात आले. प्रत्येक मशीनवर 1000 याप्रमाणे दोन दिवसांत 19 मशीनवर 19 हजार मॉक पोल घेण्यात आले.

अशी असते प्रक्रिया : ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया ही उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींसमोर केली जाते. यात मतपत्रिका बॅलेट युनीटला लावून सील करणे, प्रत्येक उमेदवाराला मतदान करून बघणे (मॉक पोल), मतदान झाल्यानंतर व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या आणि ईव्हीएमचा डाटा जुळवून बघणे. त्यानंतर कंट्रोल युनीट, बॅलेट युनीट आणि व्हीव्हीपॅट सील करून स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात येते. प्रत्यक्ष मतदानाच्या एक दिवस अगोदर मतदान पथकाला मशीनचे वाटप केले जाते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या समक्ष प्रक्रिया : जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी स्वत: समोर मशीन तयार करण्याची प्रकिया करून घेतली. मशीनला व्यवस्थित सिलींग करणे जेणेकरून मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. तसेच मॉक पोल होतांना व्हीव्हीपॅट काम करते की नाही, याची काटेकोरपणे तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी रंजित यादव, सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.

०००

 

रायगडमधील आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील -जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड(जिमाका)दि.12:- आदिवासी गावामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात आदिवासी समाजाच्या बोली भाषेतील पथ नाट्याद्वारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते सिद्धेश्वर बु.येथे  मतदार जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे बोलत होते.

एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प पेण, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या सहकार्याने आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात हा पथदर्शी उपक्रम राबविला जात आहे. आदिवासी समाजाची युवक आणि प्राथमिक शिक्षक हे पथनाट्य सादर करीत आहेत. याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक सिद्धेश्वर बु. येथे आयोजित या कार्यक्रमासाठी निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे, तहसिलदार उत्तम कुंभार आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले, आदिवासी वाड्या वस्त्या, गावे येथील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र मतदार दूत नेमण्यात येणार आहे. या दुतामार्फत गावातील प्रत्येक मतदाराला मतदानासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी सर्वांना भरपगारी सुट्टी देण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी यावेळी केले.

आदिवासी बहुल गावामधील मतदार काम व नोकरीसाठी कुठल्या आस्थापनांमध्ये  जात असतील तरी तेथे सुट्टी देण्याबाबत निर्देश देण्यात येत आहेत. सर्व आदिवासी मतदारांना भर पगारी सुट्टी किंवा सवलत देण्याबाबत कळविण्यात येईल असे जिल्हाधिकारी श्री. जावळे यांनी सांगितले.

या पथनाट्याचे लेखन/दिग्दर्शक श्री.राजू लहू बांगारे यांनी केले आहे. तसेच गीतकार दामोदर शिद, वादक सतिश खाणेकर आहेत. या पथनाट्यात राजू बांगारे, दामोदर शिद, ज्ञानेश्वर शिद, गणपत पारधी, साई बांगारे, श्रेयश वारगुडे, वेदांत शिंदे यांनी सहभाग घेतला.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक श्रीमती अहिरराव यांनी केले. जिल्ह्यातील 11 तालुक्यातील वाडया, वस्ती, गावामध्ये पथनाट्य आयोजन करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. मतदानाच्या जनजागृतीसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नाबद्दल त्यांनी माहिती दिली.

00000

 

धुळे लोकसभा मतदारसंघ पूर्वपीठिकेचे जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन

धुळे, दिनांक 12 एप्रिल, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी 18 वी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 02-धुळे लोकसभा मतदारसंघाची पूर्वपीठिका तयार केली आहे. या पूर्वपीठिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते आज संपन्न झाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन समारंभास निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे,जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, तहसिलदार पंकज पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने घोषित केला असून निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीस सुरवात झाली आहे. या निवडणूक प्रक्रियेत शासनाचा प्रत्येक विभाग सहभागी होत असून लोकसभा निवडणूक हे एक टीम वर्क आहे. यात जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांचाही सहभाग महत्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे यांनी 02-धुळे लोकसभा मतदारसंघाची पूर्वपिठिका प्रकाशित केली आहे. हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असा आहे. लोकसभा निवडणूक निष्पक्षरित्या पार पाडण्यात माध्यमांची भूमिका मोलाची आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी पारंपारिक प्रचाराबरोबरच सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला आहे. अशा परिस्थितीत निवडणूकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रिंट, इलेक्ट्रॉनिक तसेच सोशल मिडीया यासारख्या माध्यमांना तसेच राजकीय विश्लेषकांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरेल.

जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचे वार्तांकन करतांना माध्यमांना मागील निवडणुकीचे संदर्भ वेळोवेळी लागतात. या पूर्वपीठिकेत विविध स्वरुपाची आकडेवारी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये 1952 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार, त्यांना मिळालेली मते, मतदानाशी निगडीत आकडेवारी, मतदारसंघाचे नकाशे, धुळे लोकसभा मतदार संघाचे सन 2024 चे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासह निवडणूक प्रक्रियेत सहभागी महत्वाचे अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमांक, पुरुष व महिला मतदार, मतदान केंद्र आदि माहिती समाविष्ठ करण्यात आली आहेत. लोकसभेचा धुळे मतदारसंघ हा धुळे व नाशिक या दोन जिल्हृयात विस्तारलेला आहे. या दोन्ही जिल्ह्यातील माध्यमांना ही पूर्वपीठिका संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार आहे.

या पूर्वपीठिकेच्या निर्मितीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानोबा इगवे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. पूर्वपीठिकेतील माहिती संकलन व संपादनासाठी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळे येथील माहिती सहायक संदीप गावित, वरिष्ठ लिपिक बंडू चौरे, लिपिक चैतन्य मोरे, इस्माईल मणियार, ऋषीकेश येवले यांनी परिश्रम घेतले.

00000

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात १२०५ गृहमतदारांनी केले मतदान

गडचिरोली दि.११ : महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान सुविधेअंतर्गत लोकसभा निवडणुक -2024 साठी काल आपलं मतदान केलं. त्यांच्या सोबत किष्टय्या लसमय्या कोमेरा या 86 वर्षीय वयोवृद्धानेदेखील गृहमतदान केले. हे मतदान घेण्यासाठी अहेरी विधानसभा मतदार संघातील गृह मतदान चमूने अहेरी ते सिरोंचा हे तब्बल 107 किलोमीटरचे अंतर गाठले व गृह मतदानाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगितल्यानंतर या दोघांचे मतदान नोंदविले.

दोघेही वयोवृद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी गृहमतदानाची निवड करून आपले मत घरातच स्थापन केलेल्या तात्पुरत्या मतदान कक्षात गोपनियता बाळगून नोंदविले.कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या मार्गदर्शनात 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात कालपर्यंत 85 वर्षावरील 923 मतदार आणि 282 दिव्यांग अशा एकूण 1205 मतदारांनी आतापर्यंत गृह मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.संपूर्ण मतदार संघातून 85 वर्षावरील 1037 व 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेले 338 असे 1375 मतदारांचे गृह मतदानासाठीचे अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी श्री दैने यांनी मंजूर केले आहेत.विधानसभा मतदार संघनिहाय 85 वर्षावरील मतदार व झालेले मतदान आणि दिव्यांग मतदार व झालेल्या मतदानाची (कंसात) माहिती पुढीलप्रमाणे आहे. आमगाव- 133 पैकी 127(दीव्यांग-38 पैकी 38), आरमोरी -88 पैकी निरंक (दीव्यांग-53 पैकी निरंक), गडचिरोली -132 पैकी 132 (दीव्यांग-70 पैकी 70), अहेरी 23 पैकी 21 (दीव्यांग-13 पैकी 10), ब्रम्हपुरी 224 पैकी 224 (दीव्यांग-63 पैकी 63), चिमुर 437 पैकी 419 (दीव्यांग-101 पैकी 101).

याव्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील 28 मतदारांचेही अर्ज गृहमतदानासाठी मंजूर करण्यात आले आहे.
सिरोंचा येथील 100 वर्षीय किष्टय्या आशालू मादरबोईना आणि किष्टय्या लसमय्या कोमेरा (वय 86) यांचे मतदान नोंदविण्यासाठी नायब तहसीलदार जनक काडबाजीवार, क्षेत्रीय अधिकारी सागर भरसट, केंद्राध्यक्ष प्रमोद करपते, सहाय्यक मतदान अधिकारी सुरज आत्राम, पोलीस शिपाई प्रशांत मिसरी, प्रमोद तोटापल्लीवार या मतदान अधिकाऱ्यांनी गृह मतदान घेण्याची कार्यवाही पूर्ण केली असल्याचे अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.
000

ताज्या बातम्या

राज्यपालांची राजभवन येथील कर्करोग जनजागृती शिबिराला भेट

0
मुंबई, दि.25 : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राजभवन येथे अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित कर्करोग जनजागृती  शिबिराला भेट देऊन तपासणी आणि जनजागृती उपक्रमाची...

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे दादासाहेब गवई यांना अभिवादन

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी दारापूर येथे आज त्यांचे वडील रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या...

शासनाच्या बांधिलकीची आणि मानवतेच्या हाकेची कहाणी

0
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत संपूर्ण राज्यात गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना तात्काळ व पारदर्शक पद्धतीने आर्थिक मदत...

“झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. 25 जुलै  2025 (जिमाका वृत्तसेवा) : “आई ही प्रत्येकाच्या जीवनातील पहिली गुरु आणि पहिली सावली असते. झाडांचे संगोपन म्हणजे आईच्या आठवणींना जपणे....

गावाचा सर्वांगीण विकास हा ग्रामीण प्रगतीचा पाया – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
जळगाव दि. 25 जुलै 2025 (जिमाका वृत्तसेवा) :“गावांचा सर्वांगीण विकास, पायाभूत सुविधा, शिक्षण, महिला सशक्तीकरण आणि सांस्कृतिक प्रगती हेच ग्रामीण भागाच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचे...