शनिवार, जुलै 26, 2025
Home Blog Page 824

ठाणे जिल्ह्यात तृतीयपंथी मतदारांची संख्या अधिक; गेल्या वेळेच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा अधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद

मुंबई दि. 14: लोकसभा निवडणुकीत 2004, 2009 च्या वेळी तृतीयपंथी अशी वेगळी नोंद नव्हती. सन 2014 च्या निवडणुकीदरम्यान पहिल्यांदाच पुरुष मतदार, महिला मतदारांबरोबरच तृतीयपंथी अशी तिसरी वर्गवारी करण्यात आली होती. आता २०१९ च्या तुलनेत तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ठाण्यात सर्वांधिक तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

2014 मध्ये या तिसऱ्या वर्गवारीमध्ये 918 मतदारांची नोंद करण्यात आली. 2019 मध्ये म्हणजे आणखी पाच वर्षांनी करण्यात आलेल्या नोंदीमध्ये हा आकडा दुप्पटीने वाढला होता आणि ही संख्या 2,086 इतकी झाली आहे. आता तर यावर्षी म्हणजेच 4 एप्रिल 2023 रोजीपर्यंत करण्यात आलेल्या राज्याच्या एकूण मतदार संख्येत 5 हजार 617 तृतीयपंथी मतदार आहेत. यावेळी सर्वांत जास्त तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्हयात करण्यात आली आहे. 1 हजार 279 तृतीयपंथी मतदारांची नोंद ठाणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. मुंबई उपनगरमध्ये 812 आणि पुण्यात 726 तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे.

यावर्षी गोंदियामध्ये 10, गडचिरोलीत 9, हिंगोलीमध्ये 7, भंडाऱ्यात 5 आणि सिंधुदुर्गमध्ये 1 अशी तृतीयपंथी मतदारांची नोंद झाली आहे. तृतीयपंथी कार्यकर्ते गौरी सावंत, प्रणीत हाटे आणि झैनाब पटेल हे निवडणूक सदिच्छादूत म्हणून काम करणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2014 साली तृतीयपंथी मतदारांना प्रथम मतदानाचा अधिकार मिळाला. आणि तेव्हापासूनच तृतीयपंथी अशा स्वतंत्र वर्गवारीत या समूहाची नोंद करण्यात येऊ लागली. 2019 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत तृतीयपंथी वर्गवारीमध्ये मतदारांची संख्या दुप्पटीने वाढली असल्याचे दिसून आले होते. तर 2024 मध्ये करण्यात आलेल्या नोंदणीत दुप्पटीपेक्षाही अधिक तृतीयपंथी मतदार संख्या वाढली आहे. याचाच अर्थ आज तृतीयपंथी सुध्दा आपल्या मतदानाच्या हक्काबाबत सजग असून मतदान नावनोंदणीसाठी पुढे येत आहेत.

0000

वर्षा आंधळे/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे अभिवादन

??????????????????????????

मुंबई दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवन येथे डॉ. आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी राज्यपालांचे विशेष सचिव विपीन कुमार सक्सेना, सहसचिव श्वेता सिंघल तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Raj Bhavan : Governor Bais offers tributes to Dr Ambedkar on 133rd Birth Anniversary

 Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the bust of Bharat Ratna Dr Babasaheb Ambedkar on the occasion of the 133rd birth anniversary of the Architect of the Indian Constitution at Raj Bhavan Mumbai on Sunday (14th April).

Special Secretary to the Governor Vipin Saxena, Joint Secretary Shweta Singhal and officers and staff of Raj Bhavan were present.

0000

९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ ची परतफेड

मुबंई, दि. 14 – महाराष्ट्र शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या ९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ अदत्त शिल्लक रकमेची परतफेड दि.१४ मे, २०२४ पर्यंत देय असलेल्या व्याजासह  दि.१५ मे, २०२४ रोजी सममूल्याने परतफेड करण्यात येईल,असे वित्त विभागाच्या (वित्तीय सुधारणा), सचिव श्रीमती शैला ए. यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.

“परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१” अन्वये महाराष्ट्र शासनाने उपरोक्त दिनांकास सुटी जाहीर केल्यास, राज्यातील अधिदान कार्यालय, कर्जाची परतफेड अगोदरच्या कामाच्या दिवशी करेल. या कर्जावर दि. १५ मे, २०२४ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही.

सरकारी प्रतिभूती विनियम, २००७ च्या उप-विनियम २४ (२) व २४(३) अनुसार, दुय्यम सर्वसाधारण खातेवही लेखा किंवा रोखे प्रमाणपत्र यांच्या स्वरुपातील शासकीय रोख्यांच्या नोंदणीकृत धारकाकडील मुदत समाप्ती उत्पन्नाचे प्रदान हे, इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत जमा निधीची सुविधा असलेल्या कोणत्याही बँकेतील धारकाच्या खात्यात जमा करुन त्याच्या बँक खात्याचे संबधित तपशिलांसह प्रदानादेशाव्दारे करण्यात येईल. रोख्यांच्या बाबतीतील प्रदान करण्यासाठी, अशा रोख्यांचा मूळ वर्गणीदार किंवा यथास्थिती उत्तरवर्ती धारक, बँकेकडे किंवा कोषागाराकडे किंवा भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या उप-कोषागाराकडे किंवा यथास्थिती त्यांच्या दुय्यम बँकांकडे जर त्यांना व्याज प्रदान करण्यासाठी मुखांकित करण्यात आले असल्यास/ त्यांची नोंदणी करण्यात आली असल्यास त्याच्याकडे, त्यांच्या बँक खात्याचा संबंधित तपशील सादर करतील.

तथापि, बँक खात्याच्या संबधित तपशिलाच्या/इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत निधी जमा करण्याच्या आदेशाच्या अभावी, नियत दिनांकास परतफेड करणे सुलभ व्हावे यासाठी, ९.२२ टक्के महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२४ च्या धारकांनी, लोक ऋण कार्यालयात २० दिवस अगोदर त्यांचे रोखे सादर करावेत. रोख्यांच्या मागील बाजूस ” प्रमाणपत्रावरील देय मुद्दलाची रक्कम मिळाली.”, असे यथोचितरीत्या नमूद करुन ते रोखे परतफेडीसाठी सादर करावेत.

भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या कोणत्याही सहयोगी बँकांच्यामार्फत ज्या ठिकाणी कोषागाराचे काम केले जाते त्या ठिकाणी ते रोखे रोखा प्रमाणपत्राच्या स्वरुपात असल्यास, ते संबंधित बँकेच्या शाखेत सादर करावेत आणि ते कोषागार किंवा उपकोषागार येथे सादर करु नयेत, याची विशेष नोंद घेतली पाहिजे.  रोख्यांची रक्कम प्रदान करण्यासाठी जी ठिकाणे मुखांकित करण्यात आली असतील त्या ठिकाणांखेरीज अन्य ठिकाणी ज्या रोखेधारकांना, रक्कम स्वीकारायची असेल, त्या रोखेधारकांनी ते रोखे नोंदणीकृत व विमाबध्द डाकेने संबंधित लोक ऋण कार्यालयात यथोचितरित्या पाठवावेत. लोक ऋण कार्यालय हे, महाराष्ट्र राज्यात शासकीय कोषागाराचे काम करणा-या भारतीय स्टेट बँकेच्या किंवा तिच्या सहयोगी बँकेच्या कोणत्याही शाखेत कोषागारात/उपकोषागारात देय असलेल्या धनाकर्षाव्दारे त्याचे प्रदान करील.

0000

वंदना थोरात/विसंअ/

अग्निशमन दलाने ड्रोन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अंगिकारावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई अग्निशमन दलाच्या ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक प्रदान

मुंबई दि. 14 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढली असून पूर्वीपेक्षा अनेक बहुमजली इमारती शहरात निर्माण होत आहेत. अनेक देशात अग्निशमन कार्यात ड्रोन तंत्रज्ञान वापरले जाते, तसेच आगीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान आपल्या अग्निशमन दलांनी देखील अंगिकारण्याबाबत विचार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

राष्ट्रीय अग्निशमन दिनानिमित्त राज्यपाल  रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे राज्यस्तरीय अग्निशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

महानगरांमध्ये आगीबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे, तसेच सर्व हाऊसिंग सोसायटी व औद्योगिक आस्थापनांचे नियमित फायर ऑडिट करणे आवश्यक आहे असे राज्यपालांनी सांगितले.

आगामी काळात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असून वाहनांच्या आगीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले. यंदा अग्निशमन सेवेकरिता राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या मुंबई अग्निशमन दलातील ४ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्यपालांच्या हस्ते यावेळी पदक प्रदान करण्यात आले.

मुंबई अग्निशमन दलाचे विभागीय अग्निशमन अधिकारी संपत कारंडे, लिडिंग फायरमन दत्तात्रय पाटील, सहायक फायरमन गुरुप्रसाद सावंत तसेच चालक ऑपरेटर संदीप गवळी यांना राज्यपालांनी पदक प्रदान केले.  राज्यपालांच्या हस्ते अग्निशमन सेवा कर्मचारी कल्याण निधी संकलन मोहिमेचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक यांनी राज्यपालांचे स्वागत केले तसेच त्यांच्या पोशाखाला अग्निशमन ध्वजाचे तिकीट लावले.

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर, महाराष्ट्र अग्निशमन सेवेतील वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील विविध शहरे व आस्थापनांचे मुख्य अग्निशमन अधिकारी यावेळी उपस्थित होते.सन १९४४ साली मुंबई डॉकयार्ड येथे जहाजाच्या स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल रोजी राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिवस पाळला जातो.

0000

मतदार चिठ्ठी पडताळणीसाठी जिल्हाधिकारी घरोघरी

चंद्रपूर, दि. 14 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा ज्वर चांगलाच चढला आहे. प्रत्यक्ष मतदानासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन नागरिकांपर्यंत पोहचत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी रविवारी नागरिकांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याची पडताडणी केली.

 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागरिकांच्या घरापर्यंत पोहचून ‘मतदार चिठ्ठी’ चे वाटप प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या घरी जाऊन मतदार चिठ्ठी मिळाली की नाही, याबाबत नागरिकांना विचारून खात्री केली. यावेळी त्यांनी देवई गोविंदपूर येथील मतदान केंद्र क्रमांक 74, 75 आणि 42 या मतदान यादीतील समाविष्ट भागाला भेट दिली. तसेच शहरातील शास्त्रीनगर, बागला चौक या भागाला सुध्दा भेटी दिल्या.

यावेळी त्यांनी मतदार चिठ्ठ्या वाटपाची प्रगती, तसेच शिल्लक असलेल्या मतदार चिठ्ठ्या याबाबत संबंधित केंद्रस्तरीय अधिका-यांकडून सविस्तर आढावा घेतला. मतदार चिठ्ठ्या वाटपाचे काम वेळेत 100 टक्के पूर्ण होईल, याबाबत दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.  ज्या क्षेत्रात मतदार चिठ्ठ्यांचे वाटप होते, त्या क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असते. कारण आपले नाव मतदार यादीत आहे, याबाबत नागरिकांना खात्री होते.

याप्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवाल, चंद्रपूर मतदारसंघाचे सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मंगेश खवले यांच्यासह पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

०००००००

सर्व शासकीय यंत्रणांनी ७५ टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४

सोलापूर, दिनांक 14(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक करण्यासाठी सुचित करण्यात आलेले आहे. तरी जिल्हास्तरावर सर्व शासकीय यंत्रणांनी निवडणूक कामकाजाबरोबरच मतदारांना मतदार केंद्रापर्यंत आणून त्यांना सर्व अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. स्वीपद्वारा जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवून सोलापूर जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी 75 टक्के पेक्षा अधिक होईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, पोलीस शहर उप आयुक्त दिपाली काळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोक्कलिंगम म्हणाले की, आपले राज्य सर्व क्षेत्रात देश पातळीवर अग्रेसर आहे. परंतू मतदानाच्या टक्केवारीत इतर राज्याच्या तुलनेत व राष्ट्रीय सरासरीपेक्षा मतदानाची टक्केवारी कमी आहे. तरी सर्व यंत्रणांनी परस्परात चांगला समन्वय ठेवून मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. मागील लोकसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी मतदानाची टक्केवारी कमी आहे अशा ठिकाणी मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. मतदानाची टक्केवारी जास्त होणाऱ्या मतदान केंद्रासाठी स्पर्धा ठेवावी. मतदान केंद्रावर मतदारासाठी वेटिंग रूम करून टोकन सिस्टीमप्रमाणे मतदानासाठी बोलवावे मतदानाच्या जवळ वाहन पार्किंगची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सूचित केले.

जीएसटी, उत्पादन शुल्क व वन विभागाने त्यांच्या स्तरावरून चेक पोस्ट तयार करून वाहनांची कसून चौकशी करावी. एस एस टी व एफ एस टी टीमने प्रत्येक वाहनांची व्यवस्थित तपासणी करून कॅश व अवैध दारू वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. सर्व चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम राबवावी. सिव्हिजनवरील तक्रारींचा निपटारा वेळेत करावा. सर्व मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. खर्च समितीने उमेदवाराच्या खर्चावर व्यवस्थित नियंत्रण ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद घ्यावी. ईव्हीएम वर व्यवस्थित नियंत्रण राहील याची दक्षता घ्यावी. हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने ईव्हीएम मशीन संबंधी सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पार पाडावी, अशा सूचना श्री. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

मतदार यादीत जिल्ह्यातील कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीचे नाव समावेश करण्याचे राहून जाणार नाही याची दक्षता घ्यावी. क्यू लेस वोटिंग प्रक्रिया राबवावी सर्व सूक्ष्म निरीक्षकांचे प्रशिक्षण व्यवस्थितपणे घ्यावे. ईपिक कार्ड चे वितरण व्यवस्थित करावे. भारत निवडणूक आयोगाच्या परवानगीने डमी बॅलेट युनिट वापरण्याचा अधिकार उमेदवारांना आहे त्याबाबत राजकीय पक्ष व माध्यमाना माहिती द्यावी. पोलीस विभागाने शहरी व ग्रामीण भागातील सर्व मतदान केंद्रावर तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने आवश्यक तो बंदोबस्त उपलब्ध करून त्याचे सूक्ष्म आराखडा करावा. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रशासनाची तयारी व्यवस्थित झालेली असून याच पद्धतीने पुढेही काम करून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघाच्या अनुषंगाने प्रशासनाच्या झालेल्या तयारीची माहिती सादरीकरणाद्वारे बैठकीत सादर केली. निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे जिल्ह्यात निवडणूक विभागाचे विविध प्रशासकीय यंत्रणा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलीस शहर आयुक्त एम. राजकुमार यांनी सोलापूर शहरातील मतदान केंद्र यासाठी देण्यात आलेल्या पोलीस बंदोबस्ताची तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तर पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांनी ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर पोलीस विभागाकडून देण्यात आलेल्या बंदोबस्ताची माहिती देऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्याचे सांगितले.

जिल्हा नियंत्रण कक्ष व मतमोजणी केंद्राला भेट

जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी मतदान होणार असून मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉंग रूमची व मतमोजणी केंद्राची पाहणी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ई व्हि एम मशीन ठेवणे व सोलापूर, माढा लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

तसेच नियोजन भवन येथील निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा नियंत्रण कक्षालाही श्री. चोक्कलिंगम यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी कक्षाचे नोडल अधिकारी आशिष लोकरे यांनी जिल्हा नियंत्रण कक्षाकडून निवडणूक विषयक करण्यात येत असलेल्या कामकाजाची माहिती दिली.

0000000000

राज्यपाल रमेश बैस यांचा मतदार जागृती स्वाक्षरी मोहिमेत सहभाग: मतदारांनी २० मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

मुंबई, दि. १४ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी आणि  मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून मतदार जागृती करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मुंबई शहर जिल्हा कार्यालयातर्फे  विशेष स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

३०-मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १८१- माहिम विधानसभा मतदारसंघ यांच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष स्वाक्षरी मोहीम उपक्रमास राज्यपाल रमेश बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर सही करून मतदारांनी दि.२० मे रोजी  मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन मतदारांची नोंदणी तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणुकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने (Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठित करण्यात आली आहे. या समितीतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. भालचंद्र मुणगेकर आदींसह विविध मान्यवरांनी स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करत मतदानाचा हक्क बजावणार असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

याप्रसंगी माहीम विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी अमोल कदम यांच्यासह संबंधित अधिकारी यांनी या विशेष मोहिमेसाठी पुढाकार घेतला.

0000

काशिबाई थोरात/विसंअ/

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. १४ :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज चैत्यभूमी स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच चैत्यभूमीवरील भिमज्योतीस पुष्प अर्पण करण्यात आले.

यावेळी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांच्यासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर समन्वय समितीचे महासचिव नागसेन कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चैत्यभूमी येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर चित्र प्रदर्शन आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृती स्टॉल उभारण्यात आला.

0000

राजू धोत्रे/विसंअ

‘माझा देश माझी लोकशाही,चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई!’ – उखाण्याद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली मतदानाची महती

छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ‘माझा देश माझी लोकशाही, चल गं…. करु मतदान लावू बोटाला शाई’, या उखाण्यातून जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी समोर असलेल्या श्रोतृवर्गाला मतदानाची महती सांगितली. स्वीप उपक्रमाअंतर्गत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत वैजापूर येथे आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मतदान जनजागृतीच्या घोषणांनी आज वैजापूर नगरी दुमदुमली.

            वैजापूर  येथे आज मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात आले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी या कार्यक्रमांना हजर होते. उपविभागीय पोलीस अधिकारी महक स्वामी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी  डॉ. अरुण जऱ्हाड, तहसिलदार सुनिल सावंत तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

            सकाळी आठ वाजेपासून शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्यात सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी,अंगणवाडी सेविका, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.रॅलीत लेझीम पथकाचाही समावेश होता. मतदार जनजागृतीच्या घोषणा देऊन शहर दणाणून गेले. डीएड कॉलेजच्या प्रांगणामध्ये रॅलीचा समारोप झाला तेथे  विविध कार्यक्रमांनी मतदार जनजागृतीचा संदेश देण्यात आला. दीपक त्रिभुवन अव्वल कारकून यांनी देशभक्तीपर गीत सादर केले. श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. शाहीर अशोक बागुल व त्यांच्या संचाने अतिशय सुंदर पोवाडा सादर करत मतदानाची महती सांगितली.

मतदार जागृती संदेश देणाऱ्या उखाण्यांच्या कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात स्वतः जिल्हाधिकारी स्वामी यांनी स्वतः उखाणा सादर केला. त्यांनी घेतलेल्या ‘माझा देश माझी लोकशाही चल गं… करु मतदान लावू बोटाला शाई’ या उखाण्याला उपस्थितांनी दाद दिली. याप्रसंगी श्रीमती राजश्री बंड, सुवर्णा बोर्डे, दीपक त्रिभुवन, सुचिता हरेगावकर, उर्मिला जेजुरकर,सुरेखा पोटे, कमल खरे, नाजुका गायकवाड, केशव सूर्यवंशी आदींनी उखाणे सादर केले. तलाठी श्रीमीहिंगे यांनी एकपात्री  प्रयोग सादर करून लोकशाहीची भावना व्यक्त केली.

            जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, मतदानाप्रति कर्तव्य भावना जागरुक व्हायला हवी. आपल्या देशाची लोकशाही बळकट करायची तर मतदानाचे प्रमाण वाढले पाहिजे. त्यासाठी लोकांना मतदान केंद्रांवर विविध सुविधांची उपलब्धता करुन दिली जाणार आहे. त्यात पाणी, सावली, लहान बालकांसाठी पाळणाघर, दिवंग्यासाठी व्हील चेअर, मेडिकल किटइ. विविध सुविधांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. कुणीही मतदानापासून वंचित राहू नये हे आयोगाचे ध्येय्य आहे. तथापि, सगळ्यांना मतदान करता यावे यासाठी मतदार सहायता केंद्रही स्थपन करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघ निहाय निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. यावेळी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००००

समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जनजागृती अभियान

सांगली दि. 13  (जि.मा.का.) : 281  मिरज विधानसभा मतदारसंघ, उत्तम नगर येथे समृद्ध लोकशाही संदर्भात मिरज येथे रेड लाईट एरियामध्ये मतदान जागृती अभियानांतर्गत रेड लाईट एरिया येथे तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहिम राबविण्यात आली .

यावेळी सोडा आपले सर्व काम, चला करूया आपले मतदान ! चुनाव नही, मतदान करे ! नवभारत का निर्माण करे ! अशा प्रबोधनपर घोषणा देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रबोधन फेरीनंतर कॉर्नर सभेमध्ये नोडल ऑफिसर तथा उपशिक्षणाधिकारी गणेश भांबुरे, बाल विकास प्रकल्प अधिकारी पूजा कणसे, स्वीप सदस्य संगीता खटावकर, शफिया जमादार व आस्था बेघर महिला निवारा केंद्र, भीमांगन महिला संस्थेच्या सुरेखा शाहीन शेख यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक वेश्या एड्स मुकाबला परिषदेचे मीनाक्षी कांबळे यांनी तर स्वागत श्रीमती रेणुका काळे यांनी केले. याप्रसंगी निर्भयपणे मतदान करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी जनकल्याण आरोग्यसेवा फाउंडेशनचे रमजान खलिफा, राजेश साळुंखे यांच्यासह परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

ooooo

ताज्या बातम्या

कोल्हापुरी चप्पल : देशी हस्तकलेचा अनमोल वारसा

0
भारतातील सर्वात जुन्या पारंपरिक हस्तकलांपैकी एक असलेल्या अशा कोल्हापुरी चपला आज पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या वलयात येत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीचं आकर्षण महाराष्ट्रात आणि देशात...

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आयोगाची तयारी सुरू; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

0
मुंबई, दि.२५ : भारताच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आवश्यक प्रक्रियेसाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. संविधानातील अनुच्छेद ३२४ नुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे आयोजन...

राज्यातील विकास प्रकल्पांसाठी मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटी

0
गावांना सिमेंट रस्त्यांनी जोडणार, सांडपाणी प्रक्रिया, बांबू क्लस्टर, विदर्भात खतांचा प्रकल्प, एनसीडी स्क्रिनिंगसाठी एआय, अनेक प्रकल्पांना गती नवी दिल्ली, दि. 25 : राज्यातील विविध विकास...

प्राचार्यांचे निवृत्ती वय ६५ करण्यासाठी सकारात्मक – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा...

0
अमरावती, दि. २५ :  नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या प्रभावी अंमलबजावणीत प्राध्यापक आणि प्राचार्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असून, देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी धोरणाचे सर्व पैलू...

विदर्भ ज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठ दर्जासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

0
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शहराच्या हृदयस्थानी 167 एकरावर आणि साडेतीनशे विविध वनस्पती असलेल्या शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळवण्यासाठी सहकार्य...