रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 822

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८७ हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 23: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 1016 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 87 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. एकूण निवड झालेल्या उमेदवारांपैकी जवळपास 8.6 टक्के महाराष्ट्रातून आहेत. राज्यातून समीर प्रकाश खोडे प्रथम आले असून देशात त्यांनी 42 वा क्रमांक पटकाविला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष 2023 च्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील तीन उमेदवारांचा समावेश आहे. नेहा राजपूत यांनी 51वा तर अनिकेत हिरडे यांनी  81 वा क्रमांक पटकावला आहे.

एक नजर निकालावर

समीर प्रकाश खोडे (४२) नेहा उद्धवसिंग राजपूत (५१) अनिकेत ज्ञानेश्वर हिर्डे (८१) विनय सुनील पाटील (१२२) विवेक विश्वनाथ सोनवणे (१२६) तेजस सुदीप सारडा (१२८) जान्हवी बाळासाहेब शेखर (१४५) आशिष अशोक पाटील (१४७) अर्चित पराग डोंगरे (१५३) तन्मयी सुहास देसाई (190) ऋषिकेश विजय ठाकरे (२२४) अभिषेक प्रमोद टाले (२४९) समर्थ अविनाश शिंदे (२५५) मनीषा धारवे (२५७) शामल कल्याणराव भगत (२५८) आशिष विद्याधर उन्हाळे (२६७) शारदा गजानन मद्येश्वर (२८५) निरंजन महेंद्रसिंह जाधवराव (२८७) समिक्षा म्हेत्रे (३०२) हर्षल भगवान घोगरे (३०८) वृषाली संतराम कांबळे (३१०) शुभम भगवान थिटे (३५९) अंकेत केशवराव जाधव (३९५) शुभम शरद बेहेरे (३९७) मंगेश पाराजी खिलारी (४१४) मयूर भारतसिंग गिरासे (४२२) अदिती संजय चौगुले (४३३) अनिकेत लक्ष्मीकांत कुलकर्णी (४३७) क्षितिज गुरभेले (४४१) अभिषेक डांगे (452) स्वाती मोहन राठोड (४९२) लोकेश मनोहर पाटील (४९६) सागर संजय भामरे (५२३) मानसी नानाभाऊ साकोरे (५३१) नेहा नंदकुमार पाटील (५३३) युगल कापसे (५३५) हर्षल राजेश महाजन (५३९) अपूर्व अमृत बालपांडे (५४६) शुभम सुरेश पवार (५६०) विक्रम जोशी (593)  प्रियंका मोहिते (595) अविष्कार डेरले (604) केतन अशोक इंगोले (६१०) राजश्री शांताराम देशमुख (६२२) संस्कार निलाक्ष गुप्ता (६२९) सुमित तावरे (655) सुरेश लीलाधरराव बोरकर (६५८) अभिषेक अभय ओझर्डे (६६९) नम्रता घोरपडे (675) जिज्ञासा सहारे (681) श्रृति कोकाटे (685)  अजय डोके(687) सूरज प्रभाकर निकम (706) श्वेता गाडे (711) अभिजित पखारे (720) कृणाल अहिरराव (732) हिमांशु टेभेंकर (738) सुमितकुमार धोत्रे (750) गौरी देवरे (759) प्रांजली खांडेकर (७६१) प्रितेश बाविस्कर (767) प्रशांत डांगळे (775) प्रतिक मंत्री (786) मयुरी माधवराव महल्ले (७९४) राहुल पाटील (804) सिध्दार्थ तागड (809) प्राजंली नवले (815) सिध्दार्थ बारवळ (823) ओमकार साबळे (844) प्रशांत सुरेश भोजने (८४९) प्रतिक बनसोडे (862) चिन्मय बनसोड (893) निखील चव्हाण (900) विश्वजीत होळकर (905) अक्षय लांबे (908) निलेश डाके (918) किशनकुमार जाधव (923) ऐश्वर्या दादाराव उके (९४३) स्नेहल वाघमारे (945) शुभम त्रंबकराव डोंगरदिवे (९६३) गौरव हितेश टेंभुर्णीकर (९६६) मयांक खरे (९६८) शिवानी वासेकर (९७१) श्रावण अमरसिंह देशमुख (९७६) श्रुती उत्तम श्रोते (९८१) सुशीलकुमार सुनील शिंदे (९८९) आदित्य अनिल बामणे (१०१५)

केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी – एप्रिल 2024 दरम्यान परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 1016 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून –347, आर्थिक मागास प्रवर्गातून  (ईडब्ल्यूएस) 115, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून (ओबीसी) – 303, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – 165, अनुसूचित जमाती प्रवर्गातून- 86  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 37  दिव्यांग उमेदवारांचा (16 ऑर्थोपेडिकली अपंग, 06 दृष्टीहीन, 05 श्रवणदोष आणि 10 एकाधिक अपंग) यांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 240 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 120, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 36,  इतर मागास वर्ग -66, अनुसूचित जाती- 10, अनुसूचित जमाती – 04  उमेदवारांचा समावेश आहे. यासोबत एकूण चार दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (आयएएस) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 73, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 17 इतर मागास वर्ग (ओबीसी) –49, अनुसूचित जाती (एससी) – 27, अनुसूचित जमाती (एसटी) 14  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (आयएफएस) या सेवेत शासनाकडे एकूण – 37 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 16, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओबीसी) – 10, अनुसूचित जाती (एससी) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 02 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 32, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 613 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 258, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 64 , इतर मागास प्रवर्गातून – 160, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 86 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –45  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 113   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 47, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  10 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 29, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून -12 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण 355 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल. अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

0000

६.४० कोटींच्या कर चोरीप्रकरणी जीएसटी विभागाकडून दोन संचालकांना अटक

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणात ६ कोटी ४० लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला आहे. बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सुरु असलेल्या घडक मोहिमेअंतर्गत कमलेश बाबुलाल जैन (वय ६१), आणि भावना कमलेश जैन (वय ६१) या दोन संचालकांना आज १६ एप्रिल रोजी अटक करण्यात आली, अशी माहिती राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

मे. मोनोपोली इनोव्हेशन्स प्रा.लि. या कंपनी विरोधात वस्तू व सेवाकर विभागाकडून अन्वेषण कारवाई सुरु करण्यात आली होती. कारवाई दरम्यान या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी व विक्री दाखवून ६.४० कोटी रुपयांची महसूल हानी केली आहे. या व्यापाऱ्याने नोंदणी दाखला रद्द झालेल्या व्यापाऱ्याकडून खरेदी दाखवुन ३.२३ कोटी रुपयांची चुकीची कर वजावट घेऊन तसेच, मालाशिवाय फक्त बिले देवून ३.१७ कोटी रुपयांची शासनाची महसूल हानी केल्याचे निदर्शनास आले.

महानगर दंडाधिकारी यांनी आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ही धडक कारवाई राज्यकर सहआयुक्त  प्रेरणा देशभ्रतार आणि राज्यकर उपायुक्त राजेंद्र टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक राज्यकर आयुक्त डी. के. शिंदे यांनी राबविली. या कार्यवाहीत सर्व राज्यकर निरीक्षकांचे महत्त्वाचे योगदान राहीले.

सर्व समावेशक नेटवर्क विश्लेषण साधनांचा वापर करुन आणि इतर विभागांशी समन्वय साधून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभाग कर चुकवणाऱ्या व्यापाऱ्यांचा शोध घेत आहे. या मोहिमेद्वारे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाद्वारे २०२४-२५ या आर्थिक वर्षात पहिल्याच अटक कारवाईद्वारे कर चुकवेगिरी करणाऱ्यांना इशारा दिला आहे.

००००

पवन राठोड/ससं/

 

 

दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार

मुंबई दि. 16 : जे दिव्यांग नागरिक मतदान केंद्रावर येऊन मताधिकार बजावू इच्छितात, त्यांच्यासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत स्वयंसेवक व व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सुविधा मिळण्यासाठी दिव्यांग मतदारांनी आपले नाव Saksham-ECI या अॅपवर चिन्हांकित करणे आवश्यक आहे.  या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्यात आलेली आहेत. त्यामुळे दिव्यांग मतदारांना ये-जा करणे सोयीचे होऊ शकेल.

दिनांक १२ एप्रिल २०२४ रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण ९८,११४ मतदान केंद्रे आहेत. त्यांपैकी ९८,०३९ मतदान केंद्रांवर रॅम्पची आवश्यकता आहे. त्यांतील ९७,६६२ मतदान केंद्रांवर रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील ३७७ मतदान केंद्रावर प्रमाणित मानकानुसार तात्पुरत्या रॅम्पची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदारांना सुलभपणे वापरता येतील अशी शौचालयेही उभारली आहेत.

विशेष म्हणजे, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ३१३ मतदान केंद्रांवर सर्व दिव्यांग मतदान अधिकारी कार्यरत असणार आहेत. तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमे ह्या वरील मजकूर दिव्यांग नागरिकांना, विशेषतः अंध आणि कर्णबधिर मतदारांना वाचण्या-ऐकण्यायोग्य तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये आधीच मतदार असलेल्या दिव्यांग मतदारांनी Saksham-ECI या अॅपवर आपले नाव कसे चिन्हांकित करावे, नव्याने मतदार नोंदणी कशी करावी, दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधा इ. माहिती व्हिडिओ व लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदार चिठ्ठी, मतपत्रिका, मतदार मार्गदर्शक पुस्तिका हे अंध मतदारांना ब्रेल लिपीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ८५ वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा दिलेली आहे. ही सुविधा घेण्यास इच्छुक असलेल्या पात्र ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरावा लागेल. हा अर्ज भरून घेण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी त्यांच्या घरी भेट देतील. प्रत्येक टप्प्याची निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाल्यापासून पाच दिवसांपर्यंत पात्र ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना १२ड हा अर्ज भरून देता येईल. या मतदारांची गुप्त पध्दतीने मतदान प्रक्रिया त्यांच्या मतदारसंघासाठी निश्चित केलेल्या मतदान-तारखेच्या एक दिवस आधी पूर्ण केली जाईल.

0000

मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठात ‘स्वीप’तर्फे मतदान जनजागृती कार्यक्रम

मुंबई, दि. १६ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी स्वीप अर्थात मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील एसएनडीटी महिला विद्यापीठात नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात एसएनडीटी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींद्वारे मतदान जनजागृतीसाठी पोवाडा सादर करण्यात आला. या पोवाड्याच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी निवडणुकीत मतदानाचे असलेले महत्त्व अधोरेखित केले. या निवडणुकीत मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन देखील मतदारांना या पोवाड्याच्या माध्यमातून केले. धनश्री काशिद, ज्ञानेश्वरी दळवी व अनुश्री वैद्य या विद्यार्थिनींनी हा पोवाडा सादर केला. यावेळी विद्यापीठाच्या प्राचार्या  डॉ. जसवंती वाम्बुरकर व प्राध्यापक  चित्रा लेले उपस्थित होते.

मुंबई शहर जिल्ह्यात ‘स्वीप’च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधींच्या माध्यमातून मतदारांना ईव्हीएम व व्हीव्हीपॅटसंदर्भात जनजागृती तसेच पथनाट्य स्पर्धांसह प्रभातफेरी आदींच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

‘स्वीप’च्या माध्यमातून जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा याबाबत जनजागृतीसाठी मदत होणार आहे. मतदान प्रक्रियेविषयी जागरूकता वाढावी, त्या प्रक्रियेचे ज्ञान प्रत्येक मतदारापर्यंत पोहचावे, मतदान प्रक्रियेत सामान्य मतदाराचा सहभाग वाढावा, लोकशाहीला खऱ्या अर्थाने लोकसहभागात्मक लोकशाही बनविणे हा ‘स्वीप’चा मूळ उद्देश आहे. समाजमाध्यमांद्वारे देखील मतदार जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी व्यक्त केला.

‘स्वीप’च्या कामाचा आवाका पाहता जिल्ह्यातील प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही पोहोचत आहोत. सर्व कार्यालयांनी विशेषतः शाळा, महाविद्यालयांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. मतदानावेळी त्याचे चांगले परिणाम दिसून येतील, स्विपच्या मुंबई शहर जिल्ह्याच्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम यांनी व्यक्त केला आहे.

कुलाबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ‘स्वीप’तर्फे सीमा खान, शरयू लाड, उर्मिला तांबे, मधुकर वाडीकर, प्रकाश कापसे, समीर मोहिते, लहू चौगुले उपस्थित होते. सीमा खान यांनी विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे महत्व व मतदान करण्याबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमासाठी १८७ – कुलाबा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजयकुमार सुर्यवंशी व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदेश डफळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

0000

शैलजा पाटील/विसंअ

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च निरीक्षण समितीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

मुंबई, दि. १६ : आपल्या दैनंदिन शासकीय कामकाजापेक्षा निवडणुकीचे काम जबाबदारीचे आहे. हे कामकाज करताना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून निवडणुकीच्या कामास अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे , असे कोकण विभागाचे अपर विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे यांनी सांगितले.

निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करून प्रामाणिकपणे काम करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे व कर्तव्ये समजून एकमेकांशी समन्वयाने काम करावे. निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण दिले जात आहे, या प्रशिक्षणाचा फायदा क्षेत्रीय स्तरावर दिसला पाहिजे. निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून घेवून दक्षतापूर्वक पार पाडावी, असे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड यांनी सांगितले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे खर्च  संनियंत्रणासाठी असलेल्या विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाकरीता निवडणूक विषयक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे आणि निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी मार्गदर्शन केले.

श्री. पानसरे म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहेत.

खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची देखील या कामात मदत घेतली जाते.

या प्रशिक्षण कार्यक्रमात अप्पर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहरचे  उन्मेष महाजन, वरिष्ठ लेखाधिकारी राजू रामनानी, उपसंचालक चित्रलेखा खातू यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यवाहीसाठी नियुक्त खर्च विषयक पथक प्रमुख, त्यांचे सहायक, सर्व सहायक खर्च निरीक्षक, मतदार संघनिहाय नियुक्त विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आज प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तर घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा उच्चांक; तीन लक्ष कोटींचा टप्पा पार

मुंबई, दि. 16 :  महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती मुंबईचे राज्यकर उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.

महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे.

राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST) रूपये ९३,४०० कोटी तर एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामधुन रूपये ४८,३०० कोटी एवढा महसुल प्राप्त झालेला आहे. राज्य वस्तू व सेवा कर महसुलात राज्याने गतवर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के एवढी वृद्धी नोंदवलेली असून एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामध्येही २४ टक्के (मागील वर्षातील Ad hoc वगळता) एवढी वृद्धी दिसत आहे. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवधीत कराचा महसूल रूपये ५३,२०० कोटी एवढा आहे.

वस्तू व सेवा कर, मुल्यवर्धित कर, व्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के असुन तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अंदाजित सकल राज्य उत्पादनातील वृद्धी दराहून (१० टक्के) अधिक आहे. एकंदरीत महसुल जमा ही २०२३-२४ साठी निर्धारीत अर्थसंकल्पीय अंदाज रूपये १.९५ लक्ष कोटीहून ही अधिक आहे.

महितीच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आलेल्या धडक कारवायामध्ये अन्वेषण शाखेने जवळपास १२०० प्रकरणात २००० कोटी रूपयांचा महसुल गोळा करून दिलेला आहे. तसेच २४ प्रकरणात अटकेच्या कारवाया केल्या आहेत. अन्वेषण शाखेने गोळा केलेला महसुल हा आतापर्यंतच्या सर्व आर्थिक वर्षांतील सर्वाधिक आहे.

0000

 

 

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीने प्रयत्न करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या दुसऱ्या टप्प्यासाठी अमरावती विभागातील चार लोकसभा मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर दि. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. याअनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक नियमांचे व सूचनांचे विभागातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी काटेकोर पालन करुन निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, नि:ष्पक्ष व भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी जबाबदारीपूर्वक प्रयत्न करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक पूर्वतयारीचा आढावा विभागीय आयुक्तांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. उपायुक्त संजय पवार, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, विधी अधिकारी प्रत्यक्षरित्या तसेच पाचही जिल्ह्यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते.

श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेने दिलेल्या मतदान करण्याच्या अधिकाराचा वापर करावा. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, मतदार जागृती व साक्षरतेसाठी स्वीप मोहिमे अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात यावे. युवा मतदारांना मतदानाच्या राष्ट्रीय उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करावे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांचे गृहमतदान अधिक प्रमाणात होण्यासाठी प्रयत्न करावे. आदर्श आचारसंहितेचे उमेदवारांकडून काटेकोरपणे पालन होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी केल्या.

            मतदान केंद्रे, मतदारांची माहिती, मतदानाची ठिकाणे व तेथील व्यवस्था, माध्यम सनियंत्रण व प्रमाणिकरण समिती, प्रशिक्षण कार्यक्रम, मनुष्यबळ, आचारसंहिता कक्ष, सीव्हीजील ॲप, खर्च सनियंत्रण समिती पथक, आदर्श आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात चेकपोस्टव्दारे तपासणी, वनविभागाचे चेकपोस्ट, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी, राजकीय प्रचाराच्या जाहिराती व चित्रफीतींचे माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून पूर्व प्रमाणिकरण, पेड न्यूज आदी लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध विषयांचा विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

0000

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ एप्रिल रोजी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता

सिंधुदुर्गनगरीदि.16 (जि.मा.का): प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त पूर्व सूचनेनुसार दि. 17 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्मालाट उद्भवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. या सूचनेच्या अनुषंगाने नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाच होण्याच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.

 काय करावे

1)     परेसे पाणी प्या तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.

2)    घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा.

3)    दुपारी बारा ते तीन दरम्यान घरा बाहेर जाणे टाळा.

4)   सुर्यप्राकशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा.

5)    उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी  रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.

6)     हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.

7)   प्रवासात  पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

8)    उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके,मान,चेहरा झाकण्यात यावा.

9)    शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.

10) अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत  

          व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.

11) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.

12) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेड चा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या

          ठेवण्यात याव्यात.

13) पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.

14) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.

15) सुर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.

16) पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये

      मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

17) गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

काय करु नये

1)     उन्हात अति कष्टाची कामे करु नका.

2)     दारु,चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नका.

3)     दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळा.

4)    उच्च प्रथिनयुक्त आणि शिळेअन्न खाऊ नका.

5)     लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.

6)    गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

7)    बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.

8)     उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत.

०००००००००

सीमावर्ती गावातील वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क

नागपूर, दि. 16 : कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. रामटेक, काटोल या उपविभागातील अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले.

सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात १४ ते १७ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात १४ एप्रिल रोजी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. त्यांनतर जिल्ह्यात विविध ठिकाणी गृह मतदान सुरू आहे.

रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. करवाही, दुलारा, बेलदा या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या गृह मतदानाचा आनंद चेह-यावर पहायला मिळाला. यात दुलारा येथील जानोती उईके,  शेवंताबाई मराठे करवाही येथील मंगोलाबाई उईके आणि बेलदा येथील नारायणराव भाल, गंगुबाई भाल, लक्ष्मण गराट यांनी गृह मतदान केले.

रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ तसेच दिव्यांग अशा एकूण 118 पैकी 112 मतदारांनी मतदान केले. यासाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी मतदानस्थळी भेट देऊन पाहणी करीत मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सूचना केल्या. काटोल उपविभागातील प्रामुख्याने सोनोली, राजनी, खामली, खारगड, हिवरमठ, येनिकोनी, अंबोला, खैरगाव,गोधनी, गायमुख या गावातील वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काटोलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज पडोळे यांनीही अनेक मतदारस्थळी भेट देत पाहणी केली.

*****

‘महिला मतदार; मतदान करणार’ जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम

छत्रपती संभाजीनगर, दि.१६(जिमाका):- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये महिला मतदारांची मतदानासाठीची टक्केवारी वाढावी यासाठी महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे

            जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम स्वीप अंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यात महिला मतदारांपर्यंत विशेष करुन पोहोचता यावे यासाठी ‘महिला मतदार-मतदान करणार’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५० टक्के मतदार महिला आहेत.ज्या गावात महिला तलाठी व ग्रामसेवक असतील अशा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे विशेष उपक्रम राबवावयाचे आहेत. याशिवाय इतर ठिकाणीही हे कार्यक्रम राबवावयाचे आहेत. ज्या गावात महिला अधिकारी- कर्मचारी आहेत त्यांनी अंगणवाडी ताई, बचतगटाच्या महिला यांच्या सहकार्याने उपक्रम राबवावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी नियोजन करावयाचे आहे. जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यान, उखाणे, हळदी कुंकू वा तत्सम कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यातून महिलांना मतदानाचे महत्त्व सांगावे. महिलांना मतदान केंद्रांवर महिलांसाठी केलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

०००००

ताज्या बातम्या

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...

दरड व भूस्खलनग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनाची कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ - पाटण तालुक्यातील दरड व भूस्खलनग्रस्त ४७४ कुटुंबांची १५१ तात्पुरत्या निवारा शेडमध्ये तात्पुरती सोय स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यांच्या पुनर्वसनासाठी...

ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे श्री ब्रम्हचैतन्य...

0
सातारा दि.२६ - शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दहिवडी ता. माण या संस्थेचे श्री. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज नामांतर सोहळा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे...