रविवार, जुलै 27, 2025
Home Blog Page 821

नांदेड जिल्ह्यात खर्च निरीक्षक डॉ. जांगिड यांच्याकडून रात्री उशिरा नाक्यांची तपासणी

नांदेड दि.१७: नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत नियुक्त खर्च निरीक्षक डॉ. दिनेश कुमार जांगिड यांनी रात्री उशिरा आकस्मिक भेटी देऊन अनेक नाक्‍यांची तपासणी केली. त्यांच्या या भेटीमुळे यंत्रणा सतर्क झाली असून मोठ्या प्रमाणात नाकेबंदी केली जात आहे.

लोकसभा आचारसंहिता लागल्यानंतर सर्वात प्रथम आलेले खर्च निरीक्षक डॉ.जांगिड यांनी आपल्या अचानक दौऱ्यातून नांदेड शहर, भोकर, मालेगाव, कासारखेडा आदी ठिकाणच्या विविध स्थानिक निगराणी दलांच्या कामकाजाचा आढावा घेतला. याशिवाय भरारी पथक नेमके काय काम करत आहेत, याबाबतही त्यांनी चौकशी केली.

नांदेड लोकसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नगदी रोकड, सोने, चांदी, मद्य व मादक पदार्थ व अन्य काही भेटवस्तू जप्त करण्यात आले आहे. डॉ.जांगिड यांच्याकडून वेळोवेळी अशा प्रकारे अचानक पाहणी केली जात असल्यामुळे निवडणूक काळातील तपासणी पथके जागृत झाली आहेत.

जिल्ह्यात सध्या 25 निगराणी केंद्र आहेत. ज्या ठिकाणी 24 तास वेगवेगळ्या वाहनांची तपासणी केली जाते. या काळात नगदी रक्कम, मादक पदार्थ, मद्य याची तस्करी प्रतिबंधित केली जाते. अशाच प्रकारच्या 60 फिरत्या पथकांकडून मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे. फिरत्या पथकाकडून देखील अशा प्रकारच्या कोणत्याही गैरप्रकारावर नियंत्रण ठेवले जात आहे.

०००

लोकसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज

  • कडेकोट पोलिस बंदोबस्त, संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष
  • आज रवाना होणार मतदान पथके
  • बाहेरगावातील मतदारांनाही आवाहन

नागपूर, दि. १७ :  नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होत असून यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून संवेदनशील केंद्रांवर विशेष लक्ष राहणार आहे. मतदान पथके 18 एप्रिल रोजी सकाळपासून रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. विपीन इटनकर यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक (ग्रामीण) हर्ष पोद्दार, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे, तहसिलदार (निवडणूक) वैशाली पाटील यावेळी उपस्थित होते.

गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुमारे 54 टक्के मतदान झाले होते. यंदा ही टक्केवारी 75 टक्क्यांवर न्यावयाची आहे. यासाठी सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे. विशेषतः नागपूर बाहेर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागपूरात यावे.   मतदान शपथ, मॅरेथॅान, बुथ अवेरनेस ग्रुप, सोसायटी कनेक्ट अशा मतदार जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी जरूर सहभागी व्हावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. इटनकर यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात 124 संवेदनशील मतदान केंद्रे

नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून 124 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 63 तर नागपूरमध्ये 61 केंद्रे आहेत. यात काटोल 15, सावनेर 11, हिंगणा 7, उमरेड 13, कामठी 7 तर रामटेकमध्ये 10 संवेदशील मतदान केंद्रे आहेत. तर नागपूर लोकसभेंतर्गत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ 11, नागपूर दक्षिण 11, नागपूर पूर्व 10, नागपूर मध्य 8, नागपूर पश्चिम 9, नागपूर उत्तर 12 अशा एकूण 61 मतदान केंद्रांचा समावेश आहे. या केंद्रांवर विशेष लक्ष राहणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात राहणार आहे. यातील सुमारे 50 टक्के मतदान केंद्राचे वेबकास्टिंग होणार आहे.

रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे

जिल्ह्यात एकूण 4510 मतदान केंद्रे आहेत. यात रामटेकमध्ये 2405 तर नागपूरमध्ये 2105 मतदान केंद्रे आहेत. यात सहाय्यकारी मतदान केंद्रांचाही समावेश असल्याची माहिती जिल्हाधिका-यांनी यावेळी दिली. या ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी, मतदान पथकांची नियुक्ती करण्यात आली असून ही पथके उद्या, दि. 18 एप्रिल रोजी मतदानस्थळी रवाना होणार आहेत. मतदान पथकांसोबत प्राथमिक वैद्यकीय किट, ग्लुकोज असणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.

12 महिला मतदान केंद्रे

दोन्ही लोकसभा मतदारसंघ मिळून 12 महिला मतदान  केंद्रे  असणार आहेत. प्रत्येक विधानसभेत प्रत्येकी एक महिला मतदान केंद्र असणार आहे.

कडेकोट पोलिस बंदोबस्त

नागपूर लोकसभेसाठी 321 पोलिस अधिकारी, 4 हजार 250 पोलिस कर्मचारी आणि 1 हजार 800 होमगार्डस यांच्यासह केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या तैनात असणार आहेत. रामटेकसाठी 151 अधिकारी, 2 हजार 676 कर्मचारी, 1 हजार 534 होमगार्ड आणि 3 केंद्रीय पथक असणार आहेत. संवेदशील केंद्रामध्ये अधिकचे पोलिस मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहेत.

सी व्हिजिल ॲपवर 64 तक्रारी

सी व्हिजिल या ॲपवर 64 तक्रारींची नोंद करण्यात आली.  यात 20 तक्रारींमध्ये तथ्य  आढळून आले नाही. तर 44 तक्रारींचे निरसन करण्यात आले.

देवलापार येथे आदिवासी मतदार केंद्र

देवलापार येथे आदिवासी मतदान केंद्र असणार आहे.  मतदान सुरू होताच सुरुवातीच्या मतदारांचे पारंपरिक आदिवासी पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. यासोबतच दिव्यांग, युवा अशी विशेष मतदान केंद्रे असणार आहेत. दिव्यांगांसाठी व्हिलचेअरची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासोबतच काही मतदान केंद्रांवर प्रायोगिक तत्वावर मतदान केंद्रांवर टोकन पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे.

०००

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

चंद्रपूर, दि. १७ : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी जवळ आली असून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. शिवाय मतदानातूनच आपण आपले व देशाचे उज्वल भविष्य निश्चित करू शकतो. त्यामुळे मतदारांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सामील व्हा, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांच्या नावे संदेशपत्र लिहून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आवाहनही केले आहे.

जिल्हाधिकारी म्हणतात की, भारत हा उत्सवप्रिय देश आहे. प्रत्येक उत्सव आपण सर्वजण मोठ्या आनंदाने साजरा करीत असतो. यावर्षीदेखील लोकशाहीचा उत्सव देशभरात साजरा होत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य पार पाडायचे आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये, म्हणून मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि मुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबद्ध आहे.

त्यामुळे येत्या 19 एप्रिल 2024 रोजी 13 – चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. लक्षात ठेवा मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आहे. त्यामुळे सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रातून केले आहे.

०००

प्रशासनाची सज्जता; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.१७ (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने १९- औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया दि.१८ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. दरम्यान ही सर्व प्रक्रिया नामनिर्देशनाने सुरु होणार असून त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता केली असून सर्व पूर्वतयारीचा अंतिम आढावा आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज घेतला.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी स्वामी यांच्या सह उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाच्या १०० मीटर परिसरातील सुरक्षा नियमांच्या अनुषंगाने बदल करावयाचे वाहतुक मार्ग, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्याबाबतचे मार्ग, वाहनांचे पार्किंग, उमेदवारी अर्ज दाखल करावयास येणाऱ्या उमेदवारांसाठी असणारे नियम इ. बाबत सुरक्षा यंत्रणांकडून आढावा घेण्यात आला. येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, आवश्यकतेनुसार दिशादर्शक फलक इ. तयारीचा आढावा घेण्यात आला. नामनिर्देशन दाखल करणे, त्यांची छाननी, उमेदवारी अर्ज माघारी घेणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर आवश्यक असणारा पोलिस बंदोबस्त व आयोगाच्या सुरक्षा निर्देशांची तपासणी करण्यात आली.

वाहतुक मार्गात बदल

१९-औरंगाबाद लोकसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया गुरुवार दि.१८ पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने दि.१८ (उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिनांकापासून) ते दि.२९ पर्यंत (उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिनांकापर्यंत) वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालय परिसरातील वाहतुक वळविण्यात आली आहे. दि.१८ ते दि.२९  दरम्यान दररोज सकाळी ९ ते सायं.६ दरम्यान या परिसरातील वाहतुक सर्व वाहनांसाठी बंद करुन अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे.

बंद वाहतुक मार्ग

चांदणे चौक- जिल्हाधिकारी कार्यालय ते विभागीय आयुक्त यांच्या निवासस्थानाजवळील टी- पॉईंट पर्यंत.

पर्यायी मार्ग– 

  • चांदणे चौक- अण्णाभाऊ साठे च्चौक- उद्धवराव पाटील चौक- सत्यविष्णू हॉस्पिटल चौक- एन १२ गणपती विसर्जन विहीर मार्गे येतील व जातील.
  • चांदणे चौक- फाजलपुरा- चेलीपुरा चौक- चंपा चौक- विभागीय आयुक्त निवासस्थानासमोरील दर्गा मार्गे येतील व जातील.

पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, अत्यावशयक सेवेच्या वाहनांना हा वाहतुक बदल लागू असणार नाही असे शहर वाहतुक शाखा -१ चे पोलीस निरीक्षक अमोल देवकर यांनी कळविले आहे.

०००

बीडमध्ये निवडणूक पार्श्वभूमीवर अवैध मद्यविक्री विरोधात मोहीम ९२ गुन्हे दाखल

बीड दि. १७ (जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर बीड लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात अवैध मद्य वाहतूक तसेच विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मोहीम राबविण्यात येत असून आतापर्यंत या अंतर्गत 92 प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर लगेच आचारसंहिता अमलात आली आणि त्यासोबतच राज्य उत्पादन शुल्क खात्यातर्फे या प्रकारच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. आचारसंहिता कालावधी सुरु झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तथा विक्री विरुद्ध जोरदार कारवाया सुरु केल्या असून आतापर्यंत एकूण 92 गुन्हे नोंद करण्यात आलेले असून त्यात 77 आरोपींना अटक तसेच  ₹ 12.91 /- लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आतापर्यंत केलेल्या कारवाईत प्रामुख्याने हातभट्टी निर्मिती केंद्रांवर तसेच अवैध मद्य वाहतुकीवर कारवाई यांचा समावेश आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ आचारसंहिता अनुषंगाने प्रमुख राज्य व राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्ह्यातील इतर रस्त्यांवर संशयित वाहनांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. हॉटेल व धाबाचालकांना सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटीस बजावण्यात आल्या असून अवैध मद्यविक्री अथवा सेवन करतांना कोणी आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती यांच्या दैनंदिन मद्यविक्रीवर देखील ऑनलाईन प्रणालीद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. विहित नियमांचे उल्लंघन करून मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

०००

 

नांदेडमध्ये मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू ; १८ ते २१ एप्रिल ज्येष्ठ व दिव्यांगाचे मतदान

नांदेड दि. १७ : निवडणूक आयोगातर्फे मतदारांना मतदार माहिती चिठ्ठी अर्थात पोल चीट (Voter Information Slip ) वाटप करण्यात येते. या मतदार चिठ्ठीमध्ये मतदाराचे नाव, परिसर, केंद्र कोणते, यादी क्रमांक, भाग क्रमांक, रुम क्रमांक इत्यादी आवश्यक माहिती आहे. नांदेड मतदार संघात मतदार चिठ्ठी वाटप गतीने सुरू असून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी अशा काही मतदारांच्या घरी पोल चिठ्ठी पोहचवून मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

16 नांदेड लोकसभातंर्गत 087 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चिखलवाडी, वजिराबाद व गुजराती हायस्कूल परिसरात मतदारांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना व नवमतदारांना पोलचिटचे  (मतदान माहिती चिठ्ठी ) वाटप केले. 85 वर्षे वयाच्यावरील नागरिकांना पूर्वकल्पना दिली. यापैकी काही मतदार हे होम व्होटिंग करणार आहेत. 12 डी फॉर्म भरून 699 मतदारांनी घरी पोस्टल मतदान करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. नांदेड दक्षिण बूथ नंबर 60 मध्ये होम वोटिंग लाभ घेत असलेल्या कस्तुरबाबाई शर्मा यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते मतदार चिठ्ठी देण्यात आली. त्यांना आश्वस्त केले, की तुमच्या घरी तुमचे मतदान नोंदवण्यासाठी टिम येईल. जेष्ठ वयोवृद्ध मतदार श्रीमती शर्मा यांनी यावेळी मतदान नोंदवणारच, असा निर्धार व्यक्त केला.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी काही नवमतदारांनी मतदार माहिती चिठ्ठी (पोलचिट ) स्विकारली. मी मतदान करणारच असा निर्धार व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी जेष्ठांमध्ये असणारा उत्साह तरुणांनी देखील दाखवावा, असे आवाहन केले आहे. यावर्षी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून नागरिकांनी सुदृढ लोकशाहीच्या जपवणुकीसाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू, गुजराती हायस्कूल नांदेड बुथ क्रमांक 60 चे बि.एल.ओ. पी.डी. कोळपेवाड व महानगरपालिका प्रा शा वजीराबाद बुथ क 57 चे बि.एल.ओ. सुधाकर, नांदेड दक्षिणचे बि.एल.ओ. समन्वयक गुलाम नबी हे उपस्थित होते.

०००

 

बीड लोकसभा मतदारसंघासाठी उद्यापासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास प्रारंभ

बीड, दि. १७ ( जिमाका ): लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत  39 बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात सोमवार, दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. यासाठी उमेदवाराकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया  उद्या, गुरुवार दि. १८ एप्रिल पासून सुरु होत आहे.

गुरूवार 18 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होत आहे. तसेच याच दिवसापासून दि. 25 एप्रिल 2024 पर्यंत 11 ते 3 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील जिल्हा नियोजन कार्यालयात नामनिर्देशन पत्र नि:शुल्क दिले जातील. तसेच संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात हे नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील.

नामनिर्देशन पत्रासोबत शपथ पत्र( नमुना 26 ) हा 25 एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत सादर करता येणार आहे. शपथपत्र अपूर्ण असल्यास दुसरे शपथपत्र सादर करण्याची अंतिम वेळ दिनांक 26 एप्रिल सकाळी 11 वाजेपर्यंत आहे.  इच्छुक उमेदवारांना आपल्या अर्जासोबत मतदार यादीची प्रमाणित पत्र दाखल करावी लागणार आहे.  फॉर्म ए व फॉर्म बी 25 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करावयाचे आहेत.

नामनिर्देशन पत्र सादर करतेवेळी अनुसूचित जाती तथा जमातीच्या उमेदवारासाठी  ₹12,500 /- तर सामान्य वर्गातील उमेदवारासाठी  ₹ 25000/- इतकी अनामत रक्कम आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल रोजी सायंकाळी ३ वाजेपर्यंत आहे. अपक्ष उमेदवारांसाठी दहा सूचक असणे आवश्यक आहेत. 29 एप्रिल रोजी ३ वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

उमेदवार त्यांचे नामनिर्देशन हे निवडणूक आयोगाच्या ‘सुविधा’ या वेब पोर्टलवरही उपलब्ध आहे. याद्वारे देखील ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन पत्र दाखल करता येतील. अशा प्रकारे सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाची  एक प्रत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे येऊन प्रत्यक्षरीत्या सादर करावी लागणार आहे.

०००

मतदान जनजागृतीच्‍या एलएईडी रथास जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्‍ते हिरवा झेंडा

नांदेड, दि. १७ : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून मतदान जनजागृतीसाठी एलईडी चित्ररथ तयार करण्यात आले आहेत. एलएईडी रथाचे आज जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी विकास माने, महापालिकेचे उपायुक्त अजिपालसिंह संधू, तहसीलदार निलेशकुमार बोलेलू, शिक्षणाधिकारी (नियोजन) दिलीप बनसोडे आदीची उपस्थिती होती.

या एलईडी रथाद्वारे मतदान जनजागृतीच्या चित्रफिती, नागरिकांनी मतदान करावे यासंदर्भातील जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त यांनी दिलेले निवेदन व आवाहन दाखविले जाणार आहे. निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाहीच्या या उत्सवात नांदेड लोकसभा मतदार संघातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, यासाठी मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदार जनजागृतीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

बसस्‍टॅडवरुन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते उद्घोषणा, पथनाट्य, निवडणूक प्रतिज्ञा आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून मतदार जनजागृतीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून मतदानाचे महत्त्व संबंधितांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या रथाद्वारे नांदेड लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. यावेळी स्वीपचे प्रलोभ कुलकर्णी, बालासाहेब कच्छवे, सुनील मुत्तेपवार, रवी ढगे आदींची उपस्थिती होती. जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल व महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे हे नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदार जनजागृती विषयक विविध उपक्रम राबवित आहेत.

०००

 

०००

पहिल्या टप्प्यात १.४१ लाख नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १७ :लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नवमतदारांची संख्या लक्षणीय असून यंदा 18-19 या वयोगटातील 1 लाख 41 हजार 457 नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवमतदारांनी मतदान करण्याचे आवाहन मुख्य निवडणूक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. मतदान केंद्रावर आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून दुर्गम भागातील मतदान केंद्रापर्यंत आवश्यक मतदान साहित्य पोहोच करण्यात येत आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअरसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदार नोंदणी करुन घेतली आहे.

18-19 वयोगटातील सर्वाधिक नवमतदार रामटेक मतदारसंघात आहेत. त्यापाठोपाठ भंडारा-गोंदिया या मतदारसंघात आहेत. रामटेक मतदारसंघात 31,725, भंडारा-गोंदिया 31,353, नागपूर 29,910, चंद्रपूर 24,443 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 24,026 इतके नवमतदार आहेत. यासह 20-29 वयोगटांतील सर्वाधिक मतदारही रामटेक मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 3,83,276,  भंडारा-गोंदिया 3,66,570, चंद्रपूर 3,42,787, नागपूर 3,37,961 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,28,735 इतके मतदार आहेत.

30-39 वयोगटातील सर्वाधिक मतदार हे नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 5,06,372, रामटेक 4,90,339, चंद्रपूर 4,25,829, भंडारा-गोंदिया 3,99,115 आणि गडचिरोली-चिमुर या मतदारसंघात 3,56,921 इतके मतदार आहेत.

पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीत 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक मतदार सर्वाधिक नागपूर मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात 70,698 इतके मतदार आहेत. त्यापाठोपाठ रामटेक 46,413, भंडारा-गोंदिया 38,269, चंद्रपुर 37,480 आणि गडचिरोली-चिमुर 33,559 असे एकूण 2,26,419 ज्येष्ठ  मतदार आहेत. येत्या 19 एप्रिल रोजी मतदान होणार असून सर्व मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे.

०००

पवन राठोड, स.सं

राज्यपालांनी घेतले प्रभू श्री रामाचे दर्शन; रामनवमीच्या दिल्या शुभेच्छा  

मुंबई, दि. १७ : रामनवमीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील श्रीगुंडी देवी मंदिर परिसरातील राममंदिरात जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. राज्यपालांनी उपस्थितांसह प्रभू रामाची माध्यान्ह आरती केली. राज्यपालांच्या वतीने सर्व उपस्थितांना यावेळी प्रसाद वाटप करण्यात आले. राज्यपाल श्री.बैस यांनी सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.

०००

 

ताज्या बातम्या

रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

0
मुंबई, दि. २७: - रायगड जिल्हा आणि पुणे घाट, सातारा घाट  परिसरात पुढील २४ तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या...

‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर फुलणार हसू

0
मुंबई, दि. 27 : बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेल्या टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर...

‘ई-लायब्ररी’ चे सरन्यायाधीशांच्या हस्ते लोकार्पण: वकील आणि कायदेक्षेत्राला नवी दिशा

0
अमरावती, दि. २६ (जिमाका): अमरावती जिल्हा वकील संघातर्फे आज  'स्व. ॲड. टी. आर. गिल्डा स्मृती ई-लायब्ररी'चे अमरावती ल्हा व सत्र न्यायालय इमारतीत उद्घाटन सिपना...

आरोग्य शिबिरातून मोफत अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

0
कोल्हापूर, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानातून जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सर्व विभागांमार्फत जिल्ह्यात चांगले काम सुरू आहे. विशेषत: आरोग्य विभागाकडून...

कारगिल युद्धातील सैनिकांचे बलिदान अविस्मरणीय  – पालकमंत्री शंभूराज देसाई 

0
सातारा दि.२६ : कारगिल युद्धात वीर शहीद झालेल्या सैनिकांचे कर्तव्य, धैर्य, धाडस, शौर्य व बलिदान सर्वांनी स्मरणात ठेवले पाहिजे. सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून त्यांच्या कुटुंबियांना...