मंगळवार, जुलै 29, 2025
Home Blog Page 820

सावधान….भारतीय लोकशाहीत पेड न्यूजला थारा नाही…!

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने दि.16 मार्च 2024 “आदर्श आचार संहिता” जाहीर केली आहे. लोकसभेत योग्य, कार्यक्षम व लोकाभिमुख दृष्टिकोन असलेला लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी प्रत्येक भारतीय  मतदाराने मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येते. मतदान करणे, हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याने मतदारांनी कुठल्याही आमिषाला वा प्रलोभनाला बळी पडू नये. तसेच धाकदपटशाहीला भीक न घालता मतदारांनी सद्सद्विवेकबुद्धीने मतदान करावे. महत्वाचे म्हणजे निवडणुका मुक्त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पडाव्यात, यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांनी अन् प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे निवडणूक आयोगाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मागील काही सार्वत्रिक निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर देशात काही ठिकाणी पेड न्यूज च्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. खरे तर, अशा घटना लोकशाहीला मारक आहेत. त्याचप्रमाणे पेड न्यूज हे मुक्त व शोधपत्रकारितेलाही बाधक आहे. यास्तव वृत्तपत्रे अन् त्यांच्या प्रतिनिधींनी “पेड न्यूज” ला अजिबात थारा देऊ नये. सर्वात महत्वाचे म्हणजे सुदृढ लोकशाहीसाठी उमेदवारांनीदेखील आपल्या प्रचार मोहिमेदरम्यान पेड न्यूजचा आधार घेवू नये. कारण पेड न्यूज हा लोकशाही संवर्धनाच्या मार्गातील मोठा अडसर आहे, हे लक्षात द्यावे.

प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पेड न्यूजसंदर्भात केलेली व्याख्या “एखाद्या उमेदवाराने पैशाच्या मोबदल्यात किंवा विशेष मेहरनजरेच्या बदल्यात प्रसिद्धी माध्यमाद्वारे केलेली बातमी, वृत्तांकन, विश्लेषण वा प्रसारण” अशी आहे. असे कृत्य केल्याचे निष्पन्न झाल्यावर त्या संबंधीत प्रसारमाध्यम, वृत्तपत्र आणि उमेदवाराच्या लोकप्रियतेला तडा जावून जनमानसातील विश्वासाहर्ता नाहीशी होत असते. म्हणजेच एखाद्या उमेदवाराने, राजकीय पक्षाने वा त्याच्या संघटना किंवा संस्थेने मतदारांना प्रभावित करण्याच्या हेतूने वर्तमानपत्रे, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया ( विभिन्न चॅनल्स) यांच्याद्वारे सोयीनुसार बातम्या प्रसिद्ध-प्रसारित करणे, हे सर्व प्रकारे पेड न्यूजच्या कक्षेत येतात, हे उमेदवार व माध्यमांनी जरूर लक्षात घ्यावे.

सांगण्याचे तात्पर्य म्हणजे वृत्तांकनाच्या (दृकश्राव्य) बदल्यात घेतलेला पैसा वा भेटवस्तू याला “भ्रष्टाचाराचे कृत्य” म्हणून घोषित केल्याने, तो आता शिक्षापात्र अपराध आहे. म्हणूनच पेड न्यूजसारख्या गैरप्रकारांना प्रसारमाध्यमांनी स्वतःहूनच मज्जाव करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

उमेदवारांनी प्रचार मोहिमेत केलेल्या खर्चाचा अचूक लेखा ठेवून, त्याचे विवरणपत्र संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तसेच खर्च नियंत्रण समितीच्या नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करणे, निवडणूक आयोगाने अनिवार्य केले आहे. त्यात कसूर करणे हाही एक अपराधच आहे, याची संबंधितांनी नोंद द्यावी.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तर “पेड न्यूज” हा निकोप पत्रकारितेची संभाव्य कीड आहे. यासाठी पत्रकारांनीच पुढाकार घेवून “पेड न्यूज” या अनैतिक बाबीला अस्वीकृत करून हद्दपार करायला हवे. वृत्तपत्रे व दूरचित्रवाहिन्यांनी पत्रकारितेची मूल्ये शिरसावंद्य मानून, लोकशाहीची बूज राखायला हवी. प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी हे लोकशाहीचे पाईक असल्याने, त्यांनी पत्रकारिता क्षेत्रातून पेडन्यूजला हद्दपार करण्यास कटिबद्ध व्हावे. घटनाकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना अन् भारतीय लोकशाहीचा जगाच्या पाठीवर सर्वत्र नावलौकिक आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील सर्वपक्षीय उमेदवार, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसारमाध्यमे (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे) या सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन लोकशाहीला मारक असलेल्या पेड न्यूजचा मार्ग अवलंबू नये, असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. आपण अशा प्रकारे कर्तव्यपूर्ती केल्यामुळे भारतीय लोकशाही जागतिक स्तरावर सदैव आदर्श लोकशाही म्हणून गणली जाईल, हे निश्चित!

00000

-मनोज सुमन शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

तथा नोडल अधिकारी, एकत्रित मीडिया कक्ष आणि

सदस्य सचिव माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती, ठाणे

 

 

 

अग्निशमन सेवा सप्ताहाची सांगता

मुंबई, दि. २० :  अग्निशमन सेवा सप्ताहाचा सांगता समारोह मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन समोरील मैदानावर २० एप्रिल रोजी पार पडला.

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई गोदीत एस. एस. फोर्ट स्टिकिन् या जहाजाला आग लागून झालेल्या भीषण स्फोटात अग्निशमन व विमोचनाचे कार्य करीत असताना मुंबई अग्निशमन दलाच्या ६६ जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सुचनेनुसार जनतेमध्ये अग्निशमनाबाबत जनजागृती निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी १४ ते २० एप्रिल या कालावधीत अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. या सप्ताहाचे उ‌द्घाटन राज्यपाल यांच्या शुभहस्ते राजभवन येथे १४ एप्रिल रोजी झाले. या सप्ताहाच्या सांगता समारोहासाठी प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृह मंत्रालय अग्निशमन सेवा-सिव्हील डिफेन्स व होम गार्डचे महासंचालक विवेक श्रीवास्तव, आयपीएस यांनी उपस्थित राहून संचलनाची मानवंदना स्विकारली. याप्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

राज्याचे अग्निशमन सेवा संचालक आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी संतोष वारीक यांनी अग्निशमन सेवा सप्ताहाबाबत प्रस्तावना केली. राज्यातील विविध महानगरपालिका, विशेष नियोजन प्राधिकरणे तसेच मुंबई पोर्ट ट्रस्ट, भाभा अॅटोमिक रिचर्स सेंटर, इत्यादींच्या अग्निशमन सेवांचे प्रमुख अग्निशमन अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

या सप्ताहामध्ये अग्निशमनाबाबत विविध प्रसार माध्यमांद्वारे जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात आले. या सप्ताहाचा एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. तसेच औद्योगिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी तसेच नियमीत अग्निशमन दलातील जवानांसाठी विविध फायर ड्रिल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच स्वातंत्र्यदिन-२०२३ आणि प्रजासत्ताक दिन-२०२४ या प्रसंगी ज्या अग्निशमन अधिकारी व जवानांना राष्ट्रपतींची अग्निशमन सेवा पदके जाहिर झाली त्यांना प्रमुख अतिर्थीच्या शुभहस्ते सन्मान चिन्हे प्रदान करुन त्यांना गौरविण्यात आले.

केंद्र शासन व राज्य शासन यांच्या मदतीने अग्निशमन सेवांची तूट टप्प्या-टप्याने भरुन काढण्यात येत आहे. राज्यात अग्निशमन कायदा सन २००८ पासून अंमलात आला असून यामध्ये काळानुरुप काही सुधारणा करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या सुधारणांमध्ये प्रामुख्याने शैक्षणिक इमारती, तसेच गोदामे आणि शीतगृहांच्या इमारतींची उंची वाढविणे, अग्निशमन व जीवसंरक्षक लेखा परीक्षकाची तरतूद करण्यात आलेली आहे, यासारख्या सुधारणा अग्निशमन कायदयात करण्यात येणार आहेत.

000

 

 

अजूनही मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी…

मुंबई, दि. २० : निवडणूक काळात प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण १० दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्यासाठी व हरकती मागवण्यासाठी हा साधारण १० दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

राज्यात पाचव्या टप्प्यात  दि. २० मे रोजी  धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर- मध्य, मुंबई दक्षिण- मध्य आणि  मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे. या मतदारसंघांसाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख ३ मे २०२४ आहे.

त्यानुसार, या लोकसभा मतदार संघातील ज्या पात्र नागरिकांनी दि. १ एप्रिल २०२४ रोजीपर्यंत आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असतील व त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नसेल, अशा नागरिकांनी या मतदारसंघामध्ये नवीन मतदार नोंदणीसाठी दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत अर्ज केल्यास (ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने) त्यांची नावे मतदार यादीत (अन्यथा पात्र असल्यास) समाविष्ट होऊ शकतील. यामुळे सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासून, जर नाव नसल्यास त्वरीत दि. २२ एप्रिल २०२४ पर्यंत मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ भरावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.

Ø  मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline अॅपचा वापर करून मतदार यादीत आपले नाव शोधा

वैयक्तिक तपशिलाच्या पर्यायांतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाच्या आधारे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे किंवा मोबाइल क्रमांकाच्या आधारे ( तो जर तुमच्या मतदार ओळखपत्राशी जोडला असेल तर) किंवा Voter Helpline App वर मतदार ओळखपत्रावरील क्यू आर कोड स्कॅन करूनही मतदार यादीत आपले नाव शोधता येते.

Ø  मतदार नोंदणीचा अर्ज कसा भरावा

अर्ज क्र. ६ – नवमतदार नोंदणी

ऑनलाइन पद्धतीने – voters.eci.gov.in हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline App चा वापर करून मतदार नोंदणीचा अर्ज भरा

ऑफलाइन पद्धतीने- आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाच्या स्वतःची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह आपल्या जवळच्या मतदार नोंदणी कार्यालयाला भेट द्या. अधिक तपशिलांसाठी लिंक:  https://ceoelection.maharashtra.gov.in/SearchInfo/VHCs.aspx

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून जन्माचा दाखल, भारतीय पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, दहावी किंवा बारावीचे निकालपत्र या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

मतदार नोंदणीच्या अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून भारतीय पासपोर्ट, आधारकार्ड,  राष्ट्रीय, श्येड्युल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबूक, पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,  नोंदणीकृत भाडे करार, नोंदणीकृत विक्री करार या दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

voters.eci.gov.in हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline या अॅपवरून मतदार नोंदणीचा अर्ज क्र. ६ कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या CEO Maharashtra या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांचे दुवे :

फेसबूक: https://www.facebook.com/ChiefElectoralOfficerMaharashtra

युट्यूब: https://www.youtube.com/@ceomaharashtra211

इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/ceo_maharashtra/

एक्स (ट्विटर): https://twitter.com/CEO_Maharashtra

निवडणूक प्रक्रियेविषयीच्या शंका किंवा प्रश्नांसाठी १८०० २२ १९५० या मतदार मदत क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

 

… संधी अजूनही आहे !

महाराष्ट्र राज्यात पाचव्या टप्प्यातले मतदान दि.20 मे, 2024 रोजी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेचा केंद्रबिंदू म्हणजे मतदार. मतदान करण्यासाठी पात्र असलेला आणि मतदानाची इच्छा असलेला कोणीही मतदार मतदानापासून वंचित राहू नये. हयासाठीची  सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मतदार यादीत नाव असायला पाहिजे. आपण राहतो तिथल्या मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध आहे. त्याचा वापर करुन प्रत्येकच मतदाराने आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करायला हवी. आपल्याला मतदानासाठी कोणत्या ठिकाणी जावे लागेल, ते सुध्दा पाहून ठेवावे. म्हणजे मग ऐन वेळेची धावपळ होणार नाही.

दि.20 मे, 2024 रोजी मतदान होणार असलेले मतदारसंघ

१)    मतदार संघ क्र.2 – धुळे

२)    मतदार संघ क्र.20- दिंडोरी

३)    मतदार संघ क्र.21 – नाशिक

४)    मतदार संघ क्र.22-पालघर

५)    मतदार संघ क्र.23-भिवंडी

६)    मतदार संघ क्र.24- कल्याण

७)    मतदार संघ क्र.25-ठाणे

८)    मतदार संघ क्र. 26- मुंबई उत्तर

९)    मतदार संघ क्र.27- मुंबई उत्तर-पश्चिम

१०)  मतदार संघ क्र.28- मुंबई उत्तर- पूर्व

११)  मतदार संघ क्र.29- मुंबई उत्तर- मध्य

१२)  मतदार संघ क्र. 30- मुंबई दक्षिण- मध्य

१३)  मतदार संघ क्र.31- मुंबई दक्षिण

निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर नामांकनाच्या अखेरच्या दिवसाच्या साधारण 10 दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणीसाठी आलेले अर्ज हे मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने विचारात घेतले जातात. या अर्जांची आणि पुरावा म्हणून जोडलेल्या दस्तऐवजांची पडताळणी करण्याच्या दृष्टीनेच हा साधारण 10 दिवसांचा कालावधी गृहीत धरला गेला आहे.

पाचव्या टप्प्यात निवडणुकीत या मतदारसंघासाठी नामनिर्देशन सादर करण्याची अखेरची तारीख 3 मे, 2024 आहे. त्यानुसार या मतदारसंघांमधील पात्र नागरिकांनी म्हणजेच मतदार नोंदणीसाठीची अर्हता दिनांक असलेल्या 1 एप्रिल, 2024 रोजीपर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या आणि भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींनी मतदार नोंदणीसाठी 22 एप्रिल, 2024 पर्यंत केलेले अर्ज मतदार यादीत नाव येण्याच्या दृष्टीने कार्यवाहीसाठी ग्राहय धरले जाऊ शकतील. अशावेळी सर्व पात्र नागरिकांनी उपलब्ध  कालावधीचा लाभ घेण्याकरिता मतदार यादीत आपले नाव तपासून घेणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव तपासताना आपले नाव त्यामध्ये नाही, हे लक्षात आल्यावर दि.22 एप्रिल, 2024 पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने  अर्ज केला पाहिजे.

मतदार यादीत नाव कसे तपासावे

voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline  ॲपचा वापर करुन मतदार यादीत आपले नाव शोधा.

१)    वैयक्तिक तपशीलाच्या पर्यायाअंतर्गत नाव, आडनाव, वडील किंवा पतीचं नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ या तपशिलाआधारे

                               किंवा

२)     मतदार ओळखपत्र क्रमांक असेल तर त्याआधारे

                               किंवा

३)    मतदार ओळखपत्र क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक जोडला असेल तर त्याआधारे

                               किंवा

४)     Voter Helpline App  वर मतदार ओळखपत्र क्रमांकावरील किंवा क्यू आर कोडद्वारे

मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याच्या दोन पध्दती आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन – सोईप्रमाणे कोणतीही एक पध्दत वापरली तरी चालेल-

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी voters.eci.gov.in  हे संकेतस्थळ किंवा Voter Helpline   ॲपचा वापर करुन मतदार नोंदणीचा अर्ज भरता येतो. त्यासाठी युजरनेम पासवर्ड तयार करावा लागेल आणि  त्यासाठीच्या सूचना स्क्रीनवर दिसतीलच.

आपल्या सर्वसाधारण निवासी पत्त्यानुसार आपला विधानसभा मतदारसंघ, जिल्हा आणि राज्य हा तपशील देण्यासाठी ड्रॉपडाऊन मेन्यू उपलब्ध आहे. आपले नाव, लिंग, जन्मतारीख किंवा वय, दिव्यांगत्व, मोबाईल क्रमांक आणि ईमेल (स्वत:चा  किंवा नातेवाईकांचा) यासंबंधीचे वैयक्तिक तपशील भरल्यावर आपल्या सर्वसाधारण निवासाच्या पत्त्याचे तपशिल भरा. आपले छायाचित्र तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेला पुरावा जोडा, त्यासाठी फाईल अपलोड सुविधा उपलब्ध आहे.

अर्ज दाखल केल्यावर मिळालेला संदर्भ क्रमांक वापरुन वेळोवेळी आपल्या अर्जाची स्थितीगती जाणून घ्या, थोडक्यात आपल्या अर्जाचे  तुम्ही ट्रॅकींग करु शकता.

ऑफलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी आपल्या  जवळच्या मतदार नोंदणी  कार्यालयात जावे लागेल. आपले छायाचित्र, तसेच वय आणि सर्वसाधारण निवासाचा स्वत:ची स्वाक्षरी असलेल्या पुराव्यासह अर्ज  तिथे सादर करावा लागेल. आपल्या मतदार संघातल्या मतदार नोंदणी कार्यालयाचा तपशील ceo Maharashtra  हया वेबसाईटवर उपलब्ध आहे.

 

मतदार नोंदणी अर्जासोबतच वयाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    जन्माचा दाखला

२)    भारतीय पासपोर्ट

३)    पॅन कार्ड

४)    ड्रायव्हिंग लायसन्स

५)    आधार कार्ड

६)    दहावी किंवा बारावीचे निकालपत्र

मतदार म्हणून नोंद करण्यासाठी 18 वर्षाच्या वरती वय असणे  आवश्यक आहे. हया निवडणुकीसाठी 1 एप्रिल, 2024 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदानाची संधी मिळू शकते. म्हणजे, हया 1 एप्रिलला वयाची 18 वर्षे पूर्ण झालेला नवमतदार मतदान करु शकतो आणि  आपल्या पहिल्या वहिल्या मतदानाचा आनंद मिळवू शकतो.  “मी मतदान केले” असे  अभिमानाने सांगू शकतो.

 

मतदार नोंदणी अर्जासोबतच सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून खाली नमूद दस्तऐवजांपैकी  कोणताही एक दस्तऐवज जोडता येईल.

१)    भारतीय पासपोर्ट,

२)    आधारकार्ड,

३)    राष्ट्रीय,  श्येडयुल्ड बँक किंवा टपाल विभागाचे खात्याचे चालू पासबुक

४)    पाणी, वीज तसेच स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे किमान एका वर्षाच्या आतील देयक,

५)    नोंदणीकृत भाडे करार,

६)    नोंदणीकृत विक्री करार

*आपल्याकडे यापैकी कोणतेही दस्तऐवज नसतील तर वय किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही दस्तऐवज देता येईल.

 

निवासाचा पुरावा महत्वाचा ठरतो कारण त्यावर कोणत्या मतदारसंघाच्या कोणत्या भागामध्ये मतदार म्हणून नावाची नोंदणी होणार, ते ठरते.  बेघर, देहव्यवसाय करणारे किंवा तृतीयपंथी या प्रवर्गातील अर्जदाराकडे वय किंवा रहिवासाचा पुरावा म्हणून कोणताच दस्तऐवज नसेल, तर असे अर्जदार पुरावा म्हणून स्वत: स्वाक्षरी केलेलं स्व-घोषणापत्र देऊ शकतात. भारत निवडणूक आयोगाने हया समाजघटकांचा विशेष विचार करुन ही सूट दिलेली आहे.

जर अर्जदाराकडे, वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा यापैकी कोणताही दस्तऐवज नसेल, तर ते त्यांच्याकडे वय आणि सर्वसाधारण निवासाचा पुरावा म्हणून उपलब्ध असलेला इतर दस्तऐवजही देऊ शकतात.

voters.eci.gov.in   हे संकेतस्थळ तसेच Voter Helpline  या ॲपवरुन मतदार नोंदणीचा अर्ज क्र.6 कसा भरावा, मतदार यादीत नाव कसे तपासायचे याचे मार्गदर्शनपर व्हिडिओ मुख्य निवडणुक अधिकारी कार्यालयाच्या  (ceo Maharashtra) युटयूब वाहिनीवर आणि  सर्व समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. उत्साही मतदारांनी जरुर तेथून मार्गदर्शन घ्यावे.

भारतीय राज्यघटनेने प्रौढ मताधिकाराचे अनमोल देणे आपल्या सगळयांना दिलेले आहे. आपल्या देशाची व्यवस्था आणि भविष्य हयाबाबत निर्णय घेण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे.  मतदार यादीमध्ये नाव आहे की नाही, हे तपासण्यासाठी भारत निवडणुक आयोगाने चालू काळाला अनुसरुन तंत्रज्ञानाच्या आधारे सुंदर सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.  मतदानाच्या दिवशी एखादया मतदान केंद्रावर जाऊन आपले नाव मतदार यादीमध्ये नसल्याचा साक्षात्कार होणे सजग नागरिकाला शोभणारे नाही. आधीच मतदार यादीतले आपले नाव आणि मतदान केंद्र पाहून ठेवणे सहज शक्य आहे. जाणतेपणाचे ते लक्षण आहे. मतदानाच्या दिवशी आपले मतदान केंद्र शोधत सैरावैरा फिरणारे तांडे आणि त्यांच्या यंत्रणेवर पडणारा ताण ह्याची मुळी आवश्यकताच नाही.  मतदान करण्यास पात्र असूनही आपले नाव मतदार यादीत नसेल तर ही बाब भारतीय  नागरिक म्हणूवन घेणाऱ्याला नामुष्कीची वाटायला हवी. मतदार यादीत नाव असूनही मतदानाचा हक्क न बजावणाऱ्या नागरिकांबद्दल काय बोलावे ? स्वत:चे इतर सारे हक्क गाजवायला सतत उत्सुक असा हा वर्ग हया महत्वाच्या हक्क-कर्तव्याला कसा विसरतो ? स्वत:ला आणि आजूबाजूच्या मतदारांना “मतदान करायचे आहे”, अशी आठवण करुन देण्याइतकी सोपी गोष्ट आपल्या साऱ्यांनाच  करता येईल. प्रगल्भ लोकशाहीच्या वाटचालीतले ते एक छोटेसे पाऊल असेल.

– डॉ.किरण कुलकर्णी,

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी,

महाराष्ट्र राज्य.

000

‘महिला मतदार, मतदान करणार’

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- बचतगटांद्वारे संघटीत महिलांनी महिला मतदारांमध्ये मतदानाचे महत्त्व सांगावे. त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रेरित करावे. आणि ‘महिला मतदार, मतदान करणार’ या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व महिला मतदारांनी आपण मतदान करणारच असा निर्धार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

वंदे मातरम सभागृहात आज महिला बचत गटांचा मतदार जनजागृतीबाबत मेळावा पार पडला. स्वीप नोडल अधिकारी सुदर्शन तुपे, मनपा उपायुक्त पांढरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक अशोक शिरसे,  स्वप्निल सरदार, माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास तसेच तालुका समन्वयक, महिला बचत गट सदस्य, बचत गटाच्या प्रमुख यांची मेळाव्यास उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, महिला बचत गटाच्या महिलांचा संपर्क गावातील अन्य महिलांशी असतो. त्यामुळे त्यांनी आपापल्या गावात आर्थिक सक्षमीकरणासोबतच लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी योगदान द्यावे. प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, हे त्यांना सांगावे. महिलांनी स्वतः मतदान करण्याबरोबरच इतरांनाही मतदान करण्याचा संदेश द्यावा.       आपण नागरिक म्हणून ज्या सेवा सुविधा, हक्क अधिकार प्राप्त करतो त्यासोबतच मतदान करण्याचे कर्तव्यही आपण पुर्ण केले पाहिजे. योग्य उमेदवार निवडणूक यावा यासाठी मतदानाचे प्रमाण वाढणे महत्त्वाचे आहे.  भावी पिढी संस्कारक्षम घडावी यासाठी महिला आपल्या मुलांवर संस्कार करतात. त्याचप्रमाणे भावी पिढीला समृद्ध, सुदृढ लोकशाही मिळावी यासाठी महिलांनी मतदान करायला हवे. ‘महिला मतदार मतदान करणार’, या घोषवाक्यानुसार स्वतःसह इतर महिलांनाही मतदानाचे महत्त्व सांगून मतदान करण्यास प्रवृत्त करावे, असे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.महिलांच्या  मतदानाची टक्केवारी  वाढवण्यात आपला सहभाग असावा असा निर्धार महिलांनी येथे करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ग्रामीण भागातील महिलांच्या सहभागामुळे जिल्ह्यात महिलाच्या मतदानाचे प्रमाण वाढेल, जिल्ह्याच्या मतदानाचा टक्का पाहिजे.

महिला बचत गटांच्या या मेळाव्यात कीर्तन, पथनाट्य व विविध उपक्रमातून मतदान जागृती चे कार्यक्रम  सादर करण्यात आले.

प्रास्ताविक अशोक शिरसे यांनी केले. स्वीपचे नोडल अधिकारी सुदर्शन तुपे यांनीही मनोगत व्यक्त केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प समनव्यक सुचिता खोतकर यांनी केले.

०००००

मतदार साहाय्यता क्रमांकावरून मतदारांच्या शंकांचे निरसन

मुंबई दि.20: भारत निवडणूक आयोगाच्या १८००२२१९५० मतदार साहाय्यता क्रमांकावर दिनांक १८ एप्रिल २०२४ पर्यंत ७३१२ इतके फोन आलेले आहेत. सर्व फोन कॉल्सना व्यवस्थित उत्तरे देण्यात आली असून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी यांनी दिली आहे.

यामध्ये सर्वसामान्य माहिती, अर्जाची स्थितिगती, मतदार ओळखपत्र प्राप्त न होणे, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणे, स्थलांतर केल्यानंतर पत्त्यातील बदल, विविध दुरुस्त्या, नाव वगळणी, मतदार ओळखपत्र आधारकार्डाशी जोडणे, मतदार ओळखपत्र हरवणे, मतदार ओळखपत्राशी मोबाइल क्रमांक जोडणे, इत्यादी विषयांच्या अनुषंगाने माहिती विचारणारे फोन आलेले आहेत. आलेल्या फोनमध्ये सर्वसामान्य माहिती विचारणारे फोन सर्वाधिक होते. असे १३३२ फोन आले. सर्वसामान्य माहितीमध्ये मतदारसंघाचा संपर्क क्रमांक व पत्ता, ऑनलाईन अर्जाबाबत माहिती विचारली गेली. त्या खालोखाल अर्जाची स्थितिगती जाणून घेण्यासाठी ५०७, मतदार यादीत नाव तपासण्यासाठी ५०३, मतदार ओळखपत्र प्राप्त न झाल्याबद्दल ४७०, नवमतदार नोंदणीसाठी ४५४ फोन आले. उर्वरित फोन संकीर्ण माहितीसाठी विचारण्यात आले.

महाराष्ट्रातील मुंबई उपनगर या जिल्ह्यातून सर्वाधिक फोन आले, त्यांची संख्या १५७५ इतकी होती. ठाणे जिल्ह्यातून ९९१, मुंबई शहरातून ५२०, रायगडमधून १८२ आणि पुण्यातून १६३ फोन आले.

१८००२२१९५० या मतदार साहाय्यता क्रमांकाशिवाय महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत ०२२ – २२०२१९८७ आणि ०२२ – २२०२६४४२ हे दोन अतिरिक्त क्रमांकही मतदारांना त्यांच्या मनातील शंका व प्रश्न विचारण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मतदारांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी 24 तास मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे आणि समाधानकारक उत्तरे देण्यात येत आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

0000

 

गडचिरोलीत १११ वर्षाच्या फुलमती यांचे मतदान

गडचिरोली दि.२० (जिमाका): १२-गडचिरोली-चिमूर मतदारसंघात १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार या वृद्ध महिलेने गृह मतदानाची सुविधा नाकारत  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आपले मतदान नोंदविले. फुलमती बिनोद सरकार या मुलचेरा तालुक्यातील गोविंदपूर येथील रहिवासी आहेत.  त्यांचा  जन्म १ जानेवारी १९१३ रोजीचा आहे. नातवाच्या  दुचाकीवर बसून त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन स्वतः मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला.

लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी होत मतदानासाठी  बाहेर निघत होते. यातच तरुण मतदारांनाही लाजवणारा उत्साह दाखवत, या १११ वर्षांच्या आजींनी मतदान केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष मतदान केले. वयोवृद्ध फुलमती सरकार यांनी स्वतः मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्यासाठी घेतलेला पुढाकार  इतर  मतदारांपुढे एक आदर्शवत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिली आहे. तर अहेरी विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक अधिकारी आदित्य जीवने यांनी फुलमती आजीचे अभिनंदन करत मतदान प्रक्रियेत नोंदवलेल्या सहभागाबद्दल त्यांना धन्यवाद दिले आहे.

0000

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल

मुंबई, दि. १९ : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील ११ मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत एकूण ३६१ उमेदवारांचे ५२२ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात २८ उमेदवारांचे ४० अर्ज, बारामती – ५१ उमेदवारांचे ६६ अर्ज, उस्मानाबाद – ३६ उमेदवारांचे ७७ अर्ज, लातूर – ३६ उमेदवारांचे ५० अर्ज, सोलापूर – ४१ उमेदवारांचे ५३ अर्ज, माढा – ४२ उमेदवारांचे ५५ अर्ज, सांगली – ३० उमेदवारांचे ३९ अर्ज, सातारा – २४ उमेदवारांचे ३३ अर्ज, रत्नागिरी -सिंधुदुर्ग – ९ उमेदवारांचे १३ अर्ज, कोल्हापूर – २८ उमेदवारांचे ४१ अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात ३६ उमेदवारांचे ५५ अर्ज दाखल झाले आहेत.

0000

बी.सी.झंवर/विसंअ/

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघातील मतदान शांततेत; सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे ६०.२२ टक्के मतदान

              मुंबई, दि. 19 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदार संघांमध्ये आज दि.19 एप्रिल 2024 रोजी शांततेत मतदान पार पडले असून पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 60.22 टक्के मतदान झाले असल्याची माहिती  मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.

            पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय  मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : ९-रामटेक ५८.५० टक्के, १०-नागपूर ५३.७१ टक्के, ११-भंडारा- गोंदिया ६४.०८ टक्के, १२-गडचिरोली- चिमूर ६७.१७ टक्के आणि १३- चंद्रपूर ६०.०३ टक्के.

0000

निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली विकसित

मुंबई, दि. १९ : लोकसभा निवडणुका निर्भिड व निःपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे. निवडणुका निःपक्षपातीपणे पार पाडण्याच्या मार्गातील महत्त्वाचा अडथळा म्हणजे काही समाज घटकांकडून मतदारांना देण्यात येणारी विविध आमिषे (उदा. पैसा, मौल्यवान वस्तू, दारु इ.) आहेत. या आमिषांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे विविध उपाययोजना आखल्या असून त्याचाच एक भाग म्हणून भारत निवडणूक आयोगाद्वारे दि.१ डिसेंबर २०२३ च्या पत्राद्वारे दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने राज्यांच्या स्तरावर कार्यरत केंद्र व राज्य शासनाच्या अखत्यारीतील १९ अंमलबजावणी यंत्रणांच्या प्रत्येकी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची निवडणूक खर्च सनियंत्रण करण्याकरीता समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. याच अनुषंगाने विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे तपासणीकरीता अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद होण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाद्वारे निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली (Election Seizure Management System) विकसित केली आहे.

या प्रणालीवर अंमलबजावणी यंत्रणा तसेच जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथक यांच्याद्वारे अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद करण्याकरीता निवडणूक खर्च राज्यस्तरीय समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथक व स्थायी देखरेख पथक यांना ऑनबोर्ड करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या १६०० हून अधिक फिरती पथके आणि दोन हजारहून अधिक स्थिर पथके कार्यरत आहेत. दि.१ मार्च २०२४ पासून निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणालीवर (Election Seizure Management System) अंमलबजावणी यंत्रणांद्वारे अडविलेला (Intercept) व जप्त (Seizure) केलेला माल यांची त्याच वेळेस नोंद घेण्याची कार्यवाही सुरु आहे.

०००

वंदना थोरात/विसंअ

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून टिळक कुटुंबियांचे सांत्वन

0
पुणे, दि.२८: लोकमान्य टिळक यांचे पणतू आणि केसरीचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे १६ जुलै रोजी निधन झाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज...

शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शक सूचना; शासन निर्णय निर्गमित

0
मुंबई, दि. २८ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबाबत नवे मार्गदर्शक नियम जाहीर केले असून त्याबाबतचा...

नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
नागपूर, दि. २८ :  नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांनी किशोरवयातच जागतिक बुद्धिबळस्पर्धेत विजेतेपद पटकावले असून 'ग्रँड मास्टर' हा  किताब मिळविला आहे,...

महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल करू – क्रीडा...

0
पुणे, दि.२८: क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. महाविद्यालयामध्ये खेळाडू कोट्यातील रिक्त जागेवर खेळाडूंना देण्यात येणाऱ्या प्रवेशाबाबत नियमात आवश्यक ते बदल...

पुणे शहरातील पाणीगळतीच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी कृतीदल स्थापन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे...

0
पुणे, दि. २८: पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी मिळणाऱ्या पाण्याची गळती, नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावरील प्रक्रिया, प्रक्रिया न करता सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण आदींच्या अनुषंगाने...