शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 815

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची तरुणाईला साद

लातूर, दि. 03 : युवावर्ग हा देशाचे भविष्य असून आपल्या देशातील वैभवशाली लोकशाही परंपरा अधिक बळकट करण्यासाठी युवावर्गाने आपला मतदानाचा हक्क बजावावा. तसेच आपल्या कुटुंबातील आणि मित्र परिवारातील प्रत्येक व्यक्तीचे मतदान करून घेण्यासाठी युवक-युवतींनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले. निमित्त होते जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत आयोजित मतदार जागृती कार्यक्रमाचे. यावेळी उपस्थित युवा मतदारांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजाविण्याचा निर्धार करीत जनजागृती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, स्वीपचे नोडल अधिकारी रामदास कोकरे आणि नागेश मापारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त बालाजी मरे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, स्वीप समन्वयक रामेश्वर गिल्डा, विजय माळाळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि युवक यावेळी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुलावर सकाळी साडेसहा वाजता सुरु झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी मतदार जागृतीपर गीतांवर आधारित झुम्बा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा संकुलावर नियमितपणे व्यायामासाठी आणि विविध खेळांच्या सरावासाठी येणारे युवक-युवती यांनी या झुम्बा डान्समध्ये सहभागी होत ठेका धरला. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल यांनीही यामध्ये सहभागी होत उपस्थितांचा उत्साह वाढविला. या माध्यमातून युवा वर्गापर्यंत मतदानाचे महत्व गीताच्या माध्यमातून पोहाेचविण्यात आले.

मतदार जागृतीसाठी जिल्हा क्रीडा संकुलावरील 400 मीटर स्वीप ध्वजाची मिरवणूक आयोजित करण्यात आली. उपस्थित युवावर्ग, नागरिकांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली. तसेच विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून महाराष्ट्र राज्याचा नकाशा साकारून मतदार जागृतीचा संदेश दिला. जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित स्वाक्षरी मोहिमेस जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते यावेळी प्रारंभ झाला. दयानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक संदीपन जगदाळे यांनी आपल्या पहाडी आवाजात मतदार जागृतीचा पोवाडा सादर करून आपल्या देशातील निवडणूक प्रक्रियेचा इतिहास मांडला. तसेच ही लोकशाही व्यवस्था बळकट करणे आपल्या सर्वांची जबाबदारी असून प्रत्येकाने 7 मे रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.

लोकशाही बळकट करण्याची जबाबदारी तरुणाईवर : जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. साहजिकच आपल्या देशात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. लोकशाही व्यवस्थेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा अमूल्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराने हा अधिकार बजाविणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका तरुणाईची आहे, तरुणाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे येत्या 7 मे रोजी लातूर लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानामध्ये लातूरला अग्रेसर बनविण्याचा निर्धार युवक-युवतींनी करावा. प्रत्येक युवक-युवतीने 7 मे रोजी मतदान करावे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य, आपल्या मित्र-मैत्रिणी यांना मतदानासाठी आग्रह धरून त्यांचे मतदान होईल, यासाठी पाठपुरावा करावा. आपल्या जिल्ह्याला मतदानात नंबर वन बनविण्यासाठी प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.

*****

‘दिलखुलास’मध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ‘लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर सोमवारी मुलाखत

मुंबई, दि. ३ : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज’ या विषयावर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात घेण्यात आली आहे. ही मुलाखत सोमवारी ६ मे रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्थेबाबत नियोजन, सर्व घटकातील मतदारांसाठी  करण्यात आलेल्या सोयीसुविधा याबाबत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी  अमोल  येडगे यांनी माहिती दिली आहे.

००००

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांची नियुक्ती

मुंबई, दि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८-मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी स्तुती चारण (IAS) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

       उमेदवारांना अथवा नागरिकांना निवडणूक संदर्भात संपर्क साधावयाचा असल्यास 8591366725 या भ्रमणध्वनीवर अथवा 22-20852870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांनी केले आहे. निवडणूक निरीक्षक स्तुती चारण यांचा पत्ता – मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पिरोजशहा सांस्कृतिक सभागृह, स्टेशन साईड कॉलनी, गोदरेज कॉलनी, विक्रोळी पूर्व, मुंबई – ४०० ०५१  असा आहे. भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार दु.१२.०० ते १.०० अशी आहे.

जम्मू आणि उधमपूर येथे राहणाऱ्या विस्थापितांसाठी ‘फॉर्म-एम’ची प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाकडून रद्द

मुंबई उपनगर, दि. 3 : लोकसभा निवडणुका 2024 मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना  मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म  एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम  सोबत जोडलेल्या प्रमाणपत्राचे स्व-प्रमाणन अधिकृत केले आहे, त्यामुळे हे प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्याद्वारे प्रमाणित करून घेण्याची धावपळ वाचेल.

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आयोगाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली.

प्रत्येक निवडणुकीत फॉर्म – एम भरताना येणाऱ्या अडचणी आणि त्यामुळे मताधिकाराचा अधिकार बजावण्यात होणारा त्रास याबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून विविध निवेदने प्राप्त झाली. जम्मू आणि काश्मीरच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी देखील योग्य विचारविनिमय करून आणि राजकीय पक्षांच्या पूर्ण सहमतीने 9 एप्रिल रोजी आयोगाला टिप्पण्या सादर केल्या. या योजनेबाबत अनेक काश्मिरी स्थलांतरित गटांकडून प्राप्त झालेली निवेदने, राजकीय पक्षांचे अभिप्राय आणि जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या टिप्पण्या विचारात घेतल्यानंतर, काश्मिरी विस्थापितांनी संक्रमण शिबिरांमध्ये वैयक्तिकरित्या मतदान करण्याची आणि दिनांक 11 एप्रिलच्या आदेशाद्वारे, लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित टपाल मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया आयोगाने अधिसूचित केली.

—–000—–

दीपक चव्हाण/स.सं

महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा –जिल्हा निवडणूक अधिकारी

बीड.दि. (जिमाका): महिलांनी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात  प्रगती साधली आहे. मतदारांमध्ये जनजागृतीचे कामही महिला उत्कृष्टपणे पार पाडत आहे. बीड लोकसभा मतदार संघातील निवडणुका सोमवार दिनांक 13 मे रोजी होणार आहेत. यामध्ये महिलांनी नि:संकोचपणे स्वविवेकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी केले आहे.

 

बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये 55 महिला मतदान केंद्र असून मतदान केंद्राच्या ठिकाणी महिला अधिकारी कर्मचारी तैनात असतील.

महिलांचा मतदानात सक्रिय सहभाग असावा यासाठी स्तनदा माता, गरोदर महिला, लेकुरवाळ्या स्त्रियांसाठी मतदान केंद्रावर तात्पुरत्या अंगणवाड्या उभारण्यात येत आहेत. या  ठिकाणी पाळणा लहान मुलांसाठी, खेळणी असणार आहेत. स्तनपान कक्ष, गरोदर मातांसाठ आरामाची सुविधा आदींबाबत तयारी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

प्रशासनातील महिला अधिकारी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्नरत

जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या स्वतः दिवस-रात्र काम करून बीड लोकसभा मतदार संघातील मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे, यासाठी प्रयत्नरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात सर्वच अधिकारी कर्मचारी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी तयारीत आहेत.

यासह बीड विधानसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव यादेखील अधिकाधिक मतदान विधानसभा मतदारसंघात व्हावे, यासाठी तयारीला लागल्या आहेत.

कायदा सुव्यवस्था नीट राहावी, याकरीता आंबेजोगाईच्या अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके या सज्ज आहेत.

महिलांनी मतदानाच्या दिवशी सक्रिय राहावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक संगीता देवी पाटील यादेखील प्रयत्न करत आहेत.

माजलगाव तालुक्याच्या तहसीलदार वर्षा मनाळे, तहसील मध्ये निवडणुकीची प्रक्रिया नीट व्हावी यासाठी कार्यरत आहेत.

माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीच्या सदस्य सचिव तथा मीडिया कक्षाच्या प्रमुख अंजू निमसरकर काम पाहत आहेत. यासह तहसीलदार तेजस्विनी जाधव आणि सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती वसुधा रघाताटे या ही निवडणुकीच्या जबाबदाऱ्या कर्तव्यपूर्णरित्या पार पडत आहेत. याशिवाय विविध विभागातील निवडणुकीची प्रक्रिया पार पडणाऱ्या अधिनस्ताच्या आदेशाचे काटेकोरपणे महिला कर्मचारी पालन करीतआहेत.

या सर्व महिला अधिकाऱ्यांनी व महिला कर्मचाऱ्यांनी आवाहन, केले आहे बीड लोकसभा मतदारसंघातील महिलांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा.

०००

खान्देशची भरीत रेसिपी व्हाया मतदान जागृती संदेश एकच… तुमच ‘मत अनमोल आहे’

जळगाव दि.३ (जिमाका): प्रत्येक भागाच्या खाद्य संस्कृतीची म्हणून एक ओळख असते. तशी भरीत हे खान्देशच्या खाद्यसंस्कृतीची आद्य ओळख.. मग हीच खाद्य संस्कृती पोटातून बोटात आणण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी खान्देशच्या किचनमध्ये जाऊन मतदान जागृतीचे केलेले आवाहन हा लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरले.. आणि महिलांना मत देण्याच्या स्वातंत्र्याचा गौरव महिलांमध्ये मत केलंच पाहिजे हे बळ निर्माण करण्यास हा व्हिडीओ कारणीभूत ठरत आहे.

 

भरीत करण्यापेक्षाही मतदान करणं सोपं

स्त्रियांना एखादा आवडीचा पदार्थ घरच्यांना खाऊ घालायचा असेल तर जरा निवांत वेळ हवा असतो.. अन तो निवांत वेळ सुट्टीचा असतो.. यावर्षी मतदानाला लागून शनिवार, रविवार आहे, त्यामुळे निवांतपणा मिळू शकतो पण मतदान विसरु नये. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी महिलांच्या किचनमध्ये जाऊन कशी असते भरीत रेसिपी हे जाणून घेतले… ते जाणून घेताना भरीत जसं भाजावं लागतं, नंतर साल काढावी लागते, तसंच मतदान केंद्रावर जाऊन तुम्हाला मतदार यादीत तुमचं नाव बघून, तुमचे ओळख पत्र दाखवून, बोटाला शाई लावली जाते.. तुम्ही साल काढलेल्या वांग्याची पेस्ट करून त्याला कांदा, जिरे, लसूण इतर मसाल्याबरोबर तडका देता मग ते भरीत चवदार होते… तसंच बोटाला शाई लावल्यानंतर मतदान करायला मतदान बॉक्समध्ये जाऊन तुमच्या मनात क्षणभर विचार येतो त्यावेळी तुम्ही पूर्ण स्वातंत्र्य असता, तुमच्यावर कोणाचाही दबाव नसतो…आणि तुमच्याकडून बटण दाबले जाते.. त्या तुमचं मत असतं त्याला लोकशाही मध्ये अमूल्य असं महत्त्व असतं.. मग तुम्ही एवढं अमूल्य मत करायलाच हवं.. त्यासाठी कोणतेही कारण न सांगता मतदान करायचं… आणि मतदान करणं हे भरीत करण्यापेक्षा सोपं आहे… असं आयुष प्रसाद सांगतात.. त्यावेळी महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास दिसतो. तेच या व्हिडीओचं बलस्थान आहे.

अभिनव कल्पनेचं कौतुक

जिल्ह्यात तर या भरीत व्हाया मतदान जागृती व्हिडीओची चर्चा तर होत आहेच पण हा व्हिडीओ सर्वदूर व्हायरलं झाला आहे, त्याच्या अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया आयुष प्रसाद यांच्यापर्यंत येत आहेत. यातून मतदान टक्केवारी वाढावी हीच निवडणूक प्रशासनाचा प्रयत्न आहे. यावेळी मतदारयादीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नामुळे महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. तो मतदान केंद्रापर्यंत यावा यासाठी विविध उपक्रम हाती घेतले त्यातला हा उपक्रम आहे.

जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या वतीने पुन्हा जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

०००

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई, दि. 3 : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.

फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

अशा गैरप्रकारांवर त्वरीत नियंत्रण मिळविणे तसेच त्वरित कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने, अशा घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनामार्फत पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.

000

इरशाद बागवान/विसंअ/

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

सांगली दि. 2 (जि.मा.का.) : 44-सांगली लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदान होत आहे. लोकसभा  निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी काढण्यात आलेल्या संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधून मतदान करण्याचे आवाहन केले.

जिल्हा प्रशासनामार्फत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आज सांगली शहरातील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र संजयनगर ते राष्ट्रमाता जिजाऊ क्रीडांगण या मार्गावर संवाद यात्रा काढण्यात आली. संवाद यात्रेत जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या समवेत उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी आशिष बारकुल, जिल्हास्तरीय स्वीप  समितीचे नोडल अधिकारी शशिकांत शिंदे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकाऱ्यांनी साधला मतदारांशी संवाद

मतदान करून लोकशाही बळकट करूया असे मतदारांना आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी या संवाद यात्रेत महिला, ज्येष्ठ मतदार, युवा मतदार यांच्याशी संवाद साधून 7 मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये सर्वांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्यास पुढे यावे,असे आवाहन केले.

संवाद यात्रेतून घुमला मतदार जागृतीचा जागर

संवाद यात्रेत सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचारी, बचत गटाच्या महिलांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. एक मत लोकशाहीसाठी,  मतदार राजा जागा हो.. लोकशाहीचा धागा हो अशा घोषवाक्याचे फलक दर्शवत मतदारांना आवाहन करण्यात आले. या संवाद यात्रेतून मतदार जागृतीचा जागर घुमला.

मतदान आवाहन पत्राचे मतदारांना वाटप

संवाद यात्रेत मतदारांशी संवाद साधताना मतदान करण्याचे आवाहन करून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मतदारांना मतदान आवाहन पत्रे दिली. मतदारांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी म्हणाले, मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, सावली, दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प व व्हील चेअर , अत्यावश्यक आरोग्य सुविधाची सोय करण्यात आल्या आहेत. मतदारांनी, निर्भयपणे आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

०००००

पद्म पुरस्कारांसाठी नामांकने मागविण्याचे आवाहन; १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

नवी दिल्ली, ०२ : केंद्रसरकार प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करत असते. त्यास अनुसरून यावर्षीही पद्म पुरस्कार 2025 साठी ऑनलाईन नामांकन/ शिफारशीबाबतचे आवाहन केले आहे. याबाबतची निवेदने स्वीकारण्याची सुरुवात 1 मे 2024 पासून सरकारने केली असून, पद्म पुरस्कारांसाठी नामांकने स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/ शिफारशी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल (https://awards.gov.in) वर ऑनलाइन स्वीकारल्या जातील.

पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये सुरू झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी गृह मंत्रालयाकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त केली जाते. हे पुरस्कार ‘उत्कृष्ट कार्याच्या’ सन्मानार्थ तसेच कला, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या सर्व क्षेत्रे / विषयांमध्ये विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी / सेवेसाठी दिले जातात. वंश, व्यवसाय, पद किंवा स्त्री-पुरुष असा भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र असतात. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक उपक्रमांसोबत काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसह सरकारी कर्मचारी पद्म पुरस्कारांसाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रूपांतर “लोकांचे पद्म” मध्ये करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे. यासाठी सर्व नागरिकांनी, त्यांनी त्यांच्या स्व-नामांकनासह नामांकन / शिफारशी सादर करण्याची गृह मंत्रालयाने विनंती केली आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि जमाती, दिव्यांग व्यक्ती आणि समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या प्रतिभावान व्यक्ती ओळखून त्यांचे असामान्यत्व आणि कर्तृत्वाची दखल घेण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतात.

नामांकन/शिफारशींमध्ये उपरोक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नमुन्यात निर्दिष्ट केलेले सर्व संबंधित तपशील असावेत, ज्यात वर्णनात्मक स्वरूपात (जास्तीत जास्त 800 शब्द) शिफारस केलेल्या व्यक्तीची तिच्या किंवा त्याच्या संबंधित क्षेत्रातील/विद्याशाखेतील विशिष्ट आणि अपवादात्मक कामगिरी/सेवा स्पष्टपणे मांडणारा उल्लेख समाविष्ट असावा.

या संदर्भातील तपशील गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (https://mha.gov.in) आणि पद्म पुरस्कार पोर्टलवर (https://padmaawards.gov.in) पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली देखील उपलब्ध आहे. या पुरस्कारांशी संबंधित कायदे आणि नियम https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या लिंकसह संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांकाचे प्रदान    

नाशिक, दिनांक 30 एप्रिल, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार निवडणूक खर्च नियंत्रणासाठी 20-दिंडोरी व 21-नाशिक मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील चार आयआरएस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून ते जिल्ह्यात दाखल झाले आहेत. कामकाजाच्या सोयीनुसार निवडणूक खर्च निरीक्षक यांना मोबाईल क्रमांक प्रदान करण्यात आले असून  त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अ.क्र मा.निवडणूक निरीक्षक

यांचे नाव

नियुक्त मतदारसंघ पदनाम मोबाईल क्रमांक
1. निधी नायर 20- दिंडोरी मधील 119- येवला,

121 निफाड,

122- दिंडोरी

IRS 9146658390
2. मुकंबीकेयन एस. 20- दिंडोरी  मधील

113- नांदगाव,  117-कळवण, 118- चांदवड

IRS 9371069632
3. प्रवीण चंद्रा 21 – नाशिक मधील

120- सिन्नर

123- नाशिक पूर्व

124 -नाशिक मध्य

IRS C& CE 9607749864
4. सागर श्रीवास्तव 21 – नाशिक मधील

125- नाशिक पश्चिम

126- देवळाली

127-इगतपुरी

IRS 9145310592

000

ताज्या बातम्या

महसूल दिनानिमित्त बेळी येथे २३ घरकुल लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश

0
जळगाव, दि. १ (जिमाका ): महसूल सप्ताहाचे औचित्य साधून बेळी (ता. जळगाव) गावात घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासकीय जागेचे वाटप आदेश  पालकमंत्री  गुलाबराव पाटील यांच्या...

अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक – मंत्री आदिती तटकरे

0
रायगड दि. ०१ (जिमाका): महसूल विभाग हा शासनाचा कणा असून महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लोकाभिमुख काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री...

महसूल विभाग शासनाचा आधारस्तंभ – पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

0
महसूल दिनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व अनुदानाचे वाटप बुलढाणा, दि. १ (जिमाका): महसूल विभागाच्या...

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्या – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा,दि. ०१ (जिमाका) : बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा आणि मेहकरसह इतर तालुक्यांमध्ये मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, शेतपिकांचे,...

नैसर्गिक आपत्तीसंदर्भात तत्काळ मदत करा – मंत्री मकरंद जाधव पाटील

0
बुलढाणा, दि. १ (जिमाका): जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी आज...