शनिवार, ऑगस्ट 2, 2025
Home Blog Page 814

ठाणे जिल्ह्यातील लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करावे – केंद्रीय निवडणूक निरीक्षक

ठाणे, दि.04 (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रिया येत्या 20 मे 2024 रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील 23-भिवंडी, 24- कल्याण आणि 25 – ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करायचे असून ही निवडणूक प्रक्रिया ही शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी आपल्यावर सोपविण्यात आलेले काम हे गांभीर्यपूर्वक करावे, असे निर्देश भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघात दाखल झालेल्या सर्व निवडणूक निरीक्षकांनी तीनही लोकसभा क्षेत्रातील निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी तसेच पोलीस यंत्रणांना आज झालेल्या बैठकीत दिले.

            जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजन भवनातील समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने आज निवडणूक निरीक्षकांनी आढावा घेतला.

            या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठीचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चंद्र प्रकाश मीना (आयआरएस) , 24 कल्याण लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) मनोज जैन (आयएएस), खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक कु. इलाक्किया करुणागरन (आयपीएस) , आणि 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठीचे निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री.राजनवीर सिंग कपूर (आयएएस), खर्च निरीक्षक श्री.चित्तरंजन धंगडा माझी  (आयआरएस) आणि पोलीस निरीक्षक के. जयरामन (आयपीएस) उपस्थित होते.‍ तसेच तीनही लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. शिनगारे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघांची माहिती उपस्थित निरीक्षकांना दिली. तसेच  भिवंडी, कल्याण, ठाणे या मतदारसंघातील निवडणुकांसाठी राबविण्यात येणारी मतदान प्रक्रिया व त्यासाठी लागणारी यंत्रणा यांची माहिती सर्व निरीक्षकांना दिली.

            नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपापसात उत्तम समन्वय साधावा. त्यासाठी मतदान प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचा बारकाईने अभ्यास करावा, असे निर्देश ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) श्री. राव यांनी यावेळी दिले.

            23 भिवंडी, 24 कल्याण, 25 ठाणे या लोकसभा मतदारसंघात संवेदनशील असलेल्या मतदार केंद्रांवर लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात यावी. आदर्श आचारसंहिता भंग होणार नाही, याची आचारसंहिता कक्षाने गांभीर्याने काळजी घ्यावी. मतदारसंघात पुरेशा प्रमाणात व्हिडिओ रेकॉर्डिंग टीम असतील व ते संपूर्ण प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवतील, यासाठी सूक्ष्म निरीक्षकांनी दक्ष राहावे. व्हिडिओ सर्व्हेलन्स टीमने स्टार कॅम्पेनअरचे संपूर्ण भाषण रेकॉर्ड करून ठेवावे. तसेच रॅली, प्रचारामध्ये विहीत परवानगी घेतलेली वाहनेच असतील. विनापरवाने वाहने आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देशही श्री. राव यांनी यावेळी दिले.

            पेड न्यूजचे प्रकार घडू नयेत यासाठी दररोजची वर्तमानपत्रे, टिव्ही चॅनेल, सोशल मीडिया, आकाशवाणी केंद्र याद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवावे,असेही त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यत पेडन्यूजचे प्रकार घडले आहेत का याबद्दलची माहिती त्यांनी जाणून घेतली.

            लोकसभा निवडणूक 2024 साठी निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

रेल्वेच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत ठाणे रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. नकुल अग्रवाल यांनी या बैठकीत दिल्या.

            मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष यांना त्या दिवशी सकाळपासून कोणकोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत उदा. मतदान सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत भरण्यात येणारे फॉर्म, त्यासाठीची प्रक्रिया, मॉक पोलिंग आदी कामाची चेकलिस्ट करुन ती सर्व मतदान केंद्रावर देता येईल का ते पाहावे. जेणेकरुन मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाईल. तसेच मनुष्यबळ व साहित्याची वाहतूक करण्यासाठी सूक्ष्म आराखडा तयार करण्याच्या सूचनाही सर्वसाधारण निरीक्षक श्री. जैन यांनी यावेळी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिल्या.

                  20 मे 2024 ही मतदानाची तारीख आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर पाणी, सरबत आदींची सोय होईल हे पाहावे. तसेच पाऊस पडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही, यासाठी ज्या ठिकाणी मंडप टाकून मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात सुविधा मिळतील, यासाठीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याच्या सूचना श्री. जैन यांनी यावेळी दिल्या.

            मतदान प्रक्रिया हे टीमवर्क आहे. शेवटच्या टप्प्यातील ठाणे जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया ही यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री.के.जयरामन, कु.करुणागरन, श्री.मीना यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

                 बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.

00000000000000

पाचव्या टप्प्यातील निवडणूक उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि. ४ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४५ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काल शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल झाले होते. आज या अर्जांची छाननी केल्यानंतर एकूण ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर धुळे लोकसभा मतदारसंघात २२, दिंडोरी – १५, नाशिक – ३६, पालघर – १३, भिवंडी – ३६, कल्याण – ३०, ठाणे – २५, मुंबई उत्तर – २१, मुंबई उत्तर पश्चिम – २३, मुंबई उत्तर पूर्व – २०,मुंबई उत्तर मध्य – २८, मुंबई दक्षिण मध्य – १५, आणि मुंबई दक्षिण –  १७ असे एकूण  ३०१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख सोमवार दिनांक ६ मे २०२४ आहे.

00000

नाशिक लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक पी. एस. प्रद्युम्न यांची माध्यम कक्षास भेट

नाशिक, दिनांक 4 मे, 2024 (जि. मा. का. वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 21 नाशिक लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) पी. एस. प्रद्युम्न यांनी आज मीडिया कक्षास भेट देऊन समाधान व्यक्त केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तथा समन्वय अधिकारी उदय पालवे उपस्थित होते.

जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल माध्यम कक्षाच्या नोडल अधिकारी संप्रदा बीडकर यांनी श्री. प्रद्युम्न यांचे स्वागत केले व माध्यम कक्षाच्या कामकाजाची माहिती दिली.

यावेळी माध्यम कक्षामध्ये सुरु असलेल्या कामकाजाबाबत श्री. प्रद्युम्न यांनी समाधान व्यक्त केले.
०००००

मतदारांसाठी मतदान केंद्रावर मिळणार किमान आवश्यक सुविधा

लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने येत्या 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 दरम्यान 41-लातूर (अ.जा.) लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. यावेळी  मतदारांना मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, ग्लास, विविध माहिती फलक, प्रथमोपचार पेटी, आवश्यक फर्निचर यामध्ये आवश्यकतेनुसार लाकडी टेबल, प्लास्टिक खुर्च्या, आवश्यकतेनुसार प्रकाश व्यवस्था, स्वच्छता कामगार, मतदारांना रांगेत थांबण्यासाठी सावलीची व्यवस्था, लहान मुलांची खेळणी असलेले पाळणाघर, आवश्यकतेनुसार मार्गदर्शक फलक, मतदान सहायता केंद्र या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.

उष्माघातापासून बचावासाठी प्रथमोपचार सुविधा

उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक सुविधा मंतदान केंद्रांवर राहतील. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी यावे, यासाठी मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, सावलीची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक मतदान केंद्रांवर प्रथमोपचार सुविधा राहणार आहे. यामध्ये ताप, जखम, उन्हाच्या त्रासाची लक्षणे आढळ्यास द्यावयाची प्राथमिक औषधी, ओआरएस पावडर आदी सुविधा राहणार आहे.

*****

निवडणूक कालावधीत क्षेत्रीय अधिकारी यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान

लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या गृह विभागाने 5 एप्रिल 2024 च्या अधिसूचनेद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 21 नुसार  लातूर लोकसभा मतदार संघातील सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार प्रदान केले आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कामासाठी सह्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे स्तरावर क्षेत्रीय अधिकारी (झोनल अधिकारी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 129, 133, 143 व 144 नुसार अधिकार प्रदान करण्यात आलेले विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार 07 मे 2024 पर्यंत राहणार आहे.

*****

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्र पातळीवर गृहभेटीवर देण्यात येतोय भर

धुळे, दि. ४ मे, २०२४ (जिमाका वृत्तसेवा) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ०२-धुळे लोकसभा मतदार संघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरीता मतदान केंद्राच्या क्षेत्रात गृहभेटी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत आज धुळे तालुक्यातील वडगाव येथे निवडणूक अधिकारी, कर्मचारी यांनी गृहभेट देऊन मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी गृहभेटी उपक्रम राबविण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी विशाल नरवाडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, तहसिलदार अरुण शेवाळे, शिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुक्यातील एकूण ३७५ मतदान केंद्रांसाठी ४७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना संपर्क अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.

एका क्षेत्रीय अधिकाऱ्याकडे साधारणपणे आठ ते दहा मतदान केंद्रे देण्यात आले असून मतदान केंद्राच्या क्षेत्रात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे सहशिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, पोलीस पाटील, आशा वर्कर, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या तीन ते चार व्यक्तींचा गट तयार करुन मतदान केंद्र पातळीवर मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. या उपक्रमांतर्गत आज धुळे तालुक्यातील वडगाव येथे संपर्क अधिकारी व्ही.बी. घुगे यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) प्रवीण ओतारी, शिक्षक हेमकांत अहिरराव व गावातील सर्व गावस्तरावरील कर्मचारी यांचे तीन ते चार जणांचे गट तयार करून कुटुंबांचे वाटप करून देण्यात आले व त्यानुसार प्रत्यक्ष गृहभेटी देऊन नागरीकांना लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मत देणे किती महत्वाचे आहे. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्यामुळे देशाचा आणि ओघाने आपला कसा फायदा होणार आहे हे सांगून मतदारांमधील उदासिनता दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचेही संपर्क अधिकारी व्ही.बी. घुगे यांनी कळविले आहे.

०००००

मतदान केंद्रांवरील ‘पाळणाघरे’ सज्ज ठेवा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.४ (जिमाका):- मतदान केंद्रांवर मतदानासाठी येणाऱ्या मातांची बालके सांभाळण्यासाठी मतदान केंद्रांवर पाळणाघरांची सुविधा उपलब्ध करावयाची आहे. ही जबाबदारी आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभाग यांनी संयुक्तपणे पार पाडावयाची असून ही पाळणाघरे मतदानाच्या आदल्यादिवशी म्हणजे दि.१२ रोजी सज्ज असायला हवी, यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  दिलीप स्वामी यांनी आज सर्व संबंधित यंत्रणांना दिले.

            मतदान केंद्रांवर द्यावयाच्या सुविधांबाबत आज जिल्हाधिकारी स्वामी यांनी आज तालुकास्तरीय यंत्रणांसमवेत दूरदृष्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दयानंद मोतीपवळे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुवर्णा जाधव तसेच अन्य विभागप्रमुख तसेच तालुकास्तरीय अधिकारी सहभागी झाले होते.

            मतदान केंद्रांवर उपलब्ध करावयाच्या पाळणाघरांमध्ये बालकांसाठी आहाराची सोय, पाणी, खेळणी यांच्या उपलब्धतेसह अंगणवाडी सेविका, सहाय्यक इ. यांनी उपस्थिती आवश्यक आहे. ही सगळी तयारी मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे दि.१२ रोजी सायंकाळपर्यंत पूर्ण झाली पाहिजे. त्याचा आढावा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी घेऊन तसा अहवाल जिल्हास्तरावर द्यावयाचा आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

            प्रत्येक पाळणाघरावर बालकांना द्यावयाचे पाणी  तसेच अन्य आहार विषयक सुविधा उपलब्ध ठेवण्याविषयीही सुचना देण्यात आल्या. पाळणा घरातील तसेच मतदान केंद्रावरील अन्य सुविधांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपले स्वतःचे मतदानही करावयाचे आहे. त्यादृष्टीने त्यांना एक अन्य सहकारी ही बदलीसाठी उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले.

०००००

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारु जप्तीची मोठी कारवाई

जळगाव, दि. 4 (जिमाका) :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने दि. 4 मे , 2024 रोजी एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुर्वेदित प्रोडक्ट या कंपनीत मारलेल्या छाप्यात बनावट देशी दारुचा कारखाना जमीनदोस्त केला असुन 75 लक्ष 64 हजार 200 रुपये किमंतीचा मुद्दामाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी 05 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व बनावट दारु विक्री व निर्मितीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत जिल्हाभर वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून कारवाया करणे सुरु आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक डी. एम. चकोर यांच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि. 4 मे, 2024 रोजी मध्यरात्री 2.30 वाजेसुमारस एमआयडीसी भागातील के-10 सेक्टर मधील मंदार आयुवैदिक प्रोडक्ट या कंपनीत छापा मारला असता शितपेयाच्या नावाखाली अवैधरित्या बनावट देशी दारु कारखाना सुरु असल्याचे व रॉकेट संत्रा नामक मद्याची अवैधरित्याअ निर्मिती करुन ते बाटलीत भरताना मिळून आले. या प्रकारणात एकूण पाच आरोपीना अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 15 लाख 75 हजार किमंतीच्या 45 हजार सिलबंद रॉकेट संत्रा मद्याच्या बाटल्या, 30 लाख 30 हजार किमंतीच्या देशी मद्याचे भरलेले बॅरल, 3 लाख किमंतीच्या 1 लाख रिकाम्या बाटल्या, 6 लाख किंमतीचे लेबल पट्टी मशिन, 6 लाख किंमतीचे बुच सिल बंद करण्याचे मशिन, 5 लाख रुपये किंमतीचे पाणी शुद्धीकरण मशिन, 4 लाख 50 हजार किंमतीचे चार चाकी वाहन यासहल किरकोळ व इतर साहित्य असा एकूण 75 लाख 64 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही राज्य उत्पादक शुक्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यंवशी, प्रसाद सुर्वे, उपआयुक्त उषा वर्मा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अधिक्षक डॉ. व्ही. टी. भुकन यांच्या मार्गदर्शना खाली निरिक्षक डी. एम. चकोर, एस.बी. चव्हाणके, दुय्यम निरीक्षक एस.बी.भगत, सी.आर.शिंदे, राजेश सोनार, विठ्ठल बाविस्कर, गिरीष पाटील, सुरेश मोरे, पी.पी.तायडे, दिनेश पाटील, गोकुळ आहिरे, धनसिंग पावरा, एस.आर.माळी, विपुल राजपुत, आर.टी.सोनवणे, व्ही.डी.हटकर, एम.एम.मोहिते, आर.डी. जंजाळे, नंदू पवार यांच्या पथकाने केली. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास डी.एम.चकोर हे करीत आहे.
00000

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांची रायगड जिल्हा माध्यम कक्षास भेट

रायगड दि. ०३, (जिमाका) :निवडणूक प्रक्रियेमध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असून विविध माध्यमाने समन्वय राखताना माध्यम कक्षाने सतर्कतेने भूमिका पूर्ण करावी असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस.चोक्कलिंगम यांनी केले.

जिल्हा माहिती कार्यालयात कार्यालयात लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने स्थापन माध्यम संनियंत्रण व जनसंपर्क कक्षाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत श्री. चोकलिंगम यांनी समाधान व्यक्त केले.

मुख्य निवडणूक अधिकारी श्री. चोकलिंगम यांनी विविध माध्यमांमधील जाहिराती आणि पेड न्यूजबाबत कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाविषयी माहित दिली.

माध्यम कक्षात सुमारे 8 दूरचित्रवाणी संचांच्या माध्यमातून वृत्तवाहिन्यांतील निवडणूक प्रचार, जाहिरात, पेड न्यूज आदींच्या अनुषंगाने संनियंत्रण केले जात आहे. तसेच सोशल मीडियावरील पोस्टबाबतही बारकाईने संनियंत्रण केले जात आहे. वृत्तपत्रातील जाहिराती आणि पेड न्यूजबाबतही दररोजच्या वृत्तपत्रांचे अवलोकन केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

श्री चोकलिंगम यांनी सीव्हिजील कक्षालाही भेट देऊन नागरिकांच्या तक्ररी संदर्भात करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, अप्पर जिल्हाधिकारी सुनील थोरवे,   उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी होते.

000

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल

मुंबई, दि. ३ : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात – 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी – 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक – 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर – 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी – 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण – 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे – 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर – 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम – 29 उमेदवारांचे 33 अर्ज,  मुंबई उत्तर – पूर्व – 34 उमेदवारांचे 42 अर्ज,  मुंबई उत्तर – मध्य – 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य – 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात  21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.

0000

 

ताज्या बातम्या

लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा -विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल

0
उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार विभागीय आयुक्तालयात महसूल सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ अमरावती, दि. ०२ : महसूल विभाग हा राज्य...

समाजसेवेसाठी शासकीय नोकरी हे महत्त्वाचे क्षेत्र -अपर मुख्य सचिव डॉ. विकास खारगे

0
ठाणे,दि. ०२ (जिमाका): समाजाची सेवा करण्यासाठी शासकीय नोकरी हे एक महत्त्वाचे क्षेत्र असून आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे अपर मुख्य...

क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र विशेष पॅकेज

0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): आदिवासी समाजातील घटकांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यंदापासून क्रांतिवीर शामादादा कोलाम यांच्या नावाने प्रत्येक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत सूक्ष्म...

महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा – पालकमंत्री संजय राठोड

0
यवतमाळ, दि.२ (जिमाका): महसूल विभाग हा राज्याच्या कारभाराचा कणा असल्याचे गौरवोद्गार मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी महसूल दिनाच्या कार्यक्रमात...

जळगाव तहसील कार्यालयात प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू केंद्र व क्षेत्रीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण

0
जळगाव, दि.२ (जिमाका): नागरिकांना अधिक सुसंस्कृत, सुलभ व सकारात्मक शासकीय सेवा मिळाव्यात या उद्देशाने जळगाव तहसील कार्यालयात उभारण्यात आलेल्या प्रतीक्षालय, वाचनालय, सेतू सुविधा केंद्र...