बुधवार, ऑगस्ट 20, 2025
Home Blog Page 78

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना घडवावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दि. 19- भविष्य घडवण्याची व चांगली पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. त्यामुळे शिक्षकांनी प्रथमत: शिकण्याबद्दल विद्यार्थ्यांची मानसिकता तयार करून त्यांना शिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमधील कौशल्य शोधून त्यांना त्या दृष्टिकोनातून त्यांना घडवावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागातर्फे प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षकांकरिता आयोजित ‘उद्यमशाळा’ या दोन दिवसीय कार्यशाळेचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर हे होते. याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, उद्योजिका चंद्रिका चौहान, सेवावर्धिनीचे गिरीश देगावकर, शिवरत्न पवार, विद्यापीठाच्या इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. विकास पाटील, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख, सिनेट सदस्य रोहिणी तडवळकर, शशिकांत चव्हाण, इनक्युबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी, विनायक बंकापूर, चन्नवीर बंकुर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेसाठी प्रिसिजन फाउंडेशन, सर फाउंडेशन, सेवावर्धिनी, स्वदेशी जागरण मंच, साविष्कार या संस्था सहआयोजक आहेत. एकूण दोन हजार शिक्षकांचा यामध्ये सहभाग होता.

पालकमंत्री श्री. गोरे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबवला, याचे खरच कौतुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच कौशल्य विकास आणि उद्योजकतेबाबत आग्रही आहेत. यासाठी विविध योजना आहेत. त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून शिक्षकांनी शालेय वयातच विद्यार्थ्यांच्या मनावर कौशल्य विकास व उद्योजकतेबाबत संस्कार करण्याबरोबरच त्याबाबत मानसिकता तयार करावी, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. गोरे यांनी यावेळी केले.

कुलगुरू डॉ. महानवर म्हणाले की, आज जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तुंग यश मिळवल्याचे आपण पाहतो. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षक हे फार महत्वाचे असतात. समस्या व अडचणी निर्माण झाल्यास नेहमीच त्यावर उपाय निघतो आणि तेथूनच खऱ्या अर्थाने संशोधनास चालना मिळते. आणि हे काम आज ग्रामीण भागात होत असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आणि बुद्ध्यांक नेहमी अधिक असतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे, असे आवाहन देखील कुलगुरू प्रा. महानवर यांनी यावेळी केले. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी आवर्जून विद्यापीठ भेटीसाठी विद्यार्थ्यांच्या सहलीचे आयोजन करावे आणि येथील सोयी सुविधांचा विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.

युवा पिढीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

बारामती, दि.१९: उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.

गदिमा सभागृहात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंह, सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, हे २१ वे शतक तंत्रज्ञान आणि प्रचंड स्पर्धेचे युग आहे. शिक्षण सर्वत्र उपलब्ध झाले असून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा आहे. त्यामुळे युवा पिढीच्या निरोगी आरोग्यासाठी सायकल, मैदानी खेळाच्या स्पर्धा महत्त्वाची भूमिका पार पाडतात. विद्यार्थ्यांनी बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले पाहिजे. तसेच शिक्षणासोबतच खेळही खेळले पाहिजे. खेळामुळे मन सदृढ होऊन यश आणि अपयश पचविण्याची ताकद मैदानावर मिळते.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाटचालीचे कौतुक करून श्री. पाटील म्हणाले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावरील ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत अपेक्षित यश न मिळालेल्या खेळाडूंनी हार न मानता, खचून न जाता उमेदीने, जोमाने तयारी केली पाहिजे. ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री. पाटील यांनी अभिनंदन केले.

श्री. भरणे म्हणाले, सायकल स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत प्रबोधन करण्यासोबतच सायकल वापराचे महत्त्व समाजातील घटकांना व्हावे, याकरिता पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या दरवर्षी या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात येतात. जीवनात यशस्वी होण्याकरिता प्रचंड मेहनत करा, असा सल्ला यावेळी त्यांनी युवकांना दिला.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण मंडळाची यशस्वीपणे वाटचाल सुरु असून यापूढेही प्रगती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली बारामती तालुक्यासह जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लागत आहेत, असेही श्री. भरणे म्हणाले.

डॉ. सोनवणे म्हणाले, पुणे हे सायकलीचे शहर असल्याचे आपण म्हणतो, याच संस्कृतीची ओळख करुन देणाऱ्या या सायकल स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बारामती येथील उप केंद्राचे लवकरच उद्घाटन करण्यात येणार आहे, असेही श्री. सोनवणे म्हणाले.

यावेळी श्री. सिंह म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीचे मिशन महत्वपूर्ण असल्याने राज्यात विविध सायकल स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकार आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. येत्या काळात पुणे येथे भव्यदिव्य सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून आगामी काळात महाराष्ट्र खेळात महाशक्ती (सुपर पॉवर) होण्याकडे वाटचाल करीत आहे, असेही सिंह. म्हणाले.

मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात सायकल स्पर्धेच्या वाटचालीबाबत माहिती दिली.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

याप्रसंगी श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, शिक्षक उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात कि.मी. व वेळ):

घाटाचा राजा (दिवे घाट) – राष्ट्रीय स्पर्धा – मानव सारडा, राजस्थान (००.०८.०६)

घाटाचा राजा (दिवे घाट) – राज्य स्पर्धा –  सिद्धेश अजित पाटील, कोल्हापूर (००.०८.३२)

१) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीयस्तर (१२२ कि.मी.):

प्रथम क्रमांक – दिनेश कुमार, एअर फोर्स (२.२९.५४) (‘कर्तुत्वाचा वारसा, नव्या पिढीस दिशा’ स्व. प्रताप शंकर जाधव चषक), द्वितीय क्रमांक -सूर्या रमेश थाथू, महाराष्ट्र (२.३१.३३),

तृतिय क्रमांक – उदय गुलेड, कर्नाटक (२.३५.५८) याने पटकावला.

२) पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर – (१२२ कि.मी.):

प्रथम क्रमांक – तांबोळी अमन राजअहमद, सांगली (२.३६.२०), द्वितीय क्रमांक – नदाफ निहाल मुसा, सांगली (२.३७.४९), तृतिय क्रमांक – चोपडे हनुमान यशवंत, बीड (२.४०.२७) याने मिळवला.

३) सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – शेख खुददुस, पुणे (२.०३.५९), द्वितीय क्रमांक – सोनवणे योगेश नामदेव, नाशिक (२.१०.२६),तृतिय क्रमांक – मरळ आर्यन संजय, पुणे (२.१०.३३).

४) माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर  (१५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – गंगा दांडीन, कर्नाटक (२२.२६.७४), द्वितीय क्रमांक- पूजा बबन दानोले, महाराष्ट्र (२२.२६.७५), तृतीय क्रमांक – श्रावणी परिट, महाराष्ट्र (२२.२६.७६).

५) सासवड ते बारामती (पोलिस / राज्य कर्मचारी) राज्यस्तरीय (८५ कि.मी.):

प्रथम क्रमांक -शिवम खरात, संभाजीनगर (२.१०.२०) द्वितीय क्रमांक – अमोल क्षिरसागर, सांगली (२.३०.०२) तृतीय क्रमांक – प्रसाद आलेकर, रत्नागिरी (२.३१.१२) याने प्राप्त केला.

६) माळेगाव ते बारामती (राज्य पोलिस/राज्य कर्मचारी महिला राज्यस्तरीय (१५ कि.मी.):

प्रथम क्रमांक – सिद्धी मनोहर वाफेलकर (००.२४.१०), द्वितीय क्रमांक – रूपाली गिरमकर (००.२४.१०) यांनी पटकावला.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंगारी (पनवेल) येथील नवीन कार्यालयाचे लोकार्पण मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न

रायगड (जिमाका), दि. १९ : भिंगारी (पनवेल) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नवीन कार्यालय इमारतीचे लोकार्पण सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोकण परिक्षेत्राच्या मुख्य अभियंता सुषमा गायकवाड, पनवेल विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य आणि अत्याधुनिक सोयींनी युक्त इमारतीबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, “या इमारतीमुळे स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे व सुलभपणे नागरिकांपर्यंत पोहोचतील. ही इमारत ही केवळ एक शासकीय सुविधा नसून, पनवेल तालुक्याच्या शासकीय प्रगतीचा नवा टप्पा ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

 

जनतेला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कटिबद्ध – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

राज्यातील रस्ते, पूल आणि इतर सार्वजनिक बांधकामे वेळेत पूर्ण करून जनतेला दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग सतत प्रयत्नशील असून, ही कामे दर्जेदार आणि नागरिकांना उपयोगी ठरणारी असावीत, असेही मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.

पनवेल येथील रा.मा. १०३ कि.मी. ३/८०० चिपळे येथे नेरे-मालढुंगे नवीन पुलाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर,  मुख्य अभियंता सा.बा.विभाग कोकण, सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता सा.बा.विभाग पनवेल, संदीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी मंत्री भोसले म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी सर्व कामे ही दर्जेदार असली पाहिजेत.जनतेसह वाहनचालक व प्रवाशांना येणाऱ्या अडचणी तातडीने सोडविल्या पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याच्या चौफेर विकासासाठी बांधकाम विभागाने नियोजनबद्ध कामे हाती घेत आहे. सर्व प्रकारची कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे आणि त्यात गुणवत्ता राखणे, हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

नेरे – मालढुंगे नवीन पूल सुरू झाल्यामुळे  नेरे आणि आजूबाजूच्या गावांतील नागरिकांसाठी वाहतुकीची मोठी सुविधा निर्माण झाली असून, ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासालाही या पुलामुळे चालना मिळेल, असेही मंत्री भोसले यांनी सांगितले.

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

मुंबई,दि. 19 – राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून इमारत बांधकामासह दवाखान्याची दुरूस्ती, स्वच्छतागृह व उपकरण खरेदी यासाठी ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

पशुसंवर्धनाला कृषी व्यवसायाचा दर्जा देणारे देशातील पहिले राज्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती देण्याचा निर्णय पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे राज्याच्या सात महसुली विभागातील ३४ जिल्ह्यात एकूण ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत. नवीन इमारत बांधण्याकरिता २८७ कोटी ७६ लाख ४४ हजार तर दुरुस्तीसाठी १२१ कोटी ११ लाख ८२ हजार, स्वच्छतागृह साठी २५ कोटी १७ लाख २० हजार, विविध उपकरणे खरेदीसाठी २४ कोटी ३५ लाख ८८ हजार असा एकूण ४५८ कोटी ४१ लाख ३४ हजार रूपये निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ही सर्व कामे प्रस्तावित करण्यात येणार आहेत.

बीड जिल्ह्यात २४ इमारतीसाठी ९ कोटी ४० लाख

बीड जिल्ह्यात सर्व सहा विधानसभा मतदारसंघात २४ इमारतींसाठी ९ कोटी ४० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यात ज्या ठिकाणी  पशुवैद्यकीय दवाखान्याला नवीन इमारती मिळणार आहेत, त्यांची विभागनिहाय संख्या पुढील प्रमाणे-  मुंबई विभाग – ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३, पुणे विभाग – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात १२५, नाशिक विभाग – नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर जिल्ह्यात ५५, छत्रपती संभाजीनगर विभाग – छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात ५१, लातूर विभाग- लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यात ३९, अमरावती विभाग- अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, यवतमाळ जिल्ह्यात ३८, नागपूर विभाग- नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात ३६ अशा एकूण ३५७ ठिकाणी नवीन इमारतींसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

ठाण्याच्या उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानासाठी नगरविकास विभागातून ५ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ठाणे,दि.१९ (जिमाका)-: उपमुख्यमंत्री निरोगी महिला अभियानांतर्गत महिलांची गर्भाशय कर्करोग तपासणी जलद गतीने व्हावी यासाठी नगरविकास विभागाकडून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागास पाच कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केली.

ठाणे महानगरपालिका, रोटरी क्लब आणि आदित्य बिर्ला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उपमुख्यमंत्री निरोगी महिला’ अभियानाचा आज ठाण्यातील लोकमान्य नगरमधील कोरस आरोग्य केंद्रात शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, डॉ.प्रसाद पाटील, डॉ.कारखानीस, आदित्य बिर्ला फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच रोटरी क्लबचे महाजन आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते

गर्भाशयाचा कर्करोग हा जगातील दुसरा सर्वसाधारण आढळणारा आजार असून त्यांचे निदान लवकर झाले तरच त्यावर उपाय करणे शक्य होते. आपल्या कुटुंबातील महिला भगिनी या कायम कुटुंबाकडे लक्ष देताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे या शिबिराकडे दुर्लक्ष न करता जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी केले.

माझ्या लाडक्या बहिणींसाठी हे अभियान सुरू करण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत पाच लाख महिलांची विनामूल्य वैद्यकीय तपासणी या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे यावेळी जाहीर केले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गर्भाशय मुखाचा कर्करोग, ९ ते १४ वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लस, मधुमेह तसेच हिमोग्लोबिन तपासणी तसेच स्त्रियांच्या निरोगी आणि आरोग्यदायी जीवनशैलीबाबत संवाद याचा अंतर्भाव या शिबिरात करण्यात येणार आहे. यासाठी इथे सोनोग्राफीची अद्ययावत मशीन, मॅमोग्राफीची गाडी सज्ज ठेवण्यात आली आहे. त्या माध्यमातून नामवंत डॉक्टरांची मदत घेऊन हे अभियान राबविण्यात येईल असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी सांगितले.

अंधेरीतील कांदळवनाच्या कत्तलीची तत्काळ दखल; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी

मुंबई, दि. १९ –अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाच्या कत्तलीप्रकरणी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी थेट जागेवर जाऊन पाहणी करत गंभीर स्थितीची नोंद घेतली. बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.

आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अधिवेशन संपल्यावर दुसऱ्याच दिवशी पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी संबंधित घटनास्थळाची पाहणी केली.

सीटीएस क्रमांक १६१, पहाडी गोरेगाव परिसरात झालेल्या पाहणीत आमदार श्री. परब, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे निदर्शनास आले. प्रथमदर्शनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये होती. ती डेव्हलपमेंट झोन कशी झाली?, असा थेट सवाल करत श्रीमती मुंडे यांनी विभागाला जमीन नॉन डेव्हलपमेंट झोन असण्याची कारणे काय होती याचा तपशीलवार शोध घेण्याचे आदेश दिले.

जे कंत्राटदार बेकायदेशीर भरावासाठी जबाबदार आहेत, त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. संबंधित ठिकाणी भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन:स्थापना करण्याचेही आदेशही त्यांनी यावेळी दिले. कांदळवनाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याच्या तक्रारी लक्षात घेता, अशा सर्व प्रकरणांचे संकलन करून तात्काळ कारवाई करण्याच्या सूचनाही पर्यावरण मंत्री श्रीमती मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे प्रकार थांबायला हवेत, पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंत्रणांनी जलद गतीने काम केले पाहिजे, असे श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

0000

नंदकुमार वाघमारे / स.स.

भुदरगड तालुक्यातील सात धबधबे म्हणजे निसर्गात लपलेला अद्भुत खजिना – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर दि. 19 : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे या भागात एकाच ठिकाणी वेगवेगळे सात नैसर्गिक धबधबे आहेत. हा सवतकडा धबधबा परिसर निसर्गात लपलेला अद्भुत खजिनाच असून या परिसरात पर्यटकांना सोबतच वर्षाविहारासह जंगल, जल, जमीन, शेती पाहण्याचे पॅकेजच मिळत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या प्रयत्नातून वनविभाग कोल्हापूर वनपरिक्षेत्र गारगोटी अंतर्गत दोनवडे, नितवडे, खेडगे, एरंडपे येथील वन व्यवस्थापन समिती यांच्या पुढाकाराने ही कामे करण्यात आली आहेत. या ठिकाणचा नैसर्गिक ठेवा पर्यटकांना पाहता यावा यासाठी 3.44 कोटी रुपयांच्या विविध सुशोभीकरणासह इतर विकास कामे करण्यात आली आहेत. या सर्व पर्यटनस्थळांच्या विकास कामांचे लोकार्पण व धबधब्याचे अधिकृत उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक विलास काळे, गारगोटी वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल अविनाश तायनाक, बाबा नांदेकर यांच्यासह संबंधित गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. सवतकडा धबधबा आणि परिसर आता पर्यटकांसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे. निसर्गाचा मनमोहक अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण पर्यटकांना सहजपणे उपलब्ध होणार असून, या परिसराच्या विकासासाठी विविध मूलभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजन तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक (कोल्हापूर) जी गुरूप्रसाद यांनी विशेष प्रयत्न केले.

सवतकडा धबधब्याचा विकास ही निसर्ग पर्यटन आणि स्थानिक विकास यामधील एक सकारात्मक पाऊल असून, वनविभाग, स्थानिक ग्रामस्थ, आणि प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे ठिकाण लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ म्हणून उदयास येईल असे प्रतिपादन श्री.आबिटकर यांनी केले. या ठिकाणी कोल्हापूर वन विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या पर्यटन कॉफी टेबल बुकचे प्रकाशनही पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

उपस्थित पर्यटकांशी संवाद

लोकार्पण सोहळ्या वेळी स्वतः पालकमंत्र्यांनी सर्व ठिकाणी भेटी देत कामांची पाहणी केली. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना भेटून त्यांनी विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधला. उपस्थित ग्रामस्थांसह त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी चालत पर्यटनाचा आनंद लुटला. उत्साही वातावरणात ग्रामस्थ, पर्यटक यांच्याशी संवाद साधत येथील पर्यटन ठिकाणी करण्यात येत असलेली विकास कामे तसेच त्या ठिकाणी आवश्यक स्वच्छतेबाबत विविध विषयांवर चर्चा केली.

गरजू रूग्णांसाठी संजीवनी : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष

राज्यातील गरजू व गोरगरीब जनतेला दुर्धर आजारामध्ये उपचारासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा जणू संजीवनी ठरला आहे. विदर्भातील गरजू व पात्र रूग्णांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणारा मुख्यमंत्री सचिवालय हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षही मोलाचा ठरत आहे. जानेवारी २०१७ ते जून २०२५ पर्यंत या कक्षाद्वारे ११ हजार ८४९ रूग्णांना ९९ कोटी ४६ लाख ९४ हजार ४१ रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे.

विदर्भातील गोरगरीब रुग्णांना नागपुरातच हे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना झाली. सहाय्यता निधी प्राप्त करण्याकरिता संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्याच्या गैरसोयीतूनही त्यांची सुटका झाली.  हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील गरजू व पात्र रुग्ण गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते. जानेवारी २०१७ पासून या कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे.

जानेवारी २०१७ ते जून २०२५पर्यंत रूग्णांना ९९ कोटी ४६ लाखांची मदत

हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे ११ हजार ८४९ रूग्णांना ९९ कोटी ४६ लाख ९४ हजार ४१ रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. या कक्षाद्वारे सर्वप्रथम १ जानेवारी ते ३१ मार्च २०१७ दरम्यान ३३२ रूग्णांना ३ कोटी २३ लाख ११ हजार ५०० रूपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. तर १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात १७७६ रूग्णांना १९ कोटी ५ लाख ६४ हजारांचे , १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत २०९९ रूग्णांना २० कोटी १ लाख ६२ हजार ७००, १ एप्रिल २०१९ ते ७ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ९७१ रूग्णांना ७ कोटी ४ लाख २५ हजार, ३१ डिसेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत २८३ रूग्णांना १ कोटी ६ लाख ८५ हजार ९४१, १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ पर्यंत  ५४९ रूग्णांना २ कोटी ३७ लाख ९९ हजार ५००, १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत ४८२ रूग्णांना २ कोटी २७ लाख २२ हजार ५००, १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत ८३६ रूग्णांना ५ कोटी ६४ लाख ३६ हजार, १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत २००५ रूग्णांना १६ कोटी ३३ लाख ९७ हजार ५००, १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत २०८२ रूग्णांना १७ कोटी ८० लाख ७५ हजार ४०० आणि १ एप्रिल ते ३० जून २०२५ पर्यंत ५३४ रूग्णांना ४ कोटी ६१ लाख १४ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

असा आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी उपक्रम

महाराष्ट्रातील गरजू व पात्र रूग्णांना वैद्यकीय उपचाराकरिता आर्थिक मदतीचा हातभार लावण्याकरिता राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने सुरू केलेला हा लोकोपयोगी व महत्वाकांक्षी उपक्रम आहे.

योजनेसाठी पात्रता व निकष

या उपक्रमाचा लाभ घेण्याकरिता अर्जदारांना महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागतो. अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न १.६० लाखांच्या आत असणे आवश्यक आहे. रूग्णाकडे रेशन कार्ड व आधार कार्ड असणेही गरजेचे आहे. उपचार घेत असलेले रूग्णालय महाराष्ट्र राज्यामधील असणे आवश्यक असून रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक असते.

या आजारांवरील उपचारासाठी मिळते मदत

या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत काही ठराविक आजार चिन्हित करण्यात आले आहे. यामध्ये कॉकलियर ईम्प्लांट (वय ३ वर्षांपर्यंत), ह्रदय/यकृत/किडणी/फुप्फुस/बोन मॅरो आणि हाताचे प्रत्यारोपण, कर्करोग/रस्ते अपघात/लहान बालकांची शस्त्रक्रिया/मेंदुरोग/ ह्रदयरोग आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी यासह डायलिसिस/केमोथेरेपी/रेडिएशन/नवजात शिशुंचे आजार/गुडघ्याचे प्रत्यारोपण/भाजलेले रूग्ण/अस्थीबंधन आणि विद्युत अपघात यांचा समावेश होतो.

या कागदपत्रांची लागते आवश्यकता

या वैद्यकीय कक्षाकडून अर्थसहाय्य प्राप्त करण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रकाची मूळप्रत, डॉक्टरांच्या सहि व शिक्यासह (खाजगी रुग्णालय असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडुन प्रमाणीत करणे आवश्यक आहे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. १.६० लक्ष पेक्षा कमी), रुग्णाचे आधार कार्ड (महाराष्ट्र राज्याचे)/नवजात बाळासाठी आईचे आधारकार्ड आवश्यक आहे, रुग्णाचे रेशन कार्ड (महाराष्ट्र राज्याचे), संबधीत आजाराचे रिपोर्ट (ईन्व्हेस्टिगेशन रिपोर्टस) असणे आवश्यक, रुग्णाचा पासपोर्ट फोटो, अवयव प्रत्यारोपण रुग्णांसाठी झेडटीसीसी/ शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे, रस्ते अपघात असल्यास एफआयआर ची प्रत जोडणे आवश्यक आहे.

असा करता येईल अर्ज

विहीत नमुन्यात मुळ अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय हैद्रबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स नागपूर येथे सादर करणे आवश्यक आहे. अर्जाचा नमुना https://cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

लाभासाठी रूग्णालयाची अट

या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी रूगणालय हे नोंदणीकृत असणे गरजेचे असून संबंधित रूग्णालयाची नोंद मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या प्रणालीमध्ये असणे आवश्यक आहे. रूग्णालयामध्ये महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना/आयुष्यमान भारत योजना/धर्मदाय रूग्णालय/आरबीएसके इत्यादी योजना कार्यान्वीत असल्यास या योजनांमधून रूग्णाचा उपचार होणे बंधनकारक आहे व रूग्णाचा आजार या योजनेमध्ये बसत नसल्यास तसे प्रमाणपत्र खर्चाच्या अंदाजपत्रकासोबत जोडणे आवश्यक आहे.

किती रकमेपर्यंत मिळू शकते मदत

रूग्णाच्या आजाराचे व उपचाराचे स्वरूप, इन्व्हेस्टीगेशन रिपोर्ट याचे अवलोकन करून कार्यकारीणी समिती नियमाप्रमाणे निर्णय घेत जास्तीत जास्त 2 लाखांचे अर्थसहाय्य ह्रदय/यकृत/किडणी/फुप्फुस आणि बोन मॅरो प्रत्यारोपणाकरिता करण्यात येते.

गरजू व गरीब जनतेला दुर्धर आजाराच्यावेळी  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाद्वारे देण्यात येणारी मदत ही बहुमोलाची ठरत आहे. जास्तीत-जास्त गरजुंपर्यंत हा लाभ पोहचावा या उद्देशाने मुख्यमंत्री कार्यालयही या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. याची प्रचिती विदर्भातील जनतेला आली आहे या मदतीबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर समाधानही दिसून येत आहे.

 

रितेश मो. भुयार,

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती शहरातील विविध विकास कामांची पाहणी

बारामती, दि.१९: शहरात भटकी जनावरे, कुत्र्यांचा वावर तसेच त्याबाबत नागरिकांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी गांभीर्याने घेत नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, त्यासाठी शहरातील विविध भागात कोंडवाड्याकरिता जागा निश्चित करुन प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

बारामती परिसरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसर, दशक्रिया घाट, शारदा प्रांगण येथील सुरु असलेली विविध विकास कामे, प्रस्तावित माळावरची देवी ते जळोची चौक चारपदरी रस्ता, जळोची कॅनाल पुलावरून संभाजीनगरकडे जाणारा रस्ता, कॅनाल लगतची गार्डन जागा, जळोची ओढ्याशेजारील दशक्रिया घाट, दहनभूमी, दफनभूमी जागा, रुई हद्दीतील विद्या प्रतिष्ठान शेजारील दोन लहान पूल, गार्डन, स्मशानभूमी, पूर संरक्षण भिंतीच्या प्रस्तावित जागेची पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी केली.

प्रस्तावित जागेवर करण्यात येणाऱ्या कामांची पाहणी करुन श्री. पवार म्हणाले, बारामती परिसरातील हद्दवाढ लक्षात घेता प्रस्तावित जागेवर कामे सुरु करावीत. कामात अडथळा आणणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी. या परिसरातील रुई-जळोची ओढा रुंदीकरणाची कामे करताना मोजणी करुन त्यामध्ये अतिक्रमण असल्यास ती काढावीत. या ओढ्याच्या दोन्ही बाजूस पूर संरक्षण भिंतीचे बांधकाम करावे.

शारदा प्रांगण परिसरात उभारण्यात येणाऱ्या सीबीएसई आणि मराठी शाळेत विद्यार्थी व शिक्षकांना लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा विचार करुन इमारत व परिसर विकसित करा. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांकरिता सोयी-सुविधांचा करुन शौचालय, पाणी, विद्युत व्यवस्था आदींच्या अनुषंगाने कामे करावीत.

बाबूजी नाईक वाडा, दशक्रिया घाट परिसरात सावली देणारी झाडे लावावीत. दशक्रिया घाट परिसरामध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा मिळतील यादृष्टीने नियोजन करुन कामे करावीत. पाणी साचणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कविवर्य मोरोपंत यांच्या स्मारकाची आवश्यक ती डागडुजी करुन घ्यावी. नदी पात्रातील ड्रेनहोल चेंबर्सला आवश्यक  अंतर सोडून वृक्षारोपण करावे.

बारामती परिसरात विविध विकासकामे सुरु असून आगामी काळात होणारी हद्दवाढीचा विचार करुन पुढची शंभर वर्ष उपयोगात येईल, तसेच कामे करताना ती देखभाल विरहित झाली पाहिजेत, यादृष्टीने नियोजन करून कामे करा, असे निर्देश श्री. पवार यांनी दिले.

स्वच्छतेकरिता नगरपरिषद सेवेत ग्लूटन लिटर पिकिंग मशीन दाखल

आदर पूनावाला स्वच्छ शहर उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेकरिता ४ ग्लूटन लिटर पिकिंग मशीन देण्यात आल्या आहेत, उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत नगरपरिषदेच्या सेवेत त्या दाखल करण्यात आल्या.

यावेळी उपमुख्यमंत्री कार्यालयाचे उपसचिव विकास ढाकणे, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे  कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, आदर पुनावाला क्लीन सिटी इनिसिएटिवचे मुख्य कामकाज अधिकारी मल्हार करवंदे, श्री सिद्धेश्वर मंदिरचे विश्वस्त समीर दाते आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहायता कक्षाने दिला आधार; गरजुंना गेल्या सहा महिन्यात ९ कोटी ६२ लाखांची मदत

राज्यातील जनतेला सुखकर आयुष्य जगता यावे यासाठी जनतेचे पालकत्व म्हणून मुख्यमंत्री हे राज्य शासनाचे विविध धोरण व कायदे, योजना यांच्या प्रभावी अंमलबजावणीद्वारे आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध होण्यासाठी आग्रही असतात.यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य या मूलभूत सोयीसुविधांचा प्राधान्यक्रम लागतो. गोर-गरीब जनतेला दुर्धर आजारांवरील उपचारांकरिता येणाऱ्या खर्चासाठी विविध योजनांसोबतच तातडीच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाने पुढाकार घेतला आहे. या कक्षामार्फत राज्यभर प्रभावी अंमलबजावणी होवून गरजुंना मदत दिली जात आहे

विदर्भातील जनतेलाही या उपक्रमाचा लाभ मिळावा व रूग्णांच्या नातेवाईकांना अर्थसहाय्य मिळविण्यासाठी मुंबईकडे पायपीट करावी लागू नये म्हणून उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सचिवालय, हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरु झाला. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यावर या कक्षाला एक वेगळीच गती प्राप्त झाली आहे. या कक्षातून जानेवारी ते जून २०२५ दरम्यान विदर्भातील गरजु व पात्र रुग्णांना गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी एकूण १ हजार ११३ गरजुंना ९ कोटी ६२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले.

सहाय्यता निधी प्राप्त करण्याकरिता संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना मुंबई येथे अर्ज सादर करण्यास जावे लागत असे त्यात बऱ्याच अडचणीही येत असत. ही अडचण दूर करून विदर्भातील गोर गरीब रुग्णांना नागपुरातच हे अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून २०१५ मध्ये हैद्राबाद हाऊस येथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाची स्थापना झाली. हा कक्ष कार्यान्वित झाल्यापासून नागपूरसह विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यातील गरजु व पात्र रूग्णांचे नातेवाईक गंभीर व दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी अर्थसहाय्य मिळवण्याकरिता येतात व त्यांना कक्षाद्वारे सर्वतोपरी मदत करण्यात येते.

जानेवारी २०१७ पासून या कक्षातून प्रत्यक्ष रुग्णांना उपचारासाठी निधी उपलब्ध होत आहे. नागपुरात दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध असल्याने विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमधील गोर गरीब रुग्णांना उपचार व त्यासाठी शासनाच्या अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी नागपूर मधील हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष मोठा आधार ठरला आहे. या कक्षाद्वारे मंजूर अर्थसहाय्याची रक्कम नागपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित रूग्णालयांना वितरीत करण्यात येते.

जानेवारी ते जून २०२५पर्यंत ९ कोटींची मदत

हैद्राबाद हाऊस स्थित मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे जानेवारी ते जून २०२५ एकूण १ हजार ११३ गरजुंना ९ कोटी ६२ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात २६३ रूग्णांना २ कोटी ३७ लाख ५५ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले. तर फेब्रुवारी महिन्यात १४१ रूग्णांना १ कोटी १४ लाख ८७ हजारांचे, मार्च महिन्यात १७५ रूग्णांना १ कोटी ४८ लाख ८६ हजार ५००, एप्रिल महिन्यात १८२ रूग्णांना १ कोटी ५६ लाख ४ हजारांचे, मे महिन्यात १४७ रूग्णांना १ कोटी २३ लाख ६५ हजार आणि जून महिन्यात २०५ रूग्णांना १ कोटी ८१ लाख ४५ हजारांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

 ७ मृत कामगारांच्या परिवारांना प्रत्येकी ५ लाखांची मदत

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात ११ एप्रिल २०२५ रोजी एमएमपी इंडस्ट्रीज लि. येथे झालेल्या दुर्घटनेमध्ये ७ कामगारांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७ लाखांप्रमाणे ३५ लाखांचे अर्थसहाय्य देण्यात आले.

अर्थसहाय्य मंजूर होण्यासाठी कार्यकारीणी समिती

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे (विदर्भ) प्रमुख व सदस्य सचिव म्हणून डॉ. सागर पांडे कार्यरत आहेत. मुंबई मंत्रालय येथे विशेष कार्य अधिकारी रामेश्वर नाईक हे राज्यातील सर्व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा समन्वय पाहतात. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकरिता प्राप्त अर्जांची छाननी करून अर्थसहाय्य मंजूर करण्याकरिता कार्यकारीणी समिती गठीत करण्यात आली असून विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा शल्य चिकित्सक या समितीचे सदस्य आहे तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे (विदर्भ) प्रमुख हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून नागपूर येथे निर्माण झालेल्या हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे विदर्भातील गरजू व गोर गरीब जनतेला दुर्धर आजारावर उपचारासाठी आर्थिक मदत मिळत आहे. त्यामुळे कठीण प्रसंगात मुख्यमंत्री कार्यालय सर्वसामान्यांच्या भक्कमपणे पाठीशी असल्याने पालकत्वाच्या भूमिकेतील मुख्यमंत्री यांच्या विषयीचा विश्वास सामान्य जनतेमध्ये वृद्धींगत होत आहे.

 

रितेश मो. भुयार,

माहिती अधिकारी,

माहिती व जनसंपर्क, नागपूर.

00000

ताज्या बातम्या

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट

0
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा घेतला आढावा मुंबई, दि. 20 : राज्यात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी...

दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

0
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली ‘सद्भावना दिना’ची प्रतिज्ञा मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला...

राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन

0
मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार...

रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट...

0
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर,...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा

0
मुंबई दि. 20 : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला....