रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 730

मलेशिया महाराष्ट्राशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक – दातो मुजफ्फर शाह मुस्तफा

मुंबई, दि. ३१ : मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलरवरुन २५ अब्ज डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरिता सर्वात महत्त्वाचे असेल, असे प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी येथे केले.

मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूक, व्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम लवकरच भारतभेटीवर येण्याची शक्यता असून आपल्या दौऱ्यात ते मुंबईला देखील भेट देण्याची शक्यता असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले.  मलेशियाला सेमीकंडक्टर निर्मितीचा ५० वर्षांचा अनुभव असून मलेशिया – भारत डिजिटल सहकार्य परिषदेच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्था तसेच सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मलेशिया भारत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मलेशिया भारतीयांना आगामी वर्षभर आगमनानंतर विजा देत असून भारताने देखील मलेशियातून येणाऱ्या नागरिकांना आल्याबरोबर विजा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतातून मलेशियाला गेल्यावर्षी ७ लाख पर्यटक आले असून यंदा त्याहून अधिक पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टीने मलेशियन मुंबई, दिल्ली व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. मलेशिया वेडिंग डेस्टिनेशन, गोल्फ या दृष्टीने भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार

मलेशिया भारताला ३० लक्ष टन पामोलिन तेल निर्यात करीत आहे. पामोलिन हे खाद्य तेल असले तरीही या तेलाबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत असे सांगून ते दूर करून पाम तेल आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून देण्यासाठी मलेशिया प्रयत्न करीत असल्याचे उच्चायुक्त मुस्तफा यांनी सांगितले.

जगाची लोकसंख्या वाढत असताना पाम तेलांमुळेच लोकसंख्येची खाद्य तेलाची गरज पुरी होऊ शकते,असे त्यांनी सांगितले. एक हेक्टर क्षेत्रफळातून तीस वर्षे ८ टन पाम तेलाची निर्मिती होत असल्यामुळे पाम लागवड शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने नवीन परराष्ट्र व्यापार नीती जाहीर केली असून मलेशियाने भारताशी पारंपरिक क्षेत्रांशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर निर्मिती व स्टार्टअप क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. भारत जगाचे औषध निर्मिती स्थळ म्हणून उदयास आले असून उभय देशांनी जेनेरिक औषध निर्मिती, वॅक्सीन विकास व आरोग्य कर्मचाऱ्यांची गतिशीलता या क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे असे राज्यपालांनी सांगितले.

बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूक, पर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपसचिव रोशनी कदम – पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि.30 : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल.

तसेच जेष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य  विभागाच्या  मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन  करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे.

उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

मुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचार संहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी.

भारत निवडणूक आयोगाने दि.१६.३.२०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. आदर्श आचार संहितेच्या कालावधीमध्ये “काय करावे” व “काय करु नये” याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२.१.२०२४ च्या एकूण आठ पत्रान्वये स्वतंत्ररित्या देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि.५.३.२०२४ व ७.३.२०२४ च्या पत्रांद्वारे सर्व संबंधित यंत्रणास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता

नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेवरील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने दि.२४.५.२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचार संहितेबाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२६.१२.२०१६ च्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात येईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी,असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

‘लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारी’ या विषयावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ३० : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची मतमोजणी’ याविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा २०२४ साठी राज्यात ४८ मतदार संघात निवडणुका झाल्या. यांच्या मतमोजणीची प्रक्रिया, मतमोजणीच्या दिवशी प्रसार माध्यमांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, २०१९ च्या तुलनेत राज्याची मतदानाची वाढलेली टक्केवारी, आदर्श आचारसंहिता याबाबत डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत शनिवार दि. १ जून, सोमवार दि. ३ जून २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

संध्या गरवारे/विसंअ/

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई, दि.30 : राज्य सरकारच्या विविध विभागातील 524 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 रविवार, दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाकडून दिनांक 30 मे, 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार करण्यात आली आहे.

शासनाकडून प्राप्त झालेल्या सूचना विचारात घेऊन अराखीव किंवा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी इतर मागास वर्गाचे जात प्रमाणपत्र प्राप्त केले असल्यास, अशा उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा उपलब्ध करून देण्याचा तसेच सदर प्रवर्गातून नव्याने पात्र ठरलेल्या (अराखीव करीता वयापेक्षा अधिक) उमेदवारांना अर्ज सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय सदर शुद्धीपत्रकानुसार आयोगाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-2024 दिनांक 06 जुलै, 2024 ऐवजी सुधारित दिनांकास म्हणजेच दिनांक 21 जुलै, 2024 रोजी घेण्यात येणार आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेकरीता मूळ जाहिरातीस अनुसरून अर्जाद्वारे फक्त अराखीव (खुला) अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांना इतर मागास वर्गाचा दावा करण्याकरीता विकल्प सादर करणे तसेच अराखीव (खुला) मधील उमेदवार जे मूळ जाहिरातीकरीता वयापेक्षा अधिक ठरल्याने अर्ज सादर  करू शकले नाहीत, अशा इतर मागासवर्गातील उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक 31 मे, 2024 ते दिनांक 7 जून, 2024 असा आहे. सविस्तर माहितीसाठी संबंधित उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावरील उपरोक्त शुद्धीपत्रकाचे अवलोकन करावे, असे आयोगाकडून कळविण्यात येत आहे.

००००

राजू धोत्रे/विसंअ

 

 

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन

मुंबई, दि. 30 : कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक 10 जून ते 23 ऑगस्ट 2024 या कालावधीत सीडीएस अभ्यासक्रम क्रमांक 63 चे आयोजन करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षणार्थींचा निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची विनामूल्य व्यवस्था करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर येथे दिनांक 31 मे 2024 ते  3 जून 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येते वेळी त्यांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या या संकेतस्थळावर जाऊन त्यामध्ये CDS-36 अभ्यासक्रमासाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेल्या परिशिष्टांची प्रत काढून व ते पूर्ण भरुन सोबत आणावे.

सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईन पद्धतीने  अर्ज सादर केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्रमांक 0253-245132 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवरून संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

निलेश तायडे/विसंअ/

 

 

देशातील सर्वोत्तम संचालनालय होण्याचा बहुमान; महाराष्ट्र एनसीसीला ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ प्रदान

            मुंबई, दि. 30 : एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांवर देशभक्ती, शिस्त व समाजसेवेचे संस्कार घडतात. सर्वांकरीता एनसीसी प्रशिक्षण अनिवार्य झाले तर ती खरोखरच चांगली गोष्ट होईल. एनसीसी प्रशिक्षणामुळे समाजाप्रती जबाबदार नागरिक घडतात, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले.

            राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) महाराष्ट्र संचालनालयाला सर्वोत्कृष्ट संचालनालय ठरल्याबद्दल राज्यपाल बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ३०) राजभवन येथे ‘राज्यपालांचे प्रशस्तीपत्र’ समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

            राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या ‘प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात’ राज्यपालांच्या हस्ते  महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंदर सिंह यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.

            आपण स्वतः एनसीसी कॅडेट होतो असे नमूद करून देशातील शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व जाणवले, तर देश अतिशय वेगाने प्रगती करेल,  असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र एनसीसी संचालनालयाने आजपर्यंत २३ वेळा पंतप्रधानांचे ध्वजनिशान जिंकले. तसेच ८ वेळा महाराष्ट्र संचालनालय उपविजेते ठरले आहे, याबद्दल राज्यपालांनी राज्यातील एनसीसीच्या सर्व अधिकारी व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

            राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एनसीसी कार्यरत असून एकूण १.१७ लाख कॅडेट्स कार्यरत आहेत. पुढील १० वर्षांत कॅडेट्सची राज्यातील संख्या १.८५ लाख इतकी वाढविली जाणार आहे, हे कौतुकास्पद आहे असे राज्यपालांनी सांगितले.

            एनसीसी प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या क्षेत्रात काम करताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.

            या सोहळ्याला भारतीय सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी, शासनाचे अधिकारी, विद्यापीठांचे कुलगुरु तसेच विविध महाविद्यालयांमधील एनसीसीचे कॅडेट्स उपस्थित होते. यावेळी एनसीसीच्या चमूने एक रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

००००

निलेश तायडे/विसंअ

 

 

‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक’- राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ३० : भारत हजारो वर्षांपासून एक महान सागरी राष्ट्र आहे. स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत भारताला ‘विकसित राष्ट्र’ बनविण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. विकसित भारताचा राजमार्ग विकसित बंदरांमधून जातो. त्यामुळे देशाला विकसित घडविण्यात देशातील बंदरांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी येथे केले.

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचा ३५ वा स्थापना दिवस राज्यपाल श्री. बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. २९ मे) मुंबई येथे समारंभपूर्वक साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

गेल्या ३५ वर्षांमध्ये जवाहरलाल नेहरू देशातील अग्रगण्य कंटेनर बंदर म्हणून उदयाला आले आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, प्रगत तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक उपक्रम यामुळे ते जागतिक व्यापारासाठी प्रमुख बंदर म्हणून स्थापित झाले आहे. जवाहरलाल नेहरू बंदरामुळे कार्यक्षम मालवाहतूक सुनिश्चित झाली व त्यामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

सीमाशुल्कातून मिळणाऱ्या एकूण महसुलाच्या सुमारे २५ टक्के रक्कम ही जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाकडून मिळते तर देशातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त कंटेनर हाताळणी या बंदरातून होते. यावरून देशाच्या औद्योगिक विकासात या बंदराचे योगदान महत्वाचे असल्याचे सिद्ध होते, असे राज्यपालांनी सांगितले.

जवाहरलाल नेहरू बंदरामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण केल्या आहेत. राज्यातील २८ विद्यापीठांचा कुलपती या नात्याने आपण जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला राज्यातील विद्यापीठांसोबत सहकार्य करण्याचे आवाहन करीत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

राज्यातील विद्यापीठांमध्ये सागरी व्यापार आणि बंदर संबंधित अभ्यासक्रम आणि कार्यक्रमांची रचना करण्यासाठी प्राधिकरणाने सहकार्य करावे, असेही आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

राज्यपालांच्या उपस्थितीत वाढवण येथील ग्रीनफिल्ड बंदराच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व पीएसए यांच्यात; तसेच जेपीएनए आणि सीएमएसीजीएम यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते सार्वजनिक खाजगी भागीदारीतील (पीपीपी) निवडक प्रतिनिधींचा तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्राधिकरणाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते जेएनपीएचे विशेष आवरण व कॉर्पोरेट कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले. जेएनपीएच्या 35 व्या वर्धापन दिनानिमित्त तयार केलेल्या कॉफी टेबल पुस्तकाचे तसेच भांडारकर पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित केलेल्या विशेष आवृत्तीचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, पोस्ट मास्टर जनरल महाराष्ट्र किशन कुमार शर्मा, सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त राजेश पांडे, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष, उन्मेष शरद वाघ, सचिव मनीषा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

०००

शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पत्रकारांना प्राधिकार पत्रे

मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र राज्यातून विधान परिषदेवर निवडून आलेल्या कोकण विभाग व मुंबई या दोन पदवीधर मतदारसंघातील तसेच मुंबई व नाशिक विभाग या दोन शिक्षक मतदारसंघातील सदस्यांची मुदत दिनांक७ जुलै, २०२४ रोजी समाप्त होणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरीता भारत निवडणूक आयोगाने दि. ८ मे, २०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे.

या निवडणुकीसाठी बुधवार, दि. २६ जून, २०२४ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान व सोमवार दि. १ जुलै, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीच्या मतदान/मतमोजणीचे वृत्तसंकलन/छायाचित्रण करण्याकरिता विविध प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना भारत निवडणूक आयोगाची विहित प्राधिकारपत्रे प्राप्त करणे आवश्यक आहे. अशी प्राधिकारपत्रे प्राप्त होण्याकरिता भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या इच्छुक प्रतिनिधींच्या नावांच्या शिफारशी भारत निवडणूक आयोगाकडे 11 जून, 2024 पर्यंत पोहचविण्यात येणार आहेत. या शिफारसी महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांनी 10 जून, 2024 पर्यंत मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, मुंबई यांच्याकडे सादर करावयाच्या आहेत. प्रसिद्धी माध्यमांच्या ज्या प्रतिनिधींना वरील निवडणुकीकरिता प्राधिकारपत्रे हवी असतील अशा प्रतिनिधींनी आपली नावे, आपल्या पासपोर्ट आकाराच्या छायाचित्राच्या 2 प्रतीसह (मतदान/मतमोजणी दोन्ही प्राधिकारपत्रे हवी असल्यास 3 प्रतींसह) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई यांच्याकडे 10 जून, 2024 पर्यंत पाठवावीत. जेणेकरून महासंचालनालयाकडून याबाबतची मागणी या कार्यालयाकडे 11 जून, 2024 पर्यंत प्राप्त होऊ शकेल. छायाचित्राशिवाय प्राप्त झालेली मागणी तसेच 10 जून, 2024 नंतर महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयास प्राप्त झालेली मागणी स्वीकारण्यात येणार नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

०००

संजयडीओरके/सहा.संचालक/

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...