शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 729

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३१  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. दि. ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ०८ वाजेपासून दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीला ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) संजय लाटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसे, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक तथा समन्वय अधिकारी (स्ट्रॉंग रूम) अभिजीत घोरपडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संतोष सावंत, सहाय्यक समन्वय अधिकारी (वेलफेअर) डॉ. धीरज पगार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उप वाहतूक व्यवस्थापक आय एस स्वामी, बृहन्मुंबई महानगरपालिका व दक्षिण विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (विद्युत) नलिनी सुत्रावे, बृहन्मुंबई महानगरपालिका फ-दक्षिण विभाग घनकचरा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले की, शिवडी वेअर हाऊसमधील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी सुमारे ३५०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांसह उमेदवार, निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी, पोलिस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर व केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात अग्निशमन बंब, अग्निशामक यंत्रणेने व्यवस्था चोख ठेवावी, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस यांच्यासाठी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार करावा, तसेच त्या ठिकाणी ०४ ॲम्बुलन्स व वैद्यकीय पथक नियुक्त करावे व केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित ठेवावेत, वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकारी नेमण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणचा परिसर मोहीम राबवून तात्काळ स्वच्छ करण्याबाबतची कार्यवाही करावी व मतमोजणी केंद्र परिसरातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावी. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहावा, याची खबरदारी बेस्ट प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांनी घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

०००

व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 31 : देशात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या निवडक चांगल्या संस्था आहेत. परंतु बहुतांशी संस्था सरासरी गुणवत्तेच्या आहेत.  व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी तसेच व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व्हावे, या दृष्टीने बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विदेशातून एमबीए पदवी प्राप्त करून युवक तेथेच नोकरी व्यवसायासाठी स्थायी होत असल्यामुळे प्रतिभावंतांचे स्थलांतर होते, या दृष्टीने देशातील व्यवस्थापन शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा ‘के एस बसू जीवन गौरव पुरस्कार’ थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्ष व ‘टीच फॉर इंडिया’ कार्यक्रमाच्या संस्थापक अनु आगा यांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री.बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अनु आगा यांना यशस्वी उद्योग व्यवस्थापनासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

 

कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादव, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, बीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यासह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते. राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जगातील अनेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. परंतु, जागतिक दर्जाच्या कंपन्या, अकॉउंटिंग – ऑडिट फर्म्स, कन्सल्टन्सी फर्म्स भारताच्या का नाहीत, या दृष्टीने चिंतन झाले पाहिजे.

भारतातील महिला गृह तसेच व्यवसायांच्या उत्कृष्ट व्यवस्थापिका असल्याचे सांगून बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यावे, तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळी शाखा निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी अनु आगा यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल राज्यपालांनी असोसिएशनचे तसेच निवड समितीचे अभिनंदन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी साहिल गोयल, संस्थापक ‘शिप रॉकेट’ यांना मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द ईअर हा पुरस्कार देण्यात आला तर ‘बुक माय शॊ’ चे संस्थापक आशिष हेमराजानी यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड पुरस्कार देण्यात आला.

मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द इयर, एक्सल अशुअर्ड एन्टरप्राईस ऑफ द इयर हे पुरस्कार देखील यावेळी देण्यात आले. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ माशेलकर यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका विषद केली, तर शैलेश हरिभक्ती यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष ‘इ ऍम्बीट’ डिजिटल प्रकाशनचे उद्घाटन करण्यात आले.

०००

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा – लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन

मुंबई, दि. 31 : अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत,  प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच  ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. अधिदान व लेखा कार्यालय, कोषागार कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही. अशा दूरध्वनी, भ्रमणध्वनीला प्रतिसाद देऊन निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी.

तसेच अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा

मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. ३ जून २०२४ रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव श्री.भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव श्री.कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे मार्गदर्शन करतील.

विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग अधिवेशन कामकाजाचे वार्तांकनासाठी करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.

००००

रेल्वेच्या ‘जम्बो ब्लॉक’ कालावधीत सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशी टप्पा वाहतुकीस परवानगी

मुंबई, दि. 31 : मध्य रेल्वेमार्फत तांत्रिक कामासाठी 30 मे रोजी मध्यरात्रीपासून 2 जून 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 63 तासांचा जम्बो ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जम्बो ब्लॉकच्या कालावधीत प्रवासी वाहनांमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

ही परवानगी मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांच्या टप्पा वाहतुकीस जम्बो ब्लॉक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी असणार आहे, असे परिवहन विभागाचे सहसचिव राजेंद्र होळकर यांनी अधिसुचनेद्वारे कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

मलेशिया महाराष्ट्राशी व्यापार, पर्यटन, विज्ञान तंत्रज्ञान देवाणघेवाण वाढविण्याबद्दल उत्सुक – दातो मुजफ्फर शाह मुस्तफा

मुंबई, दि. ३१ : मलेशिया आणि भारताचे संबंध पूर्वीपासून घनिष्ठ व सहकार्याचे असून येत्या तीन वर्षात उभय देशांमधील व्यापार २० अब्ज डॉलरवरुन २५ अब्ज डॉलर इतका वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. आगामी काळात मलेशिया भारताशी पर्यटन, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रीडा व पाम लागवड या क्षेत्रात सहकार्य वाढविणार असून या दृष्टीने महाराष्ट्र हे राज्य मलेशियाकरिता सर्वात महत्त्वाचे असेल, असे प्रतिपादन मलेशियाचे भारतातील नवनियुक्त उच्चायुक्त दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी येथे केले.

मुजफ्फर शाह मुस्तफा यांनी गुंतवणूक, व्यापार व पर्यटन विषयक मलेशियाच्या शिष्टमंडळासह गुरुवारी (दि. ३०) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम लवकरच भारतभेटीवर येण्याची शक्यता असून आपल्या दौऱ्यात ते मुंबईला देखील भेट देण्याची शक्यता असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले.  मलेशियाला सेमीकंडक्टर निर्मितीचा ५० वर्षांचा अनुभव असून मलेशिया – भारत डिजिटल सहकार्य परिषदेच्या माध्यमातून डिजिटल अर्थव्यवस्था तसेच सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात मलेशिया भारत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मलेशिया भारतीयांना आगामी वर्षभर आगमनानंतर विजा देत असून भारताने देखील मलेशियातून येणाऱ्या नागरिकांना आल्याबरोबर विजा उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतातून मलेशियाला गेल्यावर्षी ७ लाख पर्यटक आले असून यंदा त्याहून अधिक पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या दृष्टीने मलेशियन मुंबई, दिल्ली व चेन्नई येथे पर्यटन कार्यालये उघडली असल्याचे त्यांनी सांगितले. मलेशिया वेडिंग डेस्टिनेशन, गोल्फ या दृष्टीने भारतीय पर्यटकांना आकर्षित करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

पाम तेलाबाबत गैरसमज दूर करणार

मलेशिया भारताला ३० लक्ष टन पामोलिन तेल निर्यात करीत आहे. पामोलिन हे खाद्य तेल असले तरीही या तेलाबाबत लोकांच्या मनात काही गैरसमज आहेत असे सांगून ते दूर करून पाम तेल आरोग्यासाठी चांगले आहे हे पटवून देण्यासाठी मलेशिया प्रयत्न करीत असल्याचे उच्चायुक्त मुस्तफा यांनी सांगितले.

जगाची लोकसंख्या वाढत असताना पाम तेलांमुळेच लोकसंख्येची खाद्य तेलाची गरज पुरी होऊ शकते,असे त्यांनी सांगितले. एक हेक्टर क्षेत्रफळातून तीस वर्षे ८ टन पाम तेलाची निर्मिती होत असल्यामुळे पाम लागवड शेतकऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताने नवीन परराष्ट्र व्यापार नीती जाहीर केली असून मलेशियाने भारताशी पारंपरिक क्षेत्रांशिवाय डिजिटल अर्थव्यवस्था, अक्षय ऊर्जा, सेमीकंडक्टर निर्मिती व स्टार्टअप क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली. भारत जगाचे औषध निर्मिती स्थळ म्हणून उदयास आले असून उभय देशांनी जेनेरिक औषध निर्मिती, वॅक्सीन विकास व आरोग्य कर्मचाऱ्यांची गतिशीलता या क्षेत्रात देखील सहकार्य वाढावे असे राज्यपालांनी सांगितले.

बैठकीला मलेशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत अहमद झुवैरी यूसोफ तसेच गुंतवणूक, पर्यटन व व्यापार विषयक कार्यालयांचे भारतातील प्रतिनिधी उपस्थित होते.

०००

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपसचिव रोशनी कदम – पाटील, अश्विनी यमगर, चंद्रशेखर तरंगे, अवर सचिव अशोक नायकवडे, नारायण माने, भरत बिडे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००

उत्तराखंड मधील पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी संजय यादव

मुंबई, दि.30 : उत्तराखंडमध्ये पवित्र चारधामला भेट देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तराखंड शासनाने या काळात होणाऱ्या गर्दी व्यवस्थापनासाठी दि.31 मे, 2024 पर्यंत कोणत्याही प्रकारची “व्हीआयपी दर्शन”सुविधा देण्यात येणार नसल्याचे एका पत्राद्वारे सर्व राज्यांना कळविले असून पवित्र चारधाम दर्शनासाठी भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

चारधाम यात्रेतील दर्शनाची प्रक्रिया सुसंगत करण्यासाठी, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वांसाठी नोंदणी अनिवार्य आहे. तरी सर्व भक्तांनी चारधाम यात्रा 2024 च्या नोंदणीसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणी केलेल्या यात्रेकरुंनाच दर्शनासाठी परवानगी देण्यात येईल.

तसेच जेष्ठ नागरिकांनी चारधाम यात्रेपूर्वी वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आरोग्य  विभागाच्या  मार्गदर्शक सूचनाचे सर्वांनी पालन  करावे, असे आवाहन उत्तराखंड शासनाने केले आहे.

उत्तराखंड शासनाने केलेल्या आवाहनानुसार मुंबई शहर जिल्ह्यातील चारधाम यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्यांनी नाव नोंदणी करावी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ

नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम

मुंबई, दि. ३० : सद्यःस्थिती लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व टप्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. तरी आदर्श आचारसंहिता अद्यापपर्यंत सुरु असून त्यात कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

आचार संहिता कालावधीत एखाद्या अत्यंत तातडीच्या प्रकरणी आचार संहितेतून सूट देऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे, अशी प्रकरणे निवडणूक आयोगास शिफारस करण्यासाठी या कार्यालयाच्या दि.२८.२.२०२४ च्या परिपत्रकान्वये मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने शिफारस केलेले प्रस्ताव या कार्यालयामार्फत भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतात. लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने आचार संहिता लागू झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत अशा एकूण ५९ प्रस्तावांवर भारत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. तरी आचार संहिता कालावधीत आचारसंहितेचे कटाक्षाने पालन केले जाईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी.

भारत निवडणूक आयोगाने दि.१६.३.२०२४ च्या प्रसिद्धीपत्रकान्वये देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम घोषित करुन आदर्श आचार संहिता लागू केलेली आहे. आदर्श आचार संहितेच्या कालावधीमध्ये “काय करावे” व “काय करु नये” याबाबतच्या तसेच इतर विविध विषयाबाबतच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२.१.२०२४ च्या एकूण आठ पत्रान्वये स्वतंत्ररित्या देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या दि.५.३.२०२४ व ७.३.२०२४ च्या पत्रांद्वारे सर्व संबंधित यंत्रणास सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिक व कोकण विभागात विधानपरिषद निवडणूकीची आचारसंहिता

नाशिक व कोकण विभागातील महाराष्ट्र विधानपरिषदेवरील दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. सदर रिक्त होणाऱ्या पदांसाठी भारत निवडणूक आयोगाने दि.२४.५.२०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून प्रसिद्धीपत्रक जारी केलेल्या दिनांकापासून संबंधित मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. या कालावधीत पालन करावयाच्या आदर्श आचार संहितेबाबतच्या सविस्तर सूचना भारत निवडणूक आयोगाच्या दि.२६.१२.२०१६ च्या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे कटाक्षाने पालन करण्यात येईल, याची सर्व संबंधितांद्वारे दक्षता घेण्यात यावी,असे प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

‘लोकसभा निवडणुका २०२४ च्या मतमोजणीची तयारी’ या विषयावर अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई, दि. ३० : ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ ची मतमोजणी’ याविषयी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.

लोकसभा २०२४ साठी राज्यात ४८ मतदार संघात निवडणुका झाल्या. यांच्या मतमोजणीची प्रक्रिया, मतमोजणीच्या दिवशी प्रसार माध्यमांनी कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात, २०१९ च्या तुलनेत राज्याची मतदानाची वाढलेली टक्केवारी, आदर्श आचारसंहिता याबाबत डॉ. किरण कुलकर्णी यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ही मुलाखत शनिवार दि. १ जून, सोमवार दि. ३ जून २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. ३१ मे २०२४ रोजी सायंकाळी ७.३० वाजता महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येणार आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यूट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRA DGIPR

००००

संध्या गरवारे/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतीची उत्पादकता वाढविण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पाच वर्षात कृषी क्षेत्रात २५ हजार कोटींची गुंतवणूक करणार पंढरपूर, दि. ५: शेतकऱ्याला शेती फायद्याची व्हावी, यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढावी असा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अध्यापन कारकीर्दही प्रेरणादायी – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५: विविध विषयांचे अभ्यासक व तज्ज्ञ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व विधिज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ असे बहुआयामी होते. शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाबरोबरच डॉ. बाबासाहेब...

विद्यार्थी नात्याने नवीन विषयांचा प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे – सरन्यायाधीश भूषण गवई

0
मुंबई दि ०५:  विविध आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करताना वेळप्रसंगी प्रत्येक नवीन विषयाचा विद्यार्थी या नात्याने प्रांजळपणे अभ्यास करणेही गरजेचे असल्याचे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे दर्शन

0
पंढरपूर, दि. ५ (जिमाका): आषाढी शुद्ध एकादशी निमित्त वाखरी येथे पोहोचलेल्या आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट...

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...