शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 728

मतमोजणी कक्षातील कामकाजाचा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी  यांच्याकडून आढावा

सांगली, दि. (जिमाका) :  सांगली लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्षात सुरू असलेल्या कामकाजाचा सूक्ष्म आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी घेतला आणि येथील अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत आवश्यक त्या सूचना केल्या.

४४- सांगली लोकसभा मतदार संघात ७ मे रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी येत्या ४ जून २०२४ रोजी वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन मिरज येथे होणार असून जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी आज मतमोजणी कक्षातील कामांची पाहणी केली. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी सरिता लष्करे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्यासह पोलीस व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले, मतमोजणीसाठी आयोगाच्या सुचनांनूसार निश्चित केलेल्या आणि ओळखपत्र वितरीत केलेल्या अधिकारी, कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी आणि माध्यम प्रतिनिधी यांना प्रवेश असणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी मतमोजणी केंद्रावर सुरक्षेच्या अनुषंगाने उपाययोजना केल्या आहेत. अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेले काम जबाबदारीने पार पडावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी  मतमोजणी कक्षातील सीसीटीव्ही, संगणक, बॅरीगेट, आत येण्याचा व बाहेर जाण्याचे मार्ग, ईव्हीएम मतमोजणी केंद्रात नेण्याचा मार्ग, पोलीस सुरक्षा, माध्यम कक्ष आदी ठिकाणी भेट देवून येथील कामांबाबत  संबंधितांना आवश्यक सूचना केल्या.

जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल यांनी मतमोजणी कक्षातील संगणकीय कामकाज, सीसीटिव्ही व अनुषंगिक कामकाजाबाबत केलेल्या कामांची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.

०००

जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्याकडून स्ट्राँग रुमसह मतमोजणी व्यवस्थेची पाहणी

  • एकूण मतमोजणी टेबल १०१, उपलब्ध कर्मचारी संख्या ३७९
  • प्रशासनाकडून युध्दपातळीवर तयारी

चंद्रपूर, दि. १ : निवडणूक प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा समजला जाणारा मतमोजणीचा टप्पा, येत्या मंगळवारी (4 जून) होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाची युध्द पातळीवर तयारी सुरू आहे. मतमोजणीकरीता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून या व्यवस्थेची पाहणी करण्याकरीता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडावून येथील स्ट्राँग रुमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली व सुचना दिल्या.

13- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीनंतर येत्या 4 जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडावून येथे मतमोजणी होणार आहे. या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरीता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरीकेटींग, सीसीटीव्ही, विद्युत व्यवस्था, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्ग, सुरक्षा व्यवस्था, मिडीया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना सूचनाही केल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मतमोजणीकरीता एकूण टेबल व फेऱ्यांची संख्या : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी 14 टेबल याप्रमाणे एकूण 84 टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरीता 9 टेबल आणि ईटीपीबीएमएस (सर्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरीता 8 टेबल असे एकूण 101 टेबल राहणार आहेत. तसेच राजूरा विधानसभा मतदारसंघाच्या 24 फे-या, चंद्रपूर – 28, बल्लारपूर – 26, वरोरा – 25, वणी – 25, आणि आर्णि मतदारसंघाच्या मतमोजणीच्या 27 फेऱ्या होणार आहेत.

नियुक्त कर्मचारी संख्या : प्रत्यक्ष मतमोजणी करीता आणि अतिरिक्त स्टाफ धरून 120 टक्के याप्रमाणे एकूण 379 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षकांची संख्या 122, मतमोजणी सहायक 140 आणि सुक्ष्म निरीक्षकांची संख्या 117 आहे.

मतमोजणी केंद्रावर नियुक्त सुरक्षा व्यवस्था : मतमोजणी आवाराच्या / परिसराच्या सभोवताली 100 मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात आहे.

मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तुंना प्रतिबंध : मतमोजणी केंद्रात मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तु नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही केवळ मिडीया सेंटरमध्येच मोबाईलचा वापर करता येईल. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जातांना मोबाईल, कॅमेरा मिडीया सेंटर येथे जमा करावा लागेल.

उमेदवार / प्रतिनिधींना अत्यावश्यक सूचना : मतमोजणी परिसरात तीन स्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश दिला जाईल, परिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येईल. उमेदवार / उमेदवारांचे प्रतिनिधींनी आपले मोबाईल / इलेक्ट्रॉनिक संयत्रे जमा करणे बंधनकारक राहील.

०००

जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याकडून शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी,आढावा

मुंबई दि. १ : मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दि. ४ जून, २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरु होणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी आज शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी करून मतमोजणीसाठी आवश्यक उपाययोजना आणि सोयीसुविधांचा आढावा  घेतला.

यावेळी मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे,पोलीस उपायुक्त संजय लाटकर, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे स्ट्राँग रूम संचालक तथा समन्वय अधिकारी अभिजीत घोरपडे,तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी मतमोजणीच्या अनुषंगाने स्थापन करावयाचे विविध कक्ष, सोयीसुविधांची उभारणी, उमेदवारांसाठी व्यवस्था,माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष, मतमोजणी पथके, आपत्कालीन कंट्रोल रूमची पाहणी करून चर्चा करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि अखंडित व सुरळीत वीजपुरवठा राहील यादृष्टीने सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी दिल्या.

मतमोजणी केंद्राच्या परिसरातील स्वच्छता आणि मतमोजणीच्या अनुषंगाने सुरक्षा उपाययोजनाबाबतही चर्चा करण्यात आली. मतमोजणी केंद्रातील नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष, चौकशी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष  उपलब्ध  असल्याची माहितीही जिल्हाधिकारी श्री.यादव यांनी यावेळी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे कटाक्षाने पालन करून मतमोजणी प्रक्रिया नियोजनबद्ध पार पाडण्याबाबत संबंधितांना सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

०००

 

राज्यपालांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

मुंबई, दि. 31 : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज  (दि. 31) राजभवन मुंबई येथे अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. 

यावेळी राजभवनातील अधिकारी व कर्मचारी यांनी देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

०००

Birth Anniversary of Ahilyadevi Holkar

Governor Bais offers tributes to Ahilyadevi Holkar

     

      Mumbai, 31st May : Maharashtra Governor Ramesh Bais offered floral tributes to the portrait of Punyashlok Ahilyadevi Holkar on the occasion of the birth anniversary of Ahilyadevi Holkar at Raj Bhavan, Mumbai on Friday (31st May).

      Officers and staff of Raj Bhavan also offered their respects to Ahilyadevi Holkar on the occasion.

००००

अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जीर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. ३१ : भारताचा वारसा, संस्कृती आणि सामर्थ्य समृद्ध करण्यात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचे खूप मोठे योगदान लाभले आहे. अहिल्यादेवींचे सुशासन, मंदिरांचा जिर्णोद्धार व महिला सक्षमीकरणाचे कार्य लोकोत्तर असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारंभाचे औचित्य साधून मुंबई विद्यापीठाचे लोकमान्य टिळक अध्यासन केंद्र, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र आणि समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहाँगीर दीक्षांत सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अँड रिसर्चचे संचालक प्रा. सतीश मोढ, समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेशचे कोषाध्यक्ष धीरज बोरीकर, मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, कुलसचिव प्रा. बळीराम गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दूरदर्शी प्रशासक म्हणून अहिल्याबाईंनी जमीन महसूल व्यवस्थापनाची प्रक्रिया सुलभ केली. त्यांच्या प्रशासन निष्पक्षता, न्याय आणि प्रजेबद्दलच्या कर्तव्याच्या भावना उदार होत्या. महिलांच्या हक्कांसाठी व सामाजिक-आर्थिक उन्नतीचे मार्ग निर्माण करण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. आज महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने परिस्थितीत लक्षणीय बदल होत असून सर्वत्र महिलांचे प्रतिनिधीत्व वाढत आहे ही अभिमानाची बाब असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आपला सांस्कृतिक वारसा जपण्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाईंचे समर्पण वाखाणण्याजोगे आहे. त्यांनी अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच मंदिरांची पुनर्बांधणी केली. अहिल्याबाई होळकर या थोर समाजसुधारक होत्या. माळवा संस्थेत सती प्रथेविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. वाईट प्रथा मोडीत काढत त्यांनी मुलींचे लग्नाचे वय वाढविण्याचे धाडसी पाऊल उचलले. विधवांना मालमत्तेत हक्क दिला असल्याचेही  राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले.

आज, जसे आपण अहिल्यादेवींचा वारसा लक्षात ठेवतो, तसेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना नेतृत्व पदे स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज देखील आपण ओळखली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिलांना समान भागीदार केल्याशिवाय ‘विकसित भारत’चे उद्दिष्ट आपण साध्य करू शकत नाही. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती जपून, आपण अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाची निर्मिती केली पाहिजे.  अहिल्यादेवी होळकरांचा वारसा पुढे नेण्यासाठी विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजवावी लागणार असून राज्यातील विद्यापीठांना विद्यार्थिनींसाठी अधिकाधिक वसतिगृहे बांधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. नोकरदार महिलांसाठी अधिकाधिक वसतिगृहे बांधणे व वंचित आदिवासी मुली गरिबीमुळे शाळा सोडणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली जाणे हेही तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अधिकाधिक महिला उद्योजिका निर्माण व्हाव्यात, महिलांना अधिक स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक असून महिलांना त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने राज्य आणि केंद्राच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा याची आपणा सर्वांस खात्री करावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर भाषणात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी असून अशा महनीय व्यक्तिमत्वातून सतत प्रेरणा मिळत राहावी, यासाठी वर्षभर विद्यापीठामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विवेकानंद एज्युकेशन सोसायटीज इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् अँड रिसर्चचे संचालक प्रा. सतीश मोढ यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर सखोल प्रकाश टाकला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जगलेले ७० वर्षांचे आयुष्य आज तीनशे वर्षानंतर आणि इथून पुढेही चिरकाल प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बळीराम गायकवाड यांनी सर्वांचे आभार मानले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती समारंभाचे औचित्य साधून दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावरील चित्र प्रदर्शनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

०००

ते मृत्यू उष्माघातामुळे नसल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे झाले स्पष्ट – जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड

नागपूर,दि. 31 : जिल्ह्यात उष्णतेचा दाह वाढला असून यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात 12 रुग्ण तर मनपा हद्दीच्या क्षेत्रात 12 रुग्ण महानगरातील विविध रुग्णालयात दाखल झाले होते. हे सर्व 24 रुग्ण यशस्वी उपचारानंतर बरे होऊन सुखरुप घरी परतले आहेत. पोलीस विभागाने अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केलेल्या 12 व्यक्तींचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर हे मृत्यू उष्माघाताने झाले किंवा कसे याबाबत स्पष्टता येईल. एप्रिल महिन्यात अकस्मात जे तीन मृत्यू झाले होते त्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून त्यांचे मृत्यू उष्माघाताने नसून जंतूसंसर्ग व निमोनियाने झाले, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.बी.राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.

उष्माघात मृत्यू अन्वेषण समितीची बैठक आज जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या दालनात संपन्न झाली. यावेळी समितीतील सदस्य तथा मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, बालरोग तज्ज्ञ दिलीप मडावी, डॉ.मृणाल हरदास, फिरते पथकाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गुज्जनवार, फोरेन्सिक मेडीसीनचे डॉ.दिनेश अकर्ते व इतर सदस्य उपस्थित होते.

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे नोंद झालेल्या संशयित उष्माघात रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला idspnagpur2024@gmail.com या इमेलवर कळवावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यातील संशयित उष्माघात रुग्णांची माहिती दररोज शासनाच्या पोर्टलवर अपलोड केली जात आहे. त्यानुसार दिनांक 31 मे 2024 रोजी अखेरपर्यंत 24 संशयित रुग्णसंख्या नोंदविण्यात आलेली आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कोणत्याही व्यक्तीचा ताप जर 104.7 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, त्याचे  भान हरपत असेल अथवा तीव्र डिहायड्रेशनची लक्षणे असतील तर त्या रुग्णाला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आले आहे.

उष्माघाताच्या बचावासाठी पुरेसे पाणी, ताक किंवा लिंबु पाणी इत्यादी द्रव पदार्थ घ्यावयास हवेत. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडू नये. बाहेर पडायचे असल्यास डोक्यावर टोपी, रुमाल,छत्री इत्यादी वापरावे. वातावरणाला पंखा, कुलर, एसीने थंड ठेवण्याचे प्रयत्न करावेत. लहान मुले, वयस्कर मंडळी यांची विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.

०००

मुंबई शहर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघ मतमोजणीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३१  :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात २० मे २०२४ रोजी मतदान घेण्यात आले. दि. ४ जून २०२४ (मंगळवार) रोजी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे सकाळी ०८ वाजेपासून दोन्ही लोकसभा मतदारसंघांतील मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी आज मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेतला.

मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या आढावा बैठकीला ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास पानसरे, ‘३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त (बंदर परिमंडळ) संजय लाटकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (वडाळा विभाग) विजय भिसे, मुंबई राज्य वातावरणीय कृती कक्षाचे संचालक तथा समन्वय अधिकारी (स्ट्रॉंग रूम) अभिजीत घोरपडे, उपमुख्य अग्निशमन अधिकारी संतोष सावंत, सहाय्यक समन्वय अधिकारी (वेलफेअर) डॉ. धीरज पगार, मुंबई पोर्ट ट्रस्टचे उप वाहतूक व्यवस्थापक आय एस स्वामी, बृहन्मुंबई महानगरपालिका व दक्षिण विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सतीश बडगिरे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता (विद्युत) नलिनी सुत्रावे, बृहन्मुंबई महानगरपालिका फ-दक्षिण विभाग घनकचरा विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. यादव म्हणाले की, शिवडी वेअर हाऊसमधील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांच्या मतमोजणीसाठी सुमारे ३५०० कर्मचारी कार्यरत असणार आहेत. तसेच या कर्मचाऱ्यांसह उमेदवार, निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी, पोलिस उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर व केंद्राबाहेर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना श्री. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात अग्निशमन बंब, अग्निशामक यंत्रणेने व्यवस्था चोख ठेवावी, मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी, बंदोबस्तासाठी नियुक्त पोलीस यांच्यासाठी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय कक्ष तयार करावा, तसेच त्या ठिकाणी ०४ ॲम्बुलन्स व वैद्यकीय पथक नियुक्त करावे व केईएम हॉस्पिटलमध्ये १० बेड आरक्षित ठेवावेत, वैद्यकीय मदत वेळेवर मिळण्यासाठी स्वतंत्र वेल्फेअर अधिकारी नेमण्याचे निर्देश श्री. यादव यांनी दिले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणचा परिसर मोहीम राबवून तात्काळ स्वच्छ करण्याबाबतची कार्यवाही करावी व मतमोजणी केंद्र परिसरातील स्वच्छतागृह स्वच्छ ठेवावी. मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळीत व अखंडित विद्युत पुरवठा सुरू राहावा, याची खबरदारी बेस्ट प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) यांनी घेण्याच्या सूचनाही श्री. यादव यांनी यावेळी दिल्या.

०००

व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व गुणवत्तापूर्ण करावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 31 : देशात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या निवडक चांगल्या संस्था आहेत. परंतु बहुतांशी संस्था सरासरी गुणवत्तेच्या आहेत.  व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या सर्व संस्थांमधील शिक्षणाची गुणवत्ता वाढावी तसेच व्यवस्थापन शिक्षण परवडणारे व्हावे, या दृष्टीने बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विदेशातून एमबीए पदवी प्राप्त करून युवक तेथेच नोकरी व्यवसायासाठी स्थायी होत असल्यामुळे प्रतिभावंतांचे स्थलांतर होते, या दृष्टीने देशातील व्यवस्थापन शिक्षण गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या स्थापनेचे ७० वे वर्ष साजरे करीत असलेल्या बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे (बीएमए) देण्यात येणारा ‘के एस बसू जीवन गौरव पुरस्कार’ थरमॅक्स लिमिटेडच्या माजी अध्यक्ष व ‘टीच फॉर इंडिया’ कार्यक्रमाच्या संस्थापक अनु आगा यांना प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन आज मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात करण्यात आले. यावेळी राज्यपाल श्री.बैस बोलत होते. या सोहळ्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अनु आगा यांना यशस्वी उद्योग व्यवस्थापनासाठी हा पुरस्कार देण्यात आला.

 

कार्यक्रमाला बीएमएचे अध्यक्ष किरण यादव, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलपती व पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ रघुनाथ माशेलकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, बीएमएचे माजी अध्यक्ष शैलेश हरिभक्ती यासह प्लॅटिनम ज्युबिली पुरस्कार समितीचे सदस्य व पुरस्कार विजेते उद्योजक उपस्थित होते. राज्यपाल श्री.बैस म्हणाले की, जगातील अनेक कंपन्यांचे सीईओ भारतीय आहेत. परंतु, जागतिक दर्जाच्या कंपन्या, अकॉउंटिंग – ऑडिट फर्म्स, कन्सल्टन्सी फर्म्स भारताच्या का नाहीत, या दृष्टीने चिंतन झाले पाहिजे.

भारतातील महिला गृह तसेच व्यवसायांच्या उत्कृष्ट व्यवस्थापिका असल्याचे सांगून बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनने महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन द्यावे, तसेच शहरी व ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना व बचत गटांना मार्गदर्शन करण्यासाठी वेगळी शाखा निर्माण करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली. अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी अनु आगा यांना उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वोच्च पुरस्कार दिल्याबद्दल राज्यपालांनी असोसिएशनचे तसेच निवड समितीचे अभिनंदन केले. राज्यपालांच्या हस्ते यावेळी साहिल गोयल, संस्थापक ‘शिप रॉकेट’ यांना मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द ईअर हा पुरस्कार देण्यात आला तर ‘बुक माय शॊ’ चे संस्थापक आशिष हेमराजानी यांना बिझनेस लीडर ऑफ द डिकेड पुरस्कार देण्यात आला.

मॅनेजमेंट अचिव्हर ऑफ द इयर, एक्सल अशुअर्ड एन्टरप्राईस ऑफ द इयर हे पुरस्कार देखील यावेळी देण्यात आले. ‘मेट्रोमॅन’ ई. श्रीधरन यांना त्यांच्या अनुपस्थितीत विशेष सन्मान प्रदान करण्यात आला. बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष किरण यादव यांनी प्रास्ताविक केले. डॉ माशेलकर यांनी पुरस्कार निवडीमागची भूमिका विषद केली, तर शैलेश हरिभक्ती यांनी आभारप्रदर्शन केले. राज्यपालांच्या हस्ते संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबिली विशेष ‘इ ऍम्बीट’ डिजिटल प्रकाशनचे उद्घाटन करण्यात आले.

०००

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा – लेखा व कोषागारे संचालनालयाचे आवाहन

मुंबई, दि. 31 : अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई आणि राज्यातील सर्व जिल्हा कोषागार कार्यालयांमधून निवृत्तीवेतनधारक, कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन, सुधारित निवृत्तीवेतन, कुटुंबनिवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतन विषयक इतर लाभ प्रदान करण्यात येतात. सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत,  प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोषागार कार्यालयांमार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही. तसेच  ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी सूचित केले जात नाही. अधिदान व लेखा कार्यालय, कोषागार कार्यालयांमार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो. अशा येणाऱ्या संदेशाबाबत सावध राहून कुणीही प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

याबाबत काही निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी, भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारांतील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. अशा कोणत्याही प्रकारचा दूरध्वनी अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत केला जात नाही. तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरी पाठविले जात नाही.

दूरध्वनी, भ्रमणध्वनीवरून प्रदानासंदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरणेबाबत अधिदान व लेखा कार्यालय तसेच जिल्हा कोषागार कार्यालयांमार्फत कळविले जात नाही. अशा दूरध्वनी, भ्रमणध्वनीला प्रतिसाद देऊन निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील, याची नोंद घ्यावी.

तसेच अशा प्रकारचा दूरध्वनी प्राप्त झाल्यास कृपया आपण निवृत्तीवेतन घेत असलेल्या अधिदान व लेखा कार्यालय अथवा जिल्हा कोषागार कार्यालयास अवगत करावे. तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमत: संबंधित निवृत्तीवेतन घेत असलेल्या कार्यालयांशी संपर्क साधण्यात यावा, असे आवाहन लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक दीपा देशपांडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

विधिमंडळ कामकाजाबाबत मंत्रालयात तीन जूनला कार्यशाळा

मुंबई, दि. ३१ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘माध्यम साक्षरता अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार तसेच महासंचालनालयातील अधिकारी यांच्याकरिता ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन सोमवार, दि. ३ जून २०२४ रोजी मंत्रालयातील वार्ताहर कक्षात करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधिमंडळ सचिवालयाचे निवृत्त प्रधान सचिव अनंत कळसे, विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव जितेंद्र भोळे हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विधिमंडळाची कार्यपद्धती आणि संकल्पना या विषयावर प्रधान सचिव श्री.भोळे, द्वितीय सत्रात विधिमंडळ कामकाजाचे वृत्तांकन, चर्चा आणि विशेषाधिकार या विषयावर निवृत्त प्रधान सचिव श्री.कळसे तर तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर विधानपरिषद उपसभापती डॉ. गोऱ्हे मार्गदर्शन करतील.

विधिमंडळ अधिवेशन कामकाजाचे वार्तांकन करताना माध्यम प्रतिनिधींना ही कार्यशाळा मार्गदर्शक ठरणार आहे. कार्यशाळेतील मार्गदर्शनाचा उपयोग अधिवेशन कामकाजाचे वार्तांकनासाठी करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी केले आहे.

००००

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...