शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 727

इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे दि.२५ : इंदापूर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य शाखेच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन बांधकाम चांगल्या दर्जाचे करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, इंदापूर शाखेचे शाखा व्यवस्थापक बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.

नविन बांधकाम ७ हजार ३९२ चौ. फुट जागेत करण्यात येणार आहे. बांधकामाला एकुण अंदाजे खर्च १ कोटी ८३ लाख ४६ हजार ९२६ रूपये येणार आहे.

000

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली श्री मलंगगडावर महाआरती

ठाणेदि.24 (जिमाका) : भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कल्याण जवळील श्री मलंगगडच्या यात्रेनिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीमलंग गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेऊन आरती केली. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध अधिकारी-पदाधिकारी तसेच मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.

00000

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पहिल्या क्रमांकास रु.५ लाख, दुसऱ्या क्रमांकास रु.३ लाख तर तिसऱ्या क्रमांकास रु. २ लाख

ठाणे, दि.24 (जिमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता रुपये पाच लाख, दुसऱ्या क्रमांकाच्या रुपये एक लाख पारितोषिकाची रक्कम रुपये तीन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या रुपये 75 हजार पारितोषिकाची रक्कम रुपये दोन लाख देण्यात येणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली अन् ठाण्यातील धर्मवीर आनंद दिघे क्रीडानगरी खेळाडू -प्रेक्षकांच्या जल्लोषाने आणि टाळ्यांनी दुमदूमून गेला.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तसेच ठाणे महानगरपालिका ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) सन 2023-24, ठाणे या स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेत एकूण सोळा मुलांचे व सोळा मुलींचे संघ सहभागी होणार आहेत

यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा मंत्रालयाचे उपसचिव सुनिल हांजे, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के,महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबूराव चांदेरे, मंत्रालयाचे उपसचिव सुनील हांजे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी या मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या भाषणाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्री स्व.मनोहर जोशी यांना आदरांजली वाहत स्व.मनोहर जोशी यांनी पंचवीस वर्षांपूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, बुवा साळवी यांचेही यासाठी अमूल्य योगदान होते, या आठवणींना उजाळा दिला. ते पुढे म्हणाले, आपल्या मातीतला खेळ जगभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपल्या खेळाडूंनी राज्याचा आणि देशाचा नावलौकिक जगभरात वाढविला आहे, याचा अभिमान आहे. राज्यातील खेळाडू गुणवान आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने त्यांच्या बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या देशातील खेळाडूंना आणि युवकांना खेलो इंडिया, फिट इंडिया च्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने या स्पर्धेसाठी 75 लाख रुपये तर ठाणे महानगरपालिकेने 1 कोटी 11 लाख रुपये इतका निधी दिला आहे. कबड्डी खेळासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतलेल्या या पुढाकाराचा इतरांनी आदर्श घ्यायला हवा. मैदानी खेळांना जास्तीत जास्त वाव द्यायला, यासाठी शासनाच्यावतीने मैदानी खेळांसह पारंपारिक “क्रीडा महाकुंभ” भरविण्यात येणार आहे. खेळाडूंनी खेळाचे उत्तम प्रदर्शन करुन खेळाच्या माध्यमातून देशाचा आणि राज्याचा नावलौकिक वाढवावा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्पर्धेचे ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. येथील क्रीडांगणास “धर्मवीर आनंद दिघे क्रीडा नगरी” असे नाव देण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक, मैदानी खेळ आणि गणेश वंदना हे कलाविष्कार सादर केले.

क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे यांनी प्रास्ताविकात या स्पर्धेबाबतची माहिती उपस्थितांना दिली. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राणाप्रताप तिवारी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्ण बारटक्के आणि ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

उद्घाटन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी मैदानास श्रीफळ वाढवून व खेळाडूंची भेट घेवून त्यांना शुभेच्छा देत कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ केला.
0000

महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजळून निघावी : अभिनेता अनासपुरे

बीड, दि.24 (जिमाका) :- तरुण पिढीला स्थानिक लोककलांची, खाद्य संस्कृतीची ओळख होण्यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आज महासंस्कृती महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी केले.

       पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, ग्रामविकास विभाग, कृषी विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवाचे थाटात उद्घाटन छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते.

     यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन सुप्रसिध्द सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, पद्मश्री बशीर मामू, जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, विकास उपायुक्त सुरेश बेदमूथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, आत्माचे प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

             महासंस्कृती महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी महिला स्वयंसहायता बचत गटातर्फे निर्मित विविध वस्तू व खाद्यपदार्थाच्या, कृषी विभागाकडून लावण्यात आलेल्या दालनाला मान्यवरांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. यावेळी विशेष सत्कार पद्मश्री शब्बीर मामू, यांच्यासह जागतिक स्तरावर खेळातील उत्कृष्ट कामगिरी केलेले ॲथलेटिक्स अविनाश साबळे, क्रिकेटर सचिन संजय धस, तायक्वांदो नयन अविनाश बारगजे व अविनाश पांचाळ आदि खेळाडू, प्रशिक्षक तसेच खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्यांचा गौरव करण्यात आला. त्तपुर्वी शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथुन शोभायात्रा काढण्यात आली.

श्री. आर्दड पुढे म्हणाले की, आपला सांस्कृतिक वारसा हा येथे सर्व समाजातील या संस्कृतीचा पाया सशक्त असा आहे तो इथल्या खाण्या-पिण्यातून आणि जगण्यातून दिसतो. त्यामुळेच्या आपल्या आधीच्या पिढीतील लोक वागण्या बोलण्यातून संतुलित अशी असायची हीच लोप पावत असलेली सशक्त संस्कृती महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून पुन्हा लोकांसमोर उभी करण्याचा मानस आहे. या महोत्सवात लोक पावलेली खाद्य संस्कृती सोबतच लोककलांना प्रोत्साहन देण्यासाठी हा मंच शासनाने उभा करुन दिला आहे. अधिकाधिक लोकांनी या महोत्सवात येवून मनोरंजनासोबत खाद्य संस्कृती आणि लोककलांचा आनंद लुटावा असे आवाहनही त्यांनी केले.

महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी : अभिनेता अनासपुरे

  महासंस्कृती महोत्सवात आपली संस्कृती उजाळून निघावी, असे उदघाटनाप्रसंगी प्रमुख उदघाटक म्हणून लाभलेले सिने अभिनेता मकरंद अनासपुरे यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले, स्थानिक उत्पादने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल असला पाहिजे, बचत गटाच्या महिलांनी दर्जेदारपणे बनविलेले पिढी जात पदार्थ खरेदी करून त्याचा स्वाद घ्यावा. पूर्वी गावात निर्मित होणारा  माल गावातच विकला जायचा त्यामुळे स्थानिक व्यवसायांना उभारी मिळत असे.  त्यामुळे महासंस्कृती महोत्सवातील विविध स्टॉल वरील पदार्थ केवळ न बघता खरेदी करावीत. असे आवाहनही त्यांनी आवर्जून केले.

 आपला अंशतः सहभाग व्यवसाय उभारणीसाठी महत्त्वाचा आहे भगिनींचे प्रॉडक्ट विकत घेऊन त्यांचा व्यवसाय वाढवावा. तरी महासंस्कृती महोत्सवाचा उपक्रम अतिशय स्वागतार्ह आहे. असेही त्यांनी सांगितले. तसेच स्टॉलवरील स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाची आवर्जून खरेदी करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी केले.  बीड शहरात आगळावेगळा महा संस्कृती महोत्सव पुढील पाच दिवस छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेला आहे. या महोत्सवासस्थानी कलाकारांना मंच तर व्यवसायिकांना स्टॉलची उभारणी करून देण्यात आलेली आहे. स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संधी देण्यात येणार आहे. महोत्सवात बीड जिल्ह्याचे नाव ज्यांनी उंचावर नेले अशा व्यक्तींचा सत्कार व सन्मान या ठिकाणी केला गेला. महोत्सवात 200 बचत गटांचे स्टॉल, कृषी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी महासंस्कृती महोत्सवा उपस्थित रहावे, असे आवाहनही  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.

            कार्यक्रमाच्या सुरुवातीला  चंपावती विद्यालयातील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. तर यावेळी स्थानिक लोक कलावंतांनी यात कन्या भृण हत्या विरोधी  जाकरुकता पसरवणारा जोगवा, गोंधळ, वासूदेव, पोवाडा, आणि जागो हिंदुस्थानी ग्रुप यांचा देशभक्तीपर गीत गायनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात सादर करण्यात झाला.

०००००

‘शिवगर्जना’महानाट्याला पहिल्याच दिवशी पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे, दि.२४: मंचासमोरून जाणारे हत्ती, घोडे, उंट….मोगलांचे आक्रमण आणि चित्तथरारक अंगावर शहारे आणणाऱ्या लढाया…..महाराष्ट्राची वारकरी परंपरा, लोकसंस्कृती, सह्याद्रीचा रांगडेपणा… तळपत्या तलवारी, ढाल, भाले, धनुष्यबाण…. स्वराज्यासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या मावळ्यांचा पराक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप….जणू शिवकालीन इतिहास दौलतराव जाधव तुरुंगाधिकारी महाविद्यालयाच्या मैदानावर अवतरला. निमित्त होते ‘शिवगर्जना’ महानाट्याचे…..

राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पुणे जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने  छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त ‘शिवगर्जना’ महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महानाट्याला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या महानाट्याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी आमदार सुनील टिंगरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आमदार रामभाऊ मोझे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, माजी विशेष पोलीस महनिरीक्षक विठ्ठल जाधव, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवगर्जना महानाट्याच्या आयोजनाबाबत  संदेश यावेळी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणून देशासाठी योगदान देण्याचे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी उदघाटन प्रसंगी केले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या  कार्याची माहिती होण्यासोबत त्यांच्या कार्यातून पुढच्या पिढीला  प्रेरणा मिळावी यासाठी शासनाच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘शिवगर्जना’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या काळात आपण प्रदूषण, रोगराई, दारिद्र्य, बेरोजगारी विरुद्ध लढले पाहिजे, असे आवाहन डॉ. पुलकंडवार यांनी केले.

आमदार टिंगरे म्हणाले, पुणे जिल्हा हा शिवरायांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भूमीत त्यांचा पराक्रम सांगणारे शिवगर्जना महानाट्य होत असून नागरिकांनी याचा लाभ घ्याव, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले.  ते म्हणाले, पुढच्या पिढीच्या मनावर छत्रपतींचा विचार आणि कार्याचा आदर्श बिंबविण्यासाठी सर्वांनी हे महानाट्य अवश्य पहावे आणि हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

भव्य मंचावर साकारला शिवकालीन इतिहास
देखण्या आणि भव्य मंचावर पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीने शिवरायांची भव्य दिव्य शौर्यगाथा ऐतिहासिक प्रसंगाद्वारे कलाकारांनी ताकदीने सादर केली. देशप्रेम जगविणारे संवाद, ताकदीचा अभिनय, ऐतिहासिक प्रसंगांना साजेसे नेपथ्य, प्रसंगानुरूप गीत-नृत्य आणि संगीत यामुळे त्यात छत्रपतींच्या पराक्रमासोबत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले. स्वराज्याची शपथ, अफजलखान वध, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक सोहळा अशा अनेक प्रसंगातून इतिहास प्रेक्षकांच्या समोर उभा राहिला. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी कलाकारांना टाळ्या वाजवून दाद दिली.

महानाट्याच्यावेळी संपूर्ण परिसर यावेळी जय भवानी… जय शिवाजी.. जय  छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणेने दुमदुमला. नागरिकांनी महानाट्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

‘शिवगर्जना’ महानाट्याचे २६ तारखेपर्यंत भव्य आयोजन करण्यात आले असून नागरिकांना हे महानाट्य विनाशूल्क पाहता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य देण्याचे ठरवले असून प्रवेशिकांची गरज असणार नाही. जिल्ह्यातील सर्व नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.
००००

मुंबई शहर जिल्ह्याच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी मार्शल रॅलीचे आयोजन – जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव

मुंबई, दि.24 : मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अंतर्गत मतदार नोंदणी करीता व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.मुंबई शहर जिल्हा कार्यालय आणि लाला लजपतराय महाविद्यालयातील राष्ट्रीयसेवा योजनेच्या वतीने मार्शल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

एअर इंडिया बिल्डिंग, मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यत ही मार्शल रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये सामजिक संस्था मार्क युवर प्रेझेन्स (MYP) सोबत मुंबई शहरातील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजतील विद्यार्थी,प्राध्यापक विविध विद्या शाखेचे विद्यार्थी,नागरिक मोठ्या संख्येने  सहभागी झाले होते. यावेळी स्वीप नोडल अधिकारी डॉ. सुभाष दळवी, मुंबई शहर राष्ट्रीय सेवा योजना  जिल्हा समन्वयक  क्रांती इंदूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने ही रॅली यशस्वीपणे पार पडली.

मतदार नोंदणी करुन सक्षम लोकशाही मध्ये सहभागी होण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूकीसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची संधी अजूनही आहे मतदारांनी मतदार यादीत आपले नाव तपासून घ्यावे, आणि आपले नाव नसेल तर मतदार नोंदणीसाठी voters.eci.gov.in / Voter Helpline Mobile App / मतदार मदत क्रमांक 1800221950 यावर संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.

लोकशाहीला अधिक समृद्ध करण्यात मतदानाचे महत्त्व आणि युवा वर्गाचा सहभाग महत्वाचा आहे. यासाठी 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची नोंदणी संख्या वाढविण्यासाठी जनजागृती उपक्रम, निवडणूक साक्षरता याबाबत मतदारांना ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने मतदान नोंदणी प्रक्रियेची व EVM/VVPAT मशीन व Mock Poll कशा पध्दतीने हाताळावे याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच नव मतदार नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा अधिक सहभाग असेल असे या रॅलीत सहभागी  तरुणांनी आश्वासन दिले.

000

शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या दुष्काळी उपाययोजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि. 24 (जिमाका) : जिल्ह्यात तसेच विभागातही दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिती पुढील कालावधीत अधिक तीव्र होत जाणार आहे. या कालावधीत शासनातर्फे उपाययोजना केल्या जाणार आहेत. याबाबतची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. या उपाययोजना राबविताना त्यात मदत पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक सेवाभावी संस्थांना सहभागी करुन घ्या, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळी उपाययोजनांबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी रमेश भिसे, एच.पी. देशमुख, धनाजी धोतरकर, पुष्कराज तायडे, रमेश कुटे, मारोती बनसोडे, ज्ञानेश्वर हनवते तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, शासनाच्या  ऑक्टोबर 2023 च्या निर्णयानुसार दुष्काळी उपाययोजना जसे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांकडून सक्तिची कर्ज वसुली थांबविणे, शेती कर्जाचे पुनर्गठन करणे, वीज देयकांची वसूली थांबविणे, टँकर तात्काळ सुरू करणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. शासन करत असलेल्या उपाय योजना बाबत जनतेपर्यंत माहिती पोहोचवावी. पुढील हंगामापर्यंत (जून पर्यंत) कर्ज वसूली थांबविण्याची प्रक्रिया सुरु करा, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे वाढवा. त्याच्या उपलब्धतेबाबतही लोकांना माहिती द्या.  रोजगार हमी योजनेच्या कामांवर येणे शक्य नसलेल्या एकल किंवा विधवा महिलांना मदत दिली जावी. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांची मुलं सांभाळण्यासाठी व्यवस्था व इतर उपाय योजना कराव्यात, असेही निर्देश उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

तत्पूर्वी  जिल्हाधिकारी स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुष्काळाबाबत सविस्तर माहिती डॉ गोऱ्हे यांना दिली. त्यामध्ये जिल्ह्यात दोन तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ सदृश्य परिस्थिती ६ तालुक्यात आहे.  अशा सर्व भागात दुष्काळी उपाययोजना सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात सध्या ९००५ रोजगार हमी ची कामे सुरू असून त्यावर ७० हजार मजूर काम करीत आहेत. प्रत्येक गावात किमान ५ कामे तरी शेल्फवर असावी,असेही नियोजन करत असल्याचे जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

000

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात कुसुमाग्रज साहित्य जागर…

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनी म्हणजे २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी “कुसुमाग्रज साहित्य जागर” मांडला जाईल.

कविश्रेष्‍ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे दिनांक २७ फेब्रुवारी, २०२४ रोजी दुपारी ४.०० ते ६.०० यावेळेत “कुसुमाग्रज साहित्य जागर” या कार्यक्रमाचे संयोजन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष श्री. नरहरी झिरवाळ यांच्या संकल्पनेनुसार करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन सत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने आणि मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विजय वडेट्टीवार विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आले आहे.

“कुसुमाग्रज साहित्य जागर” कार्यक्रमात दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य, विधानमंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकार हे कुसुमाग्रजांची एक आवडती कविता किंवा त्यांच्या साहित्यांतील लेखाचा सारांश, नाट्यसंवाद यापैकी एक आणि एक स्वरचित कविता सादर करणार आहेत. “कुसुमाग्रज साहित्य जागर” कार्यक्रमात उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे.

बांद्रा-कुर्ला संकुल येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी प्रयोगशाळेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार उद्घाटन

मुंबई दि. २४ : अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) व अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्यातील सामंजस्य कराराअंतर्गत बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवार,२५ फेब्रुवारी, २०२४ रोजी सायं. ४ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

दूरदृश्यप्रणालीद्वारे होणारा हा समारंभ अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार पूनम महाजन, आयुक्त (अन्न) अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगणेकर सभागृह, पहिला मजला, अन्न व औषध प्रशासन बांद्रा कुर्ला-संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई येथे होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाने कळविले आहे.

अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (FSSAI) यांच्यादेशातील अन्न चाचणी प्रणालीचे बळकटीकरण यासह मोबाईल फूड टेस्टिंग लॅब या योजनेअंतर्गत राज्यात Microbiology प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत. बांद्रा-कुर्ला कोम्प्लेक्स, मुंबई येथे Microbiology प्रयोगशाळा उभारणीसाठी एकूण ४५० लाख निधी केंद्र सरकारकडून देण्यात आलेला आहे. मुंबई येथे उभारण्यात आलेल्या अन्न चाचणी (Microbiology) प्रयोग शाळेत अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. प्रयोगशाळेत अन्न नमुन्यांचे microbial विश्लेषण करण्यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून इथे उच्च कुशल तांत्रिक कर्मचारी (high-skilled worker) नियुक्त केले जाणार आहेत.

प्रयोगशाळा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, पाणी, मसाले, फळे आणि भाजीपाला उत्पादने आणि मांस आणि मांस उत्पादने इ. अन्न पदार्थामधील सूक्ष्मजीव दूषित पदार्थचे विश्लेषण करण्यासाठी सुसज्ज करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत कमी कालावधीत जास्तीत जास्त नमुने विश्लेषण करणे शक्य होणार आहे.

प्रयोगशाळा उद्घाटन समारंभास मान्यवर पदाधिकारी, नागरिक आणि प्रसार माध्यमातील प्रतिनिधी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यु काळे यांनी केले.

००००

राज्यातील विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

        मुंबई, दि. २४: सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र व राज्य शासनातर्फे राज्यातील आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. या प्रकल्पांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी, दि. २५ फेब्रुवारी रोजी दुरदृष्य प्रणालीद्वारे विविध आरोग्य पायाभूत सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य व कुटुंब कल्याण आणि रसायने व खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी व्यवहार राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार,  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याणराज्यमंत्री प्रो. एस. पी. बघेल, आयुष आणि महिला व बाल विकास राज्यमंत्री मुंजपरा महेंद्रभाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव नवीन सोना, आयुक्त धीरज कुमार दुरदृष्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी https://pmindiawebcast.nic.in या लिंकला क्लिक करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणाऱ्या पीएम-अभिम अंतर्गत आरोग्य संस्थांचे भूमिपूजन आणि राष्ट्राला समर्पण

भूमिपूजन (PM-ABHIM) क्रिटिकल केअर हॉस्पिटल ब्लॉक

जिल्हा रुग्णालय, जि. पुणे – १०० खाटा, जिल्हा रुग्णालय, जि. अहमदनगर ५० खाटा,  जिल्हा रुग्णालय, जि. बुलढाणा – ५० खाटा,  जिल्हा रुग्णालय, जि. बीड – ५० खाटा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय, जि. नंदुरबार – ५० खाटा (एकूण खर्च – रु. १३५.०५ कोटी)

पीएम-अभिम अंतर्गत इंटिग्रेटेड पब्लिक हेल्थ लॅब

जिल्हा रुग्णालय, जि. अमरावती (एकूण खर्च – रु. १.२५ कोटी),

राष्ट्रीय आरोग्य अभियान

मुख्य इमारत आणि १४ स्टाफ क्वार्टर – प्रा. आ. केंद्र, करजगाव ता. चांदूरबाजार जि. अमरावती, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, जैताने ता. साक्री जि. धुळे,  मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा. आ. केंद्र, शिराळा ता. अमरावती जि. अमरावती, जिल्हा वेअरहाऊस, मिटींग, डीपीएमए ऑफिस, जि. चंद्रपूर, स्टाफ क्वार्टर – प्रा.आ.केंद्र, ताडली ता. चंद्रपूर जि. चंद्रपूर, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर प्रा.आ. केंद्र, गव्हाळी, ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, सावदा ता. रावेर जि. जळगाव, मुख्य इमारत आणि स्टाफ क्वार्टर ग्रामीण रुग्णालय, किनगाव ता. यावल जि. जळगाव(एकूण खर्च – रु. ७७.९४ कोटी)

राष्ट्रीय आयुष अभियान : नवीन आयुष रुग्णालय इमारत बांधकाम, पुणे(एकूण खर्च – रु. ८.९९ कोटी)

000

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...