शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 721

पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत मिळावी; केंद्रीय कृषिमंत्र्यांना देखील भेटणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ११ :- तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानमंत्रीपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत. राज्यातही शासन शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेत आहे, असे सांगून केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या माध्यमातून देखील पिकांना चांगली किमान आधारभूत किंमत (एमएसपी) मिळून त्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. आज केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या बैठकीस उपस्थित राहून एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे शेतकऱ्यांविषयीची वचनबद्धता प्रकट केल्याबद्दल या बैठकीस उपस्थित विविध राज्यांच्या प्रतिनिधींनी टाळ्या वाजवून प्रशंसाही केली. रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यासाठी पश्चिम भारतातील राज्यांच्या प्रतिनिधींची ही बैठक होती.

सह्याद्री अतिथीगृहात आज केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, दीव आणि दमण तसेच महाराष्ट्राच्या प्रतिनिधी व शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले व शेतमालाला चांगली किंमत व बाजारपेठ मिळावी यासाठी पंतप्रधानांसमोर आपलं म्हणणं नुकतचं मांडले असल्याचे ते म्हणाले.

लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार

मुख्यमंत्री म्हणाले की, सोयाबीन, कांदा, कापूस या शेतमालाला चांगली आधारभूत किंमत मिळावी, तसेच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नी देखील आपण लवकरच केंद्रीय कृषिमंत्र्यांना भेटणार आहोत. आज मिलेटचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळायचे असेल तर मायक्रो मिलेटस् ला देखील किमान आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. केंद्र आणि राज्याची विचारधारा एकच असून पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येत आहेत. गेल्या दहा वर्षात याची प्रचिती आली आहे. पंतप्रधानपदी शपथ घेतल्यावर नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. आज राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक निर्णय घेतले असून गेल्या वर्षभरात नुकसान भरपाईपोटी पंधरा हजार कोटी रुपये दिले आहेत.

पर्यावरणाला पूरक बांबूची लागवड

यावेळी मुख्यमंत्र्यांनी वाढत्या प्रदूषण आणि तापमानावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, मी स्वत:ही शेतकऱ्याचा मुलगा असून मी वारंवार संबधित तज्ज्ञ व्यक्तींशी यावर बोलत असतो. मी गावी गेलो की, आवर्जून झाडे लावतो. विविध प्रकारची पिके घेतो. गेल्या वर्षभरापासून पर्यावरणाला पूरक अशा बांबू लागवडीला आम्ही मिशन मोडवर सुरुवात केली आहे. आमचे राज्य यामध्ये देशात आघाडीवर असून बांबू लागवडीसाठी सात लाख रुपये हेक्टरी अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येते. यासाठी दहा लाख हेक्टरचे उद्द‍िष्टही ठरवण्यात आले आहे. बांबूच्या अनेक प्रजाती असून त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, त्यामुळे टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलत आहोत.

महाराष्ट्र हे देशाच्या पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेमध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान करण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये शेतीचा देखील मोठा सहभाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिनिधींकडून स्वागत

केंद्रीय कृषीमूल्य आयोगाच्या बैठकीसाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याची घटना देशात पहिल्यांदाच घडली असून यामुळे आता या आयोगाच्या ज्या राज्यांमध्ये बैठका होतील तिथे त्या- त्या मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहण्याचा पायंडा पडेल, असे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सांगताच उपस्थित शेतकरी व प्रतिनिधींनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. यावेळी बोलतांना पाशा पटेल यांनी मिलेट उत्पादनासाठी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कशा रितीने पुढाकार घेतला ते सांगितले. पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयावर मुख्यमंत्री स्वत: टास्क फोर्सचे अध्यक्ष झाले यावरुन राज्य सरकार या विषयी किती गंभीर याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी बोलताना कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, विविध राज्ये पिकांची किमान आधारभूत किंमत किती असावी, याच्या शिफारशी केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगाकडे करतात. मात्र त्यात तफावती आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे त्यात सुसूत्रता व एकवाक्यता आणणे गरजेचे आहे. यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेत असून, त्यादृष्टीने आज आयोजित करण्यात आलेली परिषद अत्यंत महत्त्वाची आहे.

सर्वांनी मिळून समन्वयातून विविध पिकांच्या आधारभूत किमतींच्या शिफारशी एकत्रित व समसमान तसेच शेतकऱ्यांचा लाभ विचारात घेऊन केल्याने सर्व संबंधित राज्यांना फायदा होईल, असेही ते म्हणाले.

ही परिषद ऐतिहासिक ठरणार असून, रब्बी ज्वारीसाठी किमान आधारभूत किंमत देखील या परिषदेतील चर्चेतून केली जावी व त्यासंबंधीची कार्यवाही व शिफारस देखील शासनाला करावी, अशी सूचनाही धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच ज्वारीच्या धर्तीवर वरई, नाचणी, राळा यांसारख्या आदिवासी क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या पौष्टिक तृण धान्यासाठी देखील किमान आधारभूत किंमत लागू करण्याबाबत विचार व्हावा, अशीही सूचना श्री. मुंडे यांनी केली आहे.

केंद्रीय कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पाल शर्मा म्हणाले, आयोग शेती व शेतकरी हितासाठीच काम करेल. शेतमालाला योग्य मोबदला मिळेल तसेच कृषी मालाची उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. कृषी विस्तार यंत्रणा मजबूत करणे, खतांचा वापर कमी करणे, कृषी यांत्रिकीकरणावर भर देणे, खरीपामधील पिकांना देखील एमएसपीचा फायदा मिळवून देणे, खाजगी क्षेत्राची भागिदारी व गुंतवणूक वाढविणे यादृष्टीने आयोग काम करत असल्याचे सांगितले.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, कृषी क्षेत्राला महत्त्व देणारे हे सरकार आहे. त्यामुळेच कृषी मूल्य आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की कृषी मूल्य आयोगाच्या किंमत विषयक धोरण ठरविण्याबाबतच्या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री उपस्थित राहिले आहेत. तृणधान्याचे महत्त्व लक्षात घेऊन २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षे म्हणून साजरे केले आहे. तसेच तापमान वाढ कमी करण्यासाठी राज्यात मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करण्यात येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्यासाठी कृषी मूल्य आयोगाची भूमिका सकारात्मक राहील, असेही श्री. पटेल यावेळी म्हणाले.

केंद्रीय कृषी मूल्य आयोग – रब्बी हंगाम २०२५-२६ केंद्रीय कृषी आयोगाची किंमत विषयक धोरण ठरविण्याबाबत बैठक सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित केली होती. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार भरत गोगावले, केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष विजय पॉल शर्मा, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) चे प्रकल्प संचालक परिमल सिंह तसेच केंद्र आणि राज्य कृषी  मुल्य आयोगाचे सदस्य आणि पश्चिम भारत समूहातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान,मध्य प्रदेश, गोवा व दमण राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

केंद्रीय कृषी  मूल्य आयोगाकडून विविध पिकांच्या किमान आधारभूत किमतींची शिफारस केंद्र शासनाला करण्यात येते आणि केंद्र शासन राष्ट्रीय स्तरावर आधारभूत किंमत योजनेत समाविष्ट शेतमालाच्या आधारभूत किंमती निश्चित करून जाहीर करते.  केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किंमती सर्व राज्यांना लागू होतात.

0000

मुलुंड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

मुंबई, दि. ११ : मुलुंड येथील मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत प्रवेशासाठी संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहप्रमुखांनी केले आहे.

प्रवेशित विद्यार्थिनींना वसतिगृहात राहण्याची व्यवस्था, भोजन, रुपये ९००-मासिक निर्वाह भत्ता, स्टेशनरी रक्कम, ग्रंथालय सुविधा, दैनंदिनी वर्तमानपत्र इत्यादी मोफत सोयी-सुविधा दिल्या जातात. या वसतिगृहात ११ वी व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल.

प्रवेशासाठी पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे. प्रवेशासाठी ५५% पेक्षा जास्त गुण असावेत. ती महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावी. या वसतिगृहाचा पत्ता : गृहपाल मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, डी-१० पार्श्वनाथ कॉ. हौसिंग सोसायटी, सर्वोदय नगर मुलुंड, मुंबई-४०००८० असा आहे.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राज्यातील पाणीटंचाईचा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून आढावा

मुंबई, दि. ११ : राज्यातील धरणे तसेच तलावात अत्यल्प जलसाठा आहे. त्याचबरोबर राज्यातील काही भागात आजपर्यंत पर्जन्यमान अपुरे झालेले आहे, याअनुषंगाने पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयात आढावा घेतला.

या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, जल जीवन मिशनचे अभियान संचालक आर. रवींद्र तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, पाणी टंचाईच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने जलदगतीने कार्यवाही करावी. याबाबतचे कोणतेही प्रस्ताव प्रलंबित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रीत करून स्थानिक परिस्थितीनुसार जिल्हाधिकारी यांनी टँकरबाबत निर्णय घ्यावे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत व जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणाऱ्या नळ पाणीपुरवठा योजनांचाही आढावा मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी घेतला. जल जीवन मिशनच्या विहिरी, बांधकामे यासारखी कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात यावी. ज्या गावातील योजनेचे किरकोळ काम शिल्लक आहे, अशी कामे तात्काळ पूर्ण करावीत. भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांनी मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात भूजलपातळी याबाबतचा  आराखडा तयार करावा. जलस्रोत बळकटीकरण, भूजल पुनर्भरण होणे आवश्यक आहे, असेही मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

****

शैलजा पाटील/विसंअ/

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापनेच्या कामाला गती – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 11 : पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात वारंवार उद्भवत असलेली पूर परिस्थिती, भूकंप प्रवण क्षेत्रात येत असलेला पाटण तालुका व रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसत असलेला चक्रीवादळाचा फटका या आपत्तीजनक परिस्थितीमुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण केंद्र व मुख्यालय कोयनानगर येथे करण्यात येत आहे. कामाची निकड लक्षात घेता या कामाला यंत्रणांनी प्राधान्य देऊन गती द्यावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

मंत्रालयात कोयनानगर, ता. पाटण, जि. सातारा येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दलाचे मुख्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणेबाबत आयोजित आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस अति. पोलीस महासंचालक अर्चना त्यागी, अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंखे, अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण) राजकुमार व्हटकर, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे, गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट, अवर सचिव नारायण माने, तर  दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे साताऱ्याचे अप्पर जिल्हाधिकारी श्री. गलांडे, जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी चर्चेत सहभाग घेतला.

केंद्रासाठी जमीन मिळून बराच कालावधी झाला असल्याचे सांगत मंत्री श्री. देसाई म्हणाले, या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करावे. पर्यावरणीय परवानग्यांचा प्रस्तावाचा संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. या कामासाठी जिल्हास्तरावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. हे प्रशिक्षण केंद्र जागतिक दर्जाचे झाले पाहिजे. प्रशिक्षण केंद्राची निवडलेली जागा मौजे गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) ही निसर्गरम्य व पर्यटनीय ठिकाण आहे. त्यामुळे प्रशिक्षण केंद्र पर्वतीय स्टेशनमधील इमारतीप्रमाणे करण्यात यावे. प्रशिक्षण केंद्राला पर्यटकांनीही भेटी दिल्या पाहिजे, अशा दर्जाचे बनविण्यात यावे,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, या केंद्रासाठी अंदाजपत्रक तयार करून निधी मागणी प्रस्ताव सादर करावा. पुढील दोन महिन्यात काम निविदा प्रक्रियेवर आणण्याची दक्षता घ्यावी. पोलीस गृहनिर्माण महामंडळाने आपल्या प्राधान्य क्रमाच्या यादीत या प्रकल्पाचा समावेश करावा. या प्रकल्पासाठी वास्तू विशारद नियुक्त करून विस्तृत प्रकल्प तयार अहवाल तयार करावा. स्थानिक प्रशासनाने राज्यस्तरावरील संबंधित विभाग, राज्य राखीव पोलीस दल यांच्याशी संमन्वय ठेवून काम गतीने पुढे न्यावे, अशाही सूचना केल्या.

००००

निलेश तायडे/विसंअ/

विधान परिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेत वाढ

मुंबई, दि. ११ : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दिनांक २६ जून २०२४ रोजी मतदान होत आहे. काही संघटनांनी या मतदानाची वेळ वाढविण्यासाठी केलेली मागणी भारत निवडणूक आयोगाने  मान्य केली असून; आता मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजेपासून सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत अशी असेल.

या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३१ मे २०२४ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता बुधवार, दि.२६ जून रोजी मतदान तर सोमवार, दि.१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.

000

संजय ओरके/विसंअ/

कृषी विभागाच्या कल्याणकारी योजना…                               

विविध पिकांच्या संकरीत वाण निर्मितीमुळे देशांत हरितक्रांतीचा पाया घातला गेला. यानंतरच्या काळातील पंचवार्षिक योजनांद्वारे शेती विकासावर विशेष भर देण्यात आला. कृषी विद्यापीठातील सुधारीत तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यत पोचवण्यासाठी आखलेल्या पीक प्रात्यक्षीके, प्रक्षेत्र भेटी, कृषी तंत्रज्ञान प्रचारसभा, चर्चासत्रे, मेळावे, प्रदर्शने इत्यादी कार्यक्रमांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे कृषी उत्पादनवाढीमध्यें मोलाची भर पडली. या मुळे आपण अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झालो असलो तरी अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता हे कृषी विभागाचे एकमेव उद्दीष्ट नसून शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनांचा परिपूर्ण वापर करुन अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देणे हे सुद्धा नितांत गरजेचे आहे. यासाठी व्यापारक्षम शेतीची कास धरावी लागेल. मुक्त आर्थिक व्यवस्था व जागतीक व्यापार व्यवस्थेचा फायदा करुन घेण्याच्या दृष्टिने कृषी, फलोत्पादन व जलसंधारण क्षेत्रात कृषी उत्पादन वाढ, निर्यातवृध्दी व कृषि प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या अनेकविध योजना कृषी विभागामार्फत राबविण्यांत येत आहेत.

शेतीव्यवसायातून स्वयंपूर्णतेबरोबरच आर्थिक उन्नती साधणे व जागतीक शेतमालाच्या बाजारपेठेत महत्वाचे स्थान मिळविणे या निर्धाराने कृषी विभागाची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्र शासन राबवत असलेल्या महत्वाकांक्षी योजना हा या धोरणाचाच भाग आहेत. आधुनिक कृषीतंत्राच्या वापरासाठी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आवश्यक त्या सर्व संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टिने मार्गदर्शन करणारी एकच यंत्रणा असावी यादृष्टिने कृषि विभागाची रचना करण्यांत आलेली आहे. त्या द्वारे कृषी तंत्रज्ञान थेट शेतक-यांपर्यत पोहोचविणे सुलभ झाले आहे.

केंद्र व राज्य शासन कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना राबावत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेती उत्पादन वाढण्यासाठी,पिकांचे संरक्षण आणि त्यांची जोपासना करण्यासाठी, पिकांवरील आलेली कीड नियंत्रण करण्यासाठीचे कार्यक्रम आणि,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत व्यापारी पिकांसाठी असलेल्या योजना यांचा यामध्ये समावेश आहे. सिंचनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे शेती आणखी फायद्यात आणणे ही येणाऱ्या काळासाठी तितकेच गरजेचे आहे. हा संपूर्ण विचार करता त्यासाठी जिल्ह्यातील कृषी विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहे.

पंतप्रधान पीक विमा योजना

केंद्र शासनाने सुरु केलेली पंतप्रधान पीक विमा योजना शेतक-यासाठी अत्यंत उपयुक्त आणि फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने फक्त १ रुपया भरुन आपले नाव नोंद करायचे आहे. विमा हप्त्याची रक्कम ही केंद्र शासन भरणार आहे. शेतकऱ्याने आपल्या आधार कार्डची प्रत, ७/१२ उतारा, बैंक पासबूक झेरॉक्स, पीक पेरणी स्वयंघोषणा पत्र घेऊन आपल्या जिल्ह्य़ातील किंवा आपल्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन   नाव नोंदणी करावी हे सर्व केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.अवकाळी झालेली अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक  आपत्तीमुळे जमीन नापेर राहिल्यास त्या क्षेत्रालाही विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

अन्न आणि पोषण सुरक्षा : अन्नधान्य पिके  (पूर्वीचे NFSM) ( भात,  कडधान्य, भरडधान्य (मका), पौष्टिक तृणधान्य व TRFA कडधान्य ) या योजनेंतर्गत   भात,   कडधान्य, भरडधान्य ( मका ) व पौष्टिक तृणधान्य (ज्वारी, बाजरी,  नागली, इ. पिकांची पीक प्रात्याक्षिके राबविली जातात अन्नधान्य पीक  क्षेत्र विस्तार  व  उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या  उत्पादनात  शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे.,शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे. हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

कृषी यांत्रिकीकरण –  शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे.,पीक रचने नुसार गरजेनुरुप व मागणी प्रमाणे पूर्वतपासणी केलेली दर्जेदार कृषीऔजारे शेतक-यांना अनुदानावर उपलब्ध करुन देणे.व  कृषी उत्पादन प्रक्रियेत अद्ययावत यंत्रसामुग्रीच्या वापरासाठी प्रोत्साहीत करणे. हे प्रमुख उद्देश साध्य करण्यासाठी जिल्ह्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येत आहे ट्रॅक्टर, पॉवर टिलर आणि ट्रॅक्टर सोबत चालणारी औजारे, ठिबक आणि तुषार सिंचन सेट, शेडनेट, पॉली हाऊस, कांदाचाळ,प्लास्टिक मल्चिंग इत्यादी गोष्टींसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज केल्यास त्यांना या योजनेचा   लाभ घेता येईल. महाडीबीटी पोर्टल- https://mahadbt.maharashtra.gov.in

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी या योजनेंतर्गत , गांडूळ खत युनिट, बांबू लागवड,फळबाग लागवड,नाडेप कंपोस्ट युनिट बनवणे, इतर लाभ दिले जातात.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रम योजनेतंर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक शेतजमीनीवर फळबाग लागवड करता येते.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना –  शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे., पीक रचनेत बदल घडवून आणणे. व  प्रक्रीया उद्योगांसाठी आवश्यक कच्च्या मालाच्या उत्पादनात वाढ करणे. हे प्रमुख उद्देश साध्य करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे. जे शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड कार्यक्रमाचा  लाभ घेऊ शकत नाहीत असे शेतकरी जास्तीत जास्त ६ हेक्टर क्षेत्र मर्यादेत या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप)

सोयाबीन, कापूस, ,हरभरा, भात,मका, ज्वारी व ऊस  या महत्वांच्या प्रमुख पिकांवर वारंवार तसेच आकस्मिकरीत्या उद्भवणाऱ्या कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे होणारे शेतकऱ्यांचे  नुकसान व त्यामुळे उत्पादनात होणारी घट लक्षात घेता यासाठी कीड व रोग सर्वेक्षण , सल्ला, जन जागृती व व्यवस्थापन याबाबतची शाश्वत यंत्रणा तयार करण्याच्या दृष्टीने “पिकांवरील कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (CROPSAP)” राबविण्यात येत आहे. . शेतकऱ्यांमध्ये कीड व रोगांची ओळख निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षित करुन कीड रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे., कीड रोगांच्या प्रादूर्भावाबाबत जागरूकता निर्माण करणे  व पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे. पिकांचे सर्वेक्षण करून हंगाम निहाय प्रमुख कीड रोगांच्या प्रादूर्भावाबाबत शेतकरी यांचेमध्ये जाणीव निर्माण करणे व त्यांना  वेळीच उपाययोजना सुचविणेसाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शेतक-यांसाठी कृषी विभागामार्फत ऊस सुपर केन नर्सरी प्रात्याक्षिके , हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळे उभारणी, बीज प्रक्रिया प्रात्याक्षिके,  फलोत्पादन यांत्रिकीकरण , प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – प्रती थेंब अधिक पीकएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, काढणीपश्चात व्यवस्थापन अंतर्गत प्रकल्प उभारणी ,केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकी करण उप अभियान, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके ,एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान क्षेत्र विस्तार सामूहिक शेततळे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अंतर्गत),कांदाचाळ उभारणीआत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME)कृषि पायाभूत सुविधा योजनाशेतकरी मासिकमहा-डीबीटीराष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत- मृद आरोग्य पत्रिका योजना प्रशिक्षणासह प्रात्यक्षिक कार्यक्रम ,परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती)डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन , राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान (NMSA) अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती) ,जमीन आरोग्य पत्रिका कार्यक्रम, कृषी विभागामार्फत दिले जाणारे विविध कृषी पुरस्कार (राज्य पुरस्कृत योजना) अशा विविध योजना व उपक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहेत. कृषी विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, योजनांबाबत अधिक माहितीसाठी स्थानिक पातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा.

000000

जिल्हा माहिती कार्यालय,

सातारा

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर

नवी दिल्ली, 10 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या कार्यकाळासाठीच्या मंत्रिमंडळाची खाते वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, पाच राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 20 राज्यमंत्री यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये दोन केंद्रीय मंत्री, एक राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) व तीन राज्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले असून यामुळे राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्रातील नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री पदाचा, पियुष गोयल यांच्याकडे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पदाचा, प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातील राज्यमंत्री, रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री पदाचा कार्यभार , रक्षा खडसे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदाचा कार्यभार तर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

संपूर्ण मंत्रिमंडळाची यादी

केंद्रीय कॅबिनेट मंत्री :
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
अमित शाह – गृह मंत्रालय
अश्विनी वैष्णव – रेल्वे, माहिती आणि प्रसारण मंत्रालय
एस. जयशंकर – परराष्ट्र मंत्रालय
नितीन गडकरी – परिवहन आणि रस्ते विकास मंत्रालय
शिवराज सिंह चौहान – कृषी, पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्रालय
मनोहर लाल खट्टर – ऊर्जा, शहरी विकास मंत्रालय
सीआर पाटील – जलशक्ती मंत्रालय
मनसुख मांडविया – कामगार मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य, रसायन आणि खते मंत्रालय
ललन सिंह – पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्रालय
डॉ. विरेंद्र कुमार – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
चिराग पासवान – क्रीडा मंत्रालय
किरेन रिजिजू – संसदीय कार्य मंत्रालय
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – जहाज बांधणी मंत्रालय
ज्युवेअल राम – आदिवासी कार्य मंत्रालय
किशन रेड्डी – कोळसा आणि खणन मंत्रालय
निर्मला सीतारामण – अर्थ मंत्रालय
जीतन राम मांझी – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्रालय
एचडी कुमार स्वामी – अवजड उद्योग मंत्रालय
ज्योतिरादित्य सिंधिया – टेलिकॉम मंत्रालय
भूपेंद्र यादव – पर्यावरण मंत्रालय
प्रल्हाद जोशी – ग्राहक संरक्षण मंत्रालय
गजेंद्र शेखावत – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
पीयूष गोयल – वाणिज्य मंत्रालय
हरदीप सिंह पुरी – पेट्रोलियम मंत्रालय
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्रालय

स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री :
इंदरजित सिंग राव – सांख्यिकी आणि कार्यक्रम कार्यान्वयन, नियोजन मंत्रालय
जितेंद्र सिंह – विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पीएमओ कार्यालय, अॅटोमिक एनर्जी आणि अंतराळ विभाग
अर्जुन मेघवाल – विधी आणि न्याय, संसदीय कार्य मंत्रालय
प्रतापराव जाधव – आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
जयंत चौधरी – कौशल्य, शिक्षण मंत्रालय

राज्यमंत्री :
जतीन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
श्रीपाद नाईक – ऊर्जा मंत्रालय
पंकज चौधरी – अर्थ मंत्रालय
कृष्णा पाल – सहकार मंत्रालय
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय
रामनाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी विकास मंत्रालय
नित्यानंद राय – गृह मंत्रालय
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब विकास, रसायन आणि खते मंत्रालय
व्ही. सोमण्णा – जलशक्ती आणि रेल्वे मंत्रालय
डॉ. चंद्रशेखर पेमासानी – ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालय
एसपी बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय तसेच पंचायत राज मंत्रालय
शोभा करंदलाजे – सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, कामगार आणि रोजगार मंत्रालय
बीएल वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय
अजय टमटा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
हर्ष मल्होत्रा – परिवहन आणि रस्ते मंत्रालय
शांतनू ठाकूर – जहाज बांधणी मंत्रालय
रवनीत बिट्टू – अल्पसंख्याक मंत्रालय
सुरेश गोपी – कला, पर्यटन, सांस्कृतिक मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय

०००००

छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध

मुंबई, दि.१० : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा ४ जागांकरिता निवडणूक होत असून बुधवार, २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत  छाननी नंतर एकूण ८८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

या निवडणुकीकरिता  उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी आज सोमवार, १० जून २०२४ रोजी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई पदवीधर मतदारसंघात १०, कोकण विभाग पदवीधर २५, नाशिक विभाग शिक्षक ३६ तर मुंबई शिक्षक मतदारसंघात १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत बुधवार, १२ जून २०२४ अशी आहे. बुधवार २६ जून २०२४ रोजी चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. सोमवार १ जुलै २०२४ रोजी मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक ५ जूलै २०२४ रोजी पूर्ण होणार आहे.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष कार्यान्वित

मुंबई, दि. १० :  राज्यातील शेतकरी, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या सुचनेनुसार आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक (केवळ संदेश पाठविण्याकरिता) ९८२२४४६६५५  उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके या निविष्ठांचा पुरवठा वेळेत तसेच गुणवत्तापूर्ण व मुबलक प्रमाणात होणे अत्यावश्यक आहे. यासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री  (तोंडी तक्रार नोंदविण्याकरिता) १८००२३३४०००  क्रमांकावरही संपर्क करता येईल. तसेच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ई-मेलवरही नोंदवता येईल.

संबंधितांनी व्हॉट्सॲप, टोल फ्री भ्रमणध्वनी क्रमांक तसेच ई-मेलवर अडचणी, निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना, नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व अडचणी किंवा तक्रारीचा संक्षिप्त तपशिल द्यावा. अडचणीबाबत माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा फोटो व्हॉट्सॲप किंवा ई-मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल.

ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपचा वापर करणे शक्य नसेल त्यांनी वरील टोल फ्री क्रमांकावर संपर्क क्रमांकासह तोंडी तक्रारी नोंदवाव्यात.   शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत नोंदवता येतील, असे कृषी संचालक विकास पाटील यांनी कळविले आहे.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपाची व्यवस्था करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 10 : हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी साचणे, पुराचे पाणी, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात. तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.

मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी ठाणे जिल्हा मान्सुनपूर्व आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माहिती दिली. तसेच अन्य प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

नाल्यांची साफ-सफाई करण्यात आली आहे. मात्र मोठा पाऊस झाल्यास नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होवू शकते. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे. धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची आवश्यकता भासल्यास तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, नागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी. गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘इमरजन्सी हेल्पलाईन क्रमांक’ची सुविधा सुरू करावी. पूर किंवा पावसाशी निगडीत घटनेशी संबंधित दूरध्वनी किंवा सूचना आल्यास, तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देवून गरजू नागरिकांना मदत द्यावी. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

निलेश तायडे/विसंअ/

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...

जीएसटी उत्पन्न विश्लेषणासाठी मंत्रिगटाची पहिली बैठक

0
नवी दिल्ली, दि. 4 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाची (GoM) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) उत्पन्नाच्या विश्लेषणासाठी पहिली बैठक महाराष्ट्र सदन,...