शनिवार, मे 10, 2025
Home Blog Page 720

सर्व घटकांना न्याय देऊन गरीबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प –  वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७ : महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला, अशी प्रतिक्रिया वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताची संकल्पना साकार करण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री श्री. पवार यांनी सर्वांना समान न्याय देणारा अर्थसंकल्प सादर केला. समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास या अर्थसंकल्पातून साध्य होणार आहे. शिक्षण, रोजगार, शेती, उद्योग, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वच घटकांना सामावून घेणारा, न्याय देणारा असा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

०००

दीपक चव्हाण/विसंअ/

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. २७ : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. याविषयी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कृषी विभागाला 3650 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आलेला आहे. वातावरणीय बदलाला सामोरे जाताना पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांबू लागवडीचा पर्याय जागतिक दर्जाच्या संशोधनातून पुढे आला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्या अंतर्गत 10 हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड करण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत 7 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी 8 लाख 50 हजार कृषी पंपांची तरतूद करण्यात आली आहे. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेअंतर्गत एक लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवरील कुंपणासाठी अनुदान देण्यात येणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या अन्य योजनांनाही बळकटी देण्यासाठीचे नियोजन व सारासार विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर – बीड – परळी या रेल्वे मार्गाच्या कामास गती देण्यासाठी आवश्यक तरतूद देखील करण्यात आली आहे. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी अपघात विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध समाजघटकांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या आर्थिक विकास महामंडळ व शासकीय संस्थांना भरीव निधीची तरतूद करून खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साधण्याचे काम अर्थसंकल्पात केले असल्याचेही मंत्री श्री. मुंडे यांनी म्हटले आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. २७ : शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासनाने कला शिक्षणाची सोय करावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. जहांगीर आर्ट गॅलरी येथे बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे आयोजित 132 व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कलाकार पद्मश्री मनोज जोशी, बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह सोसायटीचे सदस्य, कलाकार उपस्थित होते.

मोबाईलच्या अतीवापरामुळे आज विद्यार्थी, शिक्षक, पालक तणावामध्ये असल्याचे सांगून राज्यपाल श्री. बैस म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये हिंसा पहायला मिळत आहे. या सर्वांवर उपाय म्हणजे कला शिक्षण आहे. कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता जागी होते. विद्यार्थ्यांमध्ये वेगळा विचार करण्याची, प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवण्याची, नवीन विषय शिकण्याची क्षमता जागृत होते. कलेमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक विकासात सकारात्मक प्रभाव पडतो. व्यक्तीला तणावमुक्त होण्यासाठी कला मदत करते. कला शिक्षण हा शालेय शिक्षणातील महत्वाचा घटक आहे. कला म्हणजे चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य आणि रंगभूमी या सर्वांचा त्यात समावेश होतो. आजच्या काळात कला शिक्षणाला कमी महत्व दिले जात आहे.

राज्यपाल श्री. बैस म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगळी कला आहे. त्याची जोपासना करण्यात यावी. प्रत्येकाच्या घरात किमान एक कलाकृती असावी यासाठी बॉम्बे आर्ट सोसायटी सारख्या संस्थांनीही प्रयत्न करावेत. सर्वसामान्य लोकांमध्ये कलाकृतींचे महत्व सांगणे ही आजची गरज आहे. तसेच बॉम्बे आर्ट सोसायटीने आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांचेही आयोजन करावे. आज डॉ. उत्तम पाचारणे यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. याचा मला आनंद आहे. यासह अनेक कलाकारांचाही आज सन्मान केला जात आहे. पुरस्कार प्राप्त कलाकारांचे मी अभिनंदन करतो.

संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी प्रस्तावनेमध्ये संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तर पद्मश्री मनोज जोशी कलेचे महत्व सांगताना म्हणाले, कितीही कृत्रीम बुद्धीमता आली तरीही व्यक्तीमधील स्पंदन आणि कल्पनाशक्ती यावर ती मात करू शकत नाही.

यावेळी डॉ. उत्तम पाचारणे यांना जाहीर करण्यात आलेला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या पत्नीने स्वीकारला. उत्कृष्ट चित्रकार, शिल्पकार यांनाही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

मुंबई: दि, २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे.

मराठी भाषेतील विज्ञानाची व्याप्ती, संकल्पना आणि विविध तंत्रज्ञानाचे योगदान तसेच विज्ञानाचा प्रसार मराठी भाषेतून करण्यासाठी मराठी विज्ञान परिषद विविध उपक्रम राबविते. मराठीतून वैज्ञानिक संशोधन आणि विज्ञानातील प्रगतीचा प्रसार करणे ही या परिषदेची मुख्य उद्दिष्टे आहेत. विज्ञानाचा प्रसार प्रामुख्याने मराठी भाषेतून करणे, विज्ञान व्यक्त करण्यासाठी मराठी भाषा समृद्ध करणे, जीवनात विज्ञानाचे महत्त्व वाढवणे, वैज्ञानिक संशोधन यासाठी मराठी विज्ञान परिषद राबवित असलेले उपक्रम तसेच महाराष्ट्रातील वैज्ञानिकांचे त्यांच्या संबंधित क्षेत्रातील योगदान याविषयी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात श्री. देशपांडे यांनी माहिती दिली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात श्री. देशपांडे यांची मुलाखत बुधवार दि. 28, गुरूवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी तसेच शुक्रवार दि. 1 आणि शनिवार दि. 2 मार्च 2024 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार दि. 29 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ऐकता येणार आहे. निवेदक अभिजित मुळ्ये यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या लिंक

एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

0000

मोदी आवास घरकुल योजनेचा प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या आरंभ

मुंबई, ‍‍दि. २७ : मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या तीन वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा आरंभ प्रधानमं‌त्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 ते  2025-26 दरम्यान एकूण 10 लाख घरे बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सन 2023-24 मध्ये मंजूर 3 लाख घरकुल लाभार्थ्यांपैकी 2 लाख 50 हजार लाभार्थ्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याच्या 375 कोटी रुपये निधीचे वितरण होणार आहे. राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून 17,00,728 घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून 7,03,497 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या ध्येयपूर्तीसाठी राज्यात सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांच्या कामात गतीमानता व गुणवत्ता आणण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “महा आवास अभियान 2023-24” अंतर्गत 7 लाख घरकुले पूर्ण करण्यात येणार आहेत.

०००

शैलजा पाटील/स.सं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

मुंबई, दि. २७ : राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि. यवतमाळ) या 39 कि.मी लांबीचा रेल्वे मार्ग  व अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गावरील 645 कोटी रूपये खर्च आलेल्या न्यु आष्टी ते अंमळनेर (जि. बीड) या 32.84 कि.मी लांब रेल्वे मार्गाचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी रोजी  यवतमाळ येथे करण्यात येणार आहे. तसेच वर्धा- कळंब स्टेशनपर्यंत नवीन रेल्वेला व अंमळनेर ते न्यू आष्टी रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारीत डेमू रेल्वे सेवेचा आरंभ प्रधानमंत्री यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

रस्ते प्रकल्पांमध्ये 291 कोटी खर्चाच्या साकोली – भंडारा जिल्हा सीमेपर्यंत 55.80 कि.मी दुपदरी रस्ता काम, 378 कोटी रूपये खर्च असलेल्या सलाई खुर्द – तिरोडा (जि. गोंदीया) महामार्गावरील 42 कि.मी लांबीच्या क्राँक्रीटीकरण रस्ता काम, तसेच 483 कोटी रूपये खर्च आलेल्या वरोरा – वणी (जि. यवतमाळ) महामार्गावरील 18 कि.मी लांबीच्या चौपदरीकरण कामाचे लोकार्पणही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  आयुष्मान भारत – जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील एक कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात तीन लाभार्थ्यांना कार्डही प्रधानमंत्री यांच्या हस्ते वितरीत करण्यात येणार आहे.

०००

निलेश तायडे/विसंअ/

ठाणे येथे ६ व ७ मार्च रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल

मुंबई, दि. २७ : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय  कोकण  नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी दि. 24 आणि 25 फेब्रुवारी 2024 रोजी होणार होता. त्यानंतर ठाणे येथे होणारा मेळावा 29 फेब्रुवारी ते 1 मार्च रोजी होईल असे जाहीर केले होते. मात्र काही अपरिहार्य कारणास्तव या होणाऱ्या मेळाव्याच्या तारखांमध्ये बदल झाला आहे. हा मेळावा दि. 6 व 7 मार्च रोजी मॉडेला मिल कपाऊंड, वागळे इस्टेट ,चेक नाका ,ठाणे – ४००६०४ येथे होणार आहे, अशी माहिती कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनातून कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक-युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी  कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून ६ व ७ मार्च रोजी हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स,इनवेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन, कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत करण्यात आले आहे.

या मेळाव्यात दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेवून  रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd   किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in  या लिंक वर उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एकापेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करता येवून मुलाखती देत येतील.रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर,रत्नागिरी,रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 -120 -8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

दैनंदिन जीवनातील अधिकाधिक वापर मराठी भाषेला समृद्ध करेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरण

मुंबई, दि. २७: तंत्रज्ञान युगात मराठीचाही मोठा पगडा आहे. जेवढी जास्त आपण दैनंदिन जीवनात ही भाषा वापरू तेवढी ती समृध्द होईल. दोन हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा कधीही संपणार नाही. भाषा ही प्रवाही हवी. त्यात शब्दांची देवाणघेवाण झाली पाहिजे.  त्यामुळे आग्रहाने मराठी वाचन, लेखन करावे लागेल. मराठी ही अभिजात होती, आहे आणि राहील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठी भाषा विभागाच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अपर मुख्य सचिव  मनीषा म्हैसकर, मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने मराठी भाषा संवर्धनासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तीस आणि संस्थेस भाषा संवर्धन पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2023 या वर्षासाठी डॉ.रवींद्र शोभणे यांना विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तर मनोविकास प्रकाशन, पुणे या संस्थेस श्री.पु.भागवत पुरस्कार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप पाच लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे असून श्री.पु.भागवत पुरस्काराचे स्वरूप तीन लक्ष रुपये, मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. त्याचबरोबर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 (व्यक्ती) डॉ.प्रकाश परब यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार वाङ्मय चर्चा मंडळ, बेळगाव या संस्थेस प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार २०२३ (व्यक्ती) डॉ.कौतिकराव ठाले पाटील यांना तर संस्थेसाठी देण्यात येणारा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक या संस्थेस प्रदान करण्यात आला. प्रत्येकी दोन लाख रूपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, मराठी दिन राज्यात सगळीकडे उत्साहात साजरा होत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा जागर होत आहे. ‘बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके’ अशी ही आपली मराठी भाषा आहे.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी अजरामर साहित्यकृती तयार केल्या. मराठी समाज, भाषा विज्ञान वर डॉ. परब यांचे प्रभुत्व आहे. साहित्य क्षेत्रात कौतिकराव ठाले पाटील यांचे योगदान मोठे आहे. या आणि अशा अनेक भाषा प्रेमी साहित्यिक, लेखक यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसाठी राज्य शासनाने भरीव मदत केली. विश्व मराठी संमेलनाला पाठबळ दिले. जगभरातील मराठी बांधव त्यासाठी आले.

खऱ्या अर्थाने मराठी विश्वात्मक झाली असल्याची भावना  त्यांनी यावेळी व्यक्त केली.

परदेशातही मराठी मंडळी आपली भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेथील मराठी मंडळांच्या माध्यमातून हे काम होत आहे.

दावोस येथे गेलो असताना प्रचंड थंडीत स्वागतासाठी मराठी मंडळी आली होती. रशियात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली, अशी आठवण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितली.  मराठी बद्दल आपुलकी वाढवायची आहे. त्यासाठी नवलेखकांना आपण प्रोत्साहन देत आहोत.  तांत्रिक व्यावसायिक शिक्षण मराठीत देण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी नमूद केले.

मुंबईतील इतर भाषांतील शाळेत मराठी शिकवणे सक्तीचे: मंत्री दीपक केसरकर

मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, साहित्यिकांचे वैचारिक स्वातंत्र्य आहे. त्यांच्या भूमिकेला पाठबळ देण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. साहित्य संमेलनासाठी पन्नास लाख वरून दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. परदेशात आणि बृहन्महाराष्ट्र मराठी  भाषेचा जागर होत आहे. परदेशातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या अभ्यासक्रमासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जवळपास ७२ देशात मराठी बोलणारी मंडळी राहतात. बृहन्महाराष्ट्र भागात तेथील लोकांना संमेलनासाठी आपण मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या या क्षेत्रातील खाणाखुणा जपण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने घेतला आहे. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे मातृभाषेतून देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. त्याची सर्वप्रथम अंमलबजावणी राज्य शासनाने सर्वप्रथम केली. मुंबईत मराठी भाषा भवनाची उभारणी होत आहे.  मराठी भाषा बृहन्महाराष्ट्र क्षेत्रात टिकावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. नवी मुंबईला साहित्यिक भवनाची उभारणी केली आहे.  मराठी विश्वकोश कार्यालयासाठी वाई येथे नवीन जागा खरेदी करून त्यात स्थलांतर करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.  सध्या राज्यातील सहा शहरात आपण पुस्तकांचे गाव ही संकल्पना राबवित आहोत.

मराठी भाषा शिकविण्यास टाळाटाळ करणाऱ्या शाळांवर मराठी शिकवणे सक्तीचे करण्यात. आले आहे.  तरीही  या शाळांनी त्याची अंमलबजावणी केली नाही तर त्या बंद करण्याचे पाऊलही उचलले जाईल, असे त्यांनी नमूद केले. याशिवाय मंत्रालय आणि बृहन्मुंबई महानगरपालिके मध्ये प्रत्येकाने आवर्जून मराठी बोलावे यासंदर्भात परिपत्रक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त विशाखा विश्वनाथ आणि एकनाथ आव्हाड यांचाही सत्कार करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात येणाऱ्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मंत्री श्री. केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. नवलेखक अनुदान योजनेत पुरस्कार प्राप्त सुधीर शास्त्री यांच्या माणूस या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर आणि कुणाल रेगे यांनी केले तर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सुत्रसंचलन अभिनेता तुषार दळवी आणि अभिनेत्री मधुरा वेलणकर यांनी केले. यावेळी जीवनगाणी प्रस्तुत मान मराठीचा सन्मान महाराष्ट्राचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

०००

दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू

मुंबई, दि. २७ :  अपंग समावेशित शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्याबाबतचा शासन निर्णयही निर्गमित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून शिक्षकांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी घेण्यात आली.

दिव्यांग शिक्षकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वाहतूक भत्ता वाढविण्याचा आणि २० फेब्रुवारी २०२२ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर राज्यातील ६ जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ/ समावेशित शिक्षक व १५८ विशेष शिक्षक अशा २१६ कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करून २०१८-१९ पासून केंद्रीय समग्र शिक्षा योजना अंमलात आली आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या योजनेची पुनर्रचना २०२० मध्ये करण्यात आली असून या योजनेत केंद्राच्या ६० टक्के हिस्स्यासोबत राज्य आपला ४० टक्के हिस्सा देत आहे. या योजनेत कार्यरत कर्मचाऱ्यांची भरती करार पद्धतीने करण्यात आली असून केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एकक दराने मानधन देण्यात येत आहे,  या पदांना वाहतूक भत्ता देताना राज्य हिस्सा प्रमाणाबाहेर जात असतानाही दिव्यांग शिक्षकांच्या पाठिशी ठाम राहत वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापोटी मासिक सहा लाख २९ हजार १०० तर वार्षिक ७५ लाख ४९ हजार २०० इतका अतिरिक्त खर्च राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहे.

०००

विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेला अनुसरून विकसित महाराष्ट्राला चालना देणारा अर्थसंकल्प आज शासनाने सादर केला, असे सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे अभिनंदन केले आहे.

हा अंतरिम अर्थसंकल्प सर्वच घटकांचा विचार करणारा तसेच राज्याच्या समतोल विकासाचा आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित या अर्थसंकल्पाने शेतकरी, महिला, युवा, विविध समाज घटकांना मोठा दिलासा देणारा आहे. विदर्भातील सिंचन सुविधांसाठी 2000 कोटींची तरतूद त्यात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषिपंप योजना जाहीर करण्यात आली असून 8.50 लाख कृषिपंप पहिल्या टप्प्यात देण्यात येणार आहेत. 37,000 अंगणवाड्यांना सुद्धा सौर ऊर्जेवर आणण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी 34,400 घरकुले बांधण्यात येणार आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलाला राज्य क्रीडा संकुलाचा दर्जा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी 578 कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. सर्वच पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी मोठी आर्थिक तरतूद यात करण्यात आली आहे. राज्यात 2000 नवीन प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. आज मराठी भाषा गौरव दिवस असून कवितेचे गाव म्हणून वेंगुर्ला गावाचा विकास करण्याची सुद्धा तरतूद यात आहे. एकूणच आपल्या संस्कृतीचा गौरव सुद्धा यात आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.

**

दीपक चव्हाण/विसंअ/

ताज्या बातम्या

दिशाभूल करणाऱ्या संदेशांपासून सावध राहण्याचे निवृत्तीवेतनधारकांना आवाहन

0
मुंबई, दि. 9 : संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई व सर्व कोषागार कार्यालये यांच्यामार्फत सर्व निवृत्तीवेतनधारकांना सूचित करण्यात येते...

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन निर्णय जारी

0
मुंबई, दि.9 : राज्यातील मच्छिमार व मत्स्यसंवर्धक यांना कृषी क्षेत्राप्रमाणे विविध पायाभूत सुविधा व सवलती उपलब्ध करून देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यासंदर्भातील शासन...

खाजगी बाजार व थेट बाजारांच्या सुविधांची तपासणी करावी – पणन मंत्री जयकुमार रावल ...

0
पुणे, दि. 9 : राज्यात शेतकऱ्यांना शेतमाल विक्री साठी कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त 105 खाजगी बाजार तसेच थेट बाजार कार्यरत आहेत. काही खाजगी...

आधुनिक कृषी तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री नितेश राणे

0
सिंधदुर्गनगरी दि ०९ (जिमाका) : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारे मदत झाली आहे. नवीन आणि सुधारित...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्र विकासाचा प्रस्ताव सादर करावा – उच्च व तंत्रशिक्षण...

0
नाशिक, दि. ९ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक येथील उपकेंद्राच्या इमारतीत येत्या जून महिन्यापासून विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. रस्ते, वीज, पाणी...