शनिवार, जुलै 5, 2025
Home Blog Page 719

अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी १४ जून रोजी प्रथम प्रशिक्षण

मुंबई, दि. १२ :- मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी प्रथम प्रशिक्षण १४ जून २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

सकाळी ९:०० ते दुपारी १:३० यावेळेत मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले रेल्वे स्टेशनजवळ, विलेपार्ले पूर्व मुंबई ४०००५७ येथे हे प्रशिक्षण होणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने  अधिसूचनेद्वारे मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्ह्यांतील मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्र.१, २, व ३ चे आदेश निर्गमित करण्यात आले असून सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

——000——–

आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे करावे – जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर

मुंबई, दि. १२ :- मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे तसेच या निवडणुकीसाठी लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे पालनही काटेकोरपणे करावे, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिले.

मुंबई पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२४- च्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पदनिर्देशित अधिकारी व समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, निवासी उपजिल्हाधिकारी सतिष बागल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ उपस्थित होते.

मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश

श्री. क्षीरसागर म्हणाले, मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व संबंधित पदनिर्देशित अधिकारी यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रे सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.

दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाहतूक आराखडे तयार करावे. निवडणूक प्रक्रिया सुरळितपणे पार पाडण्यासाठी कालबद्ध वेळापत्रक तयार करण्याचे निर्देशही श्री. क्षीरसागर यांनी दिले.

१४ जून रोजीच्या प्रशिक्षणास सर्व संबंधितांची उपस्थिती बंधनकारक

मुंबई शिक्षक व मुंबई पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ निवडणूकीसाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १४ जून रोजी विलेपार्ले येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले असून या प्रशिक्षणास सर्व संबंधितांनी उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचेही जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

—–000——

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या मान्यतेबाबत येणाऱ्या अडचणी सोडविणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. 12 : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाकडून राज्यातील प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबतच्या अडचणी सोडविणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या कार्यवाहीबाबत आढावा बैठक मंत्रालयात घेण्यात आली, त्यावेळी मंत्री श्री.लोढा बोलत होते. यावेळी व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, राज्य कौशल्य विकास सोसायटीचे अतिरिक्त आयुक्त अनिल सोनावणे, आर्ट ऑफ लिव्हींगचे अध्यक्ष प्रसन्ना प्रभू जोशी यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ५११ ठिकाणी ही केंद्र सुरू करण्यात आली आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांना मान्यता मिळण्याबाबत कठोर निकष आहेत. भौगोलिक रचना आणि स्थानिक सुविधा लक्षात घेता ग्रामीण व शहरी भागासाठी वेगवेगळे निकष असावेत. या केंद्राचे तपासणी शुल्कही कमी करण्यात यावे. तसेच ही तपासणी केंद्र शासनाने खाजगी संस्थाकडून न करता राज्य शासनाकडून करावी याबाबत विभागाने पाठपुरावा करावा, यासह विविध सूचना यावेळी मंत्री श्री.लोढा यांनी या बैठकीत केल्या.

******

संध्या गरवारे/विसंअ/

दृष्टिबाधितांच्या सक्षमीकरणासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 12 : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड – ‘नॅब’ – संस्थेने ब्रेल पुस्तक छपाईसाठी खरेदी केलेल्या अत्याधुनिक ‘ब्रेलो 300’ या प्रिंटिंग मशीनचे उद्घाटन राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते संस्थेच्या वरळी येथील मुख्यालयात करण्यात आले.

राज्यपालांनी दिलेल्या स्वेच्छा निधीतून खरेदी केलेल्या या छपाई मशीनमुळे दृष्टिबाधित व्यक्तींसाठी क्रमिक पुस्तके, धार्मिक पुस्तके, पत्रिका व अवांतर पुस्तके छापता येणार आहेत.

तंत्रज्ञान सर्वांकरिता, विशेषतः दिव्यांग व्यक्तींकरिता वरदान सिद्ध होत आहे. मात्र दिव्यांगांना नोकरी व्यवसायाकरिता आज नवनवी कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक झाले आहे.  या दृष्टीने त्यांना कौशल्याबाबत अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केले.

दिव्यांगांना ज्ञान व कौशल्यात अग्रेसर ठेवण्यासाठी मोठ्या संख्येने ऑडिओ पुस्तके तयार केली पाहिजेत तसेच ती स्वस्त व सहज उपलब्ध करून दिली गेली पाहिजेत असे राज्यपालांनी सांगितले.

नॅब इंडिया संस्थेने दृष्टिबाधित व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करावे व सर्वोत्कृष्ट दिव्यांग सहायता केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी केले.

यावेळी दहावी बोर्डाच्या परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या शिक्षकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

‘नॅब’ संस्थेच्या इमारतीची दुरुस्ती व रंगकाम तसेच इमारतीवर सौर पॅनेल बसविण्यास आर्थिक सहकार्य करणाऱ्या मार्श इंडिया, एचएसबीसी व कन्सर्न इंडिया फाऊंडेशन या संस्थेच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  यावेळी ‘नॅब’ च्या कार्याची माहिती देणाऱ्या एका माहितीपटाचे देखील प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला नॅब इंडियाचे अध्यक्ष हेमंत टकले, कार्यवाहक मानद महासचिव डॉ. विमल कुमार डेंगला, सचिव हरेंद्र मल्लिक, कार्यकारी संचालक पल्लवी कदम तसेच नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे समिती सदस्य, कर्मचारी आणि निमंत्रित उपस्थित होते.

००००

Maharashtra Governor inaugurates Braille Printing Machine for visually impaired

 

Maharashtra Governor Ramesh Bais inaugurated ‘Braillo 300’, a modern Braille Printing Machine at the headquarters of the National Association for the Blind India at Worli, Mumbai on Wed (12 Jun).

The machine purchased by NAB India from the discretionary funds made available by the Governor will be used for printing text books, novels, religious books, cards and other reading material.

The Governor felicitated the visually impaired students who scored more than 80 per cent marks in the SSC Board examinations. Teachers were also felicitated on the occasion.

The Governor felicitated the CEO of Marsh India Sanjay Kedia, HSBC representative Roopa Varma and CEO of Concern India Foundation Kavita Shah for supporting the structural repairs, painting and installation of Solar panels of NAB building.

A documentary film on NAB India was released on the occasion.

President of NAB India Hemant Takle, Acting Honorary Secretary General Dr Vimal Kumar Dengla, Honorary Secretary Harendra Mallik, Executive Director Pallavi Kadam, Committee members and office bearers of NAB were present.

0000

परदेशी शिष्यवृत्तीकरिता १२ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

मुंबई, ‍‍दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परदेश शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी  दि.12 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण आयुक्त यांनी केले आहे.

सामाजिक न्याय विभागाची परदेशी शिष्यवृत्ती योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. सन 2003 पासून ही योजना राबविली जात आहे. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्ययावत (Qx World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या 75 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३० % जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या  www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ‘ताज्या घडमोडी’ या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावी. परिपूर्ण अर्ज विहीत मुदतीत व आवश्यक त्या कागदपत्रासह, समाज कल्याण आयुक्तालय, 3, चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे- 411001 या पत्त्यावर पाठवावेत. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुविज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एम डी  व एम एस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी, असे समाज कल्याण आयुक्तांनी परिपत्रकात नमूद केले आहे.

0000

शैलजा पाटील/वि.सं.अ

पवना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबत कार्यवाहीला गती देण्यात येणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई दि. 12 : पवना प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाबाबतची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

मावळ तालुक्यातील पवना, जाधववाडी आणि टाटा कंपनीच्या धरणग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार सुनिल शेळके, मदत व पुनर्वसन  विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहता, पुण्याचे अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) स्वप्नील मोरे यासह इतर विभागांचे अधिकारी, टाटा कंपनीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पवना प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याच्या कार्यवाहीला गती देताना प्रकल्पग्रस्तांना टाटा कंपनीनेही नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. टाटा कंपनीने भूसंपादन करतेवेळी केलेल्या सामंजस्य कराराबाबतही अहवाल सादर करण्याचे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविणार – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

       मुंबई दि. 12 : वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामधील बाधित प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य अभियंता डॉ. ह. तू. धुमाळ, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहता, साताराचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, तारळीचे कार्यकारी अभियंता राहुल धनवट यांच्यासह वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्प येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी  मध्यम प्रकल्पातंर्गत अंशत: बाधित गाव मौजे जिंती व निगडे प्रकल्पग्रस्तांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव तसेच उत्तरमांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधित झालेल्या माथनेवाडी येथील 46 घरांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात यावा.

0000

संध्या गरवारे/विसंअ/

तारळी प्रकल्पातील उपसा जलसिंचन योजना १० ऑगस्ट पूर्वी कार्यान्वित करावी – मंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 12 : सातारा जिल्ह्यातील तारळी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत तारळे, बांबवडे उपसा सिंचन योजनांमध्ये जुने सदोष यांत्रिक साहित्य बदलवून अद्ययावत पाणी उपसा करणारी  यंत्रणा बसवावी. या उपसा सिंचन योजनेचे प्रात्यक्षिक घेऊन ही योजना 10 ऑगस्ट 2024 पूर्वी कार्यान्वित करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

मंत्रालयात तारळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजना, मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पातील नाटोशी उपसा सिंचन योजना व केरा मणदुरे विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी प्रकल्पाबाबत बैठक मंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर उपस्थित होते. तर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता श्री. धुमाळ सहभागी झाले होते.

मोरणा (गुरेघर) मध्यम प्रकल्पांतर्गत नाटोशी उपसा सिंचन योजनेच्या कामाचा आढावा घेत मंत्री श्री. देसाई म्हणाले, या योजनेचे बंद पाईप लाईनचे काम सुरू करावे. ही योजना पूर्ण झाल्यास पाटण तालुक्यातील क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. तारळी पॅटर्नप्रमाणे केरा मणदुरे विभागातील निवकणे, चिटेघर व बिबी या प्रकल्पातील दोन्ही तीरावरील शेत जमिनीस उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी देण्यासाठी सर्वेक्षणाचे काम हाती घ्यावे. सर्वेक्षणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा. निवकणे उपसा सिंचनाची उंची न वाढवता आहे त्याच स्थितीत कामे करण्यात यावीत, असे निर्देशही मंत्री श्री. देसाई यांनी दिले.

तराळी प्रकल्पातील उपसा सिंचन योजनांचे प्रात्यक्षिक घेण्यासाठी महावितरणने या भागातील भारनियमन काही दिवसांसाठी रद्द करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी महावितरणला दिल्या. सर्व योजना पूर्ण क्षमतेने एकाच वेळी सुरू होण्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ/

 

 

इस्टोनिया महाराष्ट्राशी सायबर सुरक्षा, ई-गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात सहकार्य करण्यास उत्सुक : राजदूत मार्जे लूप

मुंबई, दि. 12 : पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मधून स्वतंत्र झालेला इस्टोनिया हा देश सायबर सुरक्षा,  ई – गव्हर्नन्स, डेटा सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो व्यवस्थापन आदी उच्च तंत्रज्ञानाने जगात अग्रस्थानी असून या क्षेत्रात भारताशी आणि विशेषतः महाराष्ट्राशी सहकार्य करण्याबाबत उत्सुक असल्याची माहिती इस्टोनियाच्या भारतातील नवनियुक्त राजदूत मार्जे लूप यांनी आज येथे दिली.

पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या मुंबई भेटीवर आलेल्या इस्टोनियाच्या राजदूत श्रीमती मार्जे लूप यांनी बुधवारी (दि. १२ जून) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.

इस्टोनिया देशाने डेटा सुरक्षेच्या दृष्टीने लक्झेम्बर्ग येथे स्वतःचा ‘माहिती दूतावास’ – डेटा एम्बसी – सुरु केली असून क्लाऊड तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा सुरक्षित ठेवला जातो, असे सांगून डेटा सुरक्षा क्षेत्रात इस्टोनिया भारताला व महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करू शकेल, असे राजदूतांनी सांगितले. भारतातील जिओ व टीसीएस कंपन्यांशी देखील सहकार्य करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्टोनिया देशाचे स्वतःचे प्रतिष्ठित आणि जुने ‘टॅलीन तंत्रज्ञान विद्यापीठ’ असून या विद्यापीठात इ- गव्हर्नन्स, सायबर सुरक्षा, उपयोजित अभियांत्रिकी, जहाज बांधणी व इतर उच्च कौशल्ये शिकविली जातात, असे सांगून या विद्यापीठाशी महाराष्ट्र राज्याने सहकार्य प्रस्थापित केल्यास ते उपयुक्त ठरेल, असे राजदूतांनी सांगितले.

इस्टोनिया देशाची लोकसंख्या १४ लाख असून तेथे नागरिकत्व दिले जात नसले तरीही इ-रेसिडंसी दिली जाते, असे सांगून मुकेश अंबानी आपल्या देशाचे इ – निवासी असल्याचे त्यांनी सांगितले. इस्टोनियाचे इ – रहिवासी होऊन तेथे उद्योग / कंपनी सुरु करता येते असेही त्यांनी सांगितले.

इस्टोनिया देशाचा ५० टक्के भूभाग जंगलाने व्याप्त असून मोठा भाग निर्मनुष्य परंतु जैवविविधतेने नटलेला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या देशातील मध्ययुगीन शहरे व बंगले पर्यटकांना आवडतील, असे सांगून भारतीय पर्यटकांनी इस्टोनियाला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सांस्कृतिक सहकार्य परस्परांना जोडण्यास मदत करते असे सांगून इस्टोनिया आपले कॉयर समूह भारतात पाठवेल. महाराष्ट्राचे सांस्कृतिक पथक इस्टोनियाला बोलावणार असल्याचे राजदूतांनी सांगितले.

काही देशांची अर्थव्यवस्था जगातील युद्धजन्य स्थितीमुळे मंदावत असली तरीही भारताची अर्थव्यवस्था उत्तम गतीने वाढत आहे. भारताशी व्यापार, वाणिज्य व सांस्कृतिक संबंध वाढविण्याची सध्याची वेळ योग्य असल्याचे राज्यपाल श्री. बैस यांनी राजदूतांना सांगितले.

इस्टोनियाच्या टारटू विद्यापीठात १८३७ पासून संस्कृत भाषा शिकवीत असत. परंतु कालांतराने संस्कृत भाषा वर्ग बंद झाले. या विद्यापीठाला संस्कृत अध्यापक उपलब्ध करून संस्कृत भाषा वर्ग पुन्हा सुरु करण्यास महाराष्ट्रातील संस्कृत विद्यापीठ मदत करेल, असे राज्यपाल श्री. बैस यांनी यावेळी सांगितले. इस्टोनियाने विद्यार्थी व अध्यापक आदानप्रदान वाढवावे तसेच सांस्कृतिक संबंधांना गती द्यावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.

बैठकीला इस्टोनियाचे भारतातील दूतावासाचे उपप्रमुख मार्गस सोलसन व मुंबईतील मानद वाणिज्यदूत सुनील खन्ना हे देखील उपस्थित होते.

००००

Estonian Ambassador calls on Maharashtra Governor

Mumbai, 12th June : The newly appointed Ambassador of Estonia to India Ms Marje Luup called on the Governor of Maharashtra Ramesh Bais at Raj Bhavan, Mumbai on Wed (12 Jun).

Stating that Estonia has emerged as a leader in Cyber Security, e- governance, waste management, metro management and other high end technology areas, the Ambassador called for strengthening cooperation with Maharashtra in business, culture and tourism.

Welcoming the ambassador to Maharashtra, Governor Bais called for strengthening inter university collaboration between Estonian universities and those in Maharashtra. He said the Sanskrit University in Maharashtra will help the University of Tartu in Estonia to resume the teaching of Sanskrit language in that University.

Deputy Head of the Estonian Mission in India Margus Solnson and Honorary Consul in Mumbai Sunil Khanna were present.

0000

पणन महासंघाने प्राप्त उद्दिष्टानुसार खतसाठ्याची उचल केल्यानंतर आवश्यकता असल्यास कृषी विभागाने अतिरिक्त साठा मंजूर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

मुंबई, दि. १२ : राज्यात काही ठिकाणी चांगला पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी पेरणीच्या पूर्वतयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यात बी-बियाणे आणि खतांच्या मागणीत वाढ होत आहे. शेतकऱ्यांना युरिया आणि डीएपी खतांचा पुरेसा पुरवठा केला जात असला तरी येणाऱ्या काळात खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी राज्य शासनातर्फे खतांचा संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यात येतो. पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार आपल्या वाट्याच्या खतसाठ्याची संपूर्ण उचल करावी. तसेच त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागाने पणन महासंघास अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात आज पणन महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेतली. या बैठकीस कृषिमंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, उपाध्यक्ष रोहित निकम, संचालक पांडुरंग घुगे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर डुबे-पाटील, नाफेडच्या व्यवस्थापक भाव्या आनंद आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पणन महासंघाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगले काम केले आहे. महासंघाने आपल्या कामात आणखी सुधारणा करून शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी शासनातर्फे महासंघाला अधिक सहकार्य करण्यात येईल. राज्यात जिल्हा पणन कार्यालयांच्या माध्यमातून ग्रामीण सहकारी संस्थांच्या मदतीने गावपातळीपर्यंतच्या शेतकऱ्यांना वाजवी दरात खतांचे वितरण करण्यात येते. यामुळे पणन महासंघाअंतर्गत काम करणाऱ्या सहकारी संस्थांच्या उत्पन्नात वाढ होण्यासही मदत होते. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पणन महासंघास आवश्यकतेनुसार व प्राप्त उद्दिष्टानुसार संरक्षित खतसाठा वितरित करावा. धान खरेदीसाठी आवश्यक असणारा बारदाणा पूर्वीप्रमाणे महासंघामार्फत खरेदीसाठी शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही केली जावी. केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या दराने आणि त्यांच्या पॅनेलवरील पुरवठादारांकडून बारदाण खरेदीसाठी महासंघाने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

शालेय पोषण आहार योजनेत पणन महासंघ निविदा प्रक्रियेद्वारे नियमानुसार सहभागी होऊ शकतो. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून चना व तूर विक्री तसेच अनुषंगिक खर्चापोटी आणि धान व भरड धान्य खरेदी पोटी अनुषंगिक खर्चाची प्रलंबित रक्कम मिळण्याबाबत शासन स्तरावर नियमाप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. याबाबत लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्य सचिवांनी बैठक घेऊन योग्य शिफारशी कराव्यात. नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या कडधान्य वाहतूक रकमेबाबतीतही गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागांना दिले.

पणन महासंघाच्या कृषी, पणन आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाकडील अन्य मागण्यांवर देखील सकारात्मक चर्चा झाली. याबाबतीतही वेगाने निर्णय घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले. अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यांच्या सचिवांच्या स्तरावर बैठक घेऊन पणन महासंघाने मागणी केलेल्या प्रलंबित रकमेबाबत अहवाल द्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००००

ताज्या बातम्या

बिहारमध्ये विशेष सखोल पुनरीक्षण यशस्वीरित्या सुरू

0
मुंबई, दि. ५ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) उपक्रमांतर्गत बिहारमध्ये १.५ कोटी घरांना बूथ स्तर अधिकारी (Booth...

शेतकऱ्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

0
नाशिक, दि. 4 जुलै, 2025 (जिमाका वृत्तसेवा): रस्ते वीज व पाणी या शेतकऱ्याच्या मूलभूत गरजा असून पूर्ण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना आवश्यक उपलब्ध करून देण्यासाठी...

कामात कुचराई करणाऱ्यांची गय न करता शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्य सेवा पुरवा – केंद्रीय आरोग्य...

0
बुलढाणा,दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य गोरगरीब जनतेपर्यत आरोग्य सेवा सहज ,सुलभ आणि माफक दरात पोहचविण्याचा केंद्र सरकारचा हेतू आहे . हा हेतू साध्य करण्यासाठी आणि...

‘माये’चं दूध… नवजातांसाठी संजीवनी!

0
जळगावच्या 'ह्युमन मिल्क बँके'तून २०००हून अधिक बाळांना मिळाला जीवनदायी आधार आईपण म्हणजे माया, वात्सल्य आणि त्याग. पण काही वेळा ही आई काही कारणांमुळे बाळाला दूध...

बॉम्बे बार असोसिएशनतर्फे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार

0
मुंबई, दि. ४ : मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत, बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या माझ्या सहकाऱ्यांनी मला घडवलं. आज जे काही आहे ते या...