रविवार, जुलै 6, 2025
Home Blog Page 715

रोजगार निर्मितीसाठी महिला बचतगटांकडून गणवेश शिलाई

             मुंबई, दि.15 महिलांना रोजगार उपलब्ध होऊन आर्थिक लाभ मिळावा, यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळच्या (मविम) बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची प्रभावी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 पर्यंत शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व अनुसूचित प्रवर्गातील मुले, तसेच दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो.

              गणवेश शिवणकाम महिलांना देण्यापूर्वी गावाचे मॅपिंग करण्यात आले तसेच महिलांची संख्या निश्चित करण्यात आली. महिला दिवसाला किती गणवेश शिवतात याची संख्या काढून त्यानुसार गणवेश संख्या देण्यात आली आहे.

            आता शाळा सुरू झाल्या असून राज्यभरात गणवेश  वाटपही सुरू झाले आहे. या निर्णयामुळे  मुलांना गणवेश वेळेत मिळण्यास मदत झाली, तसेच महिलांना मोठ्या प्रमाणत रोजगार प्राप्त होत असल्याचेही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

0000

 

साहित्य अकादमीचे ‘युवा’ आणि ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली, 15: साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठेचे समजले जाणारे साहित्य अकादमी ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी  देविदास सौदागर या युवा सहित्यकाच्या ‘उसवण’ या कादंबरी ला ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.  तर बाल  साहित्यासाठी  साहित्यकार  व कथाकार भारत सासणे यांच्या ‘समशेर आणि भूतबंगला’ या कादंबरीला ‘बाल’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या अध्यक्षतेत आज झालेल्या बैठकीत साहित्य अकादमीच्या वर्ष 2024 साठी युवा साहित्य आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.  प्रत्येक भाषेतील पुरस्कारांसाठी तीन सदस्यीय निर्णायक मंडळाच्या निर्धारित निवड प्रक्रियेचे अवलंब करत उत्कृष्ट साहित्य लेखनाची निवड पुरस्कारांसाठी  करण्यात आली आहे.

युवा साहित्य पुरस्कारांमध्ये 23 भाषेतील युवा साहित्यिकांना अकादमीचा पुरस्कार जाहीर करण्यात आले. तर, बाल साहित्य पुरस्कारांसाठी 24 भाषेतील साहित्यकांची अकादमीच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आलेली आहे. युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रूपये रोख असे आहे.

मराठी भाषेसाठी देविदास सौदागर यांच्या उसवण या कादंबरीस साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार  जाहीर झाला. श्री  देविदास सौदागर हे महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित युवा लेखक आहेत. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे मराठी साहित्य विश्वात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि शहरी जीवनातील विसंगती, संघर्ष आणि मानवी भावभावना या त्यांच्या लेखनातील मुख्य विषयांपैकी एक आहेत. ‘उसवण’ ही त्यांच्या साहित्यिक प्रवासातील एक महत्वपूर्ण कामगिरी मानली जाते. त्यांच्या लेखनात मानवी नात्यांची गुंतागुंत आणि समाजातील विविध प्रश्नांची चर्चा प्रकर्षाने आढळते. ‘उसवण’ ही कादंबरी एका ग्रामीण समाजातील कथा सांगते ज्यात कुटुंबातील नातेसंबंध, सांस्कृतिक बदल आणि सामाजिक ताणतणाव यांचे सूक्ष्म चित्रण आहे. या कादंबरीत ग्रामीण महाराष्ट्रातील जीवनाचे बारकावे, आर्थिक संकटे आणि आधुनिकतेचे वाढते दबाव या सर्वांचे वर्णन आहे. कादंबरीतील पात्रांची विश्वसनीयता आणि कथानकाची गुंफण वाचकांना तल्लीन करते. देविदास सौदागर यांच्या शैलीत कथानकाचे नाट्यमय आणि संवेदनशील चित्रण आढळते, ज्यामुळे ‘उसवण’ ही कादंबरी वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.

मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये  ख्यातनाम साहित्य‍िक श्री किरण गुरव डॉ. शरणकुमार  लिंबाळे व श्री श्रीकांत उमरीकर  यांचा समावेश होता.

सुप्रसिद्ध बाल साहत्यिकार भारत सासणे यांच्या ‘ समशेर आणि भुतबंगला’  या मराठी कादंबरीला साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार जाहिर झाला.  भारत जगन्नाथ सासणे हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रतिष्ठित कथाकार आहेत. त्यांचा जन्म २७ मार्च १९५१ रोजी जालना येथे झाला. साहित्य क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या कथा, लेखनशैली आणि कथावस्तूंमध्ये ग्रामीण जीवनाचे विविध पैलू, सामाजिक समस्या आणि मानवी भावनांचे सूक्ष्म दर्शन घडते. त्यांच्या लेखनाची शैली वाचकांना विचारप्रवृत्त करते आणि त्यांच्या कथा मराठी साहित्य विश्वात एक विशिष्ट ठसा उमटवतात.

मराठी भाषेसाठी  तीन सदस्य निर्णयाक मंडळामध्ये राजू तांबे, विजय नगरकर आणि विनोद शिरसाठ  या साहित्य‍िकांचा समावेश होता.

संस्कृतमधील युवा पुरस्कार विजेत्याची घोषणा नंतरच्या तारखेला केली जाईल, असे अकादमीने एका निवेदनात म्हटले आहे.

०००००

पालकमंत्र्यांच्या हस्ते आपत्कालीन वापराच्या पोर्टेबल टेंटचे उद्घाटन 

यवतमाळ, दि.१५ (जिमाका) : आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरते निवारागृह म्हणून वापरण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्याला ३२ पोर्टेबल टेंट प्राप्त झाले आहे. या टेंटचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते आज उद्घाटन करुन वितरण करण्यात आले. प्रत्येक तालुक्यास दोन याप्रमाणे टेंट वितरित करण्यात आले.

यावेळी पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मून यांच्यासह शोध व बचाव पथकाचे सदस्य उपस्थित होते.

मान्सून कालावधीत बरेचदा अतिवृष्टी किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस होतो. नदी नाल्यांना पुर आल्याने वाहतूक बाधित होते. गावात, घरात पाणी शिरण्याचा घटना घडतात. अशा प्रसंगी बाधित नागरीकांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविणे आवश्यक असते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून प्राप्त हे टेंट सुरक्षित तात्पुरता निवारा म्हणून उपयोगात येणार आहे.

या टेंट मध्ये बाधितांची व्यवस्था करण्यासोबतच तात्पुरते रुग्णालय देखील सुरु करता येणार आहे. जिल्ह्यासाठी ३२ टेंट प्राप्त झाल्यानंतर आज पालकमंत्री संजय राठोड यांनी टेंटचा शुभारंभ केला व प्रत्येक तालुक्यास प्रत्येकी दोन याप्रमाणे टेंटचे वितरण करण्यात आले. पालकमंत्र्यांनी यावेळी टेंटच्या उपयुक्ततेची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सतिश मुन यांच्याकडून जाणून घेतली.

बचाव पथकात प्रशिक्षित मनुष्यबळ नेमा

मान्सून काळात बरेचदा शोध व बचाव पथकांना महत्वाची तितकीच जोखमीची भूमिका पार पाडावी लागते. पुरपरिस्थितीत अडकलेल्यांना सुरक्षित बाहेर काढणे पथकाचे कौशल्यपूर्ण काम आहे. या पथकात नेमणूक करतांना प्रशिक्षित मणूष्यबळ नेमा, प्रत्येक प्रसंगाला खंबीरपणे पुढे जाण्याचे उत्तम प्रशिक्षण त्यांना द्या, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

000000

 

जून अखेरपर्यंत ७५ टक्केपेक्षा अधिक पिककर्जाचे वाटप करा – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.15 (जिमाका) : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पिककर्जाची नितांत गरज असते. हंमाग तोंडावर आला आहे, परंतू त्या मानाने पिककर्जाचे वाटप कमी झाल्याचे दिसते. या महिन्याअखेर 75 टक्के पेक्षा अधिक कर्जाचे वाटप झाले पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने बिगर शेती कर्जाची वसूली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पिककर्ज वाटप करावे, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.

महसूल भवन येथे पालकमंत्री श्री.राठोड यांनी पिककर्ज वाटप, खते व बी-बियाणांचा पुरवठा, मान्सूनपुर्त तयारी, महावितरण व महाबिज संबंधित बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, जिल्हा पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, सहकारचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, कृषि विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, अग्रणी बॅंक प्रबंधक अमर गजभीये यांच्यासह बांधकाम, जलसंधारण, महावितरण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्याला यावर्षी 2 हजार 200 कोटी रुपयांच्या पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 1 हजार 26 कोटींचे वाटप झाले असून वाटपाची टक्केवारी 47 ईतकी आहे. पालकमंत्र्यांनी सर्वच बॅकांना पिककर्ज वाटपाची गती वाढविण्याचे निर्देश दिले. राष्ट्रीयकृत बॅंकांचे वाटप तुलनेने कमी असल्याने या बॅंकांनी अधिक काम करण्याची गरग आहे. कोणत्याही परिस्थितीत या महिन्याअखेर जास्तीत जास्त कर्जवाटप होणे आवश्यक आहे. एकही पात्र शेतकरी पिककर्जापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील पालकमंत्र्यांनी केल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेने निधी उपलब्ध नसल्याने पिककर्ज वाटप थांबविले आहे. शासनाकडून निधी उपलब्ध होण्याची वाट न पाहता या बॅंकेने आपल्या बिगर कृषी कर्जाची वसूली वाढवून त्यातून शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करावे. शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता जिल्हा बॅंकेने घ्यावी. शासनाकडून बॅंकेला निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे पालकमंत्री म्हणाले.

बी-बियाने व रासायनीक खतांच्या उपलब्धतेचा सविस्तर आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. जिल्ह्याला आवश्यक बियाने, खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यात कुठेही बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, असे आढळल्यास पोलिस विभागाच्या मदतीने संबंधितांवर कारवाई करा. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या आणि निर्धारीत दरात कृषि निविष्ठा उपलब्ध झाल्या पाहिजे, याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी.

पेरणीनंतर बियाणे उगवले नसल्याच्या किंवा उगवणक्षमता अगदी कमी असल्याच्या तक्रारी येतात. अशा तक्रारींवर वेळीच कारवाई करण्यासाठी कृषि विभागाने स्वतंत्र पथक नेमावे. तक्रारींची लगेच शहानिशा करून संबंधित कंपनीविरोधात आवश्यक ती कारवाई करावी तसेच शेतकऱ्यांना त्याचा उचित मोबदला मिळेल याची खात्री करावे, असे पालकमंत्री म्हणाले.

मान्सुनपुर्व तयारीचा आढावा घेतांना जिल्ह्यात कुठेही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणेने सज्ज असले पाहिजे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. जिल्हा व तालुकास्तरीय दक्षता व सुरक्षा पथके, नियंत्रण कक्ष, संवेदनशिल व अतिसंवेदनशिल गावांची विशेष दक्षता घेतली जावी. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नदी, नाल्यांना पुर आल्यास निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तैनात असावे. पुरेसा औषध व अन्न धान्यसाठा उपलब्ध ठेवावा. शहरी भागातील नाल्यांची साफसफाई करा, अशा सूचना केल्या.

बॅंकांनी अनुदानाची रक्कम कपात करू नये

लाभार्थ्यांना पीएम किसानसह वेगवेगळ्या योजनांचे अनुदान त्यांच्या बॅक खात्यात प्राप्त होतात. बॅंका ही रक्कम परस्पर कर्ज खात्यात कपात करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. बॅंकांनी अशी कपात करू नये, अनुदानाची रक्कम तातडीने संबंधितांना वितरीत करावे, अस निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

महावितरणने दक्ष राहून काम करावे

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळ वारा, किंवा नदी नाल्यांना पुर आल्याने वीजेचे खांब, तारा तुटतात. त्यामुळे वीज पुरवठा खंडीत होतो. पुरवठा तातडीने सुरळीत न झाल्यास नागरिकांमध्ये रोष निर्माण होतो. अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी महावितरणे दक्ष राहून काम केले पाहिजे. नागरिकांशी संवाद ठेवावा. विपरित परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना विश्वासात घेऊन त्यावर तोडगा काढावा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

                                00000000

 

बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शिक्षण आणि प्रशिक्षणावर भर द्यावा – डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे दि.१५: बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यासह शाळाबाह्य मुलांचे शिक्षण आणि पाल्य व पालकांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा, तसेच वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबतही आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

पुण्यात अलिकडे झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, बालगुन्हेगारी प्रतिबंध आणि ससून रुग्णालयातील व्यवस्थापनाबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस महिला व बालविकास आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे प्र.पोलीस आयुक्त सुनील रामानंद, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, ससूनचे अधिष्ठाता डॉ.चंद्रकांत म्हस्के, उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक सुजीत पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी उपस्थित होते.

डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, बाल न्याय कायद्यानुसार गंभीर गुन्ह्याबाबत कारवाई करताना गुन्हेगारांना प्रौढ समजण्यात यावे यादृष्टीने नियमांचा अभ्यास करून कार्यप्रणाली निश्चित करण्याचा प्रयत्न करावा. जिल्हाधिकाऱ्यांकडे होणाऱ्या बाल कल्याण समितीच्या बैठकांमधील कामकाज गांभिर्याने होईल याकडे लक्ष द्यावे. बाल गुन्हेगारी रोखण्यासोबत गंभीर गुन्ह्यात शिक्षा होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यावर भर द्यावा. महानगरपालिकेने शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्याची मोहिम राबवावी, यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पोलीस विभाग गुन्हे शोधण्यासाठी उपयोग करीत असलेली सीसीटीएनएस प्रणाली बाल गुन्हेगारांसाठी लागू करण्यासाठी शासनाकडे शिफारस करण्यात येईल.

शहरातील ब्लॅकस्पॉटची माहिती संकलीत करून अशा ठिकाणी सीसीटीव्ही लावल्यास वाहतूकीवर चांगल्याप्रकारे नियंत्रण करता येईल. सण आणि उत्सवांच्या कालावधीत वाहतूक नियंत्रणाबाबत आतापासून नियोजन करावे. शहरातील अतिक्रमणे काढण्याबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल महानगरपालिकेने सादर करावा. महानगरपालिका आणि पोलीस विभागाने अपघात रोखण्यासाठी संयुक्त मोहिम राबवावी.

ससून रुग्णालयाने नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यावर भर द्यावा. आरोग्य सेवेत ससून रुग्णालयाचा लौकीक चांगला असून तो वाढविण्याचा प्रयत्न करावा. आरोग्य क्षेत्रातील चांगल्या स्वयंसेवी संस्था आणि व्यक्तींची मदत घेवून कामकाजात पारदर्शकता वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यांनी सांगितले.

मद्यसेवनासाठी परवाना देण्यासाठी भरावयाचे शुल्क वाढविण्याबाबत आणि एक दिवसाचा परवाना देताना मुले अल्पवयीन आहेत का हे तपासण्यासाठी काटेकोर नियमावली करणे शक्य आहे का याचा विचार करावा. मद्य विक्री आणि परवान्याचा वापर याचा ताळमेळ घेण्याची व्यवस्था निर्माण करता येईल का याचा विचार करावा. अवैध दारू विक्रीवर प्रतिबंध करण्यासाठी विशेष मोहिम राबवावी, असे निर्देशही डॉ.गोऱ्हे यांनी दिले.

आयुक्त डॉ. नारनवरे म्हणाले, बाल न्याय कायद्यानुसार बालगुन्हेगारांचे पुर्नवसन करण्यावर भर देण्यात आला आहे. बाल न्याय मंडळातील महिला व बालविकास विभागातर्फे नियुक्त प्रतिनिधींच्या प्रशिक्षणाबाबत कार्यवाही करण्यात येत आहे. वारंवार गुन्हे करणारे आणि गंभीर गुन्ह्यातील बालगुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी नव्या बाल कायद्याबाबत राज्यासाठीची नियमावली लवकरच करण्यात येत आहे. त्यात प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवरही भर देण्यात येणार आहे. बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजातही सुधारणा करण्यात येत आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. भोसले म्हणाले, अनधिकृत हॉटेल आणि रुफ टॉप हॉटेलवर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आहे. शहरातील पदपथावरील आणि रस्त्याच्या बाजूला असेलेली अतिक्रमणे काढण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई करण्यात येत आहे. वाहतूक सुरक्षेच्यादृष्टीने रस्त्यांच्या रचनेत सुधारणा करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, पुणे शहरातील वाहतूक सुरक्षेबाबत मागील १५ दिवसात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोनदा बैठक घेण्यात आली असून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील सुमारे ५० ब्लॅकस्पॉटबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे. अवजड वाहनांना शहराच्या मध्यभागात वाहतूकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. १६ ते १८ वर्षातील बालगुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पालकांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

पोलीस आयुक्त श्री.रामानंद म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात रात्री ‘ड्रिंक ॲण्ड ड्राईव्ह’ ला प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वाहतूक नियमांविषयी समुपदेशन करण्यात येत आहे.

डॉ.म्हस्के म्हणाले, ससून रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी आदर्श प्रणाली निश्चित करण्यात आली आहे. दररोज कामकाजाचा आढावा घेण्यात येत आहे. चांगली रुग्णसेवा देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्त श्री.खोराटे यांनी पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक नियोजन आणि रस्ता सुरक्षेबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. उत्पादन शुल्क विभागाचे श्री.पाटील यांनी उत्पादन शुल्क विभागातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
0000

शाळांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. १५ (जि.मा.का.) : खाजगी शाळामध्ये ज्या प्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पध्दतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशा भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केल्या.

            शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली येथील स्फुर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्र. ७ मध्ये पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी  मुलांचे गुलाबपुष्प व रोपटे देवून स्वागत केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे, राकेश दड्डणावर यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा नियोजनमधून महानगरपालिकेला जो निधी दिला जातो त्यातील जास्तीत जास्त निधी शाळेसाठी द्यावा. काही मुले शाळेत लांबून येत असतात या मुलांना शाळेत आणण्यासाठी बस व्यवस्थेबाबतचा प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या शाळांना वर्ग खोल्यांची कमतरता आहे, अशा शाळांना आवश्यक वर्ग खोल्याबाबतचा  प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश मधून शिकण्याची संधी मिळत आहे. शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत आवश्यक  सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, राकेश दड्डणावर यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली व  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सन २०१९ मध्ये शाळेची पटसंख्या ७० होती ती आता सुमारे ४५० पर्यंत पोहचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पहिली ते पाचवी पर्यंत असणाऱ्या या शाळेस  सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग मंजूर करून दिल्याबद्दल शाळेच्यावतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा आर्यविन ब्रिज पुलाची प्रतिमा भेट देवून यावेळी सत्कार करण्यात आला.

000000

शाळांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली दि. १५ (जि.मा.का.) : खाजगी शाळामध्ये ज्या प्रमाणे शैक्षणिक सुविधा देण्यात येतात त्याच पध्दतीने महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद शाळांमध्ये आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. मुलांना शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार मिळून आदर्शवत भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी पुढे येणे गरजेचे आहे, अशा भावना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज व्यक्त केल्या.

            शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ च्या शाळेच्या आजच्या पहिल्या दिवशी सांगली येथील स्फुर्ती चौकातील महानगरपालिकेच्या शाळा क्र. ७ मध्ये पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी  मुलांचे गुलाबपुष्प व रोपटे देवून स्वागत केले. यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी संवाद साधताना पालकमंत्री डॉ. खाडे यांनी या भावना व्यक्त केल्या. यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त शिल्पा दरेकर, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी रंगराव आठवले, मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, कार्यक्रम अधिकारी सतिश कांबळे, राकेश दड्डणावर यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, जिल्हा नियोजनमधून महानगरपालिकेला जो निधी दिला जातो त्यातील जास्तीत जास्त निधी शाळेसाठी द्यावा. काही मुले शाळेत लांबून येत असतात या मुलांना शाळेत आणण्यासाठी बस व्यवस्थेबाबतचा प्रस्ताव तयार करावा. त्याचबरोबर महानगरपालिका क्षेत्रातील कोणत्या शाळांना वर्ग खोल्यांची कमतरता आहे, अशा शाळांना आवश्यक वर्ग खोल्याबाबतचा  प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

शाळेमध्ये पहिलीपासून सेमी इंग्लिश असल्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश मधून शिकण्याची संधी मिळत आहे. शिक्षणाचा दर्जा उच्च ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या शाळेत आवश्यक  सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी सांगितले.  यावेळी त्यांनी उपस्थित मुलांना शुभेच्छा दिल्या.

मुख्याध्यापिका स्मिता सौंदत्ते, राकेश दड्डणावर यांनी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली व  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सन २०१९ मध्ये शाळेची पटसंख्या ७० होती ती आता सुमारे ४५० पर्यंत पोहचली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

पहिली ते पाचवी पर्यंत असणाऱ्या या शाळेस  सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग मंजूर करून दिल्याबद्दल शाळेच्यावतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा आर्यविन ब्रिज पुलाची प्रतिमा भेट देवून यावेळी सत्कार करण्यात आला.

000000

शिक्षक व पदवीधर निवडणूक मतदानाच्या वेळेत वाढ

ठाणे, दि. 15 (जिमाका) :  महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण विभाग पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातीलर उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 च्या प्रसिध्दी पत्रकानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.  या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदारसंघांकरिता मतदान करण्याची वेळ बुधवार, दिनांक. 26 जून 2024 रोजी सकाळी 8.00 ते सायं 4.00 अशी निश्चित करण्यात आली होती.  परंतू आता भारत निवडणूक आयोगाने  दिनांक 03 जून,2024 रोजीच्या पत्रकान्वये लोक प्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 56 नुसार पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदानाच्या वेळेमध्ये बदल केलेला आहे.  कोकण पदवीधर मतदारसंघाच्या बुधवार, दि.26 जून 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी सकाळी 7.00 ते सायं 6.00  ही नवीन वेळ निश्चित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर,कोकण विभाग पदवीधर व मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी मतदान करावे या उद्देशाने मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली असून दिनांक 26 जून,2024 रोजी  पदवीधर व शिक्षक मतदारांनी  मोठ्या संख्येने व उत्साहाने आपल्या मतदानाचा हक्क बजावावा  असे आवाहन उपसचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी म.स.पास्कर यांनी केले आहे.

000000

कुवैतच्या आगीत मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे मृतदेह देशात पोहोचले

नवी दिल्ली, 14:  कुवैतच्या दक्षिण मंगफ परिसरातील इमारतीला काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत  45 भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या दुर्घटनेत महाराष्ट्रातील मुंबई, मालाड (पश्चिम) येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

भारतीय हवाई दलाच्या C-130J  या विशेष विमानाने मृतदेहांना कुवैतहून भारतात आणले गेले. कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाचे आज आगमन झाले. मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3 जणांचा समावेश आहे. या 30 जणांचे मृतदेह कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर संबंधित राज्य शासनाकडे सुपुर्द करण्यात आले.  उर्वरित मृतदेहांना नवी दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या C-130J  या विशेष विमानाने आणले गेले.

बुधवारी पहाटे साडेचार वाजता  ही आग लेबर कॅम्पच्या स्वयंपाकघरातून इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे सुरु झाली. भीषण आग लागल्यानंतर काही लोकांनी अपार्टमेंटमधून उड्या मारल्या, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, तर काहीजण आगीत होरपळून व धुरामुळे गुदमरून मृत्युमुखी पडले. कुवैतमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली. या दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये महाराष्ट्रातील एका कामगाराचा समावेश आहे. मुंबईच्या  मालाड (पश्चिम), मालवणी येथील 33 वर्षीय डेनी बेबी जे मागील चार वर्षांपासून कुवैतमधील एका खाजगी कंपनीत अकाउंटंट आणि सेल्स समन्वयक म्हणून काम करत होते, ते मृत्युमुखी पडले.

मृतांच्या यादीत केरळमधील 23, तामिळनाडूतील 7, आंध्र प्रदेशातील 3, उत्तर प्रदेशातील 3, ओडिशातील 2 आणि बिहार, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, झारखंड, हरियाणा यासारख्या उर्वरित सात राज्यांमधून प्रत्येकी एक अशा एकूण 45 जणांचा समावेश आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि कुवेती अधिकारी सतत संपर्कात असून, या दुर्घटनेत जखमी झालेल्या 50 हून अधिक भारतीयांवर उपचार सुरु आहेत. तसेच, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिंचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. मालाड येथील डेनी बेबी करुणाकरण यांचा मृतदेह दिल्ली येथून रात्री 11.40 वाजता 6ई 519 या विमानाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येईल. सदर विमान शनिवारी पहाटे 1.40 वाजता मुंबई येथे पोहचेल. परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी कुवैत येथील घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी करून आवश्यक समन्वय साधत या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्रातील डेनी बेबी करूणाकरण यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप पोहचविण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राजशिष्टाचार अधिकारी किशोर कनौजिया यांनी याबाबत आवश्यक समन्वय केले.

पंतप्रधान मोदींकडून मदतीची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेत मृत पावलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी पीडित कुटुंबांना शक्य त्या सर्व प्रकारची मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यांनी एक्सच्या माध्यमातून हा दुर्दैवी प्रसंग अत्यंत वेदनादायक असल्याचा शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.

00000

बकरी ईद शांततेत व सौहार्दाच्या वातावरणात साजरी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 14 : येत्या सोमवारी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा पवित्र सण विभागात सर्वत्र साजरा होणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखून भाईचारा व सलोख्याच्या वातावरणात बकरी ईद आनंदात साजरी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे केले.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आज कायदा व सुव्यवस्थेबाबतचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त संजय पवार यावेळी उपस्थित होते.

डॉ. पाण्डेय म्हणाल्या की, बकरी ईदच्या अनुषंगाने नमाज अदा करतेवेळी प्रत्येक ईदगाहमध्ये आवश्यकतेनुसार जबाबदार स्वयंसेवक नेमावेत. विभागात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे पालन होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बकरी ईद शांततेत व आनंदात साजरी होण्यासाठी शांतता कमिटीच्या बैठकी घेण्यात याव्यात व महत्वपूर्ण सुचनांबाबत सर्वांना अवगत करावे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणीही, कोणत्याही प्रकारे गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक, गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे कुर्बानी देणार नाही, याची नोंद घ्यावी. गोवंशीय प्राण्यांची अवैधपणे वाहतूक निदर्शनास आल्यास स्थानिक पोलीसांशी किंवा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केले.

            त्या पुढे म्हणाल्या की, कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वच धर्मियांची जबाबदारी आहे. शांतता व सुव्यवस्थेच्या माध्यमातून सर्वधर्मिय बांधवांनी एकत्र घेऊन सण-उत्सव साजरा करण्यासाठी पुढे यावयाचे आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियमानुसार कोणत्याही प्रकारचा गोवंश जसे गाय, वळू, बैल या प्राण्यांची कत्तल करण्यास संपूर्ण मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे ईअर टॅगिंग शिवाय पशुधनाची खरेदी-विक्री व वाहतूक होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासन व पशुसंवर्धन विभागाने घ्यावी. पशुधनाची इअर टॅगिंग करण्याबाबत शहरी तसेच ग्रामीण भागात विविध माध्यमातून जनजागृती करावी. गोवंशाची अवैधरित्या वाहतूकीवर पोलीस विभागाने दक्ष राहून वेळीच कार्यवाही करावी. सणाच्या कालावधीत विभागात कुठलाही अनुचित प्रकार घडु नये म्हणून पोलीस विभागाने विभागातील सिमावर्ती भागातील व शहरात दाखल होणाऱ्या चेक पोस्ट चोख बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. यापूर्वी देखील आपण या सणासाठी उत्तम नियोजन केले आहे. त्याहून अधिक प्रभावी आणि चांगली अंमलबजावणी यंदा होईल, याकडे लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिल्या.

            पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्ती बाबत मदत कार्य व नियोजन बाबत विभागीय आयुक्तांनी बैठकीत आढावा घेतला. मान्सूनपूर्व तयारी व पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून बचावासाठी विभागीय व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष तसेच पोलीस विभागाने दक्ष राहून मदत व सहाय्यतेसाठी सजग राहावे, असे आवाहन डॉ. पाण्डेय संबंधित शासकीय यंत्रणांना केले.

बकरी ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर तसेच पावसाळ्यात अचानक उद्भणाऱ्या आपत्तींना तोंड देण्यासाठी पोलीस विभाग सज्ज असून तात्काळ मदत व सहाय्यता पुरविण्यासाठी आवश्यक ती सर्व पूर्वतयारी करण्यात आली असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. पोकळे व पोलीस आयुक्त श्री. रेड्डी यांनी यावेळी दिली.

0000

ताज्या बातम्या

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची...

0
पंढरपूर, दि. ६- पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र...

आषाढी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला शुभेच्छा

0
मुंबई, दि. ५ : "आषाढी वारी ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भक्तीची, वारकऱ्यांच्या शक्तीची, अध्यात्मातील शिस्तीची, समतेच्या विचारांवरील श्रद्धेची गौरवशाली परंपरा आहे. महाराष्ट्राच्या अध्यात्मिक, सांस्कृतिक समृद्धीची...

‘पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पर्यावरणाची पूजा, रक्षण व संवर्धनाने जग वाचवण्याचा संतांचा संदेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृह परिसरात वृक्षारोपण पंढरपूर, दि. 5 : ‘पर्यावरणाची वारी, पंढरपूरच्या दारी’ हा...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘एकात्मिक सनियंत्रण कक्ष’ व ‘हरित वारी’ ॲपचे उद्घाटन

0
पंढरपूर, दि. ५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने पंढरपूर आषाढी वारीच्या संनियंत्रणासाठी शहर पोलीस ठाण्याच्या मागे स्थापन करण्यात आलेला एकात्मिक...

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
पंढरपूर, दि.५:  सर्व संतांनी निसर्गप्रेम आणि स्वच्छतेचा संदेश दिला आहे, आपल्या नद्या, निसर्गांवर प्रेम करायला शिकवले आहे. त्यामुळे विठुमाऊलीच्या दर्शनाला येताना त्यांचा संदेश प्रत्यक्षात...