सोमवार, जुलै 7, 2025
Home Blog Page 713

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून २५० कोटींच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखडयास मान्यता

सोलापूर, दि. 19(जिमाका):- जागतिक पर्यटनाच्या नकाशावर सोलापूर जिल्ह्याला आणून स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणे यासाठी जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचा लाभ घेऊन जल, कृषी, धार्मिक व विनयार्ड पर्यटनाच्या अनुषंगाने विविध सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून सुमारे 250 कोटीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला आहे. त्यास मान्यता देण्यात येत असून यावर्षीच्या अंदाजपत्रकात निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात एकात्मिक पर्यटन विकास आराखडा मान्यतेच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की पर्यटनाच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपण या आराखड्याला मान्यता देत असून यासाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल, त्याबाबतचा मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावा व याच अधिवेशनातील अंदाजपत्रकात या आराखड्यासाठी टोकन निधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

तसेच या आराखड्यातील सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या निर्माण करण्यात येणार असल्याने अशा सुविधा देणाऱ्या संस्थांची निवड करावी. या प्रस्तावित केलेली सर्व कामे उत्कृष्ट दर्जाची होऊन देश विदेशातील पर्यटकांना समाधानकारक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. याच अनुषंगाने स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ निर्माण असल्याने या भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याने हा पर्यटन आराखडा खूपच महत्वपूर्ण असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

पुणे येथे उपमुख्यमंत्री तथा वित्त नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे प्राथमिक स्तरावर जिल्ह्याच्या पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले व यावेळी उपमुख्यमंत्री महोदयाकडून या बजेटमध्ये तरतूद केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. आज आपल्याकडून या आराखड्यास मान्यता मिळाल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने आजच राज्य शासनाला आराखडा सादर करण्यात येईल. तसेच उजनी  धरणात जल पर्यटन, 94 धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास होऊन येथे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन स्थानिक नागरिकांची आर्थिक उन्नती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेला आहे. हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून येथे 94 पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे 90 किलोमीटर लांबीचे पात्र असून पात्राची रुंदी जवळपास सहा किलोमीटर आहे. येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्र अनुभवयला मिळणार आहे. तसेच या ठिकाणी देशातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पॅव्हेलियन निर्माण करण्यात  येऊन यात माहिती, तिकीट केंद्र व प्रतीक्षलाय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, 1 हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम,, रॉक पुल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे आशीर्वाद यांनी सांगितले.

आपला सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनात ही अग्रेसर असून पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन स्थळ अंतर्गत विकास केला जात असून या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या ही मोठी आहे. त्याप्रमाणे च उजनी धरण परिसर व जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला, मासेमारी सह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. माळशिरस व करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये विन यार्ड, मनोरंजन, बायसिकल राईड, चीज टेस्टिंग, हॉटेल्स या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.

उजनीच्या सर्वेक्षणास 20 जून पासून सुरुवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे व त्यानंतर राज्य शिखर समिती ची मान्यता मिळून पुढील सहा महिन्याच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.

   जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व आमदार संजय शिंदे यांच्यामुळे पर्यटन आराखड्याला गती

जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करणे व त्या अनुषंगाने सर्व बाबींची पूर्तता करणे या कामास मागील दहा वर्षांपूर्वी सुरुवात झालेली होती परंतु काही कारणामुळे हा आराखडा मार्गी लागत नव्हता. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जुलै 2023 मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर पर्यटन आराखडा कामास गती आली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहून त्यादृष्टीने पर्यटन विकास आराखड्यात महत्त्वपूर्ण चार घटक अंतर्भूत केले व त्या पार्श्वभूमीवर विविध स्तरावर अभ्यास करून एक परिपूर्ण एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात आला. यासाठी करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनीही पाठपुरावा केला.

पर्यटन प्रकल्प

सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल, कृषी आणि ग्रामीण पर्यटन यांचे अनोखे मिश्रण आहे. उजनी धरण हा या पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडवून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार असल्याने हा पर्यटन प्रकल्प होणे अत्यंत आवश्यक आहे.

सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा

मुंबई, दि. 18 : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.

राज्यसभा सदस्य प्रफुल्ल मनोहरभाई पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी श्रीमती पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.

 

0000

प्रकल्पबाधितांच्या अडचणी सोडविण्यासाठी सद्यस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 18 : शेतकरी व नागरिकांच्या जमीन अधिग्रहणातून प्रकल्पांची उभारणी होत असते. त्यामुळे संबंधितांना त्याचा मोबदला व सर्व सुविधायुक्त ठिकाणी नागरिकांचे पुनर्वसन होणे क्रमप्राप्त आहे. प्रकल्पबाधितांच्या अडचणी कालमर्यादेत सोडविण्यासाठी सिंचन प्रकल्पांतर्गत असलेल्या भूसंपादन व पुनर्वसन विषयक अडचणीबाबतचा सद्यस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.  

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भूसंपादन व पुनर्वसनविषयक अडचणींचा आढावा विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी आज घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपायुक्त (सामान्य प्रशासन) संजय पवार, उपायुक्त (पुनर्वसन) गजेंद्र बावणे, उर्ध्व वर्धा सिंचन मंडळ व अमरावती पाटबंधारे मंडळाचे अधिक्षक अभियंता, भूसंपादन उपजिल्हाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

            बैठकीत अमरावती जिल्ह्यातील सिंचन अनुशेषांतर्गत असलेल्या चंद्रभागा प्रकल्प, वासणी प्रकल्प, निम्न चारघड, निम्न पेढी व पेढी बॅरेज या प्रकल्पांतर्गत पुनर्वसन व भूसंपादनामध्ये क्षेत्रीय स्तरावर असलेल्या अडीअडचणींबाबत सविस्तर आढावा विभागीय आयुक्तांनी घेतला. या संदर्भात सविस्तर चर्चा संबंधित कार्यन्वयन यंत्रणांसोबत करण्यात आली. प्रकल्पांच्या संबंधित भुसंपादन व पुनर्वसनाच्या अडचणी तेथील नागरिकांना विश्वासात घेऊन प्राथम्याने सोडवाव्यात, अशा सूचना डॉ. पाण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. भूसंपादन व त्यानंतर तेथील नागरिकांचे पुनर्वसन सुरळीतपणे होण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. पुनर्वसनाची प्रक्रिया होत असताना संबंधित नागरिकांच्या सूचना व हरकती सुध्दा विचारात घ्याव्यात, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी केल्या.

अपर वर्धा प्रकल्पांतर्गत सिंचन क्षमता वाढविण्याचे दृष्टीने पिकांचे उत्तमरित्या नियोजन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी कृषी विभागाला दिल्या. प्रकल्पबाधितांचे प्रश्न व अडचणी सुनियोजित पध्दतीने सोडविण्यासारठी सिंचन प्रकल्पांतर्गत येत असलेल्या भूसंपादन व पुनर्वसन विषयक अडचणींबाबतचा सद्यस्थितीदर्शक अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या.

0000

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिबिराचे २१ जूनला मंत्रालयात आयोजन

मुंबई दि. १८ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शुक्रवार, २१ जून २०२४ रोजी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात सकाळी ८.३० वाजता योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य शासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपले शरीर निरोगी असेल तरच आपण आयुष्यातील सर्व गोष्टीचा आनंद घेऊ शकतो. योगासन हे केवळ व्यायाम नाही. तर हे आपले शरीर आणि मन दोन्ही जोडण्याचे साधन आहे. योगामुळे शरीरासोबत आपले मनही निरोगी राहते. योगामुळे अनेक आजार देखील बरे होतात. योगाभ्यास व योगाची संपूर्ण पद्धती सर्वांना माहिती व्हावी तसेच जगभरात योगाचा प्रसार व्हावा, या हेतूने दरवर्षी २१ जून रोजी ‘जागतिक योग दिन’ साजरा केला जातो.

0000

राजू धोत्रे/विसंअ/

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २ चा प्रस्ताव मंत्रिमंडळ मान्यतेसाठी सादर करावा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई दि. १८ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा मंजुरीचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करावा असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या आढाव्यासाठी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये अंदाजित सहा हजार कोटी किंमतीचा दुसरा टप्पा राबविण्यास शासनाने जून २०२३ मध्ये तत्वतः मान्यता दिलेली आहे. पहिल्या टप्प्यात 5284 गावांचा समावेश होता तर दुसऱ्या टप्प्यात 6,959 गावांचा समावेश असेल. यासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शासनाने निश्चित केलेले शेती उत्पादकता वाढविणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, शेतीमध्ये कर्बग्रहण वाढविणे हे उद्देश साध्य करावेच. शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले धान्य प्रक्रिया करून साठवणूक करण्याची यंत्रणा उभी करावी. अल्पभूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी संशोधन व्हावे. तसेच शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणाऱ्या व विद्यापीठांनी विकसित केलेला छोट्या यंत्रांचा वापर होण्यासाठी सुद्धा या प्रकल्पातून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा यावेळी मंत्री श्री. मुंडे यांनी व्यक्त केली.

या बैठकीस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, कृषी आयुक्त रावसाहेब भागडे, कृषी उपसचिव संतोष कराड यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई, दि. १८ :- भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या विधानपरिषदेच्या ११ सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै २०२४ रोजी संपणार आहे. या रिक्त होणाऱ्या जागांकरिता द्विवार्षिक निवडणूक होत असून यासाठी शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी मतदान होणार आहे.

विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा श्यामसुंदर कायंदे, विजय विठ्ठल गिरकर, अब्दुल्ला खान अ.लतीफ खान दुर्राणी, नीलय मधुकर नाईक, ॲड. अनिल दत्तात्रय परब, रमेश नारायण पाटील, रामराव बालाजीराव पाटील, डॉ.वजाहत मिर्झा अथर मिर्झा, डॉ.प्रज्ञा राजीव सातव, महादेव जगन्नाथ जानकर आणि जयंत प्रभाकर पाटील हे २७ जुलै २०२४ रोजी विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत.

या निवडणुकीसाठी मंगळवार, 25 जून 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. मंगळवार, 2 जुलै, 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल. उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी बुधवार, 3 जुलै, 2024 रोजी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, 5 जुलै, 2024 अशी आहे. शुक्रवार, 12 जुलै, 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत या निवडणुकीसाठी मतदान होईल. तर त्याच दिवशी 5 वाजेनंतर मतमोजणी करण्यात येईल. ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 16 जुलै, 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000

वंदना थोरात/विसंअ/

कौशल्य विकास विभागातील योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, दि. १८ : तालुकास्तरीय रोजगार मिळावे, नमो महारोजगार मेळावा २०२४ ची पूर्वतयारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयातील आगामी शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रिया यासह विभागाच्या कामकाजाचा मंत्रालय दालन येथे कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा घेतला.

कौशल्य रोजगार विभागाअंतर्गत २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय संस्थांमध्ये योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशा सूचना मंत्री श्री. लोढा यांनी केल्या. त्याचबरोबर रोजगार आयुक्तालय अंतर्गत तालुकास्तरीय रोजगार मेळाव्याचे स्वरूप, राज्यात आयोजित करावयाचे एकूण मेळाव्याची संख्या, आगामी तीन महिन्यात घ्यावयाच्या मेळाव्याचे नियोजन., महास्वयं पोर्टलची सद्यस्थिती, सन २०२४-२५ मध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजनासाठी करावयाची पूर्व तयारी, महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठातील प्रवेश, कोर्सेस वाढविण्याबाबत केलेले नियोजन., स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य प्रबोधिनी, विद्या विहार येथील कोर्सेस, बॅचेस, संत गाडगेबाबा स्वच्छ भारत अकॅडमी तर पाच महसुली विभागात कार्यान्वित करणे,२ जुलै रोजी कौशल्य दिंडीचे आयोजन करणे, महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, सुकाणू समिती स्थापनेबाबतची सद्यःस्थिती याबाबत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आढावा घेतला.

या बैठकीला कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे सचिव गणेश पाटील, राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या आयुक्त निधी शर्मा, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी,  महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय व प्रशिक्षण मंडळाचे संचालक योगेश पाटील, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे उपायुक्त डी. डी. पवार यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

खरीप-२०२४ साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीकविमा – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम – 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असून, याही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा

खरीप 2024 साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असून, त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

योजनेतील वैशिष्ट : विमा योजनेत समाविष्ट  पिके भात(धान), खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मुग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, कारळे, कापूस व कांदा या १४ पिकांसाठी, अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील, भाडेपट्टीने शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-पीक पाहणी :- शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी  मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणे, उदाहरणार्थ शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मस्जिद  यांच्या जमिनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भात, कापूस, सोयाबीन  पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६०% भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे, पिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच  असावा, पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात, आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे, विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  घेऊन प्राधिकृत बँकेत किंवा  कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता  किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत  १५ जुलै २०२४ आहे.

सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम, यात जिल्हानिहाय फरक संभवतो.

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु.४०००० ते ५१७६०, ज्वारी रु.२०००० ते ३२५००, बाजरी रु १८,००० ते ३३,९१३, नाचणी रु. १३७५० ते २००००, मका रु ६००० ते  ३५५९८,  तूर रु २५००० ते ३६८०२, मुग २०००० ते २५८१७, उडीद रु. २०००० ते २६०२५, भुईमुग रु. २९००० ते ४२९७१, सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७,  तीळ रु. २२००० ते २५०००, कारळे रु. १३७५०, कापूस रु. २३००० ते  ५९९८३, कांदा रु. ४६००० ते ८१४२२.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७, संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

0000

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हप्त्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथून वितरण

मुंबई, दि. 18 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (एप्रिल 2024 ते जुलै 2024) 17 व्या हप्त्याचे वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी, उत्तर प्रदेश येथून करण्यात आले.

देशातील शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबीयास रु. 2000/- प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात रू. 6000/- प्रती वर्षी लाभ दिला जातो.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रतिवर्षी पुढील वेळापत्रकानुसार पात्र शेतकरी कुटुंबाच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) निधी जमा करण्यात येत आहे. पहिला हप्ता माहे डिसेंबर ते मार्च रु 2000, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै रु.2000, तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर रु.2000 असा असेल. राज्यात पी.एम.किसान योजनेच्या एकूण 16 हप्त्यांमध्ये शेतकरी कुटुंबाच्या खात्यावर एकुण रु 29630.24 कोटी रक्कम जमा करण्यात आलेली आहे.

देशातील एकूण 9.20 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20 हजार कोटी रक्कम वितरित करण्यात येणार असून त्यामध्ये राज्यातील एकूण 90.48 लाख लाभार्थींना रक्कम रू. 1845.17 कोटी वितरीत होणार आहेत, खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पिकाचे सुधारित बियाणे, खते घेणे, पेरणी करणे इत्यादी शेती कामासाठी या निधीचा निश्चित चांगला उपयोग होणार आहे .

००००

दत्तात्रय कोकरे/विसंअ/

कबड्डीला प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी निवडणूक घेण्याची सूचना

मुंबई दि 18:- राष्ट्रीय क्रीडा संहितेचे राज्य कबड्डी असोसिएशन कार्यकारिणीने काटेकोरपणे पालन करावे व त्यानुसार राज्यस्तरीय निवडणूक पार पाडावी. तसेच कोणत्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिल्या. कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन सल्लागार समिती व कार्यकारिणीच्या बैठकीचे आज दादर शिवाजी पार्क येथील कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव साळवी सभागृहात महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले होते. यावेळी असोसिएशनचे सर्वश्री उपाध्यक्ष, आमदार भाई जगताप, माजी आमदार अमरसिंह पंडित, दिनकर पाटील, रा. उपाध्यक्षा शकुंतला खटावकर, सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगल पांडे, सहकार्यवाह रविंद्र देसाई, असोसिएशनचे आजीव सदस्य तथा उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव अविनाश सोलवट यांच्यासह कार्यकारिणी सदस्य आणि असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कबड्डी खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसांच्या रकमा वाढविण्यात आल्या आहेत. खेळांना महत्व प्राप्त व्हावे यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. ग्रामीण भागात कबड्डी जास्त रूजली आणि वाढली असल्याने आमदार निधी, जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जातो. कबड्डी खेळाला सुवर्ण दिवस आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रीय संहितेनुसार कार्यकारिणी निवडणूक घेण्यात यावी. स्पोर्ट्स कोडचे पालन करण्यात यावे. 21 जून रोजी नव्याने होणाऱ्या कार्यकारिणीसाठी निवडणूक होणार असून, 19 जून ही जिल्हानिहाय मतदारांची नावे स्वीकारण्याची अंतिम तारीख असल्याचेही त्यांनी सांगितले.
***

ताज्या बातम्या

आता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत जेईई – सीईटीची कोचिंग

0
चंद्रपूर, दि. 6 : ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाखाणण्याजोगी असते. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे किंवा संधी उपलब्ध न झाल्यामुळे असे विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे...

पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्याकडून आदिवासी विकास विभागाचा आढावा

0
चंद्रपूर, दि. 6 : पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी शनिवारी, जिल्ह्यातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला. तसेच राज्य शासनाने सुरू केलेल्या 100 दिवस प्रशासकीय...

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे प्रयाण

0
मुंबई, दि. ६ : भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून विमानाने आज दुपारी २.०० वाजता कोची येथे प्रयाण झाले. यावेळी  अतिरिक्त मुख्य सचिव व...

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!

0
ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत मुंबई, दि.  : - ‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विद्यार्थ्यांच्या ‘एआय’ प्रकल्पांचे कौतुक

0
पंढरपूर दि. ६  : पंढरपूर येथील अरिहंत पब्लिक स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी’ या आगळ्या-वेगळ्या उपक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच व्हिडिओ...