बुधवार, मे 14, 2025
Home Blog Page 712

वैद्यकीय व आरोग्य सेवा पद भरतीसाठी बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांची परीक्षा होणार

मुंबई, दि. 05 :  महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट – अ पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी ऑनलाईन पोर्टलद्वारे पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले. अर्ज सादर करण्याची मुदत 1 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत होती. या मुदतीअंती 22 हजार 981 बीएएमएस अर्हताधारक उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. 283 रिक्त पदे भरावयाची आहेत. ही पदे परीक्षेद्वारे भरण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम, वेळापत्रक, स्वरूप व इतर माहिती नंतर कळविण्यात येणार आहे, असे आरोग्य सेवा आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. 05 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला 9 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालय, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालय येथे विनामूल्य मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले आहे.

जास्तीत जास्त रुग्णांना या मोहिमेचा लाभ घेता यावा, यासाठी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी या मोहिमेला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मोहिमेसाठी शासकीय आरोग्य संस्थांसह, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खासगी संस्थांचे सहकार्य घेण्यात येत आहे. याविषयी किंवा इतर आरोग्य विषयक सल्ला घेण्यासाठी नागरिकांनी 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पंधरवड्यात 1 लाख  शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष विभागाने ठेवले आहे.

या मोहिमेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विभागाने जिल्हानिहाय नियोजन केले असून संबंधित आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्र शासनामार्फत   ‘राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान’ ही विशेष मोहीम जून, 2022 पासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत 50 किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये अंधत्व आणि एसव्हीआय कारणीभूत असलेल्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांचा अनुशेष पूर्णपणे भरून काढण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या या मोहिमेमुळे नागरिकांना नि:शुल्क शस्त्रक्रिया करून आपली दृष्टी कायम ठेवता येणार आहे. राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान अंतर्गत 2022 ते 2025 या तीन वर्षात 27 लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट आहे.

सन 2022-23 मध्ये राज्यात मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे 112.51 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात डिसेंबर, 2023 पर्यंत एकूण उद्दिष्टाच्या 67.30 टक्के मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. सन 2023-24 या आर्थिक वर्षातील मोतिबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याकरिता दि. 19 फेब्रुवारी ते दि.04 मार्च 2024 या कालावधीत जिल्हा स्तरावर ‘विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असून मोहिमेकरिता 9 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

परिचारिका संवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. 5 : परिचारिका संवर्गातील सर्व स्तरावरील शुश्रूषा, शैक्षणिक व प्रशासकीय विभागातील तसेच प्राचार्यांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले.

परिचारीका संघटनांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालयात बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी परिचारिकांच्या समस्या सोडविण्यासंदर्भात शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, उपसचिव वैशाली सुळे तसेच परिचारिका संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मेट्रन तसेच परिचारिकांच्या रिक्त पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी रिक्त पदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करावी.  परिचारिकांना शुश्रूषा अधिकारी  पदनाम देण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांना लिपिक संवर्गातील काम देऊ नये तसेच, रिक्त लिपिक पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी. वैद्यकीय महाविद्यालयात पाळणाघर असणे अत्यावश्यक आहे. परिचारिका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबाबत कार्यवाही सुरू असून, नव्याने बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानात या कर्मचाऱ्यांना सोयी देण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

सहसंचालक पद निर्मितीसाठी प्रस्ताव सादर करावा, केंद्राप्रमाणे नर्सिंग भत्ते, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत देय असलेला भत्ता, गणवेश भत्ता मिळण्यासंदर्भात वित्त विभागाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिले.

००००

श्रद्धा मेश्राम/स.सं

‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ४  मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी १९ कोटी ७० लाखाचा निधी वितरित करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिली.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, नवी मुंबई मार्फत ३६ जिल्हयांना १९.७० कोटी (रुपये १९ कोटी ७० लाख) वितरित करण्यांत आले याबाबत  जिल्हा स्तरावर जिल्हा निहाय व तालुका स्तरावर कॅम्प आयोजित करुन १ एप्रिल २०२३ नंतर जन्मलेल्या मुलींना लाभ देण्याची कार्यवाही विभागामार्फत करण्यांत येत आहे.

आतापर्यत जवळपास ३५ हजार प्रस्ताव जिल्हा कार्यालयात प्राप्त झालेले असून पुढील १५ दिवसांत तालुका निहाय / जिल्हा निहाय कॅम्प आयोजित करण्यांत येत असून पात्र लाभार्थीनी जवळच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत पिवळया व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात जन्मलेल्या मुलीना लाभ दिला जाईल. मुलींच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये, सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/- एवढी रक्कम देण्यात येईल.

ही योजना दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्‍या एक अथवा दोन मुलींना लागू राहील, तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

जळगाव जिल्हा ‘वारकरी भवन’ ला निधीची कमतरता पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

            जळगाव दि. 4 (जिमाका ) : जळगाव सारख्या संताच्या भूमीत वारकरी भवन होत आहे. अशा या जिल्हास्तरीय वारकरी भवनला निधीची कमतरता पडू देणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

            आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या वारकरी भवन‘ चे भूमिपूजन खेडी (जळगाव) येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या भूमिपूजन सोहळ्यास ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजनपाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटीलमदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटीलखा. उन्मेष पाटीलखा  रक्षा खडसेआ. राजुमामा भोळेआ किशोरआप्पा पाटीलआ.चिमणराव पाटीलआ.चंद्रकांत पाटीलजिल्हाधिकारी आयुष प्रसादजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकितह.भ.प.गजानन महाराज वरसाडेकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की,आज आपल्याला इथे आल्यावर वारकरी संप्रदाय भेटला आणि  मनाला खूप आनंद झाला. आज उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिल्या  वारकरी भवन‘ चे भूमिपूजन होत  आहे. या कामी ज्यांचे ज्यांचे हात लागले त्यांचे आभार आणि ज्यांचे लागणार आहेत सर्वांना या निमित्ताने मी मनापासून  शुभेच्छा देतो.  

             पालकमंत्री गुलाबराव  पाटील यांनी विकासकामांसोबत अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले आहेत परंतू  यात सर्वात महत्वाचे असे वारकरी भवन‘ बांधण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला असल्याचे सांगून  प्रत्येक जिल्ह्यात वारकरी भवन बांधावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

            ते पुढे म्हणाले कीआपल्या राज्यात वारकरी संप्रदाय खूप मोठा आहे. तो गावोगावी अंखड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातूनत्यातील कीर्तनाच्या माध्यमातून अतिशय दुर्गम भागात देखील पांडुरंगाचे नामस्मरण करुन मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाच काम तसेच जनजागृतीच काम करीत आहे.   पंढरपुरचा विकास होत असतांना  राज्यातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेतत्या सर्व तीर्थक्षेत्राचा विकास करण्याचे शासनाने ठरविले आहे. विशेष म्हणजे राज्यातील ‘ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी  राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये अडीच हजार कोटींची  तरतुद केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असे आहे वारकरी भवन

            प्रस्तावित जिल्हातील वारकरी भवन ५५ एकरांच्या भूखंडावर होणार असून त्याला सहा कोटी सहा लाख एवढा निधी अपेक्षित आहे. इथले वारकरी भवन इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. या वारकरी भवनास जिल्हा वा‍र्षिंक योजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 6 कोटी 6 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एकूण बांधकाम- १८१०.३८ चौ.मी. (तळ मजला) (टप्पा-1) वारकरी भवन पहिल्या टप्प्यात  सभामंडप व भक्त निवास इमारत (मुख्य इमारत) प्रस्तावित आहे.

००००

ख्यातनाम चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांच्या ‘रिव्हर रिटर्न्स’ या चित्रप्रदर्शनास उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट

मुंबई, दि 4 : नित्या आर्टिस्ट सेंटर पुनर्निर्मीत आर्टस गॅलरीज येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट दिली. सध्या येथे ख्यातनाम चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांचे रिव्हर रिटर्न्स हे अमूर्त चित्रकारितेचे प्रदर्शन सुरू आहे.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व चित्रांचे तपशीलवार रसग्रहण केले व भारतीय अमूर्त चित्रकारितेची गौरवशाली परंपरा प्रकाश बाळ जोशी हे समर्थपणे सांभाळत आहेत, असे सांगून भेटी प्रसंगी श्री. जोशी यांचे अभिनंदन करुन सत्कार केला.

 

0000

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस

            मुंबई, दि. ४ : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी ३ मार्च रोजी राज्यातील  ० ते ५ वर्षांपर्यंतच्या ९५ लाख ६४ हजार ६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेला आपल्या ५ वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोस देण्याबाबत आवाहन केले होते.

            राज्यात एकूण ८९,२९९ बुथ व ट्रान्झिंट टिम २७,५५३ फिरती पथक १५,४३० व रात्रीचे पथक ६४२ याद्वारे ० ते ५ वर्ष वयोगटातील ९५,६४,६१३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला आहे. यानंतर ग्रामीण भागात ३ दिवस व शहरी भागात ५ दिवस (आय.पी.पी.आय.) राबविण्यात येणार असून घरोघरी जाऊन सुटलेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

            राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकारी यांची नेमणूक करुन त्यांच्या मार्फत सर्व जिल्हा व मनपा या मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आली व त्यांच्यामार्फत मोहिमेचे पर्यवेक्षण करण्यात आले. सर्व शासकीय विभाग, अशासकीय संस्था, जागतिक आरोग्य संस्था, युनिसेफ, जे. एस.आय., आय.एम. आय. आय. ए.पी. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने मोहीम १०० टक्के यशस्वी होण्यासाठी मदत झाली.

            देशात पोलिओ निर्मूलन कार्यक्रमाचे अंतर्गत सन १९९५ पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यांत येत आहे. दिनांक ३ मार्च २०२४ रोजी राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

            या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओची अतिरिक्त मात्रा देण्यात आली आहे. दि. २७ मार्च २०१४ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने भारत देश पोलिओ मुक्त असल्याचे प्रमाणित केले आहे. पोलिओग्रस्त असणाऱ्या देशांमधून स्थलांतरामुळे देशात पोलिओ रुग्ण आढळण्याच्या धोका उद्भवू शकतो. यासाठी पोलिओ निर्मुलनाकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे अंमलात आणणे आवश्यक आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ/

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव दि. 4 (जिमाका) :  महाराष्ट्र शासनाचा ” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. टी. बसमध्ये महिलांना पन्नास टक्के सवलत दिली. शेतकऱ्यांना मदत करतांना एन.डी.आर.एफ नियमात बदल केल्याचे सांगून आता मुक्ताईनगर आणि रावेरला जोडणारा इथली भाग्य रेषा बदलणारा हा तापी नदीवरला पूल देत आहोत. तसेच संत मुक्ताईच्या पावनभूमीच्या  पर्यटन विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुंढोळदे (खडकाचे) व रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील  पुलाच्या भूमीपूजनानंतर झालेल्या जाहिर कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आ. किशोरआप्पा पाटील, आ. संजय सावकारे, आ. चिमणराव पाटील, आ.चंद्रकांत पाटील, माजी आ. चंद्रकांत सोनवणे, माजी आ. दशरथ भांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित उपस्थित होते.

मुक्ताईनगरच्या या पुलामुळे 30 ते 35 किलोमीटरचा वळसा वाचणार असून आता मुक्ताईनगर आणि रावेर जोडले जाणार आहे. हा पुल नाबार्ड कडून केला जाणार असल्याचे सांगून या पुलासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात सगळीकडे विकासाची कामं सुरु आहेत. शासन आपल्या दारी हा लोकाभिमुख उपक्रम राबविला जातो आहे. एका छताखाली सगळ्या गोष्टी मिळतायत, कोणाला ट्रॅक्टर मिळतय,कोणाला घर मिळतंय, कोणाला शेती अवजारे मिळतायत अशा अनेक योजनाचा थेट लाभ दिला जात आहे. उद्योगाच्या बाबतीतही शासनाने आघाडी घेतली असून पाच हजार कोटीचे नवे उद्योग राज्यात येत आहेत. त्यामुळे हजारो लोकांना रोजगार मिळणार आहे.

संत मुक्ताबाई यांच्या पावन भूमीच्या विकासासाठी पन्नास कोटी रुपये देणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. तालुक्यातील इतर विकासकामाचे जवळपास 75 कोटी  रुपयांच्या कामाचे आज मुख्यमंत्री यांनी उदघाटन केल्याचे जाहीर केले.

मंत्री अनिल पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मुक्ताईनगर ते रावेरचे प्रवेशद्वार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद आणि मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाचे यश असून आता मुक्ताईनगर बदलायला लागलं आहे.

यावेळी आ. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री यांची कृतज्ञता व्यक्त केली. तापी नदीवरील हा पुल इथल्या जनतेसाठी किती महत्वाचा होता हे सांगितले.

   मुख्यमंत्र्यांनी घेतले संत मुक्ताबाईंच्या समाधीचे दर्शन

संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव यांच्या भगिनी संत मुक्ताबाई यांची समाधी ज्या मुक्ताईनगरमध्ये आहे त्या नगरीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन झाले. सगळे कार्यक्रम आटोपल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी संत मुक्ताबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतले. साडीचोळी वाहिली आणि आरतीही केली.

000

‘ॲडव्हान्टेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन

           मुंबई, दि. 4 : देशाच्‍या विकासात आता चंद्रपूर महत्त्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्‍या माध्‍यमातून लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह 19 कंपन्यांशी सामंजस्‍य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्‍यांच्‍या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्‍या विकासातही हातभार लावेल,  असे प्रतिपादन  वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.  ‘देश के निर्माण में चंद्रपूर मैदान में’ असे सांगून देशविकासाच्या कार्यात चंद्रपूर महत्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

            महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ चे सोमवारी वन अकादमी येथे उद्घाटन झाले.

            त्यावेळी मंत्री श्री मुनगंटीवार बोलत होते. कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्‍यासह आमदार किशोर जोरगेवार, चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी विनय गौडा, सीईओ विवेक जॉन्‍सन, मनपा आयुक्‍त विपीन पालिवाल न्‍यू ईरा व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईडचे मधूर गुप्‍ता, कुमार वार, राकेश प्रसाद, राजेश झंझाड, जी. डी. कामडे, आलोक मेहता, के. जी. खुबाटा, मधुसूदन रुंगटा  उपस्‍थ‍ित होते.

            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर हे आतापर्यंत कोळसा, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. येथे स्‍थापन झालेले उदयोग भविष्‍यात अधिक प्रगती करतील. त्याचा लाभ स्थानिक परिसराला होईल. करार झालेल्‍या कंपन्‍यांच्‍या विविध परवानगींसाठी ‘वन विंडो सिस्‍टीम’ तयार करण्‍यासोबतच एअरपोर्ट, रेल्‍वे, रस्‍ते आदी पायाभूत सुविधा, कौशल्‍य विकासाचे विविध अभ्‍यासक्रम, संशोधन कार्यक्रमांवर भर दिला जाणार असल्‍याचे ते यावेळी म्‍हणाले.

            मंत्री श्री. लोढा यांनी श्री. मुनगंटीवार यांच्‍या कार्याचे कौतुक केले. आ. किशोर जोरगेवार यांनी यावेळी शुभेच्‍छा दिल्‍या.

            मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्‍सन यांनी अॅडव्‍हांटेज विदर्भ व चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या विकासासाठी जिल्‍हा प्रशासनाने विविध कंपन्‍यांशी केलेल्‍या सामंजस्‍य करारासंदर्भात माहिती दिली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सामाजिक, औद्योगिक व आर्थिक विकासाबद्दल विस्‍तृत सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले. ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 संदर्भात एक चित्रफीत दाखवण्यात आली.

            ॲडव्हान्टेज चंद्रपूर 2024 साठी राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि केंद्र शासनाच्या एमएसएमई मंत्रालयाचे सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर व श्‍यामल देशमुख यांनी केले.

५० वर्षांचे व्हिजन तयार करा  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

            चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या क्षमता आणि कमतरता या बाबींचा विचार करून या जिल्‍ह्याच्‍या  विकासासाठी, जिल्‍ह्याला समृद्ध व संपन्‍न करण्‍यासाठी पुढील 50 वर्षांचे व्हिजन तयार करावे, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ संदेशातून केल्‍या. चंद्रपूरमध्‍ये अॅडव्‍हेंचर स्‍पोर्ट्स, वॉटर स्‍पोर्टस, पर्यटन, पर्यटकांसाठी इलेक्‍ट्रीक गाड्या, रिसॉर्टस, बांबू लागवड, मत्‍स्‍यव्‍यवसाय यावर काम करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्हणाले.

चंद्रपूरमध्‍ये स्‍टील प्‍लांट उभारणार – अलोककुमार मेहता

            लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपचे संचालक (मायनिंग अँड स्‍ट्रॅटेजिक प्रोजेक्‍ट) अलोक कुमार मेहता यांनी महाराष्‍ट्रात येऊन सामंजस्‍य करारांवर स्‍वाक्षरी करण्‍याची संधी मिळाल्‍याबद्दल धन्‍यवाद व्‍यक्‍त केले. चंद्रपूरमध्‍ये 40 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून स्‍टील प्‍लांट स्‍थापन करण्‍यात येणार असून त्‍या माध्‍यमातून 60 हजार प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष रोजगार निर्मिती केली जाईल, असे ते म्‍हणाले. मधुसुदन रुंघटा यांनीही मनोगत व्‍यक्‍त केले.

19 सामंजस्‍य करार, 75 हजार 721 कोटींची गुंतवणूक

            ‘अॅडव्‍हांटेज चंद्रपूर’च्‍या उद्घाटन सत्रात लक्ष्‍मी मित्‍तल ग्रुपसह एकुण 19 सामंजस्‍य करार करण्‍यात आले. यामध्ये सुमारे 75 हजार 721 कोटी रुपयांचे करार करण्‍यात आले ज्‍या द्वारे या भागात 50 हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्‍हा प्रशासनाच्‍यावतीने या करारावर स्‍वाक्षरी केली. या विविध करारांवर आर्सेलर मित्‍तल निप्‍पॉन स्‍टील इंडिया लिमिटेडचे अलोककुमार मेहता, न्‍यू ईराचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, लॉईड मेटल्‍सचे मधूर गुप्‍ता, चंद्रपूर सोलारचे राजेश ओसवाल, अंबुजा सिमेंट के. सुब्‍बलक्ष्‍मणन, अरविंदो रिअॅलिटी इन्‍फ्रोस्‍ट्रक्‍चर प्रा. लि. संजय मिश्रा, राजुरी स्‍ट्रील्‍सचे विपीन जैन व विवेक गुप्‍ता, सनफ्लॅग अँड स्‍टील कंपनी लिमिटेडचे एस. महादेवन अय्यर, अल्‍फालॉजिक टेक्‍सेस लिमिटेडचे अंशु गोयल, वेस्‍टर्न कोलफिल्‍ड लिमिटेड हर्षल दातार, अल्‍ट्राटेक एसीसीचे अतुल कंसन, डेस्टीनो मिनरल्‍सचे मोरेश्‍वर झोडे, एसआयएडी युएसएचे उमेश दिघे व अनंत एव्हियेशनचे संचालक यांनी स्‍वाक्षरी केल्‍या.

            मान्‍यवरांच्‍या हस्‍ते यावेळी भव्‍य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्‍यात आले. या प्रदर्शनामध्‍ये कोळसा खाणी, खनिज, लोह – पोलाद, बांबू, मत्स्यव्यवसाय, पर्यटन सोबतच पुरवठा, डेअर, ग्रीन एनर्जी, रिअल इस्टेट, वाहन उद्योग, औषधनिर्माण अशा विविध क्षेत्राशी संबंधित सुमारे 150 स्‍टॉल्‍स आहेत. मान्‍यवरांनी यावेळी या प्रदर्शनाची पाहणी करून कौतुक केले.

0000

दीपक चव्हाण/विसंअ/

राज्यपालांच्या उपस्थितीत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजेमेंटचा दीक्षान्त समारंभ

पुणे दि. ४ : जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरूवातीस एक नवकल्पना होते, प्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळविले. आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारे, त्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटच्या 14 व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला वीकफील्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी. एस. सचदेवा, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, पीआयबीएम गुपचे अध्यक्ष रमण प्रीत आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्री.बैस म्हणाले, नव्या पिढीने नवोन्मेषक, उद्योजक, नवप्रवर्तक आणि आव्हाने स्वीकारणारे व्यावसायिक व्हावे. त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकेरबर्ग दडलेला असेल. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल.

देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या परिवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकांने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखा परिक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात. जागतिक दर्जाच्या कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात. संपत्ती निर्माण करणारे आणि स्टार्ट अप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडावेत, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. बैस यांनी व्यक्त केली.

देशातील 50 टक्क्यापेक्षा अधिक रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, फलोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा क्षेत्रांना प्रभावित करणारे आहे. व्यवस्थापन स्नातक आणि व्यवसाय व्यवस्थापकांनी देशाच्या विकासासाठी एआय शक्तीचा उपयोग करण्यात भारताला अग्रेसर ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पदवीदान समारंभात एमबीएच्या 323 व पीजीडीएमच्या 359 अशा एकूण 682 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपालांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात  सुवर्णपदक  आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

प्रारंभी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रमन प्रीत यांनी प्रास्ताविकात संस्थेद्वारे चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. यावेळी संस्थेतील प्राध्यापक, पालक, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

****

ताज्या बातम्या

महाराष्ट्र रेल्वे फाटक मुक्त करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज मुंबई, दि. १३ : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे ब्रिजचे काम महारेलनी हाती घेतले आहे. आतापर्यंत...

महाराष्ट्राला नागरी क्षेत्रातील प्रकल्पांसाठी आवश्यक सहकार्य करणार – केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर

0
मुबंई, दि. १३: महाराष्ट्रात मेट्रोचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी तसेच नागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांच्या व्यापक अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व सहाकार्य केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून  करण्यात येईल,असे...

चिंचघाट उपसा सिंचन योजनेला गती द्या – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0
मुंबई, दि. १३: चिंचघाट उपसा सिंचन योजना नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात प्रस्तावित महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प आहे. या योजनेचा उद्देश कृषी क्षेत्रात सिंचन सुविधा वाढवून शेतकऱ्यांना...

युवकांनी  ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी – मंत्री चंद्रकांत पाटील

0
मुंबई, दि. १३ : आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन यंत्रणांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास...

महाराष्ट्र सागरी मंडळाने महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा – मंत्री नितेश राणे

0
मुंबई, दि. १३: महाराष्ट्र सागरी मंडळाने प्राप्त होणारा निधी शंभर टक्के खर्च करावा. तसेच मंडळाच्या महसूल वाढीसाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवावा अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे...